शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

स्विस बॅंकेच्या खात्यातले ‘जनकलियाण सहयोगी’


   याच आठवड्यात अरविंद केजरिवाल यांनी परदेशी बॅंकेमध्ये भारतीयांनी लपवून ठेवलेल्या काळ्यापैशाचा उलगडा केला. त्यातले काही तपशीलही जाहिरपणे सांगितले. कित्येक हजार कोटी रुपये बेकायदा हवाला मार्गे कसे देशाबाहेर नेण्यात आले, त्याचीही माहिती दिली. त्यातच एक कंपनी व तिच्या मालकाचा समावेश होता. रिलायन्स असे कंपनीचे नाव आहे आणि मालकाचे नाव मुकेश अंबानी असे आहे. याच मुकेशची पत्नी रिलायन्स फ़ाऊंडेशन नावाची समाजसेवी संस्था चालवते. त्यासाठी लागणारे करोडो रुपये कोणत्या मार्गाने येत व जात असतात, त्याचाच खुलासा केजरिवाल यांनी केलेला आहे. इथला पैसा परदेशी बॅंकेत का ठेवला जातो? इथल्या बॅंकेत ठेवण्यात काय अडचण आहे? तर इथेच पैसा असेल तर त्यावर करभरणा करावा लागतो. परदेशी चोरट्या मार्गाने पैसा नेला; मग तो इथे हिशोबात नसतो म्हणूनच त्याच्यावरचा कर बुडवता येत असतो. पुन्हा अन्य मार्गाने तो तिथल्या बॅंकेतला पैसा परदेशी गुंतवणूक म्हणून मायदेशी आणता येतो. पण या दरम्यान जी करबुडवेगिरी होते, त्यातून कोणाची फ़सवणूक होत असते? ती फ़सवणूक सामान्य माणसाची होत असते. कारण तो कराचा पैसा सामान्य माणसाच्या कल्याणासाठीच सरकार वसूल करत असते. मग सरकारला जनकल्याण करण्यासाठी जो पैसा हवा त्यात रिलायन्स बुडवेगिरी करणार आणि त्यातून क्षुल्लक रक्कम फ़ाऊंडेशनची मेहरबानी म्हणून आमिर सांगेल त्या संस्थेला दान करणार. केवढे मोठे जनकलिय़ाण झाले ना?  

   जनकल्याण हा आता एक मोठाच धंदा झालेला आहे. काही वर्षापुर्वी जागतिकीकरणाला व मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध कारणार्‍या अनेक समाजसेवी संस्था उदयास आल्या होत्या. त्यांचे मोठमोठे मेळावे आपल्या देशात व्हायचे. त्यात इथल्या अनेक कामगार संघटनाही मोठ्या उत्साहात सहाभागी होत असत. हल्ली ते कुंभमेळे बंद झालेत. पण ते व्हायचे तेव्हा त्यासाठी युरोपमधल्या कामगार संघटनांनी प्रचंड निधी पुरवला होता. त्याचे कारण सरळ होते. युरोपमधल्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन भारतात आणू द्यायचे नाही, म्हणजे तिथल्या रोजगारावर गदा येणार नव्हती. पण इथे रोजगार वाढला असता. त्या युरोपियन कामगारांचे हित संभाळणार्‍या समाजसेवी संस्था इथे जनकल्याण म्हणून परदेशी गुंतवणुकीला व कंपन्यांना विरोध करणारे मेळावे भरवत होत्या. असे व्यावसायिक समाजसेवक आजकाल भरपुर उदयास आलेले आहेत. जगातल्या प्रतिस्पर्धी कंपन्या व उद्योगसमुह त्यांना असे जनकलियाण साधायला आर्थिक मदत सढळ हस्ते करीत असतात. मात्र त्या धंद्यासाठी या समाजसेवी उद्योजकांना आंदोलनात भाग घेणारे कार्यकर्ते व गर्दी नावाचा कच्चा माल आवश्यक असतो. लोकमताचा पाठींबा किंवा जनमानसातील खळवळ; हे त्यांचे उत्पादन असते. जो कोणी असा जनमानसात हंगामा खडा करू शकेल त्यालाच त्यातला धंदा करता येत असतो. आमिरने तो यशस्वीरित्या करून दाखवला. ती व्यावसायिकता वर्षा देशपांडेकडे नसते म्हणुन तिचे कामही कोणाला दिसत नसते. कित्येक वर्षे स्त्रीभृणहत्येच्या विरोधात लढून देखिल तिचे नाव कोणाला ठाऊक सुद्धा नाही. पण प्रचंड जाहिरातबाजी करून हंगामा खडा करणार्‍या आमिरला स्त्रीभृणहत्येच्य विरोधातला मसिहा होणे शक्य झाले, याचे कारणही समजून घेतले पाहिजे.

   वर्षा देशपांडे यांना प्रसिद्धी वा श्रेय नको असते; तर त्यांना खरोखरच स्त्रीभृणहत्येच्या पापातून समाज मुक्त करायचा असतो. म्हणूनच ती महिला एकाकी लढते आहे. तेव्हा गाजलेल्या बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणाची आता कोणी बातमीसुद्धा देत नाही. आमिरचा हंगामा चालू होता; तेव्हा डॉ. मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर माध्यमांचे बारीक लक्ष होते. पण आज त्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार्‍या वर्षा देशपांडेच्या चार ओळीतरी कोणी छापतो आहे काय? त्याच प्रकरणात डॉ. मुंडेंच्या सहकारी पत्नीला जामीन मिळाला आहे आणि त्याला सरकारचा ढिलेपणा कारणीभूत आहे. त्याच्या विरोधात वर्षाताई एकाकी झुंज देत आहेत. पण तिची दादफ़िर्याद कोणी घेतो आहे काय? आमिरला तर त्याचा पत्ताही नसेल. ज्यांनी त्याच्या हाकेला दाद देताना लाखो एसएमएस पाठवले त्यापैकी कितीजणांना आता सुदाम मुंडे प्रकरणी काय झाले; त्याची माहिती आहे किंवा त्यात इंटरेस्ट आहे? आमिरने मांडलेले सवाल जिव्हाळ्याचे होते यात शंकाच नाही. पण ते प्रश्न वा समस्या सोडवायच्या कोणी? की फ़क्त त्याबद्दल बोंबाबोंब तेवढीच हवी असते? समस्या सो्डवायचीच नसते का? फ़क्त सोडवल्याचा आभास आपल्याला हवा असतो का? आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला काय हवे असते? समस्येपासून मुक्ती, की नुसता मुक्तीचा आभास? सत्यमेव जयते मालिका छोट्या पडद्यावर झळकण्यापुर्वी केलेल्या जाहिरातीमध्ये आमिर एक वाक्य अगत्याने बोलायचा. नुसता बोलायचा नाही तर त्याच्या उत्तम अभिनयाने भारावूनही टाकायचा. ‘हंगामा खडा करना मेरा मकसद नही, लेकीन सुरत बदलनी चाहिए’. असेच काहीसे ते वाक्य होते ना? मग आज सहा महिने उलटून गेल्यानंतर सत्यमेव जयतेबद्दल काय म्हणता येईल? सुरत म्हणजे समाजाची परिस्थिती किती बदलली आहे? स्त्रीभृणहत्या, मुलांचे लैंगिक शोषण, स्त्रीयांवरचे अत्याचार, औषध व्यवसाय. वैद्यकीय व्यवसाय, भिन्न जातिय विवाह यापैकी काय बदलले आहे? कितीसे बदलले आहे? बदलण्याची कुठली प्रक्रिया सुरू झालेली आहे? निदान त्यावर समाजिक घुसळण तरी सुरू झालेली आहे काय? नसेल तर सत्यमेव जयते मालिकेने नेमके काय साध्य केले? हंगामा जरूर खडा झाला, पण सुरत बदलण्याचे काय? खुद्द आमिरलाही त्याची आठवण राहिलेली नाही ना?

   दोनचार प्रेमविवाहात झालेल्या भयानक गोष्टी आमिरने नाट्यमय रितीने पेश केल्या होत्या. त्यामध्ये प्रेमात पडलेल्यांनाच इजा झाल्याचे किस्से होते. त्यांच्याच कुटुंबापुरते मर्यादित होते. पण हा लेख मी लिहितो आहे, त्यावेळी वृत्तपत्रामध्ये तामीळनाडूच्या नाथम अण्णानगर परिसरात अशाच एका प्रेमविवाहाने दोन वस्त्यांमध्ये भीषण हिंसक दंगल उसळल्याची थरारक बातमी प्रसिद्ध झाली आहे. वणीयार जातीच्या मुलीने दलित मुलाशी विवाह केल्यावर तिच्या पित्याने स्वत:ला जाळून घेतले आणि त्यामुळे खवळलेल्या त्याच्या जातबांधवांनी दलित वस्तीवर हल्ला चढवून घरेदारे भस्मसात केल्याची ती बातमी आहे. आमिरने कथन केलेल्या प्रेमविवाहातील अनुभवापेक्षा परिस्थिती अधिकच बिघडल्याचे हे वृत्त आहे. मग सुरत बदलण्याचे काय झाले? की सुरत होती त्यापेक्षा अधिक विद्रुप करायची होती? की नुसताच हंगामा खडा करायचा होता? जिथे काही भयंकर घडते अशीच बातमी झळकत असते. बाकी किरकोळ घटना लोकांसमोर येतच नाहीत. मग हरयाणामध्ये तर रोजच्या रोज अल्पवयिन मुलींवरचे बलात्कार सुरत बदलल्याचे लक्षण मानायचे काय? एकटा आमिर त्यासाठी काय करणार? त्याने निदान लोकांसमोर विषय व समस्या आणल्या हे खरेच. पण तेवढेच त्याला करायचे होते काय? मग ते काम वाहिन्या व वृत्तपत्रे रोजच करतात. आमिरने थोड्या अधिक आकर्षक स्वरुपात केले असेल. मग त्याचा इतका गवगवा कशाला चालला होता?

   बारकाईने बघितले तर ज्या अभिनिवेशात राहुल गांधी देशाच्या समस्या व प्रश्नांवर जाणकार असल्यासारखे बोलतात, त्यापेक्षा आमिरची ‘भूमिका’ वेगळी नव्हती. राहुल जे आपले ज्ञान म्हणुन दाखवतो; तेच आमिरने पाहुण्यांकडुन वदवून घेतले. आपण सगळे खुश होतो. चला प्रश्नाला वाचा फ़ुटली आहे. सवाल चव्हाट्य़ावर आला आहे. हंगामा झाला आहे. पण पुढे काय? पुढे काहीच होत नसते. पुढे काहीच करायचे नसते. लोकांना आपल्या जखमेवर फ़ुंकर घातली जाते आहे; याचे समाधान जखमेवर उपचार होण्यापेक्षा मोठे वाटत असते. आपल्या घरात एकमेकांच्या उरावर बसणारे सख्खे भाऊ राज व उद्धव एकत्र येतील काय, याची मराथी हितासाठी चिंता करतच असतात ना? समाज किंवा माणसांचे कळप असाच विचार करतात. जीवनाला भेडसावणार्‍या समस्यांपासून पळ काढण्याचा तो उत्तम मार्ग असतो. आपली निराशा, अपयश, उपेक्षा वा हतबलता लपवायला असा कोणी मसिहा लोकांना व जनसमुहाला हवाच असतो. कधी तो आमिर होऊन सत्यमेव जयतेच्या रुपाने अवतरतो; तर कधी गीता, कुराण वा बायबलच्या प्रवचनाच्या मार्गाने आपल्या समोर येत असतो. आपण मग त्याचे जनकलियाण सहयोगी होऊन त्यात स्वत:ला मिसळून टाकतो.      ( क्रमश:)
भाग  ( १७ )   ११/११/१२

1 टिप्पणी:

  1. आम्हाला झळ सोसून काही करायचे नसते पण 'काहीतरी केल्याचे समाधान' मात्र हवे असते. आमिर आणि सत्यमेव जयते कार्यक्रमाने ही सामूहिक गरज तात्पुरती पुरवली - इतकंच!!

    उत्तर द्याहटवा