गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ‘शुभेच्छा’  नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीत चारपैकी तीन विधानसभा निवडणूकीत भाजपाने मोठेच यश मिळवले, हे आकड्यातुनच आपण बघू शकतो. त्यापैकी सर्वात छोटे व एका महानगरापुरते मर्यादित राज्य असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभेत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता आणि आक्रमक प्रचार केला होता. तेव्हा मोदी भाजपाला कितपत यश मिळवून देतील, याची चर्चा चालली होती. प्रत्येक वाहिनी व माध्यमातून मोदींमुळे कदाचित तिथे भाजपाला अपयश मिळण्याची भाकितेही केली जात होती. पण चारपैकी तीन राज्यात भाजपाने नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर श्रेयाची वेळ आल्यावर मात्र कुणालाच मोदी आठवलेला नाही. उलट यात मोदींचा करिष्मा नसून भाजपाचे स्थानिक नेते वा मुख्यमंत्री कसे प्रभावी होते; त्याचे विश्लेषण व कारणे शोधण्यात तमाम माध्यमे गर्क झाली. उलट दिल्लीत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले, तर त्याचे खापर मात्र मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्यासाठी पत्रकारांमध्ये शर्यत सुरू आहे. तेवढेच नाही, तर भाजपापेक्षाही कमी यश मिळवलेल्या नवख्या आम आदमी पक्ष व त्याचे नेते संस्थापक अरविंद केजरीवाल, यांचे कौतुक करताना अन्य तीन राज्यात भाजपाने प्रचंड यश मिळवल्याचे कोणालाही आठवेनासे झाले आहे. खरे तर त्याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकात सेक्युलर पत्रकारीतेचा अनुभव घेणार्‍या लोकांना आता असल्या विश्लेषणाची व बातम्या चर्चेची सवय अंगवळणी पडलेली आहे. तेव्हा केजरीवाल यांचे अवास्तव कौतुक चालले आहे, असे मी अजिबात म्हणणार नाही. केजरीवाल हे आगामी लोकसभा निवडणूकीत मोदींना कसे झोपवतील, तेही ऐकायला मोठी मजा येते आहे. अवघ्या काही दिवसात केजरीवाल यांना घाबरून युरोप अमेरिकेतील भलेबुरे पक्षही तिथे केजरीवाल यांना वचकू लागल्याच्या बातम्या कानावर आल्या; तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. उलट एक मोदी समर्थक म्हणून मला तेच ऐकायला आवडते आहे. कारण अशा स्वप्नरंजनानेच मोदी यांना लढण्याची हिंमत मिळते आणि ते अधिक त्वेषाने कामाला लागतात, असा इतिहास आहे. त्यामुळेच मोदींच्या पराभवाचे असे माध्यमातील स्वप्नरंजन त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक आहे, असे माझे अनुभवी मत आहे.

   माझे अनुभवी मत म्हणजे काय? तसे गेल्या दहा बारा वर्षातले असे अनुभव खुप आहेत. पण त्यातल्या त्यात अलिकडचा म्हणजे अवघ्या अकरा महिन्यापुर्वीचा एक अनुभव इथे पुराव्यासहित मांडतो. मोदींच्या विरोधातली कुठलीही खोटीनाटी वा नगण्य माहिती हाती लागली वा तशी नुसती आशा दिसली, तरी आपले सेक्युलर पत्रकार व माध्यमे किती भारावून वहावत जातात, ते वेगळे सांगायला नको. याच वर्षाच्या आरंभी १४ जानेवारी रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर झालेले होते. तिथे अधिकृतरित्या पक्षाची अधिकारसुत्रे मातेकडून पुत्राला सोपवण्याचा सोहळा पार पडला होता. त्याच चिंतन शिबीरात नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भगव्या दहशतवादाचा आरोप करून तोंडघशी पडले होते, हे अनेकांना आठवत असेल. तिथेच राहुल गांधी यांनी आपले मन मोकळे करताना आपला कौटुबिक वारसा सांगण्यापासून भावनेला हात घालणारे प्रदिर्घ भाषण करून दाखवले होते. अर्थात तेही त्यांनी लिहून आणलेले वा कोणाकडून लिहून घेतलेले व वाचून दाखवलेले होते. पण त्या भाषणाने सभोवती जमलेले कार्यकर्ते व निष्ठावान कॉग्रेसजन भारावून गेलेले होते. बहुतेकांचे डोळे पाणावलेले होते. व्यासपिठावर बसलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत बहुतेक ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनी उभे राहून नव्या उपाध्यक्ष युवराजाना सलामी दिली होती. मुजरा नाही, तरी गळाभेट करून आपल्या निष्ठांचे जाहिर प्रदर्शन केलेले होते. ज्यांना गळाभेट करण्याइतके जवळपास फ़िरकता येत नाही, त्यांनी डोळे ओले करून आपल्या निष्ठा व्यक्त केल्या होत्या. त्यात केवळ घराण्याला निष्ठा वाहिलेले कॉग्रेसजन होते असे मानायचे कारण नाही. तितक्याच संख्येने तमाम सेक्युलर पत्रकार माध्यमेही भारावून गेलेली होती. त्या एका ‘वाचलेल्या’ भावनापुर्ण भाषणामुळे आता देशातली कॉग्रेसची सत्ताच नव्हे, तर मोदींनी बुडवू घातलेला सेक्युलॅरिझमही बुडताबुडता ‘वाचवला’ जाणार होता. यामुळे बहुतांश माध्यमे निश्चिंत होऊन गेली होती. आणि आपला जीव भांड्यात पडल्याचे जाहिरपणे सांगण्याची आपल्याला ‘लाज’ वाटत नाही अशी जाहिरात करायचीही त्यांना लाज वाटलेली नव्हती. यालाच भारावून जाणे म्हणतात. आणि एकदा भारावून गेले, मग सारासार बुद्धीला तिलांजली दिली जात असते. अशी बुद्धीला तिलांजली देणारे केवळ तिथे जमा झालेले कॉग्रेसजनच नव्हते. म्हणूनच आज अकरा महिन्यानंतर कोणी तेव्हा भारावलेल्या कॉग्रेसजनांना राहुलच्या अपयशासाठी जाब विचारणार असेल, त्याने आधी आपल्याही तशाच भारवण्याचा आधी जबाब दिला पाहिजे. कारण राहुलच्या व पर्यायाने कॉग्रेसच्या अशा दिवाळखोरीला तसे भारावणारे कॉग्रेस नेते जबाबदार असतील, तर तितकेच त्यांना अंधारात ठेवताना आपली बुद्धी गहाण टाकणारे पत्रकार व सेक्युलर बुद्धीमंतही त्या अपयशाचे भागिदार आहेत. त्यांनाही आजच्या कॉग्रेसी अपयशाची जबाबदारी उचलावीच लागेल.

   तुमच्यापैकी कोणी कायबीईन लोकमतची थोरली भगिनी सीएनएन कायबीईन बघत असेल तर त्यावरच्या दोन महान सेक्युलर महिला पल्लवी घोष व सागरिका घोष तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील. या दोघी गेला आठवडाभर आपल्या वाहिनीवरून कुठल्याही कॉग्रेस नेत्याला राहुलच्या अपयशाची कारणे विचारत आहेत. त्याचवेळी राहुलच्या अपात्रतेचा जाब विचारत आहेत. तशीच एनडीटीव्हीची बरखा दत्त तेच करते आहे. पण अकरा महिन्यांपुर्वी या तिघीजणी काय अकलेचे तारे तोडत होत्या? आज कोणाला त्याची आठवण तरी आहे काय? आपापल्या वाहिन्यांवर राहुलच्या महान भाषणाचे गोडवे गावून झाल्यावरही त्यांच्या तोंडातली लाळ संपलेली नव्हती, म्हणून त्यांनी ती फ़ेसबुक आणि ट्विटरवर सांडून ठेवलेली होती. त्या लाळघोटेपणाचे अकरा महिन्यात सुककेले सांडगे कोणाला बघायचे असतील, तर त्यांनी याच लेखात टाकलेले त्याचे चित्ररूप बघा्वे आणि वाचावे.

   पल्लवी घोष: ‘राहुलचे हेलावून सोडणारे भाषण, विशेषत: त्याचा शेवटचा भाग अप्रतिम, हे कबूल करायची मला लाज वाटत नाही.’
   पल्लवी घोष: ‘(श्रीराम कॉलेजमधील) मोदींचे भाषण खुप राजकीय होते, (विद्यार्थ्यांसमोर) अशा भाषणासाठी ही जागा योग्य होती काय असा प्रश्न पडतो.’

   सागरिका घोष: ‘राहुलचे आजचे भाषण आजवरचे सर्वात उत्तम. व्यवस्था परिवर्तन, समावेशकता, त्याचा आवाज व त्यातील भावनिक स्पर्श छान. त्यामागे जयराम रमेश असतील का?’
   सागरिका घोष:  ‘श्रीराम कॉलेजमध्ये आपण मोदींना कापूस, मीठ, केळी, आयुर्वेद, शिक्षक यावर बोलताना ऐकले. पण देशासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना काय आहेत?’

   बरखा दत्त: ‘राहुल गांधींच्या भाषणातील भावनात्मक भाग मनाला खुप भावला. विशेषत सत्ता हे जहर असल्याचा संदर्भ हृदयस्पर्शी होता’
   बरखा दत्त: ‘श्रीराम कॉलेजातील मोदींचे भाषण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याची तुतारीच होती. प्रश्न इतकाच, की त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला भाजपा इतका कशाला कचरतो आहे?

   आपणच अकरा महिन्यांपुर्वी उधळलेली मुक्ताफ़ळे किंवा गाळलेली लाळ या तीन विदुषींना आज आठवते तरी आहे काय? पण अशा लाळेचा पुर आणणार्‍यांनी बिचार्‍या राहुल गांधींना पुरते नाकातोंडात पाणी जाऊन बुडवले आहे. असल्या लाळघोट्यांच्या नादाला न लागता चौकात उभे राहून बोंबलणार्‍या केजरीवालांचे कान देऊन ऐकावे; असे राहुलना वाटू लागले आहे. आणि या विदूषी वा त्यांच्याप्रमाणेच अकरा महिन्यापुर्वी चाटूगिरी करण्यात गर्क असलेल्यांना आता राहुलकडे बघायचीही गरज वाटेनाशी झाली आहे. त्यांनी बुडवण्यासाठी नवी शिकार शोधली आहे. अकरा महिन्यापुर्वी जितके अवास्तव कौतुक, लाळघोटेगिरी राहुलच्या बाबतीत चालू होती, त्याहीपेक्षा अधिक आज केजरीवाल यांच्या बाबतीत चालू आहे. त्यामुळे अशा सेक्युलर माध्यमांचे व त्यातल्या पत्रकारांचे पुढले सावज, लक्ष्य कोण असणार आहे, ते वेगळे सांगायला हवे काय? त्यांनी असली चाटुकारी केली नसती, तर नुकत्याच संपलेल्या विधानसभांच्या प्रचारार राहुलने ‘मेरी दादीको मारा, मेरे पापाको मारा’ असली मुक्ताफ़ळे कशा उधळली असती? राहुलही जनसामान्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर व त्याचे उपाय सांगण्याविषयीच बोलले असते आणि त्यांच्या पक्षाला निदान काही प्रमाणात जास्त जागा मिळू शकल्या असत्या. पण अशा चाटूकार भारावणार्‍या भाटांनी आजवर मोठमोठ्या सम्राटांना बघता बघता बुडवले आहे. तिथे राहुल गांधींची काय कथा? अशा परोपजिवी बांडगुळांना फ़स्त करण्यासाठी कुठले तरी एक सशक्त झाड आवश्यक असते. त्यामुळेच त्यांनी आता केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षाला हरभर्‍याच्या झाडावर चढवले, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मोदींचे दिल्ली वा इतरत्रचे लोकांच्या मनाला जाऊन भिडणारे भाषण नाकारण्याने वा त्याचे परिणाम झाकून ठेवल्याने चार विधानसभा निवडणूकीच्या निकालावर परिणाम झाला नाही. आताही तीन राज्यातले मोदींचे यश व मतदाना्वर पडलेला प्रभाव झाकून ठेवल्याने येत्या लोकसभा निवडणूकी्त मोदींचे कुठलेही नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. चिंताच करायची असेल, तर अशी मंडळी आज ज्यांचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत आहेत, त्यांनी करावे. दिल्लीच्या निकालांनी भारावलेल्यांच्या गदारोळात केजरिवाल मग्न झालेले दिसतात आणि पुढल्या गर्जनाही करू लागले आहेत. त्यांना शुभेच्छा. 

८ टिप्पण्या:

 1. mastch bhau tumhi liha koni vachtoy ki nahi yacha vichar karu naka .
  konachya replyaychi vat pahu naka vachanare vachtat

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. हल्ली माध्यमांच्या कल्होळात फक्त चाटूगिरीचं प्रदर्शन होत असताना भाऊ तुम्ही परखड आणि पटेल तेच लिहिता म्हणून कुठलीही बातमी आली की त्यावर तुमचं मत काय हे जाणून घ्यायची उत्सुकता लागते. अप्रतिम लिखाण.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. दिल्लीतील विचारवंत हे बव्हंशी करीयरवादी असून त्यांच्या अस्तित्वाच्या नाड्या सत्ताधा-यांकडे असतात. एक तर ते कुठल्यातरी पदाचे फायदे उपभोगत असतात नाही तर त्यांच्या बायका कुठल्यातरी विद्यापिठात प्राध्यापिका असतात. हे एक कोंडाळे आहे आणि त्यात कालबाह्य समाजवाद्यांचा भरणा आहे. एकादे वादळ उठवायचे वा शमवायचे कसे हे यांना चांगले अवगत आहे. दरवेळी नवनवे मुखवटे धारण करण्यात यांचा हातखंडा आहे. आपले शुध्द तुपातले विश्लेषण त्यांच्यासाठी नासवू नका.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. लय भारी भाऊ ! आपण जे लिहले ते १००% खरे झालेले आपण पहातच आहोत. भाऊ तुमच्या लेखनीला सलाम !

  प्रत्युत्तर द्याहटवा