सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

मुंबई नव्या तारणहाराचा शोध घेते आहे का?
   काल नेहमीप्रमाणेच एक आणखी दिवस साजरा झाला. कुठे मोठ्या उत्साहाचे तर कुठे नैराश्येचे वातावरण होते. कुठे देखावा होता तर कुठे भावनेचा आवेश वा अगतिकता होती. पण ज्याला मुंबईची नित्यजीवनाची परिस्थिती म्हणतात, त्याचाच अनुभव होता. आपण दु:ख किती लौकर विसरतो, त्याची मलाही काल जाणिव झाली. त्याचे आणखी एक कारण आहे. चार वर्षापुर्वी ज्यांचा मृत्यू झाला वा ज्यांना क्रुरकर्मा कसाबने यमसदनी धाडले, त्यांच्या पुरताच हा विषय नव्हता. कारण त्यांच्या घरात येऊन कोणी गुपचुप त्यांचे हत्याकांड केले नव्हते. अपहरण करून त्यांना कुठे मारून टाकले नव्हते. वाटमारी करताना त्यांचा मृत्यू झाला नव्हता किंवा ते लोक जखमी झाले नव्हते. जो हल्ला झाला तो मुंबई नावाच्या एका महानगरावर झाला होता आणि भारत नावाच्या एका खंडप्राय देशावर तो हल्ला झाला होता. पण चार वर्षे त्यातल्या एका आरोपीला फ़ासावर लटकवतांनाही आपल्या देशातील कायदा प्रशासनाची जी तारांबळ उडालेली होती, ती पाहून लोकांचा धीर सुटला तर नवल नाही. अशाप्रसंगी आपण काय करावे हे सामान्य माणसाला कळत नाही, कारण सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी आहे. पण ती सुद्धा हाताळू न शकणार्‍या सरकारची व त्याच्या कायद्याची; सापडलेल्या खुन्याला शिक्षा द्यायलाही इतकी दमछाक होत असेल तर तुमचीआमची काय कथा? आपण हतबल व अगतिकच होऊन जाणार ना? मग असे वार्षिक समारंभ देखावा असतात, हे मन सांगत असते, पण उघड बोलायचीही हिंमत आपल्यात उरलेली नसते. त्याच अगतिकतेची छाया २६/११ च्या सोहळ्यावर पडलेली होती. इतर डझनभर कार्यक्रमापैकी एक अशीच त्यात वावरणार्‍या शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांसह, कार्यकर्त्यांची मनोवृत्ती लपत नव्हती. कारण त्यात कुठेही सहवेदना किंवा सहानुभूतीचा लवलेश नव्हता. सगळीकडे औपचारितता स्पष्टपणे जाणवत होती. काय होती ती औपचारिकता?

   पुढला असा काही प्रसंग येईपर्यंत साजरा करायचा आणखी एक दिवस वा तारिख; यापेक्षा आता २६/११ या तारखेला काही अर्थ उरलेला नाही. आठदहा महिन्यांपुर्वी ‘कोलावरी’ नावाच्या एका गाण्याचे कौतुक सगळीकडे चाललेले आठवते आपल्याला? आज कोणाच्या तोंडी ते गाणे नाही. त्याच्या जागी थोड्याच दिवसात दुसरे गाणे आले होते. मग तिसरे, चौथे, पाचवे असे होत नव्या गाण्याच्या लोकप्रियतेखाली आधीचे गाणे गाडले जाते, तसे आपल्या दु:ख वेदनांचे व सामुहिक जखमांचे झालेले आहे. आधीच्या जखमा भरून येण्यापुर्वीच नव्या अधिक भयंकर जखमा आपल्याला अगोदरच्या वेदनेवरचा उपाय देत असतात. १९९३ च्या स्फ़ोटाच्या जखमा व वेदनांची आज कोणा मुंबईकराला आठवणसुद्धा राहिलेली नाही. त्यांचे कौतुक जुलै २००६ च्या स्फ़ोटमालिकेपर्यंत चालले आणि आता २६/११ ने त्याचीही आठवण क्षीण होऊन गेली आहे. कसाबला फ़ाशी चढवले म्हणून आपण पेढे वाटले, खाल्ले व खुश झालो. मात्र जुलै २००६ च्या स्फ़ोटाचा खटला अजून निकाली लागलेला नाही, याचे आपल्याला स्मरणही उरलेले नाही. इतके भयंकर बधीरपण आपल्यामध्ये आलेले आहे. त्याचेही कारण असते. दारुडा किंवा नशाबाज असतो ना? त्याला अंगावरच्या जखमा किंवा रक्रबंबाळ शरीराचे भानच नसते. नशेमध्ये धुंद असलेल्या त्या माणसाला वेदना जाणवतच नाहीत. आपण त्याच्या जखमा बघून विव्हळतो, पण तो बेफ़िकीर असतो. त्या जखमांच्या वेदना त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नसतात. आपलेही आता हळुहळू तसेच झाले आहे. एक समाज म्हणून आपल्या जाणीवाच बोथट, बधीर होऊन गेल्या आहेत. सांडलेले रक्त दिसते, झालेल्या जखमा दिसतात, मेलेले मुडदे दिसतात; पण त्याच्या वेदनांची कुठलीही जाणिव आपल्याला होत नाही. समोर घडते वा दिसते, त्याचा कुठलाही बोध आपल्या मेंदूला होत नाही. त्यापासून सावध होण्याची इच्छाच आपल्या मनत उपजत नाही. असे का व्हावे? आपल्याला काय झाले आहे? आपल्या सर्व संवेदना अशा का बोथटल्या आहेत? कोणी असा क्लोरोफ़ॉर्म दिल्याप्रमाणे आपल्या सर्व भावना व संवेदना निष्क्रिय करून टाकल्या आहेत?

   मला खात्री आहे, की अशी अगतिकता अनेकांना मनोमन जाणवली असेल, पण तिचा बोधच होत नसल्याने त्यांचे मन अस्वस्थ झाले असेल. त्याचे कारण सापडत नसल्याने अंगावर पडलेल्या झुरळाप्रमाणे वा तोंडापाशी घोंगावणार्‍या माशीप्रमाणे; हा विचार अनेकांनी झटकून टाकला असेल. पण त्या माशीप्रमाणेच तो विचार पाठ सोडत नसेल. त्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा मनाला अधिकच व्याकुळ करणारी असेल. पण बोलायचे कोणी व सांगायचे कुणाला; अशी आणखी एक पंचाईत असते. कारण समोरचाही त्याच विवंचनेत आहे, याची प्रत्येकाला जाणिव आहे. सत्य असेच असते, ते पाठ सोडत नाही आणि झटकून टाकता येत नाही. आपली ही अगतिकता कुणा कसाबच्या सैतानीने आणलेली नाही किंवा त्याच्या राक्षसी क्रौर्याने आपल्यात भिनलेली नाही. आपल्याला अशा क्रौर्याचा प्रतिकार करायची मोठीच उबळ असते, इच्छाही उचंबळून येते. पण असे बोललो तर लोक काय म्हणतील, अशा भयाने आपल्याला पछाडलेले आहे. आपण अशा धोक्याचे थेट दोन हात करायचा नुसता विचार बोलून दाखवला; तरी आपल्यावरच हिंसाचाराचा आरोप होईल काय; अशा भयाने आपल्यात एक अगतिकता बाणवलेली आहे. त्यापेक्षा निमूटपणे कसाबाला शरण जायचे आणि झालेल्या जखमा चाटायच्या. त्यालाच शौर्य म्हणतात, असे आपल्या मनीमानसी भिनवण्यात आलेले आहे, जे आपल्याला मनोमन पटलेले नाही, पण मनातले सत्य बोलायची मात्र भिती वाटते. हेच त्या अगतिकतेचे स्वरूप आहे. कसाबने गोळ्या घालून आपल्यातले शेदिडशे लोक मारले तरी मनाला लावून न घेता दुसर्‍या दिवशी मुंबईकर कामाला लागला, म्हणजेच मुंबईकर कसा शूर आहे असे जे ढोल पिटले जातात, त्यातून आपल्या विवेकबुद्धीला ही नशा आणलेली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. जखमा चाटण्यातला पुरूषार्थ आपल्याला अंगवळणी पडला आहे किंवा पाडण्यात आलेला आहे. त्यातून एखाद्या क्षणी शुद्ध येते; तेव्हा आपल्याला त्याच्या फ़ोलपणाची जाणिव होते आणि आपणच स्वत:कडे तुच्छतेने बघू लागतो. काल २६/११ च्या दिवशी आपल्याला सतावत होती, ती स्वत:विषयीची तुच्छतेची भावना होती. आपल्यातला नाकर्तेपणा, हतबलता, अगतिकताच त्याचे कारण होती. जी आपल्याला जगापासून तोंड लपवायला सांगत होती.

   सव्वा कोटी लोकसंख्येच्या या महानगरात दहा लोक बंदुका व हातगोळे घेऊन येतात आणि इतक्या प्रचंड लोकसंख्येला कित्येक तास ओलिस ठेवतात, तेव्हा ते नुसती माणसे मारत नसतात, तर तुम्ही नुसत्या जीव मुठीत धरून पळणार्‍या जनावरांच्या झूंडी व कळप आहात, आणि आम्ही शिकारी आहोत, असेच आपल्याला सांगत असतात. ज्याप्रमाणे जो वागतो, त्याप्रमाणे त्याचे शब्द अर्थपूर्ण होत असतात. आपण ज्या कारणास्तव आलो, ती मोहीम यशस्वी ठरवण्यासाठी त्या नऊ जिहादींनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. अगदी कसाबही बिनदिक्कत फ़ासावर गेला. पण जगण्यासाठीच या मुंबईत येणारे व वास्तव्य करणारे, त्याच जीवनासाठी काय पणाला लावायला सिद्ध आहेत? कुठलीच गोष्ट त्या मुंबईकराला पणास लावायची नाही. आपण या लढाईत उतरू शकत नाही किंवा आपल्यात तेवढी हिंमत नाही, हीच भावना त्या अगतिकतेचे खरे कारण आहे. त्यांनी धमक्या द्यायच्या, हल्ले करायचे, मनसोक्त कत्तल करायची आणि आपण नुसत्या प्रतिकाराचीही हिंमत दाखवू शकत नाही, असे त्या अगतिकतेचे स्वरूप आहे. मग आम्हाला त्यातून वाचवणार कोण? कोण आहे आमचा तारणहार? जिहादी हल्ले, स्फ़ोट, घातपात आणि त्यांच्यासमोर अगतिक व हतबल असलेला कायदा व सरकार; यांनी मुंबईकरच नव्हेतर एकूणच भारतीय समाजामध्ये ही अगतिकता आलेली आहे. त्यामुळेच मग कोणीतरी आपला तारणहार असावा अशी प्रतिक्षा हा समाज, म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या करीत असते.

   मी कुठल्या लोकसंख्येबद्दल वा समाजाबद्दल बोलतोय, तुमच्या लक्षात आले का? हे रहस्य असेल तर ते एकट्या भाऊ तोरसेकरला कुठून कळले, असाही प्रश्न डोक्यात आला की नाही? की भाऊने मतचाचणी घेतली, फ़ेसबुक वा ट्विटर, इंटरनेटच्या माध्यमातून लोकमत आजमावले? कुठून लोकसंख्येला अशा कुणा तारणहाराचा शोध आहे, असा जावईशोध मी लावला, असा प्रश्न मनात आला की नाही? मित्रांनो, मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा जरा भयगंडाच्या धुंदीतून बाहेर येऊन समोर दिसणारे सत्य बघा. उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. कसाब फ़ासावर लटकण्याच्या तीन दिवसआधी तेच उत्तर कित्येक तास मुंबईचे रस्ते व्यापून तुम्हाला साक्षात्कार घडवत होते.  बुधवारी कसाबला फ़ाशी झाली आणि रविवारी मातोश्री ते शिवाजीपार्कपर्यंत लक्षावधीचा जनसागर कशासाठी लोटला होता? कोणासाठी लोटला होता? बाळासाहेबांना श्रद्धांजली द्यायला? अजिबात नाही. तो अफ़ाट जनसमूदाय आता बाळासाहेब गेल्यावर यापुढे आपला, मुंबईचा तारणहार कोण याचाच व्याकुळ नजरेने शोध घेत होता.     ( क्रमश:)
भाग   ( ८ )    २७/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा