शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

राजू शेट्टीविषयी शरद पवार असे का बोलले?
   दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याचा जो सार्वत्रिक प्रकार चालतो त्याबद्दल मी लिहिलेच. त्याचा मानवी झुंडीशी काय संबंध असे काही वाचकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण वास्तव असे आहे, की झुंडी नेहमी समान विचार करतात व सामुहिक विचार करतात, त्याचेच ते प्रतिक आहे. एका ठरलेल्या दिवशी किंवा कालखंडात एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या, तर का द्यायच्या याचा झुंडी चौकस होऊन विचार करत नाहीत. कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली रित वा परंपरा म्हणून त्यांचे पालन होत असते. कितीही निरर्थक वाटले तरी त्याचे आपण सहजगत्या अनुकरण करीत असतो, हेच मला त्यातून सूचवायचे होते. पण असे अनुकरण निव्वळ शुभेच्छा देण्यापुरतेच मर्यादित नसते. राग द्वेष किंवा तिटकारा दाखवण्यातही झुंडी तशाच वागत असतात. त्यात सहभागी झालेल्यांना आपण कुणाला का शुभेच्छा देतो याची जाणीव नसते, तशीच कुणाचा द्वेष व तिटकारा का करतोय याचेही भान नसते. मग त्याचे कर्तव्य भावनेने अनुकरण होत असते. उदाहरणार्थ परवाच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने फ़ेसबुकवर जे संदेश दिले वा वाटले जात होते, त्यात जशा शुभेच्छा होत्या तसेच द्वेष वा हेव्यादाव्यांचेही संदेश सगळीकडे फ़िरत होते. तेवढ्याच उद्देशाने अनेकजण दोन्हीकडले अनुकरण करताना दिसत होते. दिवाळीच्या शुभेच्छांबद्दल मी लिहिलेच. पण अनेक संदेश बळीराजाच्या निमित्ताने होते. बलीप्रतिपदा ही तिथी बळीला वामनाने तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून पाताळात गाडल्याच्या पुराणकथेशी संबंधीत आहे. मग त्यातला बळीराजा म्हणजे मराठा किंवा त्यातला वामन म्हणजे ब्राह्मण, म्हणून बळीला गाडणार्‍या ब्राह्मणांचा उत्सव साजरा करायचा काय; अशी तक्रार त्या दिवाळी नाकारणार्‍या संदेशात होती. त्या संदेशाचे वाटप करणार्‍या कितीजणांना खरेच त्यातली बळीची कथा ठाऊक असेल याची शंकाच आहे. पण त्यातला वामन ब्राह्मण आहे म्हटल्यावर संदेश पुढे पाठवणे मराठा नावाच्या झुंडीशी निगडीत प्रत्येकाने कर्तव्य म्हणून पार पाडले. त्यातले कितीजण प्रतिपदेचे अभ्यंगस्नान करण्यापासून दूर राहिले असतील त्याची शंकाच आहे. पण त्यांनी तो संदेश मात्र कर्तव्य भावनेने पुढे सरकवला. त्यालाच झुंडीचा सामुहिक विचार म्हणतात. आणि असे केवळ अल्पबुद्धीचे लोकच करतात मानायचे कारण नाही. अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे लोकही धुर्तपणा म्हणुन करत असतात.

   याच दिवाळीच्या दरम्यान ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे दरवाढीचे आंदोलन चालू होते. अर्थात त्यामध्ये इतका विलंब होईल अशी आयोजकांची अपेक्षा नसावी. अन्यथा त्यांनी दिवाळीनंतर हे आंदोलन पुकारले असते. पण ते आधीच सुरू केले आणि सरकारी खाक्यानुसार त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते चिघळत गेले. मग शेतकरी इर्षेला पेटला आणि हातघाईचा प्रसंग ओढवला. तेव्हा केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेताही तिकडे वळला. आजवर त्यांनी मानवी झुंडी खेळवण्याचे यशस्वी राजकारण केलेले होते. पण आज त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला आहे. अनेक झुंडींना शेतकरी वा ग्रामीण जनता म्हणून खेळवलेल्या शरद पवारांना ताज्या आंदोलनाने त्यांच्या मूळ झुंडीत आणून सोडले. पवारांनी आजवर कितीही राष्ट्रीय वा सेक्युलर राजकारणाचा मुखवटा पांघरलेला असला; तरी त्यांच्या राजकारणाचा मूळ गाभा मराठा जातीच्या वर्चस्वाभोवती घुटमळत राहिला आहे. मात्र त्यांनी उघडपणे तसा जातीय चेहरा कधी लोकांना दिसू दिला नाही, की दाखवला नाही. बहूजन, सर्वसमावेशक, ग्रामीण वा कष्टकरी असे विविध मुखवटे लावणार्‍या पवारांचा खरा राजकीय चेहरा कायमच मराठा राजकारणाचाच राहिला. तीच त्यांची स्वत:ची झुंड राहिली. पण आपला तो चेहरा लपवित त्यांनी नेहमी बहुजन मुखवटा लावून अनेक लहान मोठ्या झुंडी सामावून घेतल्या. त्यातून एक बलवान राजकीय झुंड तयार केली. त्या लहानमोठ्या झुंडीच्या म्होरक्यांना किरकोळ लाभ मिळवून देत आपल्या झुंडीला बलवान केले. मात्र तरीही त्यांच्या मूळ झुंडीतल्या अनेकांचे समाधान त्यातून होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे झुंडीत आपण नुसतेच वापरले गेलो, याचे भान मूळच्या मराठा झुंडीतल्या अनेकांना येऊ लागले आहे. सहाजिकच ती झुंड विस्कळीत होत चालली आहे. नवे मराठा नेतृत्व झुंडीच्या रुपाने आकार घेत आहे. त्याच वेळी शेतकरी म्हणून त्याच झुंडीतले अनेकजण जातीची झुंड सोडून व्यवसायाच्या झुंडीत दाखल झाले आहेत. परिणामी पवार यांच्या झुंडीच्या साम्राज्याला खिंडारे पडत चालली आहेत. त्यातूनच त्यांनी धारण केलेल्या मुखवट्य़ाचे भान सुटले आणि एका क्षणी त्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनावर आसूड ओढताना आपला अस्सल मराठा चेहरा उघडा पडू दिला.

   या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाने साखर कारखाने बंद पाडायचा पवित्रा घेतला आहे. जो दर ऊसाला देण्यात आला, तो नाकारताना अधिक दरासाठी चालू असलेल्या आंदोलनाने कारखान्याकडे जाणारा ऊस वाटेत अडवण्याचा लढा पुकारला आणि पवारांचा तोल गेला. एका सभेत बोलताना त्यांनी आंदोलनाचे नेते राजू शेट्टी यांच्या जातीचा उल्लेख करून आंदोलनात जातीवरून फ़ूट पाडण्याचा खुला मार्ग स्विकारला. शेट्टी यांचा मतदारसंघ कुठला? इचलकरंजी व तिथले साखर कारखाने जोरात चालू आहेत. त्या कारखान्याचे भागधारक कोण आहेत? असा सवाल पवार यांनी केला तेव्हा, त्या कारखान्याचे भागधारक नव्हेतर संचालक व म्होरके मराठा नाहीत; असेच पवारांना सुचवायचे होते. किंबहूना मराठा नेत्यांच्या पुढारपणाखाली चालू असलेले साखर कारखाने मराठा नसलेला नेता बंद पाडू बघतो आहे आणि आणि (मराठा असूनही ऊस उत्पादक) शेतकरी त्या बिगर मराठ्याच्या नादाला लागला आहे, असेच पवारांना सुचवायचे होते. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या न्यायाचा वा अन्यायाचा विषय अजिबात चर्चिला नाही. आंदोलनाची कारणे वा त्यातील मागण्या यांचा उहापोह केला नाही. न्याय असो, की अन्याय असो, जातीला महत्व आहे असेच त्यांना सुचवायचे नाही काय? कोल्हापूर वा इचलकरंजीचे साखर कारखाने ऊसाला किती भाव देतात, याचा उल्लेख आला असता तर गोष्ट वेगळी होती. शेट्टी यांच्या मतदारसंघातील कारखाने कमी दर देत असूनही तिथले कारखाने जोरात चालू आहेत आणि त्यात शेट्टी लक्ष घालत नाहीत असा दावा असता, तर गोष्ट वेगळी होती. पण पवार यांच्या भाषणात त्याचा अजिबात उल्लेख नाही. केवळ कारखान्याचे संस्थापक व संचालक-भागधारक यांच्या जातीचा उल्लेख पवार करतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मराठा जातीचे संचालक असतील तर अन्याय सोसूनही कारखाने चालले पाहिजेत, असेच ते सुचवत नाहीत काय? त्यालाच झुंडीची मानसिकता म्हणतात.

   झुंड अशीच विचार करते. मुंग्या असो किंवा पशूपक्षांचा कळप असो, ते पळून जायचे असो किंवा लढून प्रतिकार करायचा असो, सामुहिक विचार करतात. त्यात व्यक्तीगत नफ़्यातोट्य़ाचा विचार नसतो. पवार आपल्या त्या सुचक भाषणातून काय सुचवत होते? तुम्ही सातारा सांगलीचे पुण्याचे शतकरी मराठा जातीचे आहात. जे काही इथले सहकारी साखर कारखाने आहेत ते मराठा नेत्यांनी स्थापन केलेले व चालविलेले आहेत. ते बंद पडले तर तुमचा व्यक्तीगत लाभ होऊ शकेल. पण जातीचे नाक कापले जाईल ना? मग जातीसाठी नुकसान सोसा, हानी सोसा. पण बिगर मराठ्याच्या नादाला लागून आपल्या जातीच्या साखर कारखान्यांचे भवितव्य धोक्यात आणू नका. आणि राजू शेट्टी बघा काय करतो आहे? त्याच्या जातीच्या भागधारक नेत्यांचे कारखाने चालू देतो आहे आणि केवळ मराठा जातीच्या नेत्यांचे कारखाने बंद करायचे आंदोलन चालवतो आहे. पवारांचे आवाहन अत्यंत काळजीपुर्वक समजून घेण्यासारखे आहे. शेतकर्‍याचे, कष्टकर्‍याचे, ऊस उत्पादकाचे वा सहकारी साखर कारखान्याचे हित असा त्यांच्या बोलण्याचा रोख अजिबात नाही. त्यांचा रोख जातीच्या सामुहिक स्वार्थाशी संबंधित आहे. आपण व्यक्तीगत नफ़ातोटा विसरून जातीचे वर्चस्व टिकवले पाहिजे, असेच त्यांचे आवाहन आहे. इतकी वर्षे त्यांनी राज्याच्या सत्तेचा उपभोग घेतला आहे. बहुजनांचे राजकारण म्हणून इतरमागास, दलित-पिछडे यांना सोबत घेऊन काम केले आहे. असा माणूस जेव्हा राजू शेट्टी यांच्या राजकीय चुका न दाखवता, त्याच्या जातीचा उल्लेख करून मराठा जातीला आवाहन करतो, जातीय आवाहन करतो तेव्हा आपल्याला आधुनिक काळातही झुंडीची मानसिकता किती प्रभावी आहे, त्याचाच दाखला देत असतो. किती परस्पर विरोधी नमुने आहेत ना? एक शुभेच्छांचा मुद्दा आहे तार दुसरा द्वेष हेव्याचा मुद्दा आहे. पण दोन्ही मागे झुंडीचाच विचार आहे.      ( क्रमश:)
भाग  ( २२ )   १६/११/१२

२ टिप्पण्या: