गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूष इतके क्षुल्लक नसतात

सामर्थ्य आहे चळवळीचे (४)

  समर्थ रामदासांनी पुन्हा मुर्तीपूजेचे थोतांड सुरू केले, असाही एक आक्षेप असू शकतो. पण त्यात तथ्य नाही. सवाल देवळातल्या देवाचा वा त्यातल्या मुर्तीचा नाही. गावोगावी अशा देवळांची स्थापना ही प्रतिकात्मक होती. त्यातून त्या त्या गावात वस्तीमध्ये अस्मितेची प्रतिके त्यांना उभारायची होती. त्यामागे त्या मुर्तीचे थोतांड उभे करण्यापेक्षा तिला अस्मितेचे प्रतिक बनवून तिच्या संरक्षणार्थ उभे ठाकण्याची प्रेरणा स्थानिक पातळीवर रुजवण्याचा हेतू महत्वाचा होता. माणूस कुठल्या तरी अभिमान स्वाभिमानासाठीच लढायला उभा रहातो आणि त्यासाठी अशी प्रतिके मोलाची कामगिरी बजावत असतात. आजही आपल्या देशाच्या सीमेवर थंडीवारा सोसत उभा असलेला जवान सैनिक तिरंगा नावाच्या एका प्रतिकासाठीच लढत असतो आणि आपले प्राण ओवाळून टाकत असतो. तेव्हा तेही एक कापडच असते. त्या झेंड्याला आपला बचाव करता येत नसेल, तर त्याची महत्ता ती काय; असे आपण म्हणत नाही. कारण ते हिदूस्तानच्या अस्मितेचे प्रतिक असते. तसेच धर्मस्थान वा श्रद्धास्थान हे निव्वळ प्रतिक असते. कधी सजीव तर कधी निर्जीव असते. त्याच्यात कुठली चमत्कारी शक्ती नसते. त्यातला चमत्कार त्याच्यासाठी लढायला उभ्या ठाकणार्‍या समाज समुहामध्ये दडलेला असतो. म्हणूनच धर्मस्थान वा देवळाची महत्ता सामुहिक जीवनात मोठी असते. दोन दशके उलटून गेल्यावरही अयोध्येत उध्वस्त करण्यात आलेल्या निरूपयोगी अवशेषरुपी बाबरी मशीदीचे तेच कौतुक आहे. आजही मुस्लिम त्यासाठी अश्रू ढाळत असतात व कुठल्याही स्तराला जाऊन आक्रोश करीत असतात. कारण त्या स्थानाला अस्मितेचे रुप आहे. समर्थांनी नव्याने देवळांच्या उभारणीची मोहिम हाती घेतली, कारण त्यांच्याच समकालीन शिवरायांनी धर्मासह भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे कंकण हाती बांधले होते. त्या संस्कृतीच्या अस्मितेची प्रतिके जागोजागी उभी करून समाजातला स्वरंरक्षणाचा पुरूषार्थ जागवणे; हा त्याचा एक हेतू होता. तसाच एकूण हिंदू समाजातील क्षात्रवृत्तीचे पुनरुत्थान हा दुसरा हेतू त्यामागे होता. अशा रितीने आपल्या वस्तीतले गावातले अस्मितेचे प्रतिक जपायला पुढे येण्यातून जी लढावूवृत्ती जोपासली जाणार होती, तीच पुढे सैनिक होऊन शिवरायांच्या सैन्यात भरती व्हायला हातभार लावणार होती.

   थोडक्यात समर्थांनी आपली अध्यात्मिक चाकोरी सोडून राजकीय, सामाजिक वाट चोखाळली होती, तर शिवरायांनी राजकीय सत्तेत राहुन परमार्थाची सामाजिक जबाबदारी उचलली होती. दोघेही चाकोरी सोडून एकाच कालखंडात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कामाला लागले होते. या दोघांनी परस्पर पुरक कार्य आरंभले होते आणि त्यांच्या कुठल्याही काम वा कृतीने एकमेकांच्या उद्दीष्टाला छेद दिला नाही. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदून जाऊ शकले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्राचाच नव्हेतर भारतवर्षाचा इतिहास बदलून गेला. सभोवारचे अनेक देश व राष्ट्रे, समाज आपली परंपरा, वारसा व इतिहास गमावून बसले; त्याच काळात हिंदूस्तानला मात्र आपली ओळख व वारसा टिकवता आलेला आहे. आफ़्रिकेपासून मलेशियापर्यंत सभोवारच्या भूगोलाचा ऐतिहासिक चेहरामोहराच बदलून गेला. आज तिथल्या समाजाला आपलीच पूर्वपुण्याई आठवू शकत नाही, अशा प्रदिर्घ कालखंडात भारताचा चेहरामोहरा कायम राहू शकला. त्यामागे महाराष्ट्रातील या दोघा महापुरूषांची दूरदृष्टी व दुर्दम्य इच्छाशक्तीच कारणीभूत झाली आहे. मग ते परस्परांशी संबंधित होते, गुरूशिष्य़ होते किंवा सहकारी होते, असल्या वादाला अर्थच उरत नाही. दोघांनी साधलेले परिणाम अभूतपुर्व आणि कौतुकास्पद आहेत. त्यांच्यातले वाद व वितुष्ट शोधणार्‍यांना आज इतिहासाचा अभ्यास वा छाननी करता येते; त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी भारतीय अस्मितेला सुखरूप राखण्यासाठी केलेले परस्पर पुरक व संयुक्त प्रयास हेच आहे. दोघेही परस्परांच्या शत्रूसारखे वागले वा जगले असते; तर आपलीही अवस्था पाकिस्तान वा इराण, इजिप्तसारखी होऊन आपण ऐतिहासिक वारशाबद्दल बोलूही शकलो नसतो. उलट शेकडो वर्षापुर्वी कधीकाळी अरबी प्रदेशात इस्लामच्या आरंभ काळात जे पंथ निर्माण झाले, त्याच्या अभिमानाने प्रेरित होऊन शिया-सुन्नी अशा वैरासाठी एकमेकांच्या उरावर बसलो असतो. समर्थ रामदास ब्राह्मण होते किंवा शिवराय मराठा होते, त्यामुळे त्यांच्या जातीची अस्मिता घेऊन आपण भांडूही शकलो नसतो. कारण आपली तशी जातीची वा वारशाची ओळखही आपण केव्हाच विसरून गेलो असतो.

   ज्या जातीय भेदभाव वा पक्षपाताच्या भूमिकेत आजचे काही विद्वान वा या महापुरूषांचे पाठीराखे एकमेकांची उणीदुणी काढत असतात आणि त्यासाठी त्याच महात्म्यांची नावे घेत असतात; त्यांना त्या थोरपुरूषांच्या जीवनाचे उद्दीष्ट व सार कितपत कळले आहे, याचीच मग शंका येते. हे त्यांचे भक्त वा अनुयायी ज्या आवेशात एकमेकांच्या अंगावर जात असतात व परस्परांना नामोहरम करीत असतात, तसेच तेव्हा त्या दोघांनी केले असते; तर आज समर्थ रामदास किंवा शिवराय असली नावेही आपल्याला आठवली नसती. ती आपल्याला आठवतात, स्मरणात आहेत, कारण त्यांनी आपल्या कार्यकाळात परस्परांना पुरक असे समाज जोडायचे व समाज उभा करण्याचे संयुक्त कार्य पार पाडलेले आहे. आजच्या जातीय अस्मितेचीच कास धरत त्यांनीही परस्परांच्या विरोधातली लढाई केली असती; तर कोणी मराठा राहिला नसता किंवा कोणी ब्राह्मणही राहिला नसता. इथेही शिया-सुन्नी असल्या रक्तरंजित संघर्षात आपणही अस्मिता गमावल्यासारखे भरकटत गेलो असतो. शिवराय, समर्थ रामदास किंवा ज्ञानेश्वर-तुकोबा ही इतकी प्रचंड व्यक्तीमत्व असतात, की त्यांचे आकलन होण्यापुर्वीच आपले आयुष्य़ संपून जाऊ शकेल. अमावस्येचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र जसे भिन्न दिसतात, तसे आपण या महापुरूषांना भिन्न स्वरुपात पाहून त्यावरूनच भांडत बसतो. पण त्यांच्या कार्याची महती वा त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा थांग आपल्याला लागलेला नसतो. म्हणूनच त्यांच्यातले गुण व त्यांची शिकवण आत्मसात करण्यापेक्षा आपण त्यांच्यात काय नव्हते, याचा शोध घेऊन चिखलफ़ेक करण्यात धन्यता मानू लागतो. तिथेच मग आपण त्यांचाच पराभव करीत असतो. त्यांच्याच महान कार्याची व इतिहासाची विटंबना करीत असतो. लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीने सागराला घागरीचे क्षुल्लक रूप देत असतो. शिवराय किंवा समर्थ रामदास यांचे ऐतिहासिक कर्तृत्व सागरासारखे अथांग अफ़ाट असते, तो महासागर उपसण्यापेक्षा त्यातली रत्ने माणके शोधावीत. इतक्या पराक्रमी व कर्तबगार थोरपुरूषांच्या संरक्षण वा समर्थनासाठी आपल्यासारख्या क्षुल्लक लोकांनी धावावे; इतके ते छोटे नसतात. आपणही आपल्या मोठेपणासाठी त्यांना छोटे करू नये, इतकेच सांगावेसे वाटते. (समाप्त)

1 टिप्पणी:

  1. इतक्या पराक्रमी व कर्तबगार थोरपुरूषांच्या संरक्षण वा समर्थनासाठी आपल्यासारख्या क्षुल्लक लोकांनी धावावे; इतके ते छोटे नसतात. आपणही आपल्या मोठेपणासाठी त्यांना छोटे करू नये, इतकेच सांगावेसे वाटते.
    समर्पक समाप्ती व प्रतिकांच्या रुपाने अस्मितांचा जाणू के करणे महत्वपूर्ण. जाती मूलक विचारकांचे भड़काऊ लेखन कुठे वा आपल्या प्रगल्भ वैचारिकतेचा प्रगल्भ पणा कुठे! आपण खरे तर छाती बडवत नाहीतर ताबूतांचे डोलारे वाहून शिया - सुन्नी लढ्यात हिरीरीने भाग घेणारे व्हायचो. वगैरे वाचताना... शिवाजी महाराज व त्यांचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते.

    उत्तर द्याहटवा