रविवार, १६ मार्च, २०१४

युझफ़ुल इडीयटस अर्थात उपयुक्त मुर्ख



‘थ्री इडियटस’ नावाचा एक चित्रपट आपल्याकडे आला आणि खुप गाजला सुद्धा. इडियट म्हणजे खुळा, मुर्ख वेडगळ वगैरे संदर्भाप्रमाणे अर्थ काढता येतो. पण इडीयट म्हणजे अक्कलच नसेल तर तो युझफ़ुल म्हणजे उपयुक्त कसा? ही उक्ती रशियन कम्युनिस्ट क्रांतीचा जनक ब्लादिमीर लेनीन याची असल्याचे म्हटले जाते. त्याचा सज्जड पुरावा नाही. पण खरेखोटेपणाचा मामला इथे महत्वाचा नाही. त्यातला बोध मोलाचा.

   सोवियत सत्ता स्थापन झाल्यावर तिथल्या साम्यवादी हुकूमशाहीने विचारस्वातंत्र्याची गळचेपी केली होती. म्हणजेच कम्युनिस्ट विचारसरणी आणि त्यातही सत्ताधार्‍याची भूमिका, यावर टिका करायला मुभा नव्हती. भिन्न मतप्रदर्शनालाही बंदी होती. पण अशा सत्तेचे व व्यवस्थेचे कौतुक पाश्चात्य देशातील मुक्त स्वातंत्र्य उपभोगणारे विचारवंत व अभ्यासक सातत्याने करीत असत. ज्या व्यवस्थेने स्वातंत्र्य दिले आहे, तिचीच निंदा करण्यात धन्यता मानणारे हे विचार स्वातंत्र्यवीर; विचारस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या व्यवस्थेचे कौतुक कशामुळे करीत, ते त्यांनाच माहित. पण यातल्या विरोधाभासाबद्दल सोवियत नेता लेनीन यालाच प्रश्न विचारण्य़ात आला होता. त्यावर उत्तर देण्यापेक्षा त्याने काय मतप्रदर्शन केले? त्याने अशा विचारवंतांना उपयुक्त मुर्ख अशी उपाधी दिली. मुर्ख हा उपयुक्त कसा? असे विचारता लेनीन म्हणाला ते स्वत:च्या स्वार्थाबाबतीत मुर्ख आहेत, पण आमच्या राजकारणासाठी उपयुक्त आहेत.

   याचा मतितार्थ असा, की अशा विचारवंतांच्या विवेचन समर्थनातून उद्या पाश्चात्य देशात कम्युनिझम आलाच, तर सर्वात प्रथम गळचेपी झाली असती ती त्याच विचारस्वातंत्र्याची म्हणजे विचारवंतांची. म्हणजे आपण आपल्याच स्वातंत्र्यावर गदा आणायच्या राजकारणाचे समर्थन करतोय, याचे भान सुटलेले विचारवंत शत्रूसाठी उपयुक्त आणि स्वत:सह विचारस्वातंत्र्यासाठी मुर्ख असतात. केजरीवाल यांना मागल्या चार महिन्यात ज्यांनी इतके प्रसिद्धीझोतात आणले, त्यांना आता आपण कसे उपयुक्त मुर्ख आहोत याचा साक्षात्कार व्हायला हरकत नाही. अर्थात तितके डोके ठिकाणावर असेल तर.



   हा सगळा विषय आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल यांच्या जाळ्यात फ़सलेल्या तथाकथीत पुर्वाश्रमीच्या समाजवादी वा उदारमतवाद्यांशी कुठे जोडला जातो, तेही समजून घेण्यासारखे आहे. १९७७ पासूनचा हा संघर्ष आहे. तेव्हा आणिबाणीच्या विरोधात अशा सेक्युलर उदारमतवाद्यांच्या बरोबरीने संघ व तेव्हाच्या भाजपाला (जनसंघाला) लढावे व तुरूंगात जावे लागले होते. त्याच्याही आधी याच लोकांनी इंदिरा गांधी यांच्या समाजवादी भाषेला भुलून फ़ुटलेल्या कॉग्रेसपैकी इंदिरा गटाला समर्थन दिले होते. त्यातून इंदिराजींना दोनतृतियांश इतके प्रचंड बहूमत मिळाले आणि त्यांना लोकशाहीसह राज्यघटना गुंडाळून ठेवायची शक्ती प्राप्त झाली होती. पर्यायाने ज्या संघ वा जनसंघाच्या विरोधात ही उदारमतवादी सेक्युलरांची शेळी हुरळली व इंदिराजींच्या मागे गेली होती, तिचाही संघासोबतच बळी गेला. त्यांच्याच विचारस्वातंत्र्याला व नागरी हक्काला बेड्या ठोकल्या गेल्या होत्या. त्यातून मुक्त होण्यासाठी त्याच संघासोबत या सेक्युलरांना हातमिळवणी करावी लागली होती. त्यामुळेच मग १९७७ सालात जनता पार्टीचा प्रयोग झाला आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. पण कुत्र्याचे शेपूट वाकडेच म्हणतात, तशी या लोकांची अवस्था असते. त्यांनी इंदिराजी पराभूत झाल्या म्हणजे कॉग्रेस संपली; असे गृहीत धरून जनता पक्षात सेक्युलर थोतांडाचे नाटक नव्याने सुरू केले आणि जनतेचा पुरता भ्रमनिरास केला. पर्यायाने असल्या सावळ्यागोंधळाने जनता पुन्हा इंदिरा गांधींकडे वळावे लागले. त्या अराजकाला लोक इतके कंटाळले होते, की अवघ्या ३० महिन्यात लोकांनी त्याच आणिबाणीफ़ेम इंदिराजींना दोनतृतियांश बहूमताने पुन्हा निरंकूश सत्ता बहाल केली. म्हणून सेक्युलर इडियट शहाणे होतील, अशी अपेक्षा बाळगणेच चुक होते. अखेर पुढलीही निवडणूक कॉग्रेसलाच मोठे यश मिळाले आणि त्या वैफ़ल्यातून बाहेर पडण्यासाठी सेक्युलर शहाण्यांना तब्बल बारा वर्षांनी विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या बंडखोर कॉग्रेस नेत्याला शरण जावे लागले. पण तेवढेही पुरेसे नव्हते. विखुरलेल्या विविध समाजवादी व सेक्युलरांना त्याच संघ भाजपाची १९८९ मध्ये सोबत घ्यावी लागली होती.

   तसे बघितले तर भाजपा आधी गांधीवादी होता आणि त्यातच त्याचा बट्ट्याबोळ झालेला होता. अखेर आपला मतदार पुन्हा मि्ळवण्यासाठी भाजपाला हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला होता. हिंदू परिषदेला शरण जाऊन भाजपाने अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय हाती घेतला. अशा कडव्या हिंदूत्ववादी झालेल्या धर्मांध भाजपाशी व्ही. पी. सिंग यांना निवडणूकपुर्व आघाडी करावी लागली आणि पुढे सत्तेसाठी त्याच भाजपाचा पाठींबाही घ्यावा लागला. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पुन्हा लोकांनी दिलेला कौल मातीमोल करून सिंग सरकार पडले आणि मध्यावधी निवडणूकीत जनता दलाचा पुरता धुव्वा उडाला. त्यातूनच भाजपा देशातला कॉग्रेसला पर्यायी राष्ट्रव्यापी पक्ष होत गेला. लोकांकडे मते मागताना सेक्युलॅरिझम गुंडाळून ठेवायचा आणि निकाल लागले की सेक्युलर नाटक सुरू करायचे; हा जुनाच खेळ होऊन बसलाय. असो, मुद्दा इतकाच की मागल्या दोन दशकात सेक्युलर समाजवाद्यांनी आपली विश्वासार्हता संपुर्णपणे गमावली आणि अन्य कुठल्या नाही तर कॉग्रेस पक्षाच्या वळचणीला गेले. ज्यांना ते साधले नाही त्यांनी स्वयंसेवी संघटनेचा बुरखा पांघरून राजकीय अज्ञातवास पत्करला. आता तर कॉग्रेसही रसातळाला चालली आहे. मग यांच्या सेक्युलर नाटकाचे प्रयोग कोणी लावायचे? त्यातून त्यांना नवा प्रेषित सापडला. त्याचे नाव केजरीवाल. अलिकडल्या विधानसभा निवडणूकीत दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने थोडे यश मिळवले आणि महाराष्ट्रातले अनेक वैफ़ल्यग्रस्त समाजवादी नव्या नेत्याला शरण गेलेत. पंचवीस वर्षापुर्वी त्यांना असाच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यात प्रेषित सापडला होता. आज ते उपयुक्त मुर्ख केजरीवालच्या मागे धावत सुटले आहेत. पण केजरीवाल यांनीच पत्रकार आणि माध्यमांना तुरूंगात डांबण्याची भाषा केली आहे. थोडक्यात जे विचारस्वातंत्र्य या समाजवादी उदारमतवाद्यांना प्राणप्रिय आहे, त्याचाच गळा घोटण्याची भाषा केजरीवालच्या तोंडी आली आहे. इंदिराजी निवडणूका जिंकेपर्यंत तरी थांबल्या होत्या. पण केजरीवाल आधीच तसल्या वल्गना करू लागले आहेत.

   १९७७च्याच सुमारास भारताचा एक शेजारी इराणमध्येही क्रांती झाली होती. तिथल्या राजा आणि हुकूमशहा विरोधात म्हणजे मोठाच उठाव सुरू झाला होता. तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने तो विद्यार्थ्यांचा लढा उभारला होता. पण त्याला चिरडण्याची कारवाई शहाने सुरू केली आणि त्या कम्युनिस्टांनी जनमताचा रेटा निर्माण करण्यासाठी लोकांच्या धर्मभावनेला हात घातला. इराणचा माथेफ़िरू धर्ममार्तंड आयातुल्ला खोमेनी तेव्हा पॅरिसमध्ये परागंदा होता. त्याच्याविषयी लोकांना खुप आस्था होती. कम्युनिस्टांनी त्याच्याच नावाचा जयजयकार सुरू केला. त्याला प्रतिसादही मिळाला. आंदोलन भडकतच गेले. शेवटी शहाला देश सोडून पळ काढायची वेळ आली. तोपर्यंत खोमेनी इराणी जनतेचा अनभिषिक्त नेता सत्ताधीश होऊन बसला होता. मायदेशी येऊन सत्ता हाती घेतल्यावर त्याने सर्वप्रथम काय केले असेल; तर मतस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याचे हट्ट धरणार्‍या कम्युनिस्टांचे शोधून शोधून शिरकाण केले. काही कम्युनिस्टांना तुरूंगात डांबले, तर उरलेल्यांना ठार मारले. ज्यांना शक्य झाले त्यांना इराण सोडून पळ काढावा लागला. थोडक्यात इराणचा हुकूमशहा परवडला, म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्याने मर्यादित स्वातंत्र्य तरी उपभोगू दिले होते. खोमेनीने कत्तल केली आणि अवघा देशच धर्माच्या साखळदंडांनी जखडून टाकला. ती क्रांती ज्यांनी सुरू केली होती आणि ज्या उद्दीष्टांसाठी सुरू केली होती, त्या दोन्हीचा त्यात बळी गेला. आणि आततायीपणाने खोमेनीला दैवत बनवून जनतेला रस्त्यावर आणणारे कोणी अडाणी अशिक्षीत लोक नव्हते. तर राजकारणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपणच करतो, अशा भ्रमात कायम जगणारे कम्युनिस्ट, उदारमतवादी व समाजवादीच पुढे होते. ४८

   त्यांनी जे काही केले, ते स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्या्सारखे होते. म्हणजेच ते स्वत:साठी मुर्ख होते. कारण असलेले मर्यादित स्वातंत्र्यही त्यांनी गमावलेच. पण त्याचवेळी धर्मांध हुकूमशाही प्रस्थापित व्हायला त्यांनी सर्वस्व पणाला लावून मदत केली होती. म्हणूनच लेनीन त्यांना युझफ़ुल इडीयटस असे म्हणतो. मागल्या काही काळात मोदींचा द्वेष आणि संघ-भाजपा यांच्याविषयी पुर्वग्रह असल्याने केजरीवाल यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले, त्या पत्रकार, राजकीय विश्लेषक, डावे उदारमतवादी विचारवंत यांची कहाणी वेगळी आहे काय? तीन महिन्यात दिल्लीपुरत्या मर्यादित केजरीवाल व त्याच्या आप या पक्षाला राष्ट्रीय प्रतिमा उभी करून देणार्‍या पत्रकार माध्यमांना जेलमध्ये डांबण्याची भाषा केजरीवाल वापरतात, तेव्हा कोण इडीयट आणि कोणाला युझफ़ुल हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल यांनी अशा किती इडीयटसना आपल्या कारस्थानात वापरून उकीरड्यावर फ़ेकून दिले, त्याची यादी वेगळी द्यायला हवी काय? स्वामी अग्नीवेश, अण्णा हजारे, किरण बेदी ही मोठी नावे. आम आदमी पक्षाची स्थापना केल्यावर वापरलेले आणि आता नागवले गेलो म्हणून टाहो फ़ोडणारे कमी नाहीत. पण अशा बळी जाणार्‍यांचा जगात कधीच तुटवडा नसतो. ते उतावळेपणाने आपल्याला बळी देणार्‍या खाटकाच्या प्रतिक्षेत बसलेलेच असतात.

   १९९९ सालात सेना-भाजपा युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, पण बहूमत हुकले होते. तेव्हा रिपब्लीकन, जनता दल, मार्क्सवादी व शेकाप हे पक्ष सेक्युलर राजकारणाला जीवदान देण्य़ासाठी पुढे सरसावले आणि त्यांच्यासह सेक्युलर विचारवंत पत्रकारांनी दोन्ही कॉग्रेस गटांना एकत्र यायला भाग पाडले. पुढल्या चौदा वर्षात काय झाले आहे? त्याच चार सेक्युलर पक्षांची दुरावस्था काय आहे? त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरले आहे काय? दहा वर्षापुर्वी त्याचाच प्रयोग अखील भारतीय पातळीवर होऊन लालू, पासवान व डावी आघाडी रसातळाला गेली. त्यात हे लोक मरगळल्या कॉग्रेसला संजीवनी देऊन बळी गेले. भाजपाला आज पुन्हा उर्जितावस्था आलेली आहे. मग त्यांचेच विस्कटलेले वैफ़ल्यग्रस्त कार्यकर्ते आता केजरीवालच्या मागे धावत सुटलेले आहेत. त्यांनाही वापरून फ़ेकून देणारा कोणीतरी भामटा हवाच असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, त्याचे हे बुद्धीमान अवतार. असो, आज महाराष्ट्रात केजरीवालच्या मागे धावलेले समाजवादी बघितल्यावर लेनीनची उक्ती आठवली.

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल



केजरीवाल यांनी जे काही केले त्यापेक्षा त्यांना हरभर्‍याच्या झाडावर चढवणार्‍या माध्यमे, पत्रकार व जाणत्या विश्लेषकांनी मागल्या तीन महिन्यात काय केले याला अधिक महत्व आहे. सोबतच्या चित्रात आपल्या कारट्याचे उपदव्याप कौतुकाने बघत बसलेली माता आणि आज केजरीवालच्या हल्ल्यानंतर खडबडून जाग आलेल्या माध्यमांची कथा वेगळी आहे काय?

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल

   शेजार्‍याच्या दारात जाऊन हगूमुतू करणार्‍या आपल्या लाडक्याचे कौतुक करणार्‍या आईबापांची स्थिती अनेकदा त्याच अनुभवातून गेल्यावर जशी होते? तशीच अवस्था आज आपल्या वाहिन्यांची व त्यावरील बहुतांश सेक्युलर पत्रकारांची झाली आहे. ज्यांचे स्मरण पक्के असेल त्यांना आठवेल, की ८ डिसेंबर २०१३ रोजी चार विधानसभांचे निकाल लागले आणि त्यात तीन विधानसभेत भाजपाने मोठाच विजय संपादन केला होता. जिथे ६५ लोकसभा जागा निवडून दिल्या जातात, तिथे भाजपासाठी मोदींनी प्रचार केला होता आणि तिथेच मतदानाची टक्केवारी वाढून भाजपाला दैदिप्यमान यश मिळाले होते. अपवाद होता दिल्ली नावाच्या एका इवल्या नगरराज्याचा. तिथे भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला, तरी त्याला बहूमताचा पल्ला गाठता आला नाही. तिथे कॉग्रेसवरील नाराजीची मते नव्या आम आदमी पक्षाने मिळवून भाजपाच्या यशाला गालबोट लावले होते. पण म्हणून त्याचा देशव्यापी परिणाम होऊ शकणार नव्हता आणि आता त्याचेच प्रतिबिंब बहुतेक मतचाचण्यांमध्ये पडलेले दिसते आहे. पण वाहिन्यांसह माध्यमातील सेक्युलर पत्रकारांना त्यातले कॉग्रेस व राहुलचे अपयश झाकायचे होते, म्हणून आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील दुय्यम यशालाच त्या निवडणूकीतील यशाचा सेहरा बांधण्याच्या कसरती ९ डिसेंबरपासून सुरू झाल्या. त्याच कसरती कालपर्यंत चालू होत्या. त्यासाठी मग अरविंद केजरीवाल नावाच्या माकडाच्या हाती कोलीत देण्यात आले. जोपर्यंत ते ‘सेक्युलर पत्रकारां’चे लाडके बाळ भाजपाच्या दारात जाऊन हगूमुतू करीत होते; तोपर्यंत ‘हाऊ स्वीट’ असे कौतुकाचे बोल मागले तीनचार महिने नित्यनेमाने कानावर पडत होते. सहाजिकच घरातले उनाड पोर जसे शेफ़ारल्याने बेताल होते; तेच केजरीवाल यांचे झाले. असे उनाड पोर मग त्याला कोणी हटकले तर संतापते चिडते. नेमके तेच आता झाले आहे. त्याने मांडलेला उच्छाद जगाच्या नजरेतून सुटेनासा झाला आणि सेक्युलर पत्रकारांसह माध्यमांनाही शंका व प्रश्न विचारणे भाग झाले. पण अशा प्रश्नांची सवय नसली, मग उनाड पोरही अस्वस्थ होते आणि आईबापांनाही ब्लॅकमेल करू लागते. केजरीवाल त्याचाच नमूना होता. म्हणूनच मुंबईत त्यांनी जो धिंगाणा घातला, त्याबद्दल शंका विचारल्या गेल्यावर त्यांनी थेट माध्यमांच्याच तोंडावर टांग वर केली. आता आपल्याच या लाडक्या पोराच्या उचापतींनी सेक्युलर माध्यमे विचलीत झाली आहेत.

   पहिल्या दिवसापासून भाजपाचे नेते हर्षवर्धन यांनी केजरीवाल नौटंकी करतात, असे म्हटलेले होते. पण हेच पत्रकार तेव्हा हर्षवर्धनची हेटाळणी करीत म्हणायचे, ‘तुमची खुर्ची हुकली म्हणून रडकुंडीला आलाय’. आता कोण रडकुंडीला आलाय आणि कशाला? स्टंट, नौटंकी, बेजबादार वक्तव्ये, बिनबुडाचे आरोप, बेताल विधाने, बेछूट भाषा हे सगळे आरोप भाजपाने पहिल्यापासून केलेले होते. आज तेच शब्द पत्रकार व माध्यमे बोलू लागली असतील, तर मग केजरीवाल यांचा आरोप खराच मानायला हवा. कारण हेच शब्द माध्यमांपेक्षा आधी भाजपा नेते प्रवक्ते वापरत आहेत आणि पत्रकारांनी तिथूनच उसनवारी केलेली आहे. तेव्हा नुसता केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाने खुलासा देऊन भागणार नाही. किंबहूना त्या पक्षाने कुठलाही खुलासा देण्याची गरजच नाही. पत्रकार आणि माध्यमांनी आजवर दिल्लीतल्या अनेक वास्तविक बातम्या कशासाठी लपवल्या; त्याचा खुलासा देण्याची गरज आहे. दिल्लीत जेव्हा दहाबारा दिवस प्राथमिक शिक्षक केजरीवाल यांच्या दारात उपोषणाला बसले होते, त्याला किती वाहिन्यांनी प्रसारीत केले? नसेल तर का नाही? याच पक्षाच्या दोन आमदारांना पाणीपुरवठा होत नाही, म्हणून त्याच्या मतदारसंघात महिला रहिवाशांनी मारहाण केली. ही बातमी कुठल्या नामवंत वाहिनीने दाखवली होती? वीजदरात कपात करण्याचे आश्वासन देऊन मते घेतलेल्या केजरीवालांनी तीन महिन्यासाठी अनुदानाने वीज बिले कमी करून मतदाराची व्यवहारी फ़सवणूक केली; त्याचा जाब कुठल्या वाहिनीने विचारला? ४९ दिवसात आपण जितके काम करून दाखवले तितके काम कुठल्या सरकारने मागल्या ६५ वर्षात केलेले नाही, अशी शुद्ध थापेबाजी केजरीवाल कॅमेरासमोर नित्यनेमाने करीत होते, तेव्हा त्यांना नेमकी कुठली कामे केलीत, असा सवाल कुणा पत्रकार वा वाहिनीने कशाला केला नव्हता? मोदी वा राहुल यांच्या भाषणातील एखाद्या शब्दावरून तासभर पिसे काढणार्‍यांनी कधीतरी केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या थापेबाजीचे पोस्टमार्टेम केल्याचे आपण मागल्या तीन महिन्यात ऐकले होते काय?


   इतके दूर जाण्याची गरज नाही, दिल्लीत केजरीवाल इतकी प्रचंड मते मिळवू शकले, त्यात ज्या अनेक समाजघटकांचा सहभाग होता, त्यात रिक्षावाले सर्वात महत्वाचा गट होता. त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे ‘आप’चे फ़लक लावून केलेल्या प्रचारामुळे ह्या पक्षाला दिल्लीत एक चेहरा मिळू शकला. आज त्यांचीच काय अवस्था आहे? गेले दोनतीन दिवस हे रिक्षावाले गाडीच्या त्याच भागावर ‘केजरीवालने दगा दिला’ असल्या घोषणांचे फ़लक लावून फ़िरत आहेत. कोणा वाहिनीने त्याची दोन मिनीटाची तरी बातमी दाखवली आहे काय? नसेल तर कशाला दाखवू नये? मागल्या तीन महिन्यात अत्यंत खळबळजनक ठरू शकतील अशा काही डझन घटना आहेत, त्यांना ब्रेकिंग न्युज म्हणून प्राधान्य मिळायला हवे होते. पण त्यातून केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या पापांचा पाढाच वाचला गेला असता. त्याबद्दल माध्यमांनी व प्रामुख्याने बहुतांश नावाजलेल्या वाहिन्यांनी मौन कशाला धारण केलेले होते? आजच एका वाहिनीवर तेव्हाचे या पक्षाचे कायदामंत्री सोमनाथ भारती तिरंगी पतंग उडवून राष्ट्रध्वजाचा अवमान करीत असल्याचे चित्रण दाखवण्यात आले. ती घटना जानेवारीच्या मध्याची आहे. म्हणजे तीन महिने जुनी. आता त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यावर ते चित्रण दाखवण्यात आले व वृत्त प्रक्षेपित झाले. तीन महिने अशा किती बातम्या माध्यमांनी का झाकून ठेवल्या आहेत? आणि केजरीवाल यांनी पत्रकारांवरच टांग वर केल्यानंतरच कशाला त्यांचे प्रसारण व पारायण सुरू झाले आहे?

   ‘सारा का सारा मीडिया खरीदा गया है, इनको जेल भेजेंगे’ असे केजरीवाल यांनी म्हटल्यावर पत्रकारांना स्वाभिमान आठवला? त्यात विकले गेल्याचा आरोप या संतापाचे कारण आहे, की आपण इतकी इमानेइतबारे आम आदमी पक्षाची पाठराखण केल्यावरही लाथा झाडल्याचा आक्षेप आहे? पत्रकारांचा राग नेमका कोणत्या कारणास्तव आहे? न्य़ुज नेशन, इंडिया न्युज, झी, लाईव्ह इंडीया, न्युज एक्सप्रेस असा दिल्लीकेंद्रीत वाहिन्या सोडल्या, तर आम आदमी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी दिल्लीत घातलेल्या धुमाकुळाबद्दल बहुतेक मान्यवर वाहिन्या व वृत्तपत्रांनी साळसूद मौन पाळलेले होते. त्याचे कारण कोणते? की त्यांना तेव्हा कौतुकाच्याच बातम्या देण्यासाठी केजरीवाल पैसे मोजत होते? त्यासाठी मग त्यांच्या पापाचा पाढा वाचायची पत्रकारांची तयारी नव्हती का?  आता त्या सगळ्या दडवलेल्या बातम्या चव्हाट्यावर आणल्या जातील याची मला पुर्ण खात्री आहे. आणि तशा थोड्याथोडक्या बातम्या व घटना नाहीत. केजरीवालच्या नादाला लागून आपण फ़सल्याचे सांगणारे काही लाख मतदार दिल्लीत सापडतील. पण त्यांच्याकडे आजवर पत्रकार व कॅमेरे जात नव्हते. आता तिकडे रीघ लागेल. आजवर उलट्या बाजूचे चित्रण व विधाने दाखवण्याची कसरत चालली होती. त्यासाठी केजरीवाल यांनी पैसे दिले असतील असेही नाही. तो वैचारीक अगतिकतेचा भाग होता. ज्या सेक्युलर पत्रकारांचे व विचारवंतांचे राजधानीतील माध्यमांवर वर्चस्व आहे, त्यांना मोदीचे वावडे आहे. मग त्यांनी दिल्लीच्या नगण्य यशाचा फ़ुगा इतका फ़ुगवला, की त्यासमोर अन्य तीन राज्यातील मोदींच्या लोकप्रियतेला, भाजपाच्या यशाला माध्यमातून झाकून टाकले जावे. साधे आकडे या बदमाशीची साक्ष देऊ शकतील.

   केजरीवाल व आपचे यश किती मोठे असावे? चार राज्यात निवडणूका झाल्या, तिथे ७२ लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी ६५ जागी मोदींनी व भाजपाने बाजी मारली आहे. केजरीवालांनी दुसरा क्रमांक मिळवला त्या दिल्लीत त्यापैकी अवघ्या ७ जागा आहेत. पण मागल्या तीन महिन्यात त्यांचे इतके कौतुक चालू आहे, की छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान या तीन मोठ्या राज्यात आमदारांची बैठक झाली, त्यांनी आपला नेता निवडला, त्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला किंवा त्याने मंत्रीमंडळ बनवल्याची बातमी तरी प्रसारीत झाली काय? त्याबद्दल कुठली चर्चा तरी झाली काय? जणू सात लोकसभा जागांची दिल्ली म्हणजे अवघा भारत असल्याच्या थाटामध्ये देशातल्या राजकारणाचे चित्र कोणी रंगवले? तो भूलभुलैया केजरीवाल यांनी निर्माण केला नाही. आपणच आता मोदींचा विजयरथ रोखणार ही आम आदमी पक्षाच्या कुणा नेत्याने केलेली भाषा नव्हती. ती भाषा तमाम वाहिन्या व त्यावरील सेक्युलर पत्रकार वा जाणत्यांची होती. त्यांच्या असल्या विश्लेषणातून केजरीवालसह त्यांच्या पक्षाला लोकसभा लढवून देशाची सत्ता मिळवण्याची झिंग चढली तर दोष कुणाचा? ज्यांनी त्या बाळाला असले बाळकडू भरवले, त्यांचाच गुन्हा नाही काय? शेफ़ारलेल्या पोराने तोंडाला येईल ते बरळावे आणि वडीलधार्‍याने त्याला रोखायचे सोडून लहान आहे म्हणत त्याचे कौतुक करायचा पवित्रा घेतल्यावर दुसरे काय व्हायचे?

   मागल्या तीन महिन्यापासून सतत एक पोरकटपणा सातत्याने विविध वाहिन्यांवर ऐकायला मिळाला. ‘हम राजनिती नही करने आये, राजनिती सुधारने आये है. इन पार्टीयोंको राजनिती सिखाने आये है. गव्हर्नेन्स सिखाने आये है’. लहान पोराचे बालीश व फ़ुलीश शब्द जसे प्रौढांनी झेलावेत, तशीच माध्यमे असली विधाने झेलत नव्हती काय? ती पचली म्हणून आता तेच सोकावलेले बाळ आईबापांनाच सांगू लागले आहे, ‘पोर जन्माला कसे घालतात ते तुम्हाला शिकवतो’. ज्यांनी या पक्षाला जन्माला घातले त्यांच्यावरच तो उलटले आहे. ज्या माध्यमांनी पत्रकारांनी व जाणत्या, अभ्यासकांनी त्याचे अवास्तव लाड केले, त्यांनाच आता गुरूची विद्या फ़ळायची वेळ आलेली आहे. कारण हे शेफ़ारलेले पोर त्यांना सांगतेय, ‘पत्रकारीता करने नही आये, तुम्हे पत्रकारीता सिखाने आये है’. केजरीवाल यांच्या वादग्रस्त विधानानंतर खुलासे द्यायला समोर आलेल्या तीन प्रवक्त्यांपैकी दोघे होते आशुतोष व आशिष खेतान. यांनी मागल्या दहा वर्षात सतत मोदी विरोधात कंड्या पिकवण्याची मोहिम माध्यमातून चालवली होती आणि त्यांनाही माध्यमांनी प्रोसाहनच दिलेले होते ना? मग त्याच शेफ़ारलेल्या पोरांनी आता वाढलेल्या पंगतीच्या ताटामध्येच लघूशंका केली; तर इतका आरडाओरडा कशाला? याचा विचार आपले पोर शेजार्‍याच्या दारात वा घरात जाऊन धुमाकुळ घालते, तेव्हाच करायचा असतो. लाडकौतुकाचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगायची वेळ येऊ नये, याची तरी शहाणा काळजी घेतो. इथे अतिशहाणेच सगळे. मग दुसरे काय व्हायचे? माध्यमांच्या या दांभिकतेचा बुरखा फ़ाडल्याबद्दल केजरीवालांचे मनपुर्वक अभिनंदन.

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल

शनिवार, ८ मार्च, २०१४

माल जुनाच, मॉडेल नवे



   आमच्या बालपणी घरात रेडीओ नसायचा तर टेलिव्हिजन कुठला? सिनेमा तर मुलांनी बघायचेच नसत. त्यामुळे सिनेमा नावा़चा प्रकार शाळकरी वयात पोस्टरपुरता मर्यादित असायचा. त्यामुळे ज्यांना सिनेमाविषयी माहिती असायची, ती तरून मुले कोणी मोठे जाणकार असल्यासारखे वाटायचे. बाकी चित्रातून अभिनेते वा अभिनेत्री माहिती असायच्या. पोस्टरखेरीज असे देखणे चेहरे दिसायचे, ते वृत्तपत्रातल्या जाहिरातीमध्ये. तेव्हा मधुबाला, मीनाकुमारी अशा नट्यांचा बोलबाला होता आणि त्यापैकी मधूबाला अनेक जाहिरातीमध्ये दिसायची. लक्स नावाचा एकच सर्वपरिचित सौंदर्य साबुन तेव्हा माहिती होता. त्याचे कौतुक म्हणजे, तोच साबण वापरल्याने या सिनेमातल्या नट्या सुंदर देखण्या होतात, अशी समजूत करून देणार्‍या जाहिराती होत. पुढल्या काळात आम्ही तरूण झालो आणि कॉलेजात जाऊ लागल्यावर स्वतंत्रपणे सिनेमा बघण्याइतके ‘स्वतंत्र’ झालो होतो. नट्यांचा जमानाही बदलला होता. मधूबाला मागे पडून नुतन, वैजयंतीमाला आणि पुढे हेमा मालिनी पडद्यावर झळकू लागल्या होत्या. त्यांचीही गोरी कांती व सौंदर्य पुन्हा लक्स याच साबणातून आल्याच्या जाहिराती रंगीत मासिकातून बघायला मिळू लागल्या होत्या. पण बाजारात लक्सशी स्पर्धा करणारे आणखी काही नवे सौंदर्य साबून दाखल झालेले होते. नुतनची पिढी मागे पडून शर्मिला टागोर व मुमताज सौंदर्यवती म्हणून पुढे येत होत्या. त्यांच्याही सौंदर्याचे रहस्य पुन्हा तोच लक्स साबून होता. कोवळ्या शाळकरी वयापसून आमची चाळीशी आली आणि सिनेमातल्या नट्यांची तिसरी पिढी दाखल झाली, तरी सौंदर्य साबुन कायम होता. फ़क्त त्याची जाहिरात करणार्‍या सौंदर्यवती बदलत होत्या. आता तर मधुबाला सोडाच तिच्यानंतरच्या चौथ्या पाचव्या पिढीतल्या नट्याही मागे पडल्या आहेत. पण म्हणून त्या नट्यांच्या सौंदर्याचे रहस्य आजही कायम आहे. तसल्या जाहिराती कायम आहेत. साबणाचे प्रकारही नवे आलेत.

   मुद्दा इतकाच की जाहिरातीमधली मॉडेल बदलत गेली, पण साबून तोच राहिला. विकायचा माल तोच राहिला. असे का व्हावे? वीस वर्षापुर्वीच्या पेप्सीकोलाच्या जाहिराती आठवतात? तेव्हा तेंडूलकर नवखा होता. त्याचा शाळकरी सवंगडी विनोद कांबळीही नवाच होता. मग त्या दोघांमध्ये पेप्सीसाठी झोंबाझोंबी होते अशी एक जाहिरात होती. पण हे दोघे पेप्सीच्या बाटलीपर्यंत जाण्याआधीच तिथे अझरुद्दीन पोहोचतो अशी एक जाहिरात होती. कारण तेव्हा अझर सिनीयर होता आणि कर्णधार सुद्धा होता. पुढे त्याच्यावर मॅचफ़िक्सिंगचा आरोप झाला आणि अझर संघातून बाहेर फ़ेकला गेला. त्यानंतर पेप्सीच्या जाहिरातीतून अझरही गायब झाला. पण सचिन कायम होता. त्यात मग अझरच्या ऐवजी नवा सिने सुपरस्टार शाहरुख सचिनच्या जोडीला आलेला होता. अझरची जागा शाहरुखने घेतली. काळ बदलला, जाहिराती बदलल्या तरी विकावू माल कायम तोच होता. पेप्सीकोला. पुढे तर शाहरुख पेप्सीचा कायम मॉडेल होता. जोवर अझर, सचिन वा शाहरुखचा जमाना होता, तोपर्यंत तेच जाहिरातीमध्ये दिसायचे. जमाना बदलला आणि नवे हिरो किंवा खेळाडू पेप्सीची जाहिरात करू लागले. थोडक्यात माल तोच असतो, पण काळानुसार मॉडेल बदलते. कारण आज कोणी मधुबालाच्या जाहिरातीमुळे सौंदर्य साबून किंवा अझरच्या जाहिरातीमुळे पेप्सीकडे आकर्षित होणार नाही. जाहिरातीचा हाच मामला असतो. आपल्या मालाचे आकर्षण वाढवायला किंवा त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक वा लोकप्रिय चेहरा आवश्यक असतो. त्या चेह्र्‍याकडून बोलून वा लक्ष वेधून घेण्याला जाहिरात म्हणतात. अशी माणसे हेरून त्यांना आपल्या मालाच्या जाहिरातीसाठी वापरण्याच्या कलेला पासष्टावी कला म्हणजे जाहिरातबाजी म्हणतात. आज माध्यमे, पत्रकारिता आणि पासष्टावी जाहिरातबाजीची कला यातली सीमारेषा कमालीची पुसट होऊन गेली आहे. त्यातूनच मग पेडन्यूज नावाचा प्रकार उदयास आलेला आहे. बातम्या म्हणून छापले जाते किंवा वाहिन्यांवर प्रसारीत होते, ती प्रत्यक्षात जाहिरात असते. थोड्या डोळसपणे बघितले तर वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरच्या बातम्या किंवा लेख चर्चा अशाच पासष्टाव्या कलेचे अविष्कार असल्याचे आपल्याला सहज ओळखता येतील.

   हे आज इतक्या तपशीलाने का सांगायची वेळ आली? सध्या तमाम वाहिन्यांवर असाच एक पासष्टाव्या कलेचा अहोरात्र अविष्कार रंगलेला आहे. केजरीवाल यांच्या बातम्यांनी व प्रसारणाने दिवसाचे चोविस तासच नव्हे, तर तीस तास व्यापलेत की काय अशी शंका येण्याची पाळी आलेली आहे. काय बोलतात हे महाशय? प्रामुख्याने त्यांनी गेल्या दोनतीन दिवसात गुजरातचा दौरा करून जी आरोपबाजी व तमाशे सादर केले; त्यात नेमके काय नवे होते? मागल्या दहा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अखंड ज्या आरोपांचा भडीमार सुरू होता, त्यापेक्षा केजरीवाल यांनी कुठला नवा आरोप केलेला आहे? गुजरात मागासलेला आहे, तिथे मुलांचे कुपोषण होते आहे, तिथे विकास झालेला नसून मोदी देशभर विकासाच्या थापा मारत फ़िरतात. गुजरातची जनता भयग्रस्त आहे, दहशतीखाली आहे, शेतकर्‍यांच्या जमीनी लुबाडलेल्या आहेत. उद्योगपतींना गुजरात आंदण दिलेला आहे. यातला कुठला आरोप नवा आहे? मागल्या दहाबारा वर्षात प्रत्येक कॉग्रेस नेत्याने वा सेक्युलर नेता आणि पुरोगामी पत्रकाराने तोच आरोप सातत्याने केलेला आहे. अशा आरोपबाजीचा इतका सुकाळ झाला, की लोकच त्याला कंटाळले आणि माध्यमांना त्यातून काढता पाय घ्यावा लागला. आजही कुठल्या राजकीय चर्चेत तेच आरोप कॉग्रेस किंवा सेक्युलर नेत्यांकडून होताना दिसतील. मग गुजरातच्या दौर्‍यावर जाऊन केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी असा कोणता नवा शोध लावला, की ज्याचा इतका गाजावाजा माध्यमातून चालू आहे? त्या आरोपाच्या सादरीकरणात जुनेपणा नाही. जे आरोप कॉग्रेसजन सभा घेऊन करीत होते, पत्रकार परिषद घेऊन करीत होते, तेच केजरीवाल यांनी पथनाट्य स्वरूपात सादर केलेले आहे. पण त्याचे थेट प्रक्षेपण चोविस तास करून त्याचा मनोरंजनात्मक रियालिटी शो बनवण्यात आला आहे. साध्या भाषेत सांगायचे, तर आरोपांचा माल तोच आहे, फ़क्त सादर करणारे जाहिरातीतले मॉडेल बदलले आहे. मॉडेल फ़क्त नवे आहे.

   काही दिवसांपुर्वी हेच केजरीवाल हरयाणाच्या दौर्‍यावर गेलेले होते. तिथे त्यांनी तिथले मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांच्यावर वाड्राचा प्रॉपर्टी डीलर असल्याचा आरोप केला होता. शनिवारी अहमदाबादच्या आरोपात दोन नावे बदलली. मुख्यमंत्री मोदी आणि वाड्राच्या जागी अंबानी, अदानी अशी नावे बदलली. आरोप मोदींवरचे असोत, हुड्डावरचे असोत किंवा वाड्रावरचे असोत, त्यात नवे काहीच नाही. मग बघणार्‍यांना कंटाळा येत नसेल काय? दाखवणार्‍या वाहिन्यांनाही कंटाळा येऊ नये काय? अखंड तेच आरोप व तोच अभिनय बघून लोक कंटाळणार नाहीत काय? इथे कलवंताची खरी कसोटी असते. केजरीवाल त्यात उत्तम पारंगत आहेत. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात नाविन्यपुर्ण मनोरंजक मूल्य असले पाहिजे, याची ते पुरेपुर काळजी घेतात. त्यासाठी सातत्याने आपल्या कार्यक्रमात व वागण्यात नाट्य असावे याची बेमालूम योजना ठेवतात. शुक्रवारी त्यांनी सकाळी पत्रकारांना बोलावून घेतले आणि अकस्मात मुख्यमंत्री मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाण्याची घोषणा केली. आता अशी मोदींची भेट होऊ शकणार नाही आणि पोलिस आपल्याला रोखणार, याची केजरीवाल यांना पुर्ण जाणिव होती. पण जे काही करायचे ते नाट्यपुर्ण करायची सज्जता त्यांनी ठेवलेली असते. वाहिन्यांना इतके नाट्यमय काही सहज उपलब्ध असेल, तर तिथला वृत्तसंपादक कशाला जगात घडणार्‍या इतर कटकटीच्या बातम्यांकडे बघेल? त्याचेही कष्ट वाचतात. सहाजिकच स्टूडीओमध्ये एक पोपटपंची करणारा निवेदक आणि थेट प्रक्षेपणाची सोय असलेला कॅमेरा लावला, की काम संपले. क्षणोक्षणी बदलणारा उत्कंठावर्धक कार्यक्रम आयता मिळतो. प्रेक्षकांनाही टिव्हीसमोर खिळवून ठेवायचा रियालिटी शो अखंड चालू आहे. कपील शर्माच्या कॉमेडी सर्कसमध्ये जशी त्याच्याकडून बेईज्जत होणारी पात्रे बदलतात, तसे केजरीवाल यांच्या आरोपाचे लक्ष्य होणारे पक्ष वा नेते बदलत असतात. बाकी डायलॉग तेच तेच झालेले आहेत.

   अर्थात जाहिरात व्यवसायात एक नैतिकता पाळली जाते. आपला माल लोकांच्या गळ्यात मारण्यासाठी करायच्या प्रयत्नात दुसर्‍याच्या मालाला नावे ठेवायची नाहीत किंवा त्यांची बदनामी करायची नाही; हे पथ्य जाहिरातदार कटाक्षाने पाळतात, केजरीवाल परिवर्तनवादी असल्याने त्यांनी नैतिकतेची व्याख्याच बदलून टाकली आहे,  त्यांनी सर्वप्रकारच्या नैतिकता व सभ्यतेला आपल्या वागण्यातून पुरती तिलांजली दिलेली आहे. आपण सत्तेला हपापलेलो नाही म्हणून, बंगला गाडी घेणार नाही, असा डंका पिटायचा आणि दुसरीकडे सत्ता सोडल्यावरही सरकारी बंगला बळकावून बसायचे. अण्णांनी पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत: द्यायची नाहीत आणि दुसर्‍यांना मात्र रोज नवे प्रश्न विचारायचे. आपण दिल्लीकरांना वीजदर अर्धे करून दिले, सहाशे लिटर पाणी मोफ़त दिले आणि हे सर्व अवघ्या पन्नास दिवसात केले; म्हणून बेधडक थापा ठोकायच्या. पण त्यांच्या तीन आप आमदारांना रहिवाशांनी पाणी मिळत नाही म्हणून चोपले, त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. मोदींना सामान्य माणूस म्हणून भेटायचा आव आणायचा आणि माजी मुख्यमंत्र्याला भेट मिळत नाही म्हणूनही गळा काढायचा. मात्र आपल्याला दिल्लीचा आम आदमी दरबारात भेटायला आल्यावर छतावर पळ काढायचा. किती म्हणून खोटारडेपणाचे दाखले द्यायचे? त्यांचेच एक संस्थापक सदस्य आता उमेदवारीसाठी केजरीवाल यांनी एकाकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप करतात, त्याला उत्तर द्यायचे नाही. इतक्या इमानदारीने बेईमान वागणारा कुठला नेता वा राजकीय पक्ष निदान आपल्या देशात आजवर झालेला नसेल. इतक्या सातत्याने धडधडीत खोटे बोलण्याचा विक्रम सुद्धा दुसर्‍या कुणा नेत्याने आजवर केलेला नसावा. आता तर आपल्याला दुसरा कोणी मारतो वा रोखतो, असे सांगायचीही सोय उरली नाही म्हणून शनिवारी जंतरमंतर येथे ‘आप’नेते योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा उद्योग स्वपक्षाच्याच कार्यकर्त्याकडून करून घेण्यात आला. इतके नाटक कुठल्याही सेट किंवा सजावटीशिवाय स्टुडिओच्या खर्चाशिवाय वाहिन्यांना आयते मिळत असेल, तर त्यांनाही अहोरात्र थेट प्रक्षेपण करायला काय जाते?

   पण दिसतो तेवढा हा सगळा तमाशा निरर्थक नाही. त्यामागे आपली पापे लपवण्याचाही हेतू आहे. आपण शीला दिक्षीत यांच्या विरोधात एफ़ आय आर दाखल केला म्हणून महिनाभर केजरीवाल यांनी आपली पाठ थोपटून घेतली. पण आता त्याच दिक्षीतांची केरळच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने तो एफ़ आय आर निकामी झाला आहे. त्याची चर्चा होऊ नये, म्हणून गुजरातेत पाटनला अटकेचे नाटक रंगवण्यात आले. केजरीवाल सरकारी बंगला सोडत नाहीत म्हणून सरकारने नोटीस काढली, दिल्लीचा रहिवासी आम आदमी पक्षावर संतापला आहे, तो त्यांच्या आमदारांना ओलीस ठेवतो आहे, जाब विचारतो आहे, दिल्लीकरांची भावना फ़सवले गेल्याची झाली आहे. अशा बातम्यांना झाकण्यासाठी मग रोजच्यारोज नवनवी धमाल उडवून दिल्लीतल्या आपल्या नाकर्तेपणाची पातके झाकण्याची केविलवाणी कसरत चालू आहे. पण माध्यमांनाही मोदी विरोधात तेच जुने कालबाह्य आरोप करणारे नवे मॉडेलही सापडले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीचे निकाल लागेपर्यंत हा पोरखेळ चालणार आहे. मात्र त्यामुळे त्या पक्षाला लोकांची मते मिळणार नाहीत, की मोठे लक्षणीय यशही मिळणार नाही. कारण माध्यमातले सेक्युलर जितके सहजगत्या मुर्ख बनवले जाऊ शकतात, तितका या देशातला अडाणी, अशिक्षित मतदार अजिबात मुर्ख नाही. त्यामुळेच मनोरंजनात रमला तरी आयुष्याला भेडसावणार्‍या समस्यांचा पोरखेळ तो होऊ देत नाही.

बुधवार, ५ मार्च, २०१४

केजरीवालांमुळे आठवले शिवसेनाप्रमुख




   केजरीवाल यांच्या गाडीला गुजरातमध्ये रोखून पोलिसांनी त्यांना आचारसंहिता लागू झाल्याची सूचना दिली. तर या कांगावखोर माणसाने आपल्याला गुजरातमध्ये मोदींच्या आदेशानेच पोलिसांनी अटक केल्याची अफ़वा मोबाईल संदेशाद्वारे पसरवली आणि दिल्लीत आपल्या सहकार्‍यांना भाजपाच्या मुख्यालयावर हल्ला करायला चिथावणी दिली. शाझिया इल्मी व आशुतोष या आप नेत्यांनी त्यात पुढाकार घेऊन त्या हल्ल्याचे नेतृत्व केले. मात्र हाणामारी झाल्यावर आपण शांततापुर्ण निदर्शने करीत असल्याचेही अत्यंत शहाजोगपणे सांगितले. कॅमेरावर हेच नेते आगावूपणा करताना दिसत होते. इतके बेछूट खोटे बोलणारे राजकीय नेते कार्यकर्ते निदान आजवर भारतीय राजकारणात दुसरे कोणी दिसले नव्हते. पण बुधवारचा केजरीवाल टोळीचा तमाशा बघितल्यावर मला ४४ वर्षापुर्वीची एक अशीच घटना आठवली.

   १९७० सालात मुंबईच्या गिरणगावात तेव्हाचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची शिवसैनिकांनी हत्या केलेली होती. त्यानंतर त्याच परळच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात सेनेतर्फ़े वामनराव महाडीक यांना उभे करण्यात आलेले होते. त्यांच्या विरोधात देसाई यांच्या विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना कम्युनिस्ट पक्षाने उभे केले होते. मग त्यांना सर्वच सेक्युलर पक्षांनी पाठीबा दिलेला होता. कॉग्रेस पक्षानेही त्या राजकीय दबावात आपला उमेदवार उभा केला नाही आणि देसाई यांना पाठींबा दिलेला होता. त्यांच्यासाठी सर्वच पक्षिय नेत्यांनी तेव्हा प्रचारसभांचे रान उठवले होते. तेव्हाच मुख्यमंत्री वसंतराव नाईक परदेश दौर्‍यावर गेलेले होते. त्यांच्याजागी हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम बघणारे शंकरराव चव्हाण यांनीही सरोजिनी देसाई यांच्यासार्ठी खास प्रचारसभा घेतलेली होती. त्यांच्यावर औटघटकेचा मुख्यमंत्री अशी शेलकी टिका सेनाप्रमुखांनी केलेली होती. त्या काळात शिवसेनेवर सरसकट हिंसाचाराचा आरोप होत असे आणि आज जसा केजरीवाल म्हणतील त्याला तात्काळ प्रचंड प्रसिद्धी वाहिन्यांवर मिळते, तशीच सेनेविरुद्ध कोणीही कसलाही आरोप केला, मग त्याला वर्तमानपत्रात अफ़ाट प्रसिद्धी दिली जात असे. त्याच निवडणूकीचा प्रचार संपायचा होता, त्याच दिवशी बहुतेक वृत्तपत्रात एक बातमी छायाचित्रासह छापून आलेली होती आणि त्याचा खुप गाजावाजा केला जात होता.

   छायाचित्रात एक तरूण कार्यकर्ता बॅन्डेज गुंडाळलेला दिसत होता आणि त्याचे हातपाय पट्ट्यांनी गुंडाळलेले होते. सोबत बातमी होती शिवसैनिकांच्या हल्ल्यात सरोजिनी देसाई यांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याची. नेमका तोच दिवस प्रचाराचा शेवटचा होता आणि संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबायचा होता. म्हणून ऐन दुपारच्या उन्हात बाळासाहेब ठाकरे यांनी लालबागच्या गणेशगल्ली मैदानात अखेरची प्रचरसभा योजलेली होती. तिथे ठाकरे यांनी कम्युनिस्ट व कॉग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांची मनसोक्त खिल्ली उडवलीच. पण वृत्तपत्रातल्या त्या बातमीचाही समाचार घेतला. पण त्यापेक्षा त्यांनी तिथे सादर केलेल्या नाट्याची घटना मोठी परिणामकारक होती. शिवसैनिक हल्ले करतात, अशा खोट्या बातम्या दिल्या जातात. पण शिवसैनिकांवर हल्ले होतात, त्याचा एकही शब्द वृत्तपत्रे छापत नाहीत, असे त्यांनी म्हटल्यावर निषेधाचा सूर सभेतून उमटला. मग त्यांनी एका तरूणाला व्यासपीठावर बोलावले आणि तोही डोक्याला व हाताला बॅन्डेज गुंडाळलेला होता. याच्यावर कम्युनिस्ट गुंडांनी हल्ला केल्याचे बाळासाहेबांनी म्हणताच सभेत निषेधाचा गजर झाला. पाचसातशे तरूण उभे राहून डरकाळ्याच फ़ोडू लागले. त्यांना शांततेचे आवाहन करून साहेब म्हणाले, जरा शांत बसा आणि ऐका.

   मग त्यांनी त्या जखमी तरूणाला जवळ बोलावून त्याच्या हाताला बांधलेल्या पट्ट्या उलगडल्या, त्याच्या डोक्याला असलेल्या पट्ट्याही काढून टाकल्या. मग त्याला उड्या मारून दाखवायला सांगितले. तेव्हा सभेत हास्याचा कल्लोळ उडाला. तो शांत झाल्यावर साहेब म्हणाले, आजच्या वृत्तपत्रात बघितलात तोही असाच जखमी होता. फ़ोटो काढण्यापुरत्या पट्ट्य़ा गुंडाळल्या, की झाले. तुमच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या तशाच मतदारांच्या भावना भडकवण्याचा खेळ वृत्तपत्रे करीत असल्याचा आक्षेप त्यांनी तिथे नोंदवला होता. त्याची मग दोन दिवस गिरणगावात खुप चर्चा झाली होती. अर्थात त्यावेळी वामनराव महाडीक निवडून आले आणि सेनेचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पण तो विषय महत्वाचा नाही. आज केजरीवाल किंवा त्यांचे ‘इमानदार’नेते कार्यकर्ते किती सराईतपणे देखावे उभे करतात, त्यात तसे काही नवे डावपेच नाहीत. तेव्हा छायाचित्रातून असली दिशाभूल केली जात असे आणि आज टिव्हीचे कॅमेरे सत्य दाखवत असतानाही केजरीवाल वा त्यांच्या प्रेमात पडलेले पत्रकार चित्रणाच्या विपरित बातम्या रंगवतात, तेव्हा हा जुना इतिहास आठवला. मात्र त्यामुळे सामान्य जनता वा मतदार तेव्हाही फ़सला नव्हता, की आजचा अधिक चौकस झालेला मतदार फ़सण्याची अजिबात शक्यता नाही. पण प्रत्येक प्रियकर-प्रेयसीला जसे आपणच जगात पहिलेवहिले प्रेम करतोय असा भ्रम असतो, तशीच केजरिवाल आणि त्यांच्या टोळीची समजूत आहे.

   उपरोक्त छायाचित्रात स्पष्टपणे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दगडफ़ेक करताना दिसत आहेत. पक्षाचे एक बुद्धीमान नेते व माजी पत्रकार आशुतोष भाजपाच्या मुख्यालयाच्या गेटवर चढलेले दिसत आहेत. आणि तरीही त्यांच्यासह शाझिया इल्मी नावाच्या आप नेत्या आम्ही अत्यंत शांततापुर्ण निदर्शने करीत होतो, असे दडपून सांगत आहेत. इतके खरे त्यांना बोलता येत असेल आणि तेच माध्यमांना खरे वाटत असेल, तर मग खोटे तरी नेमके कशाला म्हणतात, त्याचा त्या सर्वांनीच खुलासा केलेला बरा. याबद्दलच्या बुधवारी रात्री टिव्ही वाहिन्यांवर चाललेल्या चर्चा ऐकल्यावर मोठेच मनोरंजन झाले. बहुतेक एन्करचे म्हणणे असे होते, की भाजपाच्या लोकांनी त्यांच्या मुख्यालयावर हल्ला झाल्यानंतर आपच्या गुंडांचा प्रतिकार करायला नको होता. त्यांना दगडफ़ेक करू द्यायची होती. त्यांची गुंडगिरीच त्यातून समोर आली असती आणि आपनेते उघडे पडले असते. हा जो सल्ला आहे वा युक्तीवाद आहे, त्याचा अर्थ तरी असल्या दिवाळखोर बुद्धीच्या लोकांना कळतो काय? की असे उपदेश भाजपाला करणार्‍यांचा आसाराम झाला आहे? आसाराम किंवा तत्सम कोणा शहाण्याने मागल्या वर्षी दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर असाच काहीसा उपदेश केलेला होता. त्या मुलीने प्रतिकार करण्यापेक्षा त्या बलात्काराला सरसावलेल्यांना बंधू म्हणून वा त्यांच्याशी सहकार्य करून स्वत:चा जीव वाचवायला हवा होता, असेच तो आसाराम म्हणाला होता ना? मग आज आपच्या हल्लेखोरांना प्रतिकार न करता त्यांनी मारलेले दगड अंगावर घ्यायचा उपदेश करणारे तरी काय वेगळे सांगत आहेत?

   या सर्व घटना घडून गेल्यावर रात्री उशीरा कुठल्या तरी वाहिनीने केजरीवाल यांचीही मुलाखत घेतली आणि त्यांनी चित्रण बघितल्यावर आप कार्यकर्त्यांच्या दंगामस्तीबद्दल माफ़ी मागितली. पण गंमत बघा, तोपर्यंत त्यांच्या कुठल्या प्रवक्त्याने माफ़ी मागितलेली नव्हती. उलट आशुतोष वा इल्मी यांच्यासारखे घटनास्थळी उपस्थित असलेले नेते; त्या दंगामस्तीचे समर्थनच करत होते. नुसते समर्थन करीत नव्हते, तर आपण अत्यंत शांतपणे निदर्शने करीत होतो, हाच त्यांचा दावा होता. मग प्रश्न असा पडतो, की खोटारडा कोण आहे? घटनास्थळी नसताना चित्रण बघून माफ़ी मागणारा केजरीवाल खरा, की आशुतोष व इल्मी खरे. यातला कोणी तरी पक्का खोटारडा असलाच पाहिजे. एक मात्र मान्यच करायला हवे, की खरे असो किंवा धडधडीत खोटे असो, ते बोलताना आपचे नेते अत्यंत इमानदार असतात, जे काही बोलतात, त्यावर त्यांचा पुर्ण विश्वास असतो. जगाच्या दृष्टीने ते धडधडीत खोटे असले तरी त्यांच्यापुरते ते इमानदारीने बोलत असतात. खरे वा खोटे बोलताना त्यांची नियत खोटी नसते, हे कोणालाही मान्य करावेच लागेल. कारण इतके बेमालून खोटे बेइमानी करून बोलताच येणार नाही. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे आपण ऐकलेले आहे. पण केजरीवाल व त्यांच्या टोळीतले लोक इतक्या सफ़ाईने बोटावरची नखेही बदलून दाखवतात, की अट्टल थापेबाजालाही शरमेने मान खाली घालावी लागेल.

   केजरीवाल यांचा गुजरात दौरा म्हणजे झाडूमार्च होता आणि त्याची सोमवार मंगळवार सर्वच वाहिन्या जाहिरात करीत होत्या. तिथे जाऊन त्यांनी लोकांशी बोलताना कॉग्रेस व भाजपाला पाडण्याचेही आवाहन केले. पण त्याला राजकीय वा निवडणूक प्रचार म्हणता येणार नाही. कारण आता आचारसंहिता लागू झाल्याचे पोलिसांनी सांगताच, केजरीवाल त्या दौर्‍याला गुजरातच्या विकासाचा अभ्यास दौरा म्हणत आहेत. आपण मोदींनी केलेल्या विकासाचा अभ्यास करायला व बघायला आलो होतो आणि त्याच अभ्यास दौर्‍यात पोलिसांनी आपल्याला रोखले; असा केजरीवाल यांचा दावा आहे. अर्थात गुजरातमध्ये पोलिसांनी त्यांना रोखले म्हणजे मोदींच्याच आदेशावरून रोखलेले असणार. आशुतोश यांचे म्हणणे तर असे आहे, की दिल्लीतले पोलिसही आतापासूनच मोदींच्या आदेशावरून आपच्या कार्यकर्त्यांना झोडपू लागले आहेत. थोडक्यात आपची टोपी डोक्यावर चढवली, मग तुमच्या कुठल्याही बेताल आरोपासाठी पुरावा आवश्यक रहात नाही. तुम्ही बोलाल तेच सत्य आणि इमानदार वचन असते. केजरीवाल यांचा निवडणूक प्रचार दौरा आणि झाडू मार्च त्यांनी व्याख्या बदलताच अभ्यासदौरा होऊन जातो. आपल्या देशात मागल्या दोनतीन महिन्यात किती आमुलाग्र परिवर्तन घडले आहे, त्याचा हा सज्जड पुरावा आहे. कुठल्याही शब्दाला, व्याख्येला नेमका कुठलाच अर्थ उरलेला नाही. आज इमानदारीचा अर्थ जो असेल, तोच उद्या असेल याची कोणी हमी देऊ शकत नाही. आता सतत परिवर्तनाच्या प्रक्रियेतून आपण जात आहोत.

   एक मात्र खरे आहे. माध्यमांनाच या देशातले सरकार निवडण्याची संधी मिळाली वा अधिकार असता, तर एव्हाना केजरीवाल देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सेनाप्रमुख, सरन्यायाधीश असे सगळ्याच जागी एकाचवेळी बसले असते. त्यांनीच कोणावरही आरोप केले असते, त्यांनीच एफ़ आय आर दाखल केले असते. त्यांनीच आरोप केलेला असल्याने त्यांच्याच तपासात आरोप हाच पुरावा झाला असता आणि गुन्हाही सिद्ध होऊन केजरीवाल यांनी शिक्षाही फ़र्मावल्या असत्या. कोर्टाच्या तारखा घेण्य़ात, तपासकामात वा सुनावण्या होण्यात विलंब लागला नसता. तीन महिने अखंड हीच पोपटपंची माध्यमे दाखवत आहेत आणि केजरीवाल यांचा देशव्यापी फ़ुगा फ़ुगवला जात आहे. आणि तेच केजरीवाल म्हणतात, माध्यमे मोदींचा फ़ुगा फ़ुगवत आहेत. माध्यमातच मोदींची हवा आहे. बाकी कुठेच नाही. इतकी इमानदार भाषा आपण कधी कुठे ऐकलेली आहे काय? दिल्लीचे सरकार त्यांनी बनवल्यानंतर त्यांच्याच एक मंत्री राखी बिर्ला यांनी त्यांच्या गाडीवर कोणीतरी दगडफ़ेक केल्याचा गुन्हा नोंदवला होता. काल गुजरातमध्येही केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफ़ेक झाल्याचा फ़ोटोच त्यांनी इंटरनेटवर टाकला आहे. अर्थात मोदींच्या आदेशाशिवाय असा दगड कोणी कशाला मारणार? कुठल्या तरी वाहिनीने रात्री उशीरा त्या गाडीच्या फ़ुटलेल्या काचेचे छायाचित्र दाखवले आणि ४४ वर्षे जुना लालबागच्या गणेशगल्लीतला प्रसंग आठवला.

शनिवार, १ मार्च, २०१४

मोदी चुकीचे बोलून काय साधतात?


   गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांच्या भाषणातले चुकीचे संदर्भ शोधून त्यावर टिकेचे आसूड ओढण्याचे सध्या मोठेच पेव फ़ुटले आहे. अन्यथा त्यातले कच्चे दुवे शोधून टवाळी करण्यात धन्यता मानली जात आहे. थोडक्यात मोदींचा इतिहास व ज्ञान एकूणच कसे कमी आहे, ते सिद्ध करून त्याद्वारे मोदींना मुर्ख ठरवल्याने आपण कसे हुशार आहोत; ते दाखवण्यात धन्यता मानली जात आहे. अशा तमाम शहाण्यांविषयी माझी काहीही तक्रार नाही. किंवा त्यांचे दावे खोडून मोदींनाच योग्य व शहाणे ठरवण्याची मला अजिबात हौस नाही. काही मंडळी तेही काम उत्साहाने करीतच असतात. या दोन्हीमध्ये पडायची मला गरज वाटत नाही. किंबहूना मोदी सुद्धा त्याबद्दल स्पष्टीकरण देत नाहीत. खरे तर त्यामुळेच मला वेगळ्या पद्धतीने हा विषय लिहावासा वाटला. आपण चुकीचे संदर्भ दिले किंवा चुकीचे बोललो, हे उघड झाले, तर आपली लोकप्रियता कमी होईल आणि त्याचा आपल्याला मिळू शकणार्‍या मतांवर विपरित परिणाम होईल; असे मोदींना वाटत नसेल काय? वाटत असेल तर त्यांनी वेळोवेळी आपल्या चुकांबद्दल माफ़ी मागून दुरुस्ती का करू नये? उलट अशा स्वरूपात होणार्‍या टिकाटिप्पणीकडे मोदी संपुर्ण दुर्लक्ष कशाला करतात? अशा प्रश्नांचा शोध घ्यावा व उत्तरे शोधावीत हे माझ्या लक्षात आले. मग मोदीच कशाला बहुतेक विद्वान व बुद्धीमंत विश्लेषणकर्तेही तितकेच निर्ढावलेपणाने आपल्या चुका दाखवल्या गेल्या तरी त्याकडे साफ़ दुर्लक्ष करतात, हेही माझ्या नजरेस आले. याचा अर्थ मोदी आणि त्यांच्यावर टिका करणारे तमाम विद्वान एकाच माळेचे मणी ठरतात ना?

   मी नेहमीच विद्वान, संपादक व विश्लेषणकर्ते यांना लक्ष्य करतो, यात शंका नाही. त्यांच्या चुका व खोटेपणाकडे मी पुराव्यानिशी सातत्याने लक्ष वेधलेले आहे. पण त्यापैकी कितीजणांनी आपल्या चुकांची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे? खर्‍याच विद्वान कुमार केतकरांपासून नि शुद्ध निर्बुद्ध निखील वागळेपर्यंत अनेकांचेच उतारे देऊन, मी त्यांचा खोटेपणा वारंवार दाखवला आहे. त्यांनी त्याकडे साफ़ दुर्लक्ष केल्याने बुद्धीमत्तेच्या बाजारातील त्यांच्या किंमतीत काही फ़रक पडला आहे काय? ज्या मुठभर लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो, त्याच्या शंभर पटीने अधिक लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नसतो. म्हणून केतकर वागळे खरेच विद्वान ठरत असतात ना? खेरीज त्यांच्या थापाच ऐकायला उत्सुक असलेल्यांसाठी तर माझ्यासारख्याने दिलेल्या पुराव्याची किंमत कवडीमोल असते. म्हणूनच माझ्या आक्षेपांच्या समोर त्यांना खरेपणा सिद्ध करण्याची कधी गरज भासलेली नाही. कारण माझे आक्षेप खोडण्यासाठी असल्या विद्वानांना त्यांच्याच हुकूमी वाचक श्रोत्यांसमोर मुळात आपल्या विधानाची चिकित्सा करावी लागेल. म्हणजेच ज्यांच्यापर्यंत मी दाखवलेला त्यांचा खोटेपणा पोहोचू शकलेला नाही, त्यांच्यापर्यंत त्यांच्या चुका त्यांना स्वत:च न्याव्या लागतील. त्यापेक्षा गप्प रहाणे त्यांच्या पथ्यावर पडत असते. जो नियम त्यांना लागू होतो, तोच मोदींसाठी लागू होतो. म्हणूनच त्या बाबतीत हे विद्वान, विश्लेषक व मोदी विरोधक आणि खुद्द मोदी एकाच माळेचे मणी आहेत. त्यांनी मोदींच्या कितीही खर्‍याखोट्या चुका दाखवाव्यात, त्याचा काहीच उपयोग नसतो. कारण ज्या काही हजार लोकांपर्यंत असले आक्षेप जात असतात, त्याच्या कित्येक पटीने अधिक लोकांपर्यंत ते आक्षेप जाऊच शकत नसतात. उलट त्याबद्दल मोदींनी माफ़ी मागितली वा चुक कबुल केली; तर त्याच सर्व लोकांपर्यंत मोदींची चुक जाऊ शकत असते. म्हणूनच कितीही आक्षेप घेतले गेले वा चुका दाखवल्या, तरी मोदी एकाचाही खुलासा करीत नाहीत.

   मोदी खुलासा कशाला करीत नाहीत, त्याचे उत्तर असे आपल्याला सापडू शकते. पण मग त्यांना खोटे पाडणा‍रे तरी मोदींच्या खोटेपणाचा हेतू का शोधत नाहीत? ज्या चुका वा खोटेपणा म्हणून समोर आणले जात असते, त्यातल्या बहुतेक गोष्टी मोदी यांनी आपल्या जाहिर भाषणाच्या ओघात केलेल्या दिसतील. जिथे लाखो हजारो लोकांची गर्दी जमलेली आहे, त्याच भाषणात मोदींकडून अशा चुका झालेल्या वा केलेल्या दिसतील. पण जिथे मोजकी अभ्यासू माणसे श्रोता म्हणून जमा झालेली असतील किंवा व्यावसायिक श्रोता असेल; तिथे मोदींच्या भाषणात असे आक्षेप घ्यायला सहसा जागा सापडणार नाही. याचा अर्थ जे काही मोदी बोलतात, त्यात सत्य असण्यापेक्षा ज्याचा प्रभाव पडावा, असे बोलायचा त्यांना हेतू असावा. ज्याचा समोर जमलेल्या जनमानसावर प्रभाव पडेल असे शब्द, प्रसंग व संदर्भ आणायचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यात शब्दांचे महत्व कितीसे असते? जाहिर सभेतील भाषण हा व्यक्तींमधला संवाद नसतो, एक व्यक्ती बोलत असते आणि बाकीचे ऐकत असतात. तिथे त्याला काहीतरी लोकांना सांगायचे असते आणि जमलेल्यांना त्याचे ऐकायचे असते. अशावेळी समोरच्या जमावाला प्रभावित करून परिणाम साधण्याचा हेतू प्रमुख असतो. त्यासाठी लागणारी साधने, शब्द व संदर्भ महत्वाचे असतात. त्यातला खरेखोटेपणा दुय्यम असतो. आणि संपर्काच्या बाबतीत देहबोली शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते. यातले जाणकार सांगतात, की आपले मत समोरच्याला पटवून देताना शब्दाचे महात्म्य खुपच दुय्यम असते आणि देहाच्या हालचाली, हावभाव अधिक प्रभावशाली असतात. नेमके सांगायचे तर अवघे ७ टक्केच शब्दाचे महत्व असते. बाकीचे काम बोलणार्‍याचा देह करीत असतो.

   मोदी जेव्हा भाषण करतात, तेव्हा ते आजचे सर्वात प्रभावी वक्ते असल्याची कबुली त्यांचे बहुतेक विरोधकही देतात. पण वक्ता जमावाला प्रभावित करत असतो, तेव्हा त्याने उच्चारलेल्या शब्दातल्या तथ्यापेक्षा, त्याच्या प्रभावाला अधिक मोल असते हे विसरून चालेल काय? प्रेमात पडलेल्या मुलीला तिचा भणंग प्रियकर झोपडीही घेऊन देऊ शकत नसतो किंवा विमानप्रवासही घडवू शकणारा नसतो. पण त्याने तिच्यासाठी ताजमहाल बांधायचे वचन दिले किंवा चांदतारे तोडून आणायचे आश्वासन दिले, तरी तिचा त्याच्यावर विश्वास बसतो. उलट तिचे आईबाप त्याच्या गरीबी बेकारीचे पुरावे देऊन खोटारडेपणा कितीही सिद्ध करीत असले; म्हणून त्याचा उपयोग असतो काय? सवाल सत्याचा वा तथ्याचा नसतोच. ऐकणारा व बोलणारा यांच्यातल्या परस्पर संपर्कातील दृढतेवर सर्वकाही अवलंबून असते. आज मोदींच्या भोवताली जमा होणारी गर्दी भाजपावर विश्वास ठेवणारी वा मोदींवर प्रेम करणारी असण्यापेक्षा कॉग्रेसच्या सेक्युलर कारभाराने गांजलेली आहे. सेक्युलर म्हणजे महागाई, अराजक, गुन्हेगारी मोकाट, बेशिस्त अशी जी मानसिकता झालेली आहे; त्या लोकांना अशा अस्थिर अशाश्वत जीवनातून मुक्ती देणारा कुणी हवा आहे. आणि ते आश्वासन देण्य़ाची भाषा कोणी ठामपणे बोलत असेल, तर त्यातला खरेखोटेपणा तपासायची गरज त्या जनतेला वाटेनाशी झालेली आहे. भले त्यातली आश्वासने व तथ्य खोटेही असेल, तरी ते आश्वासनही त्या भेदरलेल्या जनतेला धीर देणारे ठरते आहे. म्हणूनच त्यातला खरेपणा वा सत्य शोधायची गरज जनतेला वाटत नाही. मोदींच्या भाषणातले शब्द, संदर्भ किंवा वास्तविकता याचे तपशील विद्वान शोधत बसतात. पण त्या बुद्धीमंतांसाठी मोदींनी ते तपशील सांगितलेलेच नाहीत. ज्या भेदरलेल्या, ग्रासलेल्या जनतेला आश्वासक शब्द हवा आहे, तिला धीर देण्यासाठीच मोदी बोलत असतात. आणि ते आश्वासन त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत असते. ती देहबोली जे हेतू बोलते, त्याकडे पाठ फ़िरवून विचारवंत मोदींच्या भाषणातले शब्द व तपशील तपासू लागतात, तिथे सगळी गल्लत होते.

   आज अनेक मुस्लिम संघटना व धार्मिक नेतेही मोदींच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. देवबंदसारख्या मुस्लिम धर्मपीठाचे मौलाना मोदींना पाठींबा देण्याची भाषा बोलू लागले आहेत. हा चमत्कार कोणी घडवला असेल? दोन वर्षापुर्वी मोदींनी गुजरातच्या विधानसभा निवडणूकीपुर्वी एक सदभावना यात्रा काढलेली होती. त्यात लक्षणिय प्रमाणात मुस्लिमांचाही सहभाग होता. पण त्यातील एक प्रसंग माध्यमातून जाणीवपुर्वक सातत्याने प्रक्षेपित केला गेला. आजही तोच प्रसंग मोदींना मुस्लिम विरोधक म्हणून सिद्ध करयासाठी मुद्दाम दाखवला जात असतो. त्यात एक मुस्लिम मौलवी मोदींना टोपी देऊ करतो आणि मोदी त्याला थांबवतात. मग तो आपल्या खांद्यावरचा शेला काढून मोदींना अर्पण करतो; असे ते दृष्य आहे. यावर दोन वर्षात लाखो शब्द बोलले गेले आहेत. पण त्याचा मुस्लिमांवर विपरित परिणाम झाला असता, तर मुस्लिमांचा ओढा मोदींकडे वळूच शकला नसता. पण ते काम त्या एका प्रसंगाच्या लाखो प्रसारणांनी मोदीसाठी केलेले आहे. ते चित्र जितक्या वेळा दाखवले गेले, त्यातून मोदींच्या व्यासपीठावर मुस्लिम हजेरी लावतात, त्यांच्याशी संवाद साधतात, याचा इतका भडीमार झाला, की मोदींना मुस्लिम घाबरतात, ह्या समजाला त्यातून छेद देण्याचे बहुमोल काम सेक्युलर माध्यमांनी केले. ते चित्रण सातत्याने दाखवताना बोलले जाणारे शब्द ज्यांच्या कानावर पडले, त्यांनी ऐकलेच असे नाही किंवा फ़ारसे लक्षात घेतलेले नाहीत. पण मोदींच्या समवेत व्यासपीठावर मुस्लिमांचा गोतवळा दिसतो, तो कायमचा करोडो मुस्लिमांच्या मनावर कोरला गेलेला आहे. त्याला देहबोलीचा प्रभाव म्हणतात. आपल्या सोबत मुस्लिमही गुयागोविंदाने बोलतात व वागतात, हेच तर मोदींना त्या प्रसंगातून मुस्लिमांच्या मनावर बिंबवायचे होते आणि तेच काम त्या एका प्रसंगाने केले. त्याचा हजारो पटीने प्रभाव वाढवायचे काम मोदींच्या सेक्युलर विरोधक पत्रकार माध्यमांनी केलेले नाही काय? वास्तवात मोदी कदाचित मुस्लिमांशी इतके मनमोकळेही नसतील. पण त्या प्रसंगी जे चित्र दिसते, त्यातून काय प्रतिमा जनमानसावर परिणाम घडवते?

   त्या एका प्रसंगाने मुस्लिमांमध्ये मोदींविषयी सदिच्छा निर्माण करण्याचे जे काम केले, तितका त्याच चित्रण दाखवताना बोलल्या गेलेल्या शब्दांनी मुस्लिमांवर विपरित परिणाम मात्र घडवला नाही. कारण शब्दांपेक्षा चित्रमाध्यम आणि प्रतिमांचा प्रभाव अधिक असतो. बोलणारा काय शब्द बोलतो, त्यापेक्षा बोलण्यात किती आत्मविश्वास असतो, त्याचा ऐकणार्‍यावर प्रभाव पडत असतो. ‘आगळीक सहन केली जाणार नाही’ असे शब्द मनमोहन सिंग ज्या मुळमुळीत स्वरात बोलतात, त्याचा परिणाम पाकिस्तानवर कितीसा होऊ शकतो? त्यांचे शब्द खुप कठोर असतात. पण त्याचा उच्चार व बोलतानाची देहबोली इतकी निष्प्रभ असते, की त्यांनी दिलेली धमकीही भेदरून पळ काढल्यासारखी वाटते. त्याच्या उलट मोदींची भाषा व शब्द कितीही सौम्य वा सोज्वळ असले, तरी उच्चार व देहबोली बघता अत्यंत बोचरे असतात. त्यातून मोदी जो परिणाम साधतात, तोच त्यामागचा हेतू असतो. त्यातल्या सत्य वा तथ्याला अर्थ नसतो. म्हणूनच त्यातले दोष काढून उपयोग नाही, की त्याच दोष वा चुकांवर खुलासे देत बसण्याचा उद्योगही निरर्थक आहे. कारण जनमानसावर प्रभाव पाडणे हाच मूळात शब्दांच्या पलिकडला उद्योग आहे. म्हणूनच ज्यांना मोदींच्या चुका काढायच्या आहेत त्यांनी आपला उद्योग चालू ठेवावा आणि ज्यांना मोदींच्या चुकांचे समर्थन करण्यात शक्तीचा अपव्यय करायचा असेल, त्यांनी जरूर डोकी आपटावीत. माझे त्यातून मनोरंजन होण्यापेक्षा अधिक काही होत नाही. अर्थात जिथे आपल्याला सत्याचा शोध घ्यायचा असतो, तिथे असली चिकित्सा आवश्यकच असते. पण त्यामुळे अवघे जग शहाणे होईल अशा भ्रमात निदान मी तरी जगत नाही.