शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

महाराष्ट्र तामिळनाडूच्या वाटेने जाईल का?




   आता शिवसेनाप्रमुखांच्या निर्वाणाला दोन आठवडे पुर्ण होत आहेत आणि सुतकाचा काळ संपण्यापुर्वीच शिवसेनेचे त्यांच्या मागे काय होणार; याची चर्चा चालू झाली आहे. त्यात राज-उद्धव यांनी एकत्र येण्याच्या शक्यतेपासून राणे-भुजबळ माघारी येण्य़ापर्यंत अनेक गोष्टींचा उहापोह सुरू आहे. त्यातच एक बातमी अशी आली, की आता नवा किंवा दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पित्याच्या गैरहजेरीत पक्षाध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. म्हणजे गेली दहा वर्षे जी परिस्थिती होती, त्यात बदल होण्याची शक्यता नाही, असाच त्याचा अर्थ लावला जाणार. पण असे का? शिवसेनाप्रमुख दुसरा कोणी का होणार नाही? असे अनेक प्रश्न आहेत व विचारले जाणार आहेत. असे पुर्वी कुठल्या राजकीय पक्षात घडलेले नाही. 

   शिवसेनेचा राजकीय क्षितीजावर उदय झाला; तेव्हा दक्षिणेत द्रविड मुन्नेत्र कळहम नावाचा पक्ष ऐन भरात होता. त्याने १९६७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये तामिळनाडू विधानसभेत स्वबळावर बहूमत प्राप्त केले होते. अण्णादुराई हे त्या पक्षाचे सर्वेसर्वा होते. तेच मग मुख्यमंत्री झाले. तो पक्ष त्यांनीच स्थापन केला होता व विस्तारला होता. रामस्वामी नायकर यांच्या बंडखोर विचारांनी प्रेरित झालेल्या तरूणांमध्ये अण्णादुराई यांचा समावेश होता. रामस्वामी यांचे अण्णा खास शिष्य होते व भक्तही होते. पण जेव्हा त्यांच्यात मतभेद निर्माण झाले; तेव्हा द्रविड कळहम संघटनेतून बाजूला होऊन अण्णादुराई यांनी द्रमुक ही वेगळी संघटना सुरू केली. रामस्वामींच्या ब्राह्मण विरोधी चळवळीला हिंदीविरोधी चेहरा देऊन अण्णांनी तामिळी अस्मितेचा आधार घेतला आणि दिल्लीतल्या कॉग्रेसश्रेष्ठींच्या हुकूमतीला राज्यात आव्हान उभे केले. त्यातूनच त्या चळवळीचा विस्तार झाला व सत्तेला गवसणी घालण्यापर्यंत द्रमुकने मजल मारली. मात्र इतक्या परिश्रमातून ज्या पक्षाची उभारणी केली व सता संपादन केली; ती सत्ता उपभोगायला अण्णा फ़ारकाळ जगले नाहीत. काही महिन्यातच त्यांचे निर्वाण झाले. शिवसेनेच उदय होता होता अण्णादुराईंनी इहलोकीचा निरोप घेतला होता. त्यांचीही अंत्ययात्रा मद्रासच्या (आजची चेन्नई) इतिहासात अजरामर मानली जाते. पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या त्या अंत्ययात्रेला इतकी अफ़ाट गर्दी लोटली होती, की त्यात चेंगराचेंगरी होऊन बाविस लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे परवा शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेच्या वेळी वाहिन्यांच्या चर्चेमध्ये अण्णादुराईंच्या अंत्ययात्रेचा उल्लेख का झाला; ते लक्षात येऊ शकेल. 

   पण मुद्दा तो नाही. अण्णादुराई हयात असतानाही त्यांच्या पश्चात त्यांची जागा कोण घेणार; अशी चर्चा व्हायची. त्यावरही वाद होते व सत्तस्पर्धा द्रमुकमध्येही होती. अण्णांच्या सरकार व पक्षात नेंदूसेझियन नावाचे त्यांचे सहकारी अत्यंत जवळचे मानले जायचे. त्यांना द्रमुकमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे नेता मानले जायचे. त्यामुळेच लगेच हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच निवड झाली होती. पण सुतकाचे दिवस संपले आणि पक्षाचे अधिवेशन बोलावण्यात आले, त्यात तुलनेने कनिष्ठ व तरूण असलेल्या करूणानिधी, यांची पक्षाध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदी निवड झाली. आपला वकुब माहिती असल्याने नेंदूसेझियन यांनी तक्रार केली नाही. कारण कचेरी वा कागदी घोडे नाचवण्यात वाकबगार असलेल्या नेंदूसेझियन यांच्याकडे सभा गाजवण्याची वा पक्ष संघटन चालवण्य़ाची कला नव्हती. म्हणूनच त्यांनी बिनतक्रार करूणानिधींचे नेतृत्व; अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे मान्य केले. पुन्हा नव्या व्यवस्थेमध्ये नेंदूसेझीयन नव्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती झाले व पुन्हा दुसर्‍या क्रमांकाचा नेता म्हणुन मिरवू लागले. मात्र करूणानिधी आणि अण्णादुराई यांच्यात एक फ़रक होता. पक्ष अण्णांनी उभा केला होता व त्याची दिशाही नेमकी ठरवली होती. त्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अण्णांची जेवढी हुकूमत होती; तेवढा अधिकार चालवणे करूणानिधींना शक्य नव्हते. म्हणूनच द्रमुकमध्ये कुरबुरी चालू झाल्या. पक्षाला मते मिळवण्यासाठी विचार व वक्तृत्व यापेक्षा अन्य मार्ग करूणानिधी यांना शोधावे लागले. त्यातच त्यांनी एमजीआर नावाच्या लोकप्रिय अभिनेत्याचा आश्रय घेतला. तसा हा अभिनेता अण्णादुराईंचाही भक्त होता. पण त्यांनी त्याला कधी पक्षात वा राजकारणात आणले नव्हते. करूणानिधींनी ती चुक मतांसाठी केली आणि तिथून द्रविडी राजकारणाला भलतेच वळण लागले. 

   १९७२ ह्या निवडणुकीत एमजीआरच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन करूणानिधींनी सत्ता टिकवली. पण त्याच निवडणुकीने त्या अभिनेत्याच्या मनात राजकीय महत्वाकांक्षा निर्माण केली. त्यातच करूणानिधींनी आपल्या स्टालीन नामक पुत्राला चित्रपटात प्रस्थापित करण्याचा प्रयास केला. त्यामुळे वाद विकोपास गेला आणि एकेदिवशी एमजीआर यांनी वेगळी चुल मांडली व अण्णाद्रमुक नावाचा दुसरा प्रादेशिक पक्ष काढला. त्यांच्या चहात्यांच्या ज्या संस्था व संघटना होत्या, त्यांचे रातोरात पक्ष शाखांमध्ये रुपांतर करण्यात आले आणि नामोहरम कॉग्रेस बाजूला पडून तामिळी राजकारणात द्रमुकला नवाच प्रतिस्पर्धी उभा ठाकला. आपल्या पक्षाला अस्सल द्रविडी चेहरा देण्यासाठी एमजीआर यांनी अण्णांच्या नावाचा वापर केलाच होता. पण अण्णादुराई हेच पदसिद्ध पक्षाध्यक्ष रहातील; असाही प्रचार केला. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाला अध्यक्ष नसतो. सरचिटणिस हाच पक्षाचा सर्वेसर्वा प्रमुख नेता असतो. आजच्या मुख्यमंत्री जयललिता सुद्धा पक्षाच्या सरचिटणिस आहेत. उलट अण्णादुराईंच्या मूळ द्रमुक पक्षाला मात्र पक्षाध्यक्ष असतो व अण्णांनंतर ती जागा पंचेचाळीस वर्षे करूणानिधी यांनी व्यापलेली आहे. पण गंमत बघा, अण्णांचे खरे वारस असूनही करूणानिधींना जयललिता पराभूत करू शकल्या आहेत. एका निवडणुकीत तर खुद्द करूणानिधी सोडून त्यांच्या म्हणजे मुळच्या द्रमुक पक्षाचा दुसरा आमदार निवडून येऊ शकला नव्हता. पण दुसरी बाजू अशी, की आता त्याच द्रविडी पक्षाच्या दोन तुकड्यात तामिळनाडूचे संपुर्ण राजकारण व्यापले गेले आहे. त्यात शिरकाव करण्यास अन्य वैचारिक वा राष्ट्रीय पक्षांना जागाच उरलेली नाही. या फ़ुटीर वा विभक्त द्रमुक चळवळीतील गटांना एकमेकांच्या विरोधात लढताना हरवण्याचा प्रयासही अनेकदा निष्फ़ळ ठरला आहे. उलट राष्ट्रीय पक्षांना त्यापैकी एकाचा हात धरून राज्यातील आपले अस्तित्व टिकवावे लागत असते. महाराष्ट्र तामीळनाडूच्या वाटेने जाईल काय? 

   आज बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांचा वारसा कुणाकडे; याची चर्चा चालू आहे, कारण त्यांच्या अंत्ययात्रेला व अंत्यदर्शनाला जमलेली अफ़ाट गर्दी हेच आहे. त्यातून जी लोकभावना व्यक्त झाली, तिचे रुपांतर मतांमध्ये झाले तर? त्यांच्या अखेरच्या दसरा मेळाव्यातील चित्रित भाषणाचे थेट प्रक्षेपण बहूतेक वाहिन्यांनी केले होते व त्याच्याच भावनिक परिणामांमुळे अंत्यसंस्काराचा अवाढव्य सोहळा होऊ शकला. आता त्यांचे अखेरचे शब्द मराठी मनाला किती काळ भुरळ घालतील व त्यामुळे राज्याच्या राजकारणावर कोणते परिणाम होतील; यासाठीच ‘पुढे काय’ आणि ‘पुढे कोण’ अशा चर्चांना ऊत आला आहे. पोकळी कोण भरून काढणार असाही एकूण चर्चेचा सूर आहे. पण कुठली पोकळी निर्माण झाली आहे व बाळासाहेबांनी मूळात कुठली पोकळी मागल्या शेहेचाळिस वर्षात भरून काढली होती, त्याकडेही बघावे लागेल. तरच आजची पोकळी म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. जेव्हा बाळासाहेबांनी काही मोजक्या सहकार्‍यांना हाताशी धरून १९ जुन १९६६ रोजी आपल्याच घरात साधा नारळ फ़ोडून शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात कुठली पोकळी होती? ती पोकळी असण्याचे काय कारण होते? कुणाच्या जाण्याने वा बाजूला होण्याने ही पोकळी निर्माण झाली होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय आजच्या पोकळीची कारणमिमांसा होऊ शकत नाही. मग ती पोकळी भरून काढण्याचा विषय दूर राहिला. त्यासाठीच मूळात शिवसेना व बाळासाहेबांच्या नेतृत्वाला समजून घ्यावे लागेल. नुसते तेवढ्याने भागत नाही. जो कोणी त्या कालखंडामध्ये त्यांच्याभोवती शिवसैनिक म्हणून जमा झाला, तो तरूण कोणत्या मानसिकतेतून त्यांच्या जवळ आला होता? पुढल्या दोनतीन पिढ्यातले मराठी तरूण कोणत्या कारणाने बाळासाहेबांकडे आकर्षित होत राहिले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आरंभीचे तरूण शिवसेनेकडे आला, त्या उत्तरात सामावलेली आहेत. म्हणूनच शिवसेनेच्या स्थापनापूर्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावणे भाग आहे.  (क्रमश:)
भाग   ( १२ )    १/१२/१२

‘मार्मिक’ सुरू करण्याच्या वेळची परिस्थिती




  १९६० सालात आचार्य अत्र्यांच्या वाढदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा आरंभ केला. तत्पुर्वी त्यांनी अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या होत्या किंवा वृत्तपत्रासाठी कामही केले होते. त्यांच्याच इतके उत्तम चित्रकला साधलेले धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे त्यांच्या जोडीला होते. त्यांनी प्रकाशक म्हणून जबाबदाली उचलली आणि बाळासाहेब संपादक झाले. तेव्हाचे सिद्धहस्त पत्रकार द. पां. खांबेटे कार्यकारी संपादक होते. ही झाली टीम ठाकरे. पण या सर्व उद्योगाला प्रबोधनकार ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला होता. आचार्य अत्र्यांपासून एसेम जोशी, कॉम्रेड डांगे आणि थेट शहू महाराजांपर्यंत सर्वांच्या संपर्कात आलेले प्रबोधनकार हे चालतेबोलते विद्यापीठच होते. पुढल्या काळात सेक्युल्रर विचारवंत लेखक म्हणून नावारूपास आलेले डॉ. य. दि. फ़डके; त्याच प्रबोधनकारांना गुरू मानायचे. त्यांनीच युती शासनाच्या कारकिर्दीमध्ये समग्र प्रबोधनकार साहित्य संकलित करुन प्रकाशित करण्याची जबाबदारी पार पाडली. असा डोंगराएवढा माणुस व पिता पाठीशी उभा असताना; ‘मार्मिक’ बाळासाहेबांनी सुरू केला, ती मग मराठी माणसासाठी चळवळच बनत गेली. एका साप्ताहिकाने असे चळवळीचे रूप का धारण करावे? तसे पाहिल्यास त्याच काळात अनेक मराठी साप्ताहिके व नियतकालिके जोरात चालू होती. पण त्यांच्या मर्यादा होत्या. लेखन वाचन व चर्चा यापलिकडे त्यांची झेप नव्हती. नाही म्हणायला दैनिक ‘मराठा’ हे आचार्य अत्र्यांचे दैनिक खास मराठी चळवळीचे केंद्र होते. चळवळ्यांसाठी ‘मराठा’ हे त्याआधीपासूनचे व्यासपीठच होते. मात्र मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र हे वेगळे राज्य स्थापन झाले आणि ‘मराठा’चे स्वरूप काहीसे बदलत गेले होते. त्यामुळे ‘मार्मिक’ला आपले स्थान निर्माण करणे सोपे होऊन गेले. म्हणूनच शिवसेनेकडे येण्यापुर्वी मुळात ‘मार्मिक’ महाराष्ट्राला का आवश्यक झाला होता ते बघायला हवे.

   तसे पाहिल्यास ‘मराठा’सुद्धा एकटाच नव्हता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र व्हायला धडपडणार्‍या लेखक व पत्रकारांचे आणखी एक वृत्तपत्र त्या काळात तात्पुरता अवतार घेऊन अंतर्धान पावले होते. ‘लोकमित्र’ असे त्याचे नाव. समाजवादी नेते एस. एम. जोशी त्याचे संपादक होते. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारी घेऊ लागली; तेव्हा मराठीमध्ये ‘लोकमान्य’ नावाचे एक प्रमुख दैनिक होते. आजही प्रकाशित होणार्‍या गुजराती ‘जन्मभूमी" दैनिकाचे मराठी भावंड; असे त्याचे स्वरूप होते. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केवळ मराठी भाषिक राज्यापुरती नव्हती, तर द्वैभाषिक राज्याच्या विरोधातली होती. द्वैभाषिक म्हणजे आजचा गुजरात व कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचा मिळून जो भूभाग होतो, तेवढे मुंबई राज्य. तिथे मराठी व गुजराती भाषिकांनी एकत्रित गुण्यागोविंदाने नांदावे; असा दिल्लीश्वरांचा आग्रह होता. मात्र तो मराठी विद्वान, साहित्यिक, पत्रकारांना अजिबात मान्य नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाषिक तत्वावर नवी प्रांतरचना करायचा निर्णय झाल्यावर; त्या भूमिकेला नवी उभारी मिळाली. पण त्याच्याही खुप आधीपासूनच साहित्य संमेलन वा पत्रकार संमेलनातून मराठी भाषिक राज्याचे ठराव वेळेवेळी मंजूर केले जातच होते. मात्र जेव्हा हट्टाने गुजरात-मराठी एकच राज्य बनवायचा निर्णय लादला गेला, तेव्हा तो सुप्त विरोध प्रचंड प्रमाणावर उफ़ाळून आला. त्याचीच पार्श्वभूमी ‘लोकमान्य’ दैनिकातील पेचप्रसंगाला लाभली होती. तिथे काम करणारे संपादक किंवा पत्रकार आजच्यासारखे रस्त्यावर उतरून अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर नाचवणारे नाचे नव्हते. तर पगार वा नोकरीवर लाथ मारून आपल्या तत्वाशी व विचा्रांशी प्रामाणिक राहू शकणारे आणि त्यासाठी किंमत मोजायची क्षमता अंगी असलेले निव्वळ पत्रकारच होते. त्यातूनच ‘लोकमान्य’चा पेचप्रसंग निर्माण झाला आणि ‘लोकमित्र’ एसेमना सुरू करावा लागला.

   ‘जन्मभूमी’ व ‘लोकमान्य’ ही दोन्ही दैनिके चालविणारी कंपनी व मालक मंडळी गुजराती होती आणि त्यांचे द्वैभाहिकाला समर्थन होते. अशा परिस्थितीत ‘लोकमान्य’च्या संपादक, पत्रकारांनी आपला मराठी बाणा दाखवत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या मराठी भूमिकेला पाठींबा देणे व त्याचे समर्थन करणे मालकांना मान्य नव्हते. किरकोळ बातम्यांपुरते तिकडे लक्ष द्यावे. पण संपादकीय भूमिका मात्र द्वैभाषिकाचे समर्थन करणारी असावी असा मालकांचा आग्रह होता. पण संपादकांनी तो झुगारून लावला. आपण दैनिकाचे संपादक आहोत तर त्यातली वैचारिक भूमिका व संपादकीय स्वातंत्र्य आपण सोडणार नाही, ही ठाम भूमिका घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पाठींबा देणारा अग्रलेख ‘लोकमान्य’मध्ये छापून आणला गेला. बहुधा पां. वा. गाडगिळ ‘लोकमान्य’चे तेव्हा संपादक होते (मला आता सगळेच आठवत नाही. कारण मी तेव्हा फ़ारतर आठनऊ वर्षाचा होतो). पण घरातल्या शेजारच्या मोठ्या माणसांच्या चर्चेतून ऐकलेले आठवते. त्या संपादकीय लेखाने त्या वृत्तपत्रात खळवळ माजली. ज्या दिवशी तो अग्रलेख छापून आला; त्याच दिवाशी मालक व पत्रकार-संपादक यांच्यात खटका उडाला. पण आपल्या भूमिकेपासून माघार घ्यायला संपादक तयार नव्हते. अखेरीस मालकाने ‘लोकमान्या’चे प्रकशन थांबवण्याची धमकीच दिली. तर संपादकांनी माघार घेण्याची गोष्ट बाजूला राहिली. ‘लोकमान्य’चे तमाम पत्रकार आपल्या संपादकाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि ‘लोकमान्य’ हे मराठी दैनिक त्या दिवशी बंद झाले. आज आपल्या अविष्कार स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणार्‍या किती पत्रकारांमध्ये अशी नोकरी गमावून तत्वासाठी बेकार व्हायची हिंमत आहे? कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभाजी ब्रिगेडवाल्यांनी घराच्या दारावर डांबर फ़ासले, मग हौतात्म्याचा आव आणणारे नाटकी मराठी संपादक; आज स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवत असतात. त्यापैकी एकाची तरी लायकी त्या ‘लोकमान्य’च्या पत्रकाराच्या पायाजवळ बसण्याइतकी तरी आहे काय?

   एका दिवसात मराठी भाषिक राज्य व अविष्कार स्वातंत्र्यावरची गदा यासाठी त्या पत्रकारांवर बेकार व्हायची पाळी आली होती. तेव्हा त्यांना काम मिळावे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बातम्या लोकांपर्यंत वास्तव रुपात पोहोचाव्या; म्हणून एसेम जोशी यांच्या नेतृवाखाली नवे दैनिक सुरू करण्यात आले, त्याचे नाव होते ‘लोकमित्र’. मात्र त्याच्याकडे साधने अपुरी होती; तशीच व्यवस्थाही अपुरी होती. दरम्यान मराठी राज्याच्या मागणीसाठी लढणार्‍या नेत्यांमध्ये नाटककार व साहित्यिक आचार्य अत्रे यांचाही समावेश होता. त्यांचे ‘नवयुग’ साप्ताहिक होते. तर लोकांनी त्यांच्याकडे दैनिक काढण्याचा आग्रह धरला होता. खिशात दिडकी नसताना त्यांनी लोकांकडे वर्गणी मागून दैनिक सुरू करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून सुरू झाला तो ‘मराठा’. अधिक खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ होताच. या तीन दैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राची लढाई उभी केली होती. त्यात मग अनेक लहानसहान व प्रादेशिक मराठी साप्ताहिके व नियतकालिकांनी आपल्याला जमेल तसा हातभार लावला होताच. तेव्हाचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आज प्रत्येक वृत्तपत्र खपाचे आकडे सांगण्यासाठी आटापिटा करत असतात. आपणच किती लोकप्रिय आहोत ते सांगणार्‍या जाहिराती आपल्याच अंकात छापतात किंवा आपल्याच वाहिन्यांवर बोलबाला करीत असतात. पण वृत्तपत्र वा माध्यमावर लोक किती प्रेम करतात, त्याचा उत्तम नमूना म्हणजे ‘मराठा’ हे दैनिक होते. रात्री उशिरा खिळ्याच्या टाइपची जुळणी पुर्ण झाल्यावर छपाई सुरू झालेल्या ‘मराठा"ची छपाई दुसर्‍या दिवशी दुपार उजाडली तरी चालू असायची आणि संध्याकाळपर्यंत ते दैनिक विकले जात असे. कारण मागणी भरपूर असली, तरी आजच्या सारखी झटपट लाखो प्रती छापायची यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि ‘मराठा’ चालवणार्‍यांना परवडणारी नव्हती.

   तर मुद्दा इतकाच, की ‘मार्मिक’चा मराठी माध्यमांच्या जगात उदय झाला त्याची अशी पार्श्वभूमी होती. आधीच मराठीचा विषय व मराठी माणसाच्या न्यायाचा संघर्ष करणारी अनेक नियतकालिके बाजारात उपलब्ध होती. त्यांच्याच मेहनत व संघर्षातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली होती. विविध राजकिय पक्ष व संघटना महाराष्ट्रात होत्या. पण त्यांना मराठी अस्मितेसाठी एकत्र आणायचे व एकत्र लढायला उभे करण्याचे महत्वपुर्ण काम; तात्कालीन मराठी नियतकालिकांनी बजावले होते. या लेखक, पत्रकार, संपादक व बुद्धीमंतांनी मराठी समाजाची अस्मिता अशी काही जागवली व बुलंद बनवली, की मराठी अस्मितेकडे पाठ फ़िरवून राजकारण करणेच अशक्य होऊन बसले होते. त्यामुळेच आपापल्या राजकीय भूमिका व अट्टाहास, तत्वज्ञान, आग्रह बाजूला ठेवून त्या सर्वच राजकिय पक्षांना संयुक्त महाराष्ट्र समिती बनवण्याचे काम हाती घ्यावे लागले. वर्तमानपत्र किंवा लेखणीसह अविष्कार स्वातंत्र्याची ताकद किती अगाध असते; त्याची साक्ष देणारा तो कालखंड होता. त्याचा उदय तरूणपणी बाळासाहेब बघत होते, त्यापासून शिकत होते. कदाचित त्यातूनच त्यांनी आपल्या मनाशी काही खुणगाठ बांधून ‘मार्मिक’ सुरू केला असेल काय?   (क्रमश:)
भाग   ( ११ )    २९/११/१२

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

शिवसेना व बाळासाहेबांचा राजकीय उदय




   छगन भुजबळ किंवा नारायण राणे आज शिवसेनेत नाहीत. दोघेही राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातले मंत्री आहेत. तरीही त्यांनी बाळासाहेबांना मंत्रालयात पत्रकार कक्षामध्ये श्रद्धांजली अर्पण करताना, आपल्या आजवरच्या यशाचे सर्व श्रेय बिनदिक्कत शिवसेनेला देऊन टाकले. असे त्यांनी का म्हटले, याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तिथे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे मूल्यमापन करण्यासाठी कुठली राजकीय चर्चा चाललेली नव्हती. त्यांना बाळासाहेबांच्या श्रद्धांजली सभेतले भाषण करायचे होते. मात्र आपण बाळासाहेबांबद्दल बोलतो आहोत, की शिवसेनेबद्दल बोलतो आहोत, याचे भान दोघांनाही नव्हते. एका वाक्यात ते शिवसेनेबद्दल बो्लत होते तर दुसर्‍या वाक्यात ते बाळासाहेबांबद्दल बोलत होते. याचे कारण काय असावे? शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख येणे स्वाभाविकच आहे. पण दोघे जुने शिवसैनिक; शिवसेना आणि बाळासाहेब असे शब्द समानार्थीच वापरत होते. आपण शिवसेनेत होतो आणि बाळासाहेबांच्या जवळचे होतो, असे सांगताना आजही आपण शिवसैनिकच आहोत; असे सांगायचे त्यांनी बाकी ठेवले होते. त्याचा अर्थ इतकाच होता, की बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होते, पण त्याच्या पलिकडे तो त्या काळातील मराठी माणसाचा एक वडीलधारा होऊन गे्ले होते. शिवसेना आणि अन्य पक्ष यातला तोच तर मोठा फ़रक आहे. त्यात आलेले शिवसैनिक म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे बाळासाहेबांनी प्रत्येकाला वागवले होते. त्यांच्यातले मतभद असोत वा वादविवा्द असोत, त्यांनी वडिलकीच्या नात्याने हाताळले होते. ही एक संघटना होती, की चळवळ होती, ते आधी समजून घेतले पाहिजे. आपल्या शिवसेनेतील प्रवेश व नंतरच्या कार्याबद्दल बोलताना दोघांनी संघटना कशी होती, तिचे स्वरूप किती विस्कळीत होते, त्याचेही स्मरण करून दिले.

   माझगाव, भायखळा भागातले भुजबळ शिवसेना शाखाप्रमुख होते, तर लालबाग सुपारीबाग परिसरात बंडू शिंगरे शाखाप्रमुख होते. सात रस्त्याच्या बाजूला रमेश लब्दे शाखाप्रमुख होता. अशी नावे भुजबळांनी फ़टाफ़ट सांगुन टाकली. पण या शाखा व शाखाप्रमुखांचे कार्यक्षेत्र कुठले होते, त्या शाखेच्या सीमा कुठल्या होत्या, त्याचा त्यांनाही पत्ता नव्हता, हे सुद्धा भुजबळांनी सांगितले. म्हणजे ज्यांनी त्यांना शाखाप्रमुख नेमले वा शाखा सुरू करून दिली, त्यांनाही शाखेच्या सीमा माहिती नव्हत्या. याला संघटना म्हणता येईल काय? ती एक चळवळ होती. तो एक समान विचारांनी भारावलेल्या तरूणांचा जमाव होता. सगळाच नवा प्रकार होता. जसा तो शिवसैनिक म्हणवून घेणार्‍यांसाठी नवा होता; तसाच सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरणार्‍यांसाठीही नवाच प्रकार होता. शिवसेना म्हणजे काय चालले आहे, ते आजवरच्या राजकीय ढुढ्ढाचार्यांनाही कळत नव्हते, की उमगत नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला शिवसेनेविषयी जे काहीव वाटेल ते लिहित होता, मत व्यक्त करत होता आणि त्यावर वाचणारे शहाणे आपले मत बनवत होते. वास्तविक शिवसेना हे तेव्हा अगदी मराठी पत्रकारांनाही एक कोडेच होते. कारण तत्पुर्वीच्या तमाम संघटनांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिलेल्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या शाखा असायच्या. शिवाय शिवसेना राजकीय भूमिका घ्यायची; पण प्रत्यक्ष राजकारणात नव्हती. मग या संघटनेला समजून तरी कसे घ्यायचे? बाकी पक्ष हे विभाग वा मतदारसंघ यानुसार त्यांची बांधणी होती. इथे जो शाखाप्रमुख होता, त्याला आपले कार्यक्षेत्रही माहित नसायचे. ज्याला आजकालच्या आघाडीच्या राजकारणात निमंत्रक म्हणतात, तसेच काहीसे या शाखाप्रमुखाचे काम असायचे. कुठे मोर्चा आहे वा सभा व्हायची आहे; तिथे जाण्यासाठी शिवसैनिक किंवा कार्यकर्त्यांना पूर्वसूचना देणारा, असेच त्याचे काम असायचे. बाकी शिवसैनिक इथून तिथून सारखाच असायचा. शाखाप्रमुखाला अधिक महत्व नव्हते. बाळासाहेब सोडले तर बाकी सगळे शिवसैनिक होते. अगदी दुसरा कोणी नेताही नव्हता. ज्यांना थोडेफ़ार व्यासपिठावर उभे राहून बोलता येईल; एवढा सभाधीटपण होता, तेही भाषणे करायचे. बाकी वक्ता एकच आणि तोच शिवसेनाप्रमुख होता.

   आणखी एक गम्मत लक्षात घेतली पाहिजे. बाकी सगळ्या राजकीय संघटना व पक्षामध्ये विभाग वा मतदारसंघ वॉर्डनुसार समित्या असायच्या. त्यात तिथला अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारीणी असायची. इथे शिवसेनेलाच कुठली कार्यकारिणी नव्हती, की पदाधिकारी नव्हते; तर विभागवार संघटनात्मक स्वरूप कुठले असायचे? त्यामुळे इथे झेंडा खांद्यावर घेऊन ठामपणे उभा राहिला, त्याला शाखाप्रमुख बनवण्यात आले होते. शाखाप्रमुख ही राजकीय पक्ष वा संघटनेतील नवीच बाब होती. अशा शाखाप्रमुखांच्या साहेब कधीकधी बैठका घेत आणि त्याला प्रमुख शिवसैनिक हजर असायचे. त्यात पद्माकर अधिकारी, श्याम देशमुख, भालचंद्र ठाकूर अशी नावे मी ऐकलेली आठवतात. या संघटनेला स्वत:चे असे कुठले कायमचे कार्यालयसुद्धा नव्हते. फ़ॉर्म भरून शिवसेनेची पहिली सदस्य नोंदणी करण्यात आली, तेव्हा आजच्या सेनाभवनासमोर एक छापखाना होता, तिथेच बसून भालचंद्र ठाकूर व मामा खानोलकर यांनी फ़ॉर्म वाटल्याचे किती लोकांच्या स्मरणात आहे आज? रामदास मुद्रणालय असे काहीसे नाव होते. आता ती बैठी इमारत पाडून त्याच जागी तीनचार मजली बॅन्क ऑफ़ महाराष्ट्रची इमारत उभी आहे. शिवसेना भवनाच्या गडकरी चौकाकडून एक रस्ता शिवाजी पार्ककडे जातो, तसाच एक तिरपा ब्राह्मण सहाय्यक संघाकडे व पुढे सेनापती बापट पुतळ्याकडे रानडे रोडच्या दिशेने जातो, त्याच कोपर्‍यावर हे मुद्रणालय बैठ्या इमारतीमध्ये होते. म्हटले तर तेच शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यालय समजता येईल. पण तिथे कोणी पदाधिकारी बसायचे वा बैठका चालायच्या असे नव्हते. थोडक्यात संपर्क कार्यालय म्हणता येईल. अगदी सेनाभवन आकाराला येईपर्यंत मातोश्री वा तिथल्या गच्चीवर शिवसेना नेत्यांच्या किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका चालायच्या.

   इतर पक्ष आणि शिवसेना यातला हा मोठाच फ़रक आहे. ही एक संघटना अशी म्हणता येईल, की जिला आपले मुख्यालय नव्हते, पदाधिकारी व कार्यकारिणी नव्हती, घटना वगैरे नव्हती. पण ती संघटना वाढत होती, संघर्ष करत होती. विचारसरणी, धोरणे, तत्वज्ञान या खुप दूरच्या गोष्टी झाल्या. साहेब म्हणतील ते धोरण, तो विचार आणि ‘मार्मिक’ मध्ये छापुन येईल तो कार्यक्रम; असे या संघटनेचे स्वरुप होते. पण ती संघटना मराठी तरूणांन लोकप्रिय होती आणि तिची लोकप्रियता वाढतच होती. तिची आंदोलने व्हायची, धुमाकुळ घातला जायचा. शिवसेना कोणाच्या विरोधात आहे व कोणाच्या बाजूने आहे, त्याचा राजकीय अंदाज कोणा अभ्यासकाला बांधता येत नव्हता; की तिची वाटचाल कोणत्या दिशेने होईल त्याचेही समिकरण मांडता येनार नव्हते. ज्यांच्या अंगात काहीतरी करून दाखवण्याची मस्ती व उर्जा होती. त्यांच्यासाठी शिवसेनेने एक दार उघडून दिले होते. त्यातच चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि अत्यंत उत्साही शिवसैनिकांना निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर ठेवणे शक्य नव्हते. त्यात उतरण्याइतकी शिवसेना परिपक्व झालेली नव्हती. पण शांतही बसणे तिला परवडणारे नव्हते. मग मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या व उत्साहाने उतू जाणार्‍या तरूणांना त्या निवडणुकीत काही भूमिका देणे भाग होते. पण कोणाला विरोध करताना व कोणाला पाठींबा देतांना आपला वेगळेपणाही जपणे शिवसेनेला अगत्याचे होते. यातून बाळासाहेबांनी मार्ग काढला; तो निवडक उमेदवारांना पाठींबा देण्याचा. एका कुठल्या पक्षाला पाठींबा न देता; त्यांनी भिन्नभिन्न पक्षाच्या मोजक्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय भूमिकेचे आकलन करणे शहाण्यांना अधिकच अवघड होत गेले. पण निवडणुकीच्या निमित्ताने बनलेल्या संपुर्ण महाराष्ट्र समितीच्या मात्र शिवसेना पक्की विरोधात उभी ठाकली होती. अशी शिवसेनेची सुरूवात होती. शिवसेना आपल्या स्थापनेपासून वर्षभरातच राजकारणात पडली होती. मात्र तिच्या विषयी तेव्हा जेवढा बौद्धिक गोंधळ होता; तेवढाच आजही कायम आहे. त्यातून सावरून शिवसेनेचा अभ्यास करणे व निश्चित मत बनवणे, आजही फ़ारसे कोणी मनावर घेतलेले नाही.

   चार दशकांच्या कालखंडात ज्या संघटनेने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि जनमानसावर एवढी छाप पाडली, तिची निर्मिती का व कशी झाली? कोणत्या कारणाने झाली, तिची वाटचाल अशी का होत गेली; हे जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे आहे? आधीच्या प्रस्थापित राजकारण्यांनी मराठी जनमानसाला पटणारे राजकारण केले असते तर शिवसेना स्थापन तरी झाली असती का? या प्रश्नांची उत्तर शोधल्याशिवाय शिवसेनेच्या स्थापनेकडे वळणेच चुकीचे होईल. कोणत्या परिस्थितीने शिवसेनेला अवतार घ्यावा लागला?    (क्रमश:)
भाग   ( १० )    २९/११/१२

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

शिवसेनाप्रमुखांचा दबदबा का असेल बरे?




   गेल्या रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीची जगभर चर्चा झाली. मग चर्चेचेच गुर्‍हाळ चालविणार्‍या वाहिन्यांना मागे राहून कसे चालेल? मी शक्य तेवढ्या वाहिन्यांवरील चर्चा व मतप्रदर्शन ऐकत होतो. त्यातल्या अनेकांची कधी बाळासाहेवांशी साधी भेट झाली नव्हती. अनेकांना त्यांच्या धारदार मराठी भाषेचा गंध नव्हता आणि उरलेल्यांना शिवसेना वर्तमानपत्रात वाचली, तेवढीच ठाऊक होती. त्यातून त्यांचे मतप्रदर्शन चालू होते. त्यानुसारच प्रत्येकजण आपापले विश्लेषण करीत होता. त्यासाठी विवेकबुद्धी किंवा अकलेची गरज नसते. सहाजिकच समोर कॅमेरातून येणार्‍या दृष्यांचा अर्थच अनेकांना लागत नव्हता. ज्याचे वर्णन बहुतेकांनी हुकूमशहा किंवा मुंबईत दहशत माजवणारा, असेच अक्कल येण्याच्या वयापासून वाचले होते व त्यावरच आपले मत बनवले असेल, त्यांना त्या गर्दीचा अर्थ लागायचा कसा? त्यात त्यांचा गुन्हा अजिबात नाही. ती सगळी चर्चा व विश्लेषण ऐकत असताना, मला माझा भाचा व माझी आई यांच्यातला पस्तीस वर्षापुर्वीचा संवाद आठवला.

   माझी बहीण विरारला असायची. तेव्हा विरार आजच्याप्रमाणे विस्तारित उपनगर किंवा महानगर झालेले नव्हते. नुकतीच मुंबईची गर्दी तिकडे सरकत होती. माझा भाचा तीनचार वर्षाचा असेल. त्याला तिथल्या इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेत घातलेले होते. इकडे लालबागला आजीकडे कधी दोनचार दिवस आला, मग आजीचे कौतुक चालायचे. ती त्याला काऊचिऊ दाखवायची. एकदा मी लिहित बसलो असताना, त्यांचा संवाद मला थक्क करून गेला. आजी त्याला खिडकीत बसलेला काऊ दाखवत होती, त्याला मात्र चार पायाची काऊ दूध देते, असे माहित होते. तो आजीला म्हणाला, आमच्याकडे मोठी काऊ आहे. ती उडत नाही, तिला चार पाय असतात, ती दूध देते. आजीला कारटे मुर्ख वाटले होते. अखेरीस मी तिला त्याच्या इंग्रजी भाषेतला काऊ म्हणजे गाय, असल्याचे समजावले, तेव्हाच आजी व नातवातला विवाद संपला होता. कारण काऊ शब्दाचा आपापला अर्थ दोघेही मागे घ्यायला तयार नव्हते. नेमकी तशीच परिस्थिती ठाकरे निधनानंतर दिल्लीपासून अनेक वाहिन्यांच्या स्टूडीओमध्ये बसून चर्चा करणार्‍यांची झाली होती. लाखो लोक एका अंत्ययात्रेला गर्दी करतात, तेव्हा ते निवर्तलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात, त्याचा आदर करतात, अशीच एक समजूत आहे. पण ज्याला लोक घाबरतात व ज्याची लोकांवर प्रचंड दहशत असते, तेव्हा लोक भयभीत होऊन त्याच्या अंत्ययात्रेला येत नाहीत. जेवढे लोक त्याला जिवंत असताना ऐकायलाही कधी जमले नाहीत, तेवढे लोक अंत्ययात्रेत कसे आले?

   ज्यांची बुद्धी वाचलेल्या वर्णनात व ऐकलेल्या अफ़वांवरच विसंबून होती, त्यांना समोरचे दृष्य पटणे अवघडच होते. जिथे नुसत्या गर्दीचे विश्लेषण करताना इतकी गल्लत होती, तिथे त्या माणसाच्या निर्वाणानंतर त्याच्या राजकीय वारश्याचे काय होईल; याचे विश्लेषण किती अशक्य कोटीतली गोष्ट असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. आता बाळासाहेब या जगात नाहीत. मग त्यांनी स्थापन केलेल्या व जिचा दबदबा आहे अशा राजकीय संघटना शिवसेनेचे काय होणार; याची चर्चा अवघ्या आठवड्याभरातच सुरू झाली. अजून चालूच आहे. आणि ही चर्चासुद्धा अंत्ययात्रेच्या गर्दीवर बकवास झाली; तेवढीच मनोरंजक आहे. कारण ज्यांना बाळासाहेब वा शिवसेनाप्रमुख कळला नाही, ज्यांना त्याची शिवसेनेतील भूमिका वा कार्यशैली कळली नाही, त्यांना त्याच्यानंतर शिवसेना चालवायची म्हणजे काय; त्याचा तरी थांगपत्ता असेल का? मग त्यांनी अशा विषयावर आपले निर्बुद्ध मतप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? अशा तमाम अर्धवटरावांना शिवसेना वा ठाकरे कळले नाहीत, असे मी का म्हणतो, त्याचे उत्तर आठवडाभरातच दोन नामवंत माजी शिवसैनिकांनी मुंबईच्या मंत्रालयात दिले. तिथे मंत्रालय वार्ताहर संघातर्फ़े श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात उद्योगमंत्री नारायण राणे व बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. त्या ज्यांना समजून घेता येतील, त्यांनाच शिवसेना व बाळासाहेब समजू शकतील. मगच त्यांच्या मागे शिवसेनेचे काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.

‘एका रात्री उशीरा आपल्याला बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावले आणि तुला मुख्यमंत्री करतो असे सांगितले. मग दुसर्‍या दिवशी सकाळी मनोहर जोशींना     राज्यपालांकडे राजिनामा देऊनच भेटायला या असे फ़र्मावले. असा मी मुख्यामंत्री झालो’. अशी आठवण राणे यांनी एका वाक्यात सांगितली. बाळासाहेब कसे निर्णय घ्यायचे त्याचा हा नमुना आहे. शिवसेना नसती तर आमची नावे महाराष्ट्राला कधी कळली सुद्धा नसती, अशी त्या दोन्ही मंत्र्यांनी शिवसेनेत आज नसताना दिलेली कबुलीच शिवसेना म्हणजे काय त्याचे उत्तर देतात. अन्य पक्ष किंवा त्यांची कार्यशैली व बाळासाहेबांनी स्थापन केलेली व शेहेचाळिस वर्षे चालवलेली शिवसेना; यातला फ़रक त्या दोघांच्या एका वाक्यात सामावला आहे. शिवसेना नसती तर आम्हाला महाराष्ट्राने कधी ओळखलेच नसते, याचा अर्थ काय? आम्हाला बाळासाहेबांनी घडवले. सामान्य घरातली मुले राजकीय पार्श्वभूमी नाही, की कोणी गॉदफ़ादर नाही, अशा तरूणांना हाताशी धरून त्यांच्या उर्जेला काम देणारा व त्यांच्यातल्या गुणवत्तेला कोंदण देणारा; अशी त्यांची कार्यशैली होती. सरकार, सत्तापदे वा अन्य कशापेक्षाही संघटना व कार्यकर्त्यावर सतत विसंबून राहिलेला नेता; ही त्यांची खरी ओळख होती. पण त्याच हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी मुंबईमध्ये जो धाक निर्माण केला होता, त्याचा दबदबा थेट पाकिस्तानपर्यंत होता, याची कबुली अलिकडेच भारताच्या भेटीवर आलेल्या तिथल्या पत्रकारांनीच मुंबईच्या वार्तालापामधून दिली होती. या माणसाची दहशत होती ती मुंबईत; मग तिचा पाकिस्तानात दबदबा कशाला होता, याचे उत्तर ज्यांना शोधावेसे कधी वाटले नाही, ते बाळासाहेब वा शिवसेना यांचे विश्लेषण काय करणार? त्यांना राज ठाकरे संघटनेतून बाहेर पडले व उद्धवमुळे काय झाले; त्याचा थांग कसा लागणार? कारण त्यांना समोर दिसते आहे ते तसेच बघायची इच्छा नाही, की हिंमत नाही. आपापल्या रंगाचे चष्मे लावून तुम्ही बघितले तर समोरचे दृष्य त्याच रंगाचे दिसणार ना? मग गर्दी आली तरी ती भयभीत होऊन आली, असेच तुम्ही म्हणणार. त्यातले रडवेले चेहरे तुम्हाला काहीही सांगू शकत नाहीत. त्यातली अस्वस्थता तुम्हाला काहीही दाखवू शकत नाही. घडलेला फ़रक तुम्हाला जाणवू शकत नाही.
.
   इथे पोलिस आहेत, सरकार आहे, कायदा आहे, सर्वकाही आहे, पण ज्याचा धाक असावा, असे कोणीच राहिलेले नाही. आणि तीच जागा बाळासाहेबांनी व्यापली होती. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात खेळू देणार नाही, असे हा माणूस म्हणायचा, त्याची दखल त्या देशातल्या संस्थेला घ्यावीशी वाटली. त्यांनीही त्यांची तब्येत सुधारावी म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या. भारत सरकार व इथला कायदा त्यांना संरक्षण द्यायला समर्थ असताना, पाक क्रिकेट मंडळाने ठाकरे यांच्या दखल का घ्यावी? तर त्या माणसाच्या शब्दामागे ताकद होती. त्या ताकदीला शिवसेना म्हणतात. या माणसाने विरोध केला तर हजारो लोक रस्त्यावर येतात आणि मग कायदा राखणार्‍यांना तो जमाव आवरता येत नाही, याची खात्रीच पाक खेळाडूंना होती. ती रस्त्यावर उतरणारी गर्दी ही शिवसेनाप्रमुखांची ताकद होती. आणि तिलाच शिवसेना म्हणतात. पावत्या फ़ाडून पक्षाचे सदस्य होणार्‍यांची ती गर्दी नव्हती. ती थेट त्या माणसावर विसंबून मुंबईत निर्धास्त जीवन जगणारी गर्दी होती. कोण आपला वाली आहे, अशी भ्रांत ज्यांना पडलेली असते, अशा लोकांची ती गर्दी होती. सरकार वा कायदा यंत्रणा जे धाडस करू शकत नाही, तेही हा माणुस करू शकतो, असे वाटणार्‍यांची गर्दी तिथे लोटली होती. म्हणूनच त्या गर्दीचे वा त्या माणसाचे विश्लेषण करायचे, तर तो माणूस आधी समजून घ्ययला हवा. त्याची ही प्रतिमा, त्याचा हा वचक व धाक किंवा त्याची ही संघटनाशक्ती कशी निर्माण झाली, ते आधी बारकाईने शोधून, तपासून घ्यावे लागेल. मगच त्याबद्दल बोलता येईल. मगच त्याच्या निर्वाणाने किती व कोणती पोकळी निर्माण झाली व कशी भरून येईल याची चर्चा होऊ शकते. शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नाही, ती बाळासाहेबांची शक्ती होती, ज्या शक्तीने ह्या माणसाची मुंबईचा तारणहार अशी प्रतिमा उभी केली होती. हे कसे घडले, कधी घडले व कसकसे घडत गेले; तो एक इतिहास आहे. एका युगाचा इतिहास आहे. तो उलगडत गेले तरच इतकी लक्षावधी माणसे का गोळा झाली, ते लक्षात येऊ शकेल. मी त्यासाठीच प्रयत्न करणार आहे. बधू किती लेख होतात ते.     ( क्रमश:)
भाग   ( ९ )    २८/११/१२

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

मुंबई नव्या तारणहाराचा शोध घेते आहे का?




   काल नेहमीप्रमाणेच एक आणखी दिवस साजरा झाला. कुठे मोठ्या उत्साहाचे तर कुठे नैराश्येचे वातावरण होते. कुठे देखावा होता तर कुठे भावनेचा आवेश वा अगतिकता होती. पण ज्याला मुंबईची नित्यजीवनाची परिस्थिती म्हणतात, त्याचाच अनुभव होता. आपण दु:ख किती लौकर विसरतो, त्याची मलाही काल जाणिव झाली. त्याचे आणखी एक कारण आहे. चार वर्षापुर्वी ज्यांचा मृत्यू झाला वा ज्यांना क्रुरकर्मा कसाबने यमसदनी धाडले, त्यांच्या पुरताच हा विषय नव्हता. कारण त्यांच्या घरात येऊन कोणी गुपचुप त्यांचे हत्याकांड केले नव्हते. अपहरण करून त्यांना कुठे मारून टाकले नव्हते. वाटमारी करताना त्यांचा मृत्यू झाला नव्हता किंवा ते लोक जखमी झाले नव्हते. जो हल्ला झाला तो मुंबई नावाच्या एका महानगरावर झाला होता आणि भारत नावाच्या एका खंडप्राय देशावर तो हल्ला झाला होता. पण चार वर्षे त्यातल्या एका आरोपीला फ़ासावर लटकवतांनाही आपल्या देशातील कायदा प्रशासनाची जी तारांबळ उडालेली होती, ती पाहून लोकांचा धीर सुटला तर नवल नाही. अशाप्रसंगी आपण काय करावे हे सामान्य माणसाला कळत नाही, कारण सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी आहे. पण ती सुद्धा हाताळू न शकणार्‍या सरकारची व त्याच्या कायद्याची; सापडलेल्या खुन्याला शिक्षा द्यायलाही इतकी दमछाक होत असेल तर तुमचीआमची काय कथा? आपण हतबल व अगतिकच होऊन जाणार ना? मग असे वार्षिक समारंभ देखावा असतात, हे मन सांगत असते, पण उघड बोलायचीही हिंमत आपल्यात उरलेली नसते. त्याच अगतिकतेची छाया २६/११ च्या सोहळ्यावर पडलेली होती. इतर डझनभर कार्यक्रमापैकी एक अशीच त्यात वावरणार्‍या शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांसह, कार्यकर्त्यांची मनोवृत्ती लपत नव्हती. कारण त्यात कुठेही सहवेदना किंवा सहानुभूतीचा लवलेश नव्हता. सगळीकडे औपचारितता स्पष्टपणे जाणवत होती. काय होती ती औपचारिकता?

   पुढला असा काही प्रसंग येईपर्यंत साजरा करायचा आणखी एक दिवस वा तारिख; यापेक्षा आता २६/११ या तारखेला काही अर्थ उरलेला नाही. आठदहा महिन्यांपुर्वी ‘कोलावरी’ नावाच्या एका गाण्याचे कौतुक सगळीकडे चाललेले आठवते आपल्याला? आज कोणाच्या तोंडी ते गाणे नाही. त्याच्या जागी थोड्याच दिवसात दुसरे गाणे आले होते. मग तिसरे, चौथे, पाचवे असे होत नव्या गाण्याच्या लोकप्रियतेखाली आधीचे गाणे गाडले जाते, तसे आपल्या दु:ख वेदनांचे व सामुहिक जखमांचे झालेले आहे. आधीच्या जखमा भरून येण्यापुर्वीच नव्या अधिक भयंकर जखमा आपल्याला अगोदरच्या वेदनेवरचा उपाय देत असतात. १९९३ च्या स्फ़ोटाच्या जखमा व वेदनांची आज कोणा मुंबईकराला आठवणसुद्धा राहिलेली नाही. त्यांचे कौतुक जुलै २००६ च्या स्फ़ोटमालिकेपर्यंत चालले आणि आता २६/११ ने त्याचीही आठवण क्षीण होऊन गेली आहे. कसाबला फ़ाशी चढवले म्हणून आपण पेढे वाटले, खाल्ले व खुश झालो. मात्र जुलै २००६ च्या स्फ़ोटाचा खटला अजून निकाली लागलेला नाही, याचे आपल्याला स्मरणही उरलेले नाही. इतके भयंकर बधीरपण आपल्यामध्ये आलेले आहे. त्याचेही कारण असते. दारुडा किंवा नशाबाज असतो ना? त्याला अंगावरच्या जखमा किंवा रक्रबंबाळ शरीराचे भानच नसते. नशेमध्ये धुंद असलेल्या त्या माणसाला वेदना जाणवतच नाहीत. आपण त्याच्या जखमा बघून विव्हळतो, पण तो बेफ़िकीर असतो. त्या जखमांच्या वेदना त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नसतात. आपलेही आता हळुहळू तसेच झाले आहे. एक समाज म्हणून आपल्या जाणीवाच बोथट, बधीर होऊन गेल्या आहेत. सांडलेले रक्त दिसते, झालेल्या जखमा दिसतात, मेलेले मुडदे दिसतात; पण त्याच्या वेदनांची कुठलीही जाणिव आपल्याला होत नाही. समोर घडते वा दिसते, त्याचा कुठलाही बोध आपल्या मेंदूला होत नाही. त्यापासून सावध होण्याची इच्छाच आपल्या मनत उपजत नाही. असे का व्हावे? आपल्याला काय झाले आहे? आपल्या सर्व संवेदना अशा का बोथटल्या आहेत? कोणी असा क्लोरोफ़ॉर्म दिल्याप्रमाणे आपल्या सर्व भावना व संवेदना निष्क्रिय करून टाकल्या आहेत?

   मला खात्री आहे, की अशी अगतिकता अनेकांना मनोमन जाणवली असेल, पण तिचा बोधच होत नसल्याने त्यांचे मन अस्वस्थ झाले असेल. त्याचे कारण सापडत नसल्याने अंगावर पडलेल्या झुरळाप्रमाणे वा तोंडापाशी घोंगावणार्‍या माशीप्रमाणे; हा विचार अनेकांनी झटकून टाकला असेल. पण त्या माशीप्रमाणेच तो विचार पाठ सोडत नसेल. त्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा मनाला अधिकच व्याकुळ करणारी असेल. पण बोलायचे कोणी व सांगायचे कुणाला; अशी आणखी एक पंचाईत असते. कारण समोरचाही त्याच विवंचनेत आहे, याची प्रत्येकाला जाणिव आहे. सत्य असेच असते, ते पाठ सोडत नाही आणि झटकून टाकता येत नाही. आपली ही अगतिकता कुणा कसाबच्या सैतानीने आणलेली नाही किंवा त्याच्या राक्षसी क्रौर्याने आपल्यात भिनलेली नाही. आपल्याला अशा क्रौर्याचा प्रतिकार करायची मोठीच उबळ असते, इच्छाही उचंबळून येते. पण असे बोललो तर लोक काय म्हणतील, अशा भयाने आपल्याला पछाडलेले आहे. आपण अशा धोक्याचे थेट दोन हात करायचा नुसता विचार बोलून दाखवला; तरी आपल्यावरच हिंसाचाराचा आरोप होईल काय; अशा भयाने आपल्यात एक अगतिकता बाणवलेली आहे. त्यापेक्षा निमूटपणे कसाबाला शरण जायचे आणि झालेल्या जखमा चाटायच्या. त्यालाच शौर्य म्हणतात, असे आपल्या मनीमानसी भिनवण्यात आलेले आहे, जे आपल्याला मनोमन पटलेले नाही, पण मनातले सत्य बोलायची मात्र भिती वाटते. हेच त्या अगतिकतेचे स्वरूप आहे. कसाबने गोळ्या घालून आपल्यातले शेदिडशे लोक मारले तरी मनाला लावून न घेता दुसर्‍या दिवशी मुंबईकर कामाला लागला, म्हणजेच मुंबईकर कसा शूर आहे असे जे ढोल पिटले जातात, त्यातून आपल्या विवेकबुद्धीला ही नशा आणलेली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. जखमा चाटण्यातला पुरूषार्थ आपल्याला अंगवळणी पडला आहे किंवा पाडण्यात आलेला आहे. त्यातून एखाद्या क्षणी शुद्ध येते; तेव्हा आपल्याला त्याच्या फ़ोलपणाची जाणिव होते आणि आपणच स्वत:कडे तुच्छतेने बघू लागतो. काल २६/११ च्या दिवशी आपल्याला सतावत होती, ती स्वत:विषयीची तुच्छतेची भावना होती. आपल्यातला नाकर्तेपणा, हतबलता, अगतिकताच त्याचे कारण होती. जी आपल्याला जगापासून तोंड लपवायला सांगत होती.

   सव्वा कोटी लोकसंख्येच्या या महानगरात दहा लोक बंदुका व हातगोळे घेऊन येतात आणि इतक्या प्रचंड लोकसंख्येला कित्येक तास ओलिस ठेवतात, तेव्हा ते नुसती माणसे मारत नसतात, तर तुम्ही नुसत्या जीव मुठीत धरून पळणार्‍या जनावरांच्या झूंडी व कळप आहात, आणि आम्ही शिकारी आहोत, असेच आपल्याला सांगत असतात. ज्याप्रमाणे जो वागतो, त्याप्रमाणे त्याचे शब्द अर्थपूर्ण होत असतात. आपण ज्या कारणास्तव आलो, ती मोहीम यशस्वी ठरवण्यासाठी त्या नऊ जिहादींनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. अगदी कसाबही बिनदिक्कत फ़ासावर गेला. पण जगण्यासाठीच या मुंबईत येणारे व वास्तव्य करणारे, त्याच जीवनासाठी काय पणाला लावायला सिद्ध आहेत? कुठलीच गोष्ट त्या मुंबईकराला पणास लावायची नाही. आपण या लढाईत उतरू शकत नाही किंवा आपल्यात तेवढी हिंमत नाही, हीच भावना त्या अगतिकतेचे खरे कारण आहे. त्यांनी धमक्या द्यायच्या, हल्ले करायचे, मनसोक्त कत्तल करायची आणि आपण नुसत्या प्रतिकाराचीही हिंमत दाखवू शकत नाही, असे त्या अगतिकतेचे स्वरूप आहे. मग आम्हाला त्यातून वाचवणार कोण? कोण आहे आमचा तारणहार? जिहादी हल्ले, स्फ़ोट, घातपात आणि त्यांच्यासमोर अगतिक व हतबल असलेला कायदा व सरकार; यांनी मुंबईकरच नव्हेतर एकूणच भारतीय समाजामध्ये ही अगतिकता आलेली आहे. त्यामुळेच मग कोणीतरी आपला तारणहार असावा अशी प्रतिक्षा हा समाज, म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या करीत असते.

   मी कुठल्या लोकसंख्येबद्दल वा समाजाबद्दल बोलतोय, तुमच्या लक्षात आले का? हे रहस्य असेल तर ते एकट्या भाऊ तोरसेकरला कुठून कळले, असाही प्रश्न डोक्यात आला की नाही? की भाऊने मतचाचणी घेतली, फ़ेसबुक वा ट्विटर, इंटरनेटच्या माध्यमातून लोकमत आजमावले? कुठून लोकसंख्येला अशा कुणा तारणहाराचा शोध आहे, असा जावईशोध मी लावला, असा प्रश्न मनात आला की नाही? मित्रांनो, मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा जरा भयगंडाच्या धुंदीतून बाहेर येऊन समोर दिसणारे सत्य बघा. उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. कसाब फ़ासावर लटकण्याच्या तीन दिवसआधी तेच उत्तर कित्येक तास मुंबईचे रस्ते व्यापून तुम्हाला साक्षात्कार घडवत होते.  बुधवारी कसाबला फ़ाशी झाली आणि रविवारी मातोश्री ते शिवाजीपार्कपर्यंत लक्षावधीचा जनसागर कशासाठी लोटला होता? कोणासाठी लोटला होता? बाळासाहेबांना श्रद्धांजली द्यायला? अजिबात नाही. तो अफ़ाट जनसमूदाय आता बाळासाहेब गेल्यावर यापुढे आपला, मुंबईचा तारणहार कोण याचाच व्याकुळ नजरेने शोध घेत होता.     ( क्रमश:)
भाग   ( ८ )    २७/११/१२

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

शहिदांनो उदार मनाने आम्हाला माफ़ करा



   चार वर्षे झाली म्हणून आज आपण एक दिवस साजरा करणार आहोत. कशाला चार वर्षे झाली? आपल्याच किळसवाण्या कत्तलीला आज चार वर्षे पुर्ण झाली. आणि ज्या वेळी हे हत्याकांड चालू होते, तेव्हा आपण सगळे कुठेतरी सुरक्षित आडोसा शोधून लपलो होतो. आपल्यातले अनकेजण धाडस करून्न रस्त्यावर होते. काही अनवधानाने कसाब टोळीच्या तडाख्यात सापडले, त्यांना सोडून देऊ. आणि ज्यांनी धोका समोर दिसत असतानाही पुढे त्याच्याशी सामना करण्याची हिंमत दाखवली; त्या शहिद व जखमींची गोष्ट बाजूला राहू द्या. उरलेल्यांचे काय? ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, त्यात पोलिस, कमांडो होते; तसेच अगदी ताज ओबेरॉयमधले काही कर्मचारी सुद्धा होते. काही तर तुमच्या आमच्यातले सामान्य नागरिक सुद्धा होते. असे धाडस करणार्‍यांची गोष्ट वेगळी आहे. कारण ते अपघाताने त्या हल्ल्यात बळी पडले. कसाब किंवा त्याचे साथीदार त्यांना मारायला आलेलेच नव्हते. किंबहूना ती टोळी कोणाला जीवे मारायला आलेलीच नव्हती. ते एकाला मारून लाखभर लोकांच्या मनात धडकी भरवायला आलेली होती. आणि आज कसाब फ़ासावर लटकलेला असला; तरी त्याच्या मोहिमेत तो यशस्वी नक्कीच झाला आहे. त्याबद्दल त्याच्या सुत्रधार व प्रेरणाशक्ती असलेल्या सईद हफ़ीझने त्याला विशेष नमाज पढून पाकिस्तानात श्रद्धांजलीसुद्धा वाहिलेली आहे. आपले काय? कसाबच्या फ़ाशीनंतर टाळ्या वाजवणारे आपण किती खरे आहोत? जे मेले किंवा मारले गेले, त्यांच्यासाठी आपण काय केले? आपण कोणता लढाऊ बाणा दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती? घटनेला आठवडा उलटल्यावर त्याच गेटवेपाशी, ताज हॉटेलपाशी जे मेणबत्त्या पेटवण्याचे नाटक व रिआलिटी शो रंगवण्यात आला; त्यात आपण मोठ्या उत्साहात सहभागी झालो होतो. दहशतवादाच्या विरोधात केवढा मोठा आवाज उठवला ना आपण? कधी उठवला? सर्व काही शांत झाल्यावर. मग मुंबईभर शहिद झालेल्यांचे मोठमोठे फ़लक झळकले. पण जेव्हा प्रत्यक्ष हत्याकांड चालू होते व रक्तपात चालू होता, तेव्हा आपण कुठे होतो? आपापल्या सुरक्षित बिळामध्ये दडी मारून बसलो होतो. आपल्यासाठी जे कोणी लढत असतात, व लढत होते, त्यांना तसेच एकाकी सोडून आपण पळ काढला होता. मुठभरच असे होते जे पोलिस वा कमांडो नव्हते, पण रस्त्यावर होते आणि त्या लढाईत नागरिक म्हणुन कर्तव्य बजावल्यासारखे पोलिसांना मदत करत होते. कोण होते हे लोक?

   ज्यांना आपण नेहमीच्या कालखंडात हुल्लडबाज किंवा टपोरी म्हणून हिणवत असतो ना, तेच लोक तेव्हा रस्त्यावर होते. वर्गण्या काढून उत्सव करणारे, कुठे अनुचित प्रकार घडला, मग दंगल करायला सरसावणारे असतात ना, असेच भणंग किंवा उनाड-उद्धट लोक तेव्हाही रस्त्यावर होते आणि जमेल तशी पोलिसांना मदत करत होते. कोणी रस्त्याची नाकाबंदी करण्यात पोलिसांना हातगाड्य़ा आडव्या टाकायला मदत केली असेल, तर कोणी मिळेल ते रस्त्यावर उपलब्ध सामान नाकाबंदीसाठी गोळा करून दिले असेल. त्या धावपळीत त्यातलाही कोणी कसाबच्या साथीदाराचा बळी होऊ शकला असता. पण जीवाची पर्वाही न करता असे टपोरी रस्त्यावर होते. त्यांच्यात ही हिंमत कुठून आली होती? त्यांना कोणी प्रशिक्षण तर दिलेले नव्हते, की जिहादी हल्लेखोरांशी लढाई करायला मदतीला त्यांना पोलिसांनी बोलावले नव्हते. तरीही ते नेहमीचे हुल्लडबाज तिथे सरसावून पुढे आले होते. त्यात कोणी बळी गेला किंवा नाही ते मला माहिती नाही. पण असे दोनतीन हजार मुंबईकर नक्कीच आहेत, ज्यांनी त्या रात्री जबाबदारी नसताना, त्या घटनाक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. अर्थात त्यात नवे असे काहीच नाही. मुंबईच कशाला कुठल्याही शहरात अशी खोडकर तरूण, उनाड तरूण मंडळी असते, ज्यांच्याकडे आपण उचापतखोर हुल्लडबाज म्हणून बघत असतो. त्यांच्या मस्तीला गुंडगिरी म्हणून हिणवत असतो. त्या अनुभवातूनच त्यांच्यात त्या रात्री पुढे सरसावण्याची हिंमत आलेली होती. कधी कोणी अशा हुल्लडबाजांचे गेल्या चार वर्षात आभार तरी मानले आहेत काय? आणि हे आजचेच नाही. मागल्या दोन दशकात मुंबईवर अनेक घातपाती व स्फ़ोटाचे हल्ले झाले आहेत. त्यात शेकड्यांनी लोक मेले आहेत; हजारो जखमी झाले आहेत. त्या प्रत्येकवेळी हेच उचापतखोर मदतीला धावून आले आहेत. कधी त्यांनी जखमींना रुग्णालयात धावपळ करून पोहोचवले असेल, कधी तातडीने रक्तदानाची रांग लावली असेल, जखमींना उचलून दिलासा दिलेला असेल. किती पांढरपेशे त्यात पुढे असतात? नेहमी असे संकटमोचन तेच हुल्लडबाज असतात. पण कधी कोणी त्यांचे आभार मानले आहेत काय? उलट जेव्हा त्यांच्या या हिंमतीची आपल्याला गरज नसते; तेव्हा त्यांच्या वागण्याचा त्रास होतो, म्हणून तक्रारी करण्यात आपण पुढे असतो.

   गरज संपली मग आमचे शहाणे शांततेची जपमाळ हातात घेऊन आपापल्या सुरक्षित बिळातून बाहेर येतात आणि मेणबत्त्या किंवा गुलाबपुष्प वहाण्याचा तमाशा सुरू करतात. आपण स्वत:ला सुबुद्ध समजणारे मध्यमवर्गिय किंवा पांढरपेशे असल्या तमाशावर बेहद्द खुश असतो. आजही त्यांचाच तमाशा चालू आहे. मुंबईत जागोजागी अशा श्रद्धांजलीचे समारंभ योजलेले दिसतील. तिथे मान्यवर म्हणून पळपुट्यांची हजेरी असेलच. दिसणार नाहीत ते प्रत्यक्ष प्रसंगी ज्यांनी धाडस दाखवले असे ते हुल्लडबाज. आणि आपल्यापैकी कोणाला त्यांच्या कामगिरीचे कौतुकही नाही. त्यांनाही तशी काही अपेक्षा नसते. आपण आपले कर्तव्य बजावाले अशी त्यांची अलिप्त भूमिका असते. मला तसे अनेक लोक माहिती आहेत. म्हणूनच हे लिहावे लागते आहे. ते १९९२ च्या दंगलीत जाळपोळ करायला आघाडीवर होते, तसेच दोन महिन्यांनी झालेल्या बॉम्बस्फ़ोट मालिकेत रक्तदान करायलाही तेच पुढे होते. अगदी कसाब टोळीचा हल्ला झाला तेव्हाही त्यांच्यासारख्यांनीच केलेली धावपळ मला माहित आहे. परिस्थिती त्यांच्या कृतीमध्ये विलक्षण बदल घडवून आणत असते. दंगलीत जाळपोळ हिंसा करणारा राक्षस, स्फ़ोटाच्या प्रसंगात देवदूताप्रमाणे वागतांना मी बघितला आहे. तेव्हा तसा आणि मग असा, तो का वागतो; याचा आपण कधीच विचार करत नाही, की शोधही घेत नाही. त्याची आपल्याला भिती वाटत असते. त्याची म्हणजे त्या हुल्लडबाजांची नव्हे; तर आपल्याच निकम्मेपणाची भिती आपल्याला भेडसावत असते. मग आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी सर्वत्र शांतता स्थापित झाली; मग आपण हिंमत दाखवायचे नाटक करतो. पुष्प वहायला किंवा मेणबत्त्या पेटवायला हजेरी लावतो. त्याचाही समारंभ करतो. ते समारंभ आपला नाकर्तेपणा व भ्याडपणा झाकण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड असते. म्हणून मी म्हणतो आपण बेशरम झालो आहोत.

   आपण भयभीत आहोत, आपण दहशतीखाली जगत आहोत, कोणी इथे आपल्यावर बंदूक रोखण्याचीही गरज नाही; इतके आपण आधीच शरण गेलेले आहोत. म्हणून मग कोणी थोडीशी हिंमत केली तरी आपल्याला आपल्या नंपुसकत्वाचे पितळ उघडे पडेल; याची भिती वाटत असते. मग आपण विचारवंताचा आव आणून हिंसेचा निषेध करण्याचे नाटक रंगवतो. कारण हिंसा करण्याची आपल्यात हिंमत नाही, मग हिंसेचा प्रतिकार करायची तरी आपली लायकी कशी असेल? मग आपण गांधीजींच्या पंचाआड लपतो. गांधींनी अहिंसेची शिकवण दिली अशी पळवाट शोधतो. पण तेही अर्धसत्य असते. ज्याच्याकडे हिंसा करण्याची पुर्ण क्षमता आहे आणि तरी तो मनावर ताबा ठेवून हिंसा टाळतो, त्याला अहिंसा म्हणतात, अशी गांधीजींची व्याख्या आहे. मग जे हिंसेला घाबरून दडी मारुन बसतात आणि सर्वत्र शांतता सुखरूप असले मग अहिंसेचे नाटक रंगवतात, ते गांधीवादी कसले? जे हिंसा करायलाही पुढे सरसावतात व प्रसंग बदलला मग जीव पणाला लावून दुसर्‍याचा जीव वाचवतात, त्यांना निदान अर्धे गांधीवादी म्हणता येईल. उलट प्रसंग ओढवला मग सुरक्षित बिळात लपून बसणारे आणि नंतार अहिंसेची जपमाळ ओढणारे भंपक असतात. तुकाराम ओंबळेने त्या दिवशी आपला जीव पणाला लावून कसाबला जिवंत पकडले, त्याला अस्सल गांधीवादी म्हणता येईल. ज्या हुल्लडबाजांनी त्या दिवशी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर येऊन आपल्याला जमेल तशी पोलिस व प्रशासनाची मदत केली; तेही मोठेच देशभक्त म्हणावे लागतील. बाकीचे आम्ही जे नुसत्याच वल्गना करतो आणि शब्दांचे बुडबुडे उडवतो, त्यांच्यापेक्षा असे हुल्लडबाज समाजासाठी खरे उपयुक्त असतात. कारण कसोटीच्या वेळी ते धावून येतात. आमच्यासारखे शब्दांचे समर्थ पुरूष मुडद्यांची शवचिकित्सा करणारे निकम्मे असतो. मग तो वाहिनीच्या चर्चेतून, वृत्तपत्रातून वा भाषणातून शब्दांचा फ़ेस काढणारा, पण प्रसंगी पळ काढणारा कोणीही असो. आम्ही कमालीचे बेशरम असतो आणि आहोत. शहिदांनो आम्हाला उदार मनाने माफ़ करा, एवढीच आजच्या दिवशी प्रार्थना.   ( क्रमश:)
भाग   ( ७ )    २६/११/१२

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

मोगॅम्बो खुश व्हायला नको तर काय करायचे?


    शब्दांचे अर्थ परिस्थिती व प्रसंगाप्रमाणेच संदर्भानुसारही बदलत असतात. त्या चार वर्षापूर्वीच्या घटनेनंतर तुकाराम ओंबळेने मला हे शिकवले असेच मी मानतो. त्याक्षणी त्याने सगळे नियम व कायदे बाजूला ठेवले. त्याने कुणा वरीष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा केली नाही. जितका एकटा अजमल कसाब आपले निर्णय घेऊन बेधडक वागत होता, तितकाच तुकाराम ओंबळे त्याक्षणी एकटा होता. हा देशावरचा हल्ला असेल तर तो माझ्यावरचाही हल्ला आहे आणि मला वाचवायचे तर देश वाचवला पाहिजे, अशी त्याची त्या क्षणीची भूमिका होती. देश आणि तुकाराम ओंबळे यांच्यात फ़रक राहिला नव्हता. सगळेच आपापले जीव वाचवायला पळत असताना तुकाराम ओंबळेने स्वत:लाच भारत देश समजून कसाबवर प्रतिहल्ला चढवला होता. तेव्हा त्याच्यात सव्वाशे करोड भारतीयांचे बळ संचारले होते.

   खुप वर्षापुर्वी मुलांसोबत एक अत्यंत पोरकट वाटणारा ‘मिस्टर इंडीया’ नावाचा चित्रपट मी बघितला होता. त्यामध्ये मोगॅम्बो नावाचा एक काल्पनिक खलनायक भारत उध्वस्त करण्याचे कारस्थान खेळत असल्याची कथा होती. तेव्हा अदृष्य होऊन त्याच्याशी झुंज देणारा अनील कपूर त्याला आपले नाव मिस्टर इंडिया असे सांगतो. एका प्रसंगी तो मोगॅम्बोला सांगतो, तुझ्यासारख्यांना संपवायला एक सामान्य भारतीय सुद्धा पुरेसा आहे. मला त्या वाक्यावर पडणार्‍या टाळ्या ऐकून हसू आले होते. तसे मी तेव्हा लिहिले सुद्धा होते. एक सामान्य भारतीय एवढा पराक्रम कसा काय करू शकतो? अद्ययावत हत्यारे, रॉकेटस, तोफ़ा वा बॉम्ब घेऊन कोणी समोर आला, तर सामान्य भारतीय काय करू शकणार आहे? माझ्या तर्ककठोर बुद्धीवादाला न पटणारी ती बाब होती. आणि माझ्याच कशाला कोणाच्याही विवेकी बुद्धीला ते पटणारे नव्हते. पण माझा तो तर्ककठोर बुद्धीवाद २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुखवट्यासारखा गळून पडला. कारण मी बघत होतो, त्या छोट्या पडद्यावर तुकाराम ओंबळे नावाचा एक सामान्य भारतीय हातात एक साधा वेताचा दंडूका घेऊन समोर साक्षात मोगॅम्बो बनून आलेल्या अजमल कसाब नावाच्या मोगॅम्बोवर तुटून पडला होता. कुठून हे बळ त्याच्या अंगात संचारले होते? त्याने मिस्टर इंडिया बघितला होता काय? त्या अनील कपूरच्या वाक्याचा ओंबळेवर परिणाम झाला होता काय? तो चित्रपट बघतांना तिथली गर्दी सुखावताना बघून मला त्यांची कींव आलेली होती. कोणी असा मिस्टर इंडीया नसतो, आणि तो तुम्हाला वाचवणार नाही, असे शेवटी एका प्रसंगी अनील कपूरच सांगतो आणि त्याच्या टोळीतली मुले एकजूटीने त्या प्रसंगाला सामोरी जातात. यापेक्षा ओंबळेने व त्याच्या तात्कालीन सहकार्‍यांनी दाखवलेले धैर्य वेगळे नव्हते. आमचे लेख वा बौद्धीक अग्रलेख वाचून त्यांच्यात एवढे धैर्य कधी येण्याची शक्यता नाही. पण चित्रपटातल्या मनोरंजनातून किंवा कुठल्या पुराणकथा किंवा प्रवचन, शिवचरित्र ऐकण्यातून त्यांच्यात जो पुरूषार्थ संचारतो, तेव्हाच असा अचंबित करणारा पराक्रम त्यांच्यकडून होऊ शकतो. तो पराक्रम वा ते धैर्य आमचे लेख वा कुठल्या कायद्याच्या शब्दांनी वा अधिकारांनी त्यांच्यात संचारू शकत नाही. त्यासाठी सामान्य माणुस असावे लागते. बुद्धीमंतांचे ते कामच नाही.  

   आणि बुद्धीमंत म्हणजे तरी कोण असतात? जे सत्तेसमोर किंवा बलदंडासमोर शेपूट घालतात व शरणागत होतात. पण जरा टिकेची संधी दिली, मग स्वातंत्र्य देणार्‍यालाच लाथा झाडू लागतात. खरे तर विचारवंत किंवा अभिजनवर्ग म्हणुन जे अखंड समाजाला शहाणपण शिकवत असतात, त्यांच्यासारखा कोणी पळपुटा दुसरा नसतो. एक उत्तम इंग्रजी चित्रपट आहे, त्यामध्ये एका भणंगाच्या तोंडी बुद्धीवादी वर्गाचे नेमके वर्णन आलेले आहे. ‘विथ ऑनर्स’ नावाचा हा चित्रपट आहे. त्यात हॉवर्ड विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये एक प्राध्यापक मुलांना अमेरिकन राज्यघटनेविषयी प्रश्न विचारून त्यांची भंबेरी उ्डवत असतो. अचानक तिथे वर्गात विद्यार्थी नसलेला एक भणंग बसल्याचे प्राध्यापक महाशयांच्या लक्षात येते. त्यांनी विचा्रणा केल्यावर तो भणंग जायला निघतो. तर त्याची टवाळी केल्याच्या सुरात प्राध्यापक त्यालाच प्रश्न विचारतो. प्रश्न असा, अमेरिकन राज्य घटनेचे महात्म्य कोणते? आणि अमेरिकन अध्यक्ष एका आदेशाने युद्ध पुकारू शकत असेल तर लोकशाहीला काय अर्थ आहे? त्यावर पाच डॉलर दारू प्यायला दिल्यास उत्तर देईन असे तो भणंग उत्तरतो आणि जायला निघतो, तेव्हा प्राध्यापकाचा पचका होतो. अखेर तो पैसे द्यायचे मान्य करतो, पण तो भणंग आधी पैसे घेतल्यावरच जे उत्तर देतो, ते जगभरच्या मिरवणार्‍या बुद्धीमंतांचे नेमके वर्णन आहे. ते उत्तर थोडक्यात असे,

    ‘माझ्यासारखा दारूडा भणंग व अमेरिकेचा अध्यक्ष दोघेही टगेच असतात. बरे असो की वाईट; जे काही करायचे ते आम्हीच काही करतो. ते तुम्हा बुद्धीमंतांचे काम नाही. तुम्ही नुसती बडबड करता, बाकी तुम्ही नंपुसक असता. आम्ही जे काही केले त्याचे अर्थ लावण्यात तुमचे आयुष्य संपून जाते. राहिला मुद्दा राज्यघटनेचा. ती राष्ट्राची स्थापना करणार्‍यांनी बनवली, त्यांनाही ती कायमस्वरूपी उपयोगी व परिपुर्ण नाही याचे भान होते. म्हणूनच त्यांनी दोन शतकांपुर्वीच त्यात काळानुरूप तिला बदलण्याची तरतूद करून ठेवली आहे. आणि म्हणूनच दुरुस्तीची व्यवस्था हेच राज्यघटनेचे महात्म्य आहे.’

   मुद्दा इतकाच, की स्वातंत्र्याच्या गप्पा अहोरात्र ठोकणारे जे विद्वान आपण वाहिन्यांवर बघतो किंवा वृत्तपत्रातून त्यांचे बोजड लेख वाचतो, त्यांना आपल्या स्वातंत्र्याचा बचाव करण्याची कधीच हिंमत वा धैर्य नसते. अन्य कुणा ओंबळे सारख्याने येऊन त्यांच्या स्वातंत्र्याचा बचाव करावा लागत असतो. अन्यथा समोरून जो आक्रमक येतो व आपली सत्ता प्रस्थापित करतो, त्याच्यासमोर हे बुद्धीमंत शरणगत होत असतात. मग तो हिटलर असो किंवा स्टालिन असो. अगदी रोमन बादशाहा निरो हा मनोरुग्ण होता, त्याच्या सत्तेसमोर शरणागत होऊन गुडघे टेकत त्याची भाटगिरी करणार्‍या ग्रीक बुद्धीमंतांची वर्णने उपलब्ध आहेत. तेव्हा शाहीन किंवा तत्सम कोणा मुलीचा आडोसा घेऊन स्वातंत्र्याचे जे नाटक दोनचार दिवस वाहिन्यांवर चालू होते, त्यांचे स्वातंत्र्य जपायचे कोणी? त्यासाठी बलीदान व आत्मसमर्पण करायचे कोणी? जे कोणी असे बलिदान करतात व या दिवट्यांच्या स्वातंत्र्याची किंमत मोजत असतात, त्यांच्यावरच हे शहाणे आरोप करतात, तेव्हा संताप येतो. ज्या दिवशी ओंबळेला नि:शस्त्र असूनही कसाबच्या अंगावर धावून जाताना मी बघितले; त्या दिवशी माझा बौद्धीक अहंकार लयास गेला. मला माझ्या भित्रेपणाची लाज वाटली. त्याने माझ्या सुरक्षेसाठी व ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. त्याच्या रक्षणासाठी आपला प्राण पणाला लावला, त्या दिवशीपासून माझे स्वातंत्र्य मी त्याच्या चरणी अर्पण केले. पुढले काही दिवस मी त्याच्यासाठी काय करू शकतो; याचाच विचार करत राहिलो आणि माझी मलाच लाज वाटली. ज्याने आपल्यासाठी जीव ओवाळून टाकला, त्याची आपण कुठलीच भरपाई करू शकत नाही, याची असे स्वातंत्र्य उपभोगणारे व मिरवणारे आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. निदान मला वाटते. म्हणूनच त्याचे ते शौर्य कित्येक महिने माझी पाठ सोडत नव्हते. त्या घटनेला वर्ष उलटण्याची वेळ आली, तेव्हा मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला आणि माझ्या मनाची घुसमट काहीशी थांबली.

   ओंबळे गेला त्याला येत्या २६ नोव्हेंबरला चार वर्षे पुर्ण होणार आहेत. २००९ साली पहिल्या वर्षी त्याच्या पुण्यतिथीपासून मी एक व्रत माझ्यापुरते घेतले. तो दिवस अनवाणी चालून मी माझ्यापुरता ओंबळेला श्रद्धांजली देतो. त्याने त्या क्षणी व दिवशी असह्य वेदना व यातना सोसल्या. तेवढ्या सोसण्याची आपली क्षमता नाही. पण त्याचा किंचितसा पुसट अनुभव तरी घ्यावा व ओंबळेने काय सोसले व आपल्याला काय दिले; त्याची जाणीव ठेवावी म्हणुन मी तो दिवस अनवाणी पायांनी साजरा करतो. गेल्या तीन वर्षात अनेक मित्रांना व वाचकांना मी हे सांगितले आहे, लिहिले आहे. अनेकांनी तो दिवस तसा साजरा करण्यात माझी साथ दिली आहे. ज्यांना ते पटले आहे, त्यांनी आपल्या मित्रांना सांगून त्यात सहभागी करून घेतले आहे. ह्यावर्षी चौथे वर्ष आहे. कसाबला फ़ाशी देण्याचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा ओंबळेसारखा मनाचा निग्रह करण्यातून आपण त्य शहीदांना अधिक चांगली व मनापासून श्रद्धांजली वाहू शकतो. ओंबळे होणे शक्य नसेल, पण त्याच्याइतके निग्रही व निर्धारी होण्याचा संकल्प मनाला खुप धीर देणारा असू शकतो. ज्यांना असे काही करावेसे वाटेल, त्यांनी जरूर करावे. दुसर्‍या कोणाला दाखवण्यासाठी वा काही सिद्ध करण्यासाठी नव्हेतर ओंबळे व अन्य शहिदांच्या वेदनांशी एकरूप होण्याचा तो एक सोपा प्रयत्न आहे असे मला वाटते.     ( क्रमश:)
भाग  ( ६ )     २५/११/१२

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

ओंबळेला शिव्या घालणारे बुद्धीवादी की निर्बुद्ध?




   कशी गंमत आहे बघा. कालचा लेख लिहून संपवला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर काळचक्राने मीच रात्री लिहिलेल्या शब्दांचा पुरावा मला सकाळी आणून हातात दिला. बुधवारची सकाळ उजाडली तीच मुळात अजमल कसाबला फ़ाशी दिल्याच्या बातमीने. ती बातमी काय सांगत होती? ती बातमी मला तुकाराम ओंबळेच्या मुलांची आठवण करून देणारी होती. वैशाली असे ओंबळेच्या मुलीचे नाव आहे. जेव्हा तिचा पिता अजमल कसाबला पकडताना पोटामध्ये गोळ्या खाऊन मृत्यूमुखी पडला, शहीद झाला; त्यानंतर शेकडो लोक या मुलीला व त्यांच्या कुटुंबाला मदत करायला धावले होते. कोणी गेटवे ऑफ़ इंडियाला जाऊन मेणबत्त्या पेटवत होता, कोणी नाक्यानाक्यावर मोठ मोठे फ़लक लावून त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत होता. कुठे शाळेत कॉलेजमध्ये वर्गण्या गोळा करुन निधी उभारले जात होते. त्यापैकीच एका संस्थेतल्या मुलांनी लाखो रूपयांचा निधी जमवून वैशाली ओंबळे हिला दिला, तर त्या मुलीने ती सगळी रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणाला उपयोगी पडावी म्हणून तिथल्या तिथे दान केली होती. बापाची वा त्याने केलेल्या आत्मबलिदानाची किंमत पैशात मोजता येत नाही, एवढी तरी जाण तिला होती. आपल्या पित्याने करोडो भारतीयांच्या मनात अभिमानाचे स्थान मिळवले व भारतीय स्वातंत्र्याची जपणूक केली, हे तिला कळत होते. पित्याने व आपण स्वातंत्र्याची कोणती किंमत मोजली हे तिला कळत होते. स्वातंत्र्याबद्दल वाहिन्यांवर बकवास कळणार्‍यांना ती किंमत कधी कळली आहे काय? आपल्या पित्याने देशभरातल्या करोडो लोकांच्या सुरक्षित जगण्याच्या स्वातंत्र्यासाठी देह ठेवला आणि त्याच्याच बदल्यात आपले आयुष्य आता कायमचे ठ्प्प झाले आहे, बंद पडले आहे. कारण देशाच्या व जनतेच्या स्वातंत्र्याची जपणूक करण्याची किंमत अपत्यांच्या आयुष्यातला आनंद खर्चून तिच्या पित्याने चुकती केली; याची वैशालीला जाणिव होती. फ़ेसबुकवर थिल्लरपणा करणार्‍या शाहीन नावाच्या मुलीच्या स्वातंत्र्यासाठी वाहिन्यांवर अहमहमिका करीत बौद्धीक पोपटपंची करणार्‍या कुणाला तरी याच देशात आणि याच जगात वैशाली तुकाराम ओंबळे नावाची एक त्याच वयाची पिडीत तरूण मुलगी आहे, याची साधी आठवण तरी आज राहिली आहे काय? आपण ज्या स्वातंत्र्याच्या पोकळ वल्गना करीत आहोत; त्याच स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ज्या मुलीने आपले तरूणपण व पित्याचे छत्र गमावले, याचे भान तरी या पोपटांना होते काय? कुठल्या स्वातंत्र्याबद्दल हे दिवाळखोर बकवास करीत होते? त्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी नेमकी किती, कधी व कोणती किंमत मोजली आहे? त्या शाहीन नावाच्या मुलीने असो किंवा तिच्या पिडेविषयी बकवास करणार्‍यांना स्वातंत्र्याची किंमत तरी माहीत आहे काय?

   मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे, फ़ेसबुक, ट्विटर, मॉल किंवा कुठल्यातरी आलीशान रिझॉर्टमध्ये स्वातंत्र्य सवलतीच्या दरात मि्ळणारी वस्तू आहे, अशी त्यांची समजूत आहे काय? विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मतदानाचे वा विचारस्वातंत्र्य असे बाजारात खरेदी करून आणायची विकावू वस्तू आहे; अशी त्यांची समजूत आहे काय? कोणी सरकार वा संसद स्वातंत्र्य देते; अशी त्यांची धारणा आहे काय? कुठल्या कायद्याच्या पुस्तकात स्वातंत्र्याच्या व्याख्या लिहिलेल्या असतात, म्हणून त्यांच्या वाट्याला स्वातंत्र्ये आलेली आहेत; अशा भ्रमात ही मंडळी जगत असतात काय? उत्तम सुपिक जमीनीत केलेल्या शेतीतून वा अत्याधुनिक कारखान्यात स्वयंचलित यंत्रामध्ये होणार्‍या उत्पादनातून स्वातंत्र्य तयार होते व मॉलमध्ये विकायला येते; अशी त्यांची समजूत आहे काय? कुठल्या स्वातंत्राबद्दल ती शाहीन वा तिचे वाहिन्यांवरचे पुरस्कर्ते बडबड करत होते? स्वातंत्र्य सत्तेने वा सरकारी कायद्याने दिवाळीसाठी दिलेली भेतवस्तू वा आहेर नाही. ते सरकारी अनुदान नाही. जे लोक कायदा व सुरक्षितता याच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करायला आपले संसार उघड्याअर टाकून सज्ज असतात, तेच तुम्हाआम्हाला स्वातंत्र्य देत असतात. कारण आपल्या स्वतंत्रपणे व निर्भयपणे जगण्याच्या अधिकारा्ची सुरक्षा करायला ते कायम सज्ज असतात, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता येत असते. शहिद भगतसिंग वा अन्य कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आमच्यासाठी स्वातंत्र्य आणले हे निखळ सत्य आहे. पण ते टिकवण्यासाठी आजही शेकडो ओंबळे, करकरे, साळसकर व उन्नीकृष्णन सज्ज असतात आणि नियमित बलीदान करत असतात, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा मिळालेली असते. त्यासाठी, म्हणजे तुमच्याआमच्या स्वातंत्र्यासाठी अशी माणसे कोणती किंमत मोजतात, त्याकडे पोपटपंची करणारे एकदा तरी वळून बघायला तयार आहेत काय? मेला वा मारला गेला, म्हणून आम्ही त्या तुकाराम ओंबळेचे कौतुक करतो. पण तो सगळा प्रसंग तसा घडलाच नसता तर?

   समजा आजही तुकाराम ओंबळे जिवंत असता आणि कुठल्या तरी पोलिस ठाण्यात किंवा रस्त्यावर त्याला पोलिसी गणवेशात बघितला असता; तर मनातल्या मनात आपण काय बोललो असतो? त्याच्याकडेही हप्ता घेणारा लाचखोर म्हणूनच आपण बघितले नसते का? त्याच ओंबळेने कुणाला कुठल्या मोर्चात एखादी लाठी बेशिस्त वागण्यामुळे हाणली असती; तर आपण त्याचा गौरव केला असता काय? आज जितका धिक्कार हे भंपक विचारवंत व अविष्कार स्वातंत्र्याचे योद्धे पालघरच्या पोलिसांचा करत होते व त्यांच्यावर बेताल आरोप करत होते, तसेच आरोप त्यांनी ओंबळेवर केलेच असते. त्या दिवशी तिथे चौपाटीवर ओंबळे होता, त्याच्या जागी परवा पालघरमध्ये कारवाई करणारा कोणी पोलिस असता, तर त्यानेही कसाबला पकडण्यासाठी आपला जीव पणाला लावलाच असता. म्हणजे काय? जेव्हा तो पोलिस आमच्या स्वातंत्र्याच्या चैनीसाठी आपल्या जीवाची बाजी लावतो, तेव्हा तो महान आत्मा असतो. मेला वा मारला गेला म्हणुन आमच्यासाठी तो हुतात्मा होतो. बाकी आमच्या लेखी त्याचे आयुष्य व जीव कवडीमोल असते. याला बुद्धीवाद म्हणतात. त्याचा सरळसो्ट अर्थ काय होतो? ओंबळे किंवा त्याच्यासारखे पोलिस, सैनिक वा अन्य कोणी आमच्या स्वातंत्र्याची जपणूक करायला असतात, त्यांच्या जगण्यामरण्याला कवडीचे मोल नाही. जणू त्यांचा जन्मच आमच्या सुरक्षेत मरण्यासाठी झालेला आहे. आणि त्यांच्याकडुन आम्हाला चिमटा जरी घेतला गेला, तरी त्यांनी घोर पापकर्म केले आहे. त्यांना जणू देहदंडाचीच शिक्षा व्हायला हवी, असा आम्हा विचारवंतांचा आवेश असतो. आजचा बुद्धीवादी व अभिजन वर्ग किती अमानुष झाला आहे बघा. शाहीनच्या अटकेसाठी त्या दिवशी वाहिन्यांवरून वा वृत्तपत्रातून पोलिसांवर टिकेचे आसूड ओढणारे प्रत्यक्षात गणवेशातल्या पालघरच्या पाचपन्नास तुकाराम ओंबळ्यांनाच शिव्याशाप देत नव्हते काय?

   पालघरच्या त्या पोलिसांनी कायदे व नियमानुसार काम करायला हवे आणि नियमाच्या मर्यादा ओलांडल्या म्हणुन ते गुन्हेगार असतील. तर मग तुकाराम ओंबळेने तरी कुठले नियमांचे पालन केले होते? कामटे, साळसकर, करकरे यांच्यासारखे अधिकारी हाती अद्ययावत बंदूका असतानासुद्धा चिलखत घालून निघाले होते. तरीही त्यापैकी कोणी थेट कसाब टोळीतल्या कुणाला थेट सामोरे जाण्याचा आगावूपणा केला नव्हता. पण तुकाराम ओंबळेने हाती बंदूक पिस्तूल नसताना व चिलखत परिधान केले नसताना, आगावूपणा करून स्वत:चा जीव धोक्यात घातला, ते नियमात बसणारे होते काय? कुठला कायदा वा नियम सांगतो, की पोलिसाने अशा प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता मरणाला सामोरे जायचे असते? पण ओंबळेने कसाबवर झडप घातली. कसाब गोळ्या झाडतच राहिला. मात्र ओंबळे त्याच्या अंगावर पडून त्याला गच्च पकडून राहिला. मरेपर्यंत त्याने कसाबला सोडलेच नाही. हे त्याने कुठल्या नियमांच्या मर्यादेत राहून केलेले काम होते? तिथेही त्याने नियम धाब्यावरच बसवले होते. मग त्याला निलंबितच करायला हवे होते. त्याच्या त्या नियम मोडण्याविषयी वा मर्यादाभंगाविषयी तेव्हा चर्चा का रंगल्या नाहीत? ज्याने असे नियम मोडले त्याला पदके कशाला देता, असा सवाल वाहिन्यांच्या वातानुकुलित स्टुडीओत बसणार्‍यांनी, तेव्हा कशाला विचारला नव्हता? शाहीन व तिच्या मैत्रीणीला अटक करणार्‍या पोलिसांना नियम व मर्यादांचे पांडित्य शिकवणार्‍या शहाण्यांची बुद्धी; तेव्हा चार वर्षापुर्वी कुठे शेण खायला गेली होती? कारण विषय नियमभंग व मर्यादाभंगाचाच असेल तर ओंबळेनेही मर्यादाभंगच केला होता. पण हीच मंडळी त्याला शहीद म्हणुन गौरवत होती. त्याच्या नियम मोडणार्‍या कृतीचे हौतात्म्य म्हणून उदात्तीकरण चालले होते व आजही चालुच आहे. हा विरोधाभास आहे, की शुद्ध बदमाशी आहे? स्वातंत्र्य असो, की नियम व मर्यादा असोत; त्यांचेही अर्थ संदर्भ व प्रसंगानुसार बदलत असतात     ( क्रमश:)  
भाग   ( ५ ) २४/११/१२

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

जे जगाला घडवतात, त्यांच्यासाठी जग थबकते


   ‘जगात रोज अनेक माणसे मरत असतात, तरीही जग चालुच रहाते’. अशी सरसकट प्रतिक्रिया देणारी ही मुलगी दुसरीकडे भगतसिंग, राजगुरू यांच्या आत्मबलिदानाचाही हवाला देते. त्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असे सांगताना त्यांच्यासा्ठी अवघी दोनच मिनीटे शांतता पाळली गेली असाही हवाला देते. याचा अर्थच ही मुलगी बालीश वा अजाण नाही. आपल्याला कुणाच्यातरी बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले हा इतिहास तिला ठाऊक आहे व कळतोही आहे. पण कुणाच्या तरी बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल व महत्ता तिला उमगली आहे काय? सुखदेव, भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केले, ते अशा स्वैराचारी स्वातंत्र्यासाठी होते काय? तिची अक्कल फ़क्त त्या बलिदानातून काय मिळाले, त्यांच्या नोटा मोजते आहे. बापाने वा पुर्वजांनी अपार कष्ट करून मोठी मालमत्ता जमवावी आणि त्यांच्या बेताल, मस्तवाल वारसाच्या हाती ती आयती पडावी, त्यापेक्षा या मुलीची मानसिकता किंचित तरी वेगळी आहे काय? जसे त्या वारसाला बापजाद्यांचे कष्ट माहित नसतात, की त्याची कदर नसावी; तशीच या मुलीची भाषा नाही काय? त्या महान स्वातंत्र्यवीरांसाठी दोन मिनिटे शांतता पाळली गेली, असे ती सांगते; तेव्हा किंवा त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नव्हता असेही सुचवते, तेव्हा तिला नेमके काय म्हणायचे आहे? अगदी त्यांना फ़ाशी झाली तरी दोनच मिनीटे शांतता पाळून समाज कामाला लागला. त्यांच्या बलिदानाचे अवडंबर माजवले गेले नाही, असे तिला सुचवायचे आहे. पण तेव्हा देशातल्या जनतेला त्यांच्या बलिदानाचे महात्म्य सिद्ध करण्याची मुभा नव्हती, गौरव करण्याची मुभा नव्हती, हा इतिहास हिला माहित नाही काय? ब्रिटिशांचे राज्य होते आणि त्यांच्याच कायद्याने त्यांना फ़ाशी दिल्याने; त्यांचे उदात्तीकरण करण्यालाही कायद्याने गुन्हा मानले होते, याची माहिती या मुलीला नसेल; तर तिला कुठला इतिहास शिकवला गेला आहे? जसे दोन दिवस माध्यमे तिच्या प्रतिक्रियेतला कळीचा भाग लपवून सोयीचा तेवढाच भाग वाचक वा प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, तसा अपुरा इतिहास त्या मुलीला व तिच्या पिढीला शिकवला गेला आहे काय?

   ती ज्या सहजतेने भगतसिंग, राजगुरूंच्या मृत्यूबद्दल बोलते आहे, त्याचा अर्थ त्यांना ब्रिटीश सत्तेने गुन्हेगार ठरवून फ़ाशी दिल्याचे तिच्या गावीही नसावे असेच लक्षात येते. तिला जगात रोज मरणार्‍या हजारो लोकांच्या तुलनेत राजगुरू, सुखदेव व भगतसिंग यांचे काही मोलच वाटत नसल्याचे स्पष्टपणे दिसते. आणि तोच भाग चर्चेचा आहे, तिच्या प्रतिक्रियेतला तोच अत्यंत महत्वाचा भाग आहे. तेवढा लपवून वा वगळून त्यावर चर्चा व्हावी; हेच मुळात आक्षेपार्ह आहे. जणू तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळल्या गेलेल्या बंद पुरतीच प्रतिक्रिया दिली; असे भासवले जाते हीच शुद्ध बनवाबनवी आहे. तिने जेवढी बाळासाहेबांच्या बाबतीत लोकभावनेची पायमल्ली केली आहे, त्यापेक्षा अधिक देशासाठी हसतहसत फ़ाशीवर गेलेल्या शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचीही अवहेलना केलेली आहे. आणि ज्याअर्थी तिने अगत्याने त्यांची नावे त्यात घातली आहेत; त्याअर्थी तिने विचारपुर्वक त्या देशभक्तांच्या आत्मबलिदानाचा अवमान केलेला आहे. ती वस्तुस्थिती लपवून हा विषय केवळ ठाकरे यांच्या देहांताच्या बंदपुरता मर्यादित असल्याचा डांगोरा पिटणे, शुद्ध फ़सवेगिरीच नाही काय? रोज हजारो लोक मरतात आणि त्यापैकीच शहिद भगतसिंग वगैरे होते, असे ती सुचवते आहे ना? आणि त्यांच्यासाठीही दोन मिनिटे शांतता पाळली गेली, असे सांगताना भारतीयांच्या तात्कालिन भावनाही तिला ओळखता आलेल्या नाहीत. आजच्यासारखी मोकळीक असती; तर त्या शहिदांच्या अंत्ययात्रा किती प्रचंड झाल्या असत्या? त्यांच्यासाठी बंद पाळला गेला नसता काय? पण तेव्हा तसे होऊ शकले नाही. कारण पारतंत्र्यातली भारतीय जनता अगतिक व असहाय होती. आपल्या भावनांचा कोंडमारा सोसत त्या जनतेने जो लढा दिला; त्यामुळे आज या मुलीला स्वातंत्र्य मिळाले आहे, ते तिला कळते. मग त्यामागच्या यातना, वेदना व भावना का कळत नाहीत? की असे लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी मरायलाच जन्म घेतात आणि किडामुंगीसारखे मरायचीच त्यांची लायकी असते. त्यांच्यासाठी अश्रू ढाळत बसण्याची गरज नाही, असेच ही मुलगी सुचवते आहे. ही बाब सर्वात गंभीर आहे. कारण अशी एकच मुलगी वा मुलगा आजच्या भारतीय लोकसंख्येमध्ये नाहीत.

   आपण जे स्वातंत्र्य व संपन्नता अनुभवतो आहोत, त्यामागे अनेकांचे बलिदान आहे व त्यांनी सोसलेल्या यातना, वेदनांची किंमत म्हणून आपल्या वाट्याला आजचे दिवस आलेले आहेत, याची जाणिव संपल्याचे हे लक्षण आहे. तिच्यापेक्षा स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन वाहिन्यांच्या चर्चेत आपले शहाणपण पाजळणार्‍या अर्धवटरावांची मला कींव आली. कारण आपण कशाबद्दल व काय बोलतो आहोत; त्याचेही भान या शहाण्य़ांना नव्हते. अवघ्या पाच दिवसांनी कसाब टोळीने मुंबईत धुडगुस घातला, त्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. त्यात आपला बाप, आई, भाऊ वा आप्तस्वकीय गमावणार्‍यांसाठी श्रद्धांजली दिली जाईल, त्याबद्दल ही मुलगी वा तिच्यासारखे दिवटे काय बोलणार आहेत? तिच्याच वयाची एक मुलगी आहे, जिने एकुलता कमावता बाप त्या कसाबला पकडताना गमावला. जगाने तेव्हा तुकाराम ओंबळेचे कौतुक खुप केले. पण कोणाला त्याच्या उघड्या पडलेल्या संसाराची, कुटुंबाची आठवण तरी आहे काय? त्या मुलीला व तिच्या भावंडांना आपला बाप आपल्या सोबत असायचे, स्वातंत्र्य या देशात नाही काय? कोणासाठी तुकाराम ओंबळे, कामथे, साळसकर व करकरे, उन्नीकृष्णन इत्यादींनी आपले प्राण पणास लावले होते? ते सुद्धा त्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मरण पावलेल्या हजारो लोकांपैकी एक होते. जगात त्या दिवशी तेवढीच माणसे मेली नाहीत. दहापट माणसे त्याही दिवशी जगात मृत्यूमुखी पडली. आणि त्याही दिवशी जग चालूच होते. मग ही अविष्कार स्वातंत्र्याची देवता पालघरहून मुंबईत येऊन कसाबला सामोरी का गेली नाही? तिची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणारे जे कोणी वाहिन्यांवर दोन दिवस नाचत आहेत, त्यांनी ओंबळे-करकरे यांना बाजूला सारून कसाबचा सामना तेव्हा का केला नव्हता? पुढे सरसावून त्यांनाही कसाब टोळीशी दोन हात करता आलेच असते. ओंबळेच्या हाती तरी कुठे हत्यार वा बंदूक वगैरे होती? त्याच्या जागी हे तमाम अविष्कार स्वातंत्र्याचे सैनिक मारले गेले असते, तर जगाचे काही बिघडले नसते. जग चालुच राहिले असते. पण तेव्हा जग थबकले होते, अचंबित होऊन तो रक्तपात बघत होते, ते मृत्यूचे तांडव बघत होते, तेव्हा हे सर्व विचारस्वातंत्र्य सैनिक व त्यांची पालघरची स्वातंत्र्यदेवता कुठे लपून बसले होते? त्यांना कसाव बरोबर दोन हात करण्यापासून कोणी अडवले होते काय?

   पण नाही. त्यातला कुणीच पुढे आला नव्हता. आज स्वातंत्र्याच्या फ़ुसक्या मारणारे तमाम शूरवीर; तेव्हा शेपूट घालून पळत होते, ज्या स्वातंत्र्याच्या आज वाहिन्यांवरून फ़ुशारक्या मारल्या जात आहेत, त्यासाठी प्राण पणाला लावण्याची वेळ येते; तेव्हा यांना पळता भुई थोडी होत असते. आणि जे कोणी यांच्या स्वातंत्र्याच्या चैनीसाठी आत्मबलिदान करून आपले संसार व जीवन उध्वस्त करून घेतात; त्यांच्यासाठी मात्र यांना चैन थांबवायला सवड नसते. राजगुरू वा भगतसिंग यांच्या मृत्य़ुचे हवाले देणार्‍या या मुलीला तुकाराम ओंबळे का आठवला नाही? पुढले तीनचार दिवस मुंबई व जग थबकले होते, ते का आठवत नाही? तिच्या बचावासाठी वकिलपत्र घेऊन आलेल्यांना दंगली पेटतात, तेव्हा आपल्या स्वातंत्र्याची आठवण का नसते? तेव्हा बंद पडलेले जग चालू करायला, त्यांनी कधीच का पुढाकार घेतलेला नाही? माणसे मरतात म्हणुन जग बंद पडत नाही व चालूच रहाते, यात शंकाच नाही. पण ती माणसे कोण असतात, तेही बघायला हवे. अशी जी चैन करतात व लोकोपयोगी नव्हेतर निरूपयोगी असतात, त्यांच्या मरणाने जगाचे काहीच बिघडत नाही. त्यांच्या मरणाने जगाचे व्यवहार बंद पडत नाहीत. कारण ही माणसे जगासाठी निकामी असतात, धरणीला भार असतात. त्यांच्यासाठी जग थांबेलच कशाला? जगाला घडवायला व इतिहास घडवायला जे लोक या पृथ्वीतलावत जन्माला आलेले असतात, त्यांचा मृत्यू झाला तर जग थांबतेच; पण इतिहासही काही क्षण थांबतो. पण ते कळण्यासाठी मुळात आपण माणूस असायला हवे. आणि समाज माणसांचा बनतो. जे मनाने व बुद्धीने मानवी देहधारी पशूप्राणी असतात, त्यांना यातले काही कळत नाही, की समजू शकत नाही. त्यांची दखलही जग घेत नाही. त्यांच्यासाठी समाज जगाचे व्यवहार थांबवतो आणि त्यांनाच सन्मानपूर्वक निरोप देतो. जे जगासाठी उपयोगी असतात. पण ते फ़क्त माणसांना कळते. मानवी देहात जगणार्‍या पशूप्राण्यांना त्यातले काही कळणेच अशक्य आहे.    ( क्रमश:)
भाग  ( ४ )   २२/११/१२

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर


   ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात, पण जग चालूच असते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मृत्यूनंतर दोन मिनिटांची शांतता पाळली गेली, त्यांच्याच बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग सक्तीने बंद पाळावा का?’ काहीशी तशीच पण अस्पष्ट प्रतिक्रिया आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनीही ट्विटर माध्यमातून व्यक्त केली होती. पण त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. मात्र पालघरच्या त्या मुलीच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने तक्रार नोंदवली आणि तिच्यासह तिच्याशी जाहीर सहमती व्यक्त करणार्‍या दुसर्‍या एका मुलीला पोलिसानी अटक केली. नंतर त्या मुलीच्या काकांच्या पालघरमधल्या इस्पितळावर जमावाने हल्ला केला व मोडतोड केली. त्या मुलीने आपली प्रतिक्रिया पुसून टाकली होती. मग सोमवारी वाहिन्यांवर त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावर मोठमोठे विद्वान चर्चा करत होते. पोलिस, शिवसैनिकांचा धुडगुस व त्या मुलीचे स्वातंत्र्य अशा विषयावर आपापले शहाणपण मिरवण्याची अहमहमिका चालू होती. मात्र आपण काय बोलतो त्याचे भान त्या चर्चेमध्ये सहभागी होणार्‍या किती लोकांना होते; याचीच शंका आहे. फ़ेसबुकला सोशल मीडिया म्हणतात, अविष्कार स्वातंत्र्य हे दुसर्‍याला बाधा आणण्यासाठी नसते, प्रसंग काय होता. भगतसिंग वगैरे स्वातंत्रासाठी बलिदान करणारे होते. इत्यादी गोष्टी या शहाण्यांना माहिती तरी आहेत काय, याचीच शंका आली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीने ती प्रतिक्रिया लिहिली, ती प्रतिक्रिया तरी यातल्या कोणी वाचली होती काय याचीही शंका आहे. शिवाय स्वातंत्र्य देताना वा घेताना तो आगीशी खेळ असतो याचीही जाणिव कुठे दिसली नाही.

   एक मुद्दा पहिला घेऊ. फ़ेसबुक वा अन्य इंटरनेटचे जे माध्यम आहे, त्याला सोशल मीडिया म्हणतात. त्यात सोशल याचा अर्थ सामाजिक असा होतो; याबद्दल तरी वाद होण्याचे कारण नाही. आणि म्हणूनच जे काही सामाजिक असते; त्याचा वैयक्तीक हेतूने व सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणण्यासाठी वापरणे सामाजिक म्हणता येणार नाही, हेसुद्धा मान्य करावेच लागेल. ज्यामुळे सामाजिक शांतता व सौहार्दाला बाधा येऊ शकते वा आणली जाते; अशा कुठल्याही कृतीला असामाजिक म्हणतात, याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही. इथे समाज म्हणजे मोठी लोकसंख्या असा अर्थ होतो. संपुर्ण समाज वा देशाची संपुर्ण लोकसंख्या, असाच त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे त्याच लोकसंख्येतील एखादी व्यक्ती, मोठ्या लोकसंख्येला विचलित करणारे कुठलेही कृत्य करणार असेल वा करत असेल; तर त्याची ती कृती असमाजिक ठरते. मग तो बॉम्बस्फ़ोट असो, हिंसाचार असो किंवा हिंसाचाराला प्रवृत्त करणारे शब्द वा आवाहन असो. या मुलीने जे माध्यम वापरले ते फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यम आहे, त्याचा वापर तिने कोणत्या सामाजिक हितासाठी केला आहे काय? ज्या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यावर पंचविस लाख लोक उतरले आहेत व त्यांच्या भावना कमालीच्या हळव्या आहेत, त्यांचे मन विचलित करणारी प्रतिक्रिया त्या वेळी व्यक्त करणे समाजहिताचे कृत्य होते काय? आणि असे लिहिण्यासाठी सामाजिक माध्यम वापरणे, हीच मुळात समाजविघातक कृती नाही काय? आपल्या प्रतिक्रिया व मते आपल्यासाठी माह्त्वाची आहेत, पण त्याचा जाहिर उच्चार केल्याने, कुणाच्या भावना दुखावणार असतील व त्याचे प्रक्षुब्ध प्रतिसाद उमटू शकतात, हे माहिती असेल, तर ते बोलण्या व व्यक्त करण्याचा हेतू शुद्ध रहात नाही. मग ती व्यक्तीगत प्रतिक्रिया रहात नाही तर डिवचण्याचा मामला होऊन जातो.

   एक उदाहरण घेऊ. ती मुलगी बंदच्या विरोधात लिहिते आहे काय? ती सक्तीच्या बंदच्या विरोधात बोलते आहे काय? एकूणच वाहिन्यांच्या व माध्यमांच्या चर्चेतला सूर असा होता, की तिच्या बंदविषयक मताची गळचे्पी करण्यात आली व त्यासाठीच पोलिसांनी तिला विनातपास अटक करून गजाआड ढकलले, असे भासवले जात होते. पण ती माध्यमांची शुद्ध बदमाशी होती. त्या मुलीने जे काही लिहिले ते संपुर्ण सांगितले जात नव्हते. तिच्या प्रतिक्रियेतून लोकभावना दुखावण्याचा मुद्दाम केलेला प्रयास व हेतू लपवला जात होता. तिने सक्तीच्या बंद विरोधात भूमिका मांडली असती वा प्रतिक्रिया दिली असती, तर नक्कीच इतके तीव्र पडसाद उमटले नसते. पण त्या मुलीची प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहे. बंदमुळे आपल्या अडचणी वाढल्या वा त्रास झाला; याबद्दल तिची तक्रार अजिबात नाही. तिला त्याबद्दल तक्रारच करायची नाही. तिला कोणाच्या तरी भावना दुखावण्यातच रस होता आणि तेच तिच्या संपु्र्ण प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून येते. जे काही तिने लिहिले आहे, त्या शब्दाचे अर्थ तिला कळत नसावेत किंवा जाणीवपुर्वक तिने जा गुन्हा केलेला आहे. आपण जे शब्द लिहितो आहे, त्यातून समाजात प्रक्षोभ निर्माण होईल, हे तिला कळत नसले तर ती मुलगी सोशल मीडियाचा वापर करण्यास अपात्र आहे आणि म्हणुनच ते माध्यम वापरण्याचा मर्यादाभंग तिने केलेला आहे. म्हणूनच चर्चा करताना तिचे सर्व शब्द वा फ़ेसबुकवरील पोस्ट; माध्यमे लपवित होती. त्यातला प्रक्षोभक भाग लपवून सगळी चर्चा चालली होती.

   ती आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी एक कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली आहे, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्‍याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्‍याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय? बाकी सगळ्या गोष्टी व मुद्दे बाजूला ठेवून केवळ तिच्याच बाबतीत असा भावनिक प्रसंग आला; तर तिची प्रतिक्रिया काय असेल, त्याचा चर्चेत पाल्हाळ लावणार्‍यापैकी एकाने तरी विचार केला काय?

   शनिवार रविवारी मुंबईची जी परिस्थिती होती, त्यात किमान पंचविस तीस लाख लोकांना आपल्याच घरातील, कुटुंबातील कोणी आप्तस्वकीय प्रियजनाचा मृत्यू झाल्याची भावना होती. मुंबई बाहेर अनेक गावात शहरात वस्त्यांमध्ये तीच शोकाकूल भावना होती. हे त्या मुलीला कळत नसेल, तर तिला फ़ेसबुक वगैरे माध्यम वापरण्याची मुभाच असता कामा नये. कारण ज्यातून लोकांच्या संपर्कात रहावे, अशी सुविधा देण्यात आली आहे, त्याचाच वापर त्या मुलीने इतरांच्या भावना दुखावण्यासाठी व त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी हेतूपुरस्सर केला आहे. तिची प्रतिक्रिया एकाच मैत्रीणीला आवडली आणि तिच्या प्रोफ़ाईलवर फ़ारसे मित्र नाहीत असा दावा दिशाभूल करणारा आहे. कारण फ़ेसबुकवर तुम्ही जे लिहिता, ते अब्जावधी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचते करण्याची क्षमता आहे. म्हणूनच विनाविलंब त्याबद्दल पोलिसात तक्रार होऊ शकली. ज्यांनी तक्रार केली ते तिच्या मित्रयादीमध्ये नव्हते, तरीही त्यांच्यापर्यंत ती प्रतिक्रिया पोहोचली व त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. म्हणजेच एकालाच आवडले हा बचाव फ़सवा आहे. मुद्दा आहे, तो अविष्कार स्वातंत्र्याचा नसून दुसर्‍याच्या भावना दुखावण्यासाठी वा त्यातून समाज स्वास्थ्य विघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायची मुभा असावी काय, असा मुद्दा आहे. ज्यांना साधन वापरण्याची अक्कल वा भान नाही त्यांच्या हाती अशी साधने द्यावीत काय, हा मुद्दा आहे. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल वाजवून सत्य लपवण्याचे कारण नाही. कुठल्याही गुन्ह्याचा तपास व दोषपात्र ठरवण्याची प्रक्रिया हेतू तपासून होत असते. या मुलीचा हेतू गुन्हा करण्याचा होता काय?  ( क्रमश:)
  भाग   ( ३ )   २१/११/१२

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

कोवळ्या पोरांपासून अमिताभपर्यंत






   शनिवार रविवारी शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर जो धुमाकुळ माध्यमातून व अन्यत्र चालू होता, त्यातल्या तीन प्रतिक्रिया एकत्रित बघण्याची गरज आहे. त्या प्रतिक्रिया सामान्य माणसाच्या नाहीत तीन भिन्न पण सार्वजनिक क्षेत्रातील लोकांच्या आहेत. एक आहे एका राष्ट्रीय वाहिनीचा संपादक, दुसरा आहे यशस्वी अभिनेता आणि तिसरा आहे लहान मुलांसाठी व्यंगचित्रकथा सांगणारा. त्यातली पहिली प्रतिक्रिया अंत्ययात्रा व अंत्यविधी होण्यापुर्वीची म्हणजेच क्रमाने आधी आलेली आहे. ती आहे आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांची. शनिवारी रात्री झोपण्यापुर्वी त्यांनी ती प्रतिक्रिया ट्विटर माध्यमातून दिली होती. शेवटी गुडनाईट असे म्हटले आहे. म्हणजेच झोपण्यापुर्वीची असावी असे मान्य करायला हवे. ते लिहितात, ‘दिल्लीत नेता मरण पावला तर महानगरात भितीने वा आदराने व्यवहार बंद पाडले जात नाहीत, मुंबईत तसे होते. त्यातून काय सिद्ध होते?’ ही राजदीपची प्रतिक्रिया वाचल्यावर मला पहिला धक्का बसला तो त्याच्या दिसण्याचा व वयाचा. कारण वाहिनीवरून मी या माणसाला गेली काही वर्षे बघतो आहे. त्यानुसार त्याचे वय पन्नाशीच्या पुढले असावे असा माझा गैरसमज होता. पण हा त्याचा संदेश वाचनात आला आणि त्याचे वय पंचविशीतले असल्याचे लक्षात आले. पंचविशीतले म्हणजे साधारण त्याचा जन्म १९८४ नंतरचा असावा. त्याच्या आधीचा नक्की नसावा. कारण आधीचा असता तर त्याला ३१ आक्टोबर १९८४ नंतर दिल्लीत आठवडाभर काय चालू होते ते निदान ऐकून तरी ठाऊक झाले असते. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला दिल्लीत काय परिस्थिती होती, त्याचे तरी ज्ञान नक्कीच झाले असते आणि दिल्लीत काय होत नाही अशा सदरात त्याने अशी मुक्ताफ़ळे उधळली नसती.

   ३१ आक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान निवासस्थानी दोघा शीख अंगरक्षकांनी जवळून गोळ्या झाडल्याने इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. ही बातमी पसरताच दिल्ली पेटली होती. एकामागून एक शीख कुटुंबाला घरातून बाहेर खेचून त्याची हत्या करण्याचा खेळ तीनचार दिवस चालू होता. हत्याकांड व घरादारांची जाळपोळ तब्बल चार दिवस चालू होती. आणि त्यावेळी पोलिस बघ्याची भूमिका घेऊन बघत राहिले होते. तीन हजार शिख त्या हिंसाचारात मारले गेले. आणि असा हिंसाचार सुरू असताना दिल्ली म्हणजे तिथले सगळे व्यवहार छानपैकी चालू असण्याची शक्यता अजिबात नाही. हे दिल्लीतच जगणार्‍यांना ठाऊक आहेच. पण पुढला महिनाभर त्याच बातम्यांनी देशभरची माध्यमे वृत्तपत्रे भरलेली होती. त्यामुळेच अवघ्या देशातील त्यावेळी जे लिहिणारे वाचणारे होते, त्यांना दिल्लीसुद्धा नेत्याच्य निधनाने बंद होते, हिंसक होते हे पक्के ठाऊक आहे. जर वाहिनीचा संपादक होऊन व असून राजदीपला ठाऊक नसेल, तर त्याचा जन्म नक्कीच १९८४ नंतरचा असला पाहिजे. म्हणजेच त्याचे वय पंचविशीच्या आतले असायला हवे. यातल्या दोन्ही गोष्टी नसतील तर असे काही शहाणपणा म्हणून लिहिणारा माणूस चक्क बेअक्कल वा अक्कलशून्य असला पाहिजे. यातल्या दोन्ही शक्यता नाकारायच्या असतील तर मग असे लिहिणारा माणूस अट्टल बदमाश असेल असाच निष्कर्ष काढावा लागतो. जर राजदीपच्या जन्माविषयीचा माझा अंदाज चुकीचा असेल तर मग शेवटचा निष्कर्ष एकमेव उरतो. राजदीपला बदमाश म्हणावे लागते. कारण तो असे काही लिहून लोकांची दिशाभूल करू बघतो असाच निष्कर्ष निघतो.

   दुसरे दोन संदेश मला फ़ेसबुकवर मित्रांच्या कृपेने मिळाले. एक अमिताभचा तर दुसरा सकाळ दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या चिंटूचा. पहिला शब्दातला आहे तर दुसरा चित्रातला आहे. अंत्ययात्रेला अमिताभ हजर होता. त्यानंतर घरी परतल्यावर त्याने फ़ेसबुकवर आपल्या चहात्यांसाठी एक संदेश लिहिला;
‘बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या गाडीसोबत वीस लाख लोक चालत होते... असे आयुष्यात कधी बघितले नव्हते... भारतीय पातळीवरही अभूतपुर्वच... कसला आदेश नाही, कुठली सक्ती नाही, त्यांच्या बाबतीतले लोकांचे प्रेम व आदराचे ते प्रात्यक्षिक होते... कुठे अनुचित प्रकार घडला नाही... सर्वत्र शांतता आणि सदभावना होती. अंत्यविधीच्या काळात शिवाजीपार्कमध्ये त्या विराट जमावामध्ये नितांत शांतता होती. अपुर्वच... पोलिसांची व्यवस्थाही उत्तम... त्या कडेकोट बंदोबस्तासाठी त्यांनाही सलाम... अंत्ययात्रेहून परतताना एका फ़लकाने लक्ष वेधून घेतले व अंतरंगातल्या भावनांचा उमाळा उफ़ाळून आला. त्यावर बाळासाहेबांचा उल्लेख स्वर्गिय बाळासाहेब असा होता... कधीकाळी असेही वाचावे लागेल अशी कल्पनाही केलेली नव्हती.’

   किती मोजके शब्द आहेत बघा. ज्याचे आज जगभर चहाते पसरले आहेत आणि ज्याने दोन पिढ्यांच्या भारतिय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले; त्याचेही मन भावनांनी उचंबळून आलेले होते. त्या अमिताभचे वय नुकतेच सत्तरी ओलांडून पुढे गेले आहे. पण म्हणून तो भावनाविवश झाला होता आणि नव्या पिढीला बाळासाहेबांच्य मृत्यूचे काही देणेघेणे नव्हते का? नव्या सोडा आज जी कोवळ्या वयातली पिढी आहे; तिला कोण माणूस आज जग सोडून गेला, त्याच्याविषयी कर्तव्य नसेल का? त्याचे उत्तर सकाळच्या त्या व्यंगचित्र कथेत चिंटूकडून मिळाले. त्या दिवशी नेहमीचा खोडकर चिंटूही अस्वस्थ झालेला होता. त्या कथाकार चित्रकारांनी त्याचेच प्रतिबिंब आपल्या चित्रात पडू दिले. संपुर्ण एकच चौकट त्यात धावत येणारा चिंटू दचकून थबकला आहे, आणि विस्फ़ारलेल्या नजरेने बघतो आहे. त्या चौकटीतुन शाल पांघरलेला कोणीतरी निघून जातो आहे. त्याला चेहरा नाही नुसती पाठ आहे आणि दिसतो त्या एका हातात फ़क्त रुद्राक्षाची माळ आहे. त्या चित्रकारांना आपण कोवळ्या वयातल्या म्हणजे आठदहा वर्षाच्या मुलांसाठी चित्रकथा बनवतो याची जाण आहे आणि इतकी वर्षे ते लोकप्रिय आहे. म्हणजेच मुलांना काय कळू शकते, त्याचे त्यांना भान आहे. मग त्यांनी असे चित्र का काढावे? मुलांच्या भावनाच त्यातून व्यक्त होतील याची खात्री नसेल तर त्यांनी असे केले नसते. एका बाजूला सत्तरी ओलांडलेला अमिताभ हळवा झालेला होता आणि दुसरीकडे दहा वर्षे वय नसलेल्या कोवळ्या मुलांसाठीचा चित्रकार त्या मुलांच्या भावना व्यक्त करतो आहे. ही किमया होती बाळासाहेब.

   किती विरोधाभास आहे बघा. जे  पत्रकार किंवा समकालीन भाष्यकार म्हणुन मिरवत असतात, त्यांना यातले काहीच वाटत नसेल किंवा भावत नसेल तर त्यांच्याकडून कुठले भाष्य वास्तववादी होऊ शकेल? आसपास काय घडते आहे, त्याचे अर्थ जनतेला समजावण्याला पत्रकार म्हणतात. त्यांनाच वीस लाख लोक रस्त्यावर का उतरले, कुठल्या भावनेने उतरले, त्यांना काय गमावल्यासारखे वाटते; याचाच पत्ता नसेल तर मग ह्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? माणूस म्हणजे एक जिवंत प्राणी नसतो. ती प्रचंड अगणित भावभावनांची गुतागुंत असते. ती उलगडून दाखवण्यासाठी बुद्धीमंत असायला हवेत. पण माणसे अशी का वागतात, कुठल्या क्षणी वागतात, त्याचाच थांगपत्ता नसेल तर त्यांची बुद्धी काय कामाची? माणुस म्हणजे समाज म्हणजे नुसती लोकसंख्या वा झुंड नाही. त्याला भावना, रागलोभ, आपुलकी, संताप, सुखदु:ख अशा अनेक गोष्टी असतात. त्या व्यक्त कारण्याचे विविध मार्ग असतात. त्या व्यक्त करण्यालाच माणसाची अभिव्यक्ती म्हणतात. आणि त्याचेच भान वा जाण नसलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे खांध्यावर घेऊन जेव्हा माध्यमात जागा अडवून बसतात, तेव्हा माध्यमे निरुपयोगी व निष्प्रभ होऊन जातात. आजची आपली माध्यमे व बुद्धीवाद किती निरर्थक संदर्भहीन होऊन गेला आहे; त्याचा हा नमूना आहे. त्यांना समोर घडते आहे व घडताना दिसते आहे, त्याचा अर्थच लागत नाही, ते समजण्याची बुद्धीही त्यांच्यापाशी नाही. पण ज्यांनी कधी बुद्धीसंपन्न असल्याचा दावा केलेला नाही, त्या लोकांची अशा प्रसंगातील प्रतिक्रिया बोलकी असते. खुप काही सांगून जाते.

शेकडो पुस्तके वाचण्य़ातून माणुस वा जग ओळखता येत नाही. पण प्रेम ही अडिच अक्षरे खुप काही शिकवून जातात असे म्हटलेले आहे. ते त्या चित्रकार व अभिनेत्याला कळले आहे. पण अहोरात्र वाहिन्यांवरून जगाला शहाणपणा शिकवणार्‍यांना ज्ञान कशाला म्हणतात व बुद्धी कशाशी खातात, त्याचाच अजून पत्ता लागलेला नाही. हीच आपल्या माध्यमे व बुद्धीवादाची शोकांतिका आहे.       ( क्रमश:)
भाग   ( २ )   २०/११/१२

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

इतिहाससुद्धा थबकला त्यांच्यासमोर




   कधीकधी इतिहास देखील थांबतो. अचंबित होऊन थबकतो. जगाच्या रहाटगाडग्यामध्ये एखादे व्यक्तीमत्व असे त्याच्या समोर येऊन उभे ठाकते, की इतिहासालाही वाटते याच्याकडून स्वत:ला घडवून घ्यावे. शनिवार रविवारी महाराष्ट्राने व मुंबईने तोच अनुभव घेतला. मुंबईत इतिहास घडत होता. शिवसेनाप्रमुख म्हणून गेली शेहेचाळिस वर्षे मुंबईसह देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडणारा वाघ इहलोकीचा निरोप घेत होता. तशी घटना धक्कादायक नव्हती, की अनेपेक्षितही नव्हती. पण ती घडू नये अशीच सर्वांची अपेक्षा होती. किंबहूना लोकांच्या मनात पाल चुकचुकलेली होती, म्हणून तर ऐन दिवाळी चालू असताना बाळासाहेबांची प्रकृती बिघडली; तर घरातल्या सणसुदीकडे पाठ फ़िरवून हजारो लोक बुधवारी मातोश्रीकडे वळले होते. दिवसरात्र तिथेच ठाण मांडून बसले होते. पण अखेरीस व्हायचे तेच झाले. कदाचित त्याची पुर्वकल्पना स्वत: बाळासाहेबांना आलेली होती. म्हणून की काय, त्यांनी तीनच आठवड्यापुर्वी झालेल्या दसरा मेळाव्याला केलेल्या भाषणात निर्वाणीची भाषा वापरली होती. हा माणूस किती बेधडक होता, त्याची तीच मोठी साक्ष आहे. त्या चित्रित भाषणात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या व अनेक शब्दही वापरले. पण मी शेवटचा जय महाराष्ट्र म्हणतोय; एवढेच ते बोलले नाहीत. पण भाषणाचा सुर व ओथंबलेल्या भावना पाहिल्या, तर त्यांचा तोच रोख नेमका होता. आपण आपल्या लाडक्या शिवसैनिकांना शेवटचा संदेश देतो आहोत; हे त्यांना पक्के ठाऊक होते. कदाचित म्हणून त्यांनी तब्येत खुपच खालावली असताना शिवाजी पार्कला जाण्याचा हट्ट चालविला होता. केवळ डॉक्टर अडवून बसले, म्हणून त्यांना तिकडे फ़िरकता आले नाही. अन्यथा तो जिद्दी माणूस तिथे येऊन पोहोचला असता. समोरच्या गर्दीला बघून त्याला स्फ़ुरण चढले असते आणि पुढे काय झाले असते ते सांगता येत नाही.

   कारण स्पष्टच आहे, गर्दी हे बाळासाहेबांसाठी टॉनिक होते. त्यांनी कधी तयारी करून भाषण केले नाही, किंवा मुद्दे ठरवून गर्दीसमोर ते बोलले नाहीत. गर्दीच त्यांना प्रेरणा द्यायची आणि विषय सुद्धा पुरवायची. गर्दीला नेमके काय हवे आणि गर्दीच्या मनात नेमके काय आहे, ते त्यांना कळत होते. मजेची गोष्ट म्हणजे, त्या गर्दीलाही त्यांचे म्हणणे नेमके कळत असे. परवा दसर्‍याच्या मे्ळाव्याला येऊ शकत नाही म्हणून त्यांनी जे चित्रित भाषण केले होते, त्यातल्या शब्द व मुद्दे यावर बरेच भाष्य़ झालेले आहे. ते भष्य व चर्चा करणार्‍यांना त्यातले सार कळले नाही, ते समोरच्या गर्दीला कळले होते. म्हणूनच विद्वान त्या भाषणाचे अर्थ लावत असताना ते शब्द ऐकणारा सामान्य शिवसैनिक मात्र रडू लागला होता. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येकजणाच्या डोळ्याता अश्रू उभे राहिले होते. कारण साहेब काय बोलले, त्यापेक्षा आता यानंतर साहेबांचे भाषण ऐकायला मिळणार नाही, हे त्यांच्या चहात्यांना कळले होते. हेच आपले शेवटचे भाषण समजा, असा संकेत त्यात होता आणि त्याचा सुगावा लागलेल्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ‘इतकी वर्षे तुम्ही मला संभळून घेतलेत आणि मी तुम्हाला संभाळले. आता तुम्ही उद्धव आणि आदित्यला संभाळा’, या वाक्यात त्या भाषणातले सगळे सार होते. तुम्ही संभाळा म्हणजे? स्वत: साहेब कुठे जाणार होते? आपला मुलगा व नातू यांना संभाळण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर टाकायची भूमिका त्यांनी घ्यावीच कशाला? मग माझ्या मागे तुम्हीच यांना संभाळा, असे सुचवत नव्हते का साहेब? त्याचा अर्थच पुन्हा आपली भेट होणे नाही; असाच संदेश होता ना? तो त्यांच्या शिवसैनिकांना नेमका कळला होता. म्हणुनच बहुतेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

   याचा अर्थ इतकाच होता, की आपल्या समोर मृत्यू घोटाळतो आहे याची त्यांना जाणिव झाली होती. पण त्यांना मृत्यूचे भय नव्हते. त्याही क्षणी त्यांना हिंदूत्व आणि मराठी अस्मितेचीच चिंता होती. म्हणुन तर त्यांच्या त्या भाषणानंतर त्यांना भेटायला मोठ्या मान्यवरांची गर्दी झाल्यावरही त्यांची भाषा तेवढीच बेफ़िकीरीची होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल त्यांना भेटायला व प्रकृतीची चौकशी करायला आल्या, त्यांच्याशी ते काय बोलले असतील? तुम्हाला राष्ट्रपती बनवायला मदत केली आणि तुम्हीही अफ़जल गुरूला फ़ाशी देण्यात टाळाटाळ केली. माणसाची बेदरकार वृत्ती बघा किती दांडगी होती. त्या माजी राष्ट्रपती प्रकृतीची विचारपूस करायला आल्या होत्या. आणि हा माणूस त्यांच्याशी कुठल्या विषयावर बोलावा? जणू त्यांची प्रकृती ठणठणीत असावी आणि प्रतिभाताई पुन्हा मतेच मागायला त्यांच्याकडे आल्या असाव्यात, अशा थाटात ते त्यांच्याशी बोलले. अखेरच्या भाषणातही आता कसा थकलो हे सांगताना मुंबईतील रझा अकादमीची दंगल आणि आसाममध्ये पेटलेला हिंसाचार; यावर बोलायचा मोह त्यांना आवरता आला नाही. असे हे अजब रसायन होते. एकीकडे थकलेला माणूस, आपण दसर्‍याच्या मेळाव्यासाठी जाऊ शकत नाही म्हणून व्याकू्ळ झालेला माणूस, तब्येतीची तक्रार करणारा माणूस आणि तोच पुन्हा असे ज्वलंत विषय सहजगत्या बोलतो, याची सांगड तरी कशी घालायची? ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले त्यांच्यासाठी तीच बेदरकार वृत्ती आकर्षण होते. ज्यांनी त्यांच्यावर निष्ठा ठेवून जीव ओवाळून टाकला, त्यांच्यासाठी या माणसाने दिलेली आपुलकी सर्वस्व होते. ज्यांनी त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली, त्यांना नफ़ातोट्याचा विचारही न करता दिलेली मदत सगळ्यांसाठी रहस्य होते. पण ज्यांनी जाणून घेतले वा नाही घेतले, अशा सर्वांसाठी हा माणूस एक अजब दंतकथा होऊन राहिला होता. जेवढे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तेवढा तो माणुस अधिकच गुंतागुंतीचे कोडे बनून जायचा.

   शरद पवारांसारखे राजकीय विरोधक त्याच्या प्रेमात पडलेले तसेच अमिताभ बच्चन सारखा नम्र माणुसही त्याला पित्यासमान मानायचा. विरोध करणारे, टिका करणारेही त्याला वचकून असायचे. तर कधी त्यातलेच त्यांच्याकडून अपेक्षाही बाळगायचे. महाराष्ट्र सोडाच देशाच्या व जगाच्या इतिहासातही इतकी वर्षे सलग प्रकाशझोतामध्ये राहिलेला दुसरा राजकारणी नसावा. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याने कधी कुठले सत्तापद उपभोगले नाही, की अधिकारपद मिळावे म्हणून राजकीय तडजोडी केल्या नाहीत. काल मुंबईत जो जनसागर त्यांना निरोप द्यायला लोटला, त्यात त्यांचे चहाते, अनुयायी होते, तसेच त्यांचे विरोधक सुद्धा होते. पण त्यापैकी कित्येक असे होते, की ज्यांना या माणसाविषयीचे कुतूहल तिथे घेऊन आले होते. योगायोगाने मला त्या माणसाचा तब्बल तीन वर्षाचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांना जवळून ओळखण्याची संधीही मिळाली. पण आज इतक्या वर्षांनी मी छाती ठोकून असे म्हणू शकणार नाही, की मी त्यांना ओळखू शकलो आहे. एका व्यक्तीमध्ये अनेक व्यक्तीमत्वे एकत्र नांदत होती, असेच म्हणता येईल. आणि त्या प्रत्येक व्यक्तीमत्वामध्ये एक निरागस मुल लपलेले होते. खोडकर मुलासारखा त्यांचा स्वभाव होता. वय कितीही वाढले तरी त्यांनी आपल्यातले हे मूल व निरागसता कधी मरू दिली नाही. ती आहे तशी जीवापाड जपली. पण म्हणुनच एकविसाव्या शतकातला चमत्कार आजच्या पिढीला बघायला मिळाला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्यासारखे अलौकीक नेते आजच्या पिढीने किंवा आधीच्या पिढीने बघितले नव्हते. जनमानसावर अधिराज्य गाजवणारा असामान्य नेता स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्या जन्मलेल्या पिढीला बघायला मिळालेला नव्हता. त्याचा साक्षात्कार बाळासाएबांनी एकविसाव्या शतकात तरूण व प्रौढ झालेल्या पिढीला घडवला. म्हणून मी त्याला इतिहास म्हणतो.

   गेल्या चार दशकात हा माणूस इतिहास घडवत होता आणि आपल्याला घडवावे म्हणुन जणू इतिहास त्याच्यासमोर हात जोडून उभा असायचा, असेच मला वाटते. त्यांचा सार्वजनिक जीवनातील उदय आणि माझ्या पत्रकारितेची कारकिर्द समकालिन आहेत, त्यामुळे एकूणच घडमोडींचा आपोआप अभ्यास होत गेला. कारण मी त्या सर्व घटनांचा साक्षिदार आहे. योगायोगाने तीन वर्षे तेच संपादक असलेल्या त्यांच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे त्यांना जवळून बघता आले, त्यांच्याशी बोलताच नव्हेतर वाद घालता आले. आणि म्हणून मी सांगू शकतो, की हा जीताजागता इतिहासपुरूष होता. तो इतिहास घडवत होता आणि इतिहासही त्याच्याकडून स्वत:ला घडवून घेत होता. मात्र तो इतिहास म्हणुन कधी मांडला गेला नाही, की समजावला गेला नाही. ह्या निमित्ताने तो मांडावा विचार आहे.  (क्रमश:)
भाग   ( १ ) १९/११/१२

आयुष्यभराच्या आठवणी म्हणजे असतो माणूस


   राजू शेट्टी यांच्यावर शरद पवार यांनी केलेली टिका किंवा त्यातला जातिविषयक उल्लेख यावर माझा अजिबात आक्षेप नाही. कारण सगळ्यांचेच राजकारण व समाजकारण असेच चालते. त्यासाठी एकट्या शरद पवार यांना गुन्हेगार म्हणायचे कारण नाही. कोणी जातीचे डावपेच खेळतो तर कोणी भाषिक वा प्रांतिक धोरणाने आपली झुंड बनवू बघतो. कोणी धार्मिक व पंथीय झुंडीतून आपले नेतृत्व उभे करायला धडपडत असतो. मग शरद पवार यांना गुन्हेगार मानायचे कारण काय? पवार गुन्हेगार असतील तर ते एकाच बाबतीत प्रमाद करीत असतात, आपला हेतू लपवून अकारण बहुजन सर्वसमावेशक राजकारण करत असल्याचा आव आणतात. माझा आक्षेप तेवढाच आहे. ते एका समाजाचे आहेत व त्यांनी सातत्याने त्या समाजाचे प्रतिनिधित्व केल्याप्रमाणे राजकारण केले आहे. त्यामुळेच त्यांनी लपवाछपवी करायचे कारण नाही. त्यांची राष्ट्रीय राजकारणातली ओळख काय आहे? ‘स्ट्रॉग मराठा’ असाच दिल्लीची राष्ट्रीय माध्यमे त्यांचा नेहमी उल्लेख करतात ना? पंचविस वर्षे यशवंतराव चव्हाणही दिल्लीच्या राजकारणत होते. पण त्यांचा कोणी मराठा असा उल्लेख करीत नसे. स्वत: पवारांनी दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून वावरताना त्या शब्दप्रयोगाला कधी आक्षेप घेतला आहे काय? नसेल तर मग आपण मराठ्यांचे जातीय नेते आहोत आणि प्रसंग व गरजेनुसार अन्य जातीजमातींच्या समुहांना सोबत घेऊन स्वार्थाचे राजकारण करतो; हे लपवायचे अजिबात कारण नाही. तिथेच सगळी गडबड होते. आज त्यांच्यावर टिका होते आहे, ते ती त्याच लपवाछपवीमुळे.

   झुंडीचे राजकारण समजण्यापुर्वी झुंडी बनतात कशा तेही लक्षात घ्यावे लागेल. अन्यथा पवारांना अकस्मात स्वत:च्या किंवा राजू शेट्टी यांच्या जातीची आठवण का झाली, ते लक्षात येणार नाही. शेवटी माणुस म्हणजे तरी काय असतो? आज जॉर्ज फ़र्नांडीस हयात आहेत. पण त्यांचा उल्लेख कुठे होत नाही. त्याचे कारण ते सार्वजनिक जीवनातून बाहेर पडलेले नाहीत. तर त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडला आहे. त्यामुळे त्यांना आपल्याच पुर्वायुष्याचे सर्वकाही नेमके आठवत नाही. थोडक्यात ते हयात असले तरी त्यांनाच आपण जॉर्ज फ़र्नांडीस आहोत हे लक्षात राहिलेले नाही. माणूस म्हणजे त्याने जगलेल्या एकूण आयुष्य़ातल्या आठवणींचा साठा असतो. त्या स्मृती म्हणजे तो माणुस असतो. याच आठवड्यात गेल्या इंग्रजी वाहिनीवर ‘डिसॅपियर्ड’ नामक सत्यकथा आधारित मालिकेचा एक भाग बघायचा योग आला. अमेरिकेच्या एका शहारातील पस्तीस चाळिस वयाची अंबर नावाची एक महिला आईवडीलांच्या घरातून आपल्या घरी जायला निघाली; ती स्वत:च्या घरी पोहोचलीच नाही. साधारण तिनशे मैलावर तिची गाडी सापडली. त्या गाडीत तिच्या सर्व वस्तू सुरक्षित होत्या. पण या महिलेचा ठावठिकाणा नव्हता. शोधाशोध सुरू झाली. तेव्हा गाडीत सापडलेल्या वस्तूमध्ये एका दुकानात काही खरेदी केल्याची पावती होती. तिथे तपास केल्यावर सीसीटीव्ही कॅमेरात चित्रण झालेली ती महिला आढळली. पण बाकी काहीच नाही. अपहरण झाले असल्यास कुठून खंडणीसाठी धमकीचा फ़ोन वगैरे नाही. कुठे अज्ञात म्रुतदेह सापडला असेही नाही. दोन महिने असे गेले. पोलिसही कंटाळले होते. कुटुंबियांनी आपल्यापरिने तिची छायाचित्रे फ़ेसबुक इंटरनेटवर टाकली होती. ओळखायला सोपे जावे म्हणून तिने खांद्याच्या मागच्या बाजूला गोंदवलेले चित्रही मुद्दाम त्यात टाकले होते. तब्बल दोन महिन्यांनी भलत्याच एका दूरच्या शहरामध्ये एक हरवलेली काहीशी संशयास्पद अवस्थेत फ़िरणारी महिला पोलिसांना आढळली. तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तीच हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले. आईवडीलांना बोलावून ओळख पटवण्यात आली आणि अंबरला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

   तिची नजर हरवलेली होती. ती कोणालाच ओळखत नव्हती. खरे सांगायचे तर शालेय जीवनातील म्हणजे पंधरा वर्षाची असतानाच एक फ़ोटो उपलब्ध होता, तो आपला एवढेच तिला पूर्वायुष्यातले आठवत होते. वयाच्या पंधरा वर्षाच्या पुढल्या बाविस तेविस वर्षातल्या तिच्या स्मृती पुसल्या गेल्या होत्या. तिला त्यापैकी काहीच आठवत नव्हते. अगदी लग्न झाल्याचे किंवा मुले झाल्याचेही आठवत नव्हते. पण कुटुंबियांनी प्रयत्नपुर्वक तिला एक एक गोष्ट व घटना सांगुन, तिच्या स्मृती जागवल्या. तेव्हा कुठे ती ‘माणसात’ आली. पण मजेशीर गोष्ट म्हणजे जिथून ती हरवली होती, जिथे तिचे चित्रण छुप्या कॅमेराने दुकानात केले होते, तिथून बाहेर पडण्यापर्यंत तिच्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या. पण दुकानाच्या बाहेर पडुन गाडीपाशी आली असताना कुणीतरी हाक मारली एवढेच तिला आठवते. आपण हाकेसरशी वळलो आणि पुढले तिला काहीही आठवत नाही. अगदी खुप प्रयत्न केला तर डोके दुखते; पण काहीच आठवत नाही. जणू ते मधले दोन महिने तिच्या आयुष्यात आलेच नव्हते आणि काही तिच्या आयुष्यात घडलेच नव्हते. स्मृतीचा तेवढाच भाग पुसलेला आहे. ती दुकानातून बाहेर पडल्यावर गाडीपाशी असताना कोणी हाक मारली, पुढे ती कुठे होती, तिने काय केले, यापैकी काहीच आठवत नाही. नशीब तिला निदान तिथपर्यंतच्या घटना आठवण करून दिल्यावर स्मरतात तरी. जेव्हा ती सापडली तेव्हा त्यातलेही बरेच काही स्मरणतून पुसले गेले होते. परिणामी आपण कोण आहोत; तेही अंबर विसरून गेली होती. माणूस म्हणजे असे असते. माणूस म्हणजे त्याच्या आयुष्यातले बरेवाईट अनुभव असतात. आयुष्यभर जमवलेल्या आठवणी म्हणजे माणूस असतो. भाऊ तोरसेकर म्हणजे त्याच्या चौसष्ट वर्षातल्या आठवणी असतात. त्याच जर नाहिश्या झाल्या किंवा मेंदुतून, स्मरणशक्तीमधून पुसल्या गेल्या; तर उरलेल्या देहाला जग भाऊ म्हणून ओळकते, पण तो स्वत:ला ओळखू शकत नाही. त्याचे अस्तित्वच संपून जाते.

   माणसाची ओळख ही अशी त्याच्या आयुष्यभराच्या आठवणी असतात. तशीच समाजाची ओळख असते. एकाहून अनेक माणसांच्या आठवणी समान असू शकतात. त्या सामुहिक आठवणी असतात. आणि अशा सामुहिक आठवणींच्या आधारावरच कुटुंब, टोळी, झुंडी तयार होत असतात. जाती व संप्रदायाच्याही आठवणी अशाच सामुदायिक असतात. त्या आठवणी म्हणजे त्या समुदायाची ओळख असते. कधी आपण त्यालाच अस्मिता म्हणतो, अभिमान स्वाभिमानाचे नाव देतो. त्या आठवणी तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंधित असतीलच असे नाही. तुमच्या जन्मापुर्वीच्या किंवा दोनचार पिढ्यांपुर्वीच्याही असू शकतात. पण त्यांच्या भोवती आपली अस्मिता उभी असते. सहजगत्या बोलताना आपण काहीवेळा म्हणतो, ‘आमच्यात असे नाही चालत’. ही काय भानगड असते? आमच्यात म्हणजे काय? तर रिती, रिवाज, परंपरा असतात. त्यामागचे हेतू आपल्याला ठाऊक नसतात, कारणे माहित नसतात. पण त्यासाठी आपण हमरातुमरीवर येऊन भांडण सुद्धा करतो. त्या रितीरिवाज हे सामुहिक आठवणीतून आलेले असतात आणि सामुहिक अहंकार म्हणून आपण त्यांची जपणूक करत असतो. आपण आधुनिक जमान्यातले म्हणून अशा गोष्टी कितीही नाकारल्या, तरी एखाद्या क्षणी तो सुप्त अहंकार उफ़ाळून बाहेर येतो. तीच मानवी स्वभावातील पाशवी झुंडप्रवृत्ती असते.

   परवा शरद पवार यांनी अकस्मात राजू शेट्टी यांच्या जातीचा उल्लेख केला, तो योगायोग नव्हता. मराठा किंवा कुठल्याही जातीच्या गोतावळ्यात वावरताना असा अनुभव आपल्याला येत असतो. व्ही. पी. सिंग यांनी बोफ़ोर्स घोटाळ्याचा गाजावाजा केला होता, तेव्हा बोटक्लब येथे घेतलेल्या प्रचंड जाहिरसभेत बोलतांना राजीव गांधी यांनी सिंग यांचा उल्लेख जयचंद राठोडची अवलाद असाच केला होता. पृथ्वीराज चौहान याने ज्याच्या बहिणीशी मनाविरुद्ध विवाह केला म्हणून सुडाला पेटलेल्या जयचंदाने परकी आक्रमकांच्या मदतीने पृथ्वीराजला संपवले, ती कित्येक शतकांची जुनी सामुहिक भारताची आठवण आहे. राजीव गांधींनी तिचा उल्लेख का केला? त्याच आवेशात शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या संप्रदाय वा जातीचा उल्लेख केला आहे. कितीही झाकून दडपून ठेवली तरी ही झुंडीची प्रवृत्ती माणसाच्या सुप्त मनात दबा धरून बसलेली असते. एखाद्या गाफ़ील क्षणी ती उसळी मारून बाहेर येते. कारण माणूस कितीही पुढारलेला असला तरी तो कळपाने जगतो आणि कळपातच वावरतो. त्याच्यातली ती झुंडीची प्रवृत्ती अजून मेलेली नाही, संपलेली नाही. सुप्तावस्थेमध्ये ती मनाच्या खोल कप्प्यात जागृत असते. संधीची प्रतिक्षा करीत असते. जेव्हा माणसाची बुद्धी किंवा मन त्याला एकाकी कोंडीत सापडल्याचा धोका दाखवते; तेव्हा ती झुंडीची मनोवृत्ती उसळी मारून बाहेर येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच असल्याप्रमाणे त्या मनोवृत्तीचा आधार शोधू लागते.   ( क्रमश:)
 भाग  ( २३ )   १८/११/१२