शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

दंगली घडवून आणणारा सामुहिक भयगंड


   सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो - बर्ट्रांड रसेल

   रसेल हा विसाव्या शतकातला जगप्रसिद्ध विचारवंत चिंतक मानला जातो. त्याच्या या विधानातला नेमका अर्थ समजून घेतला तर आपल्याला भारतात वारंवार होणार्‍या दंगलीचे योग्य विश्लेषण करता येईल. पण दुर्दैवाने आपल्याकडे कधीच दंगलीचे विश्लेषण होत नाही. त्याऐवजी त्यावर राजकीय शेरेबाजी चालते. मग त्यात सहभागी होणारे अभ्यासक, विचारवंत आपापल्या राजकीय हितसंबंधानुसार दंगलीचे अर्थ लावत असतात आणि त्यामुळे समस्येचा उलगडा होण्यापेक्षा ती अधिकच जटील होत जाते. किंबहुना हे शहाणे कोंबडीप्रमाणे शंभर दाणे पायाने उडवतात आणि दोनतीनच दाणे खाण्याचे कष्ट घेतात. म्हणूनच आज दहा वर्षे उलटून गेली तरी गुजरातच्या दंगलीचे उत्तर सापडलेले नाही, की त्यातल्या पिडितांना न्याय मिळू शकलेला नाही. तीच अवस्था मुंबईतल्या १९९२-९३ सालाच्या दंगल व बॉम्बस्फ़ोट हिंसाचाराची आहे. त्यावर प्रचंड राजकारण झालेले आहे. पण अजून त्याची योग्य कारणमिमांसा होऊ शकलेली नाही. मग पुन्हा पुन्हा दंगली होतच आहेत आणि त्यात निरपराध लोकांचे अकारण बळी जातच आहेत. मुंबईत ११ ऑगस्ट रोजीची दंगल त्यातलाच एक प्रकार होता काय? ती दंगल व हिंसा का झाली? जे कोणी तिथे दंगल करणारे होते ते अगदी तयारीनिशी आले व त्यांनी हिंसा केली, यात शंकाच नाही. पण जर फ़क्त दंगलच करायची होती; तर जिथून आले तिथूनच दंगल करत आझाद मैदानावर ते का पोहोचले नाहीत? असे अनेक प्रश्न विचारता येतील. त्याची गरज नाही. कारण असे प्रश्न विचारून झाले आहेत. पण त्याची उत्तरे कोणीच कधी देत नाही की शोधत नाही. म्हणुनच आधी दंगलीची मानसिकता कशी तयार होते व कशी निर्माण केली जाऊ शकते, त्याचे उत्तर शोधले पाहिजे. विचारवंत रसेल यांच्या उपरोक्त विधानात त्याचे उत्तर सामावलेले आहे.

   गेल्या आठवड्यात मी मुद्दाम दोन छायाचित्रे छापली होती. ती इंतरनेटवर उपलब्ध असताना कुठल्याही वृत्तपत्राने छापलेली नव्हती किंवा वाहिनीने दाखवली नव्हती. पण त्याच छायाचित्रांच्या आधारे त्या दोन्ही दंगलखोरांना नंतर पकडण्यात आले. त्या छायाचित्रांबद्दल लेख लिहिला, त्यात मी मुद्दाम त्यातला आवेश आणि रोख बारकाईने बघायला वाचकाला सूचवले होते. तो आवेश दंगलखोराचा असतो. दिसायला तो दंगलखोरही माणुसच असतो. पण जेव्हा तो तसा वागत असतो, तेव्हा त्याच्यातल्या मानवी उपजत वृत्ती संपलेल्या असतात आणि त्याच्या मनाचा व समजूतींचा ताबा पाशवी उपजत प्रवृत्तीने घेतलेला असतो. आपण पकडले जाऊ, कदाचित पोलिसांनी गोळीबार केला तर मारले जाऊ, जखमी होऊ; अशी कुठलीही भिती त्यांच्या मनाला शिवलेली दिसत नाही. परिणामांची पर्वा न करता ते अमर जवान स्मारकाची नासधुस करत आहेत. कुठलाही सामान्य माणुस परिणामांचा विचार करतो, सावध असतो, दंगलखोर मात्र त्याला अपवाद असतो. तो स्वत:चा विचारच करत नसतो, की परिणामांचा विचारही त्याच्या मनाला शिवत नसतो. त्या चित्रामध्ये दोघाही तरूणांचा आवेश तेच सांगतो ना? ते बेभान व बेफ़ाम आहेत. इकडे तिकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. खरे सांगायचे तर ते दोघे त्या आवेशात असताना किंवा तसे वागत असताना, ती सामान्य माणसे नव्हतीच. म्हणुनच ते तसे वागत होते. आणि त्यासाठी कोणीतरी त्यांना प्रवृत्त केलेले होते, फ़ुस लावली होती. त्यांच्यातल्या विचार करू शकणार्‍या जाणिवा निष्क्रिय करून त्यांच्यातल्या उपजत पाशवी वृत्तीला चिथावणी दिली होती. त्यांच्यातला पशू जागा केला होता आणि माणूस झोपवला होता.

   ते दोघे किंवा त्या दिवशी, त्यावेळी तिथे ज्या हजारो लोकांनी धुडगुस घातला व हिंसा केली; त्या प्रत्येकामध्ये माणूस अस्तित्वातच नव्हता. चित्रात ते माणसासारखे दिसत असले तरी ते वर्तनाने पशू होते. आणि तेच कशाला कुठल्याही दंगलीत भाग घेतलेले हल्लेखोर असेच पशू असतात. मग ते कुठल्या देशातले आहेत, कुठल्या धर्माचे आहेत व कुठल्या जातीपातीचे, वंशाचे आहेत; याच्याशी त्यांच्या कृतीचा संबंध नसतो. त्यालाच रसेल भेदरलेल्या कळपाची उपजत पाशवी वृत्ती म्हणतात. भयगंड लोकांच्या मनात घालून ती पाशवीवृत्ती प्रेरित करता येत असते. भितीमधून भयंकर क्रूर प्रतिक्रिया उमटत असते. कारण पशू जसे कळपात असताना आपल्यावरील व्यक्तीगत परिणामांची पर्वा न करता क्रौर्याचे प्रदर्शन घडवतात, तसेच दंगलीत घाबरलेली माणसे करत असतात. त्यात भाग घेणार्‍यामध्ये क्रुर पशू संचारलेला असतो. तो दिसत माणसासारखा असला तरी त्याचा आवेश, देहाच्या हालचाली किंवा वर्तन पशूलाही लाजवणारे असते. मग सिंह, वानर किंवा डिस्कव्हरी वाहीनीवर दिसणारे कळप, एकमेकांशी रक्तपात करत झगडताना दिसतात, तशीच माणसेही वागतात. त्याला झुंड म्हणतात. मग ती मुंबईतली असोत, लखनौमधली असोत किंवा गुजरात वा आसाममधली असोत. जे आपण आझाद मैदानावर बघितले, तेच सर्व दंगलीत होत असते. जी माणसे अशी कळपात हिंसक होतात, ती मुळातच भयगंडाने प्रभावित झालेली असतात. कसल्या तरी भितीने ती पछाडलेली असतात. ती भिती खरी असेल किंवा खोटी असेल. पण जे भयभित झालेले असतात, त्यांचा प्रतिहल्ला चढवण्याचा आवेश मात्र शंभर टक्के खरा असतो. कुणीतरी त्यांच्या मनात कमाली्ची भिती निर्माण केलेली असते. मग त्या भितीमधूनच ही भयावह प्रतिक्रिया उमटत असते.

   अर्ध्या तासाच्या अल्पावधीत आझाद मैदानचा परिसर त्या पाचसातशे दंगेखोरांच्या जमावाने अक्षरश: युद्धक्षेत्र बनवून टाकला. त्यांनी पत्रकार बघितले नाहीत, पोलिस बघितले नाहीत, बसने प्रवास करणारे बघितले नाहीत, की बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांना सोडले नाही. कारण त्यातला फ़रक करण्याच्या मानवी जाणिवा ते दंगेखोर हरवून बसले होते. ती माणसेच नव्हती तर त्यांच्याकडून माणसाप्रमाणे वर्तनाची अपेक्षा करता येईल काय? अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी जी हिंसा केली, ती अधिक काळ चालली असती तर गुजरात व्हायला वेळ लागला असता काय? जे इथे झाले आणि गुजरातमध्ये दहा वर्षापुर्वी झाले, त्यात कुठला नेमका फ़रक आहे? त्यापेक्षा १९९२ ची मुंबईतली दंगल वेगळी होती काय? तेव्हाही अशाच घटना घडलेल्या नाहीत काय? प्रत्येकवेळी दंगा करणारी माणसे झुंड करून अमानुष हिंसा करणारी दिसतील. त्यांचे वर्तन पाशवी दिसेल. आणि ती पाशवी वृत्तीच खरे संकट आहे. पण त्या प्रवृत्तीचा बिमोड करण्याचा कधीच विचार झालेला नाही, की शोध घेण्याचा प्रयास झालेला नाही. उलट अशा दुर्दैवी घटनांचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फ़ो्डण्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि ती पाशवी वृत्ती मोकाटच रहाते. मग पुन्हा कुठेतरी ती पाशवी वृत्ती अचानक डोके वर काढते. तेव्हा पुन्हा तीच पळवा्ट शोधली जाते. कारण आता अशा पाशवी वृत्तीला हातशी धरूनच लोकांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण आपल्या देशात स्थिरावले आहे.

   आझाद मैदानच्या दंगलीसाठी सरसकट रझा अकादमीला दोषी ठरवण्यात आलेले आहे. त्या संघटनेने पुर्वनियोजन करून ही दंगल घडवून आणली असेच म्हटले जात आहे. पण कितीही प्रयत्न केले तरी ते पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नाही. कारण कोणी कोणाच्या मनात सामुहिक भयगंड निर्माण केल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो. शिवाय त्य दिशेने कधीच पोलिस तपास होत नाही आणि कायदाही अशा मानसशास्त्राचा आधार घेत नसतो. म्हणुनच त्यात झूंड झालेले किंवा झुंडीत सहभागी झालेले पकडले जातात. पण ती झूंड निर्माण करणारे सहीसलामत बाजूला रहातात. म्हणुनच त्या दंगेखोरांना पकडुन किंवा त्यांच्यावर गुन्हे सिद्ध करून भविष्यातल्या दंगली कधीच थांबवता येत नाहीत, की थांबलेल्या नाहीत. कारण भयगंड निर्माण करून दंगलखोरांच्या झूंडी तयार करणारे कायम मोकाटच असतात, कायदा त्यांना हातही लावू शकत नाही. आणि त्यांचा बंदोबस्त कायद्याने होणारही नाही. त्याला जनमानसातील परस्पर विश्वासच लगाम लावू शकतो. पण कोणीही तो लगाम लावायचा विचारही करत नाही, की त्या दिशेने पाऊल टाकले जात नाही. मात्र मुंबईतल्या ह्या छोट्या दंगलीमागचा हेतू सफ़ल झाला नाही. पण अशाच प्रयत्नातून गुजरात मात्र दोन महिने धुमसत राहिला होता. तो सुद्धा सामुहिक भयगंडाचा परिणामच होता. अमानुष होता.     ( क्रमश:)
भाग  ( १७ )    १/९/१२

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

सेक्युलर मुखवट्यातले लोक बदमाश असतात


   गेले दोन आठवडे मी मुंबईतील अझाद मैदान परिसरात रझा अकादमीच्या मुस्लिम गुंडांनी जो हैदोस घातला, त्या निमित्ताने उहापोह करणारी लेखमाला लिहितो आहे. अर्थात ते एक निमित्त आहे. खरा विषय त्यापेक्षा व्यापक व सर्वस्पर्शी आहे. कारण जे तिथे घडले ती जिहादी मानसिकतेची झलक होती. त्याहीपेक्षा ती मुस्लिम समाजाला धर्मांधतेकडे फ़रफ़टत घेऊन जाण्याची जी योजना आहे, त्याचा एक भाग होता. म्हणुनच त्याचे निमित्त करून गेली कित्येक वर्षे हिंदू मुस्लिम अविश्वास किंवा जे धर्मांधतेचे भूत आपल्या देशाला भेडसावते आहे, त्याची कारणमिमांसा करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. त्यात तसे नवे काहीच नाही. आजवर अनेकांनी तसा प्रयत्न केलेला आहे. पण त्यात जी निरपेक्षता व नि:पक्षपातिपणा हवा, त्याचा लवलेश आढळत नाही. बहुतेक विश्लेषण हे कुठल्यातरी बाजूने एकतर्फ़ी केलेले असते. मग त्यात अनेक वास्तविक गोष्टी वा घटना लपवण्याचा प्रयास असतो. किंबहूना सत्य लोकांसमोर येऊच नये याची काळजी अशा विवेचनात घेतलेली दिसून येते. आणि म्हणूनच या नाजूक तेवढ्याच संवेदनाशील विषयावर सांगोपांग लेखमाला लिहिण्याचा विचार मला करावा लागला. त्याचा चांगला प्रतिसादही मला वाचकांकडून मिळतो आहे. कारण गेल्या दोन आठवड्यात सातशे आठशे वाचकांनी मला फ़ोनवर संपर्क साधून प्रतिक्रिया दिल्या, त्यात प्रथमच मुस्लिम वाचकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यापैकी इमाम नदाफ़चा एसएमएस मी आधी छापलेलाच आहे. पण तसे खुप आहेत ज्यांनी तोंडी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यवतमाळचे दौलत खान त्यापैकीच एक आहे. तसाच देशदूत या दैनिकात वार्ताहर म्हणून काम करणार्‍या एका मुस्लिम तरूणाची प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणुन इथे देतो.

भाऊ थॅन्क्स, आजच आपल्या लेखमालेत मौलाना गुलाम व जावेद अख्तर यांचे अनुभव मांडले, ती देशप्रेमी मुसलमानांची दबकी आवाज आहे. म्हणून शुभेच्छा. आपला वाचक आरिफ़ शहा, रिपोर्टर दैनिक देशदूत

यापेक्षा माझे लिखाण योग्य दिशेने चालले आहे, याचा आणखी कुठला दाखला देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण हा असा एकच सुखद अनुभव नाही. लातूर येथून आलेला एक फ़ोन असा मला जास्त सुखावून गेला. तोही एका मुस्लिम बांधवाचा. त्याला तर माझी लेखमाला आवडली आहेच, पण त्याच्या घरातल्या सर्वांना आवडल्याचे त्याने अगत्याने सांगितले. मजा तेवढीच नाही. मी त्याचे आभार मानले, तेव्हा त्यानेच यापुर्वी एकदा फ़ोन केल्याची आठवण मला करून दिली. तेव्हा म्हणजे तीन महिन्यांपुर्वी मी आमिर खानच्या सत्यमेव जयतेचे वाभाडे काढणारे लेख लिहिले होते, तेव्हा जे अनेक वाचक अस्वस्थ झालेले होते व चिडून ज्यांनी मला फ़ोन केले होते, त्यातलाच हा एक मुस्लिम मराठी वाचक होता. त्याची आठवण त्यानेच करून दिली. पण जेव्हा पटले नाही तेव्हा मनमोकळेपणने त्यांनी तक्रार केली होती. आणि जेव्हा आवडले वा पटले तेव्हा तेवढ्याच मोठ्य़ा मनाने त्यांनी माझे अभिनंदन केले. (त्यांचे नाव माझ्या लक्षात राहिले नाही, त्याबद्दल क्षमस्व). पण असे कित्येक फ़ोन आले व येत आहेत. मात्र अशा आनंदात असताना बुधवारी एक असा फ़ोन आला, की त्याने माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकला. म्हणूनच मला नेहमीचा उहापोह बाजूला ठेवून वाचकांच्या प्रतिक्रियेवर आज लिहावे लागत आहे.

   त्याच दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी एक फ़ोन असा आला, की त्याने मी विचलित झालो. त्यावर बोलणार्‍या गृहस्थांनी अत्यंत पोक्त भाषेत मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला. ‘आजवर तुम्ही लोकपाल वगैरेवर लिहित होता ते ठिक आहे; पण आता ज्या विषयाला तुम्ही हात घातला आहे तो अत्यंत संवेदनाशील विषय आहे. त्याच्या परिणामांचे भान ठेवा. लिहिता चांगले, पण जे वाचणारे आहेत त्यांना त्यातला गर्भितार्थ कितपत कळत असतो? आमच्या सारख्यांना तुमचे म्हणणे कळेल, पण जो सामान्य वाचक असतो त्याला यातले काही कळत नाही, त्याच्या सामान्य बुद्धीच्या पलिकडला हा विषय आहे, वगैरे’. हे ऐकून मी थक्क झालो. कारण चार दशकाहून अधिक का्ळ पत्रकारिता करताना मी कधीच वाचकाला मुर्ख वा अल्पमती समजलेलो नाही. आणि हे गृहस्थ मला वाचक अडाणी अल्पबुद्धी असतो असे ठणकावून सांगत होते. किंबहूना सामान्य माणसाबद्दलची तुच्छता त्यांच्या शब्दातून अजिबात लपत नव्हती. जणु सामान्य जनता व नागरीक यांना काही अक्कल नसते आणि म्हणुन त्यांना काय सांगावे किंवा त्यांच्यापासून काय लपवावे, हे आपण शहाण्यांनी ठरवले पाहिजे. जनतेला तिचे भलेबुरे कळत नाही, त्यामुळे त्या मुर्ख लोकांना सत्य असेल तसे सांगण्याची वा समजावण्य़ाची गरज नाही, असाच त्यांचा दावा होता. आव तर त्यांनी जनहिताचा आणला होता, पण त्यातला रोख सामान्य माणसाला तुच्छ लेखण्याचाच होता.

असे मी काय मोठे घातक लिहितो आहे? जे लोकांपासून लपवायची गरज आहे? आणि असे काय आहे की ते लोकांना कलले तर त्याच्यासाठिच घातक आहे? सत्य लोकांसाठी, समाजासाठी घातक असते काय? नेहमीप्रमाणे असे फ़ोन करणारे कधी आपले नाव सांगत नाहीत की गाव सांगत नाहीत. पण मोबाईल ही अशी उत्तम सोय आहे की त्यान त्यांचे नंबर नोंदले जात असतात. इथेही त्यांचा नंबर (९२७१६४००२१) माझ्या मोबाईलवर नोंदला गेला. मात्र मी त्यांना काही प्रश्न व खुलासे विचारले तेव्हा त्यांनी फ़ोन तोडला. जेव्हा उत्तर नसते तेव्हा असेच होते. मी चार दशकापुर्वी आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात पत्रकारिता सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत कधी वाचकाला अडाणी समजलो नाही, की अल्पमती समजलो नाही. म्हणुनच सत्य सांगताना मला कधीच वाचक काय करील, याची भिती वाटली नाही. पण मी आज जे लिहितो आहे ते तथाकथित सेक्युलर शहाणे व सेक्युलर पाखंडी पत्रकारितेबद्दल लिहितो आहे. त्यामुळे ज्यांचे पितळ उघडे पडते आहे, असे लोक विचलित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मग असे अनाहुत सल्ले देण्याचा सेक्युलर प्रयास कोणी केला असू शकतो. कारण ही आजच्या सेक्युलर शहाण्याची धारणाच आहे. त्यांना वाटते, की आपण माध्यमे कब्जात घेतली मग लोकांपर्यंत सत्य जाऊच शकत नाही. मग आपला खोटेपणा किंवा असत्ये आपण लोकांच्या गळ्यात आरामात उतरवू शकतो. आणि संवेदनशील म्हणुन सत्याची सहज गळचेपी करू शकतो. पण त्यातला मुर्खपणा त्यांच्या कधीच लक्षात आलेला नाही. आता याच गृहस्थांचे घ्या. जे काही ते मला सांगत होते, त्याचा मतितार्थ त्यांना तरी कळत होता किंवा नाही, याचीच मला शंका येते. जे शब्द आपण बोलत आहोत, त्याचा अर्थ त्यांना तरी कळत होता काय? पण आव तर असा होता की जगातला सगळा शहाणपणा किंवा बुद्धी जी काही असेल तिचे अर्क काढून त्यांनीच प्राशन केलेले असावे.

   त्यांचे म्हणणे होते, की मी लिहित आहे तो अत्यंत संवेदनाशील विषय आहे. आणि म्हणुनच मी त्यावर अधिक लिहू नये. किती विरोधाभास आहे बघा. विषय संवेदनाशील असेल तर त्याबद्दल संवेदनशील असायला हवे ना? आणि मी त्या्वरच सविस्तर उहापोह करून तो विषय अत्यंत सोप्या भाषेत लिहितो आहे ना? म्हणजेच संवेदनशील असलेला विषय मी संवेदनशील पद्धतीने हाताळतो आहे, तर त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. आणि त्याच संवेदनशील विषयावर मी गप्प रहावे म्हणजे बधीर असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांची ती अपेक्षा उर्वरित माध्यमे म्हणजे तिथले सेक्युलर पत्रकार पुर्ण करत आहेतच. मी एकटाच या गंभीर व संवेदनशील विषयाला बधीरपणा सोडून हात घातला, त्याने हे महाशय विचलित झालेले आहेत. किती विचित्र बाब आहे ना? जो मामला संवेदनशील आहे त्याबाबतीत सामान्य जनतेला अंधारात ठेवणे, हा त्यांना शहाणपणा वाततो. ज्या सामान्य जनतेला अशा संवेदनशील समस्येचे चटके सोसावे लागतात, तिलाच त्यापासून अंधारात ठेवणे त्यांना उपाय वाटतो. हा खरा भारतीय सेक्युलर मानसिकतेचा हिडीस चेहरा आहे. त्यांना लोकांना समस्या व प्रश्नांबद्दल जागृत करायचे नाही, सावध करायचे नाही, तर अंधारात चाचपडत ठेवुन झुंजवायचे आहे. दंगल किंवा हिंसक प्रतिक्रिया नेहमी गैरसमजातून उमटत असतात. ते दूर केले व एकमेकांना समजून घेतले, तर संवाद सुरू होतो. त्यातून दोन वा अधिक समाज गट गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकत असतात. पण तसे करण्याऐवजी त्यांच्यातले गैरसमज कायम रहातील व एकमेकांकडे संशयाने बघत रहातील, या धोरणाला मी सेक्युलर का म्हणतो; त्याचा हा फ़ोन म्हणजे उत्तम पुरावा आहे. त्यातले दोन मुद्दे मला अत्यंत आक्षेपार्ह वाटतात. एक म्हणजे सत्याची लपवाछपवी आणि दुसरा म्हणजे सामान्य माणसाविषयीची तुच्छता. आणि म्हणूनच सेक्युलर शहाणे मला समाजासाठी अत्यंत धोकादायक मंडळी वाटतात.
 भाग  ( १६ )    ३१/८/१२

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२

सेक्युलर टोळीने घेतलेला मुस्लिम मुलीचा बळी


   आजही आमच्या सेक्युलर पत्रकार व माध्यमांना गुजरातच्या दंगलीची आठवण सतत येत असते. नरेंद्र मोदी नाव निघाले, मग त्यांना फ़क्त दंगला आठवते. पण त्याच दंगलीच्या काळात घडलेले आणि आणि गाजलेले बडोद्याचे बेस्ट बेकरी प्रकरण आता कोणालाच फ़ारसे आठवत नाही. मग त्यातल्या कोणाला जाहिरा शेख तरी कशाला आठवणार? ही जगातली एक अशी चमत्कारिक केस आहे, की ज्यात एका निरागस अजाण तरूणीला सेक्युलर लोकांच्या नादी लागल्याने न्यायाच्या बदल्यात शिक्षा भोगावी लागली आहे. आता त्याला काही वर्षे उलटून गेली आहेत. सेक्युलर मंडळींच्या नादाला लागून मुस्लिमांचे काय हाल झालेत, त्याचा तो सर्वात भयंकर नमूना आहे.

   दहा वर्षपुर्वी गुजरातमध्ये ज्या भीषण दंगली झाल्या, त्यात बडोदा शहरातील बेस्ट बेकरी जाळण्यात आली होती. त्यात जाहिरा शेखचे सर्व कुटुंबच बेकरीसह जाळले गेले होते. त्यासंबंधीचा खटला भरण्यात आला. तपास झाला आणि त्यात एका भाजपा आमदारासह कॉग्रेसच्या नगरसेवकालाही आरोपी करण्यात आलेले होते. पण कोर्टात जेव्हा तो खटला उभा राहिला, तेव्हा त्या घटनेतील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या जाहिरा शेखला आरोपी ओळखता आले नाहीत. तिने पोलिसांना जो जबाब दिला होता तोही नाकारला. त्यामुळे सर्व आरोपींची सुट्का झाली. मग एकदम कल्लोळ माजला. खटला चालला, तेव्हा त्यात जाहिरा किंवा तिच्या आईला मदत करायला कोणीही सेक्युलर गेला नव्हता. पण आरोपी सुटल्यावर धुमाकुळ सुरू झाला. जाहिरावर दडपण आणून तिला साक्ष फ़िरवायला लावली, धमकावले असे आरोप सुरू झाले. मग एके दिवशी तिला बडोद्याहून उचलून मुंबईत आणले गेले आणि थेट पत्रकारांसमोर तिला पेश करण्यात आले. इतक्या पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देण्याचीही बिचारीला हिंमत नव्हती. तिस्ता सेटलवाड नामक एका तोंडाळ महिलेच्या पुढाकाराने चालणार्‍या एनजीओच्या माध्यमातून हे प्रकरण चालू झाले होते. त्या पत्रकार परिषदेत जाहिराने आपल्याला धमक्या मिळल्याचे सांगितले आणि माध्यमातून धुमाकुळ सुरू झाला. गुजरातमध्ये न्यायव्यवस्थाही हिंदूत्ववाद्यांच्या दडपणाखाली आहे, म्हणुन दंगलीतले मोठे खटले गुजरात बाहेर मुंबईत चालवण्याचा आग्रह सुरू झाला. बेस्ट बेकरीचा खटला नव्याने मुंबईत चालवण्याची मागणी सुप्रिम कोर्टाने मान्य केली आणि त्यासाठी मुंबईत माझगाव येथे खास न्यायालय नेमण्यात आले. मधल्या कालात जाहिरा शेख हिचा ताबा तिस्ता सेटलवाड यांच्याकडे होता. तिस्ताच्या परवानगीशिवाय जाहिराला कोणी पत्रकारसुद्धा भेटू शकत नव्हता. जणु जाहिरा तिस्ताच्या कोंडवाड्यात पडली होती. तिचे कुटुंब किंवा त्यांची झालेली हत्या यासंदर्भात तिस्ताच सर्व काही माध्यमांना सांगत होती.

   मग त्या खटल्याची नव्याने मुंबईत सुनावणी होईपर्यंत आणखी एक चमत्कार घडला. एके दिवशी अचानक जाहिरा मुंबईतून गायब झाली आणि जशी मुंबईत अचानक उगवली होती; तशीच ती गुजरातमध्ये अवतरली. तिथे तिची पत्रकारांसमोर पेशी करण्यात आली. तेव्हा तिने धक्कादायक माहिती दिली. तिस्ताने आपल्याला कोंडून ठेवले होते. आपण आधीच सत्य बोललो होतो. पण गुजरातमध्ये खटल्याचा निकाल लागल्यावर आपल्याला पैशाचे आमिष दाखवून तिस्तानेच खोटे बोलायला भाग पाडले असा जाहिराचा आरोप होता. त्यातून तिस्ता आणि सेक्युलर थोतांड उघडे पडले. पण बिचार्‍या जाहिराचा त्यात उगाच बळी गेला. कारण आता तिच्यावरच सारखी साक्ष बदलते असा शिक्का बसला आणि कोर्टाला खोटी साक्ष दिली किंवा खोटे प्रतिज्ञापत्र दिले म्हणून तिलाच शिक्षा भोगायची पाळी आली. कारण कुठलीच भाषा लिहिता वाचता न येणारी जाहिरा, तिस्ताच्या शब्दावर विसंबून फ़सली होती. तिने सांगितले त्या त्या कागदावर जाहिरा सही करत गेली होती. त्या कागदावर काय लिहिले आहे त्याच तिला पत्ताच नव्हता. पण तिचा दावा मान्य करायचा तर पहिल्यांदा खटल्यातून आरोपी निर्दोष सुटल्यावर तिस्ताच्या सेक्युलर टोळीने जाहिराला आमिष दाखवले होते. जर तिने नव्याने खटला चालवायची व आधी धमक्या मिळाल्याने साक्ष फ़िरवल्याचे सांगितल्यास नवे घर बांधायला पैसे मि्ळतील असे आमिष दाखवले होते. त्याच पैशाचा अर्ज म्हणुन आपली कागदपत्रावर सही घेण्यात आल्याचे जाहिराने नंतर सांगितले. पण मुंबईत आपल्याला तिस्ताच्या घरी बंगल्यात कोंडून ठेवलेले होते आणि आपल्या भाऊ व आईलाही भेटू दिले जात नव्हते; असेही तिने सांगितले. मात्र इतके दिवस उलटून गेल्यावरही नवे घर बांधायला पैसे मिळत नाहीत, म्हटल्यावर जाहिराचा धीर सुटला आणि तिने तिस्ताच्या बंगल्यातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण सेक्युलर दहशत असल्याने आपण गुजरात पोलिसांची मदत घेऊन पळालो, असेही जाहिराने सांगितले. त्यानंतर मात्र तिस्ता व सेक्युलर टोळीची भलतीच तारांबळ उडाली. न्यायाच्या गप्पा मारणार्‍या तिस्ताने अटकपुर्व जामीनासाठी धावाधाव केली. तिला तो मिळालाही. पण बळी गेला तो बिचार्‍या जाहिराचा.

   पुढे जेव्हा खटला चालला तेव्हा जाहिराने आपली साक्ष पहिल्या खटल्याप्रमाणेच देऊन आरोपींना ओळखायचे नाकारले. तरीही त्यावर कोर्टाने विश्वास ठेवला नाही. उलट जाहिराला कोर्टाची फ़सवणुक केल्याबद्दल एक वर्षाच्या कैदेची शिक्षा झाली. ज्या मुलीचे संपुर्ण कुटुंब दंगलीच्या जाळपोळीत मारले गेले, त्यातल्या संशयितांना शिक्षा झा्लीच. पण फ़िर्यादीलाही शिक्षा होण्याचा अजब प्रकार घडला. जिचे कुटुंब मारले गेले, तिलाही कैदेची शिक्षा भोगावी लागली. जगाच्या पाठीवर असा चमत्कार कुठेच अन्यत्र कधी घडला नसेल. असा चमत्कार फ़क्त भारताच्या अनाकलनिय सेक्युलर कारभारतच घडू शकतो. तेव्हा जाहिराने आणखी एक गोष्ट सांगितली होती. पठाण नावाच्या तिस्ताच्या एका दलालाने आपल्याला खोट्या साक्षीसाठी फ़ुस लावली आणि मुंबईला घेऊन गेला असे जाहिराने तेव्हा सांगितले होते. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. त्यालाही गुजरातमध्ये अटक होण्याची भिती असल्याने तिस्ताने आपल्या सोबत त्याच्याही अटकपुर्व जामिनाचा अर्ज केला होता. आता इतक्या वर्षानंतर पठाण यानेही जाहिराच्याच तेव्हाच्या आरोपाला दुजोरा दिलेला आहे. गुजरात दंगलीच्या हिंसाचारातल्या बळी व पिडीतांचे खटले भरण्यासाठी भलतेसलते आरोप करण्याचे व साक्षिदारांना पढवण्याचे काम आपण तिस्ताच्या आग्रहाखातर करत होतो. पण अशा प्रकरणातून दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी परदेशातून भरपुर पैसे व देणग्या मिळाल्यावर तिस्ताने आपल्याला हाकलून लावले असा पठाणचा दावा आहे. याच महिन्यात तिस्ताच्या या जुन्या सहकार्‍याची मुलाखत लंडन येथील ‘गार्डियन’ वृत्तपत्रात छापून आलेली आहे.

   याला म्हणतात सेक्युलॅरिझम. या सर्व गुजरात दंगल प्रकरणात तिस्ता माध्यमांची मोठी लाडकी होऊन राहिली आहे. कुठेही कुठल्याही कोर्टत गुजरात दंगलीचे काहीही घडो की माध्यमे तिस्ताला वाहिन्या बोलावणारच. तिचे मत विचारणारच. त्या सेक्युलर तिस्ताने वा तिच्या सेक्युलर टोळीने किती मुस्लिम वा दंगल पिडीतांना न्याय मिळवून दिला मला माहिती नाही. पण तिच्या नादाला लागलेल्या तिच्या दोन अत्यंत निकटवर्तिय अशा जाहिरा व पठाण अशा दोन मुस्लिमांची दुर्दशा त्यांनीच कथन केलेली आहे. आणि गंमत अशी, की आज तिस्ताच्या व सेक्युलर टोळीच्या आहारी गेलेले अनेक मुस्लिम अन्यायाची शिकार झालेले आहेत, भरकटत राहिले आहेत. कारण तिस्ता किंवा तिच्यासारख्या सेक्युलर लोकांसाठी दंगलीतले बळी किंवा पिडीत हे कमाईसाठी व्यापाराचे भांडवल किंवा कच्चा माल झाले आहेत. याला सेक्युलॅरिझम म्हणतात. जो मुस्लिमांच्या न्यायाची भाषा अखंड बोलत असतो. पण त्याच मुस्लिमातील गुंडांना पाठीशी घालत असतो. व त्यातून सामान्य जनतेच्या मनात मुस्लिमांची विकृत प्रतिमा मात्र तयार करत असतो. कारण असे सेक्युलर हे मुस्लिम गुंडांच्या पाठ्शी उभे राहून मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन करत असतात. परिणामी जेव्हा तेढ विकोपास जाते, तेव्हा त्या विकृत प्रतिमेचे परिणाम मात्र सामान्य मुस्लिमाला भोगावे लागत असतात. गुजरातची दंगल त्याचाच परिपाक होता. माध्यमांनी गुजरातच्या दंगलीचे सेक्युलर चित्रण कसेही करो, पण वस्तुस्थिती भलतीच आहे. त्यात मुस्लिमांचाच बळी गेला आहे. पण ती दंगल का झाली, इतका दिर्घकाळ का चालली आणि तरीही मोदीच तिथे सातत्याने का जिंकतो, ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत. कारण त्याटा सेक्युलर थोतांडाबरोबरच सामान्य मुस्लिमांचे भवितव्य दडलेले आहे.     ( क्रमश:)
भाग   ( १५ )  ३०/८/१२

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

जावेद अख्तर आणि गुलाम वस्तानवींचे अनुभव


   मला वाटते बहूधा गुजरात दंगलीनंतरची गोष्ट आहे. तेव्हा इंग्रजी भाषेतील एनडीटीव्ही ही एकच वाहिनी होती. तिथे राजदीप सरदेसाई राजकीय संपादक म्हणुन काम करत होता. दर रविवारी त्याचा बिग फ़ाईट नावाचा वादविवादाचा कार्यक्रम असायचा. तीन किंवा चार पाहुणे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तीन पत्रकार असा सोहळा असे. त्यात वाद व चर्चेपेक्षा हमरीतुमरीच अधिक होत असे. अशाच एका कार्यक्रमाचा विषय होता धार्मिक अन्याय असाच काही. त्यात प्रसिद्ध चित्रपट कथाकार कवी जावेद अख्तर सहभागी झाले होते. राजदीपने त्यांना मुस्लिमांना भेदभावाची वागणूक मिळते काय असा प्रश्न विचारला. त्याची त्यांनी उत्तरे व उदाहरणे दिली. मग त्यांनी असाच हिंदूंवर भारतात अन्याय होतो काय, असाही प्रश्न विचारला. जावेद अख्तर यांनी त्याचेही स्वत:च्या अनुभवाने उत्तर दिले होते. त्यांनी एक किस्साच सांगितला. भारतीय सेक्युलर प्रशासन हे हिंदूंना कसे भेदभावाने वागवते, त्याचा तो सर्वोत्तम किस्सा आहे. त्या काळात जावेदची पत्नी शबाना आझमी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदार होती. सध्या स्वत: अख्तरच आहेत. असो, जावेदभाईंनी सांगितलेला किस्सा असा.

   एकदा त्यांना मुंबईच्या ताडदेव भागातील एका मुस्लिम महिलेचा फ़ोन आला. नवरात्रोत्सवाचे लाऊडस्पिकर खुप जोरात वाजत असल्याने त्यांच्या मुलांचा अभ्यास होऊ शकत नाही. त्याचा बंदोबस्त करावा अशी त्या महिलेची मागणी होती. त्याप्रमाणे तिचा पत्ता घेऊन अख्तर यांनी संबंधित पोलिस ठाण्याला आपण खासदार शबानाचा पती बोलत असल्याचे सांगून त्या लाऊडस्पिकरचा आवाज बंद करण्याची विनंती केली. काही वे्ळाने त्या महिलेचा आभार मानणारा फ़ोन आला. तिचे काम झाले होते. तिच्या जवळ वाजणारा नवरात्रीचा लाऊडस्पिकर बंद झाला होता. काही दिवसांनी उलट परिस्थिती आली. अशाच एका महिलेचा फ़ोन आला. ती महिला मुस्लिम नव्हती तर हिंदू होती. कुठला तरी मुस्लिम सण चालू होता आणि त्या निमित्त तिलाही असाच जोरात वाजणार्‍या लाऊडस्पिकरचा त्रास होत होता. पुन्हा त्याच पोलिस ठाण्याला अख्तर यांनी तक्रार केली. पण तासाभराने काम न झाल्याची तक्रार करणारा फ़ोन त्या महिलेने केला. आता चीड आलेल्या जावेदभाईंनी पुन्हा पोलिस ठाण्याला फ़ोन करून तिथल्या अधिकार्‍याला जाब विचारला. तर तो अधिकारी म्हणाला, लाऊडस्पिकर मुस्लिम सणासाठी लावला आहे आणि तो बंद करता येणार नाही. जावेदभाईंनी कारण विचारले तर हसत त्या अधिकार्‍याने सांगितले हे असेच चालते.

   इतका किस्सा सांगून जावेदभाई म्हणाले, हा त्या महिलेवर ती हिंदू आहे म्हणूनच झालेला भेदभाव नाही काय? मुस्लिम महिलेची तक्रार ऐकून हिंदू सणासाठी वाजणारा लाऊडस्पिकर बंद करण्यात आला. पण तशीच तक्रार असताना मुस्लिमांचा लाऊडस्पिकर मात्र बंद करण्यात आलेला नव्हता. हा भेदभाव नाही तर काय? अशा तक्रारी शिवसेना किंवा भाजपाकडून नेहमीच होत असतात, विशेषत: गणपती किंवा नवरात्रोत्सवात होतात. पण त्यांनी असा भेदभाव होतो म्हटले, की त्याला खोटे पाडले जाते. पण इथे तीच तक्रार भाजपावर सतत टिका करणार्‍या एका सेक्युलर मुस्लिमाने केली होती. पण राजदीप सरदेसाईने ती तक्रार साफ़ फ़ेटाळून लावली. राजदीप म्हणाला, यात काही तथ्य नाही. जावेदभाई पटकथाकार आहे, तो कुठल्याही कथेला कसलेही नाट्यमय वळण देऊ शकतो. म्हणजे जावेद अख्तर यांनी जो आपला अनुभव सांगितला, त्याला सेक्युलर राजदीप कथा ठरवून मोकळा झालेला होता. हा आपल्या देशातला सेक्युलॅरिझम आहे. त्यात मुस्लिमांवरच अन्याय होतो अशी ठाम श्रद्धा व समजुत आहे. मग एखाद्या मुस्लिमाने आपल्यावर अन्याय झाला नाही किंवा होत नाही म्हटले तरी सेक्युलर विचारवंत किंवा पत्रकार माध्यमे त्याला खोटा पाडायला कमी करत नाहीत. आणि एखाद्या हिंदूने आपल्यावर अन्याय होतो म्हटले, तरी त्याला खोटे ठरवणे म्हणजे सेक्युलॅरिझम अशी स्थिती आहे. आणि त्यातूनच आज या दोन प्रमुख धार्मिक समाज घटकांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. त्यावरच सेक्युलर मंडळी आपली पोळी भाजून घेत असतात. अर्थात जावेद अख्तर यांचा हा एकमेव किस्सा आहे असे कोणी मानायचे कारण नाही. असे कित्येक किस्से मी सांगू शकतो.

   मध्यंतरी देशातील सर्वात मोठे असे मुस्लिम धर्मपीठ देवबंदचे प्रमुख मौलवी गुलाम वस्तानवी यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्यावर सेक्युलर माध्यमे व पत्रकारांनी झोड उठवली. वस्तानवी हे मुळचे गुजराती मुस्लिम आहेत. त्यांनी इस्लामी धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास केलेला आहे. म्हणुनच त्या अभ्यास व अनुभवातून त्यांना धर्मपीठाचे प्रमुख म्हणुन नेमण्यात आलेले होते. पण त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत केली आणि त्यांना ते सन्मानाचे पद अपमानित होऊन सोडावे लागले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी गुजरातमधले सत्यकथन केले. तिथे दंगली होऊन त्यात मुस्लिम मारले गेले, मुस्लिमांवर खुप अन्याय झाला, हे सर्व खरे असले तरी आज त्या राज्याची जी प्रचंड आर्थिक प्रगती झाली आहे; त्याची फ़ळे गुजराती मुस्लिमांनाही चाखायला मिळत आहेत. आणि त्या विकासाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना द्यावेच लागेल. असे विधान वस्तानवी हे करून बसले आणि आयुष्यात सत्य बोलण्य़ाचा त्यांनी सर्वात मोठा सेक्युलर गुन्हा केला. झाले, वस्तानवी यांनी मोदींचे कौतुक केले असे काहूर माजवण्यात आले. वस्तानवी यांनी आपण मोदी यांच्या धोरणाचे, राजकारणाचे किंवा दंगलीतील वर्तनाचे कौतुक केलेले नाही, तर त्याच मुलाखतीमध्ये मोदींची दंगलीबद्दल निंदाच केल्याचे पुन्हा पुन्हा सांगून बघितले. पण काही उपयोग झाला नाही. मुस्लिम असून मोदींच्या विकासकामाचे कौतुक त्यांनी केले, म्हणुन आपल्या सेक्युलर माध्यमांनी वस्तानवी यांना अपराधी ठरवून टाकले होते. माध्यमातून इतके काहूर माजवण्यात आले, की त्याची दखल घेऊन देवबंद पीठाला वस्तानवी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावाच लागला.

   मुस्लिम आहे त्याने मोदी यांची निंदाच केली पाहिजे. आणि एखाद्याचा अनुभव वेगळा असेल, तरी त्याने सत्य बोलण्याचे धाडस करता कामा नये, अशी आपल्या देशातील सेक्युलर परिस्थिती आहे. हिंदूंवर अन्याय झाला तरी त्याबद्दल अवाक्षर उच्चारणे सेक्युलर गुन्हा असतो. त्याचप्रमाणे इथे या देशात मुस्लिमांवर अन्याय होतो असे सेक्युलर माध्यमांनी ठरवून ठेवले आहे. त्यात कोणी गफ़लत केली तर तो मुस्लिम असला तरी त्याला क्षमा नसते. मग वस्तुस्थिती काहीही असो. हिंदू अन्याय करतात आणि मुस्लिमांवर अन्याय होतो हा सिद्धांत मान्य करणे म्हणजे सेक्युलर असणे झाले आहे. तशी वस्तुस्थिती असायचे कारण नाही. अशी आजच्या सेक्युलर माध्यमांची मनस्थिती असेल तर त्यांना आझाद मैदानावर मुस्लिम गुंडांनी धुडगुस घातला किंवा हैदोस केला, तर ते दिसेल कसे? त्याऐवजी त्यांना त्यातही अजून हिंदूत्ववादी संघटनांचा हात कसा दिसलेला नाही हे एक आश्चर्य आहे. त्याचेच प्रतिबिंब सर्वच माध्यमात व वाहिन्यांच्या चर्चेत पडलेले दिसेल. म्हणून निखिल वागळे याने आपल्या सवालमध्ये का्रण नसताना सुनिल देवधर याच्यावर आरोपांची बरसात केली. कारण देवधर हिंदू संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांना शिव्या घातल्या किंवा खोटे आरोप त्यांच्यावर केले, मगच निखिल सेक्युलर ठरत असतो. सेक्युलर विचारसरणीची अशी आज विकृत अवस्था झालेली आहे. हिंदूंच्या भावना दुखावणे म्हणजे सेक्युलर आणि मुस्लिम गुंडगिरीचे समर्थन म्हणजे सेक्युलर; अशी त्या विचारधारेची दुर्दशा झालेली होऊन गे्ली आहे, सामान्य मुस्लिम त्याच विकृतीचा बळी होत चालला आहे. कारण असल्या सेक्युलर चाळ्यांनी मुस्लिम समाजात संयमी व समंजस वृत्तीला स्थानच राहिलेले नाही. जे भडकपणे बोलतील वा चिथावणीखोर वागतील, त्यांनाच माध्यमे मुस्लिम प्रतिनिधी म्हणून समोर आणत असतात. आणि संयमी मुस्लिम नेत्यांना प्रसिद्धी दिलीच जात नाही. जेणे करून बहुसंख्य हिंदू समाजामध्ये मुस्लिमांबद्दल गैरसमज, संशय व चिड निर्माण होईल अशाच लोकांना पुढे आणले जात असते. नुसती अशा मुस्लिम नेत्यांवर नजर टाकली तरी त्याची साक्ष मिळेल. त्याला मुस्लिम समाज जबाबदार नसून सेक्युलर विचारांचे विकृतीकरण त्याला कारणीभूत आहे. आणि या राजकारणात एका निरागस मुस्लिम मुलीचा कसा बळी घेतला गेला त्याचा तपशील उद्या बघू.     ( क्रमश:)
भाग   ( १४ )  २९/८/१२

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

मुस्लिम धर्मांधतेचे पोषणकर्ते कोण आहेत?   सेक्युलर म्हणून जे काही थोतांड आहे, त्याने मुस्लिम गुंडगिरीला मोकाट रान दिले असून आमच्या ईमाम नदाफ़सारखे सामान्य मुस्लिम त्याचे बळी होत आहेत. यात सामान्य मुस्लिमांचा बळी कसा जातो, असा अनेकांना प्रश्न पडेल. असे मी काल म्हटले होते. ज्यांच्या मनात मुस्लिमांविषयी राग आहे किंवा थोडाफ़ार संशय आहे, त्यांना माझ्या या वाक्याचे आश्चर्य वाटू शकेल. कारण मुस्लिम धर्मवेडे असतात आणि त्यातून दंगे करतात आणि त्यात हिंदू किंवा अन्य निरपराधांचा अकारण बळी जातो; अशी एक सर्वसाधारण समजूत अलिकडल्या काळात निर्माण झाली आहे. ती सर्वस्वी चुकीची नसली तरी तेच संपुर्ण सत्य आहे, असेही म्हणता येणार नाही. आजवरचा इतिहास बघितला तर बहुतेक वेळी मुस्लिमांच्या आक्रमक वृत्तीमुळेच दंगलींना सुरूवात झाली आहे. पण म्हणून सगळेच मुस्लिम वा सर्वच मुस्लिम लोकसंख्या तशीच आक्रमक आहे, असे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. पण मुस्लिम लोकसंख्या कायम एकजीव रहाण्याचा प्रयत्न करते हेसुद्धा तेवढेच खरे आहे. त्यांच्यातल्या याच प्रवृत्तीचा काही मुठभर धर्मवेडे फ़ायदा घेऊन संपुर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने आपण आक्रमक झालो आहोत; असा देखावा निर्माण केला जातो. तो खरा नसला तरी जे कोणी आक्रमक होऊन पुढे सरसावतात, त्यांना अडवण्याची व संयम दाखवायला भाग पाडण्य़ाची क्षमता मुस्लिम लोकसंख्येत नाही. तिथेच सगळी गड्बड होऊन जाते. मग जे मुठभर लोक कुरापत करतात, तेच आधी मुस्लिम लोकसंख्येवर कब्जा करतात आणि तेच म्होरके असल्याप्रमाणे वागू लागतात. परंतू जेव्हा परिस्थिती बिघडते किंवा बाजू उलटते, तेव्हा तेच आक्रमक कुरापतखोर शांतताप्रिय मुस्लिमांना ढालीप्रमाणे पुढे करून त्यांच्या मागे लपत असतात.

   आता परवाच्याच मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील हिंसाचाराची गोष्ट घ्या. ज्यांनी कुरापती करायच्या होत्या, त्यांची माथी भडकवण्याचे पाप ज्यांनी केले ते सर्वकाही घडून गेल्यावर बेपत्ता होते. अगदी रझा अकादमीचे म्होरकेही गायब होते. आणि त्या सर्वापासून दुर असलेले घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करीत ‘हे सर्व इस्लाम धर्माला मंजूर नाही" अशी ग्वाही देत होते. पण जे अन्यवेळी मोठे छाती फ़ुगवून आपणच मुस्लिमांचे तारणहार आहोत, असा आव आणतात, ते अबू आझमीसारखे लोक बेपत्ता होते. त्यांना कंठ फ़ुटला तो राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर. तोपर्यंत जे घडले त्याची आझमी यांनी एका शब्दाने तरी माफ़ी मागितली होती काय? घडले त्याबद्दल खेद व्यक्त करणे सोडा, त्याचा निषेध केला होता काय? पण तेच आझमी इतर प्रसंगी कायम हातात तलवार घेऊन जिहाद करायला युद्धासाठी बाहेर पडलेल्या आवेशात असतात. त्यातून ते जी प्रतिमा जनमानसात निर्माण करतात, तो समंजसपणाचा चेहरा असतो काय? तिथून सगळी गडबड सुरू होते. तिकडे कुठे इराकवर अमेरिकेने हल्ला केला किंवा अफ़गाणिस्तान विरोधात युद्ध पुकारले; मग आझमीसारखे मुठभर लोक जिहादच्या गर्जना करू लागतात. त्यातून जे मुस्लिम नाहीत त्यांच्या मनात मुस्लिमांविषयी कोणती प्रतिमा तयार होते? ती समंजस किंवा शांतता्प्रिय नागरिकाची असते काय? कारण एक आझमी लोकांना वाहिन्यांवर किंवा बातम्यातून दिसत असतो आणि तो कधीही रक्त सांडण्याच्या गर्जना सातत्याने करत असतो. आणि तीच प्रतिमा अन्य लोकसंख्येच्या मनात घर करून रहाते. ही झाली या समस्येची एक बाजू.

   दुसरी बाजू आहे ती अशी प्रतिमा पुअली जाण्यासाठी न होणारे प्रयास. जे शांतताप्रिय मुस्लिम आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, तेही तिथल्या तिथे किंवा अल्पावधीत आझमी जे बोलतात, त्याचे खंडन करायला पुढे येत नाहीत. मग जी गैरलागू प्रतिमा अन्य लोकांच्या मनात तयार झाली, ती तशीच रहाते आणि घर करून बसते. असेच जेव्हा वारंवार घडू लागते, तेव्हा ती आधीच तयार झालेली प्रतिमा पक्की होत जाते. मुस्लिम म्हटला मग तो धर्मवेडा धर्मांध किंवा धर्मासाठी हिंसक होणारा, अशी एक भ्रामक पतिमा मध्यंतरीच्या काळात तयार झालेली आहे. त्याची काही वेगळीच कारणे आहेत. साधारण १९८० नंतरच्या काळात त्याची सुरूवात झाली. अरबी देशातून धर्माच्या नावाने ज्या देणग्या अन्य देशात पेट्रोडॉलर्सच्या पैशातून पाठवल्या जाऊ लागल्या; त्याचा हा एक विपरित परिणाम आहे. तेव्हा अबू आझमी, दाऊद इब्राहीम वगैरेंना कोणी ओळखत नव्हते. मुस्लिमांची राजकीय संघटना वगैरे काही मोठी प्रबळ नव्हती. पण किरकोळ मंडळी तशी धडपड करत होत्या. त्यात सनदी सेवेतले निवृत्त अधिकारी सय्यद शहाबुद्दीन असा अत्यंत सुशिक्षित व हाजी मस्तानसारखा कुख्यात गुन्हेगार यांचा समावेश होतो. अशा परकीय देणगीचे पैसे आपल्यालाच मिळावेत म्हणून त्यांच्यात अधिकाधिक आक्रमक चिथावणीखोर धर्मांध भाषा बोलण्याची जणू स्पर्धाच चालली होती. हळूहळू त्यात इतर भडभूंजे सहभागी होत गेले. त्या प्रवृत्तीला मुस्लिम लोकसंख्येचा फ़ारसा पाठींबा मिळतही नव्हता. पण त्या आगीत तेल ओतण्याचे पाप इथल्या तथाकथित सेक्युलर मुखंडांनी केले.

   शहाबुद्दीन किंवा हाजी मस्तान यांच्या धर्मांध भाषेला आक्षेप घेतले गेल्यावर आधी प्रतिकार करायला पुढे सरसावले ते सेक्युलर. अर्थात या आक्रमक भाषेला भाजपा किंवा हिंदूत्व मानणार्‍या पक्ष संघटनांकडून आक्षेप घेतला जाऊ लागला. तर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न बाजूला ठेवून सेक्युलर शहाण्यांनी उलट त्याच आक्रमक मुस्लिम उपटसुंभांना पाठीशी घालायला सुरूवात केली. जी आक्रमक भाषा चिथावणीखोर होती, तिलाच धर्मस्वातंत्र्य असे लेबल लावण्याचे पाप सेक्युलर मंडळींनी प्रथम केले. त्यातून हे बिनबुडाचे मुस्लिम एकांडे शिलेदार शिरजोर होत गेले. तेवढेच नाही तर त्यांनाच मुस्लिमांचे नेते म्हणून मग सेक्युलर पक्षांनी आपल्यात मुस्लिम चेहरा म्हणून सामावून घेतले. त्यात मग समंजस, संयमी व सहिष्णु मुस्लिम कार्यकर्ता मागे पडत गेला. आज भाजपाचा नेता असलेला मुख्तार अब्बास नकवी हे त्यातले एक नाव मला चांगले आठवते. हा मुळचा समाजवादी चलवळीतला कार्यकर्ता. पण तिथे धर्मवेड्या मुस्लिमांनाच प्राधान्य मि्ळते व त्यांच्या धर्मांधतेलाच खतपाणी घातले जाते; म्हणुन तिथून बाजूला झालेला तो एक चांगला कार्यकर्ता आहे. पण त्याला कोणा सेक्युलर पक्षाने किंवा विचारवंत माध्यमांनी कधी साथ दिली आहे काय? उलट असे दिसेल, की जेव्हा जेव्हा नकवी किंवा शहानवाज यांच्यासारखे मुस्लिम चर्चेत येतात, तेव्हा वाहिन्या किंवा वृत्तपत्राचे पत्रकार त्यांना भाजपाचे भाडोत्री मुस्लिम म्हणून हिणवतात. एखादा मुस्लिम भाजपात, शिवसेनेत असेल तर पत्रकारच त्याला जाब विचारल्याप्रमाणे म्हणतात, ‘तू या पक्षात कसा?’

   यातून हे पत्रकार किंवा तथाकथीत सेक्युलर जाणकार काय सुचवत असतात? मुस्लिमाने भाजपात असता कामा नये. तो शिवसेनेत गेला म्हणजे त्याने जणू मोठेच पाप केलेले आहे. ही काय प्रवृत्ती आहे? हे सेक्युलर मुस्लिमांना भाजपा शिवसेनेचा द्वेष करायला शिकवत नाहीत काय? पण दुसरीकडे जे अन्य तथाकथित सेक्युलर पक्षातले मुस्लिम नेते आहेत, त्यांनी भाजपावर टिका केली तर त्याचे स्वागतच होत असते. थोडक्यात सेक्युलर म्हणून जी माध्यमे किंवा पत्रकार आहेत त्यांनी मुस्लिम व हिंदू तेढ वाढवण्याचे पद्धतशीर काम केलेले दिसेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे मुस्लिमांची कत्तल करायला निघालेला सैतान आहे अशी प्रतिमा जणिवपुर्वक मुस्लिम जनमानसात सेक्युलर माध्यमांनी रुजवलेली नाही काय? ताजी घटना मी सांगू शकतो. कायबीइन लोकमत वाहिनीवर संपादक निखिल वागळे यांनी कोणताही पुरावा न देताच सुनिल देवधर या संघ कार्यकर्त्यावर मुस्लिमांच्या विरोधात खोट्या अफ़वा पसरवतो, असा जाहिरपणे आरोप केला होता. पुण्यातल्या एका घटनेचा दाखला देवधर यांनी दिला तर मग त्याबद्दल पोलिसात तक्रार का केली नाही, असा जाब निखिल देवधरांना तावातावाने विचारत होता. पण निखिलचा तो आवेश खरा असेल आणि आरोप खरा असेल; तर तोच कार्यक्रम संपल्यावर स्वत- निखिलने देवधर यांच्या विरोधात अफ़वा पसरण्याची तक्रार पोलिस ठाण्यात जाऊन का केली नाही? कारण निखिल धडधडीत खोटे बोलत होता. त्याच्याकडे देवधर खोटे बोलत असल्याचा वा ती अफ़वा असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. पण तो मुंबईतील हिंसा आणि त्यानंतर अन्य राज्यातून आसामी लोकांचे पलायन होत असतानाही निखिलसारखे सेक्युलर मुस्लिम धर्मांधतेचीच पाठराखण करत होते. तिथेच सगळी गडबड होते. कारण त्यातून धर्मांधतेचे नाटक रंगवणारेच मुस्लिमच त्या समाजाचे नेते असल्याची प्रतिमा तयार होत असते. थोडक्यात मुस्लिम धर्मांधतेचे पालनपोषण मुस्लिमांनी नव्हेतर इथल्या सेक्युलर विचारवंत, माध्यमे, पत्रकार व राजकारण्यांनी केलेले आहे. त्यांच्या पापांची लांबलचक यादीच देता येईल.       ( क्रमश:)
भाग   ( १३ )  २८/८/१२

रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

दंगेखोर गुंड सेक्युलर असतात का


    आता आसामच्या दंगलीचा भर ओसरला म्हणेपर्यंत तिथला हिंसाचार पुन्हा पुन्हा डोके वर काढतो आहे. एक जिल्ह्यातली संचारबंदी उठवावी तर दुसर्‍या जिल्ह्यात भडका उडतो आणि तिकडे लष्कर पाठवले जात असते. त्यातून मार्ग काढायचा तर दंगल करणारा कोणीही असो; त्याच्यावर गोळ्या झाडण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. आणि जेव्हा अशी कायद्याची कठोर पावले उचलली जातात, त्यात जो कोणी आडवा येईल, त्यालाही गजाआड करण्याचे धाडस सरकारमध्ये असले पाहिजे. त्याला कायदा राबवणे म्हणतात. आजच्या सरकारमध्ये ते धाडस उरलेले नाही. त्यातूनच ह्या सर्व समस्या वाढत गेल्या आहेत आणि कायदा लुळापांगळा पडत गेला आहे. त्याला सेक्युलर नावाचे थोतांड प्रामुख्याने जबाबदार आहे. कारण सेक्युलर म्हणजे नेमके काय ते कोणालाच ठाऊक नाही आणि त्याच शब्दांचा आडोसा घेऊन हे अराजक माजवण्यात आलेले आहे. म्हणूनच यातून मार्ग काढायचा असेल तर आधी त्या थोतांड पाखंडातून बाहेर पडण्याची गरज आहे. सेक्युलर किंवा जातियवादी म्हणजे नेमके काय असते? वाहिन्यांवरील राजकीय चर्चेमध्ये नियमित लिखाणामध्ये आपण सेक्युलर व जातिय धर्मांध शक्ती असे शब्द आपण ऐकत-वाचत असतो. त्याचे अर्थ काय? त्यांच्या व्याख्या कोणत्या? कशाला जातीयवादी म्हणायचे आणि सेक्युलर म्हणजे तरी कोण?

   वृत्तपत्रे किंवा राजकीय चर्चेचे सूत्र पाहिले तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोणतीही हिंदूंच्या हिताचे बोलणारी संघटना वा संस्था असेल, तर ती जातीयवादी किंवा धर्मांध असते असे त्यातले गृहीत आहे. मात्र तशाच मुस्लिम हिताची किंवा ख्रिश्चन धर्मियांच्या संस्था संघटना असतील, तर त्यांचा उल्लेख जातीयवादी किंवा धर्मांध शक्ती असा होताना दिसणार नाही. अगदी त्यांच्या नावात धर्माचा उल्लेख असला किंवा धर्माचा विषय आल्यावर अशा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला; तरी त्यांना कोणी धर्मांध शक्ती असे म्हणताना दिसणार नाही. कुठल्याही वृत्तपत्रात त्यांचा जातियवादी असा उल्लेख होणार नाही. हा पक्षपात नाही काय? उदाहरणार्थ मुस्लिम लीग नावाचा पक्ष आहे. त्याची राजकीय भूमिका कायम आक्रमक असते. पण त्या पक्षाला कोणा वाहिनीने वा वृत्तपत्राने जातीयवादी म्हटल्याचे तुम्ही ऐकले आहे काय? त्याच्या खेरीज जमाते इस्लामी किंवा इत्तेहाद अशा अनेक मुस्लिम राजकीय पक्ष संघटना आहेत. पण त्यांना कोणीच जातीयवादी धर्मांध म्हणत नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करायला कुठल्याही सेक्युलर पक्षाला अडचण येत नाही. हे आजच्या सेक्युलर पक्षांचे वा सेक्युलर विचारसरणीचे निकष बनले आहेत. हिंदूंच्या अन्याय वा हितासंबंधी बोलले, तर तो जातीयवाद असतो. पण मुस्लिमांच्या कुठल्याही धार्मिक आक्रमकतेला धर्मांध म्हटले जाणार नाही. किंबहूना तसे म्हटले तर लगेच तुमच्या सेक्युलर असण्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाते. हा काय प्रकार आहे? ह्याला सेक्युलॅरिझम म्हणतात काय?

   आता अगदी ताजे उदाहरण आपण घेऊ. कालपरवा ज्या रझा अकादमीच्या मोर्च्याने आझाद मैदानाच्या परिसरात धुडगुस घातला, त्यात पोलिसांवर, पत्रकारांवर हल्ला झाला. गाड्या पेटवण्यात व जाळण्यात आल्या. महिलांची अब्रू लुटली गेली. आणि हे सर्व त्या संस्थेने संघटनेने इस्लाम धर्माचे अभिमानी म्हणूनच केले. ज्याची कुठल्याही सच्चा भारतीय मुस्लिमालाही लाजच वाटली आहे. ‘पुण्यनगरी’च्या सोलापुरमधील एक वाचकाची ही बोलकी प्रतिक्रियाच त्याची साक्ष आहे मला पाठवलेल्या एसएमएसमध्ये तो काय म्हणतो बघा-

"भाऊ तोरसेकर तुम्ही लिहिलेला आजच्या लेखामध्ये जे दोन्ही फ़ोटो दाखवले त्यातील दोघांना फ़ाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, पण आपले सरकार असे करणार नाही. म्हणूनच आज काही समाजकंटक आसे कृत्य करतात. मी एक मुसलमान आहे, पण त्याच्या अगोदर एक भारतीय आहे." -ईमाम नदाफ़ सोलापूर

तो एकटाच नाही. गेल्या तीन दिवसात मला अशा सोळा सतरा मुस्लिम वाचकांचे फ़ोन आले. त्यांनाही झाले त्याची लाजच वाटली व संताप आला आहे ना? मग त्याच्याएवढा आपल्या सेक्युलर माध्यमे व राजकारण्यांना का राग येऊ नये? इतके होऊनही कोणी रझा अकादमी या संस्थेचा उल्लेख जातियवादी, धर्मांध असा केला का? का नाही केला? याला सेक्युलर विचारसरणी म्हणतात का? ज्या संघटनेच्या मोर्चात इतका भयंकर धुडगुस घालण्यात आला व राष्ट्रद्रोही कृत्ये करण्यात आली; त्यांना सेक्युलर माध्यमे वा विचारवंत हिंसक जातीयवादी वा धर्मांध म्हणणार नसतील, तर त्यांच्या सेक्युलर भूमिकेचा अर्थ काय घ्यायचा? शिवाय ही रझा अकादमी कोण आहे? जिच्या सहा वर्षापुर्वीच्या अशाच मेळाव्यात दोन पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यांच्याबद्दल बोलताना लिहिताना आपल्या सेक्युलर माध्यमे जातीयवादी असा उल्लेख का करत नाहीत? पण तीच माध्यमे हिंदू परिषद किंवा बजरंग दल यांचा उल्लेख अगत्याने कट्टर हिंदूत्ववादी, जातीयवादी संघटना असा मात्र करतात. ही तफ़ावत कशाला होते? याचा अर्थच हिंदूंची संघटना असली तर ती जातियवादी धर्मांध म्हणावी आणि इतर धर्मियांच्या असतील तर त्यांना तसे समजू नये; अशी कायद्याने वा राज्यघटनेने केलेली व्याख्या आहे काय? नसेल तर हा भेदभाव कशासाठी?

   आता आणखी एक गोष्ट बघा. ज्या रझा अकादमीने २००६ सालात दोन पोलिसांचे भिवंडीत हत्याकांड केले होते; तीच परवाच्या मोर्चाची आयोजक होती. त्याच संस्थेच्या कार्यालयात पाच दिवस आधी गृहमंत्री आर. आर. आबा पाटिल जाऊन आलेले होते. त्या संघटनेचे प्रमुख मोईन नावाचे गृहस्थ आहेत. त्यांच्यासह आबांचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. तिथे जाऊन आल्यानंतर पुढील घटना घडली. त्याबद्दल मी आता आरोप करणार नाही. तसा आओप भाजपाने केला आहे. पण माझा आक्षेप वेगळाच आहे. त्या संस्थेच्या कार्यालयात जाण्य़ापुर्वी आबांना भिवंडीत शहिद झालेल्या आपल्या जगताप व गांगुर्डे अशा दोन पोलिस शिपायांची तरी आठवण यायला हवी होती. कारण जेव्हा त्या दोघांची हत्या झाली व त्यांना जाळण्य़ात आले. तेव्हाही आबाच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. बाकी कुठल्या नाही तरी आपल्याच दोघा शिपायांच्या जीवावर उठलेल्यांचा पाहुणचार घेऊ नये; एवढी आबांकडून अपेक्षा करायची नाही काय? की आपल्याच महिलांची अब्रू घेणारे, आपल्याच शिपायांची हत्या करणारे असतील, त्यांचे सत्कार घेण्याला आबा पाटिल व आजचे पत्रकार सेक्युलॅरिझम म्हणतात? कारण असा जाब कोणीही आबांना विचारलेला नाही. त्यावर आबांनी असे भाजपावाल्यांचेही फ़ोटो आपणही देऊ शकतो असे म्हटले आहे. सवाल पक्ष वा नेत्यांचा नसून गृहमंत्रीपदाचा आहे. जेव्हा गृहमंत्री अशा मारकेर्‍यांचे सत्कार घेतो, तेव्हा खाली पोलिस दलाकडे कोणता संदेश जात असतो?

   एका बातमीनुसार दोनच दिवस आधी बांद्रा येथील एका महिलेने असा हिंसाचाराचे कारस्थान शिजत असल्याची माहिती पोलिस व सरकारकडे पत्र लिहून कळवली होती. पण तिची दखलही घेतली गेली नाही. का दखल घेतली गेली नाही? तशी सूचना देण्याच्या तीन दिवस आधी गृहमंत्री रझा अकादमीच्या कार्यालयात सत्कार घ्यायला गेल्यावर पोलिसांना तिकडे जायची भिती वाटली असेल ना? त्या पोलिसांनी आधीच सुचना मिळाली तरी दंगा माजवणार्‍यांचा शोध घेतला नाही. त्याबद्दल मिळालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले. मग प्रत्यक्ष धिंगाणा घातला गेला आणि जाळपोळ व महिलांचे अब्रू घेतली गेली, तरी पोलिस आयुक्त गप्प बसले. कारण तोच सेक्युलॅरिझम आहे व असतो. जेव्हा गृहमंत्री रझा अकादमीच्या कार्यालयात जातो तेव्हा त्या संस्थेकडून होणारी हिंसा व दंगल जा्ळपोळही सेक्युलर होऊन जाते आणि तिच्यावर हात उचालण्याची हिंमत पोलिस गमावून बसत असतात. म्हणूनच जे कोणी पोलिस कारवाई करायला पुढे सरसावले त्यांना शिव्या हासडून अरुप पटनाईक यांनी गुंडांना मोकाट दंगा करू दिला. जे काही घडले त्यालाच सेक्युलॅरिझम म्हणतात. म्हणून कोणी माध्यम किंवा पत्रकार वा विचारवंतही माध्यमांच्या गाड्या जाळल्या तरी त्याबद्दल एका शब्दानेही रझा अकादमीचा निषेध करायला पुढे आलेला नाही. मग यांच्या सेक्युलर विचारांचा अर्थ कसा लावायचा? सेक्युलर म्हणजे मुस्लिमांचे हित नव्हे, मुस्लिमांचा न्यायही नव्हे; तर मुस्लिम गुंडांचा हैदोस म्हणजे सेक्युलॅरिझम, अशी आजची स्थिती झाली आहे. मात्र त्यात सामान्य नागरिकाप्रमाणेच सामान्य मुस्लिमही भरडला जातो आहे. कारण सेक्युलर म्हणून जे काही थोतांड आहे, त्याने मुस्लिम गुंडगिरीला मोकाट रान दिले असून आमच्या ईमाम नदाफ़सारखे सामान्य मुस्लिम त्याचे बळी होत आहेत. यात सामान्य मुस्लिमांचा बळी कसा जातो, असा अनेकांना प्रश्न पडेल. त्याचे उत्तर उद्या शोधूया.      ( क्रमश:)
भाग  ( १२ ) २७/८/१२

सेक्युलर घातपातीच खरे गुन्हेगार


   काही गोष्टी दिसत असतात, कानावर येत असतात. पन आपण त्याची फ़ारशी दखल घेत नाही. आपल्याला असे वाटत असते, की त्या गोष्टी आपल्याशी संबंधीत नाहीत. त्या गोष्टी दुरच्या व आपल्यापर्यंत न येणार्‍या आहेत. पण प्रत्यक्षात तसे काही नसते. त्या गोष्टींशी आपलाही घनिष्ट संबंध असतो. पण त्याची चिंता नको म्हणून आपण त्या झटकून टाकत असतो. त्या दिसणार्‍या सत्यापेक्षा आपल्याला फ़सवे असत्य खुप प्रिय असते. एक साधी बाब आपण अनेकदा ऐकत असतो. तशा बातम्याही सर्वत्र सातत्याने येतच असतात. कुठली तरी वयात येणारी मुलगी प्रेमात पडते आणि घरच्यांची नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटत वगैरे असते. अनेकदा त्याच्याविषयी तिला खुपशी माहिती नसते. पण ‘आवडला’ या एकाच विश्वासावर ती त्याच्या आहारी जाते. तो म्हणेल ते तिच्यासाठी खरे असते आणि त्याच्याबद्दल कोणी भयंकर सत्य जरी समोर आणून ठेवले; तरी त्या प्रेयसीचा त्या सत्यावर विश्वास बसत नाही. पण जेव्हा असे सत्य रौद्ररुप धारण करून तिच्या समोर उभे रहाते; तेव्हा त्यातून बाहेर पडण्याची वेळ टळून गेलेली असते. खुप उशिर झालेला असतो. म्हणजे असे; की तो प्रियकर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रत्यक्षात तिची दिशाभूल करत असतो. जेव्हा ती त्याच्या संपुर्ण आहारी जाते, तेव्हा ती त्याच्यासा्ठी कुठलेही धाडस करायच्या मनस्थितीत असते. तेव्हा तो त्या मुलीला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवतो आणि ही तरूणी घरदार नातीगोती सोडुन त्याच्या मागे आंधळेपणाने जातेसुद्धा. मग तिची मागे फ़िरायची दारे बंद झालेली असतात. काही दिवस असे प्रेमाचे जातात आणि घरच्या भानगडी आटोक्यात आल्या, मग तिच्या घरच्यांनी तिचा नाद सोडून दिलेला असतो. अशावेळी तो प्रियकर तिला कु्ठल्या तरी कु्टणखान्यामध्ये नेऊन विकून टाकतो.

   ही काही नवी चकित करणारी गोष्ट नाही. आजवर अशा शेकडो बातम्या किंवा आसपास घडलेल्या घटना तुम्हाला ऐकुन वा वाचून माहिती असतील. कधी ही मुलगी प्रेमात पडलेली असते किंवा कधी ती कसल्या तरी चांगल्या पगाराच्या नोकरी वा अन्य मोहपाशात सापडून घराबाहेर पडलेली असते. पण ती जाऊन पोहोचते ती कुंटणखान्यात. मग पुढला हिंस्र प्रकार सर्वश्रूत आहे. तिच्यावर गुंडांकडून बलात्कार होतात. तिचे मन मारून टाकले जाते. तिच्या मनातला प्रतिकार निष्क्रीय केला जातो. तिला असे देहविक्रयाच्या धंद्याला लावणार्‍याकडे आपण लोक रागाने बघतो. पण त्य कुंटणखान्याच्या मालकीणीने तिला घरातून पळवून आणलेले नसते. त्यांनी तिला फ़ुस लावून घराबाहेर काढलेले नसते. त्यांनी तिला मोहपाशात अडकवून तिची अशी फ़सगत किंवा दुर्दशा केलेली नसते. खरा गुन्हेगार दुरच रहातो. ज्याने तिला प्रेमाच्या मोहपाशात अडकवून एका गाफ़ील क्षणी तिला वेश्याव्यवसायाच्या जबड्यात आणुन सोडले, तोच खरा गुन्हेगार असतो. आणि म्हणूनच शिक्षा व्हायची असेल तर त्याला व्हायला हवी. पण दुर्दैवाने तसे कधीच होत नाही. नेहमी अशा कुंटणखान्याच्या मालकीणीला किंवा मालकाला पोलिस पकडतात व त्यांच्यावरच खटले भरले जातात. आणि यातला खरा सैतान असतो तो नव्या सावजाला जाळ्यात ओढायला मोकळाच असतो. तो नव्या मुलीला प्रेमाचे रंग दाखवून त्याच नरकात घेऊन जाण्य़ाचे डाव नव्याने खेळत असतो.

   आता तुम्ही म्हणाल यात भाऊंनी काय नवे सांगितले? तर त्यात नवे काहीच नाही. पण जे त्यातले दाहक सत्य आहे, त्याच अनुभवातून एक समाज म्हणून आपण जात आहोत. पण फ़सल्यावर सुद्धा आपण जागे व्हायला तयार नसतो हे त्यातले दुर्दैव आहे. ती फ़सलेली मुलगी निदान त्या नरकात जाऊन पडल्यावर पश्चातापाने शहाणपण शिकते आणि फ़सवणार्‍यावर पुन्हा विश्वास ठेवू नये, अशी तरी काळजी घेते. आपले काय? आपण तर त्याच त्याच फ़सव्या प्रियकराच्या आहारी जात असतो. एकदा चुकला असेल, दुसर्‍यांदा चुकला असेल अशी मनाची समजूत घालत त्याचे गुन्हे पोटात घालत असतो. त्यातूनच आज आपले जीवन कमालीचे असुरक्षित झाले आहे. कोण आहे तो आपला लफ़ंगा प्रियकर?

   कालचा (लेखमालेतला दहावा) लेख वाचून ज्या वाचक प्रतिक्रिया मला फ़ोनवरून मिळाल्या, त्यामुळे मलाही या लफ़ंग्याचा चेहरा दिसलेला आहे. कालच्या लेखात मी मुंबई आझाद मैदानच्या घातपाताचे विश्लेषण केलेले होते. त्याचवे्ळी दोन छायाचित्रे छापलेली होती. ती छायाचित्रे आणि त्याचे केलेले विश्लेषण वाचून बहुतांश वाचक कमालीचा विचलित होऊन गेला. ११ ऑगस्टला जे घडले त्याला दंगल म्हणता येत नाही, तो देशद्रोह होता आणि त्याच्याच समोर सरकार व पोलिसांनी नांगी टाकली होती, हे त्या घटनेतले सत्य आहे. पण तमाम माध्यमे व वाहिन्या-वृत्तपत्रांनी त्यालाच दंगल म्हणून सत्य झाकण्याचे पाप केलेले आहे. गुजरातच्या दंगलीची विदारक छायाचित्रे छापणार्‍या वृत्तपत्रे व वाहिन्यांनी अमर जवान स्मारकाची मोडतोड व विटंबना लपवण्याचा केलेला प्रयत्न लांच्छ्नास्पद असाच आहे. त्यातून त्यांनी काय केले? सामान्य भारतीयांना गाफ़ील ठेवण्य़ाचा प्रयत्न केलेला नाही काय? जो प्रकार घडला तो कुठल्या धर्माच्या अनुयायांवर नव्हे, कुठल्या समाज घटकावर नव्हे; तर भारतीय राष्ट्रीय सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता. ते सांगितले तर सामान्य देशप्रेमी भारतीय जनता संतप्त होईल, याची माध्यमांना भिती का वाटावी? मला ज्यांचे फ़ोन आले त्यात सात फ़ोन मुस्लिमांचेही होते. म्हणजेच झाल्या प्रकाराने मुस्लिमही चिडलेले आहेत. आपल्या देशाच्या स्वाभिमानाची ही विटंबना त्यांनाही आवडलेली नाही. मग अशी भावना राष्ट्राची ताकद वाढवते की देशाला खिळखिळा करते? लोकांमध्ये राष्ट्रभावना पेटवली जाईल, याची माध्यमांना भिती का वाटावी? त्यांनी राष्ट्रीय स्मारकाच्या विटंबना व मोडतोडीची छायाचित्रे उपलब्ध असूनही सामान्य वाचकांपासून का लपवावित? देशप्रेम जागले तर त्यापासून आपल्याच देशाला धोका आहे, असे या माध्यमांना वाटते काय? त्यातून त्यांना मुस्लिमांना बदनाम करायचे आहे काय? सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना पाठीशी घालून राष्ट्रप्रेमी मुस्लिमांचा आवाज दडपणे असते काय? नसेल तर अशा गोष्टी का लपवल्या जातात? हा सगळा प्रकार त्या फ़सवणार्‍या प्रियकरासारखाच नाही काय?

   आजवर नेहमी असेच होत आलेले आहे. श्रीनगर वा काश्मिर हा भारताचा अविभाज्य प्रांत असेल तर तिथे तिरंगा फ़डकवण्याच्या प्रत्येक मोहिमेची सेक्युलर माध्यमे का ट्वाळी करतात? त्यात हिंदूत्व का शोधले जाते? आता इथे मुंबईत राष्ट्रीय स्मारक विटंबले जाते तर माध्यमे ते सत्य वाचकापासून का लपवतात? त्यात जो कोणी गुंतला आहे, तो मुस्लिम आहे म्हणुन लपवणे म्हणजे एकप्रकारे तमाम भारतीय मुस्लिमांना अकारण बदनाम करणे आहे. शंभरातला एकसुद्धा मुस्लिम असा नसेल. पण जेव्हा अशा देशद्रोही मुस्लिम गुंडांची सेक्युलर पाठराखण होते; तेव्हा सर्वच मुस्लिमांकडे संशयाने बघितले जात असते. जो विषय हिंदू मुस्लिम असा नसताना त्याला धर्माचे रंग माध्यमेच देत असतील, तर कसे व्हायचे? जे गुंड आहेत ते गुंड, ज्यांनी देशद्रोह केला तो देशद्रोह. त्याकडे बोट दाखवताना धर्म बघण्याचे वा दाखवण्याचे कारण नाही. पण सेक्युलर माध्यमे किंवा राजकारण्यांकडुन तेच होत असते. त्यातून मग सामान्य माणसाची फ़सगत होत असते. खरे सांगायचे तर अधिक व रंगीत पानांच्या चमचमणार्‍या देखाव्याच्या प्रेमात पडलेल्या वाचकाने ही फ़सवणूक ओढवून आणली आहे. कमी किंमतीत अधिक भरपुर पाने आणि तीही रंगीत मिळतात, म्हणुन वाचक खोटारडेपणा सहन करायला शिकला आहे. त्यातूनच ही फ़सवणूक शिरजोर झालेली आहे.

   तो प्रियकर जसा त्या प्रेमात पडलेल्या मुलीला शेवटपर्यंत गाफ़ील ठेवतो, तशीचा आजची सेक्युलर माध्यमे आपल्याला, सामान्य माणसाला खर्‍या धोक्यापासून गाफ़ील ठेवत नाहीत काय? जे १९८८ पर्यंत पाकव्याप्त काश्मिरात चालले होते, त्याबद्दल आपल्याला गाफ़ील ठेवले; म्हणुन १९९८ सालात श्रीनगरमध्ये घातपात सुरू झाले. तिथून काश्मिरी पंडीतांना घरदार सोडून पळ काढायची वेळ आली. मग त्यातल्या राष्ट्रवादी मुस्लिमांनाही पळवून लावण्यात आले. तरी आपल्याला इथे गाफ़ील ठेवले जात होते. आता हळुहळू तो सैतान आपल्या घरापर्यंत इथे येऊन पोहोचला आहे. तर हे सत्य माध्यमे आपल्यापासून लपवत आहेत. म्हणुनच मुंबईतल्या या राष्ट्रद्रोहाला धर्माचा रंग चढ्वून सेक्युलर माध्यमांनीच आपली खरी फ़सवणूक केली आहे. ती छायाचीत्रे का लपवली? आपल्याला म्हणजे त्या पोलिस व महिला पोलिसांना विकृत गुंडांच्या तावडीत देण्याचे पाप सेक्युलर मंडळींनी केले आहे. प्रत्येकवेळी सेक्युलर भूमिकेच्या नावाखाली मुस्लिम गुंडागिरीला पाठीशी घालण्याच्या या पापाने, सामान्य मुस्लिमही त्याचे बळी होत आहेत. म्हणुनच मला वाटते, ज्यांनी आझाद मैदानावर धुडगुस घातला ते दुसर्‍या नंबरचे आरोपी आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्याला सत्यापासून वंचित ठेवणारे व गाफ़ीलपणे गुंडांच्या तावडीत सोडुन देणारे सेक्युलर पक्ष, राजकारणी माध्यमे व विचारवंत त्या लफ़ंग्या प्रियकरासारखे एक नंबरचे गुन्हेगार आहेत. गुंड व हैदोस घालणार्‍यांचा बंदोबस्त पोलिस व कायदा यथावकाश करतीलच. पण आपली अशी दुर्गत व दुर्दशा करणार्‍या या सेक्युलर माध्यमांचा बंदोबस्त कोणी करायचा? कसा करायचा? कारण तेच तर आज आपल्यासाठी खरा धोका बनलेले आहेत ना?
( क्रमश:)
भाग  ( ११ ) २६/८/१२

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

या छायाचित्रातला आवेश आणि रोख काय सांगतो?   इथे मी मुद्दाम ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदान परिसरात काय घडले; त्याची दोन सूचक छायाचित्रे दिली आहेत. ती अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत आणि गेले दोन आठवडे ती छायाचित्रे इंटरनेटवर अनेक वेबसाईट वा सोशल नेटवर्कमधून फ़िरत अहेत. त्यातून मोठा संताप भारतीयांच्या मनात उफ़ाळला आहे. म्हणुन मग सरकारी पातळीवर ती छायाचित्रे काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पण ती छायाचित्रे ज्यांनी छापली त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकलेली नाही. कारण कारवाई करायची तर कुठल्या कायद्याच्या आधारे करायची, हा सरकार समोरचा प्रश्न आहे. कारण त्या छायाचित्रात जे दिसते ते घडलेले आहे, को्णी ते नाकारू शकत नाही. बुधवारी पोलिसांनी त्या चित्रात दिसणार्‍या दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजरही केले आहे. आता त्यातून भावना भडकतात म्हणून ती चित्रे काढून टाकायची काय? ती काढून टाकली म्हणजे लोकांच्या भावना शांत होणार आहेत काय? उलट अशी चित्रे काढून टाकली तर त्यासंबंधी अफ़वा अधिक पसरतात व अशा अफ़वांना वजन मिळत असते. त्याचे परिणाम अधिक भीषण असतात. त्यापेक्षा भले लोकांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या तरी बेहत्तर. त्या भावना लोकांना जागवणार्‍या असतात. कारण त्या भावना राष्ट्रप्रेमाच्या असतात. अशा भावनांना सरकारने भिण्याचे कारण काय? शांतता म्हणजे गुंडांनी हैदोस घालणे व कायदेभिरू लोकांनी भयभीत होऊन शांत बसणे नसते. मुळात सरकारने कायद्याच्या राज्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. मगच आझाद मैदान परिसरात धुडगुस घालणार्‍यांची पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत का झाली; ते सरकारच्या लक्षात येऊ शकेल. मगच अशा प्रकारांना पायबंद घालणे शक्य होईल.

   पहिली गोष्ट म्हणजे लोकशाहीत कायदा ही सामान्य लोकांची अर्थात जनतेची अमानत असते. तो कायद्याचा अधिकार लोकांनीच सरकार चालवणार्‍यांकडे सोपवलेला असतो. जसे पालक आपले मुल शाळेत घालतात किंवा आपले मुल कुणाकडे संभाळायला देतात, तेवढीच सरकारची कायदेविषयक जबाबदारी असते. कायदा ही सरकारची मालमत्ता नसते, की विशेष अधिकार नसतो. म्हणुनच जोपर्यंत सामान्य जनता कायद्याचा आदर करते किंवा त्या कायद्याच्या समर्थनार्थ उभी रहाते; तोपर्यंतच कायद्याची हुकूमत चालू शकते. पोलिस हे सरकारचे म्हणजे प्रत्यक्षात कायद्याचेच अंमलदार असतात. त्यांची ताकद गणवेशात किंवा पुस्तकात छापलेल्या कायद्याच्या शब्दात नसते; तर त्यांच्या पाठीशी जनतेच्या ज्या सदिच्छा उभ्या असतात, त्यातच पोलिसांची शक्ती सामावलेली असते. आज त्या सदिच्छा सरकारने गमावल्या आहेत. म्हणूनच आझाद मैदान घटनेत पोलिसांना गुंडानी मारले व महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत मजल मारली आहे. म्हणून तर राज ठाकरे यांचा मोर्चा निघाला, त्याला धमकावणार्‍या पोलिस आयुक्तांना तो मोर्चा निघण्यापुर्वी अडवता आला नाही. कारण ती नैतिक ताकद गृहमंत्री आबा पाटिल असोत, की पोलिस आयुक्त असोत दोघेही गमावून बसले आहेत. म्हणुनच मुठभर गुंड पोलिसांना झोडपुन काढू शकले. हातात हत्यारे असूनही पोलिस काही करू शकले नाहीत. आणि त्यांना फ़ुकाच्या धमक्या देऊन राजचा मोर्चा अडवता आलेला नाही. तो संपल्यावर नोटिसा देण्याला काय अर्थ आहे. त्याला कागदी घोडे नाचवणे म्हणतात.

   मग अशा सरकारने अशी प्रक्षोभक वाटणारी छायाचित्रे बंदी घालून काय साधणार आहे? ती चित्रे इथे मुद्दाम दिली आहेत. ती लोकांच्या भावनांना चिथावणी देण्यासाठी अजिबात नाही. तर त्या दोन्ही चित्रातला आवेश आणि रोख सामान्य लोकांना समजावा म्हणुन दिली आहेत. जे दोन्ही गुंड त्या अमर जवान स्मारकाची मोडतोड करत आहेत किंवा त्याची विटंबना करत आहेत, त्यांच्या अंगात संचारलेला आवेश किंवा जोश आपण स्पष्टपणे बघू शकतो ना? तो आवेश कुठून व कशासाठी आलेला आहे? त्यातून त्या स्मारकाबद्दलचा राग-संताप किंवा तिटकारा बघण्यासाठी कुणाला भिंग घेण्याची गरज आहे काय? या गुंडांना त्या स्मारकाचा इतका तिटकारा कशासाठी आहे? ते स्मारक कुठल्या धर्माचे प्रतिक नाही, की कुठल्या जमातीचे श्रद्धास्थान सुद्धा नाही. ते इस्लामिक भावना दुखावणारे सुद्धा नाही. मग त्यांनी अशा लाथा मारून किंवा आवेशात ते तोडण्याचे कारण काय? कोणी कुठे मंदिर पाडले वा मशीद पाडली; चर्चला आग लावली तर समजू शकते. त्याला धार्मिक उन्माद म्हणता येईल. पण ज्या स्मारकाचा कुठल्याही धार्मिक विषयाशी संबंधच ना्ही त्याची मो्डतोड किंवा विटंबना इतक्या त्वेषाने कशासाठी? ज्या जवानांनी आपल्या मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले, जे देशासाठी शहिद झाले, त्यांच्या स्मरणार्थ उभे केलेले ते स्मारक आहे ना? त्याच्यावर हल्ला कशासाठी? आणि त्यात इतका द्वेषमूलक आवेश कशासाठी? ते नाटक नाही, की हुल्लड नाही. कुठले तरी महान पराक्रमी कृत्य आपण करीत आहोत; असा एकूण अविर्भाव त्या दोघांमध्ये दिसत नाही काय? तो आवेश आपल्याला काय सांगतो आहे? त्या दोघांना अशा कृतीमधून कोणता संदेश द्यायचा आहे? ते काय सुचवू पहात आहेत?

   ते स्मारक देशाचे प्रतिक आहे. ज्या राज्यघटनेने भारताला सार्वभौम राष्ट्र घोषित केले, त्याच सार्वभौम भारताचे ते प्रतिक आहे. जे त्या देश किंवा राष्ट्रासाठी शहिद झाले, त्यांचे स्मारक म्हणजे संपुर्ण देशाचा अभिमान असतो. आणि त्याची पुर्ण जाणीव त्याची मोडतोड करणार्‍यांना आहे. त्यावर लाथा मारल्या आणि त्याची मोडतोड केली, विटंबना केली तर आपण प्रत्येक भारतीयाच्या भावना एका फ़टक्यात पायदळी तुडवतो; हे त्या दोघांना पुर्णपणे कळते आहे. आणि त्याच हेतूने त्यांनी हे कृत्य केलेले आहे. आणि त्याच चिडीतून लोक परवा राज ठाकरे यांच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले. कुठल्याही भारतीयाला संताप येण्यासारखाच तो प्रकार आहे. त्या संतापाला धर्म नव्हता किंवा असू शकत नाही. तसेच तो संताप कुणा धर्माच्याही विरुद्ध नव्हता. ज्यांनी आमच्या भारतीय असण्यावर लाथ मारली, त्यांच्या विरुद्धचा तो संताप होता. आणि जो कोणी असे करू शकतो, तो मुळात भारतीय असूच शकत नाही. भले मग त्याच्याकडे कुठले रेशनकार्ड असो की पासपोर्ट असो, त्याला भारतीय म्हणताच येत नाही. ज्याला आपल्या भारतीय असण्याचा अभिमान नाही, तोच असे कृत्य करू शकतो. ज्याला आपल्या भारतीय असण्याची लाज वाटते, तोच असे कृत्य करू शकतो. आणि म्हणूनच ती छायाचित्रे मी वाचकांना बारकाईने बघण्याचा आग्रह करतो आहे. नुसता राग येऊन चालणार नाही, तर त्यामागची प्रवृत्ती ओळखली पाहिजे. कारण त्या दोघांनी फ़क्त त्या स्मारकला लाथ मारलेली नाही, त्यांनी त्या स्मारकाची नुसती मोडतोड केलेली नाही, तर त्यांनी आपले जे लाखो जवान सीमेवर थंडीवार्‍यात देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणास लावत उभे आहेत, त्यांच्या शौर्यावरच लाथ मारली आहे. या देशाच्या पुरुषार्थावरच लाथ मारली आहे. त्यांनी व त्यांच्यासारख्यांना त्या मैदानावर आणणार्‍यांनी देशाच्या अभिमान, स्वाभिमानालाच लाथ मारली आहे. तुमच्याआमच्या भारतीय असण्यालाच लाथ मारली आहे.

   आजवर त्या घटनेबद्दल खुप काही बोलले गेले आहे, लिहिले गेले आहे. पण कोणी गंभीरपणे हे काय आहे व कशासाठी आहे, त्याचे विवरण केले आहे काय? पोलिस गाड्या जाळणे किंवा वाहिन्यांच्या गाड्यांवरचा हल्ला एकवेळ माफ़ करता येईल. अगदी मंदिर-मशीद फ़ोडण्या पाडण्याचे प्रकारही सोसता येतील. पण अमर जवान स्मारकाची मोडतोड किंवा विटंबना, ही भारतीय अस्मितेला, अस्तित्वाला व पुरूषार्थालाच मारलेली लाथ आहे. ज्यांनी हे पाप केले त्यांना तर आपण फ़ार मोठे पुण्य करीत आहोत, असेच वाटत होते आणि त्यांचा तो आवेश लपत नाही. म्हणुनच तो आवेश किंवा त्यामागची मानसिकता समजून घेण्याची गरज अहे. कारण कालपर्यंत असे प्रकार काश्मिरमध्ये होत आले, आता ते मुंबईपर्यंत येऊन पोहोचले आहेत. स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये तिरंगा जाळला अशा बातम्या आपल्याला नव्या नाहीत. आता ते तुमच्याआमच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. आणि त्याचा सज्जड पुरावा त्या दोघांनी त्या छायाचित्रातून दिलेला आहे. कश्मिरचे हुर्रियतवाले त्यापेक्षा वेगळे काय म्हणतात? त्यांनाही आपण भारतीय नाही, असे सांगण्यात व दाखवण्यात अभिमानच वाटतो. या दोघांचे कृत्य कुठला वेगळा साक्षात्कार आहे काय? काश्मिर सोडाच आम्हाला मुंबईतही भारत नावाचे राष्ट्र मान्य नाही, असेच ते दोघे सांगत नाहीत काय? ( क्रमश:)
  भाग  ( १० ) २५/८/१२

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

आपली अवस्था रिदा शेखसारखी झाली आहे


आपली अवस्था रिदा शेखसारखी झाली आहे

   काही गोष्टी जरा शांत डोक्याने समजून घेण्याची गरज असते. तुम्ही संगणकाशी संबंधित काही करत असाल, तर त्यातली एक स्वतंत्र भाषा असते. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काही करत असाल तर त्यातली वेगळी भाषा असते. सरकारी आणि साहित्यिक भाषा वेगळी असते. अशा भाषेत इकडचे शब्द तिथेही येतात. पण त्यांचे अर्थ संदर्भाने बदलत असतात. सहाजिकच ते संदर्भ बाजूला ठेवून तुम्ही तिथे वापरलेल्या शब्दांचे कोषातले अर्थ लावून बघितले; तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. माझाच एक अनुभव सांगतो. आज ऐशी वर्षाच्या घरात असलेल्या एक आजींना एक प्रश्न दिर्घकाळ सतावत होता. तशा त्या खुप शिकलेल्या अगदी एमएपर्यंत. शाळेत शिक्षिका म्हणुनही काम केलेले. पण त्यांच्या निवृत्तीनंतर आपल्या देशात संगणक आले. नातवंडे खुप शिकली आणि आता घराघरात संगणक आलेत. त्या आजीच्याही घरात संगणक गुण्यागोविंदाने नांदतो आहे. मात्र नातवंडे त्याबद्दल बोलतात; तेव्हा त्या आजींची मोठी तारांबळ उडते. फ़ाईल्स आल्या, फ़ाईल्स पाठवल्या किंवा मेल केली, मेल पोहोचली; असे मुले बोलतात त्याचे त्यांना खुप नवल वाटते. कारण त्यांच्या लेखी फ़ाईल म्हणजे जाड कागदाचा फ़ोल्डर असतो. तसे काही दिसत नाही. मग ही मुले फ़ाईल कशी उघडतात व बंद करतात किंवा कुणाला कशी पाठवतात, त्याचे आजींना आश्चर्य वाटत रहाते. नातवंडे घरात नसताना एके दिवशी त्यांनी मला हा सवाल केला. मी त्यांना खुप समजावले. पण त्यांच्या काही लक्षात येत नव्हते. इवल्या संगणकात शेकडो हजारो फ़ाईल्स कशा रहातात, ते त्यांना काही केल्या समजून घेता येत नव्हते. असे फ़क्त त्याच आजींचे नाही. अगदी अनेक शहाण्या व बुद्धीमान लोकांचेही होत असते. त्यांचे जे संदर्भ असतात, त्याच्या पलिकडचे संदर्भ त्यांना समजूनच घ्यायचे नसतात, मग त्यांना नवे विषय किंवा शब्दांचे बदललेले अर्थ लागत नाहीत व त्यांचा गोंधळ उडत असतो. मग असा शब्द बातमीतला असो किंवा ऐकलेल्या भाषणातला असो.

‘पांडगो इलो रे बा इलो’ या नावाचे मच्छिंद्र कांबळीने गाजवलेले प्र. ल. मयेकर यांचे एक अत्यंत विनोदी नाटक आहे. त्यात सुन सासर्‍य़ाला (मच्छिंद्र) चहा आणून देते. चहा पिवून झाल्यावर सासरा तिला कप घेऊन जायला सांगत असतो. पण तिचे लक्ष नसते. तेव्हा सासरा तिला गो, गो अशी हाक मारतो. पण ती लक्ष न देताच निघून जाते. तर वैषम्याने सासरा म्हणतो ‘इंग्रजीत ऐकलान वाटता.’ म्हणजे काय? मालवणीत गो म्हणजे अग आणि इंग्रजीत गो म्हणजे जा. तसेच काहीसे आझाद मैदान परिसरातील दंगलीचे झाले आहे. कोणी त्याला हिंसाचार म्हणतो आहे, कोणी त्याला दंगल म्हणतो आहे, कोणी त्याला धार्मिक नाव देतो, आहे तर कोणी त्याकडे राजकीय गुंडागिरी म्हणुन बघतो आहे. पण यातला कोणी त्या घटनेचे वास्तविक रूप बघायलाच तयार नाही. तिथे ज्यांनी धुडगुस घातला किंवा हिंसक वर्तन केले, त्यांचा त्यामागचा हेतू व संदर्भ सोडून त्याकडे बघितले, मग अर्थाचा अनर्थ होणारच. समोर जे दिसत असते ते डोळ्यांना सत्य सांगतेच असे नाही. अनेकदा आपण जे बघत असतो आणि त्याच्या जोडीला जे शब्द आपल्या कानावर पडत असतात, त्यातून सत्याला बगल देणारी भलतीच समजूत आपल्या मनात तयार होत असते आणि आपण तिलाच सत्य समजून बसत असतो. आझाद मैदान परिसरात ११ ऑगस्ट रोजी झाले ती दंगल होती आणि फ़ारतर धर्मांध मुस्लिमांनी केलेली दंगल होती; असेच आपल्या डोक्यात घालण्यात आजची माध्यमे यशस्वी झाली आहेत. पण ती नुसतीच दंगल होती का? तिचे स्वरूप दंगलीसारखे असले तरी त्यामागे जो हेतू असतो त्याप्रमाणे अर्थ बदलत असतो.

   दंगली आजवर अनेक झाल्या आहेत. पण कधीच कुठल्या दंगलीत कुठे पोलिसांवर हात टाकला गेलेला नाही. पोलिसांच्या गाड्या पेटवणे, पोलिसांच्या बंदूका पळवणे असे घडलेले नाही. असे काश्मिरात जिहादी कारवाया म्हणुन होत असते. असे नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या विरोधात होत असते. त्याला कोणी कधी दंगल म्हटले आहे का? असे घडते तेव्हा त्याला घातपात किंवा सरकारविरुद्ध होणारे बंड, देशद्रोह वा शासनाला दिलेले आव्हान म्हणतात ना? मग तसेच परवा आझाद मैदान परिसरात झाले; त्याला दंगल कसे म्हणता येईल? ती दंगल नव्हती तर पोलिस म्हणजेच शासकीय सत्तेला, घटनात्मक सत्तेला दिलेले आव्हान होते. आणि कशाला असे आव्हान द्यायचे? ज्या कारणास्तव हा मोर्चा मेळावा आयोजित केला होता, त्याची कारणे मुंबईत किंवा महाराष्ट्रातली नाहीत. तर मग मुंबई पोलिसांवर असा हिंसक हल्ला करायचे कारणच काय होते? त्यातून हे हल्लेखोर काय सिद्ध करू पहात होते? त्यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माचा कुठे संबंध होता? त्या दंगलीत मुस्लिमच सहभागी झाले किंवा आयोजक मुस्लिम संघटना होती; म्हणुन त्याला मुस्लिम धर्माचा रंग द्यायचा काय? जे कोणी गेले दोन आठ्वडे या घटनेच वर्णन किंवा मिमांसा करू बघत आहेत, त्यांची शब्दांनी मोठीच तारांबळ उडवली आहे. कुठले शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात आहेत आणि त्यांचा अर्थ काय होतो, त्याचाच थांगपत्ता मिमांसा किंवा विश्लेषण करणार्‍यांना लागलेला नाही. आणि असे लोक जेव्हा आपल्याला सर्व काही समजले म्हणुन निदान करू लागतात तेव्हा ते अधिकच गोंधळ माजवत असतात. म्हणूनच मिमांसा करणार्‍यांपासून त्यातले राजकीय अर्थ शोधणार्‍यांपर्यंत; सर्वांचाच पुरता गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण आपापला शब्दकोष घेऊन त्यानुसार त्याचे अर्थ शोधतो आहे आणि तोच वास्तव अर्थ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे हत्ती आणि चार आंधळे अशी जी गोष्ट आहे, त्याप्रमाणे प्रत्येकजण भलताच अर्थ लावताना दिसतो आहे.


   पहिली गोष्ट म्हणजे अशी घटना घडते; तेव्हा आपल्या समजूती आणि आपले आग्रह, पुर्वग्रह बाजूला ठेवून त्याही छाननी करण्याचै गरज असते. अन्यथा रिदा शेखसारखी अवस्था होऊन जाते. आज कोणाला रिदा शेख कोण ते नुसते नावावरून आठवणार सुद्धा नाही. अशी आपली दांडगी स्मृती आहे. आठवते रिदा शेख कुणाला? अवघ्या तीन वर्षात आपण तिचे नाव सुद्धा विसरून गेलो की नाही? तीन वर्षापुर्वी तिचे नाव देशाच्या प्रत्येक माध्यमात गाजत होते. कारण तेव्हा देशभर स्वाईनफ़्लू नामक नव्याच साथीच्या रोगाने सर्वांना भयभीत केलेले होते. रिदा शेख ही त्याचा भारतातला पहिला अळी ठरली होती. मात्र तिचा जीव स्वाईनफ़्लूच्या विषाणूंनी घेतला असला, तरी तिचा बळी मात्र समजूतीने घेतला होता. कारण तिला झाला होता स्वाईनफ़्लू आणि तिच्यावर अद्ययावत इस्पितळामध्ये न्युमोनियाचे उपचार चालू होते. म्हणजेच रिदा उपचाराअभावी मृत्यू पावली नव्हती, तर चुकीच्या उपचारांनी तिला मारले होते. अगदी जे उपचार चालु होते, त्याचा तिच्यावर कुठलाही परिणाम होत नाही हे दिसत असूनही; डॉक्टरमंडळी आपले उपचार बदलायला तयार नव्हती, की वेगळा विचार करायला तयार नव्हती. त्या समजूतीने किंवा वैद्यकीय अज्ञानी अंधश्रद्धेनेच रिदा शेखचा बळी घेतला होता. कारण तिला झाला होता स्वाईनफ़्लू आणि डॉक्टर मात्र तिच्यावर बिनदिक्कत न्युमोनियाचे उपचार करत राहिले होते. त्यामुळे नसलेला न्युमोनिया बरा होण्याचा प्रश्नच नव्हता. आणि स्वाईनफ़्लू तिला झाला होता, त्यावर उपचार होत नसल्याने त्याचा प्रभाव व अपाय वाढतच चालला होता. अखेर त्याच्यासमोर रिदाने शरणागती पत्करली आणि तिचा बळी गेला. देशातला पहिला स्वाईनफ़्लूचा बळी असा वैज्ञानिक वैद्यकीय अंधश्रद्धेने आणि बौद्धीक अडाणी हटवादाने घेतला होता.

   आपल्या देशाची आणि समाजाच्या सुरक्षेची अवस्था सध्या अगदी त्या रिदा शेखसारखीच दयनिय झालेली आहे. कारण मुंबईत असो, की काश्मिर वा आसाममध्ये असो; चालू आहे तो देशद्रोह किंवा देशविघातक कारवाया आणि त्यालाच सेक्युलर विचार म्हणून खतपाणी घातले जात आहे. देशद्रोह किंवा घातपातालाच दंगल म्हटले, की देशद्रोहावर उपाय योजले जात नाहीत आणि दंगल म्हणुन उपाय योजून परिणाम साधता येत नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांनी देशाच्या विरोधात युद्ध पुकारल्याची घोषणाच आपल्या कृतीमधून केली आहे आणि आमचे सरकार व कायदा यंत्रणा मात्र त्याला दंगलीचा सामान्य गुन्हा म्हणून हाताळते आहे. मग हा देश सुरक्षित रहायचा कसा? एका जमावाने धुडगुस घातला तर त्याला दंगल म्हणतात हे सत्य आहे. पण ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात घडलेले प्रकार काय होते? हल्ल्याची चित्रे व त्यातला रोख व आवेश काय सांगतात? ते उद्या वाचू.    ( क्रमश:)
 भाग  ( ९ ) २४/८/१२

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

मुंबईचा गोध्रा-गुजरात करायचा होता का?


 गेल्या ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात जे काही घडले आणि ज्या वेगाने व पद्धतीने घडले; तेव्हा अशा विषयातले एकूण एक जाणकार गोध्रा नामक एक रेल्वे स्थानक आपल्या देशात आहे, हे कसे विसरून गेले? देशात शेकडो नव्हेतर हजारो रेल्वे स्थानके आहेत. पण त्यात जेवढा बातम्यांमधून माध्यमांमधून गोध्रा रेल्वे स्थानकाचा उल्लेख झाला आहे, तेवढा क्वचितच अन्य कुठल्या स्थानकाचा उल्लेख आलेला असेल. कारण याच गोध्रा स्थानकाने एकविसाव्या शतकातली पहिली ऐतिहासिक घटना घडवली होती. तिला आता साडे दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. २७ फ़ेब्रुवारी २००२ रोजी दुपारच्या सुमारास ती घटना घडली होती. इथे मुद्दाम काय घडले त्याचे छायाचित्र दिले आहे. त्यात एक रेल्वेचा डबा आगीत भस्मसात होताना दिसतो आहे. ती ऐतिहासिक घटना नाही. तर त्या जळीताने पुढल्या ऐतिहासिक घटनाक्रमाला चालना दिली होती. आज दहा वर्षे उलटू्न गेली तरी कोणी तो घटनाक्रम विसरायला तयार नाही. कुठेही दंगल किंवा हिंदू-मुस्लिम विषय निघाला; मग स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारी मंडळी तिथूनच श्रीगणेशा करत असतात. कारण असो वा नसो, त्या गोध्रा जळीतकांडाच्या उल्लेखाशिवाय सेक्युलर विचारवंत पुढले पाऊलच टाकू शकत नाहीत. मात्र त्यातल्या कुणालाच तत्पुर्वीच्या गोध्रा जळीताबद्दल बोलायची गरज वाटत नाही. काय झाले होते २७ फ़ेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकात?

   तेव्हा अयोध्येमध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गुजरातमधून तिकडे गेलेल्या कारसेवकांचा परतीचा प्रवास सुरू होता. त्यातले काहीजण त्या दिवशी साबरमती एक्सप्रेस गाडीने अहमदाबादला परत येत होते. त्यातले बहुतांश एकाच डब्यात बसलेले होते. ती गाडी गोध्रा स्थानकात आल्यानंतर तिथे म्हणे प्रवासी व स्थानकावरील विक्रेत्यांची बाचाबाची झाली. त्याचे अनेक बिनपुराव्याचे किस्से माध्यमातून झळकलेले आहेत. मग तिथून साबरमती गाडी सु्टली आणि किलोमिटरभर अंतरावर पुन्हा थांबली. काय होते आहे ते कळण्यापुर्वीच त्या गाडीच्या एका डब्यावर प्रचंड जमावाने हल्ला चढवला. भितीने प्रवाशांनी डब्याच्या खिडक्या दारे बंद करून घेतली. मग तर तो डबाच ज्वालाग्राही पदार्थ ओतून पेटवून देण्यात आला. मग त्यातून बाहेर पडू बघणार्‍यांना आत ढकलले जात होते. ती वर्णने आलेली आहेत. सर्वपरिचित आहेत. त्यात ५९ प्रवाश्यांचा जळून व होरपळून मृत्यू झाला. गोध्रा स्थानकावर बाचाबाची झाल्याने स्थानिक रहिवाश्यांनी केलेला तो हल्ला होता, असे सांगण्यात आले. तो सगळा घटनाक्रम अवघा तासाभरात पार पडला होता. आणि म्हणुनच तो अत्यंत संशयास्पद होता.

   गोध्रा स्थानकात प्रवासी किंवा कारसेवक आणि फ़ेरीवाले यांच्यात बाचाबाची झाली हे खरे मानले; तरी त्यानंतर त्या फ़ेरीवाले किंवा त्यांच्या सहकार्‍यांनी जो प्राणघातक खुनी हल्ला रेल्वेच्या डब्यावर चढवला, त्याचे कुठलेही तार्किक उत्तर मिळत नाही. इतक्या कमी वेळात त्या चिडलेल्या फ़ेरीवाल्यांनी आपल्या साथिदार दोस्तांना ते कळवणे, जमवणे आणि त्या प्रचंड जमावाने सुटलेली गाडी रुळावरच अडवून पेटवून देणे अशक्य गोष्ट आहे. कारण तिथे गाडी अडवणे शक्य आहे आणि अगदी मशीदीतून आवाहन केल्यावर इतका मोठा जमाव एकत्र येणेही एकवेळ मान्य करता येईल. पण पोलादी पत्रे व धातूने बनलेला रेल्वे डबा पे्टवून द्यायला, अत्यंत ज्वालाग्राही पदार्थाची गरज असते आणि तो पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायला हवा. तेवढा त्या ज्वालाग्राही पदार्थाचा साठा त्या जमावाने इतक्या अल्पवधीत मिळवला कुठून? त्याचे तार्किक उत्तर सापडत नाही. म्हणजेच त्या हल्ल्याची व आग पेटवण्य़ाची तयारी खुप आधीपासून झाली होती. त्यासाठी निमित्त मिळावे म्हणून मग साबरमती गाडी स्थानकात आल्यावर प्रवाशांशी कुरापत काढून बाचाबाची करण्यात आली. ही कुरापत आहे ते प्रवाशांना ठाऊकही नसेल. पण सर्वकाही योजनेनुसार झाल्यावर स्थानक सोडल्यावर गाडी अडवण्यात आली आणि नेमका कारसेवकांचा डबाच पेटवून देण्यात आला. ही जी तयारी आहे तशीच तयारी परवाच्या आझाद मैदान दंगलीत आढळून येत नाही काय? दोन्ही घटनांमध्ये दहा वर्षाचे अंतर असले तरी त्यातली मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. जेवढ्य़ा अल्पावधीत गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून प्रवाश्यांना जाळण्यात आले आणि एकत्र आलेला जमाव झटपट पांगला; तेवढ्याच वेगाने आझाद मैदानावरील दंगल पेटली आणि संपलीसुद्धा आहे. ह्या दोन्हीतले साम्य निव्वळ योगायोग आहे काय? की इथे मुंबईत गोध्राची पुनरावृत्ती घडवायचा हेतू होता?

   कारण नसताना गोध्रामध्ये ५९ प्रवाशांना आणि त्यातही कारसेवकांना जिवंत जाळण्याची घटना अत्यंत चिड आणणारी होती. तरीही एक दिवस शांततेत गेला. गुजरात सर्द झाला होता. मात्र शवचिकित्सा होऊन त्या जळलेल्या कारसेवकांचे कोळसा झालेले मृतदेह दुसर्‍या दिवशी अहमदाबादला आणले गेले तिथून गडबड सुरू झाली. त्यात मुख्य भूमिका माध्यमे व वाहिन्यांनी पार पाडली. त्यांनी ते कोळसा झालेल्या मृतदेहांचे थेट प्रक्षेपण केले आणि सामान्य माणसाचा धीर सुटला. बघताबघता दंगल सुरू झाली गोध्रा येथे कारसेवकांना जिवंत जाळणारा जमाव मुस्लिमांचा होता आणि त्याचेही चित्रण वाहिन्यांनी दाखवले होते. बातमीतून सांगितले होते. मग त्यातून हिंदूंच्या भावनांचा कडेलोट झाला आणि बघताबघता संपुर्ण गुजरातभर हिंदू मुस्लिम दंगल पेटली. त्यात अर्थातच अधिक मुस्लिम मारले गेले. कुठल्याही देशात असेच होते. जेव्हा दंगल होते तेव्हा जो समाजगट अल्पसंख्य असतो त्याचीच जास्त हानी व नुकसान होत असते. मग त्या भयंकर दंगलीत मुस्लिम अधिक मारले गेले तर नवल नव्हते. पण केवळ मुस्लिमांचीच कत्तल झाली वा करण्यात आली असेच चित्र माध्यमांनी कायम रंगवले. प्रत्यक्षात गुजरातच्या दंगलीत मुस्लिमांच्या तुलनेत निम्मे हिंदूही मारले गेले आहेत. तेव्हा ती दंगल एकतर्फ़ी नव्हती हे स्पष्ट व्हावे. पण तो इथे मुद्दा नाही. मुद्दा आहे तो आझाद मैदानची जाळपोळ आणि गोध्राची जाळपोळ कशी समान व सारखी आहे त्याचा. दोन्हीकडे पुर्वनियोजन व पुर्वतयारीनीशी हल्ले करण्यात आले आणि झटपट ठरल्या वेळेत काम उरकण्यात आले. त्यातली सफ़ाई उघड दिसणारी आहे. दोन्हीकडला हल्ला उत्स्फ़ुर्त नव्हता. तर पुर्वनियोजित होता.

   ज्यांनी ते कारस्थान रचले व पार पाडले त्यांना त्याचे परिणाम देखिल ठाऊक असतात. त्यातून दंगल भडकली तर त्यात अधिकाधिक मुस्लिमच मारले जातील, याची कारस्थान रचणार्‍यांना पुर्ण कल्पना होती; तरीही त्यांनी हा उद्योग केला होता. कारण त्यातून त्यांना हिंदू मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करायची होती. आणि त्यानंतर किंवा त्यापुर्वीही अशाच प्रकारे मुद्दाम दंगली घडवण्याला चिथावणी देण्याचे उद्योग झालेले आहेत. मग मुंबईतले बॉम्बस्फ़ोट असोत किंवा कसाब टोळीने केलेली कत्तल असो. त्यामागचा हेतू स्पष्टच आहे आणि असतो. एक म्हणजे मुस्लिम इतरांशी सहजीवन जगू शकत नाहीत वा इच्छित नाहीत हे सिद्ध करणे. दुसरे त्यातून दोन्ही समाज घटकांमध्ये परस्परांविषयी अविश्वासाची भावना निर्माण करणे. परवा आझाद मैदान येथे जो दंगा घडवण्यात आला त्यामागच हेतूसुद्धा तोच होता. पोलिस व माध्यमांवरील हल्ल्याबरोबर महिला पोलिसांशी करण्यात आलेले वर्तन अत्यंत बोलके आहे. त्यात म्यानमार किंवा आसामच्या विषयावर चीड व्यक्त करण्यापेक्षा दुसर्‍या कुणाच्या भावना दुखावण्य़ाचा हेतू अजिबात लपून रहात नाही. कोणी तरी चिडून उलट हल्ला चढवावा; असाच त्यामागचा हेतू नाही काय? नाही तर अमर जवान ज्योतीची मोडतोड कशाला? त्याची जी छायाचित्रे प्रकाशीत झाली आहेत, ती कुणाही स्वाभिमानी भारतीयाला चीड आणणारी नाहीत काय? ज्यांनी असे कृत्य केले त्यांचा धर्म कुठला त्यापेक्षा त्यांचा देश कुठला असा प्रश्न मनात येतो की नाही? मग ज्यांनी हा उद्योग केला त्यांना मुंबईत गुजरातप्रमाणे सार्वत्रिक दंगे घडवून आणायचे होते, असा आरोप का होत नाही? कोणाला अशी शंका का येत नाही? पुण्यात फ़ुसके बॉम्ब फ़ुटले तर त्यात कुणा संशयिताचे नाव पाटिल आहे म्हणुन त्यात हिंदू दहशतवाद शोधू बघणार्‍यांना आता आझाद मैदानच्या दंगलीनंतर त्यातली जिहादी मानसिकता कशी दिसत नाही?      ( क्रमश:)
 भाग  ( ८ ) २३/८/१२


मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

११ जुलै २००६ ची सैतानी संध्याकाळ


   ज्याप्रकारे ५ जुलै २००६ पासून भिवंडी ते मुंबई गोधळ घातला गेला होता, तो कुठल्या निषेध वा प्रक्षोभासाठी होता, की पोलिसांना त्यांच्या कामापासून तोडण्यासाठी केलेला डाव होता? ५ जुलै ते ९ जुलै अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली, की मुंबई महानगर प्रदेश ज्याला म्हणतात, त्या संपुर्ण भागामध्ये अराजकाची स्थिती पद्धतशीर निर्माण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना त्यांचे नेहमीचे काम व्यवस्थित पार पाडता येणार नव्हते. बराच फ़ौजफ़ाटा भिवंडीत तैनात करण्यात आलेला होता आणि उरलसुरला शिवसेनेच्या शाखांभोवती उभा करण्यात आला होता. मग नेहमीच्या गस्ती, खबर काढणे, पहारे देणे किंवा संशयितांवर पाळत ठेवणे; अशा गोष्टी पोलिस करूच शकत नव्हते. मग अशा परिस्थितीचा कोणाला लाभ घेता येतो? की ज्यांना त्याचाच लाभ उठवायचा होता त्यांच्यासाठी अशी स्थिती मुद्दाम निर्माण करण्यात आली होती? कारण त्या स्थितीचा अत्यंत भयंकर फ़ायदा घेतला गेला. मुंबईत मीनाताई यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या ३६ तासात मुंबई हादरून गेली. कारण ३६ तास उलटले तेव्हा ११ जुलै २००६ चा सुर्य मावळत होता. तेव्हा कामाधंद्याला सकाळी घराबाहेर पडलेला मुंबईकर दाटीवाटीने आपापल्या घरी परतू लागला होता. त्यसाठी त्याची पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये झुंबड उडालेली होती. आणि नेमक्या त्याच मुहूर्तावर पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या लोकल गाडयांमध्ये बॉम्ब फ़ुटत गेले. काय होते हे कळायच्या आत; म्हणजे अवघ्या तासाभरातच सात बॉम्बचे स्फ़ोट झाले आणि त्यात २०९ मुंबईकरांची आहुती पडली. सातशेहून अधिक लोक जखमी व जायबंदी झाले. आज मुंबईतल्या आझाद मैदानाच्या दंगलीविषयी बोलताना कुणाला तरी त्याचे किंचित स्मरण आहे काय?

   भिवंडीची दंगल आणि तिला आठवडा उलटण्यापुर्वी झालेले हे लागोपाठचे पश्चिम रेल्वेतले ब बॉम्बस्फ़ोट यांची कोणी कधी सलग चौकशी केली आहे काय? त्यांचा परस्पर काहीच संबंध नव्हता काय? तसा संबंध असावा अशी माझी खात्री आहे. म्हणूनच मी दुर अमेरिकेत होतो, तरी मी तशी आशंका व्यक्त करणारा लेख लिहून पाठवला होता. त्यात बॉम्बस्फ़ोट होतील अशी माझी भविष्यवाणी नव्हती. पण काही तरी मो्ठी घटना दोनतीन दिवसात घडावी अशी माझी अटकळ होती. त्याचेही कारण होते. मला भिवंडीपासून मुंबईत शिवाजीपार्कच्या पुतळ्याच्या विटंबनेचे तार्किक कारण सापडत नव्हते. दोन्ही घटना या पुर्णपणे विनाकारण घडवलेल्या होत्या आणि त्यातून निष्कारण मुंबई परिसरातल्या संपुर्ण पोलिस खात्याला गुंतवून ठेवण्यात आलेले होते. जेव्हा पोलिस असे गुंतून पडतात, तेव्हा घातपात्यांना स्फ़ोटके, बॉम्ब कुठूनही कुठेही उजळमाथ्याने घेऊन जाण्याची मुभा मिळत आसते. कारण पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे असत नाही. पोलिसांचे आपल्याकडे लक्षच नाही म्हटल्यावर अशा घातपात्यांना मोकळे रान मिळत असते. ज्यांच्याकडून इतका मोठा धोका नव्हता त्या  शिवसैनिकांमागे पोलिस पाठवून दिले; मग घातपात्यांना मैदान मोकळे होणार ना? की ते मैदान मोकळे व्हावे म्हणुनच आधीची व्युहरचना करण्यात आली होती? म्हणजे आधीच्या किरकोळ घटना मुद्दाम घडवण्यात आल्या होत्या? ज्यांना बॉम्ब ठेवायचे व स्फ़ोट करायचे होते, त्यांचे काम व हालचाली सुकर करण्यासाठी आधीच्या घटना पद्धतशीर रितीने घडवण्यात आल्या नव्हत्या; याचा काही पुरावा आहे काय? नसतील तर ५ जुलै ते ११ जुलै २००६ दरम्यान जे काही घडले त्यांचा एकत्रित तपास व शोध व्हायला पाहिजे. पण ते काम कधीच झाले नाही. भिवंडीची दंगल असो किंवा शिवा्जीपार्कचा पुतळा असो आणि पश्चिम रेल्वेतले स्फ़ोट असो. प्रत्येक घटनेचा वेगवेगळा शोध घेतला गेला. त्याचेच परिणाम मग पुढे दिसून आले, जेव्हा तुम्ही इतके गाफ़ील व बेफ़िकीर असता तेव्हा लपूनछपून जिहादी घातपात्यांना इथे येण्याची गरज उरत नाही. ते सरळ समुद्रमार्गे कराची ते मुंबई येऊन पोहोचले. त्यांनी आणखी चारपाचशे लोकांचे मुंबईत राजरोस मुडदे पाडले. ज्यांना आपण कसाबची टोळी म्हणून ओळखतो.

   हे सर्व घडले कारण कोणीही भिवंडीत गांगुर्डे व जगतापची आहूती का पडली; त्याचा कधीच गांभिर्याने विचारच केला नाही. रझा अकादमी नावाची संस्था नेमके काय सामाजिक कार्य करते; त्याचाही शोध घेतला गेला नाही. अकादमी नावाची कुठली संस्था आजवर अशा गुन्हेगारी व हिंसक कामात गुंतलेली आपण ऐकले आहे काय? नसेल तर सहा वर्षापुर्वीच रझा अकादमीच्या कारभाराची चौकशी व्हायला हवी होती. ज्या संस्थेच्या भिवंडीतील मेळाव्याने दोन निरपराध पोलिसांची कत्तल केली व त्यांना जाळून भस्मसात केले; त्यांच्या बाबतीत सरकारने कोणती माहिती आजवर जमवली आहे? ज्या संस्थेच्या भिवंडीतील रक्तरंजित नाटकानंतर मुंबईत स्मारक विटंबनेचे प्रकार घडतात आणि नंतर लगेच स्फ़ोट मालिका होऊन शेकडो लोकांचे बळी जातात, त्या संस्थेकडे पोलिस वा सरकार संशयाने बघू शकत नसेल; तर त्यांना पोलिसकार्य किंवा तपासकाम म्हणजे काय ते तरी समजते काय असा प्रश्न आहे. त्या्ची तेव्हापासून गंभीर दखल घेतली गेली असती तर आझाद मैदानवर रझा अकादमी निषेध मेळावा घेणार म्हणजे काय; त्याचा स्पष्ट अंदाज येऊ शकला असता. रझा अकादमीचा निषेध मोर्चा म्हणजे हिंसाचार आणि थेट पोलिसांवरच हल्ला, हे समिकरण आधीच पोलिसांना माहित असू शकले असते. कारण पोलिस भिवंडीमुळे त्या अनुभवातून गेलेले होते. मला त्याचेच आश्चर्य वाटते. दहा वर्षे उलटून गेल्यावरही मुंबईच्या सर्वांना गुजरातची दंगल आठवते आहे. पण ज्यात गांगुर्डे व जगताप असे दोन पोलिस मारले व जाळले गेले; ती भिवंडीची दंगल का आठवत नाही? की आठवते पण त्याबद्दल बोलायचेच नाही?

   इथे आपल्या देशातील सेक्युलर थोतांडाची प्रचिती येते. वीस वर्षापुर्वीच्या बाबरी कांडतल्या घटना आठवणीने सांगितल्या जातात आणि दहा वर्षापुर्वीच्या गुजरात दंगलीच्या आठवणी उकरून काढल्या जातात. पण त्याच आठवणी खाजवणारे सेक्युलर विचारवंत विश्लेषक; भिवंडीची दंगल व पोलिसांची झालेली हत्या विसरून जातात. अगदी तीच रझा अकादमी दोन्हीकडे असते आणि दोन्हीकडे थेट पोलिसांवरच हल्ला होतो, तरी कोणाही वृत्तपत्राला वा वाहिनीला भिवंडीची दंगल आठवलेली नाही. गांगुर्डे वा जगताप हकनाक मारले गेल्याचे स्मरण होत नाही. हा सेक्युलर कारभार आहे, की बहुसंख्य हिंदूच्या भावनांशी चाललेला खेळ आहे? की हिंदूच्या भावना दुखावतात असे म्हणायचीही आता आमच्या सेक्युलर माध्यमांनी भितीव वाटू लागली आहे? नसती तर त्यांनी ठामपणे भिवंडीच्या आठ्वणी चा्ळवल्या असत्या. आमच्या माध्यमांना त्यांच्यावरही पोलिसांबरोबरच हल्ला झाला, त्याची खंत नाही, अविष्कार स्वातंत्र्य पायदळी तुडवले गेल्याची फ़िकीर नाही. अमर जवान ज्योती स्मारक उध्वस्त करण्यात आल्याचे वैषम्य वाटलेले नाही. हा कसला सेक्युलॅरिझम आहे? ज्यांना हिंदुत्ववादी पोरांनी चार दगड मारले तर आभाळ कोसळल्याचा भास होतो. पण मुस्लिम गुंडांनी व झुंडीने धुडगुस घातला तर झालेली हिंसाही दिसत नाही. आणि दिसली तरी त्याबद्दल बोलायची भिती वाटते. हे कसले स्वातंत्र्य आहे? हा कसला सेक्युलॅरिझम आहे?

   मालेगावच्या स्फ़ोट प्रकरणात जुने नवे सर्व धागेदोरे शोधण्यात आपली सर्व बुद्धी खर्ची घालणार्‍या आमच्या तमाम सेक्युलर पत्रकार व जाणकारांना भिवंडी, रझा अकादमी व आझाद मैदानाजवळ झालेल्या दंगलीतले धागेदोरे दिसत असतांनाही अशी डोळ्य़ासमोर अंधारी का येते? त्या अंधारीचेच नाव सेक्युलॅरिझम आहे काय? त्या कायबीइन लोकमतवर पाल्हाळ लावणार्‍या निखिल नामक मुर्खाला तर कोणी काय अफ़वा पसरवल्यात, त्याची चिंता लागून राहिली आहे. पण समोर चित्रणात जी हिंसा साध्या डोळ्यांना दिसते, त्या्ची फ़िकीर नाही. संघाच्या कोणा सुनील देवधरच्या अंगावर अफ़वांसाठी ओरडण्यात पुरूषार्थ दाखवणार्‍या निखिलला आझाद मैदान किंवा परिसरात महिलांच्या इज्जतीशी झालेल्या खेळाची वेदना कधी कळली आहे काय? त्याला किंवा तत्सम लोकांना गांगुर्डे व जगताप यांच्या कुटुंबियांचे अश्रू कधी कळले आहेत काय? दिसले आहेत काय? २००६ च्या पश्चिम रेल्वे स्फ़ोटात मेलेल्या २०९ आणि जखमी झालेल्या सातशे लोकांच्या वेदना या सेक्युलर गेंड्यांना कधी कळणार आहेत काय? ज्यांना त्या वेदना व त्यानंतरच्या यातना कळतच नाहीत वा दिसत नाहीत; त्यांच्याकडून कुठल्या दंगली वा हिंसाचाराचे विश्लेषण काय होऊ शकणार? ते तमाशातल्या सवाल जबाबाच्या मनोरंजक जुगलबंद्या रंगवू शकतात. शब्दांचे बुदबुडे उडवू शकतात. विश्लेषण किंवा चिरफ़ाड हे त्यांचे काम नाही. ते घातपात्यांपेक्षा अधिक धोकादायक असतात. कारण असे लोक आपल्याला गाफ़िल ठेवून हल्लेखोरांच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलून देत असतात. भिवंडीचे वेळीच योग्य विश्लेषण झाले नाही, किंवा केले नाही; म्हणुन रेल्वेस्फ़ोटात २०९ निष्पापांचा हकनाक बळी गेला. कारण याच सेक्युलर भामट्यांच्या नादाला लागून सामान्य लोक बेसावध शांततेच्या आहारी गेले आणि मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले.                   ( क्रमश:)
भाग  ( ७ ) २२/८/१२

सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

५ जुलै ते ११ जुलै २००६ दरम्यानच्या घटना


   आता त्याला सहा वर्ष  होऊन गेलीत. ५ जुलै २००६ रोजी भिवंडीत रझा अकादमीच्या पुढाकाराने कबरस्तानच्या प्रश्नावर निषेध मेळावा आयोजित करण्यात अला होता. एका जमीनीवर पोलिस ठाण्याचे बांधकाम चालू होते. म्हणजे आधीपासूनच ते काम सुरू होते. त्याबद्दल तिथल्या मुस्लिमांची तक्रार होती. जिथे बांधकाम चालू होते त्या भूखंडाला लागूनच मशीद आहे आणि म्हणून ती जागा आपलीच आहे, असा मुस्लिमांचा दावा होता. त्यांच्या मते तिथे मुस्लिमांची स्मशानभूमी म्हणजे कबरस्तान आहे. तेव्हा तो वाद मिटवण्यासाठी मुस्लिमांनीच वक्फ़ बोर्डाकडे धाव घेतली. मुस्लिम धर्मदाय मालमत्ता व स्थावरजंगम यांचे निवाडे करणारी ती धर्मदाय आयुक्तांसारखी संस्था आहे. तिथेही मुस्लिमांचा दावा फ़ेटाळला गेला. त्यानंतरच पोलिस ठाण्य़ाच्या उभारणीचे काम सुरू झाले होते. म्हणजे वाद निकालात निघाला होता. पण ज्यांनी निवाडा मागितला होता, त्यांनाच तो मंजूर नव्हता. त्यातूनच वाद पेटला किंवा जाणिवपुर्वक पेटवण्यात आला. ५ जुलै रोजी तिथे नमाजासाठी जमा झालेल्या जमावाने पोलिसांवर जबरदस्त हल्ला चढवला. तेव्हा (आझाद मैदानासारखीच) तणवपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. की तशी परिस्थिती निर्माण केली जाते? मग अधी अश्रूधूर व लाठीमाराचा अवलंब पोलिसांनी केला. पण त्याने जमाव आवरेना तेव्हा गोळीबार करावा लागला. जो आझाद मैदानच्या घटनेत टाळला गेला. पण गंमत बघा, परिणाम नेमका आझाद मैदान सारखाच होता. दोन लोक गोळीबारात ठार झाले. पण अधिक पोलिसच जखमी झाले होते. दोन पोलिस उपायुक्त त्यात जखमी झाले होते. शिवाय ३९ पोलिस कर्मचारी जखमी झाले.

   ही घटना आजची व आझाद मैदानची नाही तर सहा वर्षापुर्वी भिवंडीत घडलेली घटना मी कथन करतो आहे. त्या मेळाव्याचे आयोजन सुद्धा रझा अकादमीनेच केले होते. नंतर ज्या दोन पोलिसांना भोसकून ठार मारण्यात आले त्यांच्या खुन प्रकरणात भिवंडी येथील रझा अकदमीचा अध्यक्ष युसूफ़ रझा हा प्रथम क्रमांकाचा आरोपी होता. तर अकादमीचा सचिव शकील दुसर्‍या क्रमांकाचा आरोपी होता आणि फ़रारी होता. अशी ज्या संस्थेची ख्याती आहे, त्यांना मुंबईत मेळावा भरवायला परवानगी देताना पोलिसांनी सामान्य माणसाच्या नव्हेतर स्वत:च्याच सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी नाकारायला नको होती काय? पण ती परवानगी दिली जाते, म्हणजे पुढल्या संकटालाच आमंत्रण दिले जात नाही काय? ज्यांना आपल्याच भाईबंदांवर सहा वर्षापुर्वी झालेला भीषण हल्ला व त्यांच्या हत्या आठवत नाहीत, त्यांना माणूस म्हणता येत नाही; तर त्यांना पोलिस म्हणता येईल काय? आणि ती दंगल कशासाठी झाली होती? जी जागा व जमीन कबरस्तानची नाही किंवा मशीदीची सुद्धा नाही असे खुद्द वक्फ़ बोर्डाने स्पष्ट केले होते, त्या जमीनीसाठी दंगल माजवून दोन पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हाही आर. आर. आबाच गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांना तरी ते आठवायला हवे होते आणि त्यांनीच पुढाकार घेऊन मुंबई पोइसांनी रझा अकादमीला आझाद मैदान देऊ केले असेल तर ती परवानगी रद्द करायला हवी होती. त्यांनी तसा धा्डसी निर्णय घेतला असता तर हा माणूस शेपटी घालनारा नसून शेपटी पिरगाळणारा आहे असेच लोकांनी म्हटले असते. आबांना स्वत:च्या तोंडाने तसे सांगायची नामुष्की आलीच नसती.

   १९२० सालपासून जी जमीन पोलिस खात्याच्या ताब्यात आहे, तिच्याबद्दल वाद होण्याचे कुठलेही कारण नव्हते. तरीही तो वाद उकरून कढण्यात आला आणि ते काम रझा अकादमीने ठप्प करून दाखवले. त्या वादानंतर तेच टुमणे पुन्हा लावण्य़ात आले. सध्या सर्व विषय बाजूला ठेवुन आधी शांतता प्रस्थापित करा. आणि शांतता आली मग विषय विसरून जा; याला शेपटी पिरगाळणे म्हणत नाही. यालाच शेपटी घालणे म्हणतात. आणि आबा पाटलांनी शेपूट घालूनच दाखवली. कोणाला त्याचा पुरावा हवा असेल तर भिवंडी पोलिस ठाण्याचे ते तस्सेच अर्धवट पडलेले बांधकाम दाखवता येईल. अर्थात त्यानंतर घटनाच अशा घडल्या, की आबांना खुर्चीच खाली करावी लागली. मुद्दा इतकाच, की रझा अकादमी या संस्थेची ख्याती अशी असताना त्यांच्यावर पोलिसांनी किती विश्वास ठेवायचा? भिवंडीची दंगल इतक्या झपाट्याने पेटवण्यात आली आणि झपाट्याने पसरवण्यात आली, की तातडीने आसपासच्या शहरातील व भागातील पोलिसांची कुमक भिवंडीकडे वळवण्यात आली. थोडक्यात आसपासच्या म्हणजे मुंबई परिसरातल्या पोलिसांचे लक्ष स्थानिक बंदोबस्तावरून उडवून देण्यात आले होते. कल्या्ण, ठाणे अशा भागातून पोलिसांची कुमक भिवंडीला पाठवण्यात आली आणि एकू्णच गृहखात्याचे लक्ष मुंबईवरून उडवण्यात आले. ही कथा आहे ६/७ जुलै २००६ मधली. मग एक दिवस शांततेत गेला आणि ९ जुलै २००६ रोजी नवीच धमाल उडाली. भिवंडी पेटली असताना जी मुंबई अगदी शांत होती, तिचा ९ जुलै रोजी भडका उडाला. शिवाजी पार्क मैदानाच्या गेटपाशी स्व. मीनाताई ठाकरे यांचा अर्धपुतळा आहे. त्याला कोणीतरी चिखल फ़ासल्याचे भल्या सकाळी दिसून आले आणि मुंबईभरच्या शिवसैनिकांनी चिडून रस्त्यावर धाव घेतली. मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाहतुक रोखून सत्याग्रह व निषेध सुरू झाला.

   अर्थात हे फ़क्त मीनाताईंच्या पुतळ्यापुरते मर्यादित नव्हते. आणखी कुठल्या तरी मंदिरातील गणेश मुर्तीला शेण फ़ासण्यात आले होते. त्याचाही गवगवा झाला. त्यातून परिस्थिती अधिकच बिघडत गेली. मग भिवंडी संभाळणारे पोलिस सोडून उरलेसुरले पोलिस शिवसैनिकांच्या मागे लागले. बाकीची मुंबई कुठल्याही बंदोबस्ताला पारखी झाली. याचा अर्थच कोणीतरी हे सर्व घडवून आणत होता. एकीकडे भिवंडीत दंगल माजवून ठाण्यातले पोलिस तिकडे गुंतवून ठेवण्यात आले आणि दुसरीकडे शिवसैनिकांच्या भावना भडकावून मुंबईतले पोलिस त्यांच्या मागे गुंतवण्यात आले. याला केवळ योगायोग म्हणता येईल काय? जशी भिवंडीतली घटना कुरापत काढून सुरू करण्यात आली होती तशीच मुंबईतली घटना नाही काय? तिथे नसलेल्या वादातून पोलिसांवर हल्ला चढवून परिस्थिती तंग करण्यात आली. मुंबईत शिवसैनिकांना रस्त्यावर आणायला भाग पाडुन इथले पोलिस गुंतवण्यात कोणाचा काय हेतू असू शकतो? आज त्याची आठवण करून दिली तर त्याने गांभिर्य चटकन लक्षात येणार नाही. पण त्या दिवशी, म्हणजे ९/१० जुलै २००६ मुंबईची काय परिस्थिती होती? मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तातडीने सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलावली आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणायची उपाययोजना आखायला सुरूवात केली होती. केंद्र सरकारने आवश्यक तेवढे अधिक निमलष्करी जवान पाठवण्याचे तात्का्ळ आश्वासन दिले होते. राज्यात मुंबईसह अनेक शहरात ५०० हून अधिक लोकांची त्या चोविस तासात धरपकड झाली होती. म्हणजेच आता मुंबई पेटणा्र असेच सरकारचे गृहीत होते. पण तेवढे काही झाले नाही. कारण असे काही शिवसेनेला करायचेच नव्हते. ज्यांना असे काही करायचे असते ते कधीच उघडपणे मैदानात येत नाहीत. ते लोकांचे व सरकारचे भलतीकडे लक्ष वेधत असतात आणि आपला दुष्ट हेतू साध्य करत असतात. शिवसेनेला दंगल वगैरे करायचे असते तर त्यांनी रस्त्यावर येऊन धमाल केली नसती. भिवंडीतल्या रझा अकादमीच्या निषेधाप्रमाणे थेट पोलिसांवरच हल्ला चढवला असता. लाठीमार, गोळीबराची परिथिती निर्माण केली असती. पण तसे काही झाले नाही, होऊही दिले नाही. मात्र आपला संताप व्यक्त करण्यापुरती सेनेची कारवाई मर्यादीत राहिली.

   सवाल इतकाच उरतो, की भिवंडीतल्या दंग्याला रझा अकादमीला जबाबदार धरता येईल. पण त्याच्याच पाठोपाठ मुंबईत आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात असे काही करून शिवसैनिकांना रस्त्यावर आणण्यात कोणाचा काय हेतू असावा? आजपर्यंत कोणीही त्या गुन्ह्यासाठी पकडला गेलेला नाही. कोणी मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना केली? कोणी अन्य मंदिरातल्या मुर्तींना शेण फ़ासले? या प्रश्नांची उत्तरे आजवर मिळालेली नाहीत. कोणी शोधायचा प्रयत्नही केलेला नाही. आणि तिथेच पोलिसांची व सरकारच्या नालायकीची साक्ष मि्ळते. अशा घटनांचा तपास एवढ्यासाठी करायचा असतो की त्यातून तशा घटना पुन्हा घडू नयेत आणि घडणार असतील तर त्या रोखता याव्यात. पण तेव्हा त्याचा कसून तपास घेतला गेला नाही. आणि भिवंडीतली दंगल एक गुन्हा म्हणून हाताळण्यात आली आणि मुंबईतील या कुरापतखोरीचा शोधच घेतला गेला नाही. म्हणुन मग दोनच दिवसात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले आणि पुढे थेट कत्तल करायला अजमल कसाबच इथे येऊन थडकला. असे काय घडले पुढल्या दोन दिवसात?      ( क्रमश:)
 भाग  ( ६ )     २१/८/१२

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

भिवंडीचे गांगुर्डे आणि जगताप आठवतात कुणाला?


    काही गोष्टी दिसत असतात, पण आपण बघायला तयार नसतो किंवा आपले ‘सरावलेले’ डोळे ते बघायला राजी नसतात. आणि समजा डोळ्यांनी बघितलेच तर व्यवहारी मेंदू ते स्विकारायला तयार होत नाही. कुठल्याही शहाण्या माणसाची अशी दुर्दशा असते. तुलनेने सामान्य किंवा अगदी अडाणी माणूस अधिक जागरुक असतो. त्याला सत्य स्विकारायला वेळ लागत नाही. तेवढेच नाही तर सत्य स्विकारून त्यानुसार प्रतिसादही द्यायला सामान्य माणूस वेळ लावत नाही. म्हणूनच जगाच्या इतिहासात नेहमीच शहाणे हात टेकतात; तेव्हा सामान्य माणसाने जग वाचवले आहे. चटकन हा मोठाच विरोधाभास वाटेल. पण जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्यापर्यंत पोहोचणे अशक्य अजिबात नाही. गेल्या शनिवारी मुंबईत अकस्मात जी दंगल झाली, ती तशी पहिलीच घटना नाही आणि मुंबई महाराष्ट्रात तर नाहीच नाही. अवघ्या सहा वर्षापुर्वी अशीच नेमकी घटना मुंबईपासून जवळच असलेल्या भिवंडी शहरात घडली होती. किंबहूना घडवली होती म्हणणे रास्त ठरवे. कसा योगायोग आहे बघा, तेव्हाही आपले शेपट्या पिरगाळण्याचे कौशल्य प्राप्त करून मगच राजकारणात उतरलेले आबा पाटिलच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. आणखी एक मोठाच योगायोग आहे. तेव्हाची नेमकी तशीच घटना घडवणारी मुस्लिम संघटना सुद्धा तीच रझा अकादमीच होती. काही आठवते का? मी तुम्हा वाचकांना हा प्रश्न विचारलेला नाही; तर या महाराष्ट्रामध्ये जे स्वत:ला मोठे जाणकार, विश्लेषक किंवा राज्यकर्ते म्हणवतात, त्यांना विचारलेला हा प्रश्न आहे. त्यापैकी कोणाला २००६ सालातली भिवंडी आठवते का? तिथे काय व कशासाठी घडले होते ते तरी आठाते का?

   रमेश जगताप आणि बालासाहेब गांगुर्डे ही नावे ओळखीची वाटतात कुणाला? तुमची आमची गोष्ट सोडून द्या. पण ज्यांच्या हाती तेव्हा व आज पोलिस खात्याचा कारभार आहे, त्या आबा पाटलांना तरी ती नावे आठवतात काय? कारण ती कुठली रेशनकार्डवरची खाडाखोड केलेली नावे नाहीत, की मतदार यादीतली नावे नाहीत. ते दोघे पोलिस होते. एक बाळासाहेब गांगुर्डे हा भिवंडी भोईवाडा पोलिस ठाण्यातला शिपाई होता, तर रमेश जगताप हा नारपोली ठाण्यातला जमादार म्हणजे हेड कॉन्स्टेबल होता. ते दोघे ५ जुलै २००६ च्या रात्री गस्त करायला निघालेले होते. मोटरसायकल घेऊन जाताना त्यांना मुस्लिम जमावाने वंजारपट्टी भागातील बागे फ़िरदोस मशीदीजवळ अडवले. त्यांना खाली पाडण्यात आले आणि दगडांनी तलवारीने त्यांच्यावर जमाव तुटून पडला, त्यात दोघे ठार झाले. तिथेच आधीपासून बंद पाडलेल्या व फ़ोडलेल्या एसटी बसमध्ये मग त्यांचे मृतदेह फ़ेकण्य़ात आले. त्यानंतर त्या बसला आग लावण्यात आली. त्यात हे दोघे पोलिस शिपाई जळू्न भस्मसात झाले. त्यांची नावे तरी आज कोणाला आठवतात काय? सहा वर्षात त्यांना विसरून जाणे स्वाभाविकच आहे. कारण सेक्युलर राज्यात अशा पोलिस व सुरक्षा रक्षकांनी किडामुंगीप्रमाणे मरायचेच असते. किंबहूना त्यासाठीच त्यांनी जन्म घेतलेला असतो. ते काही टीव्ही, वाहिन्यांवरल्या चर्चेत भाग घेऊन किंवा खर्डेघाशी करून सेक्युलर किर्तन करायला जन्माला येत नसतात ना? जे कोणी अशी पुराणातली वांगी, चर्चा किंवा लिखाणातून सांगत असतात, त्या वांग्याचे भरीत होण्यासाठी व त्यासाठी स्वत:ला भाजून घेण्यासाठीच जगताप- गांगुर्डे जन्म घेत असतात ना? मग अशा मेलेल्या वांग्यांची नावे सेक्युलर पोपटपंची करणार्‍या शहाण्यांना किंवा सत्तेची खुर्ची उबवत आपल्या शेपट्या जपणार्‍या आबांना कशाला लक्षात रहातील? त्यांचे असे भाजून कोणी भरीत करून आपल्या सेक्युलर पंक्तीत तंदूर म्हणुन कोणी वाढले, त्याचे तरी स्मरण सेकुलर ढेकर देणार्‍यांना कशाला राहिल?

   पण माझी त्या सर्वांना विनंती आहे. त्या जगताप किंवा गांगुर्डेच्या हौतात्म्यासाठी नाही, तरी स्वत:चे असे तंदूर भरीत होऊ नये म्हणून तरी त्यांच्या आकस्मिक हत्या व मरणाची कारणे तपासून बघा. ती बघितली नाहीत म्हणुन मग अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर किंवा तुकाराम ओंबळे यांना आपले प्राण पणास लावायची वेळ आली होती. आणि आता शनिवार ११ ऑगस्ट २०१२ रोजी जे मुंबईत आझाद मैदान परिसरात झाले, तेही त्याच निष्काळजीपणामुळे. कारण जे घडले ते होणारच होते. कारण तसे घडणार याची पुर्वसूचना देण्यात आली होती. ती पुर्वसूचना पोलिसांच्या गुप्तचर विभागाने देण्याची गरज नव्हती; की केंद्राच्या गुप्तचर खात्याकडून येण्याचीही आवश्यकता नव्हती. जेव्हा या मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली; तेव्हा ती कोण मागते यावरूनच पुढला घटनक्रम पोलिस व गृहखात्याच्या लक्षात यायला हवा होता. पण तो लक्षात आला नाही. कारण सहा वर्षापुर्वी भिवंडीत काय घडले त्याची दखल गृहमंत्री म्हणुन ना आबा पाटलांनी घेतली; ना मुंबई पोलिसांनी घेतली. खरे सांगायचे तर त्या काळात मी इथे नव्हतोच. म्हणजे मुंबईत सोडाच इथे भारतातही नव्हतो. तर दूर तिकडे अमेरिकेत सोळा हजार मैलावर होतो. पण जेव्हा भिवंडीची ती घटना मला इंटरनेटवर वाचायला मिळाली तेव्हाच मला शंका आली होती. ती सामन्य किंवा साधीसुधी घटना नव्हती. त्यामागे एक अनाकलनिय रहस्य होते. आणि म्हणुनच मी तिथे बसून पुढल्या काही दिवसात मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी, की असे मी लिहिले आणि इथे पाठवले सुद्धा. पण ज्यांच्याकडे पाठवले त्यांना ते चिथावणीखोर लिखाण वाटले आणि त्यांनी त्याला प्रसिद्धी दिली नाही. त्या दैनिकात लगेच तो लेख छापला गेला असता, तर अवघ्या बारा तासात माझी भविष्यवाणी खरी ठरली असती आणि त्याचे श्रेय त्याच दैनिकाला मिळाले असते. पण ते होणे नव्हते. कारण सेक्युलर दडपणाखाली त्यांनी तो लेख छापला नाही. आणि नंतर मात्र पस्तावले.

   मी ती भविष्यवाणी करायला कोणी ज्योतिषी नव्हतो. मी दिसणारे सत्य डोळसपणे पाहू शकतो आणि त्यानुसार तर्कशुद्ध लिहू शकतो. त्यात माझ्या विचार वा आवडीनिवडींना लुडबुड करू देत नाही. म्हणुनच मी गांगुर्डे आणि जगताप यांच्या हत्येमागचे षडयंत्र बघू शकलो होतो, जे अन्य सेक्युलर विचारांनी आंधळे झालेल्यांना दिसत असूनही बघता आले नाही. मी नुसते पाहिलेच नाही, तर त्यानंतरच्या दोन घटनांनी मला शंकाकुल बनवले आणि मी त्यामागचे दडलेले सत्य शोधण्याचा इतक्या दूर बसून प्रयत्न केला. पण जे त्यावेळी मुंबईत आणि अगदी भिवंडीपासून जवळ होते, त्या शहाण्यांना समोर दिसणारे सत्य बघताही आले नाही. किंबहूना दिसतही असेल, पण बघायची हिंमत झाली नसेल त्यांना. म्हणुनच पुढचा भीषण घटनाक्रम घडत गेला. त्यातून काही शिकता आले नाही म्हणुन मग सव्वा दोन वर्षात, आणखी तेवढाच भयंकर भीषण घटनाक्रम घडला. मी इतक्या दूर बसून काय बघत होतो? भिवंडीत जे घडले तेव्हा जुलै २००६ मध्ये ते आपोआप घडले नव्हते; तर मुद्दाम घडवण्य़ात आले होते. ज्याला खाजवून खरूज काढणे म्हणतात, त्यातलाच तो प्रकार होता. म्हणुनच मला त्यामागे काही कारस्थान असल्याची शंका आलेली होती. तिथे रझा अकादमीने मोर्चा किंवा मेळावा काढण्याचे कुठलेही रास्त कारण नव्हते. तरीही त्यांनी तो उद्योग केला होता.

   भिवंडीत कशाला मुस्लिम रस्त्यावर उतरून तेव्हा इतकी दंगल करत होते? तिथल्या कबरस्तानाच्या एका बाजूला पोलिस ठाणे बांधण्याचे काम सुरू होते. त्यावर आक्षेप घेतला गेला होता. त्यावर अगदी कोर्टबाजी झाली होती. ज्या जागेवर पोलिस ठाणे बांधले जात होते; ती सरकारी जमीन होती. पण ती कबरस्थानचीच जमीन आहे असा दावा करून कोर्टाकडे धाव घेण्यात आली होती. तिथे तो दावा फ़ेटाळून लावल्यावर प्रश्नच निकालात निघाला होता. त्यानंतरच बांधकाम सुरू झाले होते. मग निषेधाची गरज काय उरली होती? पण तरीही रझा अकादमीमे तो मेळावा मोर्चा योजला होता. त्यातुन परिस्थिती बिघडली आणि गोळीबार करण्याची वेळ आली. मग दंगल सुरू करून थेट पोलिसांनाच लक्ष्य बनवण्यात आले होते. त्यातच जगताप व गांगुर्डे यांची आहुती पडली होती. म्हणजे बळी घेतला होता. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, की रझा अकादमी ही सामाजिक संस्था नसून थेट सरकारी अंमलदार व प्रशासकिय यंत्रणेवर प्राणघातक हल्ला करणारी संघटना असल्याचा इतिहास ताजा आहे. मग अशा संस्थेने मुंबईत आझाद मैदानावर कुठल्याही कारणास्तव मोर्चा मेळावा घ्यायचे ठरवले, तर दंगल होणार आणि त्यात पोलिसांवर हल्ला होणार; ही सुर्यप्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट होती. हे (ज्यांच्या जीवावर बेतले त्या जगताप व गांगुर्डे यांचे सहकारी व समव्यवसायी असलेल्या) पोलिसांना कुठल्या गुप्तचर यंत्रणेने सांगायची गरज होती काय? काय झाले होते भिवंडीच्या दंगलीनंतर?           ( क्रमश:)
भाग  ( ५ )     २०/८/१२

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

महिला आयोग नावाची संस्था झोपली आहे का?


   मला आठवते काही आठवड्यापुर्वी आसामच्या गुवाहाटी या राजधानीच्या शहरामध्ये एक भयंकर घटना घडली होती. एक तरूणी पबमधून बाहेर पडली; तर काही गुंडांच्या जमावाने तिला अडवून विवस्त्र करण्य़ाचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिथेच उभा राहून एक पत्रकार त्या विकृतीचे आपल्या कॅमेराने चित्रण करत राहीला. पण त्याने पुढे होऊन त्यात हस्तक्षेप केला नव्हता. तेवढेच नाही. त्याने पोलिसांना बोलावून तिला वाचवण्य़ाचेही कष्ट घेतले नव्हते. पण जेव्हा त्याने आपल्या वाहिनीच्या कार्यालयाला ती बातमी देऊन अधिक कॅमेरामन बोलावले; तेव्हा त्यांनीच पोलिसांना खबर दिली आणि मग पोलिस तिकडे आलेले होते. हा सगळा प्रकार पाऊण तास चालू होता. याला आजकालची पत्रकारिता म्हणतात, जिला माणूसकीचाही विसर पडला आहे. ज्या पत्रकारितेला गयावया करणार्‍या तरूणीची दया येत नाही; तर त्यात सनसनाटी बातमी दिसते. अशी पत्रकारिता बुद्धीवादाच्या सीमा ओलांडून पलिकडे पाशवी मानसिकतेमध्ये गेलेली असते. मग तमाम वाहिन्यांनी ते चित्रण थोडे धुरसट करून दाखवण्यात धन्यता मानली. पण कोणी त्या पत्रकार वा वाहिनीच्या अशा अमानुष वागण्याचा धिक्कारही केला नव्हता. आजही त्याचीच प्रचिती येत आहे. मुंबईत गेल्या शनिवारी रझा अकादमीने निषेध मेळाव्याच्या नावाखाली दंगल घडवून आणली; त्यात पाचसात महिला पोलिसांचा विनयभंग झाला आहे. पण त्याची किती गंभीर दखल स्वत:ला सभ्य व सुसंस्कृत म्हणवून घेणार्‍या माध्यमांनी घेतली आहे? बातम्या सर्वच माध्यमांनी दिल्या यात शंका नाही. पण पोलिसांवरच्या हल्ल्याचा एक भाग म्हणून त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात महिलांशी विकृत गैरवर्तन झाल्याचा संताप कुठेच का नसावा?

   दोन महिन्यांपुर्वीच्या अशाच बातम्या आठवून बघा. वसंत ढोबळे नामक एक पोलिस अधिकारी वेगवेगळ्य़ा पब किंवा ऐष करणार्‍या खाजगी अड्ड्यावर धाडी टाकत होते. तिथे ज्या तरूणी हुक्का प्यायला किंवा नशापान करायला जमलेल्या होत्या. तिथे कुठले सभ्य कृत्य करायला त्या आलेल्या नव्हत्या. पण त्यांच्या तसल्या ‘सांस्कृतिक’ कार्यात ढोबळे नावाचा पोलिस अधिकारी मोठाच व्यत्यय आणून राहिला असावा; अशाच थाटात त्या बातम्या रंगवल्या जात होत्या. पुढे ढोबळे यांनी ज्यांना पकडले त्यांच्या रक्तामध्ये अंमली पदार्थाचा अंश मिळाल्यावर कुणा माध्यमांनी त्याची वाच्यता केली नव्हती. मुद्दा तोही नाही. मुद्दा आहे तो महिलांविषयक आस्थेचा. अशा बातम्या देताना बहुतेक वृत्तपत्रे किंवा माध्यमांचा असा आव असतो, की त्यांना महिलांच्या प्रतिष्ठेची मोठीच काळजी आहे. पण ती वस्तुस्थिती अजिबात नसते. त्यांचे हितसंबंध जिथे गुंतलेले असतात, त्यानुसारच बातम्या रंगवल्या जात असतात. म्हणूनच नशापान करायला गेलेल्या तरूणींना हटकले, की अप्रतिष्ठा केल्याचा डांगोरा पिटला जातो. पण जिथे खरोखरच महिलांची बेअब्रू केली जाते; तेव्हा त्यात आपला हितसंबंध नसेल तर हीच माध्यमे त्याकडे साफ़ काणाडोळा करता असतात. म्हणूनच शनिवारी ज्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला, त्याबद्दल कोणीही पाठपुरावा करताना दिसला नाही. कारण काय? महिला पोलिस सामान्य वर्गातून आलेल्या असतात म्हणून? त्यांची इज्जत किंवा अब्रू उच्चभ्रू वर्गातल्या महिलांपेक्षा कमी असते का? नसेल तर या महिला पोलिसांच्या विनयभंगावर माध्यमांनी काहुर का माजवलेले नाही?

   दिल्लीतल्या कुणा गितिका शर्मा नावाच्या हवाईसुंदरीने आत्महत्या केली, त्याची बातमी किती दिवस गाजते आहे? हरयाणातील वकील फ़िजा उर्फ़ अनुराधा बाली हिची बातमी किती गदारोळ करते आहे? मग मुंबईतल्या महिला पोलिसांच्या अब्रूचे काय? तिला किंमतच नाही काय? पत्रकार किंवा संपादकाची बहिण वा कोणी नातलग त्यात असती तर किती काहूर माजले असते? सांगायचा मुद्दा इतकाच, की या महिला सामान्य घरातल्या व कुटुंबातल्या आहेत; म्हणुन त्यांच्या अब्रूशी झालेल्या खेळाकडे माध्यमांनी साफ़ दुर्लक्ष केले आहे काय? समजा अशी एखादी घटना उच्चभ्रू महिलेच्या बाबतीत घडली असती तर याच माध्यमांनी एव्हाना माहिला आयोग किंवा सरकारच्या महिला कल्याण मंत्र्याला किती जाब विचारला असता ना? मग इथे सगळ्यांची वाचा का बसली आहे? की ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्याशी या मौनाचा संबंध आहे? म्हणजे असे काही ढोबळेसारखे पोलिस वा कुणा हिंदूत्ववादी संघटनेकडून घडले असते तर? तर हेच पोपट किती तावातावाने बोलले असते? दोनतीन वर्षापुर्वी मंगलोर किंवा कुठेतरी पबमध्ये गेलेल्या तरूणींना मारहाण केल्याबद्दल जाब विचारायला हीच माध्यमे आघाडीवर होती ना? श्रीराम वेदिके नावाची कोणती तरी संघटना त्यात गुंतल्याचे मला आठवते. मग तिथे त्यांचा गुन्हा महिलांची अप्रतिष्ठा करणे असा होता, की त्यांचा गुन्हा हिंदू संघटना असणे असा होता? आणि म्हणूनच रज़ा अकादमी ही हिंदू संघटना नाही त्यामुळे त्यांच्या मेळाव्यात महिलांचा विनयभंग होणे; आपल्या सेक्युलर माध्यमांना गुन्हा वाटत नाही? कारण माध्यमांचे वागणे तरी तसेच दिसते आहे. महिला पोलिसांची बेअब्रू झाली असतानाही कोणी त्याबद्दल रज़ा अकादमीवर टिकेचे आसुड ओढताना दिसत नाही. त्याचे दुसरे काय कारण आहे का?

   अर्थात महिला पोलिसांपुरताच हा विषय नाही. जिथे व ज्या परिस्थितीत हा प्रकार घडला, त्याबद्दल पोलिसांनी बोभाटा केला म्हणून. अन्यथा सीएसटी स्थानकामध्ये त्या वेळेत किती महिला असतात, त्यापैकी कितीजणींना असाच अनुभव तेव्हा आलेला असेल, कोणी सांगू शकतो का? त्यांनी पुढे येऊन सांगितले नसेल, म्हणुन असे काही झालेलेच नाही, असे मानायचे कारण नाही. कारण असा अनुभव इतका लाजिरवाणा असतो व यातनामय असतो, की त्याची इतरत्र वाच्यता करायलाही महिलांना अशक्य असते. म्हणूनच त्या मेळाव्यातील महिलांशी गैरवर्तन हे फ़क्त पोलिसांच्याच बाबतीत घडले असे मानायचे कारण नाही. कदाचित त्यातून शेकडो महिला गेलेल्या असू शकतात. म्हणूनच घडल्या प्रकाराची राज्य किंवा केंद्रिय महिला आयोगाने तात्काळ गंभीर दखल घ्यायला हवी होती. पण त्यासाठीही कुठली हालचाल झालेली दिसत नाही. म्हणून तर मला शनिवारची मुंबईतली दंगल हा एक अजब चमत्कार वा्टतो. तिथे पोलिसांवर हल्ला होतो आणि पोलिस गप्प रहातात. पत्रकार माध्यमांवर हल्ला होतो आणि त्यांचीही तक्रार होत नाही. इथे महिलांच्या अब्रूवर हात टाकला जातो; तरी को्णी त्यावरही आवाज उठवायला तयार दिसत नाही. हे सगळे योगायोग आहेत, की तशी योजनाच आहे? कायदा सर्वांना सारखाच असेल तर इतरवेळी पोलिस वा कायदा व माध्यमे वागतात; तसेच त्यांनी शनिवारच्या घटनेविषयी सुद्धा वागले पाहिजे. पण कोणीच तसे वागत नाही. म्हणजे काहीतरी गफ़लत नक्कीच आहे ना? की कायदा व देशाच्या घटनेने रझा अकादमी नावाच्या संस्थेला व तिच्या सर्व पाठीराख्यांना पोलिसी फ़ौजदारी कारवाईतुन अभय दिलेले आहे? नसेल तर या देशातले महिला आयोग कुठे झोपा काढत आहेत? एव्हाना त्यांनी रझा अकादमी व महाराष्ट्र सरकारला नोटिसा का पाठवलेल्या नाहीत? नुसता महिला आयोगच नव्हेतर मानवाधिकार आयोगही झोपला आहे का?

   सातआठ वर्षापुर्वी बडोदा येथील बेस्ट बेकरी प्रकरणी जाहिरा शेख नावाच्या मुलीने आपल्याला धमक्या दिल्याने साक्ष बदालली असे पत्रकारांना सांगितले; तर मानवाधिकार आयोगाने स्वत:च दखल घेऊन त्यावर कारवाई सुरू केली होती. मग आज त्याला मुंबईतल्या महिला पोलिसांच्या अब्रूची फ़िकीर का नाही? गुजरातच्या दंगलीनंतर प्रत्येक माध्यमातून अजूनही गळा काढणारे तिस्ता सेटलवाड, शबाना आझमी, जावेद अख्तर, महेश भट इत्यादी मानवतेचे पुजारी आज कुठे बिळात दडी मारून बसले आहेत? सर्वांचीच वाचा का बसली आहे? समतेचे, बंधूतेचे गोडवे गाणारे आज का गप्प आहेत? आपण न्यायाचे व कायद्याचे पुजारी असल्याचा आव आणणारे हे सारेच पोपट आज निमूट बसले आहेत. कारण त्यांचा न्याय जेवढा पक्षपाती असतो, तेवढाच त्यांचा गरीबाविषयीचा पुळकाही खोटाच असतो. रझा अकादमीने जे काही केले ते भयंकर असले तरी त्यांचे आभारही मानायला हवेत. कारण त्यांच्या त्याच मेळाव्याने व त्यातल्या पुर्वनियोजित दंगलीमुळे या तमाम सेक्युलर बदमाशांचे बुरखे टरटरा फ़ाटले आहेत. माध्यमांपासून सत्ताधार्‍यांपर्यंत आणि तथाकथित समाजसेवकांपासू्न सेक्युलर माध्यमे व वि्चारवंतांपर्यंत, सगळेच कसे खोटारडे व दिशाभूल करणारे आहेत; त्याचे प्रात्यक्षिक ज्याने घडवले ती रझा अकादमी माफ़ीचा साक्षिदारच नाही काय? अर्थात यातले जे स्वत:ला सेक्युलर म्हणवून मिरवतात, त्यांना राजकीय भाषेत युझफ़ुल इडीय़टस (उपयुक्त मुर्ख) असे कॉम्रेड लेनीनने म्हटले आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी मी लिहीनच.     ( क्रमश:)
 भाग  ( ४ ) १९/८/१२