शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

डॉ. दाभोळकर, त्या पुरोगाम्यांना माफ़ करा   गुरूवारची संध्याकाळ दवाखान्यातच गेली. आपण एकदा डॉक्टरांच्या तावडीत सापडलो, की त्यांनी मोकळीक करण्यापर्यंत आपल्याला निघता येत नाही. सहाजिकच त्या दिवशी विविध वाहिन्यांवरचे प्राईमटाईम वा चर्चा हुकल्या. मग जेवण वगैरे उरकून बातम्या बघितल्या; त्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. डॉ. दाभोळकरांच्या हत्येला महिना पुर्ण होत आला आणि अजून कोणा संशयितालाही अटक झालेली नाही, अशी ती तक्रारवजा बातमी होती. तेच निमित्त साधून पत्रकार युवराज मोहिते यांच्या पुढाकाराने जादूटोणा कायद्याचे सोपे चित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झाल्याची बातमी त्याच्या सोबतच सांगितली गेली. ह्या पुस्तकाचे प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालेले चित्रणही दाखवले गेले. त्यात राजसोबत दाभोळकरांची कन्या मुक्ता व युवराज दिसत होते. नंतर त्यासंबंधाने राज ठाकरे यांची खोचक प्रतिक्रियाही दाखवण्यात आली. तसे पाहिल्यास त्यात नवे असे काहीच नव्हते. दाभोळकर यांच्या हत्येनंतर तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज यांनी जो संशय व्यक्त केला होता, त्याचीच त्यांनी महिनाभराने पुनरुक्ती केलेली होती. अन्य कुठल्याही गुन्ह्याचे आरोपी व पुरावे सापडतात, मग दाभोळकरांचेच मारेकरी का सापडत नाहीत; असा सवाल राजनी एका. ही हत्या सरकार प्रायोजित तर नाही ना; असा खुला आरोप राजने केला. महिनाभर आधी त्यांनी संशयाची सुई सत्ताधार्‍यांकडेही जाते; असे म्हटलेलेच होते. आता अशा राजकीय आरोपाकडे सत्ताधारी पक्षाने काणाडोळा करणेही शक्य नव्हते. सहाजिकच त्यावर सत्ताधारी, म्हणजे कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडून अत्यंत संतप्त बोचर्‍या प्रतिक्रिया आल्या. त्याही सदरहू मराठी वाहिन्यांनी अगत्यपुर्वक दाखवल्या. त्यापैकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आजकालचे प्रवक्ते नबाब मलिक, यांनी दुखण्यावरच बोट ठेवले. अर्थात ते तसे राज ठाकरे यांचे दुखणे म्हणता येणार नाही. तर माध्यमांचे वा सेक्युलर दुखणे म्हणता येईल. म्हणूनच त्याची योग्य दखल माध्यमे वा सेक्युलर मंडळींनी कशी घेतली नाही; याचे मला खास आश्चर्य वाटले. मग तो विषय तसाच मनात घोळत राहिला.

   नबाब मलिक म्हणाले, युतीची सत्ता असताना, असेच एक हत्याकांड अनुत्तरीत राहिलेले आहे. ज्याचे दुवे व धागेदोरे आजवर सापडलेले नाहीत आणि त्यातला अनुभव दांडगा असल्यानेच राज ठाकरे असा संशय घेत असावेत. त्यांचा रोख युतीची सत्ता असतानाच्या गाजलेल्या रमेश किणी मृत्यूशी होता. मुंबईचा एक रहिवासी हा किणी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये संशयास्पद रितीने मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर दिर्घकाळ त्या मृत्यूसाठी शिवसेनेचे तेव्हा नेता असलेले राज ठाकरे यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्या निकटवर्तियांना त्यात गुंतवून रोजच्या रोज आरोपांच्या फ़ैरी उडवल्या जात होत्या. अखेरीस दोनतीन लोकांना अटक झाली. सीबीआयची चौकशी झाली. पण प्रत्येक चौकशीत आरोप निष्फ़ळ ठरले. कोणी साक्षीदार वा कुठला पुरावा समोर आणला गेला नाही. पुढे त्यात आरोपी केलेल्यांचीही कोर्टात निर्दोष मुक्तता झाली. पण आज नबाब मलिक व गेल्या वर्षापुर्वी नाशिकच्या महापालिका निवडणूकीत छगन भुजबळ, यांनी पुन्हा किणी हत्याकांडाचा उल्लेख केला होताच. महिनाभरापुर्वी जसा दाभोळकर प्रकरणात सनातन वा त्याचे कोणी म्होरके आहेत, त्यांच्यावर छातीठोकपणे आरोप चालले होते, तसेच तेव्हा किणी प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर बेताल आरोप चालू होते. तीन चौकश्या होऊनही साधा एफ़ आय आर दाखल व्हावा इतकाही दुवा सापडला नव्हता. तरी भुजबळांपासून पुष्पा भावे यांच्यापर्यंत तमाम लोक कंबर कसून राज ठाकरे यांच्या अटकेसाठी अहोरात्र झटत होते. त्यासाठी किणी यांची पत्नी शीला किणी यांना प्रेक्षणीय व्यक्ती असल्यासारखे सहानुभूती जमवायला पेश केले जात होते.  किमान वर्ष दिड वर्ष हा खेळ चालला. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दोन वर्ष त्या ‘बहिणी’कडून भुजबळांनी राखीही बांधून घेतली होती. परंतू आज मृत रमेश वा त्याची पिडीत पत्नी शीला किणी कोणालाही आठवत नाही. किंबहूना तेव्हा वरातीतल्या वर्‍हाड्यांसारखे नाचणारे कपील पाटिल, निखिल वागळे, युवराज मोहिते, पुष्पा भावे, छगन भुजबळ सगळेच किणीला विसरून गेलेत. याचा अर्थ, त्याच्या मारेकर्‍यांचा शोध लागला व त्यांना कठोर शिक्षा झाली अशी समजूत करून घेण्याचे काही कारण नाही. त्यात पकडलेल्या संशयितांवर खटले झाले व सुनावण्य़ाही झाल्या. पण दोनपाच वर्षे चाललेल्या त्याच खटल्याच्या कुठे बातम्याही आल्या नाहीत, की त्या सहानुभूतीदारांपैकी कोणी त्याबद्दल शीला किणींकडे विचारपूसही करायला फ़िरकला नाही.

   म्हणूनच मला नवल वाटले. गुरूवारी रात्री राज ठाकरे यांच्या हस्ते दाभोळकरांच्या स्मृत्यर्थ काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांच्याच बाजूला मिरवणारे युवराज मोहिते बघून मला नवल वाटले. ते चित्र शीला किणी यांनी बघितले असेल; तर त्यांना काय वाटले असेल? कारण हेच युवराज मोहिते तेव्हा सतरा वर्षापुर्वी किणी हत्याकांडातला आरोपी म्हणून राज ठाकरे यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात गर्क होते. आज ज्याप्रकारे त्यांनी आपल्या माध्यमातून दाभोळकर यांच्या संशयास्पद हत्येबद्दल सहानुभूतीचा धंदा मांडला आहे; तसाच तेव्हा त्यांनी निखिलच्या ‘महानगरी’ दुकानातला एक साधा विक्रेता म्हणून रमेश किणी यांच्या मृत्यूचा बाजार मांडला होता. त्यासाठीच्या सहानुभूतीचा वाडगा फ़िरवलेला होता. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हत्यारा म्हणून शरसंधान चालविले होते. ज्या तडफ़ेने व आवेशात आज युवराज व त्यांचे पुरोगामी सेक्युलर साथीदार सनातनच्या विरोधात गदारोळ करतात; तेच तेव्हा राज ठाकरेच्या विरोधात चाललेले होते. तुलनेने सनातन विरुद्धचा गाजावाजा महिन्याभरात कमी झाला वा ओसरला आहे. राज विरुद्धचा तमाशा वर्षभर तरी जोमात चालू होता. त्याबद्दलही माझी तक्रार नाही. आज दाभोळकरांच्य मारेकर्‍यांना पकडण्यासाठी टाहो फ़ोडत असताना; आपण राज ठाकरेच्याच बाजूलाच उभे आहोत व त्याच्याच ‘शुभहस्ते’ दाभोळकरी पुस्तकाचे थाटामाटाने प्रकाशन करून घेत आहोत, हे समजण्या इतकीही युवराजला शुद्ध नसावी? कारण अजून तरी त्याने किंवा त्यांच्या सेक्युलर गोतावळ्यातील कोणी; किणी प्रकरणात राज ठाकरे निर्दोष असल्याचे जाहिरपणे मान्य केल्याचे माझ्या ऐकीवात नाही. किंवा सतरा वर्षापुर्वी आपण किणी प्रकरणात अकारण राजला गोवण्याचे पाप केल्याची कबुली त्यांनी कुठे दिलेली माझ्यातरी वाचनात नाही. म्हणजेच आजही राज ठाकरे त्यांच्यासाठी किणी मृत्यूमधला संशयितच असतो ना? मग त्याच्याच हस्ते दाभोळकरी विचारांचे पुस्तक प्रकाशन? की धंदा व फ़ायदा असेल तेव्हा मरणारा निव्वळ विकावू वस्तू समजण्याला सेक्युलर पुरोगामी कळवळा म्हणतात?

   एका बाजूला राष्ट्रवादी पक्षाचा प्रवक्ता नबाब मलिक, किणी प्रकरणाची राज ठाकरे यांना आठवण करून देतो आणि दुसरीकडे त्याच किणीच्या सुतकातला एक प्रमुख सुतकी युवराज त्याच राज ठाकरे यांच्या हस्ते त्याच दाभोळकरी पुस्तकाचा सोहळा साजरा करतो. काय सांगावे? उद्या काही वर्षांनी हेच युवराज व त्याचे सेक्युलर साथीदार अन्य कुणा सेक्युलर पुरोगाम्याच्या विचारांच्या पुस्तकाचे प्रकाशन सनातनच्या आठवल्यांच्या हस्ते सुद्धा करू शकतील. त्यांना कोण मेला अथवा मारला गेला, याच्याशी काहीही कर्तव्य नसते.  त्याच्या मरणातून आपल्याला काय साध्य करून घेता येते; त्यावर त्यांचा डोळा असतो. म्हणून तर किणीच्या प्रकरणात राज ठाकरे व त्याच्या माध्यमातून सेना भाजपाच्या युती सरकारला गोत्यात घालण्यासाठी त्या मृत्यूचा वापर झाला आणि जेव्हा त्यामध्ये राजला गुंतवता येत नाही असे दिसून आले; तेव्हा शीला किणी यांना वार्‍यावर सोडून तमाम सेक्युलर चळवळ्ये फ़रारी झाले होते. आजही फ़रारी आहेत. पण डॉ. दाभोळकर तर त्यांचे आपले, म्हणजे चळवळीतले आहेत ना? त्यांच्याविषयीची सहानुभूती किती खरी मानायची? माझा तरी तसा गैरसमज होता. पण गेल्या महिन्याभरात तोही संपला. कारण एका महिन्याच्या आत २०-२१ ऑगस्टला गळा काढून टाहो फ़ोडणार्‍या तमाम रुदाल्या आज बेपत्ता आहेत. पंधरा दिवस सनातनच्या कुणा म्होरक्याला झोडण्यासाठी निमित्त म्हणून दाभोळकरांच्या हत्याकांडाचे चक्क भांडवल करण्यात आले. मग गोव्यात कोणी सनातनचा साधक पकडल्याचे ढोल पिटून झाले. पण त्यानंतर यात सनातनला गोवता येत नसल्याचे जाणवताच, तमाम सेक्युलर पुरोगामी फ़रारी झालेत आणि हमीद वा मुक्ता ही दाभोळकरांची मुले आपल्यापरीने न्यायासाठी प्रयत्नशील आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? महिनाभरापुर्वी टाहो फ़ोडत गल्ली ते दिल्लीपर्यंत आक्रोश करणार्‍यांना दाभोळकरांबद्दल आत्मियता होती? त्यांना न्याय मिळावा म्हणून ओरडा चालला होता? की बहुतेक पुरोगामी आपला सनातन विरुद्धचा कंडू शमवून घेण्यासाठी एका निरपराधाच्या हत्याकांडाचे बेशरम राजकीय भांडवल करीत होते? जितक्या सराईतपणे किणी हत्याकांड वार्‍यावर सोडून पुरोगामी राजकारण खेळले गेले, तितक्याच व्यापारी दिखावू मानसिकतेने दाभोळकरांच्या हत्याकांडाचे राजकारणच केले गेले नाही काय? सनातनला गोत्यात आणण्यापलिकडे त्यांचे सेक्युलर पुरोगामी अश्रू किती दिखावू व खोटे होते त्याचा यापेक्षा अधिक पुरावा कुठला हवा? सनातन संस्था अडकणार नसेल; तर यातल्या किती लोकांना दाभोळकरांचे खरे खुनी व हल्लेखोर पकडले जाण्यात स्वारस्य आहे? असेल तर त्याविषयीचा आवाज का थंडवला आहे? जितका सनातनवाल्यांना पकडण्य़ासाठी दबाव आणला जात होता, तितका खरे गुन्हेगार पकडण्यासाठी जोर का लावला जाताना दिसत नाही?

   यासाठीच मी पुरोगामी व सेक्युलर हे शब्द शिवीसारखे वापरतो किंवा अपशब्द मानतो. इतकी या मतलबी लोकांनी त्या शब्दांची रया रसातळाला नेऊन ठेवली आहे. गुन्हेगार व हल्लेखोर देखील अशा व्यापारी मतलबी पुरोगाम्यांपेक्षा अधिक प्रामाणिक असू शकतील. म्हणून मला कोणी प्रतिगामी, पुराणमतवादी म्हटले तरी चालते. पण पुरोगामी म्हटले तरी अंगावर झुरळ पडल्यासारखे शहारे येतात. आपणही त्या पुरोगामी बदमाशांकडून गुराढोरासारखे वापरले जाऊ, अशी भिती सतावते. सर्व आयुष्य चळवळीसाठी देणार्‍या दाभोळकराची ही स्थिती असेल, तर सामान्य पुरोगामी कार्यकर्त्याचे किती भयंकर शोषण व फ़सवणूक दिशाभूल होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

१३ टिप्पण्या:

 1. भाउ तुमच्या पोस्ट पटणार्‍या नसल्या तरी विचार करायला लावणार्‍या असतात.आपण दाभोलकर व अंनिसवर टीका केली असली तरी ती प्रामाणिक विचारातून केलेली आहे. पटणे न पटणे हा भाग वेगळा. मी साव असेल तरच मला दुसर्‍याला चोर म्हणण्याचा अधिकार आहे असे समजण्याचे कारण नाही. सगळ्या गोष्टी काळ्या पांढर्‍या अशा द्वैतात बघावे अशी भुमिका विवेकी विचारात आणता येत नाही. मानवी मेंदुच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे तसे समजणे हे देखील वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही. मधल्या पट्ट्यातील करडा एरिया खूप मोठा आहे. आपण म्हणता तसे पुरोगामी शब्द फार बदनाम झाला आहे. अर्थातच पुरोगाम्यांच्या समाजाशी फटकून वागण्याच्या सवयी मुळे हे चित्र तयार झाले.
  अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
  बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
  दाभोलकरांच्या खुनामुळे आमच्या मनाला अतिशय वेदना झाल्यात हे बाकी खर.तरी देखील या निमित्ताने चळवळीला आत्मपरिक्षण करावे लागेल हे ही खर. आम्ही आता फक्त हितचिंतकाच्या भुमिकेत.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. प्रकाश जी,
   भाऊंच्या या सणसणीत लेखातील काय अमान्य आहे त्याची चर्चा न करता अंनिसवादींच्या बाबतच्या आपल्या विचारांना वाट दाखवायला का सवलत घेता? भाऊंच्या अन्य वेळी अंनिसची खरड पट्टी काढणार्या लेखनाला प्रत्युत्तरे देताना वरील वेदना सुयोग्य ठरली असती. असो.
   भाऊ, 'पुरोगामी व सेक्युलर शब्द शिवीप्रमाणे वाटतात ' या वाक्याशी १०० टक्के सहमत. लेखन नेहमी प्रमाणे खणखणीत...

   हटवा
  2. अगदी सहमत. शिवीच आहे ती. आणि जशी आई बहिणीवरून दिलेली शिवी माणसाच्या जिव्हारी लागते ही तर भारतमातेवरून दिलेली शिवी आहे. कारण या लोकांचे एकमेव ध्येय म्हणजे जे जे भारतीय अ आहे, या देशाच्या हिताचे, त्याच्या सुरक्षेचे, त्याच्या संस्कृतीच्या संवर्धनाचे आहे ते नष्ट करणे हेच आहे. त्यामुळे पुरोगामी ही शिवी मातृभूमीवरून दिलेली अत्यंत गलिच्छ शिवीच मानली जावी.

   हटवा
 2. जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करणार्‍या पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात काय औचित्य होतं, हे युवराज मोहितेच सांगू शकतील.
  सुनील तांबे

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. भाऊराव,

  सनातन संस्थेने अनिसमधील आर्थिक गैरव्यवहारांची चर्चा सुरू करताच वाहिन्यांनी प्रक्षेपण बंद केलं. हे दोनदा झालंय. ( बातमी : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2013/08/blog-post_2064.html )

  त्यामुळे राज ठाकऱ्यांचा सरकारी हत्येचा संशय खरा वाटतो.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. भाऊनी अगदी यथार्थच लिहिले आहे. तरीही मी ते सौम्य म्हणेन कारण शिवी तशी निरुपद्रवी असते. पुरोगामी केवळ शिवी नाहीत. ते समाज, देश, देशाची अखंडता, अभंगता या सगळ्याला मोठा धोका आहेत. कारण गेली अनेक दशके त्यांचे जे धंदे चाललेत ते केवळ एकाच धर्माच्या लोकांच्या मागे लागून त्याला बदनाम करणे किंवा त्याच्या मते असणारे सत्य बाहेर आणण्याइतके साळसूद नाहीत. काहीवेळा नकळत परंतु ब-याचदा जाणीवपूर्वक ही सर्व बोगस मांडली 'पॅन इस्लाम'ला म्हणजेच जगाच्या इस्लामीकरणाला सर्व प्रकारे मदत करणारी फौज आहे. त्यांचे वर्णन करताना त्यांना पुरोगामी किंवा 'सिक्यु'लर म्हणण्यापेक्षा माध्यमजिहादी असेच केले पाहिजे. तेच त्यांचा संपूर्ण निवेदनाचे महत्वाचे ध्येय आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. हा कसला हो युवराज ? हा तर हरकाम्या गडी .

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. एकरस भारतीय संस्कृती छिन्नविच्छिन्न करण्यासाठी देशविघातक कृत्य करणार्यांबयोबर राहाणारे हे सुधारणावादी म्हणायचे?

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. पुरोगामी ही शिवी ऐकून गम्मत वाटली. अगदी सहजपणे कुठल्याही सज्जन माणसाला वाईट वाटेल असाच अपशब्द आहे हा.

  प्रत्युत्तर द्याहटवा