सगळ्या समस्या कुठे येऊन थांबतात? आपल्या समस्या तरी काय आहेत? भ्रष्टाचार ही समस्या आहे काय? समस्या अन्यायाची आहे काय? आणि मग प्रश्न पडतो, की अन्याय कशाला म्हणायचे आणि भ्रष्टाचार कशाला म्हणायचे? आता हे लिहित बसलो असताना एक चर्चा एबीपी माझा बाहिनीवर चालू आहे. त्यात छगन भुजबळ यांनी माळी किंवा ओबीसी म्हणूनच आपल्याला लक्ष्य बनवले जाते, अशी तक्रार केली होती, त्या संदर्भाने चर्चा चालू होती. तिथे अन्यायाची किंवा भ्रष्टाचाराची व्याख्या करताना इतिहास संशोधक व समाज चिंतक प्रा. हरि नरके यांनी केलेला युक्तीवाद विचारात घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या शिक्षण सम्राटांच्या संस्था आज उभ्या आहेत, त्यांनी सरकारी जमीनी व सवलती घेऊनच ती साम्राज्ये उभी केलीत. पण त्यांच्या कारभार किंवा भ्रष्टाचाराबद्दल तक्रारी होत नाहीत. घोटाळा म्हणून गवगवा केला जातो, तो केवळ भुजबळ यांच्या बाबतीत, असे नरके म्हणाले. या विधानाला मी का महत्व देतो? प्रा. नरके कोणी राजकीय नेता नाहीत किंवा पक्षाचे बांधिल नाहीत. पण त्यांनीही भुजबळ यांचे समर्थन करताना तक्रार काय केली, ती समजून घ्यायला हवी. भुजबळ यांच्या संस्थांचे काम उत्तम चालले असूनही त्यांनाच अकारण लक्ष्य केले जाते; अशी तक्रार नाही. सगळे्च जे करत आहेत, तेच भुजबळ करीत असतील; तर त्यांनाच लक्ष्य करणे हा अन्याय आहे. आजकाल अन्यायाची व्याख्या व व्याप्ती अशी मर्यादीत झालेली आहे.
एक बुद्धीमंत प्राध्यापक भ्रष्टाचार नसल्याची ग्वाही देत नाही, की शिष्टाचार असल्याची हमी देत नाही. सर्वत्र जे चालू आहे, तसेच होत असेल तर एखाद्याला जात किंवा वर्ग म्हणुन लक्ष्य केले जाते; ही तक्रार आहे. आणि त्यांचा दावा चुकीचाही नाही. तोच आपल्या सर्वांचा युक्तीवाद आहे. आपण केला तर भ्रष्टाचार नसतो आणि दुसर्याने केला व आपल्याला करता आला नाही; तर तो भ्रष्टाचार असतो. थोडक्यात आपल्या देशाची व एकूणच समाजाही अवस्था ‘मॅकेनाज गोल्ड’ नामक चित्रपटातील घोळक्यांसारखी झालेली आहे. त्यातला प्रत्येकजण कुठेतरी लपलेल्या सोन्याच्या मागे असतो आणि आपल्याला मिळण्यापेक्षा दुसर्याला ते मिळू नये; यासाठी आसुसलेला असतो. मग त्या सोन्याचा जो शोध चालू असतो; त्यात एकएक टोळी येऊन सहभागी होत असते. पण त्यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो. प्रत्येकजण दुसर्याकडे संशयाने बघत असतो आणि संधी मि्ळताच दुसर्याला संपवायचे मनसुबे मनोमन आखत असतो. प्रतिक्षा असते ती सोन्याच्या खाणीचा शोध लागण्याची. एकदा ती जागा कळली, मग उरलेल्या सर्वांना संपवून त्या अगणित सोन्याचा एकमेव मालक बनायला सगळे आपापल्या परीने सज्ज असतात. आज आपल्या देशातील विविध लोकसमुहांची मानसिकता तशीच झालेली आहे. मग मराठे आरक्षणाची मागणी करतात, तेव्हा ओबीसी त्याला कडाडून विरोध करत असतात. आपल्या वाट्याला जे आरक्षण म्हणजे टक्केवारी आलेली आहे त्यात भागिदार नको आहे.
वरवर पाहिल्यास ही सामाजिक न्यायाची लढाई आहे असेच भासवले जात असते. दाखवले जात असते. पण थोड्या बारकाईने अभ्यासले, तर ही टोळ्यांची लढाई झालेली दिसेल. कुठे त्या जातीच्या, पोटजातीच्या, वर्णाच्या वा वर्गाच्या टोळ्या झालेल्या आहेत. आणि आपापल्या सोयीनुसार या टोळीतला माणूस त्या टोळीतही येजा करताना दिसेल. म्हणजे शिक्षण, नोकरी किंवा सवलती मिळवताना तोच माणूस जातीपातीच्या टोळीत असतो. पण जेव्हा व्यावसायिक संघर्ष येतो, तेव्हा जातीपाती बाजूला पडून व्यावसायिक टोळ्या तयार होतात. त्यात अठरापगड जातीचे लोक एकत्र एकदिलाने लढताना दिसतील. रिक्षावाले विविध जातीचे असतात. पण जेव्हा त्यांच्या भाडेवाढीचा सवाल असतो, तेव्हा त्याला जात प्यारी नसते. त्याची जातीची अस्मि्ता बाजूला कोपर्यात जाऊन पडते आणि व्यावसायिक अस्मिता उफ़ाळून आलेली दिसते. हीच मानवी मानसिकता असते. ज्याला आपण समाज किंवा राष्ट्र म्हणतो, त्यात अनेक टोळ्या नांदत आहेत आणि बाहेरचे आक्रमण वा परचक्र आले, मग आमची राष्ट्रीय अस्मिता जागी होते, अन्यथा आम्ही आपल्या आपल्या टोळ्या बनवून दुसर्या उर्वरित टोळ्यांवर कुरघोडी करण्यासाठी कायम सज्ज असतो. आणि तीच खरी समस्या आहे. कारण प्रसंगानुसार आपल्यावर अन्याय करणारी टोळी बदलत असते. आणि अन्याय करणारी टोळी वगळता आपण बाकीच्या टोळ्यातले आम सामान्य जनता बनत असतो. एक दिवस अचानक रेल्वेच्या मोटरमनचा संप घोषित होतो आणि आपण सामान्य प्रवासी त्यांचे शिकार होतो. तेव्हा त्या मोटरमन नावाच्या टोळीने आपल्याला ओलीस ठेवलेले असते. त्यांच्या न्याय वा अधिकारापुढे तुमच्या आमच्या हालअपेष्टांना काडीमात्र किंमत नसते. मग एकेदिवशी रिक्षावाल्यांच्या न्याय्य मागण्या असतात तर दुसर्या दिवशी गॅस विक्रेत्यांच्या समस्या मोठ्या होतात. त्यांच्या तुलनेत आपण सगळे किडेमकोडे बनून जातो. मुद्दा इतकाच, की आजही आपण कायद्याच्या राज्यात नव्हेतर टोळीच्या जमान्यातच जगतो आहोत. ज्या टो्ळीचे सामर्थ्य मोठे असेल तिला शरण जाण्याखेरीज आपल्याला पर्याय नसतो. सामान्य माणसेच कशाला अगदी देशातला कायदा व सरकारही त्या समर्थ टोळीला शरण जात असते.
थोडक्यात ज्याला आपण लोकशाही म्हणतो आहोत; ती व्यवस्था टोळीबाजीची आहे. जो कोणी मोठी व समर्थ टो्ळी बनवील, त्याला उर्वरीत समाजावर आपली हुकूमत प्रस्थापित करता येत असते. मग अशा रचनेमध्ये कोणी जातीच्या टोळ्या बनवतो आणि त्याच्या आधारे आपला हिस्सा मिळवत असतो. जो कोणी जात वा पोटजातीच्या पलिकडे जाऊन अधिक मोठी व समर्थ टोळी बनवू शकतो, त्याला मग सत्तेमध्ये जास्त मोठा हिस्सा मिळू शकतो. एक उदाहरण इथे देता येईल. मध्यंतरी नांदेड महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात इत्तेहाद नावाच्या हैद्राबादच्या पक्षाने चौदा जागा जिंकल्याची चर्चा झाली. पण त्या नगण्य पक्षाने इतके मोठे यश कसे मिळवले? तर जिथे मुस्लिम दाट वस्ती आहे, तिथेच त्या पक्षाने आपले बळ निर्माण केले आणि एकजात तमाम मुस्लिमांची मते आपल्या पारड्यात पडण्याकडे लक्ष पुरवले; तर त्याचे इतके उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे मुस्लिम नसलेल्यांची मते अनेक पक्षात विभागली गेल्याचा लाभ इत्तेहाद पक्षाला मिळाला. याला टोळीचा विजय म्हणता येईल. तोच प्रकार अनेक भागात दिसून येतो. निवडणुक असो किंवा नसो, अन्य कुठल्या प्रांतिक वा भाषिक, पेशाच्या टोळ्या तयार होतात आणि आपला हिस्सा मागत असतात. अशा टोळ्या एकत्र करू शकेल, त्याला त्यापेक्षा मोठा विजय मिळवता येतो. सत्तेमध्ये अधिक हिस्सा मिळवू शकतो. त्यांना आपण राजकीय पक्ष म्हणतो. असे राजकीय पक्ष वा संघटना मग लोकासमुहांना आमिषे दाखवून खेळवत असतात. पण प्रत्यक्षात हे सर्वच झुंडीचे राजकारण चालू असते. ज्याच्या मागे मोठी झुंड त्याची हुकूमत; अशीच परिस्थिती असते किंवा आहे.
गेल्या दोनतीन हजार वर्षात माणसाने खुप प्रगती केली आणि विविध राजकीय, सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या असल्या तरी अजून माणसाला टोळीच्या मानसिकतेमधून बाहेर पडता आलेले नाही. शिक्षण, आधुनिक विचार व प्रगल्भता अशा दिशेने कितीही वाटचाल मानवाने केलेली असली; तरी आजही विध्वंसक शक्ती व उपद्रवमूल्य हेच सत्तेपर्यंत पोहोचण्याचे साधन राहिलेले आहे. त्यामुळेच झुंडीचे साम्राज्य आजही अबाधित आहे. ज्या झुंडीचे उपद्रवमूल्य अधिक आहे, त्यांनाच समाजावर हुकूमत गाजवता येते हे निखळ सत्य आहे. आणि म्हणूनच आपल्या राष्ट्रीय वा सामाजिक, राजकीय समस्यांचा विचार करायचा तर माणसाच्या झुंडींचा विचार करावाच लागतो. झुंडी कसा विचार करतात व कसे वर्तन करतात, त्याचाही विचार करावा लागतो. त्यात शिवसेना येते तशीच भुजबळांची रणनितीही येते. नरेंद्र मोदी का जिंकतात आणि मुलायम वा मायावतींच्या यशाचे रहस्यही त्यातूनच उलगडू शकते. त्याच रहस्याचा भेद केल्याशिवाय आपल्याला भेडसावणार्या समस्यांचा उलगडा होऊ शकत नाही. कारण न्याय व समता या कल्पनाच भ्रामक असतात. त्याच संकल्पनांचा खेळ करून आपल्याला नेते वा सताधीश भुलवत असतात. मग त्यात आम आदमीच्या नावाने मते मागून त्यालाच महागाईच्या खाईत लोटून देणार्या सोनिया गांधींचा समावेश होतो; तसाच भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाला सिद्ध झालेल्या केजरिवाल यांचाही समावेश होत असतो. ही सर्वच मंडळी आपापल्या झुंडी प्रभावी व सामर्थ्यशाली बनवण्यासाठी आपल्याला झुलवत असतात. आणि आपण अशा कुणातरी उद्धारक वा प्रेषिताच्या शोधात असतो, हीच आपली खरी समस्या असते. आणि म्हणुनच झुंड म्हणजे काय ते समजून घ्यायला हवे आहे. ( क्रमश:)
भाग ( १३ ) ७/११/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा