शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

महाराष्ट्र तामिळनाडूच्या वाटेने जाईल का?
   आता शिवसेनाप्रमुखांच्या निर्वाणाला दोन आठवडे पुर्ण होत आहेत आणि सुतकाचा काळ संपण्यापुर्वीच शिवसेनेचे त्यांच्या मागे काय होणार; याची चर्चा चालू झाली आहे. त्यात राज-उद्धव यांनी एकत्र येण्याच्या शक्यतेपासून राणे-भुजबळ माघारी येण्य़ापर्यंत अनेक गोष्टींचा उहापोह सुरू आहे. त्यातच एक बातमी अशी आली, की आता नवा किंवा दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पित्याच्या गैरहजेरीत पक्षाध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. म्हणजे गेली दहा वर्षे जी परिस्थिती होती, त्यात बदल होण्याची शक्यता नाही, असाच त्याचा अर्थ लावला जाणार. पण असे का? शिवसेनाप्रमुख दुसरा कोणी का होणार नाही? असे अनेक प्रश्न आहेत व विचारले जाणार आहेत. असे पुर्वी कुठल्या राजकीय पक्षात घडलेले नाही. 

   शिवसेनेचा राजकीय क्षितीजावर उदय झाला; तेव्हा दक्षिणेत द्रविड मुन्नेत्र कळहम नावाचा पक्ष ऐन भरात होता. त्याने १९६७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये तामिळनाडू विधानसभेत स्वबळावर बहूमत प्राप्त केले होते. अण्णादुराई हे त्या पक्षाचे सर्वेसर्वा होते. तेच मग मुख्यमंत्री झाले. तो पक्ष त्यांनीच स्थापन केला होता व विस्तारला होता. रामस्वामी नायकर यांच्या बंडखोर विचारांनी प्रेरित झालेल्या तरूणांमध्ये अण्णादुराई यांचा समावेश होता. रामस्वामी यांचे अण्णा खास शिष्य होते व भक्तही होते. पण जेव्हा त्यांच्यात मतभेद निर्माण झाले; तेव्हा द्रविड कळहम संघटनेतून बाजूला होऊन अण्णादुराई यांनी द्रमुक ही वेगळी संघटना सुरू केली. रामस्वामींच्या ब्राह्मण विरोधी चळवळीला हिंदीविरोधी चेहरा देऊन अण्णांनी तामिळी अस्मितेचा आधार घेतला आणि दिल्लीतल्या कॉग्रेसश्रेष्ठींच्या हुकूमतीला राज्यात आव्हान उभे केले. त्यातूनच त्या चळवळीचा विस्तार झाला व सत्तेला गवसणी घालण्यापर्यंत द्रमुकने मजल मारली. मात्र इतक्या परिश्रमातून ज्या पक्षाची उभारणी केली व सता संपादन केली; ती सत्ता उपभोगायला अण्णा फ़ारकाळ जगले नाहीत. काही महिन्यातच त्यांचे निर्वाण झाले. शिवसेनेच उदय होता होता अण्णादुराईंनी इहलोकीचा निरोप घेतला होता. त्यांचीही अंत्ययात्रा मद्रासच्या (आजची चेन्नई) इतिहासात अजरामर मानली जाते. पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या त्या अंत्ययात्रेला इतकी अफ़ाट गर्दी लोटली होती, की त्यात चेंगराचेंगरी होऊन बाविस लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे परवा शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेच्या वेळी वाहिन्यांच्या चर्चेमध्ये अण्णादुराईंच्या अंत्ययात्रेचा उल्लेख का झाला; ते लक्षात येऊ शकेल. 

   पण मुद्दा तो नाही. अण्णादुराई हयात असतानाही त्यांच्या पश्चात त्यांची जागा कोण घेणार; अशी चर्चा व्हायची. त्यावरही वाद होते व सत्तस्पर्धा द्रमुकमध्येही होती. अण्णांच्या सरकार व पक्षात नेंदूसेझियन नावाचे त्यांचे सहकारी अत्यंत जवळचे मानले जायचे. त्यांना द्रमुकमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे नेता मानले जायचे. त्यामुळेच लगेच हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच निवड झाली होती. पण सुतकाचे दिवस संपले आणि पक्षाचे अधिवेशन बोलावण्यात आले, त्यात तुलनेने कनिष्ठ व तरूण असलेल्या करूणानिधी, यांची पक्षाध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदी निवड झाली. आपला वकुब माहिती असल्याने नेंदूसेझियन यांनी तक्रार केली नाही. कारण कचेरी वा कागदी घोडे नाचवण्यात वाकबगार असलेल्या नेंदूसेझियन यांच्याकडे सभा गाजवण्याची वा पक्ष संघटन चालवण्य़ाची कला नव्हती. म्हणूनच त्यांनी बिनतक्रार करूणानिधींचे नेतृत्व; अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे मान्य केले. पुन्हा नव्या व्यवस्थेमध्ये नेंदूसेझीयन नव्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती झाले व पुन्हा दुसर्‍या क्रमांकाचा नेता म्हणुन मिरवू लागले. मात्र करूणानिधी आणि अण्णादुराई यांच्यात एक फ़रक होता. पक्ष अण्णांनी उभा केला होता व त्याची दिशाही नेमकी ठरवली होती. त्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अण्णांची जेवढी हुकूमत होती; तेवढा अधिकार चालवणे करूणानिधींना शक्य नव्हते. म्हणूनच द्रमुकमध्ये कुरबुरी चालू झाल्या. पक्षाला मते मिळवण्यासाठी विचार व वक्तृत्व यापेक्षा अन्य मार्ग करूणानिधी यांना शोधावे लागले. त्यातच त्यांनी एमजीआर नावाच्या लोकप्रिय अभिनेत्याचा आश्रय घेतला. तसा हा अभिनेता अण्णादुराईंचाही भक्त होता. पण त्यांनी त्याला कधी पक्षात वा राजकारणात आणले नव्हते. करूणानिधींनी ती चुक मतांसाठी केली आणि तिथून द्रविडी राजकारणाला भलतेच वळण लागले. 

   १९७२ ह्या निवडणुकीत एमजीआरच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन करूणानिधींनी सत्ता टिकवली. पण त्याच निवडणुकीने त्या अभिनेत्याच्या मनात राजकीय महत्वाकांक्षा निर्माण केली. त्यातच करूणानिधींनी आपल्या स्टालीन नामक पुत्राला चित्रपटात प्रस्थापित करण्याचा प्रयास केला. त्यामुळे वाद विकोपास गेला आणि एकेदिवशी एमजीआर यांनी वेगळी चुल मांडली व अण्णाद्रमुक नावाचा दुसरा प्रादेशिक पक्ष काढला. त्यांच्या चहात्यांच्या ज्या संस्था व संघटना होत्या, त्यांचे रातोरात पक्ष शाखांमध्ये रुपांतर करण्यात आले आणि नामोहरम कॉग्रेस बाजूला पडून तामिळी राजकारणात द्रमुकला नवाच प्रतिस्पर्धी उभा ठाकला. आपल्या पक्षाला अस्सल द्रविडी चेहरा देण्यासाठी एमजीआर यांनी अण्णांच्या नावाचा वापर केलाच होता. पण अण्णादुराई हेच पदसिद्ध पक्षाध्यक्ष रहातील; असाही प्रचार केला. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाला अध्यक्ष नसतो. सरचिटणिस हाच पक्षाचा सर्वेसर्वा प्रमुख नेता असतो. आजच्या मुख्यमंत्री जयललिता सुद्धा पक्षाच्या सरचिटणिस आहेत. उलट अण्णादुराईंच्या मूळ द्रमुक पक्षाला मात्र पक्षाध्यक्ष असतो व अण्णांनंतर ती जागा पंचेचाळीस वर्षे करूणानिधी यांनी व्यापलेली आहे. पण गंमत बघा, अण्णांचे खरे वारस असूनही करूणानिधींना जयललिता पराभूत करू शकल्या आहेत. एका निवडणुकीत तर खुद्द करूणानिधी सोडून त्यांच्या म्हणजे मुळच्या द्रमुक पक्षाचा दुसरा आमदार निवडून येऊ शकला नव्हता. पण दुसरी बाजू अशी, की आता त्याच द्रविडी पक्षाच्या दोन तुकड्यात तामिळनाडूचे संपुर्ण राजकारण व्यापले गेले आहे. त्यात शिरकाव करण्यास अन्य वैचारिक वा राष्ट्रीय पक्षांना जागाच उरलेली नाही. या फ़ुटीर वा विभक्त द्रमुक चळवळीतील गटांना एकमेकांच्या विरोधात लढताना हरवण्याचा प्रयासही अनेकदा निष्फ़ळ ठरला आहे. उलट राष्ट्रीय पक्षांना त्यापैकी एकाचा हात धरून राज्यातील आपले अस्तित्व टिकवावे लागत असते. महाराष्ट्र तामीळनाडूच्या वाटेने जाईल काय? 

   आज बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांचा वारसा कुणाकडे; याची चर्चा चालू आहे, कारण त्यांच्या अंत्ययात्रेला व अंत्यदर्शनाला जमलेली अफ़ाट गर्दी हेच आहे. त्यातून जी लोकभावना व्यक्त झाली, तिचे रुपांतर मतांमध्ये झाले तर? त्यांच्या अखेरच्या दसरा मेळाव्यातील चित्रित भाषणाचे थेट प्रक्षेपण बहूतेक वाहिन्यांनी केले होते व त्याच्याच भावनिक परिणामांमुळे अंत्यसंस्काराचा अवाढव्य सोहळा होऊ शकला. आता त्यांचे अखेरचे शब्द मराठी मनाला किती काळ भुरळ घालतील व त्यामुळे राज्याच्या राजकारणावर कोणते परिणाम होतील; यासाठीच ‘पुढे काय’ आणि ‘पुढे कोण’ अशा चर्चांना ऊत आला आहे. पोकळी कोण भरून काढणार असाही एकूण चर्चेचा सूर आहे. पण कुठली पोकळी निर्माण झाली आहे व बाळासाहेबांनी मूळात कुठली पोकळी मागल्या शेहेचाळिस वर्षात भरून काढली होती, त्याकडेही बघावे लागेल. तरच आजची पोकळी म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. जेव्हा बाळासाहेबांनी काही मोजक्या सहकार्‍यांना हाताशी धरून १९ जुन १९६६ रोजी आपल्याच घरात साधा नारळ फ़ोडून शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात कुठली पोकळी होती? ती पोकळी असण्याचे काय कारण होते? कुणाच्या जाण्याने वा बाजूला होण्याने ही पोकळी निर्माण झाली होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय आजच्या पोकळीची कारणमिमांसा होऊ शकत नाही. मग ती पोकळी भरून काढण्याचा विषय दूर राहिला. त्यासाठीच मूळात शिवसेना व बाळासाहेबांच्या नेतृत्वाला समजून घ्यावे लागेल. नुसते तेवढ्याने भागत नाही. जो कोणी त्या कालखंडामध्ये त्यांच्याभोवती शिवसैनिक म्हणून जमा झाला, तो तरूण कोणत्या मानसिकतेतून त्यांच्या जवळ आला होता? पुढल्या दोनतीन पिढ्यातले मराठी तरूण कोणत्या कारणाने बाळासाहेबांकडे आकर्षित होत राहिले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आरंभीचे तरूण शिवसेनेकडे आला, त्या उत्तरात सामावलेली आहेत. म्हणूनच शिवसेनेच्या स्थापनापूर्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावणे भाग आहे.  (क्रमश:)
भाग   ( १२ )    १/१२/१२

1 टिप्पणी: