शनिवार, ३० जून, २०१२

मृत्यूसमोर माणुस खरे बोलतो म्हणतात ना?


   समोर मृत्यू साक्षात उभा असताना माणूस खोटे बोलत नाही असे म्हणतात. म्हणूनच मृत्यूपुर्व जबानी वा कबूली ही अगदी न्यायालयातही ग्राह्य मानली जात असते. सहाजिकच ज्यांनी साक्षात मृत्य़ुशी गळाभेट केली, अशीही माणसे त्यातून बचावली तर खरेच बोलतात, अशी आपली समजूत असते. माझी तरी तीच समजूत आजवर होती. पण मंत्रालयाला लागलेल्या आगीतून जी मोजकी माणसे अत्यंत नशीबाने बचावली, त्यात अनेक मंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकार्‍यांचा समावेश होता. त्यातले एक किशोर गांगुर्डे बचावले तरी त्यांचा पाय मोडला आहे. मग त्याच आगीबद्द्ल त्यापैकी कोणी खोटे निवेदन करील का? भले मग रोजच्या नोकरीत सरकारी पेशा म्हणुन त्यांना सरकार व मंत्र्यांच्या नाकर्तेपणाव पांघरूण घालण्याचेच काम करावे लागत असो. इथे जे सांगायचे आहे, ते सरकारी निवेदन नसून, त्यांना ज्या मरणयातनांमधून जावे लागले, तो व्यक्तीगत अनुभव आहे. तेव्हा त्यांनी निव्वळ खरे बोलावे, एवढीही सामान्य जनतेने अपेक्षा करू नये काय? माझा एक सामान्य नागरिक म्हणुन तिथेच अपेक्षाभंग झाला आहे. म्हणूनच मंत्रालयाच्या आगीतून सहीसलामत सुटलेल्या, पण सरकारी खोटेपणाच्या फ़ुफ़ाट्यात पडलेल्या या जनसंपर्क अधिकार्‍यांच्या त्या जगजाहिर निवेदनाची उलटतपासणी मला अगत्याची वाटते. त्यांनी आपले खरेखुरे विदारक अनुभव कथन केले आहेत, की त्यांच्यावर त्यातही खोटे बोलण्याची व लिहिण्याची सक्ती झाली आहे? कारण जे अन्यत्र छापून आले वा सांगितले गेले, त्याच्या पलिकडे या सर्वांनी आपापल्या परीने त्यात खोटे बेमालूम मिसळण्याचा केलेला प्रयत्न लपून रहात नाही. ’पुढारी’ दैनिकातील संजय देशमुख कथित बातमीतली एक विसंगती मी काल दाखवली होती. ते एकाचवेळी अनेकजागी असल्याचे दावे करतात, हा बेछूट खोटेपणाच आहे, स्वत:च्या जीवावर बेतले असतानाही माणुस इतका खोटेपणा का करत असतो, असा मला प्रश्न पडतो. 

   देशमुख यांच्या (पुढारी) निवेदनातील ही दोन वाक्ये तुलना करून वाचा. १)"पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले."  २)"अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला."  इतकी विसंगत विधाने माणूस कसा करू शकतो? वाचक किंवा ऐकणारा तद्दन बेअक्कल आहे, याची खात्री असल्याशिवाय कोणी इतका बेछूट खोटेपणा करील काय? एकाच निवेदनात व पाठोपाठच्या परिच्छेदात पाऊण तासाचा अर्धा तास कसा होऊ शकतो? तेच देशमुख म्हणतात, " परंतु सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली."  हे खरे मानायचे तर अजितदादा ती शेवटची १५ मिनीटे येण्य़ाची वाट बघत आधीपासून निष्क्रिय राहिले होते काय असा प्रश्न पडतो. पण देशमुख जे दादांना श्रेय देऊ पहात आहेत ते किती खोटे आहे, ते त्याच देशमुखांच्या त्याच निवेदनातून साफ़ उघडे पडले आहे. त्यासाठी पुढला परिच्छेद कालजीपुर्वक वाचा-

"दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्‍या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्‍या प्रत्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले. अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही." 

   यातून देशमुख काय सांगतात? जेव्हा दादा बैठकीसाठी आले तेव्हाच त्यांना धुराचा म्हणजे आगीचा "वास" आला होता. म्हणुनच आमंत्रितांना त्याच धुरात घुसमटायला सोडुन दादा स्वत: मात्र धुरविरहित असेल अशा सचिवांच्या दालनात बसायला गेले. तिथेही तोच वास म्हणजे आग असल्याचे पाहुन दादांनी सटकण्याचा स्वत:पुरता निर्णय घेतला. पण आपल्या समिती कक्षात ज्यांना बसायला सांगितले आहे, ते घुसमटून मरतील याची दादांना फ़िकीर नव्हती. समिती कक्ष व सचिवांचे दालन यात फ़ारसे अंतर नसावे, म्हणुनच दादांच्या हालचाली देशमुखांना दिसत होत्या. दादा सटकताना पाहिल्यावर शंका आल्याने देशमुखांसह आमंत्रितही सटकण्याचा विचार करत होते. पण तोवर दादा धुराच्या लोटापलिकडे सुखरूप पोहोचले होते व त्यांनी थंड चित्ताने (मागे वळूनही न बघता) मागे राहिलेत त्यांच्या सुटकेचा विचारही मनाला शिवू दिला नव्हता. जे दादा जिन्याच्या दिशेने निघाले असताना, वाटेत दिसेल त्याला बाहेर पडण्याचा नुसता आदेशच देत नव्हते तर पिटाळून लावत होते, त्याच अजितदादांनी मागे समिती कक्षापाशी असलेल्या देशमुखांना ओरडून बाहेर पडायचे आदेश का दिले नाहीत? दादा काय करतात हे देशमुखांना दिसत होते, म्हणजेच कक्षात अडकलेली मंडळी दादांच्या आवाजाच्या टप्प्यात होती ना? मग दादांनी आपल्या जीवाभावाच्या देशमुखांना पिटाळुन लावण्याचा एकही प्रयत्न का केला नाही? की देशमुख वगैरे मंडळी तिथेच धुरामध्ये व आगीत घुसमटून जावी, ही दादांच्या आपत्ती व्यवस्थापनाची एक चाल होती? म्हणजे या जनसंपर्क अधिकार्‍यांना मुद्दाम समिती कक्षात धुर व आगीत फ़सू द्यायचे आणि आपण खाली जाऊन त्यांच्या सुटकेसाठी अग्नीशमन दलाची शिडी पाठवून त्यांची मृत्यूच्या जबड्यातून मुक्तता करायची योजना मनाशी आखतच दादांनी आरसा गेटकडे जाणारा जिना गाठला होता?

   साधा ओरडून आवाज दिला असता, तर समिती कक्षात बसलेले व अडकलेले जनसंपर्क अधिकारी धुराचा लोट पार करून दादांच्या पाठोपाठ आरसा गेटकडे जाणार्‍या जिन्याकडे धावून येऊ शकले असते, ते सोपे काम दादांनी का करू नये? कारण देशमुखच सांगतात, की दादांच्या पाठोपाठ त्यांनीही समिती कक्षातून बाहेर पडायचा प्रयत्न केला होता. पाठोपाठ बाहेर पडणे म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये दोनचार पावलांचेच अंतर असते, तेवढे अंतर दादा पार करू शकले तर देशमुखांना का पार करता आले नाही? की अजितदादा म्हणजे टेन कमांडमेंटस या चित्रपटात दाखवले आहे, तसे मोझेस आहेत? त्याने नदीच्या पात्रातून सुका रस्ता काढण्याचा चमत्कार घडवला होता. दादांना धुरातून निसटता येते आणि देशमुखांना तोच धुर तापलेला फ़ुफ़ाटा वाटतो काय? की दादा उष्णतारोधक कपडे नेहमीच वापरतात. त्यामुळे त्यांना तापल्या धुराच्या झळा जाणवल्या नाहीत आणि देशमुख आदी मंडळींना मात्र तो धुर सहन करता आलेला नाही? सचिवाच्या दालनाकडे बसायला गेलेले अजितदादा मागे राहिलेल्यांना एका शब्दानेही सावध करत नाहीत. पण पुढे गेल्यावर रुमाल नाकावर लावून अन्य अनोळखी लोकांना मात्र सुरक्षेसाठी बाहेर पडायला सांगतात, पिटाळून लावतात, हा भेदभाव कशाला करतात? समिती कक्षात दादांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेले काही पावलांवर असताना अजितदादांनी त्यांच्याबद्दल अनास्था का दाखवली, त्याचे उत्तर देशमुख देत नाहीत. खरे सांगायचे तर त्यांच्या या निवेदनाने अजितदादांनी देशमुखांसह अन्य आमंत्रित जनसंपर्क अधिकार्‍यांना आगीत व धुरात घुसमटून मरायला कसे सोडुन दिले होते, हेचा सिद्ध होते. त्याची देशमुखांनी प्रथमदर्शनी साक्षच दिली आहे. जे काम दादा नुसत्या हाका मारून वा ओरड्याने करू शकले असते, ते काम होते देशमुख व इतरांना आधीच निसटण्यची संधी देण्याचे. पण अजितदादांनी नेमके तेवढेच सोपे काम केले नाही. म्हणुनच देशमुख व इतर आगीच्या सापळ्यात अडकले होते. त्यांना नंतर अग्नीशमन दलाच्या शिडीने सोडवणे दादांच्या हाततले काम नव्हते. अगदी मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रीही ते काम करू शकत नव्हता. अग्नीशमन दलाच्या अधिकारी वा जवानांना दम देण्याच्या गोष्टी सोडून द्या. कारण ते असे कुणाला आग विझवतानाच्या वेळी दाद देत नाहीत. ज्यांनी त्या वेळी अजितदादांना टीव्हीवर पाहिले असेल, त्यांना दादांचा भेदरलेला चेहरा कधीच विसरता येणार नाही. तेव्हा देशमुखांनी दमदाटीच्या थापा मारण्यात अर्थ नाही. जो माणूस स्वत:च भेदरलेला व गोंधळलेला होता, तो अग्नीशमन दलाला, अधिकार्‍यांना दम देतो, आदेश देतो, हे कुठल्यातरी कॅमेरात चित्रीत झाल्याशिवाय राहिले काय? पन कॅमेराला दिसले नाही व टिपता आले नाही ते देशमुखांना धुराच्या लोटातूनही स्वच्छ दिसते ही कुठली सिद्धी आहे?   वाचक इतका मुर्ख असतो का?   (क्रमश:)
 भाग  ( ३११ )     ३०/६/१२

गुरुवार, २८ जून, २०१२

जळत्या मंत्रालयातले दोन महान सिद्धपुरूष


   काल ज्या दोन बातम्या या सदरात वाचकांनी वाचल्या, त्याचे श्रेय आबासाहेब रणसिंग नावाच्या ’पुण्यनगरी’च्या एका जागरुक वाचकाला जाते. त्यानीच मुद्दाम ईमेल पाठवून त्या बातमीकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सोमवार २५ जुने २०१२ च्या दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीमध्ये ही बातमी दुसर्‍या पानावर प्रसिद्ध झाली आहे. तसे पाहिल्यास ती बातमी नाही. ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसंपर्क अधिकार्‍याचे मंत्रालय आगीसंबंधाने केलेले निवेदन आहे. मात्र ते नेहमीच्या सरकारी पत्रकाप्रमाणे लिहिलेले सरकारी भाषेतले बेचव निवेदन नाही. तर त्या भीषण आगीत सापडलेल्या एका अग्नीकांडग्रस्त नागरिकाचे अनुभवकथन आहे. निदान मांडणी करतानाचा त्यांचा पवित्रा तरी तसा आहे. इतक्या भयंकर आगीच्या प्रसंगीही उपमुख्यमंत्री कसे कार्यक्षम होते व त्यांनी दोनचार डझन पिडीतांचे प्राण वाचवले, त्याची गौरवगाथा या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितली आहे. सुंभ जळले तरी पीळ जात नाही, अशी उक्ती हजारो वर्षे आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे, हे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख त्याचा जिवंत नमूना आहेत. कारण त्यांच्याच म्हणण्यानुसार त्या भीषण आगीत भस्मसात होण्यापासून ते बालंबाल बचावले आहेत. पण त्याची चित्तथरारक कथा सांगतानाही त्यांना आपण उपमुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी आहोत या दडपणाखालून बाहेर पडता आलेले नाही. अन्यथा त्यांनी अशी हास्यास्पद भयकथा कशाला सांगितली असती? एकटे देशमुखच नाहीत तर विशाल ढगे नावाच्या अधिकार्‍याचेही असेच रंजक थरारक कथन दैनिक सकाळच्या २६ जुनच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्यातले तपशील जादूगारालाही थक्क करून सोडणारे आहेत. 

   त्या भीषण आगीतून केवळ अजितदादांच्या समयसूचकतेमुळेच आज संजय देशमुख जिवंत आहेत असा त्यांचा दावा आहे. किंबहूना त्या दिवशी जे कोणी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अडकले होते व बचावले ते केवळ दादांच्या कृपाप्रसादामुळेच; असाही देशमुखांचा दावा आहे. आपल्यापैकी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते, पण देशमुख होते. त्यामुळेच त्यांच्या शब्दांवर अविश्वास दाखवण्याचा आपल्याला काडीचा अधिकार नाही असेच मी मानतो. त्यांच्या दाव्यावर शंका घेण्याचेही कारण नाही. पण जे निवेदन देशमुख यांनी "पुढारी"मधून केले आहे, त्या त्यांच्या शपथपत्रात विसंगती असू नये, एवढी तर अपेक्षा आपण करू शकतो की नाही? त्या घटनेचे जे सर्वसाधारण वर्णन अन्यत्र आले आहे, जवळपास तसेच वर्णन देशमुख यांनी केले आहे. आपण टिव्हीवरून सहाव्या मजल्याच्या खिडक्यांमध्ये मदतीची याचना करणारे, वा खिडकीतून बाहेर पडून सज्जावर उभे असलेले व पाईप पकडून खाली उतरण्याचा प्रयास करणारे जे लोक बघत होतो, त्यापैकीच संजय देशमुख एक आहेत. तेव्हा त्यांच्या सुदैवाचे आपण अभिष्टचिंतन केले पाहिजे. मी त्यांच्या गौरवगाथेची उलटतपासणी करण्यापुर्वी त्यांना दिर्घ आयुरारोग्य चिंततो. कारण अशा जिवावर बेतलेल्या प्रसंगातून सहीसलामत सु्टण्याचे भाग्य फ़ार क्वचितच कुणाला मिळत असते. देशमुखांना ते मिळाले तर अपण त्यांचे अभिनंदन करायलाच हवे ना? असो. आता देशमुखांच्या भयकथेकडे वळूया. त्याच्या या प्रदिर्घ निवेदनातील ही मोजकी वाक्ये ज्या क्रमाने आली तशीच वाचा.

१) मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर पाऊण तास लटकत होतो. पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले. त्यामुळे खिडकीतून खाली पाचव्या मजल्याच्या सज्ज्यावर उडी मारण्याचा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेतला..... डळमळत्या पीव्हीसी पाईपच्या आधाराने खाली उडी मारली, सुदैवाने तोल गेला नाही. सज्जावर नी्ट पोहोचलो.
२) सहाव्या मजल्यावरील खिडकीतून आम्ही मदतीची वाट बघत होतो. परंतू आम्हाला खाली उतरवण्यासाठी कुणीच येत नव्हते. अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला. खाली उडी मारायचा विचार डोक्यात चमकून गेला आणि नेमक्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा खाली आलेले आम्हाला दिसले. त्यांनीही हात हलवून आम्हाला विश्वास दिला.
३) आमच्या सुटकेसाठी अजित पवार यांनी वेगाने सुत्रे हलवली. सातव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी तात्काळ आणण्यासाठी दादांनी अधिकार्‍यांना सांगितले, नव्हे तर पिटळलेच. गेल्या ४० मिनीटापासून आम्ही वाट पहात असलेले ते शिडीधारी वाहन अखेर दादांच्या कार्यवाहीमुळे वेळेत येऊ शकले.
४) पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या ३०-४० जणांना सुटकेसाठी सुमारे ४५ मिनीटे वाट पहावी लागली. परंतू सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली. आम्हाला वाचवण्य़ात आणखी  एक-दोन मिनीटाचा जरी उशीर झाला असता तरी आमचे मरण अटळ होते.
५) तत्पुर्वी दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्‍या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्‍या प्रत्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले.
६) अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यानंतर सुमारे पाऊण तास आम्ही सर्वजण अजितदादांच्या समिती कक्षात अडकून पडलो होतो. परंतु, सुखरुप खाली पोहोचल्यानंतर त्यांनी प्रयत्नपुर्वक आमची सर्वांचीही सुखरूप सुटका केली.

   अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी असलेले संजय देशमुख मुद्दाम अशा खोट्या गोष्टी लिहितात, की त्यांना जाणिवपुर्वक लोकांची दिशाभूल करायची आहे? वाचकांनी काळजीपुर्वक या सहा उतार्‍यांतील विसंगती तपासून बघाव्यात. क्रमांक १) मध्ये देशमुख पाऊण तास समिती कक्षाच्या खिडकीबाहेर लटकत असतात. पण तेच देशमुख क्रमांक ६) मध्ये पाऊण तास समिती कक्षामध्येच अडकून पडल्याचेही छातीठोकपणे सांगतात. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या त्या पाऊण तासाच्या कालखंडात संजय देशमुख कुठे कुठे असतात, ते तपासले तर ते अनेक रुपधारी महाचमत्कारी बाबा आहेत काय, अशीच शंका येते. एकाचवेळी ते सहाव्या मजल्यावरील समिती कक्षामध्ये अडकून पडलेले असतात. त्याचवेळी कक्षाच्या खिडकीला लटकत असतात. तर त्याचवेळी खिडकीतून मदतीची वाट बघत असतात आणि त्याचवेळी पाचव्या मजल्याच्या सज्जावरही उभे असतात. मग प्रश्न असा पडतो, की संजय देशमुख नावाची कि्ती माणसे अजितदादांच्या जनसंपर्क कार्यालयात अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत? त्या तीनचार संजय देशमुखांचा आगीचा दाहक अनुभव या बातमीत एकत्र मांडला आहे काय? नसेल व एकच संजय देशमुख असतील तर ते एकाच वेळी अनेक स्थानी कसे काय असू शकतील? की अजितदादांच्या कार्यवाहीने या देशमुखांना काही खास सिद्धी प्राप्त झालेली आहे, व ते कुठेही केव्हाही असू शकतात? असतील तर त्यांनी त्याचवेळी स्वत:चा अवतार तळमजल्यावर घेतला असता तर अजितदादांना इतकी धावपळ करायची तसदी घ्यावी लागली नसती ना?

   केवळ एकाच वेळी अनेकजागी देशमुख असू शकतात म्हणुन मी त्यांना चमत्कारी सिद्धिप्राप्त महापुरूष म्हणत नाही. त्यांच्यापाशी मोठी दिव्यदृष्टीसुद्धा आहे. क्रमांक २) वाचा. धुराचे लोट वाढले आणि नेमक्या त्याच वाढलेल्या धुरातून त्यांना साठ सत्तर फ़ूट खाली असलेले अजितदादा स्पष्ट दिसले. नव्हे अजितदादा सुद्धा सिद्धपुरूषच असले पाहिजेत. कारण त्यांनाही इतक्या खालून आपल्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर धुराचे लोट वहात असताना आपले जनसंपर्क अधिकारी स्पष्टपणे दिसत होते. तेवढेच नाही त्यांनी देशमुखांना हात हलवून विश्वासही दिला. बरे झाले नाहीतर देशमुख थेट पाचव्या मजल्यावरून ( की सहाव्या मजल्यावरून) थेट खाली उडीच घेण्याच्या मनस्थितीत होते. हे सगळे वाचणार्‍या वाचकाने कितव्या मजल्यावरून उडी मारावी अशी देशमुखांची इच्छा व अपेक्षा आहे? देशमुखांच्या या भयकथेची सुक्ष्म उलटतपासणी मला अगत्याची वाटते. म्हणुनच तिकडे माझे लक्ष वेधणार्‍या वाचकाचे मी खास आभार मानतो.   ( क्रमश:)
 भाग  ( ३१० )     २९/६/१२

मंत्रालयाच्या आगीतले चित्तवेधक थरारनाट्य


    मंत्रालय बेचिराख होत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अग्नीशमन दलाला लाजवणारी जी धाडसी कामगिरी पार पाडली, त्याचे वर्णन करणार्‍या पुढील दोन बातम्या आहेत. पुढारी व सकाळ या दोन दैनिकात छापून आल्या तशाच शब्द्श: मुद्दाम इथे पुनर्मुद्रित केल्या आहेत. वाचकांनी त्या बारकाईने वाचाव्यात. त्यात कोणती विसंगती वा विरोधाभास आहे, त्याची उलटतपासणी उद्या सविस्तरपणे करू या.

आम्ही वाचलो ते केवळ अजितदादांमु्ळेच
    मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर पाऊण तास लटकत होतो. पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले. त्यामुळे खिडकीतून खाली पाचव्या मजल्याच्या सज्ज्यावर उडी मारण्याचा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेतला. जीव वाचवण्यासाठी आता दुसरा कुठलाही उपाय नसल्याने आगीत जळून मरणे किंवा उडी मारून एक संधी घेणे; एवढेच बाकी उरले होते. डळमळत्या पीव्हीसी पाईपच्या आधाराने खाली उडी मारली, सुदैवाने तोल गेला नाही. सज्जावर नीट पोहोचलो. सज्जावर आता आम्ही ३०-४० जण उभे होतो. सज्जा पडे्ल की काय अशी भिती होती. त्याचवेळी अग्नीशमन दलाची शिडी वर आली आणि तिच्या मदतीने आम्ही सर्वजण टप्प्या टप्प्याने खाली आलो. आतापर्यंत आमच्या सोबत असलेले दोघेजण धुराने गुदमरून वर सहाव्या मजल्याच्या खिडकीत बेशुद्ध पडले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांनाही खाली आणले. त्या कार्यवाहीमुळे आमचे सर्वांचे प्राण वाचले. परंतु ही कार्यवाही यशस्वी होऊ शकली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला कार्यकर्ता जागा असल्यामुळे.
   सहाव्या मजल्यावरील खिडकीतून आम्ही मदतीची वाट बघत होतो. परंतू आम्हाला खाली उतरवण्यासाठी कुणीच येत नव्हते. अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला. खाली उडी मारायचा विचार डोक्यात चमकून गेला आणि नेमक्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा खाली आलेले आम्हाला दिसले. त्यांनीही हात हलवून आम्हाला विश्वास दिला. त्यानंतर आम्हाला सुखरूप उतरवण्यासाठी त्यांनी खाली सुरू केलेली धावपळ कधीच विसरता येणार नाही. आमच्या सुटकेसाठी अजित पवार यांनी वेगाने सुत्रे हलवली. सातव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी तात्काळ आणण्यासाठी दादांनी अधिकार्‍यांना सांगितले, नव्हे तर पि्टाळलेच. शिडी असलेली गाडी उभी करण्यात अडचण येईल हे लक्षात घेऊन, तेथील नेहमीची वाहने बाहेर काढण्याचे आदेश त्यांनी दिले. चालक नव्हते ती वाहनेही धक्का मारून बाहेर काढायला लावली. गेल्या ४० मिनीटापासून आम्ही वाट पहात असलेले ते शिडीधारी वाहन अखेर दादांच्या कार्यवाहीमुळे वेळेत येऊ शकले. नंतर शिडी लावण्यात उशीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकार्‍यांना दम देऊन मदत कार्याचा वेग वाढवायला लावला. सुटकेसाठी आलेली क्रेन केवळ चार जणांनाच घेऊन खाली जाताना दिसताच अजितदादांनी, एकावेळी जास्तीतजास्त लोकांना खाली आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे सज्जावरील लोक कमीतकमी फ़ेर्‍यांमध्ये खाली येऊ शकले. सहाव्या मजल्यावर बेशुद्ध असलेल्या दोघांनाही लौकर खाली आणून त्यांचे प्राण वाचविता आले. त्याचवेळी अजितदादा अग्नीशमन दलाच्या अधिकर्‍यांकडे उष्णतारोधक सूट असलेल्या जवानांना आत पाठवून अडकलेल्यांना कसे वाचविता येईल याची चाचपणी करीत होते. हे जर शक्य झाले असते तर मृत्यूमुखी पडलेल्या त्या पाच जणांचाही जीव कदाचित वाचविता आला असता. आगीतून सुटका झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, तसेच त्यांना रुग्णालयात पाठवण्याकडेही दादांनी जातीने लक्ष पुरवले.
   पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या ३०-४० जणांना सुटकेसाठी सुमारे ४५ मिनीटे वाट पहावी लागली. परंतू सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली. आम्हाला अग्नीशमन दलाच्या शिडीने खाली उतरवत असतानाच वरचे तिन्ही मजले आगीने धगधगू लागले होते. आम्हाला वाचवण्य़ात आणखी एक-दोन मिनीटाचा जरी उशीर झाला असता, तरी आमचे मरण अटळ होते.
     तत्पुर्वी दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्‍या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्‍या प्रर्त्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले. अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यानंतर सुमारे पाऊण तास आम्ही सर्वजण अजितदादांच्या समिती कक्षात अडकून पडलो होतो. परंतु, सुखरुप खाली पोहोचल्यानंतर त्यांनी प्रयत्नपुर्वक आमची सर्वांचीही सुखरूप सुटका केली. परंतू त्या पाचजणांचे प्राणही न वाचविता आल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. सुटकेनंतर त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो असताना त्यांनी ते बोलूनही दाखवले होते. (दादांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे कथन दै. पुढारी, सोमवार २५ जुन २०१२)

 ... थरार अजित पवार यांच्या दालनातला 
मुंबई - 'सहाव्या मजल्याच्या खिडकीची काच फोडून पाचव्या मजल्यावर पाईपाला पकडून आलो. आत आगीचे रौद्ररुप दिसत होते, तर बाहेर पाचव्या मजल्यावरून खाली पाहताना मरणाच्या दारात उभा असल्याचे जाणवत होते; पण दैव बलवत्तर म्हणून मदत मिळाली. अन्‌ मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलो.' विशाल ढगे आणि संजय देशमुख हे अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी मृत्यूच्या दाढेतून परतल्यावर भावविवश होऊन सांगत होते. दोन मिनिटे थांबण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असता, तर तेही अशाच प्रकारे अडकले असते, असे सांगताना या दोन्ही अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज (गुरुवार) दैनंदिन कामकाज सुरू होते. जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होणार होती. अजित पवार बरोबर 2.45 वाजता बैठकीच्या दालनात दाखल झाले आणि तेवढ्यातच सुरक्षा रक्षकाने आग लागल्याचा निरोप देत बाहेर पडा... बाहेर पडा... असा आवाज दिला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, अनिरुद्ध अष्टपुत्रे, गृह विभागाचे किशोर गांगुर्डे, संजय देशमुख आणि विशाल ढगे; तसेच इतर जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते. आग लागल्याचे कळताच अजित पवार यांचे खासगी सचिव विजय पाटील यांनी बाहेर पडा, अशी विनंती केली. दादा उठले, बाहेर पडले, तर समोर धुरांचे लोट दिसले. नेहमीच्या मुख्य दरवाजाच्या जिन्याकडे ते गेले; पण आगीचा दाह आणि धुरांचे लोट पाहून त्यांनी विस्तार इमारतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समोर काही दिसत नव्हते. मोठ्याने आवाज देत, दिसेल त्याला बाहेर पडा... बाहेर चला... असे ओरडून सांगत अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सावध केले. अजित पवार याचे खासगी सचिव साजणीकर देशमुख, सुरेश जाधव यांची दादांनी सोबत घेत जिन्याकडे धाव घेतली. धुरांच्या लोटामुळे काहीही दिसत नव्हते. अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दादांनी जिना गाठला आणि तळमजल्याच्या दिशेने धावत सुटले. सहाव्या मजल्यावरून खाली उतरताना आगीची भीषणता त्यांना जाणवली. काही तरी भयानक असल्याची जाणीव त्यांना झाली; मात्र केवळ एका मिनिटाच्या आत त्यांनी जिन्यातून तळमजला गाठला. आरसा गेटसमोर येताक्षणी अजित पवार यांनी वर नजर टाकली, तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर खिडक्‍यांच्या काचा फोडून सुमारे 40 ते 45 जण मदतीचा धावा करीत होते. यामध्ये त्यांच्या जनसंपर्क अधिकार्‍यांसह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा समावेश होता. संजय देशमुख यांनी खिडकीच्या बाहेर असलेला पाईप पकडून पाचव्या मजल्यावर उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. खिडकीच्या छतावर थांबून त्यांनी विशाल ढगे, किशोर गांगुर्डे यांना खाली येण्याची विनंती केली. पाचव्या मजल्यावर सुरू असलेला हा जीवघेणा थरार अजित पवार यांच्यासह सर्व जण पाहत होते. दादा फायर ब्रिगेडला बोलावण्याचे आदेश देत होते. शिडी शोधा, असे सांगत होते. मदतीसाठी स्वत: धावत होते. आगीच्या डोंबाकडे हताशपणे पाहत कर्मचार्‍यांचे जीव वाचविण्यासाठी बेचैन झाले होते. अखेर सव्वातीन वाजण्याच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या शिडीने या अधिकाऱ्यांची सुटका केली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी किशोर गांगुर्डे यांचा सहाव्या मजल्यावरून पाईपला धरून उतरताना पाय मोडला. संजय देशमुख यांनी पाचव्या मजल्यावर पाईपला धरून उतरण्याचा आग्रह केल्यावर नाही-होय म्हणत धाडस करून किशोर गांगुर्डे पाईपवरून उतरले खरे; पण त्यांना तोल आवरता आला नाही. जोराने घसरत आलेल्या गांगुर्डे यांना देशमुख यांनी मोठ्या धाडसाने भिंतीला दाबून धरले; मात्र या गडबडीत गांगुर्डेंचा पाय मोडला. मित्राच्या सहकार्यामुळेच जीव वाचल्याचे समाधान व्यक्‍त करताना मृत्यूच्या दाढेतून परतल्याची धास्ती गांगुर्डे यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. ( दै. सकाळ, मंगळवार २६ जुन २०१२)   ( क्रमश:)
 भाग  ( ३०९ )     २८/६/१२

बुधवार, २७ जून, २०१२

राज्यातले सत्ताधारी सवयीचे गुलामच


   माणुस शेवटी सवयीचा गुलाम असतो. त्यातून बाहेर पडणे सोपे नसते. आणि सरकारही माणसांचेच असल्याने तेही अशा नियमांना अपवाद नसते. त्यालाही सवयी अंगवळणी पडलेल्या असतात व त्याचा परिणाम त्या सरकारच्या वागण्यावर होत असतो. आज जे सरकार देशात म्हणजे दिल्लीत वा मुंबईत राज्य करते आहे, त्यालाही काही सवयी जडलेल्या आहेत व त्याचा कारभारही त्याच सवयींचा गुलाम आहे. कुठलीही समस्या समोर आली किंवा प्रश्न समोर आला, मग आधी तो नाकारणे; ही आजच्या राज्यकर्त्यांची सवय झाली आहे. मग विषय स्पेक्ट्रम घोटाळ्याचा असो किंवा राष्ट्रकुल घोटाळ्य़ाचा असो. प्रश्न आदर्श घोटाळ्याचा असो किंवा अर्ध्या महाराष्ट्राला भेडसावणार्‍या दुष्काळाचा असो. प्रथम राज्यकर्त्यांनी असे काही आहे, याचाच इन्कार केला होता ना? पण शेवटी त्यातून सुटका नव्हती. कोंबडे टोपलीखाली झाकले म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही म्हणतात, तसे हे घोटाळे शेवटी चव्हाट्यावर आलेच. पण ते आज महत्वाचे नाही. मुद्दा आहे तो सरकार वा राज्यकर्त्यांच्या स्वभावाचा. समस्या टाळली वा तिच्याकडे पाठ फ़िरवली, मग ती संपली अशी ठाम समजूत आजच्या राज्यकर्त्यांनी करून घेतली आहे. त्याचेच दुष्परिणाम सर्वत्र दिसत आहेत. परवा मंत्रालयाला लागलेली छोटीशी आग पसरत जाउन तिचा आगडोंब झाला; त्यालाही ही सवयच कारणीभूत झाली आहे. 

   ए. राजा नावाच्या मंत्र्यावर अनेक आरोप होत राहिले. पण पंतप्रधान त्याचा इन्कार करत राहिले. राष्ट्रकुल स्पर्धांच्या बाबतीत असेच आरोप व संशय व्यक्त होत राहिले. तेव्हाही पंतप्रधानांनी इन्कार करण्यात धन्यता मानली. पुढे काय झाले? जेव्हा माणसाला कसल्यातरी आजाराची लक्षणे दिसत असतात, तेव्हा तातडीने त्याबद्दल शंका निरसन करून घेण्यात शहाणपणा असतो. उलट आजार नाही म्हणत लपवाछपवी करण्यात मुर्खपणा असतो. कारण लपवण्याने आजार संपत नाही. तो फ़ोफ़ावत व फ़ैलावत जातो. गेल्या दोन वर्षात दिल्ली वा मुंबईच्या सत्ताधार्‍यांनी सत्याला सामोरे जाण्य़ापेक्षा त्यावर पडदा टाकण्याची कसरत अधिक केली. त्यामुळे प्रश्न संपण्यापेक्षा अधिक जटील होत गेले, गुंतागुंतीचे होत गेले. पण हे असे राजकारण करताना, त्याच राज्यकर्त्यांना खोटे बोलण्याची व लपवाछपवी करण्याची जी सवय अंगवळणी पडली, तिचा विपरित परिणाम गेल्या गुरूवारी मुंबईत दिसून आला. आधी एका केबिनपुरती असलेली ही आग लगेच धावपळ केली असती तर दोन तीन खोल्या वा केबिनपर्यंत जातानाच आटोक्यात आणता आली असती. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण केले असते; तर त्यांनी थेट इमारतीत पोहोचून जिथल्यातिथे आग विझवली असती. तीनचार मजले सोडा, संपुर्ण चौथा मजलाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला नसता. पण एकाही मंत्र्याला किंवा अधिकार्‍याला आग लागली तर विझवण्याची बुद्धी सुचली नाही. असे का व्हावे? तर समस्या असली तरी ती लपवायची सवय, त्याला कारणीभूत होती. अग्नीशमन दलाला कळवले तर याची बातमी होईल व पत्रकार व विरोधी पक्षाच्या हाती कोलित दिले जाईल. त्यापेक्षा आग लागल्याचे गाभिर्य विसरून तिथल्यातिथे सारवासारव सुरू झाली. बबनराव पाचपुते आपण कसे आग विझवण्यात पुढाकार घेतला, ते वाहिन्यांना सांगत होते. दुसरीकडे मृत कोरडे यांच्या सहकार्‍याने अजितदादा स्वत:च कसे धुर कोंडलेल्या केबिनच्या खिडक्या उघडत होते, ते सांगून गेले. मग या दोन्ही मंत्र्यांना अग्नीशमन दल नावाची एक यंत्रणा मुंबईत काम करते; हेच ठाऊक नव्हते काय? मग त्यांनी धुर येताना दिसल्यावर लगेच त्यांना पाचारण का करू नये?

  आग लागल्यानंतर तिला जबाबदार कोण म्हणून विचारले जात आहे. आग लागली कुठे व कशी, त्यापेक्षा आग पसरली कशी वा कोणामुळे; याला इथे महत्व आहे. रामायणातील लंकादहनाची कथा जशीच्या तशी घडली म्हणायला हवे. त्यात मारूतीला पकडुन त्याच्या शेपटीला आग लावणार्‍यांनी ते माकड उड्या कसे मारत फ़िरते त्याची गंमत बघण्यात धन्यता मानली आणि अवघी लंका धडधडा पेटत गेली. इथे त्या राक्षसाचे वंशज होते, की माकडाचे वंशज असतात, तेच समजत नाही. कारण आग लागल्यावर अग्नीशमन दलाला पाचारण करण्याची बुद्धीही ज्यांच्यापाशी नसते, त्यांना काय म्हणायचे? वार्‍याबरोबर आग पसरत जाते, हे सुद्धा त्यांना ठाऊक नसेल काय? या सत्ताधार्‍यांचे कर्तृत्व कोणते, असे मला कोणी विचारले तर मी सांगेन, त्यांनी एका छोट्या आगीचा आगडोंब करून दाखवला. जी आग एका बंबाने विझवली असती, ती शंभर बंब विझवू शकणार नाहीत इतकी मोठी करून दाखवली. त्याचे कारण निष्क्रियतेची अंगवळणी पडलेली सवय हेच आहे. नशीब म्हणायचे; तिथे अशा राज्यकर्त्यांना सुरक्षा रक्षक दिले आहेत. ते तिथे नसते आणि त्यांनी धावपळ करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आगीतुन बाहेर आणले नसते, तर त्यांचे काय झाले असते? आपला स्वत:चा जीव वाचवायला तरी त्या दोघांनी हातपाय हलवले असते किंवा नाही, याचीच मला शंका आहे. या निमित्ताने मला पंचवीस वर्षापुर्वीचे वसंतदादा पाटलांचे शब्द आठवतात. तेव्हा दादा राजस्थानचे राज्यपाल होते. राज्यपालाने पक्षिय राजकारणात पडू नये, असा संकेत आहे. पण तरीही दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ चालू असताना गप्प बसवत नाही, म्हणुन मतप्रदर्शन केले होते. पत्रकारांनी त्याबद्दल छेडले असता दादा म्हणाले होते, तिथे माझे घर (कॉग्रेस पक्ष) जळत असताना इथे मी शांत बसू शकत नाही. उतारवयातले दादा जेवढे संवेदनाशील होते तेवढेच आजचे राज्यकर्ते बधीर झालेत का? नसतील तर त्यांना साधे अग्नीशमन दलाला पाचारण करणे का सुचू नये?

   गेल्या बारा वर्षातला आपला अनुभव काय आहे? सेक्युलर म्हणून जी आघाडी सत्तेवर आली, तिला सामान्य जनतेच्या किंवा महाराष्ट्राच्या भवितव्याशी कसलेही कर्तव्य नाही. सत्ता आणि सत्तेसाठी बहूमत यापलिकडे त्यांना काहीही सुचत नाही. इथे कोणीही येऊन बॉम्बस्फ़ोट करू शकतात. कोणीही परदेशातून येऊन नागरिकांना किड्यामुंगीप्रमाणे ठार मारू शकतात. इथे स्वाईन फ़्लू येऊन धिंगाणा घालू शकतो. सेक्युलर राजसत्ता म्हणुन जिचा गौरव केला जातो, तिचा हा अनुभव आहे ना? गेली दहा वर्षे प्रत्येक पत्रकार व सेक्युलर अभ्यासक गुजरातच्या नरेंद्र मोदींचे वाभाडे काढत असतो. पण दहा वर्षापुर्वीची एक दंगल सोडली तर त्यांनी केलेले काम वाखाणण्य़ासारखेच आहे. पण कोणी त्याबद्दल बोलतो का? दहा वर्षात मोदी यांनी ज्याप्रकारे गुजरातचा कारभार चालविला आहे, त्याचे कौतुक होऊ लागले आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला भावी पंतप्रधान म्हणुन मुठभर का होईना, लोक का अपेक्षेने पाहू लागले आहेत. तर तो मुख्यमंत्री म्हणुन आपल्या राज्यातल्या सामान्य जनतेचाच सतत विचार करत असतो. त्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक आता देशाच्या सीमा ओलांडून पलिकडे गेले आहे. पण कोणी सेक्युलर पत्रकार त्याबद्दल बोलणार नाही. कारण आपली माध्यमे सेक्युलर आहेत. त्यांना मोदींची निंदानालस्ती करायला खुप सवड असते. पण त्या माणसाने दोन कामे चांगली केली, तर त्यावर दोन शब्द बोलायला, लिहायला जागा नसते. मग असे वाटू लागते, की सेक्युलर म्हणजे विनाश, विध्वंस नाकर्तेपणा असा या शहाण्यांचा समज आहे काय?

   त्याचे कारण एकच आहे, आजचे महाराष्ट्रातले सरकार. बारा वर्षापुर्वी जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजपाचे सरकार होते, तेव्हा हीच माध्यमे त्यांच्या किरकोळ चुकांवरही तुटून पडत होती. साडेचार वर्षाच्या कालखंडात युती सरकारने राज्याच्या डोक्यावर वीस हजार कोटींचे कर्ज चढवले, म्हणुन दिवाळे वाजवले अशी बोंब माध्यमे ठोकत होती. पण निदान त्या सरकारने मुंबई पुणे नवा मार्ग, मुंबईतले मोठे उड्डाणपुल, कृष्णा खोरे योजना अशा धाडसी योजना हाती घेतल्या होत्या. पुढल्या बारा वर्षात माध्यमांच्या लाडक्या सेक्युलर सरकारने दोन लाख कोटी, म्हणजे युतीच्या दहा पटीने राज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढवला आहे. त्यातून दिवाळखोरी झाली नाही तर राज्याची संपन्नता वाढली काय? मग त्याबद्दल कोणीच का अवाक्षर बोलत नाही. युती सरकार सत्तेत असते तर मंत्रालय पेटल्यावर याच संपादक माध्यमांनी किती काहूर माजवले असते? म्हणुन मला वाटते, की सेक्युलर राजकारण म्हणजे दिवाळखोरी, भ्रष्टाचार, गैरकारभार, घोटाळे अशी व्याख्या आता बनली आहे. आणि जेवढे आजचे सत्ताधारी त्याला जबाबदार आहेत तेवढेच त्याला सेक्युलर पत्रकार व माध्यमेही जबाबदार आहेत. कारण त्यांच्याच सक्रिय पुढाकाराने महाराष्ट्रात आजचे सेक्युलर आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. त्याच्याकडून भ्रष्टाचार व अनागोंदीपेक्षा कसलीही अपेक्षा आपण बाळगू शकणार नाही. आज मंत्रालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आणखी महिन्या दोन महिन्यात कुठली मोठी आपत्ती हे सरकार आणणार आहे बघूया.     ( क्रमश:)
भाग  ( ३०८ )     २७/६/१२

भा्वनाशून्य राज्यकर्त्यांचा कोरडेपणा



  मंत्रालयाला लागलेल्या या आगीचे प्रवचन अजून काही दिवस चालणार आहे. पण सत्ताधार्‍यांना त्याची चिंता नाही. चिंतेचे कारणसुद्धा नाही. कारण दुसरी त्यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्यापर्यंत अशी चर्चा होतच असते. मग दुसर्‍या घटनेच कौतुक सुरू होते आणि पहिली दुर्घटना विसरली जाते. म्हणुनच दुसर्‍या दुर्घटनेची बेगमी करणे, हे सत्ताधार्‍यांना आजच्या घटनेतून सुटण्याचा उत्तम मार्ग वाटू लागला आहे. चार दिवस, पंधरा दिवस किंवा महिनाभर बोंबाबोंब होईल. मग सर्वकाही विसरून जातील लोक आणि माघ्यमेसुद्धा. आणि समजा माध्यमे विसरायला तयार नसतील, तर त्यांचे लक्ष विचलित करायला आरएसएस किंवा सेक्युलर अशा "बायपास"ची सोय आहेच की. देशाला किंवा महाराष्ट्राला अशा महापुर वा आगीच्या संकटांपासून कुठलाही धोका नाही. धोका आहे तो जातियवादाचा. अशी संकटे आपत्ती पचवायची सवय लोकांना आता लागली आहे. कधी अतिवृष्टीमुळे मुंबई बुडून जाते, महापुराने गावेच्यागावे जलमय होतात. दुष्काळाने लाखो लोकांचे संसार उध्वस्त होतात. कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्या करतो. तुरूंगात कैद्यांच्या हत्या होतात. नक्षलवादी अधिकारी सरपंचाला पळवून नेतात. कुपोषणाने बालके मरतात. त्यातली जिवितहानी कमी झाली तर सरकारी प्रशासनाच्या आशीर्वादाने चाललेले दवाखाने गर्भपातातून महिलांना मारत असतात. अशा घटना चालुच आहेत. त्यांचा गवगवा तेवढ्यापुरता असतो. भ्रष्टाचार, घोटाळे, अफ़रातफ़री चालू आहेत. महागाईने सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. पण कुठे काय बिघडले आहे? छानपैकी कॉग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत आहेतच ना? येणारच, कारण ज्या समस्या अशा तात्कालीन घटना दुर्घटनांमधून गाजवल्या जात असतात, त्या समस्याच नाहीत. खरी समस्या आहे, ती जातियवाद आणि सेक्युलर लढाईची. त्यामुळेच अशा मंत्रालय जळून खाक होण्याची कोणीही चिंता करणार नाही. चार दिवसानंतर लोक विसरून जातील, की मंत्रालय नावाची काही वस्तू किंवा वास्तू अस्तित्वात होती. तिच्याकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणुन बघितले जायचे, याचे कुणाला स्मरणही उरणार नाही. 

   त्याच मंत्रालयावर देशाचा तिरंगा फ़डकतो आहे, तो त्या आगीत भस्मसात होऊ नये म्हणून जे तिथेच धुमसत्या गच्चीवर ठाण मांडून बसतात, ते काही मुर्ख असतात. कुठल्या चॅनेलवर एक मानचिन्ह मिळवण्यासाठी ते जीवाची बाजी लावतात. खरे शहाणे असतात, ते पृथ्वीराज चव्हाण किंवा अजितदादा पवार. मंत्रालयाला आग लागल्यावर तिथून आपला जीव वाचवायला पळ काढतात ते मोठे असतात. कारण आपण जगलो तर अशी शंभर मंत्रालये पुन्हा बांधू शकतो, हे त्यांना ठाऊक असते. बाकी त्या वास्तू वा इमारती व तिच्याशी जोडलेल्या स्मृती. भावना, आठवणींशी आपला स्वाभिमान जोडणारे तुमच्या आमच्यासारखे बेअक्कल करोडो असतात. मग त्याच मंत्रालयात यशवंतरावांनी आणलेला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश होता, पंडित नेहरूंचा अस्थीकलश होता, असल्या भावनांमध्ये आपण गुरफ़टून पडतो. त्याला व्यवहार म्हणता येत नाही. नाही तर आमच्या आमदार जितेंद्र आव्हाढांचे पितृतुल्य शरदराव पवार बघा. मंत्रालय जळून खाक झाल्यावर शुक्रवारी तिथे आलेल्या पवारांनी त्रयस्थपणे ती इमारत आता पाडून नवी टोलेजंग वास्तू बांधावी असे सांगून टाकले. ज्या मंत्रालयात बसण्याने पवार यांना आज इतके मोठे करून ठेवले आहे, त्या भस्मसात इमारतीकडे पाहून दोन अश्रूही त्यांच्या डोळ्यात ओघळले नाहीत. याला म्हणतात मोठेपणा. याला म्हणतात थोरपणा. ज्याचा लवलेश तुमच्या आमच्यात नसतो. म्हणूनच आपण सामान्य जनता असतो आणि पवार साहेब थोरपुरूष असतात. याचे कारण ते असे भावनाशून्य असू शकतात. त्यांचा मोठेपणा त्यांच्या बेदरकारपणात सामावला आहे. आपल्याला ते कधीच साध्य होत नाही, होणारही नाही. ज्यांनी तो फ़डकता तिरंगा सन्मानाने त्या संकटातही खाली उतरवला त्यांचा गुणगौरव करण्याची पात्रता म्हणूनच पवार साहेबांकडे असते.

   सत्ता राबवणार्‍याला भावनावश होऊन चालत नाही. समोर कोणी जळताना, मरताना पाहिले तर त्याच्या मदतीला धावून जाण्याचा मुर्खपणा करत नाही तर स्वत:ला वाचवणे हे ज्याचे प्राधान्य असते, त्यालाच देशाची राज्याची सत्ता राववता येत असते. इतकी वर्षे पवार किंवा त्यांचे कुटुंबिय का महाराष्ट्राची सत्ता मिळवू शकले, त्याचे कारण हे असे आहे. अजितदादा आग लागली व पसरू लागली तेव्हा मंत्रालयातच होते. त्यांना मोठी आग असल्याचा पत्ता लागण्यापुर्वी खिडक्या उघडण्याचे काम त्यांनीच केले, असे तिथे तेव्हा हजर असलेले राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सांगतात. पण जेव्हा आग पसरते असे कळले तेव्हा त्यांना तिथेच धुमसणार्‍या आगीत सोडून, दादा मंत्रालयातून बाहेर पडले, याला राजकीय समजदारी म्हणतात. सत्ता मिळवण्यासाठी वा टिकवण्यासाठी ती चतुराई किंवा "समयसूचकता" राज्यकर्त्याच्या अंगी असावी लागते. आज जे आपल्यावर राज्य करतात, त्यांच्या अंगी असे गुण ठासून भरलेले आहेत. म्हणुन तर इतका सुंदर कारभार चालू आहे. काय झाले त्याची कोणाला फ़िकीर आहे काय? आग विझली नाही, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी जीवितहानी टाळली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. त्यांची ती पत्रकार परिषद संपताच दोन मृतदेह अजितदादांच्या केबीनपाशी सापडल्याची बातमी आली. पण असे सामान्य लोक नेहमीच मरत असतात. कधी ते कसाब टोळीकडुन मारले जातात, तर कधी बॉम्बस्फ़ोटात मरतात. कधी विषबाधेने मरतात तर कधी दरोडेखोरांकडुन मारले जातात. त्यांच्यासाठी रड्त बसले तर दादा बाबांना राज्याचा कारभार कसा चालवता येईल? अशा मरणार्‍यांच्या मुडद्यावर लाख दोन लाख फ़ेकले की काम झाले. याला राज्यकारभार म्हणतात. आणि आपले अभ्यासू राजकीय विश्लेषक खुश असतात. कारण राज्यात छानपैकी सेक्युलर कारभार चालू आहे. म्हणजे काहीच होत नाही. फ़क्त घोटाळे,, भ्रष्टाचार, अफ़रातफ़री मस्तपैकी चालू आहेत.

   कुठल्या छोट्या समस्येचा भीषण अविष्कार कसा करावा, ते आपण पहात असतो. साधी सर्दी झालेल्या रोग्याला आणुन या सेक्युलर सरकारच्या हवाली करा, त्याला मलेरिया किंवा स्वाईन फ़्लूपर्यंत नेऊन पुरता पोचवण्याची किमया आजच्या सत्ताधार्‍यांपाशी आहे. त्याचाच दाखला गेल्या गुरूवारी देण्यात आला. साधी किरकोळ आग संपुर्ण मंत्रालयाला भस्मसात करण्यापर्यंत मोठी कशी करावी, याचा वस्तूपाठच त्यानिमित्ताने देण्यात आला ना? चौथ्या मजल्यावर लागलेली छोटी आग, तिथल्या तिथे धावपळ झाली तरी आवरता आली असती. तेवढे धाडस नसेल तर तिथून दोनतीन मिनीटांच्या अंतरावर असलेल्या अग्नीशमन दलाला बोलावून आवरता आली असती. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून सामान्य अधिकारी शिपायापर्यंत कोणालाच अग्नीशमन दल आग विझवण्य़ासाठी असते, त्याचीच आठवण झाली नाही. आग लागली तर ती वेळीच विझवायला हवी ही संवेदनाच कोणापाशी तिथे नव्हती. दुष्काळाची सावली सहा सात महिन्यापासून पडली आहे. पण त्यावर याच राज्यकर्त्यांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला का? हजारो गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होईपर्यंत कुठली हालचाल सुद्धा केली नाही. नेमके तेच परवा मंत्रालयाच्या आगीच्या वेळी झाले. समस्या व प्रश्नापासून पळ काढायचा हेच धोरण सतत राबवल्याचा तो परिणाम आहे. इथेही त्यांनी आग लागल्यावर प्रथम काही केले नाही. आणि आग हाताबाहेर जाऊ लागल्यावर तिथून पळ काढण्यात धन्यता मानली.

   त्या आगीनंअर पत्रकार व कॅमेरासमोर बोलताना दोन्ही सरकार प्रमुखांच्या चेहर्‍यावर कुठली अपराधी भावना तरी होती काय? दहा लाख फ़ाइल्स म्हणजे कित्येक महत्वाची कागदपत्रे त्या आगीत भस्मसात झाली. त्यासाठी वैषम्याचा लवलेश तरी दोघांपैकी एकाच्या चेहर्‍यावर तरी दिसला काय? त्यांच्यासाठी यात नवे काहीच नव्हते. प्रत्येक परिक्षा नापासच होणार्‍या मुलाला थेट शालांत परिक्षेला बसवले आणि तो तिथेही नापास झाला, तर काय नेमके बिघडले ते त्याला कळत सुद्धा नसते. तशीच मुखयमंत्री व उपमुख्यमंत्री यांची अवस्था होती. मंत्रालय जळून बेचिराख झाल्याची कुठलीही खंत त्यांना वाटत नव्हती. थंड मनाने ते दोघे दुसर्‍या दिवशी पर्यायी जागेतून कारभार चालेल, अशी ग्वाही देत होते. कित्येक लाख लोकांच्या जीवनाशी संबंधित जिव्हाळ्याच्या कागदपत्रांची होळी झाली, याची साधी जाणिव ज्यांना नाही; ते यापेक्षा दुसरा कुठला कारभार करू शकतील?    ( क्रमश:)  
भाग  ( ३०७ )     २६/६/१२

सोमवार, २५ जून, २०१२

या अग्निकांडातला मारुती कोण?


   मला पुराणातल्या भाकडकथा खुप आवडतात, असे मी अनेकदा सांगत असतो. विशेषत: एखादी अशी पुराणकथा समोर घडताना दिसली, तर मला तिचे विश्लेषण करायचा मोह आवरता येत नाही. म्हणूनच सध्याचे शिक्षण विषयक लेखन तात्पुरते बाजूला ठेवून, मंत्रालयाच्या आगीकडे वळणे मला भाग आहे. खरे तर त्याबद्दल लोकांच्या ज्ञानात भर घालायला सगळा मिडियाच पुढे सरसावलेला आहे. तेव्हा मी तिकडे वळण्याचे काही कारण नाही, असेच कोणी म्हणेल. ते खरेही आहे. पण जेव्हा आग विझवण्यापेक्षा त्यात तेल ओतणारे पुढे सरसावता्त तेव्हा तिकडे दुर्लक्ष करता येत नाही. हातातली कामे बाजूला ठेवून तिकडे धाव घ्यावी्च लागते. मंत्रालयाची राखरांगोळी करणारा जो आगडोंब उसळला, त्यानंतरच्या बातम्या मी वृत्तपत्रातुन वाचतो आहे व वाहिन्यांवर त्याचे वर्णन ऐकतो आहे. त्यात लंका जाणणार्‍या मारूतीचेच वंशज मला अधिक दिसले म्हणुन तिकडे वळणे मला भाग पडले आहे. आग परवडली म्हणावे अशी बातमीदारी व चर्चा वाहिन्यांवर ऐकायला मिळत आहेत. एकच उदाहरण पुरेसे ठरावे.

   हल्ली काही दिवस कायबीइन लोकमत वाहिनीचे संपादक निखिल वागळे गांधींनंतरचा महान भारतीय शोधण्यात गर्क आहेत. त्या शोधापेक्षा त्यांना मंत्रालयाला लागलेली आग मोठी वाटली नाही. म्हणून की काय, त्यांनी आजचा सवाल अलका धुपकर नामक मुलीकडे सोपवला आहे. ती मुलगी पाचवीपर्यंत तरी शिकली आहे काय याचीच मला शंका येते. कारण शुक्रवारी सवाल विचारून चर्चा करताना तिने मंत्रालयाचे क्षेत्रफ़ळ चाळीस लाखाहुन अधिक "घनफ़ूट" असल्याचे ज्ञानामृत उपस्थित पाहुणे व प्रेक्षकांना पाजले. बघणार्‍यांना तिला थांबवता येत नाही, कारण ते बिचार आपालया घरात फ़क्त ऐकत असतात. पण त्या चर्चेत भाग घेणार्‍या कोणालाही तिला दुरुस्त करावेसे वाटले नाही, यातून चर्चा किती गंभीरपणे चालते, त्याचा अंदाज येऊ शकतो. भरीव वस्तूचे मोजमाप घनफ़ळात तर सपाट पृष्ठभागाचे मोजमाप क्षेत्रफ़ळात होते. हे पाचवी सहावीच्या भूमितीमध्ये शिकवले जात असते. पण धुपकर हिला बोलणार्‍याला "गलका चुप कर"ण्याचेच धडे बालपणापासून दिलेले असावेत. बाकी कुठला विषय शिकवण्य़ाचे कष्ट पालक वा शिक्षकांनी घेतलेले नसावेत. मुलांचे (म्हणजे त्यात मुली आल्याच) पाय पाळण्यात दिसतात, तसेच हिचे पाय पाळण्यात बघूनच ती पुढे कायबीइन लोकमत वाहिनीवर जाणार, हे पालक शिक्षकांनी ओळखलेले असावे. मग तिला भूमिती, गणित, अक्कल वगैरे शिकवण्याची गरज नाही, हे त्यांच्या लक्षात आलेले असावे. मग तिला बिचारीला क्षेत्रफ़ळ घनफ़ूटात नसते तर चौरस फ़ुटात असते, हे कसे आठवणार. तिने मंत्रालयाचे क्षेत्रफ़ळ किती लाख धनफ़ूट आहे ते सांगून मंत्रालयाला लागलेल्या आगीचा फ़ूफ़ाटा करून टाकला.

   भाई जगताप. शिवतारे असे अभ्यासू आमदार त्या चर्चेत होते. त्यांना हा मुर्खपणा कळतही असेल. पण "चुप कर" मॅडम समोर असताना त्यांनी बोलण्याची हिंमत कशी करावी? आणि कमीअधिक प्रमाणात सर्वच वाहिन्यांवरचा अनुभव असाच होता. होळीच्या भोवती जमलेली लहान मुले जसा उत्तेजीत गलका व कल्लोळ करतात, तसाच सगळा प्रकार चालू होता. त्यात सवाल चर्चेची सुत्रे गलका चुपकर यांच्या हाती असली, मग दुसरे काय व्हायचे? काही तरी महान घडते आहे व आपण त्याचे ऐतिहासिक साक्षिदार आहोत, अशा अभिमानाने ही मंडळी बातमीदारी करत होती. तेवढेच नाही, तर सर्वात आधी "आमच्याच चॅनेलवर" असे सांगायचा उत्साह मंत्रालयाच्या आगीच्या ज्वाळांनाही लाजवणारा होता. तिथे प्रत्येक ज्वाळेला आधी वरच्या मजल्यावर पोहोचण्याची घाई झाली होती. तर इथे प्रत्येक बातमीदाराला आधी त्या ज्वाळा आपल्य चॅनेलवर दाखवण्याची घाई झाली होती. मात्र त्या उतावळेपणात समोर दिसते आहे व आपण प्रेक्षकांना थेट प्रक्षेपणातून जे दाखवतो आहोत, त्याचा अर्थ तिथे घटनास्थळी उभे असलेल्यांना लागत नव्हता किंवा स्टुडिओत बसून चित्रणाचे विश्लेषण करण्याचा आव आणणार्‍यांना डोळ्यांना दिसते ते बघता येत नव्हते. फ़ार कशाला, तिथे लक्ष वेधले असतानाही काही शहाणे संपादक सत्य बघू शकत नव्हते.

   ज्यांनी आग पसरताना टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहिले, त्यांना एक गोष्ट नक्की आठवेल. तिथे पोहोचलेले अग्नीशमन दलाचे जवान चार पाच मजले उंच पाण्याचा फ़वारा मारून आग विझवायला धडपडत होते. ज्या अग्नीशमन दलापाशी दहा पंधरा मजले उंच पोहोचणारी शिडी असते, ते चौथ्या पाचव्या मजल्यावर लागलेली आग जमीनीवरून का विझवू पहात होते? आपल्या गाड्यांवर असलेल्या शिड्या वापरून त्यांनी थेट त्याच उंचीवरून पाण्याचा फ़वारा का मारू नये? ही साधीसरळ शंका होती. अशा प्रसंगी आगडोंब उसळलेल्या इमारतीमध्ये शिरता येत नाही, तेव्हा बाहेरून त्याच उंचीवर पोहोचता यावे म्हणुन त्यांच्या गाड्यांवर शिड्या असतात ना? मग हे इतके प्रशिक्षित जवान शिड्या का वापरता नव्हते? घरी बसून बघणार्‍या माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला हा प्रश्न पडला. मग ते चित्रण थेट दाखवणार्‍या व घटनास्थळी उपस्थित असलेल्या बातमीदारांना का पडला नाही. त्यांनी त्याची कारणे शोधून बातमी का दिली नाही. झी २४ तास वाहिनीवर नवे संपादक उदय निरगुडकर जातीनिशी निरुपण करायला बसले होते. त्यांनी एक अत्यंत अनुभवी अग्नीशमन अधिकार्‍याला त्यात सहभागी करून घेतले होते. पण तो काय सांगतो त्याकडे त्यांनी गंभीरपणे लक्षच दिले नाही. देशमुख नावाचे ते जाणकार ९/११ च्या न्यूयॉर्कमधील दुर्घटनेत काम केलेले अनुभवी. त्यांनी चार मजले उंच पाण्याचे फ़वारे कशाला मारत बसले आहेत, असा सवाल तात्काळ उपस्थित केला होता. पण त्याचे उत्तर आठ नऊ तास जाईपर्यंत कोणीच देऊ शकला नाही.

   आधीच अग्नीशमन दलाला उशीरा आमंत्रण मिळाले. तेसुद्धा कोणा जबाबदार अधिकारी मंत्र्याकडून मिळाले नाही. मुंबई अग्नीशमन दलाचे प्रमुख आहेत, त्यांचे कोणी आप्तस्वकीय मंतालयात काम करतात. त्यांनी सहज सावधानतेचा उपाय म्हणुन आपल्या साडूला सुचना दिल्या. ती अग्नीशमन दलाला मिळालेली आगीची पहिली सुचना होती. मग त्यांचा ताफ़ा मंत्रालयात पोहोचला, तेव्हा त्यांच्या बंबांना आत शिरायला जागाच नव्हती. तिथे मंत्री व अन्य पुढारी, अधिकार्‍यांच्या सरकारी गाड्यांनी मधला चौक व्यापला होता. त्यांचे ड्रायव्हर बेपत्ता होते. त्या गाड्या टोईंग करून किंवा काचा फ़ोडून बाहेर काढल्या तेव्हा कुठे बंबाच्या गाड्या आत येणासाठी जागा झाली. मग शिड्यांच्या वापर सुरू झाला. तोवर आग पसरू नये म्हणुन बिचारे अग्नीशमन दलाचे जवान मंत्रालयाच्या बाहेर आपल्या गाड्या थांबवून आगडोंबावर पाण्याचे फ़वारे जमेल तसे मारत होते. म्हणजे चौथ्या मजल्यावरची आग तिथेच रोखण्याची एक संधी जागेवर पोहोचलेल्या बंबवाल्यांना मिळालीच नव्हती. तिथे मधल्या चौकातली जागा व्यापून बसलेल्या सरकारी गाड्यांनी त्यांना ती संधी नाकारली होती. म्हणून बिचारे जवान प्रतिकुल परिस्थितीत मिळेल तिथून आग आटोक्यात आणायला धडपडत होते. त्यांच्यापाशी उंच शिड्या होत्या, पण त्या उभ्या करायलाच जागा नव्हती. मग त्यांना जमीनीवरून किंवा तळमजल्यावरून जमेल तेवढा उंच फ़वारा मारण्याखेरीज पर्यायच नव्हता. मग तो फ़वारा आगीपर्यंत पोहोचला नाही तरी बेहत्तर.

   पहिली बातमी हिच होती आणि घटनास्थळी असलेल्या बातमीदारांच्या डोळ्य़ांना ती दिसतही होती. पण तिचा अर्थच त्यांना लागला नाही. त्याचे आकलन झाले नाही. किंबहूना जे दिसत होते ते बघण्याची ’नजर’ हे बातमीदार गमावून बसल्याचा तो परिणाम होता. बातमी म्हणजे खळबळ किंवा पुढार्‍यांनी एकमेकांवर केलेले आरोप. अशाच बातमीदारीची सवय लागली, मग भयंकर घटना समोर घडत असली तरी तिचे गांभिर्य कळणार कसे? म्हणुनच शिड्या असूनही अग्नीशमन दल त्याचा वापर न करता चार मजले उंच पाण्याचे फ़वारे का मारते आहे, ही विसंगती तिथून बातमीदारी करणार्‍यांना दिसत असूनही लक्षात आली नाही. त्यांनाच नव्हेतर स्टुडिओत बसून त्याचे निरूपण करणार्‍यांनाही कॅमेरा दाखवतो आहे, त्यातला विरोधाभास कळू शकला नाही, की खटकला नाही. एवढ्याशा एका नि्ष्काळजीपणाबद्दल मी त्यांना फ़ाशी देतोय, असेच कोणाला वाटेल. पण मुद्दा त्या एका निष्काळजीपणाचा नसून वास्तविक पत्रकारितेचा आहे. बातमी म्हणजे काय त्याचा विसर पडल्याचा मुद्दा आहे. माणसाला कुत्रा चावला तर बातमी होत नाही. पण माणुस कुत्र्याला चावतो तेव्हा बातमी होते, अशी बातमीची जगभरची व्याख्या आहे. त्याचा अर्थ इतकाच, की जे नेहमी घडते त्यात बातमी नसते, तर जे अकल्पित वा चमत्कारिक व विसंगतीपुर्ण घडत असते, त्याला बातमी म्हणतात. इथे शिड्या असतानाही जवान चारपाच मजले खालून आगीवर फ़वारे मारतात ही भीषण विसंगती होती. म्हणूनच तीच बातमी होती. पण तिथे एकाही बातमीदार वा स्टुडिओतील ऍन्करचे लक्षही गेले नाही. ही त्या भीषण आगी इतकीच शोकांतिका नाही काय? सगळे नुसते लंका जाळणार्‍या व शेपटी पेटलेल्या मारुतीसारखे टणाटणा उड्या मारत, नाचत, धावतपळत होते ना?   ( क्रमश:)
 भाग  ( ३०६ )    २५/६/१२

आपली मुले हेच त्यांचे धंद्यातले भांडवल


   आपण रोजच्या जीवनात अनेक बारीकसारीक खर्च करत असतो. त्यातून सरकार करोडो रुपयाचे अप्रत्यक्ष कर वसूल करत असते. साधी काडीपेटी किंवा औषधे, अशा प्रत्येक गोष्टीवर कर लादला जात असतो. ते पैसे कशासाठी वसूल केले जात असतात? कायदा सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते, दिवाबत्ती, प्राथमिक शिक्षण अशा सामन्य जनतेच्या ज्या मुलभूत गरजा मानल्या गेलेल्या आहेत, त्यासाठी लागणारा खर्च म्हणुन सरकार ही रक्कम वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडून वसूल करत असते. म्हणजेच आपण आपल्या मुलाचे, मुलीचे प्राथमिक शिक्षण होण्यासाठी आधीच पैसे मोजलेले आहेत. मग आपण त्याच्या शालेय शिक्षणाच्या खर्चाची चिंता करण्याचे काही कारण आहे काय? नसेल तर आपण असे प्रवेश देणगी वा वाढणारी फ़ी यांच्या विरोधात का ओरडत असतो? तर आपण सरकारने जी शिक्षणाची सोय उपलध करून दिली आहे, ती नाकारून खाजगी शिक्षण सुविधांकडे वळलो आहोत. जे फ़ुकट उपलब्ध आहे, ते आपल्याला नको आहे. कारण ते पुरेसे नाही अशी आपली धारणा झालेली आहे. त्यातुन आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, म्हणून आपण चांगले शिक्षण मुलांना मिळावे, या काळजीने अन्यत्र व्यवस्था शोधलेली आहे. आपण असा शोध सुरू केला म्हणुन मग ती सुविधा पुरवणारे, तशा सुविधा उभारण्यास पुढे झाले आहेत. त्यांनी आपल्याला तशा सुविधा पुरवण्याच्या बदल्यात त्यांना हवी त्शी किंमत लावली आहे. मग ती परवडते तोवर आपली तक्रार नाही. पण जेव्हा ती सुविधा परवडेनाशी होते, तेव्हा आपण ओरडा करत असतो. पण खरेच ती सुविधा आहे काय, याचा आपण विचारही करत नाही. खरेच आपल्या मुलांना या खाजगी शाळा उत्तम शिक्षण देतात काय? 

   इंग्रजी माध्यम म्हणजेच उत्तम शिक्षण, अशी जी समजूत तयार झाली त्याचा लाभ उठवायला शेकडो चलाख लोक पुढे आले. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या. सरकारनेही त्यांना पटापट मान्यता दिली. कारण इंग्रजी शाळा काढली तर तिला कधीच अनुदान मिळणार नाही असे सरकारचे धोरण आहे. मग अशाच शाळांचे पेव फ़ुटले. दुसरीकडे मराठी माध्यमातली शाळा काढली तर सरकारचे नियम व दंडक खुप कठोर असतात. कारण आज ना उद्या तिला अनुदान द्यावे लागणार. तेव्हा नव्या मराठी शाळा होऊच नयेत, अशा पद्धतीने सरकारी धोरण राबवले जाते. शिवाय पालकांना इंग्रजीच शाळा हवी असल्याने, कुठे तक्रार नव्हती. मग अशा नव्या शाळा पालकांकडून देणग्या घेउनच उभ्या रहात गेल्या. त्यासाठी होणारी गर्दी बघून शाळाचालकांनीही देणगीचे दुकानच थाटले. हा एक चमत्कारिक धंदा किंवा व्यापार उदयास आला. त्यात तुमची मुले हे शिक्षणसंस्था काढणार्‍यासाठी भांडवल बनले. सरकारच्या धोरणाने त्याला प्रोत्साहन मिळत गेले. आता तर उच्च शिक्षणापर्यंत हा देणगीचा व्यापार पोहोचला आहे. त्यात सरकार जेवढे जबाबदार आहे, तेवढेच हे पालकांचेही पाप आहे. इंग्रजी माध्यमात पहिलीपासून मुलांना शिकवले, मग ती हुशार होतातच ह्या समजूतीने ही अवस्था आणली आहे. पण वास्तवात त्या समजूतीला कुठलाही आधार नाही.

  आता तर ह्या देणगीचे आकडे ऐकले मग चक्कर येते. पण त्या मार्गाने जाण्याची खरेच गरज आहे काय? जे मुल दिवसातले अवघे चारपाच तास शाळेत व उरलेले तास घरात असते, ते कुठे शिकणार? जिथे त्याचा अधिक वेळ जातो तिथेच ते शिकत असते. म्हणजेच घरच्यांकडून मुलाचे अधिक शिक्षण होत असते. एक साधी प्रक्रिया समजून घेतली तर मुद्दा लक्षात तेऊ शकेल. मातृभाषा म्हणजे तरी काय? तर आईची भाषा. आईची भाषा तामी्ळ असेल तर मुलाची मातृभाषा तामीळ होते. असे का व्हावे? तर जन्मापासून मुल ज्याच्या सहवासात रहाते त्याचेच अनुकरण करत जाते. त्यात जो आपुलकीने वागवतो किंवा प्रभाव पाडतो, त्याचे अनुकरण करते. त्या अनुकरणातूनच मुल शिकत असते. त्यातले जे सहजसाध्य असते ते लौकर शिकले जाते. जे कंटाळवाणे वा त्रासदायक असते, ते शिकायला वेळ लागतो. ज्याला हसतखेळत कौतुकाचा प्रतिसाद मिळतो ते लौकर आत्मसात केले जाते. ज्या मुलाला जन्मत: साधे बोलताही येत नसते व जगातली कुठलीही भाषाच ठाऊक नसते, ते मुल घरच्या घरी पहिली भाषा शिकते. आणि कोणी शिकवत नसताना शिकते. ज्याला कुठली शाळा वा शिक्षक शिकवू शकत नसतो, त्याला घरातले कुटुंबिय नकळत खुप काही शिकवून जातात ना? मग शाळा मोठी की घर कुटुंब मोलाचे? मुलाचा सर्वात उत्तम शिक्षक कोण? त्याच्यासाठी कुठली शाळा अधिक उपकारक आहे? घर की सरकारी मान्यतेचे विद्यालय?

   ज्या अजाण जीवाला पहिला शब्द, पहिली भाषा व पहिले पाऊल उचलायला आपण घरचे लोक शिकवतो, तेच त्याच्या पुढल्या आयुष्यातल्या शिक्षणासाठी नालायक कसे असू शकतो? दुर्दैव असे, की आज तोच सर्वोत्तम शिक्षक आपण आपल्या मुलांसाठी नाकारला आहे. तिथेच त्याचे मोठे नुकसान करून ठेवले आहे. मग त्याचा फ़ायदा शिक्षणाचे दुकानदार घेत असतात. आपल्या मुलांना अशा दुकानदारांच्या शाळेत घालून आपण स्वत:ची भलतीच कोंडी करून घेतली आहे. इंग्रजी शाळेत मुल घालायचे. मग त्याला तिथे शिकवण्यापेक्षा घरचा अभ्यास भरपूर दिला जातो. तो करून घेताना पालकांच्या नाकी दम येतो. त्यांना इंग्रजी जमत नसेल तर त्या कोवळ्या बालकाला आपले आईबाप बुद्दू वाटु लागतात. त्यांच्याविषयी त्या मुलाच्या मनात कमीपणाची भावना मूळ धरते. दुसरीकडे त्या होमवर्कसाठी भुर्दंड पडतो तो वेगळाच. त्याहीपेक्षा मोठे नुकसान होते ते मुलाच्या बौद्धिक विकासाचे. प्राथमिक शिक्षण म्हणजे चौथीपर्यंतच्या वयात मुलांना विषय शिकवायचे नसतात, तर ज्ञानग्रहणाच्या उपजत वृत्तीची जोपासना करायची असते. हे वय असे असते, की ज्या समजुती तयार होतात व मुलाचे स्वत:चे निकष तयार होतात, ते त्याला आयुष्यभर उपयोगी पडणार असतात. त्याच्या बौद्धिक विकासाचा पाया त्यातून घातला जात असतो. शेकडो शंका व प्रश्न मुले या वयात विचारत असतात. त्यांचे शंकानिरसन, प्रत्येक गोष्टीतले त्यांचे कुतूहल, हीच शिकण्याची प्रक्रिया असते. घोकंफट्टीच्या अभ्यासाने त्यावर पाणी ओतले जाते. उत्साह मारून टाकला जातो. शिकण्याच्या उपजत वृत्ती कोमेजून टाकल्या जातात. विचार न करता, निमूटपणे समोर आहे ते स्विकारण्याची सक्ती त्याच्यावर केली जाते. थोडक्यात त्याच्या शिकण्याच्या इच्छेचाच गळा घोटला जातो.

   साध्या भाषेत बोलायचे तर उत्साही पालक आपल्याच खर्चाने मुलाच्या शिकण्याच्या उपजत वृत्तीचा खुन पाडुन घेतात. तेवढेच नाही तर त्यातच धन्यता मानतात. प्रत्येक मुलाला जन्मत: मानवी मेंदू ही सर्वात मोठी निसर्गाने दिलेली देणगी असते. त्या मेंदूचा वापर करण्याची उपजत वृत्ती माणसात असते. तिला योग्य दिशा दे्णे म्हणजे शिक्षण असते. मात्र स्वभावानुसार प्रत्येक मुलात फ़रक पडतो. काही मुले शांत स्वभावाची असतात तर काही मुले खोडकर स्वभावाची असतात. त्या स्वभावाचा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. म्हणुनच त्या त्या मुलाच्या स्वभावानुसार त्याच्या शिकण्याला चालना देण्य़ाचा प्रयास झाला पाहिजे. ते काम शाळेत होऊ शकत नाही. तिथला शिक्षक किंवा व्यवस्था सर्वांना एकाच मापाने मोजत असते. इथे पालक महत्वाचा असतो. मुलाचे दोष, त्रुटी वा गुण पालकांना चांगले माहित असतात. त्यामुळेच पालक त्याच्या कलाने जाऊन त्याच्या शिकण्याच्या प्रवृत्तीला नेमकी चालना देऊ शकतो. मुलांच्या वागण्यातले दोष वा वृत्ती यांचा नेमका वापर करून त्यांच्या नकळत त्यांना शिकवता येत असते. मी असे अनेक प्रयोग केले आहेत. अशक्य वाटणार्‍या गोष्टी त्यातून सहजशक्य झाल्या आहेत.

   पालक तेवढा वेळ आपल्या मुलांसाठी खर्च करणार असेल, तर त्याला देणगी वा मोठी फ़ी घेणार्‍या शाळांकडे आशाळभूत होऊन बघण्याची वेळ येणार नाही. कुठल्याही सामान्य शाळेत मुलाचे नाव घालूनही त्याला हुशार बनवणे शक्य आहे. जर पालकाने पहिल्या चारपाच शालेय वर्षात मुलाकडे अगत्यपुर्वक लक्ष दिले, तर पुढल्या काळात मुल स्वयंभू होऊ शकते, हे मी अनुभवातून सांगू शकतो. आपल्या मुलांसाठी पैसे खर्चण्याची अजिबात गरज नाही. पण त्याला वेळ देण्याची तयारी असायला हवी. पण आज सर्वच नाती व आपुलकी पैशाच्या मोजपट्टीने मोजली जात असते. मग प्रेम व्यक्त करायला भेटकार्ड द्यावे लागते. गिफ़्ट द्यावे लागते. पैसे किती खर्च करता यावर नात्यांची जवळीक ठरणार असेल, तर त्याचा धंदा करणारे लाभ उठवायला पुढे येणारच. मग विषय प्रेमाचा असो, रागाचा असो, दुष्मनीचा असो किंवा दुखण्याचा असो.    ( क्रमश:)
 भाग  ( ३०५ )    २४/६/१२

शनिवार, २३ जून, २०१२

शिकलेले विसरल्यानंतर उरते तेच शिक्षण


शाळेत काय शिकलो याचा शाळा सोडल्यावर ज्याला विसर पडतो आणि तरीही जे शिल्लक उरते; त्याला शिक्षण म्हणतात. -अल्बर्ट आईन्स्टाईन.

   १९६५ सालात मी जुनी म्हणजे अकरावी इयत्तेची शालांत परिक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर शाळेशी संबंध तुटला. पुढे पंचवीस वर्षांनी मला आमचे तेव्हाचे प्राचार्य भेटले. म्हणजे माझ्या एका मित्राचा सरांशी कायम संपर्क होता. पुण्यात आम्ही गेलो असताना तो म्हणाला, चल जरा सरांना भेटू. तिथे त्याने ओळख करून दिली. सरांना मी संपादक पत्रकार झाल्याचे कौतूक वाटले. मग त्यांनी मास्तरी थाटात मला प्रश्न विचारला. इतके क्लासेस वाढलेत, हे योग्य आहे का? तेव्हा मला शाळेतला प्रसंग आठवला. आमच्या वर्गातल्या एका मुलाच्या दफ़्तरात गाईड सापडले, म्हणुन सरांनी त्याला चांगला झोडपून काढला होता. बाकीच्या मुलांनाही दोन दोन पट्ट्या खाव्या लागल्या होत्या. आपला विद्यार्थी गाईड वापरतो याचा सरांना प्रचंड संताप आलेला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, सर तुमच्यासारखे शिक्षक राहिले नाहीत, म्हणुन क्लासेस वाढलेत. त्यांच्यासारखे म्हणजे? सरांनीच शंका काढली. त्यांच्यासारखे म्हणजे आपण शिकवतो आणि मुलाला गणित वा सायन्स येत नसेल तर त्यांना सहन होत नसे. आपण दगडालाही शिकवू शकतो, असा त्याकाळच्या शिक्षकांचा स्वाभिमान होता. आपला विद्यार्थी क्लासला किंवा शिकवणीला जातो, हा त्यांना अपमान वाटे. आज तसा अभिमान दिसत नाही, की विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी दिसत नाही. मग त्याचेच परिणाम दिसतात. माझे हे उत्तर सरांना चकीत करून गेले. त्यांना आवडले व पटलेही. तेव्हा त्यांनी कौतुकाने विचारले, हे सर्व कुठे व कधी शिकलास? तर मी उत्तरलो, सर तुम्हीच तर शिकवलेत. त्या उत्तराने सर चमकले. म्हणाले, अरे, मी तर गणित-भूमिती शिकवायचो. तू तत्वज्ञानाची भाषा बोलतो आहेस. मग मी सरांना त्यांच्या शिकवण्याच्या शैलीचा किस्सा सांगितला.

   भूमितीचे प्रमेय शिकवताना सर नेहमी म्हणायचे दिगोकाउ मांडा. म्हणजे दिलेल्या गोष्टी आणि काढायचे उत्तर. प्रमेयात ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्याच सुत्राने वाट शोधत गेले, की काढायचे उत्तर सापडते, ही सरांची शिकवण होती. मी सामाजिक समस्या असोत की देशासमोरचे प्रश्न असोत, दिगोकाउ सुत्रानेच विचार करतो हे सांगितले, तेव्हा सर हसू लागले. म्हणाले, मी तर असा विचार करायला शिकवले नव्हते. इथे आईन्स्टाईन काय म्हणतो ते लक्षात घेतले पाहिजे. तो म्हणतो, शिकलेले विसरून गेल्यावर शिल्लक उरते तेच शिक्षण. सरांनी मला व सर्व वर्गालाच प्रमेय सोडवायला शिकवले होते. पण मी त्यातून जगातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे काढायला शिकलो. त्यांनी त्याच हेतूने व दिशेने शिकवले नसेल. पण ते शिकवत होते, त्यातून काय शिकायचे ते समोर बसलेल्या मुलांवर अवलंबून होते. शिकण्याची ही प्रक्रिया कशी असते? रात्रीच्या वेळी काळोख्या रस्त्याने चाललो असताना, एखादी गाडी बाजू्ने निघून जाते. तिला रस्ता दिसावा म्हणुन तिचे हेडलाईट्स चालू असतात. पण त्याच उजेडात आपल्यालाही रस्ता दिसत असतो. त्या मोजक्या क्षणात आपण पुढल्या शेदोनशे पावलांचा रस्ता बघून घेतला, तर आपले त्या अंधारातले मार्गक्रमण सोपे होऊन जाते. त्यालाच शिकणे म्हणतात. समोर दिसते व जाणवते, त्यापासून काय घ्यायचे ते आपल्या हाती असते. त्याची कोणी आपल्यावर सक्ती करू शकत नाही. आणि सक्ती करून शिकताही येत नाही. शिकवून शिकता येत नसते तर शिकणार्‍याला शि्कवता येत असते. शिकणे ही वृत्ती आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सोयीसुविधा यांच्यापेक्षा इच्छाशक्ती मोलाची असते. तिचा अभाव असेल तर नावाजलेली शाळाही निरूपयोगी असते. आपण मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतो, पण त्याच्या शिकण्याच्या इच्छेला खतपाणी घालायचे विसरून जातो. सगळी गडबड तिथेच होते.

   जन्माला आल्यापासून मुल शिकायला सुरूवात करते. त्याआधी त्याला साधे अंगावरचे दुध प्यायचे म्हणजे काय, तेही ठाऊक नसते. पण माता त्याचे इवले तोंड आपल्या स्तनापाशी आणून त्याला स्तनपान शिकवते. पहिले काही क्षण ते बाळ नुसते चाटते, मग जेव्हा चाटण्यातून नकळत स्तन चोखले जाते, तेव्हा त्यातून येणारा पान्हा त्याला कार्यरत करतो. इथून अर्भकाचे शिक्षण सुरू होत असते. आईचा पान्हा पोषक व मधुर असतो, मुल ते लगेच स्वीकारते. जन्मत: मुल रडतच असते. त्याला रडण्यापलिकडे काहीच प्रतिसाद ठाऊक नसतो. मग आईच्या सहवासात ते मुल बघून बघून हसू लागते. ते आईच्या हसण्याचे अनुकरण करत असते. त्याच्या हसण्याला आई वा इतरांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे पाहून ते बाळ हसायला शिकते. नेहमी दिसणारे चेहरे व अचानक दिसणारे चेहरे यातला फ़रक करायला शिकते. मानव प्राण्याची उपजत प्रवृत्ती त्याच्यात असते आणि जगण्यासाठी सुरक्षित काय आहे, त्याप्रमाणे वागण्यापुरती बुद्धी त्याच्यापाशी असते. तेवढ्यावर त्याची वाटचाल सुरू होते. बाकी प्रत्येक गोष्ट त्याला शिकूनच आत्मसात करावी लागत असते. ज्या प्राणी समुहात राहायचे आहे, त्यांच्या शिस्तीनुसार जगायला आवश्यक गोष्टी ते बाळ शिकत जाते. म्हणजेच शिकणे ही मुलाची उपजत प्रवृत्ती असते. आपण त्याला जसे वळण देत जाऊ, तसतसे मुल शिकत जाते. मात्र त्यात त्याच्या शिकण्याच्या उपजत वृत्तीला अडचण होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तिथेच सगळी गडबड होत असते. मुलांना शिकवण्याच्या उत्साहात, त्याने शिकायचे आहे हेच आपण विसरून जातो व त्याच्यावर सक्ती करू लागतो. त्याच्यातल्या कुतूहलाला चालना देण्यातून शिक्षण होत असते. उलट त्याच्यातल्या कुतूहलाला कुंठीत करण्याने त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत बाधा आणली जाते. शिकणे ही आनंददायी गोष्ट आहे. ती कंटाळवाणी झाली, मग मुलांचे त्यावरील लक्ष विचलित होते. आपल्याला वाटते की मुल शिकायचा कंटाळा करते आहे. पण वस्तुस्थिती उलट असते. आपणच त्याच्या शिकण्याची प्रक्रिया कंटाळवाणी करत असतो.

   मुलांना खेळायला खुप आवडते. आपण ज्याला खेळ म्हणतो वा समजतो, ते प्रत्यक्षात मुलाचे शिकणेच असते. पण त्यात कंटाळवाणे काही नसलयाने मुले उत्साहात खेळत असतात आणि त्यातून नकळत कितीतरी गोष्टी शिकत असतात. विचित्र वाटेल पण एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे. कुठलेही आईबाप वा पालक मुलांना कधी शिव्या शिकवत नाहीत. पण मुले शिव्या, अपशब्द शिकतात ना? खोड्या काढायला मुले कुठून शिकतात? खरे बोलायला आपण मुलांना नेहमीच शिकवतो, मग खोटे बोलायचे शिक्षण मुले कुठून मिळवतात? आपण ज्या गोष्टी शिकवत नाही, त्या मुले शिकतात कुठून? दुसरीकडे आपण कानीकपाळी ओरडून मागे लागून शिकवतो, त्या गोष्टी मात्र आत्मसात करताना मुलांच्या नाकी दम आलेला दिसतो. हा काय विरोधाभास आहे? न शिकवता शिकणे आणि शिकवले ते न शिकणे, असे का व्हावे? तर शिकणे हे मुलाच्या हातात असते. शिकवणे आपल्या हाती असले. तरी त्याची सक्ती करता येत नाही. ते शिकणे मुलाच्याच मर्जीवर अवलंबून असते. मुलाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून आपण मुलांचे शिक्षण करू शकत नाही. मग त्यासाठी कितीही पैसा ओतला म्हणून उपयोग नसतो. नावाजलेली मान्यवर शाळा, तिथल्या उत्तम सोयीसुविधा, यातून शिक्षण होणार नसते. ते केवळ मुलांच्या इच्छेवर आणि प्रयत्नावरच अवलंबून असते. कारण चांगल्यावाईट गोष्टी मुल कायम शिकत असते. त्याची शिकण्याची प्रक्रिया अखंड चालू असते. आपण त्यात किती, कुठे व को्णती मदत करणार व त्याला कोणती दिशा देणार एवढेच आपल्या हाती असते.

   आजचा पालक तेवढीच गोष्ट विसरला आहे. म्हणून मुलांचे शिक्षण महाग झाले आहे. ममता, माया व आपुलकी यांची जागा पैसा व साधने सुविधांनी घेतल्याचा तो दुष्परिणाम आहे. आपण मुलांना शिकवायचे आहे, त्यांचे भवितव्य घडवायचे आहे, या संभ्रमातून पालकाने बाहेर पडणे ही यातून योग्य मार्ग शोधण्याची पहिली पायरी आहे. तिथून सुरूवात केली तर शिक्षण महाग वा खर्चिक रहाणार नाही. कारण शाळा व तिथल्या अत्याधुनिक सुविधा ही तुमच्या मुलाची गरज उरणार नाही. मग त्यातले व्यापारी व त्यांची दुकाने तुमची लूट करू शकणार नाहीत. निरूपयोगी औषधे वा चाचण्या रोग्याच्या गळ्यात मारल्या जातात, तसेच अनावश्यक खर्च पालकाच्या गळ्यात मारले जात असतात. मग अशा व्यापार्‍यांनी तुमची मुले हे त्यांचे भांडवल केले तर नवल कुठले?    ( क्रमश:)
 भाग  ( ३०४ )    २३/६/१२

शुक्रवार, २२ जून, २०१२

इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता?


   जन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्‍या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची "जनकलियाण" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्‍या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्‍याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि "जनकलियाण" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय? शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय? पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो?  

   याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय? तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची? आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो? उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय? प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो.

   शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल? आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना? आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात? मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते.

   पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे? मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात.

   त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते? या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.     ( क्रमश:)
भाग  ( ३०३ )    २२/६/१२

माझे शब्द पोकळ शहाणपणाचे नाहीत


   फ़ादर्सडेच्या निमित्ताने माझी जी ओळख त्या लेखाने करून दिली, त्याने अनेक वाचक चकीतही झाले. कारण त्यांना प्रथमच लक्षात आले, की हा माणुस जे लिहितो त्याप्रमाणे वागायचा प्रयत्नही करतो. त्याचीही गोष्ट इथे सांगणे मला अगत्याचे वाटते. मी माझ्या मुलीच्या बालपणी आवश्यक होते तेव्हा माझ्या गरजा किंवा इच्छा बाजूला ठेवून तिला वेळ दिला, याचे लोकांना खुप कौतुक वाटते. किंबहूना त्यासाठीच त्या दिवशीच्या ’लोकसत्ते’तील त्या लेखाचे प्रयोजन होते. पण त्यात नेमके महान किंवा खास असे काही असावे असे मला अजीबात वाटत नाही. जर मीच तिला त्या काळात संभाळू शकणारा एकमेव व्यक्ती होतो व तिच्या आईला ते शक्यच नव्हते, तर मी जे केले त्यात मोठे असे काय आहे? एक जन्मदाता म्हणुन ते माझे कर्तव्यच नव्हते काय? केवळ मुलांच्या गरजा व त्यासाठी लागणारे पैसे किंवा साधने पुरवणे, एवढीच पालकाची जबाबदारी असते काय? पण दुर्दैवाने आज तशीच एक ठाम समजूत तयार झाली आहे. त्यातून अनेक समस्या तयार झाल्या आहेत. आपण मुलांना सर्वकाही द्यायला तयार असतो. त्यासाठी भरपुर पैसा मिळवणे हे आजच्या पालकांचे उद्दीष्ट बनले आहे. पण मुलांसाठी वेळ द्यायला मात्र आपण कमालीचे कंजुष असतो. मी तिथेच उदार होतो. किंवा जागरुक होतो म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीला अगदी कोवळ्या वयात संभाळावे लागल्याने मुलांच्या वाढीतले अनेक बारकावे मला शिकता आले. 

   थोडा वेळ माझी व मुलीची गोष्ट बाजूला ठेवून आजच्या पालकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या बघू. दोन अडिच वर्षाच्या मुलांना हल्ली पालक शाळा नावाच्या कोंडवाड्यात नेऊन डांबत असतो. त्यासाठी मुल अवघे वर्षाचे झाल्यापासून धावपळ सुरू होते. कुठली शाळा, तिथे द्यायची देणगी, मासिक फ़ी, वेळोवेळी शाळा मागेल ते पैसे व खर्च, अधिक शिकवण्या, अशा खर्चाने पालक बेजार झाला आहे. कारण तो आपल्या उत्पन्नानुसार मुलाच्या शिक्षणाचे पाच सात वर्षाचे बजेट आखून कुठल्यातरी शाळेत प्रवेश मिळवत असतो. पण त्याच शाळेने त्यात दरवाढ केली, मग पालकाचे बजेट कोसळते. माझे तसे झाले नाही. कारण कुठलीही शाळा मुलांना उत्तम शिकवते, यावर माझा विश्वासच नव्हता. त्यापेक्षा प्रत्येक मुलाचा पालक किंवा प्रामुख्याने त्याची आईच त्याच सर्वोत्तम शिक्षक असतो, असे माझे ठाम मत होते. ते नुसते माझे मत नव्हते, तर माझ्या औपचारिक शिक्षण न घेतलेल्या आईकडून जे शिकलो त्यापासून तयार झालेले अनुभवी मत होते. ते अर्थातच कोणाला पटणारे नव्हते. कारण साधारण तीसचाळीस वर्षापुर्वीपासून मध्यमवर्गात इंग्रजी शिक्षणाचे खु्ळ शिरले होते. मध्यमवर्ग किंवा उच्चभ्रू मध्यमवर्गात त्याची आधी लागण १९७० च्या दशकात झाली. मग क्रमाक्रमाने इतर वर्गात जशी सुबत्ता येत गेली, तसतसे हे इंग्रजी माध्यमाचे खुळ साथीच्या रोगासारखे सर्वत्र पसरत गेले. माझ्या मुलीला शाळेत घालण्याच्या दरम्यात ते कनिष्ठ मध्यमवर्गात पसरू लागले होते. त्यामुळेच माझ्याही मुलीला दोन तीन वर्षाची असताना इंग्रजी नर्सरी म्हणजे प्राथमिक शि्क्षणपुर्व वर्गात दाखल करण्यात आले होते. मला ते अजिबात पटलेले नव्हते. मुलांना मराठीत शिकवायला हवे असे माझे "अभिमानी" मत होते. पण भावी काळात इंग्रजीला पर्याय नाही हे आम्ही पालक झालो त्या पिढीच्या इतके डोक्यात फ़ीट बसले होते, की मी घरात व कुटुंबात त्याचा प्रतिवाद करूच शकलो नाही. पर्यायाने माझीही मुलगी नर्सरीत दाखल झाली.

   पण भाऊ तोरसेकर हा अत्यंत चेंगट स्वभावाचा माणुस. माझे मन हट्ट सोडायला तयार नव्हते. पण माझ्या हाती मराठी किंवा मातृभाषेत शिकण्याने कल्याण होते, असे दाखवणारा कुठलाही पुरावा नव्हता. योगायोग असा, की "लोकप्रभा" साप्ताहिकात मी त्यावेळी लिहित होतो आणि वसुंधरा पेंडसे नाईक तिथे संपादक होत्या. त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाले आणि त्यांनी त्यावरच लिहायचे काम मला दिले. लेख लिहिण्यापेक्षा मला माझ्या मुलीने मराठी माध्यमातून म्हणजे मातृभाषेच्या माध्यमातून शिकावे, या कल्पनेने पछाडले होते. मग मी अक्षरश: शेकडो लोकांशी बोललो. चारपाच नावाजलेल्या शाळाचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला. त्यांचे अनुभव जमा करत गेलो. त्यातून इंग्रजी माध्यमाविषयी इतरांचे गैरसमज दुर करणे सोडाच, माझा स्वत:चाही गैरसमज दुर झाला. तो खरेच चमत्कारिक अनुभव होता. मुळात मी मातृभाषेच्या अभिमानाने ते काम हाती घेतले होते. पण जेव्हा माहिती जमवली, तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. ती अशी, की उत्तम इंग्रजी भाषा शिकण्य़ासाठीच मुळात मुलांना मातृभाषेच्या माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. म्हणजेच इंग्रजी उत्तम येण्यासाठी इंग्रजी माध्यमात प्रवेश मिळवणे किंवा त्यासाठी प्रचंड देणगी, फ़ी वा खर्च हा शुद्ध मुर्खपणा आहे. मग त्यावर माझे असे जगावेगळे वाटणारे मत मांडणारा लेख मी लिहिला होता. तो "लोकप्रभा"च्या १८ व २५ ऑगस्ट १९८५ असा दोन भागात दोन अंकात प्रसिद्ध झाला होता. त्याचे शिर्षकच होते, "मातृभाषेला पर्याय नाही". तेव्हा अर्थातच माझी मुलगी इंग्रजी नर्सरीमध्ये शिकत होती, पण तिला मराठी माध्यमात आणायचा माझा निर्धार पक्का होता. पुढल्या वर्षी ती पहिलीत गेली आणि मी तिला मराठी माध्यमात आणुन बसवले. तेव्हा त्या शाळेचे खुद्द मुख्याध्यापकही थक्क झाले होते. कारण तेव्हा आजच्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फ़ुटले नव्हते आणि इंग्रजीत प्रवेश मिळवायला मोठीच झुंबड उडालेली असे. मग हा एक पालक इंग्रजीतला प्रवेश रद्द करून मुलीला मराठीत आणतो, तेव्हा त्यांनाही मी व्यवहारी चक्रम वाटलो तर नवल नव्हते.

   पण मी जेव्हा त्यांना माझ्या लेखाचे दोन्ही भाग वाचायला दिले, तेव्हा त्यांनाही माझे मत पटले. मात्र मित्र परिचित वा कुटुंबियांच्या मनातही शंकाच होत्या. पण कोणी विरोध केला नाही. कारण माझा हट्टी स्वभाव आणि त्यांचा माझ्याविषयीचा अनुभव. जवळची कुटूंबातली इतर मुले इंग्रजी माध्यमात असताना माझा हा हटवाद कोणालाही खटकणे स्वाभाविकच नाही काय? पण मुद्दा इतकाच, की मी जेव्हा बोलतो वा लिहितो तेव्हा ते मलाच पटलेले असते आणि त्याच्यावर माझा विश्वास असतो. ते कागदी वा शाब्दिक शहाणपण नसते. तेव्हा अनेकांनी मी मुलीच्या आयुष्याची माती करतोय, असा शेरा मारला होता. त्यांच्यावर मी अजिबात रागवलो नाही. कारण त्यांनी सत्य अजून बघितले नव्हते. जेव्हा मी माझ्या त्या हटवाद किंवा प्रयोगात यशस्वी झालो, तेव्हा त्यापैकीच अनेकांनी त्या अनुभवावर पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहावे असा सल्लाही मला दिला. मी ते ( कोरीपाटी ) लिहून प्रसिद्धही केले आहे. मी अशा सर्वांच्या मताचा आदर करतो. कारण त्यांची मते खोटी वा चुकीची नसतात. अनेकदा अशी मते अपुर्‍या माहितीवर आधारलेली असतात. दोष त्यांचा नसतो, तर त्यांना अपुरी माहिती देऊन अंधारात ठेवणर्‍यांचा असतो. शिवाय सोपी उत्तरे वा उपाय लोकांना आवडतात. ज्यात कष्ट नाहीत. स्वत:ला गुंतून पडावे लागणार नाही, असे उपाय व मार्ग लोकांना आवडतात. मग असे मार्ग सुचवणारा, उपाय सांगणारा त्यांना जिंकू शकतो. माझ्यासारखा प्रयत्नांची कास धरायला सांगणारा, जबाबदारी घ्यायला पुढे यायला सांगणारा, नावडता असणारच. त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.

   इंग्रजी भाषा फ़ाडफ़ाड बोलता आली मग मुल हुशार झालेच, हा किती सोपा उपाय आहे ना? पुढे कॉलेजचे शिक्षण इंग्रजीतच असणार आहे. मग आतापासूनच इंग्रजी यायला हवे. उच्चभ्रू मध्यमवर्गाचे आंधळे अनुकरण कनिष्ठ वर्गातले लोक करत असतात. त्या अनुकरणात सोपा मार्ग असतो. अभ्यास वा निरिक्षण न करता त्याचे अनुकरण अत्यंत सोपे असते. पण ते केल्याने येणारे आकस्मिक धोके मग संकटात ढकलून देत असतात. आज जे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे, ते पाहिले मग त्या पदरमोड करणार्‍या व पोटाला चिमटा घेऊन मुलांवर अफ़ाट खर्च करणार्‍या पालकांची मला खरेच दया येते. पण त्यांना मी कुठली मदत करणार? माझ्याकडे त्यांच्यासाठी स्वस्त व उत्तम शिक्षणाचा मार्ग आहे. पण सोपा मार्ग अजिबात नाही. त्यातल्या किती पालकांना मुलांनी उत्तम शिकावे अशी इच्छा आहे? मुलाच्या शिक्षणावर मोठा खर्च करण्याच्या महत्वाकांक्षेने आजच्या सुखवस्तू व कनिष्ठ मध्यमवर्गिय पालकाला पछाडलेले आहे. पण तो खर्च परवडेनासा झाला, मग त्यांची तक्रार असते. फ़ी कमी करावी, देणगी कमी करावी, अशा मागण्या सुरू होतात. पण यातले किती पालक मुलांना वेळ देऊ शकतील? पैशापेक्षा आपल्या मुलावर दिवसातला काही वेळ खर्च केला तर कुठलीही सामान्य शाळा देखील तुमच्या मुलांना गुणी व हुशार बनवू शकते. कारण शाळा अभ्यास करून घेत असते आणि पालक व कुटुंबिय मुलांना खरे शिक्षण देत असतात. पण हे पटायचे कुणाला? मी हे तीस वर्षाच्या अनुभवातून सांगतोय. पण मी आमिरखान थोडाच आहे. माझे कोण ऐकणार?  ( क्रमश:)
भाग  ( ३०२ )    २१/६/१२

बुधवार, २० जून, २०१२

आस्था आपुलकी नसलेले कोरडे सोहळे


   गेल्या शनिवारी इंग्रजीतला फ़ादर्सडे म्हणजे मराठीत पितृदिन साजरा झाला. भारतीय संस्कृतीमध्ये असले दिवस साजरे करण्याची आपली प्रथा नाही. पण मागल्या दोन दशकात जे जागतिकीकरण वेगाने दौडत सुटले आहे, त्यातून असे काही सणसोहळे परदेशातून आपल्याकडे येऊन प्रतिष्ठीत झाले आहेत. परदेशातून असे म्हणणे खरे तर चुकीचे आहे. अमेरिकेतून असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण ज्या प्रकारचे व्हॅलेंटाईनडे, मदर्सडे किंवा फ़ादर्सडे इथे मध्यमवर्गात साजरे करण्याचे हल्ली पेव फ़ुटले आहे, ते आपल्यावर अमेरिकन व्यापारी आक्रमकतेने लादलेले आहेत. त्यात आस्था किंवा आपुलकी असण्यापेक्षा देखावा अधिक  असतो. सोहळे साजरे होतात, पण त्यामागची प्रेरणा कुठली असते, याचीच शंका येते. ३० जानेवारी रोजी आपल्या देशात हुतात्मा दिवस पुर्वापार चालत आलेला आहे. ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली, तोच तो दिवस आहे. आजही तो साजरा होतो. पण ज्या शाळेत तो अगत्याने नियम म्हणुन साजरा होतो, तिथल्या शंभर मुलांना त्याबद्दल विचारले, तर दहा मुलांनाही त्याचे निमित्तही सांगता येणार नाही. पण त्याची गरजही नसते. सोहळा साजरा करण्याला महत्व आहे, त्याच्या निमित्ताला नाही. हेतू कुठलाही असो, आपण आपली मजा करायची. सॉरी, आपण आपले एन्जॉय करायचे असते. हल्ली साजरे काही होत नाही, एन्जॉय केले जाते. तसाच शनिवारी फ़ादर्स डे एन्जॉय करण्यात आला. 

   माझ्या बालपणी किंवा अगदी तरूणपणी असा दिवस असल्याचेही आम्हाला ठाऊक नव्हते. कुठल्या वृत्तपत्रातही त्याचा उल्लेख नसायचा किंवा त्याबद्दल लेख वगैरे प्रसि्द्ध झाल्याचे आठवत नाही. पण हल्ली असे दिवस मोठ्या ठाटामाटात साजरे होतात. आई किंवा बाप, ज्या कोणाचा दिवस असेल त्याला मुले शुभचिंतन करणारी छानपैकी कार्डेही देतात. वाहिन्यांपासून वृत्तपत्रात त्यासाठी काही लेखही येतात. अशाच एका लेखात माझाही उल्लेख आला. मराठी दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत काही निवडक पित्यांनी आपल्या मुलींसाठी काय केले, त्याची माहिती देणारे लेख प्रसिद्ध झाले. त्यात माझ्यावरही एक लेख प्रसिद्ध झाला. प्रा. नितीन आरेकर यांनी आधी मी व माझी कन्या वसूद हिच्याशी हितगुज करून तो लिहिला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. अर्थात चांगल्याच प्रतिक्रिया आल्या. कारण मी पत्रकार म्हणून खुप लोकांना ठाऊक असलो तरी एक चांगला व प्रामाणिक पालक होण्यासाठी मी केलेले प्रयास हा माझ्या आयुष्यातला खाजगी विषय राहिलेला आहे. जवलच्या परिचितांपलिकडे फ़ारशी कोणाला त्याबद्दल कल्पना नव्हती. यावर्षीच्या फ़ादर्सडेमुळे माझा तो चेहरा अनेकांना माहित झाला. अर्थात त्यात लपवण्यासारखे काहीच नव्हते. पण तरीही मी त्याला खाजगी जीवन मानतो. एक पालक म्हणून पार पाडलेल्या जबाबदार्‍या हा सार्वजनिक कौतुकाचा विषय होण्याचे काही कारण असू नये. ती प्रत्येक पालकाची व जन्मदात्याही जबाबदारीच असते. मग त्याचे कौतुक जगाला सांगायचे कशाला? फ़ारतर त्यातले उपयुक्त अनुभव जगाला जरूर सांगावे.

   असो. पण आता ते अनेकांना ठाऊकच झाले आहे, तर त्या निमित्ताने इथे काही उहापोह करायला हरकत नाही. गेले काही दिवस मी आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मतप्रदर्शन करतो आहे, तो पोकळ शहाणपणा आहे, असे काही लोकांना वाटले. त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला त्याबद्दल अजिबात खेद नाही. प्रत्येकाचे आपले मत असते आणि त्यात वावगे काहीच नाही. जेव्हा आपल्याला संपुर्ण माहिती नसते आणि आपण मत बनवतो तेव्हा ते परिपुर्ण असण्याची शक्यता कमीच असते. माझ्या लिखाणाबद्दल तसे कोणाचे मत झाले, तर त्यात त्या व्यक्तीची काही चुक आहे असे मला वाटत नाही. कारण आजवर त्यांना भाषणातून वा लिखाणातून शहाणापणा शिकवणारे जसे लोक भेटले असतील, त्यावरच त्यांचे मत बनणार. मग तोच निकष त्यांनी पत्रकार लेखक म्हणुन मला लावला तर त्यात चुक काहीच नाही. आणि आजची स्थिती पाहिल्यास बहुतांशी जे आपण ऐकतो वा वाचतो, ते सांगणारे व लिहिणारेच त्याचा सहसा अवलंब करताना दिसत नाहीत. म्हणजे लोकांना एक उदात्त उपदेश करायचा आणि स्वत:च मात्र त्याकडे साफ़ पाठ फ़िरवायची. जर असेच विचारवंत आपल्या वाट्याला आले आणि वाचकाचे असे मत बनले, तर वाचक दोषी कसा? ज्याच्यावर विश्वास नाही ते केवळ उपचार म्हणुन साजरे करायला लिहायचे, असेच आज चालत असते. म्हणूनच मी जेव्हा बोरिवली ट्रेनमधल्या मुलीवरील बलात्काराचा विषय लिहिल्यावर एका वाचकाने फ़ोन करून विचारले, तुम्ही मध्ये पडला असता काय? मी असा हस्तक्षेप करतो व विकतचे दुखणे वास्तव आयुष्यात घेतो, हे त्या वाचकाला ठाऊकच नसेल, तर त्याने असे विचारणे मला गैर वाटले नाही. कारण आजचे पत्रकार संपादक वा जगाला शहाणपण शिकवणारे, स्वत:वर तसाच प्रसंग आला मग पळ काढतात, हाच त्याचा व अनेकांचा अनुभव आहे.

   माझी कहाणी तशी नाही. मी एका सामान्य घरात जन्मलो व सामान्य मुलासारखा वाढलो. कामगार कष्टकर्‍यात माझे तरूणपण गेले. त्यांच्या दुखण्याखुपण्यातला मी भागिदार होतो व आहे. त्यामुळेच मला गरीबी, त्यामुळे येणार्‍या समस्या, भेडसावणारी महागाई, दरवाढीचे आकडे, यांचे संशोधन करून माहिती गोळा करावी लागत नाही. मी ती जगत असतो, भोगत असतो. विवाहितेचा छळ, हुंडाबळी, मुलींची छेड काढणारी गुंडगिरी, रेशनच्या दुकानात होणारी हेराफ़ेरी अशा शेकडो समस्या मी भोगल्या आहेत व अनुभवत असतो. त्या सांगायला वा समजावून द्यायला आमिरखानच्या सत्यमेव जयतेच्या कुबड्या मला घ्याव्या लागत नाहीत. सभोवताली सोनोग्राफ़ी मशिनची व सेंटरची वाढणारी संख्या व त्यातून होणारा धंदा मी पाहू शकलो, ज्यांना आजच स्त्रीभृणहत्या होत असल्याचा अपुर्व शोध आमिरखानमुळे लागला, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की आम्ही हा विषय ३५ वर्षापुर्वी मांडला आहे. तेव्हाच्या "श्री" नामक साप्ताहिकात वसंत सोपारकर हा संपादक होता आणि आमची टीम तिथे लिहिण्याचे काम करत होती, तेव्हा १९७५ च्या सुमारास पुष्पा त्रिलोकेकर यांनी त्यावर प्रदिर्घ लेख तेव्हा लिहिला होता. लाखो लोकांनी तो वाचलाही होता. तो वाचणारे आज पन्नाशी साठीच्या घरात असतील. ज्यांना आज सत्यमेव जयते बघून धक्का बसला त्यांचे वडील किंवा आजोबा त्यावेळच्या श्री साप्ताहिकाचे वाचकही असू शकतील. सांगायचा मुद्दा इतकाच, की आम्ही तरूण पत्रकार होतो तेव्हा असे समाजहिताचे विषय अक्राळविक्राळ राक्षसी रुप धारण करण्यापुर्वीच वाचकांसमोर आणत होतो. आम्हाला कोणा आमिरखान किंवा अन्य अभिनेत्याने तशा समस्या दाखवण्याची कधीच गराज भासली नाही.  

   जेव्हा पुष्पा त्रिलोकेकर यांचा तो स्त्रीभॄणहत्येचा लेख प्रसिद्ध झाला होता, तेव्हा सोनोग्राफ़ीची यंत्रे अशी गावोगाव बोकाळलेली नव्हती. किंवा सहजगत्या कोणाला गर्भलिंग चिकित्सा करून घेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. पण तेव्हाही मुलगी असलेला गर्भ केवळ संशय व शंकेच्या आधारे मारण्याचे उद्योग चालू होते. ते आमच्यासारखे पत्रकार व नागरिक साध्या डोळ्याने पाहू शकत होते. त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याची धडपड करत होते. त्याची कोणीतरी म्हणजे सरकारच नव्हे तर सामान्य समाजाने गंभीर दखल तेव्हाच घेतली असती, तर आज जो स्त्रीभृणहत्येचा अक्राळविक्राळ राक्षस भेडसावतो आहे, तो इतका अवाढव्य आकाराचा झाला तरी असता काय? पण मजेशीर गोष्ट बघा. त्यावेळी हा लेख पसिद्ध झाल्यावर कित्येक नाराज प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नाराजी कसली असेल? इतक्या उघडपणे गर्भपात व स्त्रीगर्भाच्या हत्येविषयी लिहिणे शोभादायक आहे काय, अशी ती तक्रार वा नाराजी होती. आहे ना गम्मत? सत्य नाकारण्याची आपली मानसिकता किती चेंगट आहे बघा. तेव्हा अशा गोष्टी कशाला लिहायच्या, ही तक्रार होती. आज जे सत्यमेव म्हणून सांगितले जात आहे, त्यातले लपवलेले सत्य समोर आणले तरी तक्रार आहे.

पण बिघडत नाही. इतकी वर्षे पत्रकारिता करताना ज्याच्यावर माझा विश्वास आहे, ते लिहित व सांगत आलो, तसा वागत आलो. मी त्यात एकटाच नव्हतो. पंढरीनाथ सावंत, पुष्पा त्रिलोकेकर, वसंत सोपारकर, श्याम मोकाशी किंवा दिलीप जोशी वा प्रदीप वर्मा अशी आमची टोळी होती. आज त्यातला सोपारकर तेवढा काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण आम्ही पत्रकारिता अशी केली, की लोकांना शहाणपण शिकवताना आपण जे सांगतो त्याच्यावर आमचा आधी विश्वास होता व आहे. जे स्वत:ला पटणार नाही, वा पटलेले नाही, ते सांगायचा देखावा आम्हाला कधी जमला नाही. आवडणारे सत्य लोकांना सांगणे खुप सोपे असते. पण नावडते सत्य सांगायला हिंमत लागते. त्याची किंमतही मोजावी लागते. आम्ही त्याची कधी पर्वा केली नाही. माझी ही पार्श्वभूमी ज्यांना ठाउकच नाही त्यांना माझे नावडते सत्य आवडणे अशक्यच आहे. म्हणुनच त्यांच्या ना्राजीने मला दु:ख नाही. कारण आजच्या बाजारी संस्क्तीमध्ये फ़ादर्सडे जसा सोहळा झाला आहे, तसाच सत्यमेव हा सुद्धा सोहळाच आहे. एक दिवस बापाला गिफ़्ट किंवा सुंदर कार्ड द्यायचे आणि मग त्याच बापाला आईला विसरून जायचे. तसेच दुसर्‍या दिवशी विसरायचे सत्य अखेरीस जिंकणार कसे तेवढेच मला कळत नाही.  ( क्रमश:)
भाग  ( ३०१ )    २०/६/१२

आपल्या आरोग्याची माती करणारी ब्रॅन्ड व्हॅल्यू


   मी सातारा माण तालुक्यातल्या महीमानगड गावात काही दिवस वास्तव्य करतो हे आधीच सांगितले आहे. तिथे शेजारीच सातवीतला अनिकेत कुंभार उर्फ़ बाबू नावाचा मुलगा आहे. त्याला हॉर्लिक्स किंवा बोर्नव्हिटा हवे असते. अशा कित्येक जाहिराती टिव्हीवर बघून खेड्यापाड्यातल्या मुलांनाही भुरळ घातली जात असते. त्यातल्या किती खाद्यवस्तू खरेच शारिरीक वाढीसाठी उपयुक्त आहेत? कुरकुरे किंवा पेप्सी लेहर अशा खाद्यवस्तू किंवा मॅगी नुडल्स तर अनेक आजाराला आमंत्रण असल्याचे सिद्ध झालेले आहे. पण आपण अगदी सुशिक्षित म्हणवणारे लोकही मुलांना त्याच अपायकारक गोष्टी अगत्याने खाउ घालत असतो. त्यातून आजारांना आमंत्रण देत असतो. चविष्ठ वाटावे व चवदार लागावे म्हणून अशा पदार्थांमध्ये ज्या रसायनांचा मारा केलेला असतो त्यातून डझनावारी आजार नकळत आपल्या शरीराचा कब्जा घेत असतात. केसाला लावायचे शाम्पु. वेगवेगळी तेले. सौंदर्यप्रसाधने यांचा जाहिरातीमधून आपल्यावर मारा होत असतो. त्यापैकी किती गोष्टी खरेच आपल्या गरजेच्या आहेत? किती अनावश्यक आहेत? किती आरोग्याला अपायकारक आहेत? पण आपण पैसे खर्च करून त्या आजार वा अपायांना आमंत्रण देतच असतो ना? आपण इतके मुर्ख आहोत काय, की पदरमोड करून कुठल्या अपाय आजारांना आमंत्रण देऊ? पण होते मात्र तसे आहे. जागतिक आरोग्य संघटना व अन्य संशोधनाने वेळोवेळी जे अहवाल दिलेले आहेत, त्याकडे पाहिल्यास पुढारलेल्या देशात चक्क बंदी असलेल्या अनेक वस्तू व उत्पादने इथे बेधडक निर्माण होतात व विकल्या जात असतात. त्यात औषधांचाही समावेश आहे. मग हे चालते कसे? तर त्यालाच ब्रॅन्ड मार्केटींग म्हणतात. एक नाव मोठे करायचे आणि मग त्याच नावाने काहीही भोळ्याभाबड्या लोकांच्या गळ्यात मारायचे. त्यासाठी लोकांना आवडणार्‍या व्यक्ती वा नावाजलेल्या लोकांना पुढे करायचे असते. 

   सचिन तेंडुलकर, आमिरखान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, महेंद्रसिंग धोनी, हे आपल्या देशातले लोकप्रिय चेहरे आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या प्रतिमेची भुरळ पडलेले लोक, त्यांच्या तोंडून बाहेर पडणार्‍या शब्दांवर सहजगत्या विश्वास ठेवत असतात. अशी नावाजलेली माणसे स्वत: एक व्यक्ती म्हणूनच ब्रॅन्ड झालेली असतात. मग अन्य व्यापारी कंपन्या त्यांना पुढे करून, आपला माल लोकांच्या गळ्यात मारायचा उद्योग करत असतात. त्याला मार्केटींग म्हणतात. हल्ली माल याचा अर्थ वस्तू एवढाच राहिलेला नाही. एखाद्या राजकीय सभेला गर्दी जमवण्यासाठी अशा लोकप्रिय व्यक्तींची हजेरी मोलाची मानली जाते. जाहिर सभा समारंभ, सोहळे उत्सव यात मग मुद्दाम त्यांना आणले जात. त्यांची हजेरी असली मग त्यांना बघायला गर्दी आपोआपच जमते. त्याला ब्रॅन्ड व्हॅल्यू म्हणतात. म्हणजे नावाची, छापाची किंमत. अगदी सत्यमेव जयतेची जी वेबसाईट आहे तिचेही तोतये निघाले आहेत. त्या बनवेगिरीला फ़सू नका असे का सांगितले जाते? तर आमिरच्या नावाने सत्यमेव जयते चालते. मग सत्यमेव जयते हे नाव ब्रॅन्ड होतो. त्याच नावाने अनेकजण आपली तुंबडी भरू शकतात. ते होऊ नये म्हणून तोतयेगिरीपासून सावध रहायचा सल्ला दिला जात असतो. पण मुद्दा काय आहे? तर ब्रॅन्ड. ज्या नावावर लोक विश्वास ठेवतात, आपला जो विश्वास आहे त्याचा हा असा धंदा चालतो. त्याला ब्रॅन्ड हे व्यापारी भाषेतले नाव आहे. एकदा का ब्रॅन्ड प्रस्थापित झाला, मग त्या नावाने काहीही खपवता येत असते. त्याची किंमत कितीही लावली तरी लोक मोजायला तयारच असतात असे नाही, तर उत्सुक असतात.

   या बाबतीतला डॉक्टर विषयीचा माझा अनुभव इथे मुद्दाम नमूद करण्यासारखा आहे. माझी मुलगी काही महिन्यांची असताना डॉ. एस. एन. लोहे या नामवंत डॉक्टरांकडे आम्ही तिला घेऊन गेलो होतो. तिला चढलेला ताप उतरत नव्हता. पण तिच्या अंगाला हात लावण्यापुर्वीच त्यांनी आम्हा आईबापांना तंबी भरली, "तुमच्याकडे मोजायला पैसे आहेत म्हणुन इथे मुलीला माझ्याकडे घेऊन यायचे नाही. जरा सर्दी पडसे झाले म्हणून माझ्याकडे यायचे नाही. मुलीचे बारीकसारीक आजार तुम्हालाच हाताळता आले पाहिजेत. मुलांची तब्येत उत्तम राखायची तर त्याला डॉक्टरपासून दुर ठेवायचे असते. तुमच्याकडे खर्चायला पैसे असतील पण माझ्याकडे कुणाच्या श्रीमंतीचे चोचले पुरवायला वेळ नाही. जो आजारी आहे त्याच्यासाठीच माझा वेळ वापरता आला पाहिजे. माझा वेळ व कौशल्य खर्‍या आजारी मुलांसाठी आहे. इथे पैशाची मस्ती चालत नाही." त्यांचे शब्द मी अजून विसरलो नाही. कारण प्रत्येक पेशंटकडुन ते वेगवेगळी फ़ी घेत होते. आमच्याकडून तेव्हा त्यांनी शंभर रुपये घेतले तर आधी एक गरीब मुस्लिम महिला बाळाला घेऊन आली होती, तिच्याकडून फ़क्त दहाच रुपये घेतल्याचे मी पाहिले होते. आणि डॉक्टर लोहे कोणी सामान्य असामी नव्हती. बालरोगतज्ञ म्हणुन त्यांचा मुंबईच्या वैद्यक क्षेत्रात मोठाच दबदबा होता.

   आणखी एक आठवण त्यांचीच इथे नमूद केलीच पाहिजे. त्यांनी लिहून दिलेले एक औषध दहा दुकाने फ़िरूनही मिळाले नाही, म्हणुन मी पुन्हा दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे गेलो व पर्यायी औषध लिहून मागितले. तर डॉ. लोहे यांनी मलाच दम भरला. मी सांगतो म्हणजे हे औषध उपलब्ध आहे. आणि तेच मुलीला दिले पाहिजे. दुसरे सांगणार नाही. बाप झाला आहेस तर पन्नास नाही शंभर दुकाने फ़िरून औषध शोधून काढ. पर्याय कसा चालेल? उपायाला पर्याय नसतो. शेवटी ते औषध मला दिड दिवस फ़िरल्यावर मिळाले. पुढे त्याबद्दल बोललो तर डॉक्टर म्हणाले तेच स्वस्त पण सर्वात उत्तम औषध होते. पर्याय महाग पण परिणामकारक नव्हते. मुद्दा इतकाच, की त्यांनी मला वैद्यक सेवेविषयी जागरुक बनवण्य़ाचे मोठे काम केले. पर्याय महत्वाचा नसून उपाय महत्वाचा असतो, हे मी तिथेच शिकलो. आज किती लोकांना आपल्या प्रकृतीविषयी तेवढी आस्था आहे? त्या डॉक्टरांनी मला नुसती औषधे सांगितली नाहीत तर माझ्या आरोग्यविषयक कल्पनांमध्ये आलेली विकृती साफ़ केली. जर तुम्हाला आपल्या प्रकृतीबद्दल फ़िकीर नसेल तर अन्य कोणी कशाला त्याची पर्वा करील, हेच त्यांच्या दमदाटीचे सार होते. आजच्या डॉक्टरांकडे आपण जातो, तेव्हा आपण खरेच किती जागरुक असतो? पैसे मोजायची मस्ती त्यामध्ये किती असते आणि आपल्या स्वत:च्या पकृतीमध्ये सुधारणा व्हावी, याबद्दल आपली आस्था किती असते?

   आपल्याला आजारातून उपचार करणारा डॉक्टर हवा असतो, की झटपट चमत्कार घडवणारा जादूगार हवा असतो? पैशाची काळजी करू नका, अशी भाषा कुठेही ऐकू येत नाही काय? वाटेल ते करा डॉक्टर पण उद्या ठिकठाक झाले पाहिजे, असे कोण सांगत असतो? जेव्हा आसपासचे लोक असे बोलतात किंवा त्यातही पुढारलेले, सुखवस्तू लोक असे वागताना दिसतात, तेव्हा सामान्य माणुसही त्यांचेच अनुकरण करत असतो. आणि हा माझा शहरी अनुभव नाही. ज्या खेड्यात मी वास्तव्य केले आहे, तिथे दोन बाटल्या सलाईन चढवले हे मोठेपणाने सांगणार्‍यांना मी ऐकत असतो. त्याचे खुप दु:ख होते. मला तर हा आता आजारच वाटू लागला आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करावी तशा थाटात सामान्य माणसे उपचार व डॉक्टर यांच्यासाठी केलेला खर्च अभिमानाने सांगतात, तेव्हा त्यातले सत्य शोधणे भाग असते. त्या सत्याकडे पाठ फ़िरवून हा गंभीर विषय मनोरंजक करून मांडणे लोकांच्या व आमिरच्या डोळ्यात अश्रू जरूर आणु शकेल. पण त्यामुळे समाजाचे आरोग्य सुधारण्याची अजिबात शक्यता नाही. उलट ते अधिक बिघडतच जाण्याची दाट शक्यता आहे. कारण खर्चीक चंगळवादातून आजच्या जीवनाला जो आजार जडला आहे त्यानेच या समस्या निर्माण केल्या आहेत. आंधळे अनुकरण त्याचे एक कारण आहे. आमिर खानने समस्या खर्‍या सांगितल्या, पण त्याचे विश्लेषण मात्र अर्थाचा अनर्थ करणारे आहे. एका तात्विक ग्रंथाचा मनोरंजक सिनेमा करून टाकावा असाच सगळा प्रकार आहे. सोपी उत्तरे व सोपे उपाय कसे घातक असतात ते लौकर कळत नाहीत. त्याचे परिणाम उशीरा समजतात व समजून उपयोग नसतो. कारण दुरुस्ती करण्याची वेळ निघून गेलेली असते. जागतीक आरोग्य संघटनेने तेच पाप केले त्याचा दाखला किती लोकांना ठाऊक आहे? सोप्या उत्तरातला तो यमराज तुमच्या आमच्या जीवाशी काय खेळ खेळून गेला ते करोडो भारतीयांना अजून कळू शकलेले नाही.   ( क्रमश:)
भाग  ( ३०० )    १९/६/१२

रविवार, १७ जून, २०१२

औषध नाही तर पैसे उपचार करतात ना?


   डेव्ही नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने केलेला एक प्रयोग मोठा विलक्षण होता. या प्रयोगासाठी त्यांनी स्वत:च्या निरिक्षणशक्तीबद्दल प्रसिद्ध असलेल्या अनेकांना प्रेक्षक व परिक्षक म्हणून आमंत्रित केले होते. त्यात पोलिस अधिकारी, डॉक्टर, विद्वानांचा समावेश होता. तो प्रयोग पिशाच्च दिसण्यासंबंधी होता. त्या प्रयोगात डेव्ही यांनी पिशाच्च दृगोचर होणे, मानवी मदतीशिवाय पाटीवर अक्षरे लिहिली जाणे; अशा अनेक गोष्टी करून दाखवल्या. तो प्रयोग संपल्यावर अनेक उपस्थितांनी पिशाच्चांच्या मदतीशिवाय झाले ते शक्य नव्हते असे लेखी कबूल केले. मग डेव्ही यांनी तो सगळा हातचलाखीचा प्रयोग होता हे पुराव्यानिशी तिथेच सिद्ध करून दाखवले. या घटनेची साक्षिदार असलेल्या एका पत्रकाराने त्याची बातमी नंतर प्रसिद्ध केली, त्यात तो म्हणतो, " या हातचलाखीच्या प्रयोगाच्या आश्चर्यकारकतेपेक्षा सुद्धा तिथे जमा असलेल्या निरिक्षकांच्या अहवालाचा आश्चर्यकारकपणा अधिक विलक्षण होता. डेव्ही यांनी वापरलेल्या युक्त्या वापरण्याचे धैर्य त्यांनी दाखवावे, याचेच कोणाला आश्चर्य वाटेल. परंतू तिथे जमलेल्या जमावाच्या मनावर इतका विलक्षण ताबा डेव्ही यांनी प्रस्थापित केला होता, की जे त्यांन दिसत नव्हते तेच ते पहात आहेत, असे वाटावयास डेव्ही यांनी प्रेक्षकांना भाग पाडले होते. वास्तविक आपण हातचलाखीचा प्रयोग करणार आहोत अशी आगावू सुचना त्यांनी प्रेक्षकांना दिली होती. तरीही प्रेक्षक फ़सले होते." 

    "झूंडीचे मानसशास्त्र" या दिवंगत चिंतनशील लेखक विश्वास पाटिल यांच्या पुस्तकातला हा उतारा. त्यात माणसाच्या सामुहिक मनावर कसा प्रभाव पाडता येतो, त्याचा दाखला आलेला आहे. ब्रॅन्ड म्हणजे काय ते म्हणूनच समजून घ्यायला हवे. ब्रॅन्ड म्हणजे तुमच्या आमच्या सामुहिक मनावर पाडलेली छाप असते. जे नाव, चेहरा, चिन्ह घेतले मग आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्याला ब्रॅन्ड म्हणतात. एक जाहिरात अनेक्दा वाहिन्यंवर लागले. खैतान, बस नाम काफ़ी है. त्याचा अर्थ काय होतो? तेवढ्या नावावर विश्वास ठेवायचा. बाकी किंमत, लायकी, उपयुक्तता यापैकी कशाचाच विचारही करायचा नाही. अशा नावाची, ब्रॅन्डची भुरळ घातली; मग त्याला पुढे करून काहीही खपवता येत असते. टाटा, रिलायन्स, ग्लॅक्सो, हिंदुस्तान लिव्हर असे जे ब्रॅन्ड आपल्या देशात आज उदयास आले आहेत, त्यासाठीच पैसे मोजावे लागत असतात. आमिर खानही असाच ब्रॅन्ड आहे. त्याने कुठलीही नवी माहिती जगासमोर आणली नाही. पण तो सादर करतो म्हणुन आपल्याला त्याची भुरळ पडत असते. तेच मुद्दे व प्रश्न कित्येक दिवस व वर्षे आधीपासून अनेकांनी मांडले आहेत. त्यासाठी संघर्षही केला व चालविलेला आहे, पण त्या धडपड्यांना कोणी इतकी प्रसिद्धी दिली नाही. त्यांची गंभीईर दखलही घेतली नाही कारण त्यांच्या नावाभोवती आमिरसारखे वलय नाही. त्यांचे नाव हा ब्रॅन्ड नाही. त्यातल्या अनेकांनी जीव धोक्यात घालून अनेक मुजोरांचे शत्रूत्व पत्करून संघर्ष केला आहे. त्यांचे काय? मग होते काय, की उपाय होणार्‍या औषधांची कोणाला गरज आहे? प्रत्येकाला ब्रॅन्ड हवा आहे. जसलोक वा लिलावतीमध्ये शस्त्रक्रिया केल्याचे कौतुक आपण किती लोकांकडून ऐकत असतो? तिथे झालेल्या प्रचंड खर्चातले मोठेपण सांगणार्‍याच्या शब्दातून लपते का?

   स्त्री भृणहत्येचीच गोष्ट घ्या. वर्षा देशपांडे यांनी शेकडो सोनोग्राफ़ी मशीनना सील ठोकायची वेळ आणली. पण त्यांच्या नावाला ब्रॅन्ड व्हॅल्यू नाही ना? त्यांच्या कष्ट, प्रयत्नांना किंमत नाही. तशीच स्वस्तातल्या औषधांना किंमत नसते. कमी पैशात उपचार करणारे डॉक्टर थोडे नाहीत. पण त्यांच्या उपचाराकडे फ़िरकतो कोण? देखावा फ़क्त सत्यमेव जयते पुरताच मर्यादित नाही. गरीबाला औषधे व महागडे उपचार परवडत नाहीत, असे म्हण्णे सोपे आहे. पण खरेच गरीबाला स्वस्तातले परवडणारे उपचार व औषधे हवी आहेत काय, याचेही उत्तर शोधावे लागेल. माझाच अनुभव सांगतो. आज ज्याला दुष्काळी भाग म्हणतात, त्या सातार्‍याच्या माण तालुक्यात महिनानगड नामक गावात माझे महिन्यात किमान दहाबारा दिवस तरी वास्तव्य असते. तिथे एक सामन्य डॉक्टरचा दवाखाना आहे. दोन वर्षापुर्वी त्या गावात उलट्या जुलाबाच्या विकाराने अर्धेअधिक लोक बेजार झालेले होते. मीसुद्धा त्याचा एक बळी होतो. मग फ़रक इतकाच होता, की मी घरच्या घरी उपचार घेत होतो. अनेकांना साखरमीठ मिसळून भरपूर पाणी प्यावे असे सांगत होतो. पण को्ण दाद देतो मला. उठेल तो दवाखान्यात जाऊन "सलाईन चढवून" ठणठणीत बरा व्हायला उतावळा झालेला होता. माझ्यासारखा शहरात आयुष्य घालवलेला शहाणा साधे साखरमीठाचे पाणी पितो म्हणजे त्यांना मुर्ख वाटत होता. हे म्हटले तर रहस्य आहे. पण समजून घेतले तर त्यात कसलेही गुढ नाही.

   उपचार औषधाने वा डॉक्टरी उपायांनी होत नसतो. शारिरीक आजारात मानसिक प्रभाव अधिक असतो. डॉक्टरकडे गेले मग लोकांना अर्धे आपोआपच बरे वाटते. उरलेला अर्धा आजार औषध व उपचारांनी बरा होत असतो. त्यात पुन्हा डॉक्टर कुठला व किती नावाजलेला, यावर गुण येणे अवलंबून असते. त्या गावातला माझा अनुभव त्यापेक्षा वेगळा नव्हता. उत्तम उपाय म्हणजे सलाईन चढवणे या समजूतीचे ते सगळे बळी होते. उलट्या वा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाणी घटत असते. त्याची अधिकाधीक भरपाई आवश्यक असते. आणि हे काही माझे ज्ञान नाही. सरकारच्या आरोग्य खात्याकडून सतत त्याच्या जाहिराती टिव्ही किंवा रेडिओवरून चालूच असतात. चिमुटभर साखर व मीठ टाकून पाणी घ्यावे, असे सल्ले त्यातून दिले जात असतात. मग त्याकडे पाठ फ़िरवून लोक डॉक्टरकडे धावत कशाला जातात? मला आठवते, त्याच गावातील एक म्हातारी नानी म्हणून आहे. कष्टकरी असलेल्या त्या म्हातारीचा तरूण मुलगा तसाच आजारी होता. पैसे नाहीत म्हणुन ती दु:खी होती. माझा सल्ला गरीबीमुळे तिने मानला आणि नंदू गुजले नुसत्या भाताच्या पेजेवर चार दिवस राहिला आणि ठणठणीत बरा झाला. मग बाकीच्यांना सलाईन चढवण्य़ाची काय गरज होती? त्यांना खरोखरच स्वस्तातले उत्तम व गुण देणारे उपचार हवे होते, की पैसे खर्च केल्यावरच गुण येतो अशा समजूतीचे ते बळी आहेत?

   हा सुद्धा एक प्रकारचा गंभीर भ्रष्टाचारच आहे. त्यात पैसे द्यावे घ्यावे लागत नाहीत. इथे बुद्धी भ्रष्ट केली जात असते. अमुक घेतले मग तमुक होते, अशा ज्या समजूती घडवल्या जात असतात, त्यातून अवघे समाज जीवनच भ्रष्ट करून टाकण्यात आले आहे. ज्या सलाईनच्या बाटलीची वा पिशवीची खुल्या बाजारातील किंमतही वीसपंचवीस रुपये नव्हती, तिच्यासाठी दिडशे दोनशे रुपये खर्चायची हौस कशाला असते? बारीकसारीक बाबतीत औषध सोडा इंजेक्शन का घ्यावे लागते? तसाच एक अनुभव आहे. बैलाच्या धक्क्याने मुका मार लागलेला संभा गायकवाड त्याच महिमानगडातला रहिवासी आहे. त्याची छाती दुखत होती. माझ्याकडे असलेली एक ट्य़ूब लेप म्हणून त्याला लावली. त्याला थोडा आराम पडला. तरी तो दुसर्‍या दिवशी तालुक्याच्या गावी जाऊन एक्सरे काढून आला. मग डॉक्टरने त्याला जी ट्यूब दिली ती त्याने अगत्याने आणून मला दाखवली. कारण त्याच ट्यूबचा लेप मी लगेच त्याला लावला होता. पण त्याला गुण आला तो खिशातले चारपाचशे रुपये खर्च केल्यावरच ना? या आजारावरचा उपाय कोणाकडे आहे? डॉक्टर नावाची जी जादू लोकांच्या मनावर गेल्या काही दशकात चालवण्यात आली आहे, त्याचाच हा दुष्परिणाम नाही काय? खुट्ट वाजले तरी डॉक्टरकडे धावायचे. शिंक आली औषध घ्याचे. तेसुद्धा झटपट गुण देणारे असायला हवे. पथ्य, शिस्त यापेक्षा बेशिस्त आणि कुपथ्य़ यांनी आपले आयुष्य़ आज खुप बेजार झाले आहे. त्यातूनच डॉक्टरवर अवलंबून रहाण्याची सवय अंगवळणी पडली आहे. त्यातून औषधे व डॉक्टरी उपचार ही आपली मानसिक गरज बनली आहे. किंबहूना बनवण्यात आली आहे.

   जेव्हा अशा रितीने कृत्रीम गरज निर्माण होते, तेव्हा त्याचा पुरवठा करून त्यातच आपला धंदा जमवणारे व्यापारी आपोआपच पुढे येत असतात. इतरांची गरज ही व्यापार्‍यासाठी संधी असते. मग ती गरज खरी असो की खोटी असो. व्यापार्‍याला त्याच्याशी कर्तव्य नसते. व्यापारी नफ़्याच्या हेतूनेच काम करत असतो. लोकांच्या समजुती, भ्रम, गैरसमज जर नफ़ा देत असतील तर व्यापारी ते दुर करत नाही. आज औषधे व उपचार यांच्याबद्दल ज्या समजुती व भ्रम तयार करण्यात आले आहेत; त्यांनी लोकांची अधिक लूट होत असते. कित्यकदा तर गरज वा आवश्यकता नाही, असा माल लोकांच्या गळ्यात मारला जात असतो. ज्या देशात तीन पैकी एक माणुस उपासमारी व अर्धपोटी जगतो आहे, ७० टक्के जनतेला पाण्याचा पुरवठाच होत नाही, तेव्हा अक्वागार्ड सारखी कंपनी पिण्याचे पाणी घरच्या घरी शुद्ध करण्याची यंत्रे विकण्याचा धंदा करते आणि सत्यमेव जयतेला प्रायोजित सुद्धा करते, यातला विरोधाभास आपण समजूनच घ्यायचा नाही काय?     ( क्रमश:)

भाग  ( २९९ )    १८/६/१२

सत्यमेव जयतेची जन्मकथा काय आहे?


सत्यमेव जयते ही मालिका सुरू होण्यापुर्वी आमिरखानने अनेक वाहिन्यांवर त्याच्या मुलाखती प्रक्षेपित झाल्या. चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर वाहिन्यांवर येऊन गाजले किंवा कोसळले असताना पक्का बिझीनेसमन असलेल्या आमिरने मात्र तिकडे वलण्याचा विचारही केला नव्हता. त्यालाहि ऑफ़र्स आल्या होत्या. त्यापैकीच एक ऑफ़र स्टारप्लसच्या उदय शंकर यांची होती. पण अन्य अभिनेत्यांप्रमाणे मनोरंजक कार्यक्रमात सहभागी व्हायला आमिरने नकार दिला. पण तेव्हापासून छोटा पडदा त्याच्या मनात घोळत होता. माग एक वर्षापुर्वी त्याच्या डोक्य़ात एक कल्पन आली आणि काही मित्रांच्या मदतीने त्याने संशोधन करून एक मालिकेची एक संकल्पना तयार केली. ती स्टारप्लस समोर मांडली. त्यांनीही मान्य केली. मगच त्या मालिकेची निर्मिती सुरू झाली. हे आमिरनेच मुलाखतीत सांगितले म्हणून मला ठाऊक. इथे एक वर्षापुर्वी आमिरला कल्पना सुचली असे तोच म्हणतो तेव्हा एक वर्ष आपणही मागे जाऊन बघायला हरकत नाही. अप्रिल २०१२ मध्ये सत्यमेव जयतेचा गवगवा सुरू झाला आणि ६ मे रोजी पहिला भाग प्रक्षेपित झाला. त्याच्या एक वर्ष आधी अप्रिल मे २०११ मध्ये काय झाले होते? अण्णा हजारे नावाचा एक माणूस आपल्या काही सहकार्‍यांच्या साथीने द्ल्लीत जंतरमंतर या जागी लोकपालच्या मागणीसाठी उपोषणाला बसला होता. तिथे जाऊन अनेकांनी अण्णांना समर्थन दिले त्यात आमिरखान याचाही समावेश होता. त्याच आसपास आमिरला सत्यमेव जयतेची संकल्पना सुचली असावी ना? मग त्याचा अण्णांचे आंदोलन वा उपोहण किंवा त्याने लोकांचे भारावून जाणे यांचा काही परस्पर संबंध आहे काय? अण्णांकडून आमिरने प्रेरणा घेतली की तिथे जमलेल्या गर्दीकडून आमिरला चालना मिळाली?    

त्याच्याही आधी "रंग दे बसंती" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर असाच आपल्या सहकारी कलावंतांसह दिल्लीत सुरू असलेल्या मेधा पाटकरांच्या उपोषण धरण्याच्या जागी जाऊन पोहोचला होता. त्यापुर्वी किंवा त्यानंतर कधी त्याने अशा चळवळी वा सामाजिक सामस्यांमध्ये लक्ष घातले, भाग घेतल्याच्या बातम्या नव्हत्या. जसे संदर्भ असतात वा त्याचे चित्रपत येतात तसे त्याने त्या समस्यांशी संबंधित आंदोलने वा चलवळींचा वापर प्रमोशनसाठी करून घेतला होता. एका व्यावसायिकाच्या हुशारीचे ते लक्षण आहे. चित्रपट चालवावा म्हणून त्याने असे करण्यात व्यावसायिक नितीमत्ता सामावलेली आहे व होती. असो, अण्णांच्या आंदोलनाला शुभेच्छा द्यायला गेलेल्य आमिरला त्याच दरम्यान सत्यमेव जयतेची संकल्पना सुचावी हे त्याच्या चाणाक्ष व्यावसायिकतेचेच लक्षन आहे. त्याबद्दल कोणी तक्रार करण्याचे कारन नाही. अण्णा टीम ज्या भ्रष्टाचाराकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत, त्याला गांजलेल्या सामान्य माणसाकडून मोठाच प्रतिसाद मिलत आहे. त्यातून सार्वजनिक जीव्न व शासन प्रशासन यांच्या धोरणात्मक भ्रह्टाचाराने जनजीवन कसे मेटाकुटीला आले आहे, त्याच्याकडे लोकांचे प्रथमच लक्ष वेधले जात आहे. अशा लोकांसमोर अन्य भ्रष्टाचार व अनाचार आणले तर गैर काहीच नाही. त्यामुळेच आमिरच्या सत्यमेव जयते मालिकेने ज्या सामाजिक व व्यावसायिक विकृती लोकांसमोर मांडल्या आहेत त्याने लोक भारावून जाणे स्वाभाविक आहे. चटकन असेही वाटेल की अण्णा जे काम करत आहेत त्याला आमिरचे काम पुरकच ठरणारे आहे. पण तिथेच लोकांची दिशाभूल होत आहे आणि त्यासाठीच सत्यमेव जयतेच्या जन्मकालाची कथा मोलाची आहे.

एक गोष्ट कोणालाही मान्य करावी लागेल की ६ मे २०१२ रोजी आमिरच्या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झालापासून त्याचाच माध्यमातून इतका गवगवा चालू आहे की त्याच कालखंदात अण्णा व रामदेव यांनी मोठी झेप घेतली असताना, त्यांच्यावरचे लोकांचे लक्ष कमी झाले आहे. लोकपाल वा अन्य भ्रष्टाचाराचे विषय यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यात आमिरने मोठेच यश मिलवले आहे. की त्यासाठीच ही मालिका इतकी वाजतगाजत समोर आणली गेली आहे? पहिले तीनचार भाग प्रामुख्याने सरकारी व शासकीय भ्रष्टाचार व निष्क्रियतेचे परिणाम आहेत. त्यातला खरा गुन्हेगार सत्ताधारी, राज्यकर्ते, प्रशासन, व सरकारी धोरणे हेच आहेत. स्त्रीभृणहत्या, बालशोषण, वैद्यकीय व औषधविषयक कायदे यातल्या त्रुटी वा पलवाटाच पुढल्या परिणामांना कारणीभूत झाल्या आहेत. पण आमिरने त्याबद्दल सरकारकडे एकदाही संशयाचे बोट दाखवू नये, हे संशयास्पद नाही काय? उलट प्रत्येक बाबतीत अन्य क्षेत्रातील संस्था, व्यावसायिक, व्यक्ती यांनाच खलनायक म्हणुन दाखवण्याची चतुराई त्याने का करावी? सरकारवरील लोकांच्या राग संतापाचा रोक अन्यत्र वळवण्यावाठी पद्धतशीर असा हा प्रयत्न आहे का? रामदेव यांच्या आश्रमावर टांगली तलवार ठेवणार्‍या सरकारला १९७५ सालच्या हाथी समितीच्या शिफ़ारशी अंमलात आणायला कोणी अडवले आहे? सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सरकारच्या गैरकारभाराला औषध कंपन्या वा खाजगी डॉक्टर जबाबदार नाहीत. मग मुळ दुखणे जे सरकारी नालायकी वा निष्क्रियता आहे त्याबद्दल आमिर गप्प का? उलट त्या नालायकीचा जे लाभ उठवतात, त्यांच्याकडे बोत दाखवत आमिर सरकारच्या पापावर पांघरून घ्हालतो आहे काय? ३२

अण्णांच्या किंवा रामदेव यांच्या आंदोलनाचा सगला रोख जो सत्ताधीश, सरकार व राजकारणी यांच्याकडे होता व आहे त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वलवण्याचा हा प्रयास नाही काय? नसेल तर मुख्य समस्या, खरे दुखणे व खरा विचका याबद्दल आमिर त्याच्य एकून कार्यक्राअत गप्प कशाला? की आजच्या सत्ताधीशांनी त्यासाहीच त्याला कामाला जुंपले आहे? अण्णा व रामदेव यांच्यावर बेछूट आरोप करून लोकांचे लक्ष विचलित होत नाही तर त्यासाठी सत्यमेव जयते हे सत्ताधार्‍यांनी शोधलेले नवे वळण आहे काय? मागल्या काही लेखांमधून मी आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला किंवा सरकारने अंग काढून घेत जनतेचे आरोग्य खाजगी क्षेत्राकडे सोपवले त्याचे अनेक दाखले दिले आहेत. आजच्या अनेक वैद्यकीय, आरोग्यविषयक समस्यांना तोच आकर्तेपणा जबाबदार असताना त्याबद्दल आमिरचे मौन संशयास्पद नाही काय? जे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला साध्या चिकित्सक नजरेने बघता येते व सांगता येते तेच आमिरच्या संशोधक टीमला शोधून का सापडत नाही? की शोधायचेच नाही किंवा सांगायचेच नाही?

आमिरअ नेहमी संशोधक टीमचा उल्लेख करतो. ते खरेच संशोधन करतात की तपासकाम करतात? तपास व सशोधन यात मोठा फ़रक असतो. संशोधक सर्व बाजू तपासून बघत असतो. चांगले वाईट परिणाम बघत असतो. सत्याचा शोध घेत असतो. त्याला आअदत सो वा नसो तो सत्य समोर आनतो. याच्या नेमकी उलट परिस्थिती तपासकामाची असते. जे पोलिस करतात. ते आधी एखाद्याला आरोपी म्हणुन निश्चित करतात आणि मग त्याला आडकवणारे पुरावे साक्षिदार शोधत असतात. त्यांना सत्याशी कर्तव्य नसते. ज्याला आरोपी ठरवले त्याला दोषी ठरवणारे पुरावे त्यांना हवे असतात. ते सम्शोधनाने सिष्कर्ष काढत नाहीत. त्यांचा निष्कर्ष आधीच तयार असतो. त्याला पुरक दाखले पुरावे त्यांना हवे असतात. असे शोधकाम चालते त्याला सम्शोधन नव्हे तर तपसकाम म्हणतात. आमिरच्या टीमने असेच तपासकाम केले आहे. त्यासाथी आधी त्यांच्या कथेतील आरोपी म्हणजे खलनायक निश्चित केले होते. म्हणूनच त्यांना मी इथे जे पुरावे व दाखले देतो आहे त्यापैकी काहीच सापदले नाही. आणि सापदले असेल तर त्यांनी लोकांना सांगण्यापेक्षा लपवाछपवी केली आहे. हाथी समितीचा अहवाल व शिफ़ारशी महागड्या औषधांच्या भागात का समोर आणला गेला नाही? कारण सरळ आहे. तसे केले तर कंपन्यांना खलनायक म्हणायच्या आधी लोकांचा राग त्याच भामट्या कंपन्यांचा छुपा बॉस असलेले सरकार समोर येइल ना? ४७

म्हणून मला वाटते की आमिरची ही मालिका सत्य प्रस्थापित करण्यापेक्षा सध्या जे सरकार विरोधी वातावरण तापले आहे त्यावरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी केलेले आयोजन असावे. त्यातून दोन हेतू साध्य होऊ शकतात. एक म्हणजे अण्णांच्या, रामदेवांच्या आंदोलनाकडून लोकांचे लक्ष विचलित होते. दुसरीकडे सरकारच्या खर्‍या पापाचे खापर भलत्यांच्याच डोक्यावर फ़ोडले जाऊन सरकारला सहीसलामत निसटता येते. याच्याही पलिकडे आमिरखानची एक आदर्श प्रतिमा जनमानसात तयार होते. त्याच्या शब्दाला वजन प्रप्त होते. उद्या त्याच्या एका शब्दावर मते फ़िरवता व वलवता येतात. यातले पुढे काय होते, कसे होते ते बघूच.      ( क्रमश:)
 भाग  ( २९८ )    १७/६/१२