बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

शिवसेना व बाळासाहेबांचा राजकीय उदय




   छगन भुजबळ किंवा नारायण राणे आज शिवसेनेत नाहीत. दोघेही राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातले मंत्री आहेत. तरीही त्यांनी बाळासाहेबांना मंत्रालयात पत्रकार कक्षामध्ये श्रद्धांजली अर्पण करताना, आपल्या आजवरच्या यशाचे सर्व श्रेय बिनदिक्कत शिवसेनेला देऊन टाकले. असे त्यांनी का म्हटले, याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तिथे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे मूल्यमापन करण्यासाठी कुठली राजकीय चर्चा चाललेली नव्हती. त्यांना बाळासाहेबांच्या श्रद्धांजली सभेतले भाषण करायचे होते. मात्र आपण बाळासाहेबांबद्दल बोलतो आहोत, की शिवसेनेबद्दल बोलतो आहोत, याचे भान दोघांनाही नव्हते. एका वाक्यात ते शिवसेनेबद्दल बो्लत होते तर दुसर्‍या वाक्यात ते बाळासाहेबांबद्दल बोलत होते. याचे कारण काय असावे? शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख येणे स्वाभाविकच आहे. पण दोघे जुने शिवसैनिक; शिवसेना आणि बाळासाहेब असे शब्द समानार्थीच वापरत होते. आपण शिवसेनेत होतो आणि बाळासाहेबांच्या जवळचे होतो, असे सांगताना आजही आपण शिवसैनिकच आहोत; असे सांगायचे त्यांनी बाकी ठेवले होते. त्याचा अर्थ इतकाच होता, की बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होते, पण त्याच्या पलिकडे तो त्या काळातील मराठी माणसाचा एक वडीलधारा होऊन गे्ले होते. शिवसेना आणि अन्य पक्ष यातला तोच तर मोठा फ़रक आहे. त्यात आलेले शिवसैनिक म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे बाळासाहेबांनी प्रत्येकाला वागवले होते. त्यांच्यातले मतभद असोत वा वादविवा्द असोत, त्यांनी वडिलकीच्या नात्याने हाताळले होते. ही एक संघटना होती, की चळवळ होती, ते आधी समजून घेतले पाहिजे. आपल्या शिवसेनेतील प्रवेश व नंतरच्या कार्याबद्दल बोलताना दोघांनी संघटना कशी होती, तिचे स्वरूप किती विस्कळीत होते, त्याचेही स्मरण करून दिले.

   माझगाव, भायखळा भागातले भुजबळ शिवसेना शाखाप्रमुख होते, तर लालबाग सुपारीबाग परिसरात बंडू शिंगरे शाखाप्रमुख होते. सात रस्त्याच्या बाजूला रमेश लब्दे शाखाप्रमुख होता. अशी नावे भुजबळांनी फ़टाफ़ट सांगुन टाकली. पण या शाखा व शाखाप्रमुखांचे कार्यक्षेत्र कुठले होते, त्या शाखेच्या सीमा कुठल्या होत्या, त्याचा त्यांनाही पत्ता नव्हता, हे सुद्धा भुजबळांनी सांगितले. म्हणजे ज्यांनी त्यांना शाखाप्रमुख नेमले वा शाखा सुरू करून दिली, त्यांनाही शाखेच्या सीमा माहिती नव्हत्या. याला संघटना म्हणता येईल काय? ती एक चळवळ होती. तो एक समान विचारांनी भारावलेल्या तरूणांचा जमाव होता. सगळाच नवा प्रकार होता. जसा तो शिवसैनिक म्हणवून घेणार्‍यांसाठी नवा होता; तसाच सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरणार्‍यांसाठीही नवाच प्रकार होता. शिवसेना म्हणजे काय चालले आहे, ते आजवरच्या राजकीय ढुढ्ढाचार्यांनाही कळत नव्हते, की उमगत नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला शिवसेनेविषयी जे काहीव वाटेल ते लिहित होता, मत व्यक्त करत होता आणि त्यावर वाचणारे शहाणे आपले मत बनवत होते. वास्तविक शिवसेना हे तेव्हा अगदी मराठी पत्रकारांनाही एक कोडेच होते. कारण तत्पुर्वीच्या तमाम संघटनांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिलेल्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या शाखा असायच्या. शिवाय शिवसेना राजकीय भूमिका घ्यायची; पण प्रत्यक्ष राजकारणात नव्हती. मग या संघटनेला समजून तरी कसे घ्यायचे? बाकी पक्ष हे विभाग वा मतदारसंघ यानुसार त्यांची बांधणी होती. इथे जो शाखाप्रमुख होता, त्याला आपले कार्यक्षेत्रही माहित नसायचे. ज्याला आजकालच्या आघाडीच्या राजकारणात निमंत्रक म्हणतात, तसेच काहीसे या शाखाप्रमुखाचे काम असायचे. कुठे मोर्चा आहे वा सभा व्हायची आहे; तिथे जाण्यासाठी शिवसैनिक किंवा कार्यकर्त्यांना पूर्वसूचना देणारा, असेच त्याचे काम असायचे. बाकी शिवसैनिक इथून तिथून सारखाच असायचा. शाखाप्रमुखाला अधिक महत्व नव्हते. बाळासाहेब सोडले तर बाकी सगळे शिवसैनिक होते. अगदी दुसरा कोणी नेताही नव्हता. ज्यांना थोडेफ़ार व्यासपिठावर उभे राहून बोलता येईल; एवढा सभाधीटपण होता, तेही भाषणे करायचे. बाकी वक्ता एकच आणि तोच शिवसेनाप्रमुख होता.

   आणखी एक गम्मत लक्षात घेतली पाहिजे. बाकी सगळ्या राजकीय संघटना व पक्षामध्ये विभाग वा मतदारसंघ वॉर्डनुसार समित्या असायच्या. त्यात तिथला अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारीणी असायची. इथे शिवसेनेलाच कुठली कार्यकारिणी नव्हती, की पदाधिकारी नव्हते; तर विभागवार संघटनात्मक स्वरूप कुठले असायचे? त्यामुळे इथे झेंडा खांद्यावर घेऊन ठामपणे उभा राहिला, त्याला शाखाप्रमुख बनवण्यात आले होते. शाखाप्रमुख ही राजकीय पक्ष वा संघटनेतील नवीच बाब होती. अशा शाखाप्रमुखांच्या साहेब कधीकधी बैठका घेत आणि त्याला प्रमुख शिवसैनिक हजर असायचे. त्यात पद्माकर अधिकारी, श्याम देशमुख, भालचंद्र ठाकूर अशी नावे मी ऐकलेली आठवतात. या संघटनेला स्वत:चे असे कुठले कायमचे कार्यालयसुद्धा नव्हते. फ़ॉर्म भरून शिवसेनेची पहिली सदस्य नोंदणी करण्यात आली, तेव्हा आजच्या सेनाभवनासमोर एक छापखाना होता, तिथेच बसून भालचंद्र ठाकूर व मामा खानोलकर यांनी फ़ॉर्म वाटल्याचे किती लोकांच्या स्मरणात आहे आज? रामदास मुद्रणालय असे काहीसे नाव होते. आता ती बैठी इमारत पाडून त्याच जागी तीनचार मजली बॅन्क ऑफ़ महाराष्ट्रची इमारत उभी आहे. शिवसेना भवनाच्या गडकरी चौकाकडून एक रस्ता शिवाजी पार्ककडे जातो, तसाच एक तिरपा ब्राह्मण सहाय्यक संघाकडे व पुढे सेनापती बापट पुतळ्याकडे रानडे रोडच्या दिशेने जातो, त्याच कोपर्‍यावर हे मुद्रणालय बैठ्या इमारतीमध्ये होते. म्हटले तर तेच शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यालय समजता येईल. पण तिथे कोणी पदाधिकारी बसायचे वा बैठका चालायच्या असे नव्हते. थोडक्यात संपर्क कार्यालय म्हणता येईल. अगदी सेनाभवन आकाराला येईपर्यंत मातोश्री वा तिथल्या गच्चीवर शिवसेना नेत्यांच्या किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका चालायच्या.

   इतर पक्ष आणि शिवसेना यातला हा मोठाच फ़रक आहे. ही एक संघटना अशी म्हणता येईल, की जिला आपले मुख्यालय नव्हते, पदाधिकारी व कार्यकारिणी नव्हती, घटना वगैरे नव्हती. पण ती संघटना वाढत होती, संघर्ष करत होती. विचारसरणी, धोरणे, तत्वज्ञान या खुप दूरच्या गोष्टी झाल्या. साहेब म्हणतील ते धोरण, तो विचार आणि ‘मार्मिक’ मध्ये छापुन येईल तो कार्यक्रम; असे या संघटनेचे स्वरुप होते. पण ती संघटना मराठी तरूणांन लोकप्रिय होती आणि तिची लोकप्रियता वाढतच होती. तिची आंदोलने व्हायची, धुमाकुळ घातला जायचा. शिवसेना कोणाच्या विरोधात आहे व कोणाच्या बाजूने आहे, त्याचा राजकीय अंदाज कोणा अभ्यासकाला बांधता येत नव्हता; की तिची वाटचाल कोणत्या दिशेने होईल त्याचेही समिकरण मांडता येनार नव्हते. ज्यांच्या अंगात काहीतरी करून दाखवण्याची मस्ती व उर्जा होती. त्यांच्यासाठी शिवसेनेने एक दार उघडून दिले होते. त्यातच चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि अत्यंत उत्साही शिवसैनिकांना निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर ठेवणे शक्य नव्हते. त्यात उतरण्याइतकी शिवसेना परिपक्व झालेली नव्हती. पण शांतही बसणे तिला परवडणारे नव्हते. मग मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या व उत्साहाने उतू जाणार्‍या तरूणांना त्या निवडणुकीत काही भूमिका देणे भाग होते. पण कोणाला विरोध करताना व कोणाला पाठींबा देतांना आपला वेगळेपणाही जपणे शिवसेनेला अगत्याचे होते. यातून बाळासाहेबांनी मार्ग काढला; तो निवडक उमेदवारांना पाठींबा देण्याचा. एका कुठल्या पक्षाला पाठींबा न देता; त्यांनी भिन्नभिन्न पक्षाच्या मोजक्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय भूमिकेचे आकलन करणे शहाण्यांना अधिकच अवघड होत गेले. पण निवडणुकीच्या निमित्ताने बनलेल्या संपुर्ण महाराष्ट्र समितीच्या मात्र शिवसेना पक्की विरोधात उभी ठाकली होती. अशी शिवसेनेची सुरूवात होती. शिवसेना आपल्या स्थापनेपासून वर्षभरातच राजकारणात पडली होती. मात्र तिच्या विषयी तेव्हा जेवढा बौद्धिक गोंधळ होता; तेवढाच आजही कायम आहे. त्यातून सावरून शिवसेनेचा अभ्यास करणे व निश्चित मत बनवणे, आजही फ़ारसे कोणी मनावर घेतलेले नाही.

   चार दशकांच्या कालखंडात ज्या संघटनेने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि जनमानसावर एवढी छाप पाडली, तिची निर्मिती का व कशी झाली? कोणत्या कारणाने झाली, तिची वाटचाल अशी का होत गेली; हे जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे आहे? आधीच्या प्रस्थापित राजकारण्यांनी मराठी जनमानसाला पटणारे राजकारण केले असते तर शिवसेना स्थापन तरी झाली असती का? या प्रश्नांची उत्तर शोधल्याशिवाय शिवसेनेच्या स्थापनेकडे वळणेच चुकीचे होईल. कोणत्या परिस्थितीने शिवसेनेला अवतार घ्यावा लागला?    (क्रमश:)
भाग   ( १० )    २९/११/१२

३ टिप्पण्या:

  1. शिवसेनेची 'जन्मगाथा'! छान आणि नवीन माहिती!

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ, आपली प्रबोधानकारांशी भेट वा चर्चा झालेली दिसत नाही. आपले मत सत्कृतदर्शनी दिसणाऱ्या परिस्थितीच्या विश्लेषणावर आधारित दिसतेय.

    उत्तर द्याहटवा