चार वर्षे झाली म्हणून आज आपण एक दिवस साजरा करणार आहोत. कशाला चार वर्षे झाली? आपल्याच किळसवाण्या कत्तलीला आज चार वर्षे पुर्ण झाली. आणि ज्या वेळी हे हत्याकांड चालू होते, तेव्हा आपण सगळे कुठेतरी सुरक्षित आडोसा शोधून लपलो होतो. आपल्यातले अनकेजण धाडस करून्न रस्त्यावर होते. काही अनवधानाने कसाब टोळीच्या तडाख्यात सापडले, त्यांना सोडून देऊ. आणि ज्यांनी धोका समोर दिसत असतानाही पुढे त्याच्याशी सामना करण्याची हिंमत दाखवली; त्या शहिद व जखमींची गोष्ट बाजूला राहू द्या. उरलेल्यांचे काय? ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, त्यात पोलिस, कमांडो होते; तसेच अगदी ताज ओबेरॉयमधले काही कर्मचारी सुद्धा होते. काही तर तुमच्या आमच्यातले सामान्य नागरिक सुद्धा होते. असे धाडस करणार्यांची गोष्ट वेगळी आहे. कारण ते अपघाताने त्या हल्ल्यात बळी पडले. कसाब किंवा त्याचे साथीदार त्यांना मारायला आलेलेच नव्हते. किंबहूना ती टोळी कोणाला जीवे मारायला आलेलीच नव्हती. ते एकाला मारून लाखभर लोकांच्या मनात धडकी भरवायला आलेली होती. आणि आज कसाब फ़ासावर लटकलेला असला; तरी त्याच्या मोहिमेत तो यशस्वी नक्कीच झाला आहे. त्याबद्दल त्याच्या सुत्रधार व प्रेरणाशक्ती असलेल्या सईद हफ़ीझने त्याला विशेष नमाज पढून पाकिस्तानात श्रद्धांजलीसुद्धा वाहिलेली आहे. आपले काय? कसाबच्या फ़ाशीनंतर टाळ्या वाजवणारे आपण किती खरे आहोत? जे मेले किंवा मारले गेले, त्यांच्यासाठी आपण काय केले? आपण कोणता लढाऊ बाणा दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती? घटनेला आठवडा उलटल्यावर त्याच गेटवेपाशी, ताज हॉटेलपाशी जे मेणबत्त्या पेटवण्याचे नाटक व रिआलिटी शो रंगवण्यात आला; त्यात आपण मोठ्या उत्साहात सहभागी झालो होतो. दहशतवादाच्या विरोधात केवढा मोठा आवाज उठवला ना आपण? कधी उठवला? सर्व काही शांत झाल्यावर. मग मुंबईभर शहिद झालेल्यांचे मोठमोठे फ़लक झळकले. पण जेव्हा प्रत्यक्ष हत्याकांड चालू होते व रक्तपात चालू होता, तेव्हा आपण कुठे होतो? आपापल्या सुरक्षित बिळामध्ये दडी मारून बसलो होतो. आपल्यासाठी जे कोणी लढत असतात, व लढत होते, त्यांना तसेच एकाकी सोडून आपण पळ काढला होता. मुठभरच असे होते जे पोलिस वा कमांडो नव्हते, पण रस्त्यावर होते आणि त्या लढाईत नागरिक म्हणुन कर्तव्य बजावल्यासारखे पोलिसांना मदत करत होते. कोण होते हे लोक?
ज्यांना आपण नेहमीच्या कालखंडात हुल्लडबाज किंवा टपोरी म्हणून हिणवत असतो ना, तेच लोक तेव्हा रस्त्यावर होते. वर्गण्या काढून उत्सव करणारे, कुठे अनुचित प्रकार घडला, मग दंगल करायला सरसावणारे असतात ना, असेच भणंग किंवा उनाड-उद्धट लोक तेव्हाही रस्त्यावर होते आणि जमेल तशी पोलिसांना मदत करत होते. कोणी रस्त्याची नाकाबंदी करण्यात पोलिसांना हातगाड्य़ा आडव्या टाकायला मदत केली असेल, तर कोणी मिळेल ते रस्त्यावर उपलब्ध सामान नाकाबंदीसाठी गोळा करून दिले असेल. त्या धावपळीत त्यातलाही कोणी कसाबच्या साथीदाराचा बळी होऊ शकला असता. पण जीवाची पर्वाही न करता असे टपोरी रस्त्यावर होते. त्यांच्यात ही हिंमत कुठून आली होती? त्यांना कोणी प्रशिक्षण तर दिलेले नव्हते, की जिहादी हल्लेखोरांशी लढाई करायला मदतीला त्यांना पोलिसांनी बोलावले नव्हते. तरीही ते नेहमीचे हुल्लडबाज तिथे सरसावून पुढे आले होते. त्यात कोणी बळी गेला किंवा नाही ते मला माहिती नाही. पण असे दोनतीन हजार मुंबईकर नक्कीच आहेत, ज्यांनी त्या रात्री जबाबदारी नसताना, त्या घटनाक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. अर्थात त्यात नवे असे काहीच नाही. मुंबईच कशाला कुठल्याही शहरात अशी खोडकर तरूण, उनाड तरूण मंडळी असते, ज्यांच्याकडे आपण उचापतखोर हुल्लडबाज म्हणून बघत असतो. त्यांच्या मस्तीला गुंडगिरी म्हणून हिणवत असतो. त्या अनुभवातूनच त्यांच्यात त्या रात्री पुढे सरसावण्याची हिंमत आलेली होती. कधी कोणी अशा हुल्लडबाजांचे गेल्या चार वर्षात आभार तरी मानले आहेत काय? आणि हे आजचेच नाही. मागल्या दोन दशकात मुंबईवर अनेक घातपाती व स्फ़ोटाचे हल्ले झाले आहेत. त्यात शेकड्यांनी लोक मेले आहेत; हजारो जखमी झाले आहेत. त्या प्रत्येकवेळी हेच उचापतखोर मदतीला धावून आले आहेत. कधी त्यांनी जखमींना रुग्णालयात धावपळ करून पोहोचवले असेल, कधी तातडीने रक्तदानाची रांग लावली असेल, जखमींना उचलून दिलासा दिलेला असेल. किती पांढरपेशे त्यात पुढे असतात? नेहमी असे संकटमोचन तेच हुल्लडबाज असतात. पण कधी कोणी त्यांचे आभार मानले आहेत काय? उलट जेव्हा त्यांच्या या हिंमतीची आपल्याला गरज नसते; तेव्हा त्यांच्या वागण्याचा त्रास होतो, म्हणून तक्रारी करण्यात आपण पुढे असतो.
गरज संपली मग आमचे शहाणे शांततेची जपमाळ हातात घेऊन आपापल्या सुरक्षित बिळातून बाहेर येतात आणि मेणबत्त्या किंवा गुलाबपुष्प वहाण्याचा तमाशा सुरू करतात. आपण स्वत:ला सुबुद्ध समजणारे मध्यमवर्गिय किंवा पांढरपेशे असल्या तमाशावर बेहद्द खुश असतो. आजही त्यांचाच तमाशा चालू आहे. मुंबईत जागोजागी अशा श्रद्धांजलीचे समारंभ योजलेले दिसतील. तिथे मान्यवर म्हणून पळपुट्यांची हजेरी असेलच. दिसणार नाहीत ते प्रत्यक्ष प्रसंगी ज्यांनी धाडस दाखवले असे ते हुल्लडबाज. आणि आपल्यापैकी कोणाला त्यांच्या कामगिरीचे कौतुकही नाही. त्यांनाही तशी काही अपेक्षा नसते. आपण आपले कर्तव्य बजावाले अशी त्यांची अलिप्त भूमिका असते. मला तसे अनेक लोक माहिती आहेत. म्हणूनच हे लिहावे लागते आहे. ते १९९२ च्या दंगलीत जाळपोळ करायला आघाडीवर होते, तसेच दोन महिन्यांनी झालेल्या बॉम्बस्फ़ोट मालिकेत रक्तदान करायलाही तेच पुढे होते. अगदी कसाब टोळीचा हल्ला झाला तेव्हाही त्यांच्यासारख्यांनीच केलेली धावपळ मला माहित आहे. परिस्थिती त्यांच्या कृतीमध्ये विलक्षण बदल घडवून आणत असते. दंगलीत जाळपोळ हिंसा करणारा राक्षस, स्फ़ोटाच्या प्रसंगात देवदूताप्रमाणे वागतांना मी बघितला आहे. तेव्हा तसा आणि मग असा, तो का वागतो; याचा आपण कधीच विचार करत नाही, की शोधही घेत नाही. त्याची आपल्याला भिती वाटत असते. त्याची म्हणजे त्या हुल्लडबाजांची नव्हे; तर आपल्याच निकम्मेपणाची भिती आपल्याला भेडसावत असते. मग आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी सर्वत्र शांतता स्थापित झाली; मग आपण हिंमत दाखवायचे नाटक करतो. पुष्प वहायला किंवा मेणबत्त्या पेटवायला हजेरी लावतो. त्याचाही समारंभ करतो. ते समारंभ आपला नाकर्तेपणा व भ्याडपणा झाकण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड असते. म्हणून मी म्हणतो आपण बेशरम झालो आहोत.
आपण भयभीत आहोत, आपण दहशतीखाली जगत आहोत, कोणी इथे आपल्यावर बंदूक रोखण्याचीही गरज नाही; इतके आपण आधीच शरण गेलेले आहोत. म्हणून मग कोणी थोडीशी हिंमत केली तरी आपल्याला आपल्या नंपुसकत्वाचे पितळ उघडे पडेल; याची भिती वाटत असते. मग आपण विचारवंताचा आव आणून हिंसेचा निषेध करण्याचे नाटक रंगवतो. कारण हिंसा करण्याची आपल्यात हिंमत नाही, मग हिंसेचा प्रतिकार करायची तरी आपली लायकी कशी असेल? मग आपण गांधीजींच्या पंचाआड लपतो. गांधींनी अहिंसेची शिकवण दिली अशी पळवाट शोधतो. पण तेही अर्धसत्य असते. ज्याच्याकडे हिंसा करण्याची पुर्ण क्षमता आहे आणि तरी तो मनावर ताबा ठेवून हिंसा टाळतो, त्याला अहिंसा म्हणतात, अशी गांधीजींची व्याख्या आहे. मग जे हिंसेला घाबरून दडी मारुन बसतात आणि सर्वत्र शांतता सुखरूप असले मग अहिंसेचे नाटक रंगवतात, ते गांधीवादी कसले? जे हिंसा करायलाही पुढे सरसावतात व प्रसंग बदलला मग जीव पणाला लावून दुसर्याचा जीव वाचवतात, त्यांना निदान अर्धे गांधीवादी म्हणता येईल. उलट प्रसंग ओढवला मग सुरक्षित बिळात लपून बसणारे आणि नंतार अहिंसेची जपमाळ ओढणारे भंपक असतात. तुकाराम ओंबळेने त्या दिवशी आपला जीव पणाला लावून कसाबला जिवंत पकडले, त्याला अस्सल गांधीवादी म्हणता येईल. ज्या हुल्लडबाजांनी त्या दिवशी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर येऊन आपल्याला जमेल तशी पोलिस व प्रशासनाची मदत केली; तेही मोठेच देशभक्त म्हणावे लागतील. बाकीचे आम्ही जे नुसत्याच वल्गना करतो आणि शब्दांचे बुडबुडे उडवतो, त्यांच्यापेक्षा असे हुल्लडबाज समाजासाठी खरे उपयुक्त असतात. कारण कसोटीच्या वेळी ते धावून येतात. आमच्यासारखे शब्दांचे समर्थ पुरूष मुडद्यांची शवचिकित्सा करणारे निकम्मे असतो. मग तो वाहिनीच्या चर्चेतून, वृत्तपत्रातून वा भाषणातून शब्दांचा फ़ेस काढणारा, पण प्रसंगी पळ काढणारा कोणीही असो. आम्ही कमालीचे बेशरम असतो आणि आहोत. शहिदांनो आम्हाला उदार मनाने माफ़ करा, एवढीच आजच्या दिवशी प्रार्थना. ( क्रमश:)
भाग ( ७ ) २६/११/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा