गेल्या वर्षी याच दरम्यान देशात एक मोठे वादळ घुमत होते. म्हणजे ते वादळ आहे आणि घुमते आहे; असा निदान तमाम वृत्तवाहिन्यांचा दावा असायचा. त्या वादळाने किती धमाल उडवून दिली आहे, त्यावर तासातासाचे ‘शो’ वृत्तवाहिन्या दाखवत होत्या आणि वृत्तपत्रातून त्यांचेच अनुकरण चालू होते. त्या वादळाचे नाव होते ‘सत्यमेव जयते’ उर्फ़ आमिर खानचा टेलीव्हीजन शो. मग त्या कार्यक्रमाने आजवरच्या लोकप्रियतेचे विक्रम कसे मोडले, यापासून त्यातून किती करोड लोक प्रभावित झाले, त्याचेही तोंड फ़ाटेस्तवर कौतुक चालू होते. आता आणखी दोनचार दिवसात जसे लालबागच्या राजापासून देशातल्या एकाहून एक नवसाला पावणार्या गणपतीचे ढोल पिटायला वाहिन्यांवरून सुरूवात होईल; तसेच सत्यमेव जयतेचे तेव्हा कौतुक होते. जणू आता आपल्या या एका ‘शो’ मधून आमीर खान देशातल्या तमाम सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणार आहे, असाच देखावा निर्माण करण्यात आला होता. आज वर्षानंतर काय अवस्था आहे? आमीर खान काही कोटी रुपयांची कमाई करून आपल्या चित्रपट निर्मिती उद्योगाकडे साळसूदपणे वळला आहे. तर वाहिन्यांना अन्य सनसनाटी माजवायला नवनवे विषय सापडले आहेत. दरम्यान आमीर बाबांच्या इच्छेला मान देऊन करोडो भक्तांनी बाबांच्या हस्ते त्या त्या विषयात काम करणार्यांना संस्थांना देणगी म्हणून लाखो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. आपण मोठेच पवित्र पुण्यकार्य पार पाडल्याचे समाधान त्या भक्तांना लाभले आहे. काही हजार रुपये वा साधा एसएमएस पाठवून केवढे मोठे पुण्य व साधासरळ मोक्ष मिळवता येतो ना?
तेव्हा जो प्रश्न मी अनेक लेखातून विचारला होता तोच आज पुन्हा विचारतो आहे, लोकांनी दिलेल्या देणगीतून नेमके काय साध्य झाले? आमीर खानच्या त्या ‘शो’मधून काय साध्य झाले? काही काळ लोकांना आपण दीनदुबळ्या रंजल्यागांजल्या लोकांच्या वेदनेशी आपण सहवेदना दाखवल्याचे पुण्य मिळाले आणि जणू पापमुक्त होण्याचा सोपा उपायच त्यांना मिळाला. अंधश्रद्धेपासून बाकीच्या समस्यांपर्यंत असा उद्योग राजरोस चालू असतो. वास्तवात असे उद्योग कुठल्याही भोंदू भगतापेक्षा किती वेगळे असतात? सुशिक्षित असो किंवा अडाणी लोक असोत; त्यांच्यात अंधश्रद्धा रुजवणे व जोपासणे खुपच सोपे व सहजसाध्य असते. माणसातल्या चांगुलपणावर तुम्ही प्रभाव पाडून त्याला भारावून टाकले; मग तो स्वत:च्या विवेकी बुद्धीला पारखा होत असतो आणि त्याला तुम्ही जे सोपे उपाय वा पळवाटा शोधून देत असतात, त्याच्या आहारी जात असतो. त्यासाठी सामान्य माणसातली सत्प्रवृत्ती असते तिच्यावर कब्जा मिळवावा लागतो. ते काम खुप अवघड नसते. कुठल्याही बाबा बुवापासून राजकारणी वा समाजसेवी व्यक्तीपर्यंत असे तंत्र सहज वापरले जात असते. त्याचे तंत्र अगदी सोपे असते.
तुमच्या मनातल्या चांगुलपणाला चुचकारायचे आणि त्याच्याच आधारे अपराधी भावना निर्माण करायची. तुम्ही इतके सुशिक्षित, शहाणे व बुद्धीमान असुन तुम्ही अशा गोष्टींच्या आहारी जाता? तुमच्यासारख्या माणसाला हे शोभते का? अशा गोष्टींची तुम्हाला लाज वाटत नाही? असे प्रश्न वा सवाल आपल्या वाट्याला नित्यनेमाने येत असतात. त्यातला दुटप्पीपणा ओळखता आला पाहिजे. ‘तुम्ही’ हुशार, प्रामाणिक व बुद्धीमान आहात असे त्यातले गृहीत असते. त्यातून तुमच्याविषयी आदर आणि तुम्ही अन्य कशात गुंतले असल्याने तुमच्याविषयी शंका; असा दुहेरी हल्ला असतो. मग तुम्ही आपल्याविषयी चांगले मत आहे, त्याची जपणूक करायला एकदम सिद्ध होता. परिणामी आपण त्या ‘अन्य कशात’ गुंतलेले नाही, हे दाखवायला धडपडू लागतो. कारण मुळातच असा दुटप्पी हल्ला करणार्यांच्या मनात आपल्याविषयी असलेला आदर जपायची धावपळ आपण करू लागतो. ह्या गोष्टी अगदी अनवधानाने सुरू होतात. आपल्याला योग्य वाटेल तसे आपण जगत वागत असताना, असा कोणीतरी आपल्या मनात अकारण आपल्या कुठल्या तरी वागण्याबद्दल अपराधी भावना रुजवू लागतो. मग आपण (त्याच्या मनातला आपला आदर टिकवण्यासाठी) त्याने रुजवलेल्या अपराधी भावनेला खतपाणी घालू लागतो. तिथूनच खरी अंधश्रद्धा सुरू होत असते. देवधर्म वा भुताटकी, सैतानाच्या कल्पना ह्या मुळातच भयगंड व अपराधगंडातून उदयास येत असतात. ज्याला इतरांच्या मनात असा अपराधगंड वा भयगंड निर्माण करणे शक्य असते; तोच आपली मते दुसर्यांच्यावर सहजगत्या लादू शकत असतो. तिथूनच अंधश्रद्धेचा जन्म होत असतो. मग ती अंधश्रद्धा देवधर्माची, दैववादाची असो किंवा विज्ञाननिष्ठा वा राजकीय सामाजिक विचारांची असो. त्यातून पहिला बळी घेतला जात असतो, तो तुमच्या विवेकी, चिकित्सक बुद्धीचा. एकदा तुमच्या चिकित्सक बुद्धीचा बळी पडला, की तुमच्या विचारशक्तीचा क्षय होतो आणि बुवा किंवा सुधारक म्हणून समोर आलेली व्यक्ती असो, तुम्ही तिचे निस्सीम भक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करीत असता.
असा भक्त झाल्याची वा त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची काही प्राथमिक लक्षणे असतात. तुम्हाला आपण शहाणे, बुद्धीमान व विवेकी असल्याचा अहंगंड पछाडतो. परिणामी आपण जे काही सत्य मानले आहे, त्यापेक्षा दुसरा कोणी वेगळे बोलत वा सांगत असेल, त्याच्याविषयी तुमच्या मनात कमालीचा तिटकारा उत्पन्न होऊ लागतो. याला कोणी आपल्या गुरू बुवावरील निष्ठा भक्ती समजत असतील, तर ती चुक आहे. भिन्न विचाराविषयी तिटकारा याचा त्या बुवा-नेत्याच्या प्रतिष्ठेशी वा महत्तेशी काडीमात्र संबंध नसतो. आपण ज्याचा विचारपुर्वक स्विकार केला आहे, तेच चुकीचे असेल तर आपण मुर्ख ठरतो; याचे वैषम्य माणसाला विचलीत करीत असते. त्यातून मग हा भिन्न विचारांचा तिटकारा व द्वेष उत्पन्न होत असतो. भिन्न विचार वा आपल्या भूमिकेतला पोकळपणा, आपल्या निर्बुद्धतेची साक्ष होण्याच्या भयाने मग आपण भिन्न विचारावर तुटून पडत असतो. त्यामुळेच विचार वा भूमिकेची परिक्षा देण्याची वेळ आली, मग उत्तरे देण्यापेक्षा प्रतिहल्ला हाच उत्तम प्रतिवाद होत जातो. त्यामुळेच बुवाबापूंच्या विरोधात विवेकाची प्रवचने देणारेही त्याच भक्तांच्या शैलीने विवेक सोडून बोलू व वागू लागलेले दिसतात. कुणा बुवा बापूचे भक्त जसे आपण योग्य निवड केली असे सिद्ध करण्याच्या नादात आपल्या गुरूच्या नावावर वाटेल ते गुणधर्म व महात्म्य चिकटवू लागतात; तोच प्रकार नेते व महात्म्यांच्या बाबतीतही होताना दिसेल. पण मूलत: त्यामागे आपल्याच मनातला अपराधगंड न्युनगंड असतो. कोणी असा कुठल्या राजकीय आर्थिक सामाजिक वा सांकृतिक भूमिकेचे प्राणपणाने समर्थन करताना दिसेल, तर कोणी बुवा महाराजांच्या महिम्याचे कौतुक सांगताना दिसेल. दोन्हीकडे सारख्याच मानसिक दौर्बल्याचे पिडीत असतात.
कधी असे मानसिक दौर्बल्य भक्ती म्हणून ओळखले जाते, तर कधी त्याला वैचारिक निष्ठा मानल्या जातात. पण दोघांचे रुप समानच असते. दोन्हीकडली माणसे तशीच मनोदुर्बल असतात व भक्तीमध्ये न्हालेली असतात. अशा मनोदुर्बल लोकांना आपल्या विवेकबुद्धीने काम करायला मोकळीक नसते. त्यांच्या विवेकबुद्धीचा ताबा नेत्याने वा बुवाबापूने घेतलेला असतो. त्यांना विचारापेक्षा प्रतिकांची गरज असते. कळपात सुरक्षितता शोधावी लागत असते. त्यामुळेच मग अशा निष्ठावान व भक्तांचे कळप तयार होतात. त्यांना प्रतिकात गुंतवून ठेवले जाते. त्यांना अवघड वाटणार्या गोष्टींची सोपी व चटकन पटणारी उत्तरे द्यावी लागतात. त्यातून एक गोतावळा तयार होतो. वैचारिक असेल तर त्याला चळवळ म्हणतात आणि भक्तीमार्गाचा असेल तर अंधश्रद्धांची गर्दी म्हणतात. बाकी दोन्हीकडे समान सुत्र कार्यरत असते. म्हणूनच आमिर खानच्या आवाहनानंतर लाखो एसएमएस पाठवले गेले. पिडीतांना गरीबांना न्याय देणे आमिरने किती सोपे केले ना? तो निर्मल बाबा असाच मांजराला गहू किंवा उंदराला खीर खाऊ घालायला सांगतो. घोर तपस्या करायला कोणाला हवी असते? कुठे तिर्थस्थळी न जाता नुसते पैसे पाठवूनही अभिषेक उरकले जातातच ना? पुण्य संपादन करायचे हे इतके सोपे उपाय असतात, तसेच मग रंजल्यागांजल्यांना न्याय द्यायला वा मुक्ती देण्यासाठी एसएमएस वा देणगीचे मार्ग खुले असतातच. दोन्हीमध्ये विवेकबुद्धीला स्थान नसते. आपले मनोदौर्बल्य कुणाला शरण जाणार, त्यावर पुढली वाटचाल अवलंबून असते. जोवर आपण अन्य कुणाच्या बोलण्याने वा प्रयत्नाने आपल्या मनात अपराधगंड वा भयगंड निर्माण होण्यावर मात करू शकत नाही, तोवर अंधश्रद्धेला मूठमाती देता येणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा