रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

आयुष्यभराच्या आठवणी म्हणजे असतो माणूस


   राजू शेट्टी यांच्यावर शरद पवार यांनी केलेली टिका किंवा त्यातला जातिविषयक उल्लेख यावर माझा अजिबात आक्षेप नाही. कारण सगळ्यांचेच राजकारण व समाजकारण असेच चालते. त्यासाठी एकट्या शरद पवार यांना गुन्हेगार म्हणायचे कारण नाही. कोणी जातीचे डावपेच खेळतो तर कोणी भाषिक वा प्रांतिक धोरणाने आपली झुंड बनवू बघतो. कोणी धार्मिक व पंथीय झुंडीतून आपले नेतृत्व उभे करायला धडपडत असतो. मग शरद पवार यांना गुन्हेगार मानायचे कारण काय? पवार गुन्हेगार असतील तर ते एकाच बाबतीत प्रमाद करीत असतात, आपला हेतू लपवून अकारण बहुजन सर्वसमावेशक राजकारण करत असल्याचा आव आणतात. माझा आक्षेप तेवढाच आहे. ते एका समाजाचे आहेत व त्यांनी सातत्याने त्या समाजाचे प्रतिनिधित्व केल्याप्रमाणे राजकारण केले आहे. त्यामुळेच त्यांनी लपवाछपवी करायचे कारण नाही. त्यांची राष्ट्रीय राजकारणातली ओळख काय आहे? ‘स्ट्रॉग मराठा’ असाच दिल्लीची राष्ट्रीय माध्यमे त्यांचा नेहमी उल्लेख करतात ना? पंचविस वर्षे यशवंतराव चव्हाणही दिल्लीच्या राजकारणत होते. पण त्यांचा कोणी मराठा असा उल्लेख करीत नसे. स्वत: पवारांनी दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून वावरताना त्या शब्दप्रयोगाला कधी आक्षेप घेतला आहे काय? नसेल तर मग आपण मराठ्यांचे जातीय नेते आहोत आणि प्रसंग व गरजेनुसार अन्य जातीजमातींच्या समुहांना सोबत घेऊन स्वार्थाचे राजकारण करतो; हे लपवायचे अजिबात कारण नाही. तिथेच सगळी गडबड होते. आज त्यांच्यावर टिका होते आहे, ते ती त्याच लपवाछपवीमुळे.

   झुंडीचे राजकारण समजण्यापुर्वी झुंडी बनतात कशा तेही लक्षात घ्यावे लागेल. अन्यथा पवारांना अकस्मात स्वत:च्या किंवा राजू शेट्टी यांच्या जातीची आठवण का झाली, ते लक्षात येणार नाही. शेवटी माणुस म्हणजे तरी काय असतो? आज जॉर्ज फ़र्नांडीस हयात आहेत. पण त्यांचा उल्लेख कुठे होत नाही. त्याचे कारण ते सार्वजनिक जीवनातून बाहेर पडलेले नाहीत. तर त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडला आहे. त्यामुळे त्यांना आपल्याच पुर्वायुष्याचे सर्वकाही नेमके आठवत नाही. थोडक्यात ते हयात असले तरी त्यांनाच आपण जॉर्ज फ़र्नांडीस आहोत हे लक्षात राहिलेले नाही. माणूस म्हणजे त्याने जगलेल्या एकूण आयुष्य़ातल्या आठवणींचा साठा असतो. त्या स्मृती म्हणजे तो माणुस असतो. याच आठवड्यात गेल्या इंग्रजी वाहिनीवर ‘डिसॅपियर्ड’ नामक सत्यकथा आधारित मालिकेचा एक भाग बघायचा योग आला. अमेरिकेच्या एका शहारातील पस्तीस चाळिस वयाची अंबर नावाची एक महिला आईवडीलांच्या घरातून आपल्या घरी जायला निघाली; ती स्वत:च्या घरी पोहोचलीच नाही. साधारण तिनशे मैलावर तिची गाडी सापडली. त्या गाडीत तिच्या सर्व वस्तू सुरक्षित होत्या. पण या महिलेचा ठावठिकाणा नव्हता. शोधाशोध सुरू झाली. तेव्हा गाडीत सापडलेल्या वस्तूमध्ये एका दुकानात काही खरेदी केल्याची पावती होती. तिथे तपास केल्यावर सीसीटीव्ही कॅमेरात चित्रण झालेली ती महिला आढळली. पण बाकी काहीच नाही. अपहरण झाले असल्यास कुठून खंडणीसाठी धमकीचा फ़ोन वगैरे नाही. कुठे अज्ञात म्रुतदेह सापडला असेही नाही. दोन महिने असे गेले. पोलिसही कंटाळले होते. कुटुंबियांनी आपल्यापरिने तिची छायाचित्रे फ़ेसबुक इंटरनेटवर टाकली होती. ओळखायला सोपे जावे म्हणून तिने खांद्याच्या मागच्या बाजूला गोंदवलेले चित्रही मुद्दाम त्यात टाकले होते. तब्बल दोन महिन्यांनी भलत्याच एका दूरच्या शहरामध्ये एक हरवलेली काहीशी संशयास्पद अवस्थेत फ़िरणारी महिला पोलिसांना आढळली. तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तीच हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले. आईवडीलांना बोलावून ओळख पटवण्यात आली आणि अंबरला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

   तिची नजर हरवलेली होती. ती कोणालाच ओळखत नव्हती. खरे सांगायचे तर शालेय जीवनातील म्हणजे पंधरा वर्षाची असतानाच एक फ़ोटो उपलब्ध होता, तो आपला एवढेच तिला पूर्वायुष्यातले आठवत होते. वयाच्या पंधरा वर्षाच्या पुढल्या बाविस तेविस वर्षातल्या तिच्या स्मृती पुसल्या गेल्या होत्या. तिला त्यापैकी काहीच आठवत नव्हते. अगदी लग्न झाल्याचे किंवा मुले झाल्याचेही आठवत नव्हते. पण कुटुंबियांनी प्रयत्नपुर्वक तिला एक एक गोष्ट व घटना सांगुन, तिच्या स्मृती जागवल्या. तेव्हा कुठे ती ‘माणसात’ आली. पण मजेशीर गोष्ट म्हणजे जिथून ती हरवली होती, जिथे तिचे चित्रण छुप्या कॅमेराने दुकानात केले होते, तिथून बाहेर पडण्यापर्यंत तिच्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या. पण दुकानाच्या बाहेर पडुन गाडीपाशी आली असताना कुणीतरी हाक मारली एवढेच तिला आठवते. आपण हाकेसरशी वळलो आणि पुढले तिला काहीही आठवत नाही. अगदी खुप प्रयत्न केला तर डोके दुखते; पण काहीच आठवत नाही. जणू ते मधले दोन महिने तिच्या आयुष्यात आलेच नव्हते आणि काही तिच्या आयुष्यात घडलेच नव्हते. स्मृतीचा तेवढाच भाग पुसलेला आहे. ती दुकानातून बाहेर पडल्यावर गाडीपाशी असताना कोणी हाक मारली, पुढे ती कुठे होती, तिने काय केले, यापैकी काहीच आठवत नाही. नशीब तिला निदान तिथपर्यंतच्या घटना आठवण करून दिल्यावर स्मरतात तरी. जेव्हा ती सापडली तेव्हा त्यातलेही बरेच काही स्मरणतून पुसले गेले होते. परिणामी आपण कोण आहोत; तेही अंबर विसरून गेली होती. माणूस म्हणजे असे असते. माणूस म्हणजे त्याच्या आयुष्यातले बरेवाईट अनुभव असतात. आयुष्यभर जमवलेल्या आठवणी म्हणजे माणूस असतो. भाऊ तोरसेकर म्हणजे त्याच्या चौसष्ट वर्षातल्या आठवणी असतात. त्याच जर नाहिश्या झाल्या किंवा मेंदुतून, स्मरणशक्तीमधून पुसल्या गेल्या; तर उरलेल्या देहाला जग भाऊ म्हणून ओळकते, पण तो स्वत:ला ओळखू शकत नाही. त्याचे अस्तित्वच संपून जाते.

   माणसाची ओळख ही अशी त्याच्या आयुष्यभराच्या आठवणी असतात. तशीच समाजाची ओळख असते. एकाहून अनेक माणसांच्या आठवणी समान असू शकतात. त्या सामुहिक आठवणी असतात. आणि अशा सामुहिक आठवणींच्या आधारावरच कुटुंब, टोळी, झुंडी तयार होत असतात. जाती व संप्रदायाच्याही आठवणी अशाच सामुदायिक असतात. त्या आठवणी म्हणजे त्या समुदायाची ओळख असते. कधी आपण त्यालाच अस्मिता म्हणतो, अभिमान स्वाभिमानाचे नाव देतो. त्या आठवणी तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंधित असतीलच असे नाही. तुमच्या जन्मापुर्वीच्या किंवा दोनचार पिढ्यांपुर्वीच्याही असू शकतात. पण त्यांच्या भोवती आपली अस्मिता उभी असते. सहजगत्या बोलताना आपण काहीवेळा म्हणतो, ‘आमच्यात असे नाही चालत’. ही काय भानगड असते? आमच्यात म्हणजे काय? तर रिती, रिवाज, परंपरा असतात. त्यामागचे हेतू आपल्याला ठाऊक नसतात, कारणे माहित नसतात. पण त्यासाठी आपण हमरातुमरीवर येऊन भांडण सुद्धा करतो. त्या रितीरिवाज हे सामुहिक आठवणीतून आलेले असतात आणि सामुहिक अहंकार म्हणून आपण त्यांची जपणूक करत असतो. आपण आधुनिक जमान्यातले म्हणून अशा गोष्टी कितीही नाकारल्या, तरी एखाद्या क्षणी तो सुप्त अहंकार उफ़ाळून बाहेर येतो. तीच मानवी स्वभावातील पाशवी झुंडप्रवृत्ती असते.

   परवा शरद पवार यांनी अकस्मात राजू शेट्टी यांच्या जातीचा उल्लेख केला, तो योगायोग नव्हता. मराठा किंवा कुठल्याही जातीच्या गोतावळ्यात वावरताना असा अनुभव आपल्याला येत असतो. व्ही. पी. सिंग यांनी बोफ़ोर्स घोटाळ्याचा गाजावाजा केला होता, तेव्हा बोटक्लब येथे घेतलेल्या प्रचंड जाहिरसभेत बोलतांना राजीव गांधी यांनी सिंग यांचा उल्लेख जयचंद राठोडची अवलाद असाच केला होता. पृथ्वीराज चौहान याने ज्याच्या बहिणीशी मनाविरुद्ध विवाह केला म्हणून सुडाला पेटलेल्या जयचंदाने परकी आक्रमकांच्या मदतीने पृथ्वीराजला संपवले, ती कित्येक शतकांची जुनी सामुहिक भारताची आठवण आहे. राजीव गांधींनी तिचा उल्लेख का केला? त्याच आवेशात शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या संप्रदाय वा जातीचा उल्लेख केला आहे. कितीही झाकून दडपून ठेवली तरी ही झुंडीची प्रवृत्ती माणसाच्या सुप्त मनात दबा धरून बसलेली असते. एखाद्या गाफ़ील क्षणी ती उसळी मारून बाहेर येते. कारण माणूस कितीही पुढारलेला असला तरी तो कळपाने जगतो आणि कळपातच वावरतो. त्याच्यातली ती झुंडीची प्रवृत्ती अजून मेलेली नाही, संपलेली नाही. सुप्तावस्थेमध्ये ती मनाच्या खोल कप्प्यात जागृत असते. संधीची प्रतिक्षा करीत असते. जेव्हा माणसाची बुद्धी किंवा मन त्याला एकाकी कोंडीत सापडल्याचा धोका दाखवते; तेव्हा ती झुंडीची मनोवृत्ती उसळी मारून बाहेर येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच असल्याप्रमाणे त्या मनोवृत्तीचा आधार शोधू लागते.   ( क्रमश:)
 भाग  ( २३ )   १८/११/१२

३ टिप्पण्या:

  1. अगदी अगदी!

    कितीही आव आणला तरी कुठल्यातरी बेसावध क्षणी आत दाबून ठेवलेले उसळी मारून बाहेर येतेच आणि दुसर्‍याच्या वर्मावर घाव घातला जातो. कोंडीत सापडलेल्याला या ढालीचा वापर आवश्यक होऊन बसतो.

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम भाऊ, तुम्ही फारच छान पोस्त टाकली आहेत.

    माणूस आणि त्याचा मेंदू हा अजूनही रानटी पशूंच्या मेंदू सारखाच आहे. त्यामुळे पशुंसारखी, कळपात/झुंडीत राहून झुंडशाही करण्याची त्याची प्रवृत्ती गेली नाही, अपवाद फक्त असामान्य महामानवांचे किंवा प्रेषितांचे....... मानवी संस्कृतीच्या गेल्या ५ त १० हजार वर्षाच्या इतिहासात त्यांची महामानवांची संख्या जवळपास १००० एक असावी...... अर्थात या बाबत सुद्धा शंका आहे......

    उत्तर द्याहटवा
  3. संपूर्ण सहमत सर

    माणसाची ओळख ही अशी त्याच्या आयुष्यभराच्या आठवणी असतात. तशीच समाजाची ओळख असते. एकाहून अनेक माणसांच्या आठवणी समान असू शकतात. त्या सामुहिक आठवणी असतात. आणि अशा सामुहिक आठवणींच्या आधारावरच कुटुंब, टोळी, झुंडी तयार होत असतात. जाती व संप्रदायाच्याही आठवणी अशाच सामुदायिक असतात. त्या आठवणी म्हणजे त्या समुदायाची ओळख असते. कधी आपण त्यालाच अस्मिता म्हणतो, अभिमान स्वाभिमानाचे नाव देतो. त्या आठवणी तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंधित असतीलच असे नाही. तुमच्या जन्मापुर्वीच्या किंवा दोनचार पिढ्यांपुर्वीच्याही असू शकतात. पण त्यांच्या भोवती आपली अस्मिता उभी असते. सहजगत्या बोलताना आपण काहीवेळा म्हणतो, ‘आमच्यात असे नाही चालत’. ही काय भानगड असते? आमच्यात म्हणजे काय? तर रिती, रिवाज, परंपरा असतात. त्यामागचे हेतू आपल्याला ठाऊक नसतात, कारणे माहित नसतात. पण त्यासाठी आपण हमरातुमरीवर येऊन भांडण सुद्धा करतो. त्या रितीरिवाज हे सामुहिक आठवणीतून आलेले असतात आणि सामुहिक अहंकार म्हणून आपण त्यांची जपणूक करत असतो. आपण आधुनिक जमान्यातले म्हणून अशा गोष्टी कितीही नाकारल्या, तरी एखाद्या क्षणी तो सुप्त अहंकार उफ़ाळून बाहेर येतो. तीच मानवी स्वभावातील पाशवी झुंडप्रवृत्ती असते.

    उत्तर द्याहटवा