शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

यापेक्षा अराजक वेगळे कशाला म्हणतात?


    अण्णा हजारे किंवा त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या केजरिवाल, शिसोदियांनी संसदेचा अवमान केला अशी जोरदार तक्रार झाली होती. तो अवमान म्हणजे काय होते? त्यांनी असे म्हटले होते, की संसदेत सव्वाशे दिडशे गुंड गुन्हेगार, कलंकित लोक बसले आहेत. त्यात त्यांनी कोणता संसदेचा मानभंग केला होता? ज्या बातम्या त्यांनी वृत्तपत्रातून वाचल्या किंवा वाहिन्यांवरील चर्चेतून ऐकल्या होत्या, त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला होता ना? आजकाल बातम्यांमध्ये बाहूबली किंवा दागी हा शब्द भलताच प्रसिद्धी पावला आहे. त्याचा अर्थ इतकाच, की बाहू म्हणजे मनगटी बळाच्या आधारावर दादागिरी करणे. अशा रितीने आपली दादागिरी लादणार्‍याला बाहुबली म्हणतात आणि ज्यांच्या नावावर पोलिसात गुन्हा नोंदलेला आहे, त्याला दागी म्हणजे कलंकित म्हणतात. उदाहरणार्थ मुंबईच्या भायखळा भागातून अरुण गवळी नावाचा गुन्हेगार विधानसभेवर निवडून आलेला होता. तसा तो पहिलाच नाही. १९९० च्या निवडणूकीत उल्हासनगर येथून पप्पू कलानी नावाचा आमदारही कॉग्रेसच्या तिकिटावर निवडून आला. त्याला उमेदवारी देण्यातून शरद पवार यांच्यावर खुप आरोप झाले होते. तेव्हा पवार यांनी दिलेले उत्तर मोठे मजेशीर होते. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन, त्यांना तिकिट दिले असा पवारांचा दावा होता आणि तो खराच आहे. कारण पप्पू कलानी याला आमदार असतानाच टाडा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर दिर्घकाळ तो गजाआडच होता. त्याला जामीन मिळाल्यावरही त्याला हद्दपार करण्यात आलेले होते. असा हद्दपार असताना दोनदा पप्पू कलानी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आला. त्याच्यावर डझनावारी गुन्हे नोंदलेले आहेत. आणि त्याची दहशत कोणी नाकारू शकत नाही. त्याने उल्हासनगर या छोटेखानी शहरामध्ये सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी केली. अगदी खुन पाडण्यापासून अनेक बेकायदा व अनधिकृत गोष्टी केल्या. पण त्याच बळावर त्याला त्या भागातील मते मिळत होती आणि तो तिकडे फ़िरकला नाही, तरी निवडून येत होता. यालाच पवार निवडून येण्याची पात्रता किंवा क्षमता म्हणतात. तेच काही प्रमाणात अरूण गवळीविषयी सांगता येईल. त्यानेही सध्या दोन नगरसेवक निवडून आणलेले आहेत व एकदा स्वत: आमदार होऊन दाखवले आहे. यावेळी त्याच्या मतदारसंघाच्या हद्दी बदलल्या नसत्या, तर तो पुन्हा निवडून येऊ शकला असता. देशाच्या कानाकोपर्‍यात असे शेकडो निवडून येणारे दाखवता येतील, ज्यांच्यावर गुन्हेगारी वा दादागिरी व कायदे मोडल्याचे गुन्हे नोंदलेले आहेत. मग लोक अशा गुंडांना का निवडून देतात?

   दहशत हे त्याचे सर्वपरिचित उत्तर आहे. वृत्तपत्रे वा माध्यमातल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा, तर या दाखलेबाजांच्या दहशतीमुळेच घाबरून लोक त्यांना मते देतात. दुसरे कारण म्हणजे ज्यांना विरोधी मत द्यायचे असते, ते भयभीत होऊन मतदान केंद्राकडे फ़िरकत नाहीत. त्यामुळे मग हे बाहुबली विजयी होतात. हे काही प्रमाणात सत्य असले तरी सर्वच बाबतीत पुर्णसत्य नाही. तसे असते तर महाराष्ट्राबाहेर हद्दपार केला असतानाही पप्पू कलानी निवडून आलाच नसता. त्यांच्या मतदारसंघात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला तरी असे लोक निवडून येताना दिसतात आणि चांगले सुशिक्षितही त्यांचे समर्थन करताना दिसतील. मग अशा त्यांच्या समर्थकांच्या मनात नेमके काय चालते त्याचा विचारच करायचा नाही का? जेव्हा मोठ्या प्रमाणात कुठलीही दादागिरी न करता असे लोक निवडून येतात, तेव्हा त्यांना मत देणार्‍यांची भूमिका समजून घेण्याची गरज आहे, असेच मला वाटते. मी अनेक वर्षे अशा उमेदवारांना लोकांचा पाठींबा का मिळतो त्याचा बारकाईने अभ्यासही करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून काही गोष्टी उघड होऊ शकतात. ज्याला आमचे पत्रकार व माध्यमे गुंडगिरी म्हणतात, तो तिथल्या स्थानिक लोकांसाठी किरकोळ स्वरूपाचा न्याय असतो. जो न्याय त्या सामान्य नागरिकाला परस्पर शासकिय यंत्रणेकडून मिळायला हवा, तोच मिळत नसेल व अशा बाहुबलीकडून मिळत असेल; तर मग तेवढ्या परिसरासाठी तोच गुंड बाहुबली त्या स्थानिकांसाठी राजा बनत असतो. तुमच्या आमच्या बौद्धिक लोकशाहीपेक्षा त्या लोकांना असा ‘भाई’ न्याय देणारा राजा किंवा सरकार वाटू लागते. त्यामुळेच त्यांना लोकशाही व कायद्याच्या राज्यापेक्षा त्या भाईचा त्या परिसरातला वरचष्मा हेच कायद्याचे राज्य वाटत असते आणि त्यावरच मतदानातून लोक शिक्कामोर्तब करत असतात. त्यांची मते मिळवायला त्या भाईला दहशत वगैरे माजवण्याची गरजच नसते. तो कायद्याच्या भाषेत गुंड गुन्हेगार असतो. पण व्यवहारी भाषेत तोच त्यांच्यासाठी न्यायदाता असतो.

   इथे एक किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो. सतरा अठरा वर्षापुर्वी अशाच दिवसात दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाची टंचाई बाजारात निर्माण झाली होती. धारा तेलाच्या डब्यांची साठेबाजी करून काळाबाजार चालू होता. तेव्हा शिवसेनेचा विभागप्रमुख शिशीर शिंदे याने मुलूंड भांडूप भागातल्या गोदामांवर धाड घातली आणि त्यातला साठा रस्त्यावर आणला. त्याचे रांगा लावून रितसर वितरण केले. योग्य किंमतीत विक्री केली. जमा झालेले विक्रीचे पैसे उत्पादक कंपनीकडे जमा केले. तर त्याच्यावर घरफ़ोडी व दरोड्याचे आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला. खरे तर त्याने जे काम केले ते पोलिसांचे व नागरी पुरवठा विभागाचे म्हणजे शासनाचे काम होते. सणासुदीला कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणे; हा गंभीर गुन्हा होता. त्यावर सरकारने कारवाई केली नाही. पण तशी कारवाई केली म्हणुन कायदा हाती घेणार्‍याला मात्र कायद्याने गुन्हेगार ठरवले. आता तिकडे दिल्ली वा पाटणा, चेन्नईचा पत्रकार आपल्या केबिनमध्ये बसून काय सांगणार? शिशीर शिंदे नावाचा गुन्हेगार शिवसेनेतून वा मनसेमधून आमदार झाला. पण त्या स्थानिक भागात शिवसेना सोडून गेलेल्या शिशीर शिंदेचा दबदबा कशाला आहे? जिथे त्याला शिवसेनेने कधी उमेदवारी दिली नाही, तिथे मनसेचा उमेदवार म्हणून तो निवडून येतो, कारण धारा तेलासारख्या विषयांची पुण्याई त्याच्या खात्यात जमा असते. त्यातून त्याला मते मिळत असतात. त्याला आम्ही पत्रकार कलंकित वा दागी म्हणतो. जिथे दहशतीने कामे कोणी करून देतो, म्हणून लोकप्रिय होतो त्याला आम्ही बाहुबली म्हणतो. पण प्रत्यक्षात त्यांनी तिथे आपापले राज्य किंवा साम्राज्य प्रस्थापित केलेले असते. त्यांच्या धाक वा दहशतीमुळे परिसरातल्या लोकांना काही प्रमाणात जीवनातील सुरक्षितता व स्थैर्य प्राप्त झालेले असते. लोक म्हणूनच त्याना प्रतिसाद देत असतात. याचा आणखी एक नमुना सांगण्यासारखा आहे.

   सातार्‍याच्या माण तालुक्यात महिमानगड नावाच्या खेड्यात माझे बराच काळ वास्तव्य असते. किसन वीर धडांबे हा तिथला माझा सर्वात जुना मित्र. आज तो हयात नाही. तसा तो कॉग्रेसच्या बाजूने मत देणारा. पण मुंबईचा विषय आला; मग तो शिवसेनेचे समर्थन करायचा. मी एकदा त्याच्या या विरोधाभासाचे स्पष्टीकरण मागितले; तेव्हा तो सोप्या गावठी भाषेत उत्तरला, ‘मुंबईत ठाकर्‍याच पायजे’. मुंबईत आमची पोरे असतात आणि तिथे बिगर मराठी लोकांची दादागिरी चालू द्यायची नसेल तर शिवसेनेचे वर्चस्व राहिलेच पाहिजे, असे त्याचे मत का होते? तो शिवसेनेच्या राजकीय भूमिकेचा समर्थक नव्हता. पण मुंबईत कायद्याच्या मार्गाने मराठी माणसाला न्याय मिळू शकत नाही. म्हणून तिथे कॉग्रेस कामाची नाही, असे त्याचे ‘अभ्यासपुर्ण’ मत होते. असेच वेगवेगळ्या भागातले दिसते. जो न्याय वा संरक्षण कायद्याच्या मदतीने मिळू शकत नाही किंवा जिथे कायदा अन्यायच करतो, तिथे कायद्याला झुगारून न्याय देणारा लोकांना आवडू लागतो. त्यांना कायद्याच्या शब्दांशी वा अर्थाशी कर्तव्य नसते, तर त्यांच्या जीवनाला भेड्सावणार्‍या समस्येच्या सुटकेशी कर्तव्य असते. आणि त्या समस्या मोठ्या जटील वा गुंतागुंतीच्या अजिबात नसतात, तर नुसतीच अडवणूक असते. कायद्याला कानफ़टीत आवाज काढून जागे केल्यावर त्या समस्या सुटू शकतात. तेवढेच काम ही मंडळी ताकद वापरून करू शकतात. आणि जेव्हा त्यातून त्यांची दहशत निर्माण होते; तेव्हा कायद्याचा धाक त्यांच्यावर चालत नाही. एकीकडे गरीबांच्या सदिच्छा व दुसरीकडे ताकदीचा धाक; या साधनसामुग्रीवर त्यांचे राज्य बिनबोभाट चालत असते. आज देशाच्या कानाकोपर्‍यात अशा बाहुबलींचे राज्य उभे राहिले आहे. ती कायद्याचे राज्य खिळखिळे झाल्याची साक्ष आहे. दोनशे वर्षापुर्वी नेमकी अशीच स्थिती हिंदुस्तान नावाच्या खंडप्राय देशाची नव्हती काय? स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या संस्थानांचे सक्तीने विलिनीकरण करण्यात आल्याचे आपण वाचतो, त्यांची संख्या बघा आणि त्याची तुलना आजच्या बाहुबलींच्या संख्येशी करा. मग आज अराजक आहे म्हणजे काय त्याचा अंदाज येईल. ब्रिटिशांनी एकछत्री सता निर्माण केली, म्हणजे काय ते कळेल आणि आज कुठे गडबड झाली आहे, त्याचाही अंदाज येऊ शकेल. याच संदर्भात शिवसेनेचा प्रभाव मुंबईत का वाढला त्याचे किसनवीर प्रस्तुत विश्लेषणही समजून घेण्यासारखे आहे.   ( क्रमश:)
भाग   ( ९ )    ३/११/१२

1 टिप्पणी:

  1. राष्ट्र वादी हा पक्षही याच प्रकारे बनलेला आहे , ज्या त्या भागातील वजनदार नेत्यांनी एकत्र येवून शरद पवारचे नेतृत्व मान्य केले आहे .

    प्रत्युत्तर द्याहटवा