मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

इतिहास घडवतात ते महापुरूष

सामर्थ्य आहे चळवळीचे (३)

   इतिहास घडत असतो, तसाच घडवला जात असतो. बहुतांश लोक इतिहास घडेल तसे बघत बसतात आणि त्याला शरण जातात. पण मोजकेच लोक असे असतात, जे इतिहासाची मनमानी स्विकारत नाहीत. ते इतिहासाला वळण देऊ बघतात, त्यासाठी झुंजतात. शिवराय आणि समर्थ रामदासांचा कालखंड बघितला तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात इतिहासाला शरण गेलेल्या समाजात इतिहासाशी झुगारणारे तरूण उदयास आले. शिवरायांच्या समकालीन अनेक मराठे व हिंदू राजांपाशी शौर्य होते. पण इतिहासाला गवसणी घालून त्याला वेगळा आकार देण्य़ाच्या इच्छेचा त्यांच्यामध्ये अभाव होता. जी सरंजामशाहीची चाकोरी अनेक पिढ्यांपासून तयार झालेली होती, ती सोडण्याची इच्छाच तेव्हाचे अनेक सरदार जहागिरदार गमावून बसले होते. अशावेळी शिवराय त्या ऐषारामी जीवनाला झुगारण्यास पुढे सरसावले. त्यांनी चाकोरी सोडून बलाढ्य वाटणार्‍या बादशहा, सुलतानांच्या सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रस्थापित सरदारांची मदत मागण्यापेक्षा त्यांनी नव्या दमाच्या तरूणांना हाताशी धरले आणि त्यातूनच नवे सरदार लढवय्ये उभे केले. पारंपारिक युद्धाची निती ही सत्ता किंवा संपत्ती, धनदौलत संपादन करण्याची होती. पण शिवरायांची निती त्यापासून अगदीच भिन्न म्हणजे चाकोरीला छेद देणारी अशी आढळते. त्यांनी उभे केलेल्या सामाजिक नेतृत्वामध्ये अस्मितेची धार दिसते. तशी धार तात्कालीन अन्य कुठल्या राजा, सरदाराच्या सेनेत किंवा सहकार्‍यांमध्ये आढळून येत नाही. आपले राज्य स्थापन करावे आणि आपण राजा व्हावे म्हणून त्यांनी लोकांना लढायला आमंत्रित केले नाही. सामुहिक अस्मितेसाठी व तिच्या संरक्षणासाठी लढणारे तरूण शिवरायांनी उभे केले. त्यांच्या सवंगड्यांच्या कथा त्याची साक्ष देतात.

   लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे, असे म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे किंवा आधी लगीन कोंडाण्य़ाचे, असे बोलून गेलेला तानाजी मालुसरे, निव्वळ टाळ्या मिळवणारी चमकदार वाक्ये बोललेले नाहीत. त्यातून त्यांनी शिवरायांच्या राजनितीचेच पाठ सांगितले आहेत. लाख मेले तरी चालतील, म्हणजे सामान्य सैनिकापेक्षा राजवंशाची महत्ता बाजीप्रभू सांगत नव्हता. तर शिवरायांसारखा दुर्मिळ नेता हरपला तर अवघी स्वराज्याची चळवळच संपुष्टात येईल, असेच त्याला म्हणायचे होते. आपल्यासारखे लढणारे शेकडो मिळतील, निर्माण होतील, पण शिवरायांसारखा प्रेरणादायी नेता क्वचितच कुणा समाजाला मिळतो, तो गमावून चालणार नाही; असेच त्याला म्हणायचे होते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिवराय त्याला सुखरूप सोबतच घेऊन जायला उत्सुक आहेत व तसे सांगत आहेत. पण खुद्द राजाच्या आदेशाची बाजीप्रभू एकप्रकारे अवज्ञाच करतो आहे. कारण त्याच्यासारख्या सहकार्‍याला गमावण्याच्या चिंतेने राजा भावुक झालेला होता. तो आपली अवज्ञा करीत नसून आपल्याला कर्तव्याची जाणिव करून देतो, हे समजण्याइतके शिवराय प्रगल्भ होते. तर आधी लगीन कोंडाण्याचे म्हणणारा तानाजीही महाराजांना स्वराज्याच्या चळवळीतील प्राधान्याची आठवण करून देतो आहे. खुद्द महाराज रायबाच्या लग्नसोहळ्यानंतर कोंडाण्याच्या मोहिमेचे बोलतात. पण तानाजी त्यांना नकार देतो आणि महाराजही ते मान्य करतात? राजाची अवज्ञा वाटण्यासारखी तीसुद्धा घटना आहे. पण त्यातून स्वराज्याची लढाई, ही तात्कालीन राजकीय सामाजिक उत्थानाची कशी प्रभावी चळवळ होती, त्याचीच साक्ष मिळते. जेव्हा असे सहकारी महाराज शोधतात व निवडतात, तेव्हा त्यामागची प्रेरणा किती संन्यस्त होती, याचेच दाखले मिळतात. असे सरदार, सहकारी शिवरायांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढत नव्हते, तर एका समाजाच्या अस्मितेचे पुनरुत्थान करण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले होते. एकूणच त्या कालखंडाचे परिशीलन केल्यास जाणवते, की तो इतिहास एका चळवळीचा होता. त्यात लढाईचे वा मनगटाचे, तलवारीचे सामर्थ्य काम करीत नव्हते; तर चळवळीचेच सामर्थ्य ओळखून स्वराज्याची मुहूर्तमेढे रोवली गेली होती. त्याच कालखंडातले संन्यासी समर्थ रामदासही स्वराज्याचा मंत्र देत फ़िरतात आणि अध्यात्मातून तीच ज्योत पेटवत जातात, हा योगायोग नसतो.

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे

   हे समर्थांचे शब्द नेमके त्या घडामोडींशी जुळणारे का असावेत? मग त्यांच्याकडून घेतलेल्या अनुग्रहानंतर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती काय? मुळात महाराजांनी समर्थांना गुरू तरी मानले होते काय? असले वाद आता खेळण्यात अर्थ नाही. कारण त्यातला बारीकसारीक तपशील इतिहासजमा झालेला आहे. महत्वाचे आहे, ते त्यातून साधले गेलेले ऐतिहासिक परिणाम. कारण या दोघा महापुरूषांनी केलेले परस्पर पुरक कार्य मराठी व हिदूस्तानी समाजाचे अपुर्व असे पुनरुत्थान करून गेलेले आहे. जेव्हा समस्त हिंदुस्तानातील बिगर इस्लामी स्थानिक राजसत्ता मोडकळीस आलेल्या होत्या आणि लढण्याची कुवत हरवून बसल्या होत्या;  त्याच कालखंडात या दोघा महापुरूषांनी या खंडपाय देशाची अस्मिता सामर्थ्याने प्रतिकारासाठी उभी करण्याचे महान कार्य केलेले आहे. सातव्या शतकानंतर जेव्हा इस्लामी फ़ौजा धर्मप्रसारासाठी हाती शस्त्र घेऊन चौफ़ेर उधळल्या; तेव्हा त्यांच्या टाचेखाली जगातल्या अनेक समाज-संस्कृती पुरत्या जमीनदोस्त होऊन गेल्या. आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. अनेक समाज व राष्ट्रे आपला वारसाच गमावून बसली आहेत. अस्मिताही हरवून गेली आहेत. कधीकाळी आपापल्या उत्क्रांत धर्म संस्कृती परंपरांमध्ये उन्नत झालेल्या शेकडो लहानमोठ्या समाजांच्या खाणाखुणा आज आशियासह आफ़्रिका खंडातून बेपत्ता होऊन गेल्या आहेत. सुमेरियन वा बायझंटाईन, पर्शियन संस्कृती उध्वस्त होऊन गेल्या आहेत. जगातले अदभूत रहस्य मानल्या जाणार्‍या पिरॅमिडसारख्या उन्नत संस्कृतीचा वारसा इजिप्शियनांना आठवत सुद्धा नाही. इराण्यांना आपली भरभराटलेली पर्शियन संस्कृती माहितही नाही. अफ़गाणिस्तानची उदात्त बौद्ध संस्कृती नामशेष होऊन गेली. हा सर्व विध्वंस होत असतानाच्या काळातच भारतीय व हिंदू संस्कृतीलाही ग्रहण लागलेले होते. पण तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडायला कुणी सामर्थ्यवान या उपखंडातून पुढे यायला राजी नव्हता. पण तरीही आज ती कित्येक शतकांचा वारसा सांगणारी भारतीय संस्कृती टिकून राहिली, त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या दोन महापुरूषांचे आहे आणि त्यांच्या परस्पर पुरक सामाजिक आध्यात्मिक कार्यालाच आहे. ते समकालीन शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासच होत. कारण त्यांनी अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे इस्लामी आक्रमणाला शरण जाऊन नष्ट होण्यास नकार दिला आणि प्रतिकाराची चळवळ इथे रुजवली व जोपासलेली होती. त्यातून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

   तसे संत परंपरेतूनही याच धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणाला सशस्त्र नव्हेतर सामुहिक प्रतिकार करण्याचे आंदोलन त्याच आधीच्या कालखंडात सुरू होते. मुस्लिम नसणे वा इस्लामचा स्विकार केला नाही, तर नागरिकांना आपल्याच जन्मभूमीत दुय्यम व पक्षपाती वागणूक देण्याचा जो अन्याय सुरू झाला होता, त्याला तोंड द्यायला संतांनी कंबर कसली होती. एकेकट्या पडलेल्या समाजाला त्यांनी वारकरी बनवून धर्मापेक्षाही आपला सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या मोहिमा चालविल्या. एक जमाव आपल्या देवधर्माचा जयघोष करीत उजळमाथ्याने घराबाहेर पडून मैलोगणती यात्रा करीत पंढरपुराला जाऊ लागला. मग जिथे म्हणून त्याचा मुक्काम पडायचा, तिथे गावातले लोक वारकर्‍यांची सेवा पाहुणचार म्हणून शेवटी आपल्या धर्माची व संस्कृतीचीच पाठराखण करायला निर्भयपणे घराबाहेर पडू लागले. थोडक्यात देवळातला देव धोक्यात आला, तेव्हा याच संत परंपरेने मनातली धर्माची व संस्कृतीची अस्मिता जपण्याची सामुहिक मोहिम चालविली होती. ती सुद्धा चळवळच होती. भारतातले धर्म मुळातच संघटित स्वरूपातले नव्हते आणि आक्रमक परके तर संघटित धर्माची व धर्मप्रसाराचीच मोहिम घेऊन अंगावर आलेले. त्यातून धर्म व संस्कृती जगवण्याचा प्राथमिक प्रयास केला, तो संत परंपरेने. पुढे त्या जगवलेल्या संस्कृती व धर्माच्या अस्मितेतून क्षात्रधर्माचे स्फ़ुल्लींग पेटवण्याचे काम शिवाजी महाराज व समर्थांनी शिरावर घेतले. तिथून संत परंपरा खंडीत झाल्यासारखी दिसते. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सामुहिक चळवळीचे इतिकर्तव्य तिथे थांबले. कारण देवळांचे संरक्षण करणारा समर्थ राजा व योद्धा उदयास आला होता. म्हणून की काय, त्याच संत परंपरेची धुरा पुढल्या काळात देवळांची नव्याने उभारणी करणार्‍या समर्थांकडे आलेली दिसते. गावोगावी त्यांनी नव्याने देवळांची, देवस्थानांची उभारणी करण्याची मोहिम हाती घेतली. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा