शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

महाराष्ट्रात मोदीलाट नव्हतीच


१९७७ सालात आणिबाणी उठवून इंदिरा गांधींनी सार्वत्रिक निवडणूका घेतल्या. तेव्हा त्यांच्या विरोधात पुन्हा उभे ठाकलेले राजनारायण मुंबईत जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले होते. त्यांची एक प्रचारसभा वरळीच्या जांबोरी मैदानावर होती. नारायण पेडणेकर या पत्रकार मित्रासह मी तिथे गेलो होतो. नारायण हा मुळातच लोहियावादी असल्याने त्याचा राजनारायण यांच्याशी चांगला परिचय होता. सभा संपल्यावर आम्ही राजनारायण यांना गाठून मोजकी प्रश्नोत्तरे उरकली. रायबरेलीत काय होईल, असा प्रश्न मी विचारला होता. तर क्षणाचा विलंब न लावता हे महाशय उत्तरले, की त्यांनी अर्ज भरला, तेव्हाच फ़त्ते झाली आहे. फ़क्त मतदान व्हायचे बाकी आहे. मला फ़टकन हसू फ़ुटले. तो माणूस आधीच विदूषक म्हणून माध्यमात प्रसिद्ध होता. पण रायबरेलीत पंतप्रधान इंदिराजींना मतदानापुर्वीच हरवल्याच्या त्यांच्या वल्गना ऐकून मला हसू आवरले नाही. माझ्या हसण्यातला उपहास ओळखून त्यांनी व्यक्त केलेले मत, मी कधीच विसरू शकलो नाही. कारण माझा निवडणूक व मतदानाचे कल, यांचा अभ्यास तिथूनच सुरू झाला. राजनारायण म्हणाले,

‘अजून बच्चा आहेस. तुला राजनिती खुप शिकायची आहे. रायबरेलीच्या लोकांना राजनारायण आवडला म्हणून कोणी मला मत देणार नाही, किंवा मला निवडून आणायला कोणीही मतदान करणार नाही. लोकांना उत्साह आहे तो इंदिरेला पराभूत करण्याचा आणि तिला पाडायचे असेल, तर समोर जो कोणी उभा आहे, त्याला निवडून येणेच भाग आहे. त्याला दुसरा पर्यायच नाही. माझी इच्छा असो किंवा नसो, मी रायबरेलीतून निवडून येणारच. मात्र तो माझा विजय असण्यापेक्षा इंदिरेचा पराभव असणार आहे. आणि त्याला आम्हा दोघांपेक्षा बाजूच्या अमेठीत उभा असलेला संजय गांधी जबाबदार असेल.’

अन्यथा लालूंप्रमाणे नाट्यमय भाषेत हेल काढून बोलणारे राजनारायण एखाद्या संयमी बुद्धीमंताप्रमाणे विवेचन करताना बघूनच मी गडबडून गेलो होतो. पण त्यांनी केलेले विश्लेषण थक्क करून सोडणारे होते. कुठलाही नेता विजयाचे श्रेय घ्यायला हौसेने पुढे येतो किंवा आवेशात बोलतो. इथे वेगळाच अनुभव माझ्या वाट्याला आलेला होता. जिंकणारा एक मोठा उमेदवार, आपल्या यशाचे श्रेय आपल्या पराभूत होणार्‍या प्रतिस्पर्ध्याला देत होता. काहीही असेल, पण मला तेव्हा राजनारायण यांचे तर्कशास्त्र मनापासून पटले आणि मी त्याची बातमी बनवून छापली, तिचे शिर्षक होते, ‘अमेठीमुळे रायबरेली गोत्यात.’ बातमी छापून आल्यावर अनेक ज्येष्ठांनी मला कानपिचक्या दिल्या. मीही अपराधी भावनेने चूक मान्य केली. पण मनापासून मला चुकलो असे वाटलेच नव्हते. पुढे दोन महिन्यांनी तेव्हाच्या मतदानाची मोजणी होऊन निकाल लागले, तेव्हा माझी बातमी खरी ठरली होती. पण त्याचे श्रेय माझे नव्हते, तर त्या विदूषक मानल्या जाणार्‍या नेत्याचे होते. त्याच्या विधानातली वास्तविकता स्वत:ला बुद्धीमान समजणार्‍या पत्रकारांना उमजलीही नव्हती. त्यानंतर असे अनेक अनुभव गाठीशी येत गेले. गेल्या ३७ वर्षात डझनावारी निवडणूका बघितल्या व त्यावर जाणत्यांची शेकडो भाष्ये भाकितेही जमिनदोस्त होताना बघितली. अशावेळी हटकून राजनारायण यांची ती हास्यास्पद मुर्ती माझ्या डोळ्यापुढे येत राहिली. हल्लीच लोकसभा मतदान व निकाल लागल्यावर त्याचे स्मरण झालेच होते. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीचे वेध लागले असताना होणार्‍या उलटसुलट चर्चा किंवा आरोप प्रत्यारोप बघितले, मग राजनारायण आठवतात. 

राज्याच्या इतिहासामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा १९७७ साल सोडल्यास कॉग्रेस पक्षाला कधीच मोठा दणका बसलेला नव्हता. पण तशी कुठलीही चळवळ किंवा विरोधी लाट नसताना एप्रिल-मे महिन्यातल्या मतदानात कॉग्रेस राष्ट्रवादीला चाखावी लागलेली पराभवाची चव, अभूतपूर्व अशीच आहे. मात्र अजून संबंधित पक्षनेते वा राजकीय अभ्यासकांकडून त्याचे वास्तविक परिशीलन वा परिक्षण होऊ शकलेले नाही. म्हणूनच मग तीन महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने आवेशपुर्ण दावे प्रतिदावे चालू आहेत. जिंकलेल्या शिवसेना-भाजपा महायुतीला आपल्या यशाचे रहस्य उलगडता आलेले नाही किंवा पराभुत कॉग्रेस राष्ट्रवादीला अपयशाची नेमकी कारणे शोधता आलेली नाहीत. म्हणूनच दोन्ही बाजू आगामी विधानसभेच्या बाबतीत हवेत बिनबुडाचे दावे वल्गना करण्यात गर्क आहेत. त्यातच मग कुणी केलेल्या मतचाचणीचे आकडे अधिकच गोंधळ माजवून गेल्यास नवल नाही. देशात नरेंद्र मोदींना इतके प्रचंड बहूमत कशामुळे मिळू शकले, त्याचे ‘लाट’ हे उत्तर नाही, तर ती पळवाट आहे. दिशाभूल आहे. त्याचवेळी मोदींना मार्केटींगमुळे लोकांनी भरभरून मते दिली, अशी कॉग्रेसने करून घेतलेली समजूत आत्मवंचना आहे. म्हणूनच मग येत्या विधानसभेला काय होईल, याचा त्यांच्यासह युतीलाही अंदाज बांधता आलेला नाही. युतीला विजयाचे व सत्तेचे वेध लागले आहेत, परिणामी मित्रपक्षापेक्षा अधिक यशाचा वाटा आपल्याला मिळण्याची झुंबड युतीतही उडालेली आहे. तर पराभूत सत्ताधारी आघाडीत अपयशाचे खापर मित्राच्या डोक्यावर फ़ोडण्याची स्पर्धा चालली आहे. पण मतदाराने दिलेला कौल कोणाला, कोणाच्या विरुद्ध वा कशासाठी विरोध वा समर्थन, याचे उत्तर कोणापाशी नाही. त्या कोणाहीपाशी विजेत्या राजनारायण इतका प्रामाणिकपणा नाही, की पराभूत इंदिराजींच्या इतके प्रासंगिक भान नाही. 

राजनारायण यांनी विजयाची नुसती चाहुल लागली असतानाही त्याचे श्रेय नाकारण्याचा प्रामाणिकपणा दाखवला होता. तर असा दारूण पराभव झाल्यावर इंदिराजींनीही तितकाचा प्रामाणिकपणा दाखवत आणिबाणी लावण्यात चुक झाल्याची जाहिर कबुली दिली होती. त्या दोघांमधल्या वास्तविकतेचा लवलेश तरी आपण आजच्या पक्षात वा नेत्यांमध्ये बघू शकतो काय? जिंकलेल्या युती पक्षांना विजय हे आपले कर्तृत्व वाटते आहे आणि त्याचे श्रेय आपल्याकडे ओढायची स्पर्धा त्यांच्यात दिसते आहे. तर पराभूत आघाडीतील सत्ताधारी पक्षांना मोदीलाट व मित्रपक्षाच्या पापामुळे पराभूत झालो, असे वाटते आहे. सहाजिकच आपण केलेल्या चुका शोधून सुधारण्याचे दरवाजे त्यांनी स्वत:च बंद करून घेतले आहेत. त्याचेच प्रतिबिंब मग एका वाहिनीने मतचाचणी घेऊन त्यावर केलेल्या चर्चेमध्ये पडले होते. मोदी लाट ओसरली आहे, म्हणूनच आता पुन्हा आपल्याला अलगद सत्ता मिळणार आहे, अशा भ्रमात सत्ताधारी दिसतात. उलट मोदींच्याच लोकप्रियतेवर स्वार होऊन आपण सत्तेचा किल्ला सर करणार असल्याच्या मस्तीत युतीतले पक्ष दिसतात. अर्थात त्यांचा आनंद खोटा मानता येणार नाही. कारण मतचाचणीही युतीला यश मिळताना दाखवते आहे. पण त्यामागे कुणा एका पक्षाकडे ओढा असल्याचे दिसत नाही. त्यापेक्षा आज जे सत्तेत आहेत आणि ज्याप्रकारचा कारभार करीत आहेत, त्याविषयी असलेली कमालीची नाराजी मात्र साफ़ समोर येते आहे. गेल्या दोनतीन वर्षात केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारच्या कारभारातले अनेक घोटाळे लोकांसमोर आलेले आहेत. प्रामुख्याने सिंचन घोटाळा व दुष्काळातल्या शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय आहे. ज्या विदर्भ विभागात देशातील सर्वाधिक आत्महत्या झाल्या, तिथल्या सर्व लोक्सभा जागांवर सत्ताधारी आघाडीचा संपुर्ण पराभव झाला आहे. १९७७ च्या विरोधी लाटेत त्याच विदर्भाने कॉग्रेस व इंदिराजींना हात दिला होता, तिथेच आज लोकमत इतके कडवे कॉग्रेस विरोधात जाण्याची चिंता सत्ताधार्‍यांना किंचितही नसावी काय? 

युतीने मोठे यश मिळवले किंवा आगामी विधानसभा निवडणूकीत युतीला पुन्हा मोठे यश मिळण्याची कल्पना सत्ताधार्‍यांना सहन होत नाही. त्यात गैर काहीच नाही. आपला विरोधक वा प्रतिस्पर्धी जिंकणार, असे लढतीपुर्वीच ऐकायला कोणाला़च आवडणार नाही. पण त्यातले वास्तव किंवा धोका असेल तर तो समजून घेण्यात कसली अडचण असते? आज राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र व कॉग्रेस मराठवाड्याच्या दोन लोकसभा मतदारसंघात मर्यादित झाले आहेत. त्यातही अशोक चव्हाण व उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना वगळता उरलेले आघाडीचे अन्य चार विजयी उमेदवार नगण्य मतांनी बचावलेले आहेत. लोकसभेच्या वेळी युतीने पन्नास टक्केहून अधिक मते मिळवली आणि आघाडीला अवघी ३४ टक्केच मते मिळाली. हे अंतर टक्केवारीत सोळा टक्के आहेच. पण वास्तविक मतांमध्ये हे अंतर ८० लाखाहून अधिक आहे. त्याची सरासरी काढल्यास २८८ जागी युती ३० हजाराहून पुढे आहे आणि ८८ जागा वगळून २०० जागी मताधिक्य वाटले, तर सरासरी ४० हजाराचे होते. म्हणजे लोकसभेप्रमाणेच मतदान झाले तर युतीच्या उमेदवाराला २०० जागी ४० हजाराचे मताधिक्य दिसू शकते. त्याचा पुढला अर्थ असा, की तसेच मतदान झाल्यास सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांना या २०० जागी ४० हजाराच्या मताधिक्याची दरी ओलांडून विजयाची लढाई लढावी लागेल. पंधरा वर्षे आपल्याला सत्ता देणार्‍या मतदाराने आपल्याला इतक्या खोल दरीत का ढकलून दिले, त्याचा पराभूत पक्षांना विचार करणे भाग आहे आणि मगच त्यांना ती दरी पार करण्याचे उपाय सापडू शकतील. पण त्यांच्या नेतृत्वाला आपल्या समोर इतकी मोठी पिछाडीची दरी असल्याचेच मान्य नाही. सहाजिकच त्या दरीत उडी घेऊन आपण विजयाचे पलिकडे दिसणारे शिखर सहज पार करू शकतो, अशा काहीश्या भ्रमात कॉग्रेस व राष्ट्रवादीचे लोक दिसतात. 

ही झाली एक बाजू. ज्यात सत्ताधारी आपल्याच मस्तीत दिसतात. पण दुसरी बाजू लोकसभेत मोठे यश संपादन करणार्‍या महायुतीची आहे. त्यात सर्वाधिक जागा जिंकणार्‍या भाजपापासून एकही जागा न जिंकणार्‍या राष्ट्रीय समाज पक्षापर्यंत प्रत्येकाला आपल्यामुळेच युतीला इतके मोठे यश मिळाल्याच्या भ्रमाने ग्रासलेले आहे. त्यामुळे आपल्याला बाजूला ठेवून वा आपल्या मर्जीविरुद्ध गेल्यास युती भूईसपाट होईल, असाही भ्रम त्यांना सतावतो आहे. कारण सत्ताधार्‍याप्रमाणेच महायुतीनेही मोठे यश कशामुळे मिळवले त्याचे परिशीलन वा आकलन केलेले नाही. सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाचा लाभ म्हणून असे मोठे यश युतीच्या पदरात पडले. त्यात सत्ताधार्‍यांच्या मस्तवाल व उद्दामपणाचाही मोठा भाग आहे. त्यांच्या हाती सत्ता असताना त्यांनी माज दाखवला, त्यावर नाराज झालेला मतदार सत्तेबाहेर असताना युतीने माजोरीपणा दाखवला तर सहन करील काय? युतीच्या नेत्यांमध्ये जी मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आधीच चालू झाली आहे, त्यांचे वर्तन लोकांना आवडणारे आहे काय? कुणाला मुख्यमंत्री पदावर बसलेला बघण्यासाठी लोक आपला कौल देत नसतात, तर असलेल्या सत्ताधीशांना धडा शिकवतानाच सुसह्य सरकार यावे. अशीही एक अपेक्षा लोकांत असते. सत्तेची मस्ती नसेल व संयमाने काम करू शकेल, अशा नेत्याचा शोधही त्यात चालू असतो. अशा मतदाराला मुख्यमंत्री पदासाठी आधीच सुरू झालेली लठ्ठालठ्ठी खुश करील काय? मतदानाचे दोन प्रकार असतात. गुजरातमध्ये लागोपाठ तीनदा लोकांनी मोदींना भरभरून मते दिली व अनिर्बंध सत्ता दिली, त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणता येईल. पण आरंभीच्या काळात भाजपाला सत्ता मिळाली होती, तिथे अशीच खुर्चीची रस्सीखेच होऊन लोकांचा भ्रमनिरास झालेला होता. मोदींचा उदय झाल्यावर भाजपावर लोकांचा विश्वास बसू लागला. त्याआधी भाजपाने तिथल्या सर्व स्थानिक निवडणूका गमावण्याची नामुष्की आलेली होती, हे विसरता कामा नये. 

महाराष्ट्रामध्ये १९९९ साली युतीला सत्ता मिळाली, त्यानंतर सत्तेची मस्ती दाखवण्यात मशगुल झालेले युतीपक्ष लोकांच्या मनातून उतरले. त्याचाच लाभ कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पुढल्या काळात मिळाला होता. त्यानंतर युतीमध्येच इतकी धुसफ़ुस व अंतर्गत बेबनाव होत राहिला, की त्यांच्यापेक्षा भ्रष्ट आघाडी बरी म्हणायची वेळ मतदारावर आली. थोडक्यात नकारात्मक मतदानातून १९९५ सालात मिळालेला कौल सकारात्मक दिशेने वळवण्यात युतीपक्षांना अपयश आल्याने कॉग्रेस आघाडीला दिर्घकाळ सत्तेवर रहाणे शक्य झाले. त्यांना लोकसभा निवडणूकीत जनतेने धडा शिकवला आहे. पण तोच धडा युतीलाही दिलेला आहे. युतीला त्याचे भान दिसत नाही. अन्यथा त्यांच्यात आतापासूनच अधिक जागांची मागणी वा पदांच्या वाटपाचे जाहिर हेवेदावे कशाला रंगले असते? जी पहिली मतचाचणी समोर आली आहे त्यातले निष्कर्ष इतकेच सांगतात, की लोकांना आजचे सत्ताधारी नकोसे झालेले आहेत आणि बदलायचे आहेत. पण त्यांना बाजूला करताना कुणाला मुख्यमंत्री बनवावा असे मतदाराने ठरवलेले नाही. सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले, तर युतीच्या पक्षांना १८० जागा मिळतातच. पण एकत्रित लढले तर २१० जागा मिळतात. उलट एकमेकांच्या विरुद्ध लढून आघाडीतील पक्षांना ५५ आणि एकत्र लढून ८० जागा मिळू शकतात. याचा सरळ अर्थ इतकाच, की कुठल्याही मार्गाने वा आडवळणाने पुन्हा आघाडी सत्तेवर बसू नये, असे जनतेचे साफ़ मत आहे. पण सत्तेची झिंग आधीच चढलेल्या युतीलाही ती चाचणी काहीतरी सांगते आहे. स्वबळावर लढलात तरी कुणा एकाला स्वच्छ कौल मिळणार नाही, युती म्हणूनच सत्ता राबवावी लागेल. अशावेळी दोन्ही बाजूंनी गंभीरपणे वास्तवाकडे बघण्याची गरज आहे. चाचणीचे आकडे झुगारून सत्ताधार्‍यांना परिणाम नाकारता येणार नाहीत वा पराभव टाळता येणार नाही. त्याचवेळी मोदी लाट आता सगळेच मान्य करीत असले, तरी युतीला मत देणार्‍यांना राज्यात मोदी मुख्यमंत्री होणार नाहीत, म्हणूनच एकट्या भाजपाच्या बाजूला कौल देणे शक्य नाही. म्हणूनच भाजपाने स्वबळाची उद्दाम भाषा बोलण्यात अर्थ नाही. त्याचप्रमाणे सेनेने अधिक जागा जिंकण्यापुर्वीच मुख्यमंत्री पदावर दावे करण्यातही अर्थ नाही. व्यवहारी राजकारणात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असते. त्यासाठी इंदिराजी वा राजनारायण यांच्यासारखे वास्तववादी असणे आवश्यक असते. 

तेव्हा इंदिराजी नकोत म्हणून आपल्याला लोक कौल देणार असले, तरी तो नकारात्मक विजय असल्याचे वास्तव राजनारायण स्पष्ट शब्दात मान्य करीत होते आणि पराभवाची चव चाखल्यावर इंदिराजींनी आणिबाणी लादल्याची चुक मान्य केली. त्यांनी चुक मान्य केली तिथून त्यांच्या सुधारण्याचा आरंभ झाला होता आणि अवघ्या अडिच वर्षात देशातले राजकीय चित्र साफ़ पालटून गेले होते. चुक कबुल करण्याचा अर्थ इंदिराजी तिथेच थांबल्या नाहीत, त्यांनी त्याच जुन्या चुका आपल्या हातून पुन्हा घडू नयेत, याची काळजी घेतली होती. तिथून मग राजकीय वास्तविकताही बदलू लागली. मार्केटींग करून जनतेची विरोधकांनी दिशाभूल केल्याचा आरोप इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर केला नव्हता किंवा आपण केलेल्या चुकांचे समर्थनही केले नव्हते. पराभवाने दिलेला धडा त्या शिकल्या होत्या आणि आपल्या यशातला फ़ोलपणा राजनारायण आधीपासून ओळखू शकलेले होते. अधिक जागांसाठीची युतीमधली रणधुमाळी आणि विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीने आघाडीमध्ये निर्माण झालेला बेबनाव, त्याच राजकीय अडाणीपणाची साक्ष आहे. लोकशाहीत जनमत सर्वोच्च असते आणि लोकांची आपल्यावर मर्जी नसली तरी चालते, पण नाराजी व्हायला नको, याची काळजी घ्यायची असते. एकूणच राज्यातल्या सर्वपक्षीय नेतृत्वाला त्याचे भान असलेले दिसत नाही. मित्रपक्ष म्हणवणारेच एकमेकांच्या कुरापती काढतात व एकमेकांवर कुरघोड्या काढण्यात रममाण होतात, तेव्हा त्यापैकी कोणालाही जनमताची फ़िकीर नसल्याचेच जाणवते. अशा पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. तर त्यात मग जनतेला कोणते पर्याय शिल्लक उरतात? आपल्या अपेक्षा पुर्ण करणारा सर्वोत्तम पक्ष वा नेता निवडण्य़ाची संधी लोकांना मिळत नाही. त्याऐवजी कोण अधिक नावडता, त्याला दूर ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागते. अमूक हवे यापेक्षा तमूक नको, अशीच निवड करावी लागते. दुसरीकडे नावडीतून झालेली निवड मग अपेक्षीत परिणाम देतेच असेही नाही. 

लोकांना आपल्या कारभाराचा इतका तिटकारा कशाला यावा, याचा आजच्या सत्ताधार्‍यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना मोदीलाटेने पराभूत झालो, असल्या भ्रमातून बाहेर पडावे लागेल. आरक्षण वा अनुदाने, सवलती असल्या आमिषातून गमावलेली पत पुन्हा हस्तगत करता येणार नाही. लोकसभा निकालाचे आकडेच त्यातले वास्तव दाखवू शकतील. ते इतके भीषण सत्य आहे, की आज अनेक राष्ट्रवादी व कॉग्रेस नेते युतीमध्ये आश्रय शोधू लागलेत. कारण आहेत त्या पक्षात भवितव्य उरले नाही, याची खात्री पटलेली आहे. पण दुसरीकडे तोच युतीलाही इशारा आहे. जनता त्यांना उत्तम कारभारासाठी संधी देते आहे, मस्तवालपणा करण्याचे लाड जनता करीत नसते. १९९५ सालात युतीने सत्ता मिळवली तेव्हा तिच्या पारड्यात अवघी २८ टक्के मते होती. लोकसभेच्या यशात युतीने ५० टक्के मजल मारली होती. एका चाचणीत युतीला ४२ टक्के मते दिसतात. तीन महिन्यांपुर्वी देशाचे पंतप्रधानपद भूषवणार्‍या कॉग्रेसला आज विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी वाडगा घेऊन फ़िरावे लागते आहे, त्याला अवघी १२ टक्के मतातली घट कारणीभूत झाली. उलट लागोपाठ दोन निवडणूकात कॉग्रेसकडून मार खाणार्‍या भाजपाला मोदींनी १२ टक्के मते अधिक मिळवून दिली आणि त्याच्यासोबत सत्ता व पंतप्रधानपदही त्या पक्षाकडे आले. आकड्यांची व टक्केवारीची ही किमया ज्यांना माहित नसते, त्यांना मतदान व त्यातून घडणार्‍या चमत्कारांचे रहस्य कधीच उलगडता येत नाही. त्यांना इंदिराजी रायबरेलीत कशाला पराभूत होऊ शकतात, ते उमगत नाही. म्हणूनच त्यांना तीनचार महिन्यापुर्वी घोंगावणारी मोदीलाट ओळखता आली नाही की तिच्यातून सावरता आले नाही. तेच लोक आता मोदीलाट ओसरल्याचे हवाले देतात, तेव्हा त्यांची कींव करावीशी वाटते. त्यांच्या अपरिहार्य पराभवातून त्यांना वाचवणे शक्य नसेल, तर त्याच लाटेवर स्वार होऊन उंची गाठणार्‍यांना कपाळमोक्ष होऊ नये यासाठी सावध करण्यात धन्यता मानावी. एका विधान परिषदेच्या जागेवरून अखेरच्या क्षणी एकमेकांना दगा देणारे मित्रपक्ष आगामी विधानसभा निवडणूकीत जागावाटप करून एकदिलाने लढतील, यावर शरद पवार किंवा सोनिया गांधी विसंबून असतील तर आनंदच आहे. लोकसभा मोजणीत २५० जागी युती आघाडीवर आहे, तिला हरवायचे तर दिडशे जागी मागे ढकलावे लागेल. असले मित्र एकजूटीने ते दिव्य कसे पार पाडणार त्यांनाच ठाऊक.

(बहार दैनिक ‘पुढारी’ १७ ऑगस्ट २०१४)