बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

अपराधगंडातून फ़ोफ़ावणारी अंधश्रद्धा



उपरोक्त चित्रात एकाच वस्तूच्या दोन भिन्न अनुभूतीचा अविष्कार दाखवलेला आहे. त्याचा आपल्या जीवनातील अनुभव काय आहे? आपण अशाच भ्रामक जगात जगतो का?

    गेल्या वर्षी याच दरम्यान देशात एक मोठे वादळ घुमत होते. म्हणजे ते वादळ आहे आणि घुमते आहे; असा निदान तमाम वृत्तवाहिन्यांचा दावा असायचा. त्या वादळाने किती धमाल उडवून दिली आहे, त्यावर तासातासाचे ‘शो’ वृत्तवाहिन्या दाखवत होत्या आणि वृत्तपत्रातून त्यांचेच अनुकरण चालू होते. त्या वादळाचे नाव होते ‘सत्यमेव जयते’ उर्फ़ आमिर खानचा टेलीव्हीजन शो. मग त्या कार्यक्रमाने आजवरच्या लोकप्रियतेचे विक्रम कसे मोडले, यापासून त्यातून किती करोड लोक प्रभावित झाले, त्याचेही तोंड फ़ाटेस्तवर कौतुक चालू होते. आता आणखी दोनचार दिवसात जसे लालबागच्या राजापासून देशातल्या एकाहून एक नवसाला पावणार्‍या गणपतीचे ढोल पिटायला वाहिन्यांवरून सुरूवात होईल; तसेच सत्यमेव जयतेचे तेव्हा कौतुक होते. जणू आता आपल्या या एका ‘शो’ मधून आमीर खान देशातल्या तमाम सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणार आहे, असाच देखावा निर्माण करण्यात आला होता. आज वर्षानंतर काय अवस्था आहे? आमीर खान काही कोटी रुपयांची कमाई करून आपल्या चित्रपट निर्मिती उद्योगाकडे साळसूदपणे वळला आहे. तर वाहिन्यांना अन्य सनसनाटी माजवायला नवनवे विषय सापडले आहेत. दरम्यान आमीर बाबांच्या इच्छेला मान देऊन करोडो भक्तांनी बाबांच्या हस्ते त्या त्या विषयात काम करणार्‍यांना संस्थांना देणगी म्हणून लाखो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. आपण मोठेच पवित्र पुण्यकार्य पार पाडल्याचे समाधान त्या भक्तांना लाभले आहे. काही हजार रुपये वा साधा एसएमएस पाठवून केवढे मोठे पुण्य व साधासरळ मोक्ष मिळवता येतो ना?

   तेव्हा जो प्रश्न मी अनेक लेखातून विचारला होता तोच आज पुन्हा विचारतो आहे, लोकांनी दिलेल्या देणगीतून नेमके काय साध्य झाले? आमीर खानच्या त्या ‘शो’मधून काय साध्य झाले? काही काळ लोकांना आपण दीनदुबळ्या रंजल्यागांजल्या लोकांच्या वेदनेशी आपण सहवेदना दाखवल्याचे पुण्य मिळाले आणि जणू पापमुक्त होण्याचा सोपा उपायच त्यांना मिळाला. अंधश्रद्धेपासून बाकीच्या समस्यांपर्यंत असा उद्योग राजरोस चालू असतो. वास्तवात असे उद्योग कुठल्याही भोंदू भगतापेक्षा किती वेगळे असतात? सुशिक्षित असो किंवा अडाणी लोक असोत; त्यांच्यात अंधश्रद्धा रुजवणे व जोपासणे खुपच सोपे व सहजसाध्य असते. माणसातल्या चांगुलपणावर तुम्ही प्रभाव पाडून त्याला भारावून टाकले; मग तो स्वत:च्या विवेकी बुद्धीला पारखा होत असतो आणि त्याला तुम्ही जे सोपे उपाय वा पळवाटा शोधून देत असतात, त्याच्या आहारी जात असतो. त्यासाठी सामान्य माणसातली सत्प्रवृत्ती असते तिच्यावर कब्जा मिळवावा लागतो. ते काम खुप अवघड नसते. कुठल्याही बाबा बुवापासून राजकारणी वा समाजसेवी व्यक्तीपर्यंत असे तंत्र सहज वापरले जात असते. त्याचे तंत्र अगदी सोपे असते.

   तुमच्या मनातल्या चांगुलपणाला चुचकारायचे आणि त्याच्याच आधारे अपराधी भावना निर्माण करायची. तुम्ही इतके सुशिक्षित, शहाणे व बुद्धीमान असुन तुम्ही अशा गोष्टींच्या आहारी जाता? तुमच्यासारख्या माणसाला हे शोभते का? अशा गोष्टींची तुम्हाला लाज वाटत नाही? असे प्रश्न वा सवाल आपल्या वाट्याला नित्यनेमाने येत असतात. त्यातला दुटप्पीपणा ओळखता आला पाहिजे. ‘तुम्ही’ हुशार, प्रामाणिक व बुद्धीमान आहात असे त्यातले गृहीत असते. त्यातून तुमच्याविषयी आदर आणि तुम्ही अन्य कशात गुंतले असल्याने तुमच्याविषयी शंका; असा दुहेरी हल्ला असतो. मग तुम्ही आपल्याविषयी चांगले मत आहे, त्याची जपणूक करायला एकदम सिद्ध होता. परिणामी आपण त्या ‘अन्य कशात’ गुंतलेले नाही, हे दाखवायला धडपडू लागतो. कारण मुळातच असा दुटप्पी हल्ला करणार्‍यांच्या मनात आपल्याविषयी असलेला आदर जपायची धावपळ आपण करू लागतो. ह्या गोष्टी अगदी अनवधानाने सुरू होतात. आपल्याला योग्य वाटेल तसे आपण जगत वागत असताना, असा कोणीतरी आपल्या मनात अकारण आपल्या कुठल्या तरी वागण्याबद्दल अपराधी भावना रुजवू लागतो. मग आपण (त्याच्या मनातला आपला आदर टिकवण्यासाठी) त्याने रुजवलेल्या अपराधी भावनेला खतपाणी घालू लागतो. तिथूनच खरी अंधश्रद्धा सुरू होत असते. देवधर्म वा भुताटकी, सैतानाच्या कल्पना ह्या मुळातच भयगंड व अपराधगंडातून उदयास येत असतात. ज्याला इतरांच्या मनात असा अपराधगंड वा भयगंड निर्माण करणे शक्य असते; तोच आपली मते दुसर्‍यांच्यावर सहजगत्या लादू शकत असतो. तिथूनच अंधश्रद्धेचा जन्म होत असतो. मग ती अंधश्रद्धा देवधर्माची, दैववादाची असो किंवा विज्ञाननिष्ठा वा राजकीय सामाजिक विचारांची असो. त्यातून पहिला बळी घेतला जात असतो, तो तुमच्या विवेकी, चिकित्सक बुद्धीचा. एकदा तुमच्या चिकित्सक बुद्धीचा बळी पडला, की तुमच्या विचारशक्तीचा क्षय होतो आणि बुवा किंवा सुधारक म्हणून समोर आलेली व्यक्ती असो, तुम्ही तिचे निस्सीम भक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करीत असता.

   असा भक्त झाल्याची वा त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची काही प्राथमिक लक्षणे असतात. तुम्हाला आपण शहाणे, बुद्धीमान व विवेकी असल्याचा अहंगंड पछाडतो. परिणामी आपण जे काही सत्य मानले आहे, त्यापेक्षा दुसरा कोणी वेगळे बोलत वा सांगत असेल, त्याच्याविषयी तुमच्या मनात कमालीचा तिटकारा उत्पन्न होऊ लागतो. याला कोणी आपल्या गुरू बुवावरील निष्ठा भक्ती समजत असतील, तर ती चुक आहे. भिन्न विचाराविषयी तिटकारा याचा त्या बुवा-नेत्याच्या प्रतिष्ठेशी वा महत्तेशी काडीमात्र संबंध नसतो. आपण ज्याचा विचारपुर्वक स्विकार केला आहे, तेच चुकीचे असेल तर आपण मुर्ख ठरतो; याचे वैषम्य माणसाला विचलीत करीत असते. त्यातून मग हा भिन्न विचारांचा तिटकारा व द्वेष उत्पन्न होत असतो. भिन्न विचार वा आपल्या भूमिकेतला पोकळपणा, आपल्या निर्बुद्धतेची साक्ष होण्याच्या भयाने मग आपण भिन्न विचारावर तुटून पडत असतो. त्यामुळेच विचार वा भूमिकेची परिक्षा देण्याची वेळ आली, मग उत्तरे देण्यापेक्षा प्रतिहल्ला हाच उत्तम प्रतिवाद होत जातो. त्यामुळेच बुवाबापूंच्या विरोधात विवेकाची प्रवचने देणारेही त्याच भक्तांच्या शैलीने विवेक सोडून बोलू व वागू लागलेले दिसतात. कुणा बुवा बापूचे भक्त जसे आपण योग्य निवड केली असे सिद्ध करण्याच्या नादात आपल्या गुरूच्या नावावर वाटेल ते गुणधर्म व महात्म्य चिकटवू लागतात; तोच प्रकार नेते व महात्म्यांच्या बाबतीतही होताना दिसेल. पण मूलत: त्यामागे आपल्याच मनातला अपराधगंड न्युनगंड असतो. कोणी असा कुठल्या राजकीय आर्थिक सामाजिक वा सांकृतिक भूमिकेचे प्राणपणाने समर्थन करताना दिसेल, तर कोणी बुवा महाराजांच्या महिम्याचे कौतुक सांगताना दिसेल. दोन्हीकडे सारख्याच मानसिक दौर्बल्याचे पिडीत असतात.

   कधी असे मानसिक दौर्बल्य भक्ती म्हणून ओळखले जाते, तर कधी त्याला वैचारिक निष्ठा मानल्या जातात. पण दोघांचे रुप समानच असते. दोन्हीकडली माणसे तशीच मनोदुर्बल असतात व भक्तीमध्ये न्हालेली असतात. अशा मनोदुर्बल लोकांना आपल्या विवेकबुद्धीने काम करायला मोकळीक नसते. त्यांच्या विवेकबुद्धीचा ताबा नेत्याने वा बुवाबापूने घेतलेला असतो. त्यांना विचारापेक्षा प्रतिकांची गरज असते. कळपात सुरक्षितता शोधावी लागत असते. त्यामुळेच मग अशा निष्ठावान व भक्तांचे कळप तयार होतात. त्यांना प्रतिकात गुंतवून ठेवले जाते. त्यांना अवघड वाटणार्‍या गोष्टींची सोपी व चटकन पटणारी उत्तरे द्यावी लागतात. त्यातून एक गोतावळा तयार होतो. वैचारिक असेल तर त्याला चळवळ म्हणतात आणि भक्तीमार्गाचा असेल तर अंधश्रद्धांची गर्दी म्हणतात. बाकी दोन्हीकडे समान सुत्र कार्यरत असते. म्हणूनच आमिर खानच्या आवाहनानंतर लाखो एसएमएस पाठवले गेले. पिडीतांना गरीबांना न्याय देणे आमिरने किती सोपे केले ना? तो निर्मल बाबा असाच मांजराला गहू किंवा उंदराला खीर खाऊ घालायला सांगतो. घोर तपस्या करायला कोणाला हवी असते? कुठे तिर्थस्थळी न जाता नुसते पैसे पाठवूनही अभिषेक उरकले जातातच ना? पुण्य संपादन करायचे हे इतके सोपे उपाय असतात, तसेच मग रंजल्यागांजल्यांना न्याय द्यायला वा मुक्ती देण्यासाठी एसएमएस वा देणगीचे मार्ग खुले असतातच. दोन्हीमध्ये विवेकबुद्धीला स्थान नसते. आपले मनोदौर्बल्य कुणाला शरण जाणार, त्यावर पुढली वाटचाल अवलंबून असते. जोवर आपण अन्य कुणाच्या बोलण्याने वा प्रयत्नाने आपल्या मनात अपराधगंड वा भयगंड निर्माण होण्यावर मात करू शकत नाही, तोवर अंधश्रद्धेला मूठमाती देता येणार नाही.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

इंदिरा युगानंतर कॉग्रेसची अखंड घसरण (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -२०)


   कॉगेसला पर्यायी पक्ष बनण्याच्या मोहिमेत सेक्युलर नाटकाने भाजपाला बहूमोलाचा हात दिला. कारण १९९० सालात अडवाणी यांची रथयात्रा लालुंनी बिहारमध्ये रोखली, तेव्हा दिल्लीतल्या व्ही. पी. सिंग सरकारला व बिहारात लालूंच्या जनता दल सरकारला भाजपाचा पाठींबा होता. अडवाणींना अटक केल्यामुळे भाजपाने सगळीकडचा जनता दला्ला दिलेला पाठींबा काढून घेतला. त्यात मग उत्तर प्रदेश, बिहार व गुजरातमधील जनता दलाची सरकारे सिंग सरकारप्रमाणेच गोत्यात आली. परंतू सेक्युलर सरकारांना वाचवण्याचा पवित्रा कॉग्रेसने राज्यापुरता घेतला आणि तिथे त्या त्या स्थानिक नेत्यांना प्रतिष्ठा मिळाली. लालू व मुलायम त्यातूनच मोठे झाले. मात्र राजीवनी दिल्लीतील सिंग सरकारला पाठींबा द्यायचे नाकारले आणि सरकार गडगडले. पुन्हा फ़ुटीर जनता दल गटाच्या चंद्रशेखर यांना पंतप्रधान व्हायला राजीवनी मदत केली. पण सरकार चालवू दिले नाही. त्यातून मग मध्यावधी निवडणूका अपरिहार्य होऊन दहाव्या लोकसभेसाठी मतदान झाले. तिथून भाजपाचा पर्यायी पक्ष म्हणून उदय सुरू झाला. कारण स्वबळावर ती पहिलीच (१९९१) निवडणूक भाजपाने लढवली होती. त्याच निवडणूकीच्या दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली तरी उरलेल्या मतदानात कॉग्रेसला मोठे यश मिळवता आले नाही. पण अल्पमताचे सरकार बनवता येईल; इतकी मजल कॉग्रेसने मारली. पण कॉग्रेसची घसरगुंडी मात्र सुरू झाली होती. १९८४ ते १९८९ मध्ये दहा टक्के मते गमावणार्‍या कॉग्रेसने राजीव हत्येची सहानूभूती असूनही आणखी तीन टक्के मते त्या निवडणूकीत गमावली. सोबतच्या कोष्टकावरून नुसती नजर फ़िरवली तरी इंदिरायुग संपल्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेस आपल्या मतांची टक्केवारी कशी गमावत आलेली आहे व त्यातून सावरणे त्या पक्षाला किती अशक्य झाले आहे, ते सहज लक्षात येऊ शकते.

   माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी बुडवलेली व सीताराम केसरी यांनी रसातळाला नेलेली कॉग्रेस, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यापासून सावरली असा एक देखावा नेहमीच उभा केला जातो व त्याचा डंका खुप पिटला जातो. पण वस्तुस्थिती सोबतच्या कोष्टकातून स्पष्ट होऊ शकेल. १९९६ सालात राव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा जो दारूण पराभव झाला, पण राव यांनी पराभवातही जितकी मते मिळवली तिथपर्यंतही अजून सोनियांना मजल मारता आलेली नाही. पण याच इंदिरायुगानंतरच्या चोवीस वर्षाच्या कालखंडात भाजपाने मात्र कॉग्रेसशी तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आहे. इंदिरा गांधी यांच्या निर्वाणानंतरच्या या सात लोकसभा निवडणूकांचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणीही लाट निर्माण करू शकणारा वा मतांचे धृवीकरण करू शकणारा नेता लोकांच्या समोर नव्हता. काही प्रमाणात अडवाणी हा खमक्या खंबीर नेता असल्याचा आभास लोकांना झालेला होता. पण त्यांच्यासह वाजपेयी यांच्यावर जो उत्तरभारतीय नेता असल्याचा शिक्का बसलेला होता, तो त्यांना पुसता आलेला नव्हता. सहाजिकच दक्षिणेत त्यांचा प्रभाव अजिबात नव्हता. इंदिरा हत्येनंतर त्यांचा पुत्र व वारस म्हणून त्यांनीच पुढे आणलेल्या राजीव गांधींबद्दल सर्वसामान्य जनतेच्या खुप अपेक्षा होत्या आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांना मिळालेल्या यशात दिसत होते. पण शहाबानू खटल्याचा निकाल व अयोध्येतील रामजन्मभूमी विषयात त्यांनी कच खाल्ली; तेव्हा त्यांच्याविषयी लोकांचा भ्रमनिरास झाला होता. राष्ट्रव्यापी चेहरा म्हणजे लोकांना ज्याच्याबद्दल खुप आशा वाटतात, असा नेता असतो. त्याच्यावर अतीव विश्वास व तितकाच त्याचा कडवा विरोध अशी एकूण लोकसंख्या वाटली जाते, असाच नेता मग लाट निर्माण करू शकतो. कधी त्याच्या विरोधात वा कधी त्याच्या बाजूने लाट उठत असते. तसे कोणी व्यक्तीमत्वच इंदिराजींनंतर शिल्लक राहिले नाही वा उदयास आले नाही. त्यामुळे मग मतदानातही विखुरलेपणा आपल्याला दिसू शकतो. विविध स्थानिक, प्रादेशिक पक्षिय नेत्यांच्या प्रभावाखाली मतदानाचे वाटप झालेले दिसते. जिथे ज्याचा प्रभाव तिथे त्याच्या प्रभावाखालच्या पक्षाचे प्राबल्य असे मतदान झालेले दिसते. २६

   तसा नेता नसला तरी प्रभावी राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपाकडे लोक आशेने बघत होते. उत्तरेतल्या या पक्षाला दक्षिणेत कर्नाटकातही प्रतिसाद मिळत होता. अन्य राज्यात बिगर कॉग्रेस पक्षातील निराश मतदार त्याच्याकडे येत होता. पण सत्तेच्या हव्यासाने अडवाणींपासून त्या पक्षाचे सर्वच नेते सरकारमध्ये दाखल झाले आणि मग सरकार टिकवणे व त्यासाठी बहूमताचे गणित सावरत बसणे; हेच त्याचे काम होऊन बसले. त्यामुळे मग प्रभावी राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपा पुढे येण्याची प्रक्रिया तिथेच थांबली आणि इतर कोणी राष्ट्रीय व्यक्तीमत्वाचा नेताच उपलब्ध नसल्याने डझनावारी महत्वाकांक्षी नेत्यांचा जमाना सुरू झाला. त्यालाच आजकाल सगळे राजकीय अभ्यासक वा निरिक्षक आघाडीचे युग म्हणतात, प्रत्यक्षात कुणी राष्ट्रीय कुवतीचा प्रभावी नेता नसल्याची ती कबुली आहे. म्हणून १९९८-१९९९ या दोन निवडणूकांपासूनचे निकाल बघितले, तर दोन्ही राष्ट्रीय पक्ष समान पातळीवर आहेत आणि कोण अन्य पक्षांच्या मित्रांच्या कुबड्या मिळवतो, त्याच्या गळ्य़ात सत्तेची माळ पडते आहे. दोन्हीपैकी कुठल्याच पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्याची इच्छा व आकांक्षा उरलेली नाही. त्यापेक्षा जागांची व पदांची सौदेबाजी करून सत्ता मिळवणे; हेच कॉग्रेस व भाजपाचे उद्दीष्ट होऊन बसले आहे. म्हणजेच १९६७ सालात कॉग्रेस विरोधी आघाड्यांचे जे राजकारण सुरू झाले, व त्यातून जी अनागोंदी माजलेली होती; तशीच अवस्था मागली पंधरा वर्षे कायम आहे. पण त्यातून देशाची व जनतेची मुक्ती करू बघणारा कोणी नेताच पुढे आला नाही. परिणामी अगतिक होऊन अशा नेत्याची प्रतिक्षा करण्यात मतदार थकून गेला आहे. १९६७-७० दरम्यान ज्या परिस्थितीतून देशाला व समाजाला बाहेर काढण्याचे स्वप्न इंदिरा गांधींनी दाखवले होते, नेमकी तशीच स्थिती एक दिड दशक आपल्या देशात नांदते आहे. सरसकट अराजक, भ्रष्टाचार, गुन्हेगारी बोकाळली आहे. जोवर असे तडजोडीचे व आघाडीचे राजकारण चालणार तोपर्यंत त्यापासून सुटका नाही. पण सुटका तरी कशी व्हायची? कोणी करायची? एकमुखी नेता व एकपक्षीय सत्ता; हाच त्यावरचा उपाय आहे. पण असा नेता व पक्ष आणायचा कुठून? ती क्षमता कॉग्रेस गमावून बसली आहे आणि तिच्या नेत्याकडे तशी इच्छाशक्तीच उरलेली नाही. दुसरीकडे पर्याय म्हणून असलेला भाजपाही उमेद गमावून बसला आहे. स्वबळावर सत्ता मिळवायची तर पक्षाची संघटनात्मक ताकद उभारण्याची भाजपाकडे इच्छाच दिसत नाही.

   सोनियांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर तसा प्रयत्न केला होता. आरंभकाळात पंचमढी येथे पक्षाचे चिंतन शिबीर घेतले; तेव्हा त्यांनी कॉग्रेसची नव्याने संघटना बांधणी व स्वबळावर सत्ता मिळवण्याचे बोलून दाखवले होते. पण २००४ च्या निवडणूका जवळ येईपर्यंत त्यांचीही उमेद संपून गेली आणि त्यांनी भाजपाप्रमाणे मित्र पक्ष व आघाडीच्या राजकारणासमोर नांगी टाकली. मिळतील तेवढ्याच मतांमधून अधिक जागा व मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता बळकावण्याचा मार्ग त्यांनी स्विकारल्यावर, सर्वांना आघाडीचे युग आल्याचे वाटल्यास नवल नाही. वास्तविक ती जशी सोनियांची चुक होती; तशीच ती भाजपाच्या नेतृत्वाचीही चुक होती. आज जे प्रादेशिक पक्ष व नेत्यांचे प्राबल्य वाढलेले दिसते; त्याला राष्ट्रीय पक्षाची सत्तालंपटता खरी जबाबदार आहे. तेव्हा म्हणजे १९९६ सालात भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झालेला असला तरी तो बहूमताच्या किंचितही जवळ पोहोचला नव्हता. त्यामुळेच त्याने सत्तेवर दावा करण्याचे कुठलेही कारण नव्हते. अर्थात तांत्रिक कारणास्तव राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रण देतात, त्याप्रमाणे भाजपाला तसे आमंत्रण मिळाले होते. पण शिवसेना व अकाली दल अशा काही निवडणूकपूर्व मित्रांची सोबत असताना भाजपाने शपथविधीची घाई केली. जर बहूमताचे समिकरण आपल्या अटीवर जमत नव्हते, तर सत्तेपासून दूर बसायला काय हरकत होती? अन्य पक्ष सेक्युलर म्हणून एकत्र येणार असतील, तर त्यांना तसे करू देण्यात काही गैर नव्हते. पण तेरा दिवसाचे अल्पायुषी सरकार बनवून भाजपाने आपल्या सत्तालंपटतेची पहिली साक्ष दिली आणि तिथून त्याच्याविषयी मतदाराचा भ्रमनिरास सुरू झाला. मग भाजपाला बाजूला ठेवून जे सेक्युलर खिचडीचे सरकार तयार झाले; त्याला दोन वर्षेही कारभार करता आला नाही. त्यामुळे दोनच वर्षात ती लोकसभा बरखास्त करावी लागली. बाराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची जागा व मते आणखी वाढली. पण सरकार स्थापन करण्यासाठी धावत सुटलेल्या भाजपाच्या नेत्यांनी मग कुणालाही सोबत घेऊन, सत्ता संपादनासाठी वाटेल त्या तडजोडी सुरू केल्या. मतदाराकडे मते मागताना दिलेल्या शब्दांना हरताळ फ़ासून भाजपाने आपले महत्वाचे मुद्दे सोडुन दिले. तरीही सत्ता टिकू शकली नाही आणि दिड वर्षात पुन्हा मध्यावधी निवडणूकीची पाळी आली. त्यात जागा टिकवणार्‍या भाजपाने दोन टक्के मते गमावली आहेत. त्यातून राष्ट्रीय पर्याय होऊ बघणार्‍या या पक्षाविषयी मतदाराचा भ्रमनिरास होऊ लागल्याची लक्षणे आकड्यात स्पष्ट दिसतात.
(अपुर्ण)
============================================
एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील कॉग्रेस व भाजपा(जनसंघ) यांची तुलनात्मक आकडेवारी

निवडणूक                    कॉग्रेसची टक्केवारी       मिळालेल्या जागा     भाजपाची टक्केवारी   जागा

पहिली लोकसभा १९५२         ४४.९९%                    ३६४          ३.०६%             ३
दुसरी लोकसभा १९५७         ४७.७८%                    ३७१          ५.९७%             ४
तिसरी लोकसभा १९६२         ४४.७२%                    ३६१          ६.४४%             १४
चौथी लोकसभा  १९६७         ४०.७८%                     २८३          ९.३१%             ३५
पाचवी लोकसभा १९७१         ४३.६८%                     ३५२          ७.३५%            २२
सहावी लोकसभा १९७७         ३४.५२%                   १५४          --------------------------
सातवी लोकसभा १९८०         ४२.६९%                    ३५३          ---------------------------
आठवी लोकसभा १९८४         ४९.१९%                    ४०४           ७.७४%             २
नववी लोकसभा १९८९          ३९.५३%                    १९७           ११.३६%            ८५
दहावी लोकसभा १९९१          ३६.२६%                     २३२           २०.११%            १२०
अकरावी लोकसभा १९९६        २८.८०%                   १४०           २०.२९%            १६०
बारावी लोकसभा १९९८         २५.८२%                    १४१           २५.५९%            १८२
तेरावी लोकसभा १९९९         २८.३०%                      ११४           २३.७५%            १८२       
चौदावी लोकसभा २००४        २६.५३%                    १४६           २२.१६%             १३८
पधरावी लोकसभा २००९        २८.५५%                   २०६           १८.८०%            ११६ 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

भाजपा कॉग्रेसला असा पर्याय बनत गेला (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -१९)



   विचारधारा, राजकीय तत्वज्ञान, भूमिका वा आर्थिक सामाजिक कार्यक्रम, अशा शब्दांचे बुडबुडे कितीही उडवले, तरी संसदीय लोकशाही म्हणजे कायदेमंडळातील बहुसंख्येचा आकडा; हेच एकमेव अंतिम व्यवहारी सत्य असते. त्यामुळेच ज्या पक्षाकडे, आघाडीकडे वा नेत्याच्या मागे बहुमताचा आकडा असतो; तो म्हणेल तसेच राज्य चालणार असते. ते राजकीय विद्वानांना, अभ्यासकांना, संपादक पत्रकारांना अमान्य असले म्हणून बिघडत नाही. तसे नसते तर एव्हाना गुजरातचे मुख्यमंत्री कधीच फ़ासावर गेले असते आणि त्यांच्या नावाची भावी पंतप्रधान म्हणून त्याच शहाण्यांना चर्चा करण्याची वेळच आली नसती. पण विद्वानांच्या बुद्धीनुसार लोकशाही चालत नसून समाजातील मतदाराची संख्या व त्याने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या संख्येनुसारच राज्य वाटचाल करीत असते. त्यामुळेच उद्या होणार्‍या लोकसभा निवडणूका वा यापुर्वी झालेल्या निवडणूकीतले आकडे फ़ार महत्वाचे असतात. आपल्या देशातली लोकशाही म्हणजे पर्यायाने लोकमत कुठल्या दिशेने झुकते आहे; त्याची चाहूल त्याच आकड्यातून लागत असते. किंबहूना जे स्वत:ला राजकीय पंडित म्हणवतात, त्यांना तर त्याचा थांगपत्ताही लागत नाही, असेच आजवरच्या निकालांनी दाखवून दिलेले आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हा आगामी निवडणूकीतला घटक समजून घेताना, मागील विविध निवडणूकीतले आकडे अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या लोकसभेचे भाकित करायचे, तर म्हणूनच आधीच्या पंधरा लोकसभातील जनमानसाने दिलेल्या कौलाचा आधार घ्यावाच लागतो.

   इथे त्यासाठीच मी मागल्या पंधरा लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीची दोन कोष्टके दिलेली आहेत. त्यापैकी एक कोष्टक आज देशातले दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष मानले जातात, त्या कॉग्रेस व भाजपा यांची त्या प्रत्येक निवडणूकीतील कामगिरी मतांच्या आकड्यात व मिळवलेल्या जागांमध्ये दिसू शकते. त्यापैकी पहिल्या पाच निवडणुका भाजपाने जनसंघ म्हणून तर नंतरच्या दोन जनता पार्टीचा घटक म्हणून लढवल्या आहेत. उरलेल्या मागल्या आठ लोकसभा निवडणूका त्याने भाजपा म्हणून लढवल्या आहेत. तर कॉग्रेसने दोन फ़ाटाफ़ुटीनंतरही आपले अस्तित्व कायम राखले आहे. त्या प्रदिर्घ सहा दशकांच्या कालखंडात शून्यापासून सुरूवात करणारा जनसंघ उर्फ़ आजचा भाजपा कसा कॉग्रेसला तुल्यबळ होत आला; त्याचा स्पष्टपणे साक्षात्कार घडू शकतो. पण त्याच कालखंडात दुसरीकडे कॉग्रेस पक्षाने आपले एकमेवाद्वितीय स्थान होते, तेही कसे क्रमाक्रमाने गमावले त्याचेही स्वच्छ दर्शन घडू शकते. विसाव्या शतकाची अखेर येईपर्यंत भाजपाने कॉग्रेसला तुल्यबळ होण्यापर्यंत मजल मारली होती. पण त्याच्याही पुढली मजल मारून पहिल्या क्रमांकाचा वा सर्वात प्रबळ राष्ट्रीय पक्ष होण्यापर्यंत भाजपा पोहोचू शकला नाही, हे त्या पक्षाच्या नेतृत्वाचे अपयश मानता येईल. कारण कॉग्रेससहीत अन्य पक्षांच्या वैचरिक व्यवहारी दिवाळखोरीला वैतागलेला भारतीय मतदार क्रमाक्रमाने भाजपाकडे कसा झुकत होता, त्याचीच साक्ष हे आकडे देतात. दुसर्‍या कोष्टकात केवळ प्रमुख बिगर कॉग्रेसी पक्षांचे आकडे दिलेले आहेत. त्यातूनही अर्धा कालखंड मतदार कसा विविध पक्षांना संधी देऊन बघत होता व त्यातून कोणाची निवड पर्याय म्हणून करायला बघत होता, त्याची साक्ष मिळू शकेल. म्हणूनच ते आकडे समजून घेण्याची गरज आहे.

   पहिल्या पाच निवडणूका जनसंघ म्हणून लढताना भाजपाची मजल केवळ आठ नऊ टक्के मतांपर्यंतच गेली होती आणि आणिबाणीनंतर जनता पक्षात विलीन होऊन बाहेर पडल्यावर नव्याने भाजपा म्हणून चुल मांडली; तेव्हाही भाजपा नेमका त्याच टक्केवारीपर्यंतच अडकून पडलेला आहे. पाचवी व आठवी लोकसभा निवडणूक लढवताना जनसंघ-भाजपाने मिळवलेली मते साडेसात टक्क्यांच्या आसपास आहेत. तर पहिल्या आठ निवडणूका लढवताना कॉग्रेसने नेहमी चाळीस टक्क्यांच्या आसपास आपली मते कायम राखलेली आहेत. त्यातून एक गोष्ट सिद्ध होते, की तोपर्यंत कॉग्रेस पक्षाला कधीच खरे राजकीय आव्हान उभे राहिले नव्हते किंवा कुठल्याच पक्षाने तसा प्रयत्नही केला नव्हता. त्याला अपवाद होता १९७७ सालचा चार पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनता पक्षाचा. पण तो पक्ष एकाच विचारधारेचा वा तत्वज्ञानाचा बांधील नव्हता. त्यामुळेच त्यात लौकरच फ़ाटाफ़ूट झाली. एकप्रकारे एका चिन्हावरच निवडणूक लढवलेली ती चार पक्षांची आघाडीच होती. त्यात समाजवादी, जनसंघीय, चरणसिंग यांचे भारतीय लोकदल, संघटना कॉग्रेस व आणिबाणीनंतर फ़ुटलेला कॉग्रेसचा जगजीवनराम गट असे घटक होते. त्यांची एकत्रित मते जनता पक्ष म्हणून दिसतात. तिथे त्या पक्षाने कॉग्रेसवर मतांच्या टक्केवारीसह जागा मिळवण्यात मात केलेली दिसते. पण तो प्रयोग टिकणारा नव्हता व टिकलाही नाही. त्यामुळेच त्याला कॉग्रेस समोरचे राजकीय आव्हान म्हणता येत नाही. याच अवस्थेमुळे कॉग्रेस पक्षाला कधीच निवडणूका जिंकण्याचे भय वाटले नाही. हे विखुरलेले पक्ष इंदिरा हत्येच्या लाटेत वाहून गेल्यावर राजीव गांधी थट्टेने म्हणाले होते, ‘इनका लोकदल तो परलोक दल हो गया.’ मात्र त्यात भाजपाचा धुव्वा उडाला आणि त्या एका पक्षात गंभीरपणे आपला भक्कम पाया उभारण्याचे चिंतन सुरू झाले. तिथून मग कॉग्रेसला खर्‍या अर्थाने पर्याय उभा करण्याचा प्रयास भाजपाने हाती घेतला, त्याचे प्रतिबिंब मग पुढल्या निवडणूक निकालांच्या आकडेवारीमध्ये पडलेले दिसू शकते. १९८४ सालात विक्रमी ४९ टक्के मते व ४०४ जागा जिंकणार्‍या कॉग्रेसच्या तुलनेत भाजपाची काय अवस्था होती? दोन जागा मिळवणार्‍या भाजपाला अवघी पावणे आठ टक्के मते मिळाली होती. पण त्याच भाजपाने पुढल्या चौदा वर्षात व चार निवडणूकीत थेट कॉग्रेसशी बरोबरी करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. तर दुसरीकडे कॉग्रेसच्या मतांची निम्मे आणि जागांची ६५ टक्के घसरण झालेली आहे.

   १९८४ सालात अवघ्या दोन जागा जिंकणार्‍या भाजपाने पाच वर्षात ८५ जागा जिंकल्या त्याचे सर्वत्र खुप कौतुक झाले व आजही त्याचा अगत्याने उल्लेख केला जातो. पण वास्तवात ते भाजपाचे यश खुप फ़सवे आहे. कारण बोफ़ोर्स भानगडीने विरोधकांना एकत्र आणले, मतविभागणी टाळण्याच्या डावपेचातून ते यश भाजपाला मिळाले होते. त्यासाठी जनता दल व अन्य पक्षांशी भाजपाने युती आघाडी केलेली होती. त्यामुळेच कमी मते व अधिक जागा असे गणित साधले गेले. पण त्यातून जी भूमिका मांडण्यात भाजपाने पुढाकार घेतला होता, तिला प्रतिसाद मिळू लागल्याचे परिणाम त्यानंतरच्या निवडणूकीत दिसू लागले. कॉग्रेस विरोधी मते घेऊन नंतर सेक्युलर थोतांड करीत पुन्हा विरोधी मतांचा विचका करणार्‍या समाजवादी व जनता दलाच्या राजकारणाला विटलेला मतदार, त्यानंतर क्रमाक्रमाने भाजपाकडे वळत गेलेला दिसेल. एकीकडे कॉग्रेस विरोधी जागा भाजपा व्यापत चालला होता आणि दुसरीकडे कॉग्रेसचा मतदार अन्य (स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे) पक्ष वा प्रादेशिक नेते बळकावत चालल्याचे दिसून येईल. कॉग्रेसने आपल्याच प्रादेशिक व स्थानिक नेत्यांचे खच्चीकरण केल्याने जी पोकळी निर्माण झाली होती, तिथे तिथे बिगर भाजपा पक्षातून उदयास आलेले स्थानिक नेते कॉग्रेसची जागा व्यापत गेलेले आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग, मायावती, ओरिसामध्ये पटनाईक, कर्नाटकात देवेगौडा, बिहारमध्ये लालूप्रसाद, पासवान, बंगालमध्ये कॉग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या ममता बानर्जी, अशा नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कॉग्रेसची जागा व्यापलेली आहे. तर जिथे सेक्युलर असलेले अन्य पक्ष कॉग्रेसशी सेक्युलर चुंबाचुंबी करीत गेले, तिथे तिथे भाजपाने आपले बस्तान पक्के केलेले दिसेल. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक अशा राज्यांचा समावेश होतो. तर बिहार, उत्तरप्रदेश अशा राज्यातही भाजपाला तीच संधी मिळाली. पण तिथल्या सेक्युलर अन्य पक्षांना कॉग्रेसने आपली जागा मोकळी करून दिली. यातून कॉग्रेसची ताकद घटत गेली आणि तितक्या प्रमाणात भाजपाचा आकार वाढत गेला. याचे प्रमुख कारण असे दिसेल, की कॉग्रेसकडे इंदिराजींप्रमाणे जनमत प्रभावित करू शकेल असा कोणी नेताच उरला नव्हता. तर अडवाणी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली भाजपा हिंदूत्व घेऊन पुढे निघाला होता. तुलनेने भाजपाकडे तेव्हा सर्वात आक्रमक नेता होता.
(अपुर्ण)
============================

एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील कॉग्रेस व भाजपा(जनसंघ) यांची तुलनात्मक आकडेवारी

निवडणूक                    कॉग्रेसची टक्केवारी       मिळालेल्या जागा     भाजपाची टक्केवारी   जागा

पहिली लोकसभा १९५२         ४४.९९%                    ३६४          ३.०६%             ३
दुसरी लोकसभा १९५७         ४७.७८%                    ३७१          ५.९७%             ४
तिसरी लोकसभा १९६२         ४४.७२%                    ३६१          ६.४४%             १४
चौथी लोकसभा  १९६७         ४०.७८%                     २८३          ९.३१%             ३५
पाचवी लोकसभा १९७१         ४३.६८%                     ३५२          ७.३५%            २२
सहावी लोकसभा १९७७         ३४.५२%                   १५४          --------------------------
सातवी लोकसभा १९८०         ४२.६९%                    ३५३          ---------------------------
आठवी लोकसभा १९८४         ४९.१९%                    ४०४           ७.७४%             २
नववी लोकसभा १९८९          ३९.५३%                    १९७           ११.३६%            ८५
दहावी लोकसभा १९९१          ३६.२६%                     २३२           २०.११%            १२०
अकरावी लोकसभा १९९६        २८.८०%                   १४०           २०.२९%            १६०
बारावी लोकसभा १९९८         २५.८२%                    १४१           २५.५९%            १८२
तेरावी लोकसभा १९९९         २८.३०%                      ११४           २३.७५%            १८२       
चौदावी लोकसभा २००४        २६.५३%                    १४६           २२.१६%             १३८
पधरावी लोकसभा २००९        २८.५५%                   २०६           १८.८०%            ११६ 

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

१९५२ ते २००९ कालखंडातील पंधरा लोकसभा

लौकरच सोळाव्या लोकसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुसंडीने सर्वांनाच त्या निवडणूकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता वाटू लागली आहे. मतचाचण्या, अंदाज, आडाखे यांना ऊत आलेला आहे. अशावेळी ज्या सामान्य माणसाला मागल्या पंधरा लोकसभा निवडणुकीचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल व त्यामागचे राजकारण समजून घ्यावेसे वाटत असेल; त्यांच्यासाठी. एक भाग आज तुल्यबळ वाटणार्‍या कॉग्रेस व भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे आकडे आणि दुसरा भाग बिगर कॉग्रेस पक्षांची स्वातंत्र्योत्तर काळात झालेली वाटचाल; असे या आकडेवारीचे स्वरूप आहे. निवडणूका व मतदाराचा बदलता कल समजून घेऊ इच्छिणार्‍यांसाठी ती आकडेवारी उपयुक्त ठरावी ही अपेक्षा.


एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील कॉग्रेस व भाजपा(जनसंघ) यांची तुलनात्मक आकडेवारी

निवडणूक                    कॉग्रेसची टक्केवारी       मिळालेल्या जागा     भाजपाची टक्केवारी   जागा

पहिली लोकसभा १९५२         ४४.९९%                    ३६४          ३.०६%             ३
दुसरी लोकसभा १९५७         ४७.७८%                    ३७१          ५.९७%             ४
तिसरी लोकसभा १९६२         ४४.७२%                    ३६१          ६.४४%             १४
चौथी लोकसभा  १९६७         ४०.७८%                     २८३          ९.३१%             ३५
पाचवी लोकसभा १९७१         ४३.६८%                     ३५२          ७.३५%            २२
सहावी लोकसभा १९७७         ३४.५२%                   १५४          --------------------------
सातवी लोकसभा १९८०         ४२.६९%                    ३५३          ---------------------------
आठवी लोकसभा १९८४         ४९.१९%                    ४०४           ७.७४%             २
नववी लोकसभा १९८९          ३९.५३%                    १९७           ११.३६%            ८५
दहावी लोकसभा १९९१          ३६.२६%                     २३२           २०.११%            १२०
अकरावी लोकसभा १९९६        २८.८०%                   १४०           २०.२९%            १६०
बारावी लोकसभा १९९८         २५.८२%                    १४१           २५.५९%            १८२
तेरावी लोकसभा १९९९         २८.३०%                      ११४           २३.७५%            १८२      
चौदावी लोकसभा २००४        २६.५३%                    १४६           २२.१६%             १३८
पधरावी लोकसभा २००९        २८.५५%                   २०६           १८.८०%            ११६

==============================================================

एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील प्रमुख बिगर कॉग्रेस पक्षांची तुलनात्मक आकडेवारी

मतांची टक्केवारी (जागा)       भाजपा(जनसंघ)   समाजवादी(सर्व गट)    कम्युनिस्ट(सर्व गट)  

पहिली लोकसभा १९५२        ३.०६% (३)          १०.५९ (१२)        ३.२९ (१६)
दुसरी लोकसभा १९५७         ५.९७% (४)        १०.४१ (१९)        ८.९२ (२७)          
तिसरी लोकसभा १९६२         ६.४४% (१४)         ६.८१ (१२)         ९.९४(२९)  
चौथी लोकसभा  १९६७          ९.३१% (३५)         ७.९८ (३६)        ९.३९ (४२)
पाचवी लोकसभा १९७१         ७.३५% (२२)        ३.४७ (५)         ९.८५ (४८)        
सहावी लोकसभा १९७७         ४१.३२ (२९५)<<<<<<<<<           ७.११ (२९)
सातवी लोकसभा १९८०         १९.९७ (३१) +++++९.३९ (४१)        ६.७३ (४७)
आठवी लोकसभा १९८४         ७.७४% (२)       १२.८६ (१३)         ८.५८ (२८)        
नववी लोकसभा १९८९          ११.३६% (८५)      १७.७९ (१४३)      ९.१२ (४५)          
दहावी लोकसभा १९९१           २०.११% (१२०)      ११.८४ (५९)       ८.६५ (४९)              
अकरावी लोकसभा १९९६       २०.२९% (१६०)     १०.२५ (५४)       ८.०९ (४४)
बारावी लोकसभा १९९८         २५.५९% (१८२)     ५.०० (१८)        ६.९१ (४१)
तेरावी लोकसभा १९९९          २३.७५% (१८२)     ४.०१ (२२)        ६.८८ (३७)
चौदावी लोकसभा २००४        २२.१६% (१३८)     तुकडे तुकडे       ७.०७ (५३)
पधरावी लोकसभा २००९       १८.८०% (११६)     तुकडे तुकडे         ६.७६ (२०)

(१९७७ व १९८० साली भाजपा जनता पक्षात सोबत होता. त्यामुळे त्यांचे वेगळे आकडे नाहीत. तर १९८० सालात समाजवाद्यांचा एक गट वेगळा झाला त्याचे आकडे वेगळे दाखवले आहेत.)