शुभेच्छा विषयक माझे मत अनेकांना विचलित करून गेले. पण मला कोणाच्या आनंदात बाधा आणायची नव्हती. माणसाला हजारो वर्षे विकसित झालेला मेंदू निसर्गाने बहाल केला आहे आणि त्याचा वापर माणसाने करावाच, अशा हट्टापायी मी लिहित असतो. बहुतेकांना माझे मत आवडले असले तरी ज्यांनी फ़ोन करून प्रतिक्रिया दिल्या; त्यामध्ये अनेकांच्या मनात अपराधी भावना मला जाणवली. त्यांच्यासाठी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की त्यांच्या शुभेच्छा देण्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. पण अकारण दुसर्या कुणाचे आंधळे अनुकरण होऊ नये, इतकाच माझा आग्रह आहे. जेव्हा आपल्याला मनापासून वाटते तेव्हा शुभेच्छा आपोआप बाहेर येतात. त्यासाठी दिवाळी किंवा वाढदिवस वगैरे असे मुहूर्त लागत नाहीत. आपल्या मित्र, मुलाला, परिचिताला कुठले यश मिळाले; मग जी भावना मनात उसळी मारून बाहेर येते ना, ती सर्वात प्रभावी शुभेच्छा असते. मग सचिनने आणखी एक शतक ठोकल्यावर गरीबीतही उत्साहाने नाचणारा कोणी भारतीय असतो ना; त्यापेक्षा सचिनला अन्य कुठल्या मोठ्या शुभेच्छा असू शकत नाहीत. आपलेही तसेच असते. आपल्यापैकी कुणाला वेदना होत असतील, त्याच्यावर संकट ओढवले असेल; तर उपजत जी सहाय्याची भावना उफ़ाळून येते ना, त्यापेक्षा त्याच्यासाठी आपण कुठल्याच शुभेच्छा देऊ शकत नसतो. तेव्हा दिवाळी नसते, की वाढदिवस वगैरे नसतो. कधी अशा कोणाच्या यशानेही आपण असेच भारावून जातो, त्यावेळच्या भावना सर्वात मूल्यवान शुभेच्छा असतात. कधीकधी त्यांचा उच्चारही आपण करत नाही.
माझीच गोष्ट घ्या. मागल्या वर्षभरात तेरा हजारहून अधिक वाचकांनी मला अगत्याने फ़ोन करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोनतीन रुपयाचे वृत्तपत्र खरेदी केल्यावर त्यातला एक लेख वाचून प्रतिक्रिया देण्यासाठी जो वाचक पदरमोड करतो, त्याची शुभेच्छा किती बहुमोलाची असेल? भले त्याची प्रतिक्रिया प्रेमळ असेल किंवा तक्रार करणारी असेल. पण तो बरीवाईट प्रतिक्रिया देण्यासाठी फ़ोन करताना जे अगत्य दाखवतो, ती शुभेच्छाच असते. अगदी माझे लिखाण आवडले नाही, राग आला असे सांगायला फ़ोन करणेही, माझ्यासाठी शुभेच्छाच असते. आवडले सांगणार्याचे जेवढे अगत्य आहे; तेवढेच नावडती प्रतिक्रिया देणार्याचेही अगत्यच असते. चटकन हे विधान विरोधाभास वाटेल. पण त्यात अजिबात विरोधाभास नाही. ज्याला माझा लेख आवडला नसेल किंवा त्यात काही चुक वाटले असेल, तरी तो त्याकडे दुर्लक्ष करीत नाही; हे अगत्यच नाही काय? साला फ़डतुस लिहितो, असे मनोमन म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही, याचा अर्थच त्याला माझ्याविषयी कुठेतरी अगत्य आहे आणि तो त्याच्या कल्पनेनुसार मला सुधारण्य़ाचा प्रयत्न करतो, हे अगत्य नाही तर काय? त्याचे असे अगत्य त्याच्या शुभेच्छाच नाहीत काय? त्याची नावडती वा चिडलेली प्रतिक्रिया, त्याच्या माझ्याविषयीच्या आपुलकीचीच साक्ष असते. आणि वर्ष भरात तेरा हजारापेक्षा अधिक वाचकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या; त्या घेऊन बसलेला मी किती श्रीमंत आहे ना? मग मी दिवाळीच्या पोकळ तोंडदेखल्या शुभेच्छा कशाला घेऊ किंवा देऊ?
जेव्हा कारण असते व गरजही असते, तेव्हा आपल्याला शुभेच्छा व सदिच्छांची खुप गरज असते. आणि जे खरे आपले असतात, त्यांच्या तोंडातून तसा शब्दही निघत नाही. कधीकधी तर गरजेला धावून येणारे असे निकटवर्तिय; शिव्याशाप देतच मदत करत असतात. पण त्या चीड आणणार्या शब्दांमधून कित्येक शुभेच्छा ओथंबून वहात असतात. कारण अत्यंत अवघड प्रसंगी अशी माणसे मदतीला धावून आलेली असतात. एकीकडे ते आपल्याला शिव्याशाप देत कामे उरकत असतात. पण तिथे त्यांच्या शब्दरूप त्या शिव्याशापांना काडीचाही अर्थ नसतो. कारण त्यांची कृती शुभेच्छा व सदिच्छांचे काम उरकत असते. पोर खेळताना बेफ़ाम होऊन जखमी होते किंवा हरवते; तेव्हा धाय मोकलून रडणारी बहीण, आई, ताई; तेच पोर हाती लागले वा सापडले मग त्याला बेदम बडवून काढते. त्या मारहाणीतही शुभेच्छा असतात. तो राग, संताप किती आपूलकी व्यक्त करत असतो, तेवढया शुभेच्छा वा प्रेम त्यालाच ओवाळताना नसते. शुभेच्छा अशा चमत्कारीक स्वरूपात समोर येतात. त्या शब्दात नसतात तर कृतीमध्ये असतात. भावनेने ओथंबलेल्या असतात. उफ़ाळून येतात, त्या शुभेच्छा असतात. त्यांची मोजदाद नसते, त्यांच्यासाठी मुहूर्त नसतो. त्या सदोदित आपल्या मनात जाग्या असतात. ज्या माणसाला बिनचेहर्याच्या हजारो वाचकांनी वर्षभर शुभेच्छा दिल्या, त्याने दिवाळीचे पोस्त मागावे काय? मी तितका कर्मदरिद्री नाही. ‘पुण्यनगरी’च्या वाचकांसह लाखो वाचकांच्या शुभेच्छा अखंड मिळवत व घेत राहिलेला आहे. किंबहूना त्यातूनच शुभेच्छा कशाला म्हणतात, त्याचा शोध घेण्याची प्रेरणा मला मिळालेली असेल.
देखाव्याला भुलण्यापेक्षा आपल्यातल्या चांगुलपणाला जागवण्यातच खर्या शुभेच्छा असतात. त्या सत्याकडे डोळसपणे बघायला भाग पाडावे एवढीच माझी त्या मागची भूमिका आहे. आज हा लेख लिहितांनाच बातम्या बघतो आहे, ऐकतो आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. त्यात गोळीबार होऊन दोन शेतकरी ठार झाल्याचे वृत्त मनाला पिळवटून काढणारे आहे. दिवाळीच्या दिवशी त्या मृतांसह जखमींच्या घरी जो आक्रोश चालू असेल, त्याची कल्पनाही मनाला घोर लावणारी आहे. त्या गोळ्या घालणारे पोलिस गुन्हेगार आहेत, की त्या शेतकर्यांचा प्रश्न दिर्घकाळ टांगून ठेवणारे सरकार गुन्हेगार आहे? गुन्हा सरकारचा आहे. जे सरकार आदर्शची फ़ाईल किंवा रॉबर्ट वड्राची फ़ाईल फ़टाफ़ट निर्णय घेऊन मार्गी लावते, त्यानेच ऊसाच्या किंमतीचा विषय निकालात काढायला विलंब केल्याने ऐन दिवाळीत या आंदोलनाने पेट घेतला. त्यातून गोळीबाराची वेळ आली. अशी वेळ आदर्शमध्ये फ़्लॅट घेणार्यांवर येत नाही. वड्रा किंवा पवार-गांधी खानदानातल्या कोणावर येत नाही. त्यांची कामे वेळीच मार्गी लागतात. म्हणूनच त्यांना रस्त्यावर उतरावे लागत नाही, की त्यांच्यावर गोळ्या झाडण्य़ाची वेळ पोलिसांवर येत नाही. कारण सरकार किंवा सत्तेच्या शुभेच्छा त्यांच्या कायम मागे असतात. ज्या शुभेच्छा ते कधी एकमेकांना देतांना दिसत नाहीत. पण कृतीने पुर्ण करीत असतात. पण तेच सत्ताधारी असे कुठले मुहूर्त आले; मग तुम्हाआम्हाला अगत्याने शुभेच्छा देत असतात. आणि त्या शब्दांचे सूर हवेत विरुन जाण्यापुर्वीच आपल्यावर गोळ्या झाडल्या जात असतात. शुभेच्छा किती अपायकारक होऊन गेल्यात ना?
ऐन दिवाळीच्या पहिल्या सकाळी अभ्यंगस्नानाच्या आधी, वाहिन्यांवर दोन शेतकर्यांच्या गोळीबारातील मृत्य़ूची बातमी ऐकल्यावर कुठली दिवाळी करायची सांगा? त्यातला कोणी माझा वाचक असेल तर? त्यातल्या कोणी कधी मला फ़ोन करून अभिनंदन वा प्रतिक्रिया दिलेली असेल तर? त्यांचे चेहरे मला ठाऊक नसतील. पण मला फ़ोन करून प्रतिक्रिया देणार्या कुणाचाच चेहरा मी बघितलेला नाही. पण त्यांच्या शुभेच्छांचा चेहरा स्पष्ट आहे. त्यामागची आपुलकी मनाला उमेद देणारी आहे. त्याचा मागमुस तरी जनतेला शुभेच्छा देणार्या सताधार्यांच्या शब्दामध्ये आढळतो काय? ज्यांनी आपले जगणे महाग व असह्य करून ठेवले आहे, असुरक्षित केले आहे; त्यांच्या शुभेच्छा काय कामाच्या? त्यापेक्षा आपुलकीने रागावणारा, चिडणारा, प्रसंगी शिव्याशाप देणारा मित्र जे काही मन:पुर्वक बोलतो ना, त्याचे शब्द कुठलेही असोत; त्या हार्दिक शुभेच्छा असतात. कारण त्या त्याच्या मनातून व हृदयातून आलेल्या असतात. आधी खर्चाचा हिशोब मांडून दिलेल्या परवड्णार्या शुभेच्छा नसतात. कारण हार्दिक म्हणजे हृदयातून आलेल्या. आणि हृदय तर कधी हिशोब मांडत नाही. चुकलेल्या पोराला बेदम मारणारी आई इजा करते, त्याही शुभेच्छा असतात आणि नंतर सुजलेल्या अवयवावर फ़ुंकर घालते, त्याही शुभेच्छा असतात. त्या मायेला शब्दांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही, तसेच शुभेच्छांना शब्दात, भेटवस्तू, भेटकार्ड किंवा आहेरातून व्यक्त करता येत नाहीत. ज्याला द्यायच्या असतात आणि ज्याला दिल्या जातात, त्या दोघांना त्या कळत असतात. आसपासच्यांना कळणर सुद्धा नाहीत इतक्या सहजगत्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात. घरकुटुंबाच्या उपस्थितीत, पण त्यांना कळणारसुद्धा नाही अशा, प्रियकर-प्रेयसीकडे टाकलेल्या कटाक्षा इतक्या शुभेच्छा इतरांसाठी अदृष्य़ असतात. आणि ज्या दिसणार्या व शब्दातल्या असतात, त्या गोळीबारात जीव घेणार्यांइतक्या अपायकारक असू शकतात. ( क्रमश:)
भाग ( २० ) १४/११/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा