बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

कृष्णा देसाई आणि गिरणगावातील दादागिरी


    बाळासाहेबांच्या निधनानंतर जी तीसपस्तीस तास अखंड चर्चा त्यांच्या व शिवसेनेच्या संदर्भात चालू होती, त्यामध्ये अगत्याने कृष्णा देसाई खुनाचा विषय आणला गेला. त्यावर बोलणार्‍या किती लोकांना कृष्णाविषयी चार गोष्टी तरी माहिती आहेत? तो कम्युनिस्ट पक्षाचा परेलचा आमदार होता आणि दिलीप हाटे; विश्वनाथ खटाटे अशा काही शिवसैनिकांनी त्याची तावरी पाड्याच्या वस्तीत जाऊन रहात्या घरात हत्या केली; यापेक्षा कोणती अधिक माहिती चर्चा करतात, त्यांना आहे किंवा होती? त्यावेळच्या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या आणि झालेले आरोप वगळता, चर्चेत बकवास करणार्‍यांना कृष्णाविषयी काडीमात्र माहिती नाही, असे मी ठामपणे सांगू शकतो. याचे कारण मी त्या व्यक्तीला अगदी जवळून बघितले आहे आणि त्याच्या हत्याकांडातला मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षिदार प्रकाश पाटकर, याच्याशी मी बालपणी खेळलेला सुद्धा आहे. त्यामुळेच जेव्हा जेव्हा कृष्णा देसाई हा विषय चर्चेला येतो; तेव्हा त्याबद्दलचे पांडित्य ऐकून मला हसू येते. कारण त्या माणसाबद्दल बोलणार्‍यांना काडीची माहिती नाही हे माझ्या लक्षात येते. शिवसेनेने केलेली राजकीय हत्या किंवा राजकीय खुन; एवढेच त्या घटनेला महत्व दिले जाते. पण हाच कृष्णा देसाई संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातला लालबागचा मोठा ‘लढवय्या’ होता, याची किती लोकांना जाणीव आहे? आणि लढवय्या म्हणजे दंगल, दगडफ़ेक, जाळपोळ, मोडतोड (हल्लीच्या भाषेत खळ्ळ फ़ट्याक) अशा कामातला लढवय्या. त्याचा लालबाग चिंचपोकळी परिसरात तेव्हा मोठा दबदबा होता. म्हणजे दादागिरी होती. पण ज्या चर्चा चालतात, त्या ऐकल्यावर कोणाला वाटेल की गांधीहत्या आणि कृष्णा देसाई खून सारख्याच घटना असाव्यात. तसे अजिबात नव्हते. आजच्या वा अलिकडच्या कालखंडात ज्याला गॅंगवॉर किंवा टोळीयुद्ध म्हणतात, त्यातलाच तोही एक प्रकार होता. पण तेव्हा टोळी वा गॅंगवॉर हे शब्द वापरात आलेले नसल्याने त्याला खून अस संबोधले गेले आहे.

   लालबागमध्ये जशी कृष्णाची दादागिरी होती तशीच राणीबाग भागात बोरकर दादा होता. तो कॉग्रेसवाला दादा आणि कृष्णा कम्युनिस्टांचा दादा होता. त्याच्या परिसरात म्हणजे प्रभावक्षेत्रामध्ये दुसर्‍या कुठल्या पक्षाला सभा घेणेही अशक्य होते. नुसती मोडतोड नाही जीवावर बेतण्याचाही धोका असे. आम्ही लहान मुले होतो, पण कृष्णाने किती खुन पाडले आहेत, ते मोठी माणसे दबल्या आवाजात ऐकलेले आठवते. त्यात मधू अंगणे हे एक नाव होते.  असे कोण व किती त्याचे बळी होते कोणजाणे. पण आमदार हा शब्द अलिकडे लागला आणि सर्वकाही विसरले जाते. की जाणीवपुर्वक ते सत्य सांगायचे तेव्हापासूनच टाळले गेले? पिवळा टेरीलीनचा शर्ट आणि निळी वुलनची पॅन्ट घातलेला कृष्णा देसाई; आमच्या चाळीत कशाला यायचा ते इथे सांगणे सभ्यपणाचे होणार नाही. पण त्यामुळेच त्याला अगदी चार हात अंतरावरून मी बघितलेले आहे. मुद्दा इतकाच, की कृष्णा देसाई हा कोणी सभ्य, सुसंस्कृत, निरुपद्रवी माणूस नव्हता. त्यावेळच्या परिस्थितीने त्याला नगरसेवक व पुढे आमदार बनवले. आणि त्याला त्याची दादागिरी नव्हे; इतकी मराठी अस्मिता त्याला उपयोगाची ठरली होती. कारण तो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातला लढवय्या होता. आणि त्याची निशाणी विळाकणीस होती. ती निशाणी आमच्या परिसरात तरी समितीची निशाणी म्हणूनच लोक ओळखत होते. बाकी कम्युनिस्ट वगैरे कोणाला कळत होते? समिती संपली आहे आणि सगळे पक्ष वेगवेगळे झालेत; हे सामान्य लोकांना फ़ारसे कळत नव्हते. म्हणूनच रिपब्लिकन, संयुक्त समाजवादी वा कम्युनिस्ट मिळून जी नवी संपुर्ण महाराष्ट्र समिती बनली, तीच जुन्या समितीचा वारसा चालवते आहे, अशीच लोकांची समजूत होती. मात्र लोक हळूहळू त्याबद्दल साशंक होत चालले होते. प्रामुख्याने मराठी तरूण राजकारणाकडे संशयाने बघू लागला होता. या तरूणांचे संघटन नव्हते, विभागातल्या संस्था, व्यायामशाळा व मंडळे यातून त्यांचे गट होते, त्यात चर्चा चालायच्या. त्यातूनच मग समितीविषयी एक नाराजीची भावना निर्माण होत चालली होती. पण तिच्याकडे कुठलेच राजकीय व्यासपीठ नव्हते. नेतृत्व नव्हते.

   इतके लढून मुंबई मिळाली, पण त्याच मुंबईत मराठी माणसाला काय स्थान होते? मुंबई कॉग्रेसचे नेतृत्व नेहमी जाणीवपुर्वक अमराठी वा प्रामुख्याने गुजराती असायचे. शिवाय दुसरीकडे तेव्हाच मुंबईत दक्षिण भारतातून लोंढे येणे सुरू झालेले होते. सरकारी वा खाजगी नोकर्‍यांमध्ये पद्धतशीर रितीने दाक्षिणात्यांची भरती व्हायची. उडूपी हॉटेलची ती सुरूवात होती. जॉर्ज फ़र्नांडीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टॅक्सी व बेस्ट युनियनच्या संघटनांमध्ये त्यांनी कानडी सहकारी घेतले होते आणि त्यांनी मग योजनाबद्ध रितीने कानडी लोकांना त्या उद्योगात आणून नोकर्‍या धंदा देण्याचे प्रयत्न केलेले होते. आजही त्या संघटनांचे जुने टिकून रहिलेले नेते बघितले; तर त्याची साक्ष मिळेल. रुग्णालयातही नर्सेसची भरती दाक्षिणात्य मुलींना इथे आणून केली जात असे. अशा रितीने नोकर्‍यांमध्ये मराठी तरुणांची गळचेपी चालू होती. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला देण्यात आली; तरी तिच्यावर अमराठी हुकूमत बोचण्यासारखी जाणवत होती. पण कामगार संघटनांच्या बळावरच राजकारण करणार्‍या समितीमधील पक्षांना, त्या अमराठी भरतीबद्दल बोलायची हिंमत नव्हती, की इच्छाच नव्हती. त्यामुळेच समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या मराठी तरूणाचा भ्रमनिरास होत चालला होता. मात्र त्याला वाचा फ़ोडणारा नेता नव्हता, व्यासपीठ नव्हते, की संघटना नव्हती. नेमक्या त्याच काळात आपली व्यंगचित्रे व बोचरी भाषा यातून ‘मार्मिक’ त्याच तरूणांच्या नजरेत भरू लागला होता. त्यातून पहिल्यांदा मुंबईतील मराठी तरूणांच्या वेदनेला वाचा फ़ोडण्याचे काम सुरू झाले. आपले दुखणे कोणतरी मांडतो आहे, म्हणून तरूण तिकडे आकर्षित होत गेला. त्यातले काही उत्साही बाळासाहेबांना भेटायला जाऊ लागले. अशी शिवसेनेच्या उदयाची चाहुल लागली होती.

   तसे पाहिल्यास सामान्य तरूणच निराश नव्हता. समितीचा किल्ला लढवणारे आचार्य अत्रेही निराशच होते आणि त्यांच्यासारखेच कुठल्या पक्षात नसलेले प्रबोधनकारही अस्वस्थ होते. मराठी हिताला प्राधान्य देणारा एखादा पक्ष असावा असे दोघांनाही वाटत होते. त्यांच्यात चर्चाही चालायच्या. मात्र त्याला नेमका आकार येऊ शकला नाही. पण कुठलेच पक्ष त्यांना दाद देत नव्हते. त्या प्रत्येक पक्षाला आपल्या अखिल भारतीय असण्याचा इतका अभिमान होता, की मराठीपणाचा शिक्का त्यांना अंगाला लावून घ्यायचा नव्हता. थोडक्यात मुंबईतला जो मराठी तरूण उत्साहाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी झालेला होता, त्याला समितीमधल्या पक्षांनी वार्‍यावर सोडुन दिले होते. त्यातून मुंबईच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती. त्या तरूणाला संघटना व नेता हवा होता. पण त्याच्या भावना समजून घ्यायला कोणीच तयार नव्हते. नेमकी तीच पोकळी ‘मार्मिक’च्या भाषा, लेख, व्यंगचित्रे व संपादकीय यातून भरली जाऊ लागली. आज ज्याला शिवसैनिक (हुल्लडबाज) असे उपरोधाने म्हटले जाते, त्याचे त्यासाठीचे प्रशिक्षण असे महाराष्ट्राच्या आंदोलनात झालेले आहे. कोणी अशा भ्रमात रहाण्याची गरज नाही, की ते आंदोलन अत्यंत शांततापुर्ण व शिस्तबद्ध होते. आजच्या कुठल्याही आंदोलनाला जसे हिंसक वळण लागते व दंगल पेट घेते; तसेच तेही आंदोलन हिंसक व जाळपोळीचेच होते. त्यातूनच शिवसैनिक तावूनसुलाखुन बाहेर पडलेला आहे किंवा त्या आंदोलनात घडला; त्यालाच आज शिवसैनिक म्हटले जाते.

   अनेकजण शिवसेना म्हणजे राडासंस्कृती असे उपहासाने म्हणतात. त्यांना एकतर संयुक्त महाराष्ट्राचे मुंबईतील आंदोलन माहीत नसावे किंवा ते जाणीवपुर्वक त्याबद्दल खोटे तरी बोलत असावेत. कारण ते आंदोलन जिथे सर्वात अधिक हिंसक झाले, त्याचा अनुभव मी बालपणी घेतला आहे आणि पाहिलेला आहे. कृष्णा देसाई त्याचे उत्तम प्रतिक होता. त्यामुळेच शिवसेनेची स्थापना झाली असतानाही एका वर्षात त्याने विधानसभेवर निवडून येऊन दाखवले होते. कारण तेव्हाही समितीकडे व पर्यायाने गिरणगावात कम्युनिस्टांकडे बाहुबल होते. शिवसेना अजून उभीच राहिली नव्हती. सहाजिकच हाणामारी व्हायची, ती दोन्ही मराठी तरूणांच्या गटातच व्हायची. त्याचे राजकीय स्वरूप खोटे आणि स्थानिक मवालीगिरी जास्त होती. त्यात कृष्णाचा बळी पडला; कारण तोच मैदानातले आव्हान होता. तो राजकीय आव्हान नव्हता. समिती म्हणून जे आव्हान कॉग्रेस समोर होते ते राजकीय कमी व राडेबाजीचे आव्हान मोठे होते. त्याचा बिमोड शिवसेनेकडून होत असेल तर कॉग्रेसने त्याला साथ देणे स्वाभाविक होते. पण ती परिस्थिती मुळात शिवसेनेने आणलीच नाही. समितीमध्ये असलेल्या पक्षांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवून परस्पर समन्वयाचे मराठी राजकारण केले असते तर कदाचित शिवसेना निर्माण झाली नसती की वाढलीच नसती.  ( क्रमश:)
भाग   ( १७ )    ६/१२/१२

२ टिप्पण्या:

  1. भाऊ खरच सांगू? तुमचे हे सेनेवरचे सगळे लेख मी दोन वर्षांपूर्वी पुण्यनगरीत ऑफिस मध्ये काम सोडून वाचले अहेत. मी सर्व लेखांचे एक पुस्तक हि तयार करून ठेवले अहे. पण आज २०१४ मध्ये पुन्हा आपल्या ब्लॉग वर हे वाचत आहे. आमच्या घरातील माझे आजोबा कट्टर शिवसैनिक आहेत, त्यानाही मी हे लेख वाचायला दिलेत. खरच तुम्ही आम्हा नवीन पिढीवर, सेनेची आणि साहेबांची जडण - घडण मांडून, खूप उपकार केलेत.

    उत्तर द्याहटवा