बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

माणसांच्या झुंडी विचार तरी कसा करतात?


माणुस झुंडीसारखा वागतो आणि जगतो हे माझे विधान लोकांना आवडणारे नाही. विशेषत: सुशिक्षित व लिहिणार्‍या, वाचणार्‍यांना ते अजिबात पटणारे नाही. कारण आपण सुशिक्षित आहोत, म्हणुन आपण विचार करतो अशी आपली एक समजूत असते. पण प्रत्यक्षात आपण मानवी समाजही अन्य प्राण्यांप्रमाणेच कळपाने जगत असतो आणि तसाच विचार करत असतो. कारण प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी जी धडपड करावी लागते, त्यातून आपलीही सुटका नाही. मग आपण तरी त्या धडपडीत अन्य पाण्यांपेक्षा वेगळे कसे वागणार? आपण एकेकटे असताना स्वतंत्र विचार करतो, पण जेव्हा आपण झुंड म्हणजे जमावात असतो, तेव्हा आपणही कळपाप्रमाणेच विचार करतो आणि कळपासारखेच वागत असतो. त्यातून सामान्य सुशिक्षित साक्षर सोडाच, अगदी स्वत:ला बुद्धीमंत म्हणवून घेणार्‍यांचीही सुटका नसते. आफ़्रीकेतल्या एखाद्या अत्यंत मागास वा अफ़गाणिस्तानातल्या टोळीवाल्यांसारखीच अमेरिकेसारख्या पुढारलेल्या प्रगत देशातल्या जमावाची अवस्था असते. नागरी आधुनिक समाज ही भ्रामक साजूत आहे. जोवर मानवी जमाव सोशिक असतो वा सोसू शकतो, तोपर्यंतच त्याचे वागणे सुसंस्कृत वगैरे असते. जिथे त्याच्या सहनशीलतेचा अंत होतो; तिथे त्याचे वागणे पशूवत होत असते. आणि हा कळप कसा विचार करतो व त्याच्यात एकमत कसे होते, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. कारण अत्यंत बुद्धीमान लोकांनाही त्याचे रहस्य अजून उलगडलेले नाही.

   प्रत्येक माणुस विचार करतो आणि विचारानेच निर्णय घेतो, असे गृहीत आहे. पण हे व्यक्तीगत बाबतीत खरे असले तरी सामुहिक बाबतीत खरे नाही. जेव्हा माणुस समुहात असतो किंवा सामुहिक निर्णय घ्यायचा असतो; तेव्हा त्याला विचार नको तर उत्तरे हवी असतात आणि सोपी उत्तरे हवी असतात. खरे तर त्याला उत्तरे म्हणणेही चुकीचे आहे. कारण माणसाला समस्येचे उत्तर वा विश्लेषण वगैरे नको असते. त्याला सोपा उपाय हवा असतो. आणि जो कोणी असा सोपा उपाय द्यायला पुढे सरसावतो; त्याचा विचार हाच मग त्या समुहाचा विचार असतो. तीन महिन्यांपुर्वी मुंबईच्या आझाद मैदान परिसरात जो हिंसाचार झाला; त्याने आसाम किंवा म्यानमारच्या मुस्लिमांना झालेल्या जखमा भरून येणार नव्हत्या, किंवा तिथला हिंसाचार थांबणार नव्हता. पण ज्याने कोणी तो हिंसाचार सुरू केला, त्याचा तो व्यक्तीगत विचार होता. पण सभोवार जमलेल्या गर्दीला तो क्षणार्धात आपलाच विचार वाटला आणि तो जमाव हिंसक होऊन बेताल वागू लागला. गुजरातच्या दंगलीने गोध्रातील होरपळून मेलेल्यांना जिवदान मिळणार नव्हते. पण ज्याने कोणी प्रत्युत्तर म्हणून पहिली हिंसा आरंभली, त्याचा विचार बाकी लोक स्विकारत गेले आणि वणवा पसरत जावा तशी दंगल गुजरातभर भडकत गेली. त्यामागे कारस्थान होते; असे बोलणे हा शुद्ध मुर्खपणा असतो. मुठभर लोक दंगल हिंसा भडकवू शकतात. पण त्यासाठी स्फ़ोटक मानसिकता पेटण्यासाठी सज्ज असावी लागते. ती सामुहिक मानसिकता विचारी नसते. ती सुचनाप्रवण असते. म्हणजे ती दुसर्‍या कुणाचाही विचार वा निर्णय आपला म्हणून स्विकारून कामाला लागत असते. ती मानसिकता म्हणजे चिकित्सक नसलेला मानवी स्वभाव. त्या स्वभावाला उत्तर नको, तर उपाय हवा असतो आणि सोपा उपाय हवा असतो.

   सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. अमेरिकेपासून भारतातल्या निवडणुकांच्या मतचाचण्या झाल्या. मग त्यातून लोक मतदान कसे करतील, कुणाच्या बाजूला झुकतील याचे अंदाज वर्तवले जात असतात. कधी ते योग्य ठरतात तर कधी ते फ़सतात. याचे एकमेव कारण जमाव किंवा कळप कसा विचार करतो व निर्णयाप्रत येतो; त्याचाच अभ्यासकांना थांगपत्ता नसतो. अमेरिकेत ही मतचाचण्यांची पद्धत प्रथम विकसित झाली. आजपर्यंत अनेक चाचण्या यशस्वी झाल्या व अनेक फ़सल्या आहेत. योगायोगाने खर्‍या ठरल्या असतील. पण त्याला शास्त्रशुद्ध पाया नाही असेच म्हणावे लागते. कारण जमाव कसा विचार करतो, त्याचे ठोकताळे नाहीत. जमाव कधी एकत्र बसून चर्चा करत नाही, की ठराव मांडून कामाला लागत नाही. त्याच्यात कधी एकमत सुद्धा होत नाही, वादविवाद रंगत नाहीत. मग हा जमाव एकदम एका बाजूने कसा झुकतो? त्याचे उत्तर हवेच असेल तर जनावरांचे कळप किंवा पक्षांच्या झुंडी कशा वागतात, त्यातून सापडू शकेल. प्राणी वाट शोधत असतात, थबकलेले असतात. त्यात जो कोणी पुढाकार घेऊन निघेल, त्याच्या मागे कळप धावू लागतो. एकाने झेप घेतली आणि त्याच्या मागे दोनतीन पक्षी उडाले; मग अवघी पक्षांची झुंड आकाशात झेपावते. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, की कळप असतो तो कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून ताटकळत असतो. निर्णय दुसर्‍याने कोणीतरी घ्यावा अशीच त्याची अपेक्षा असते. म्हणजेच त्यातल्या प्रत्येकाला निर्णय घ्यायची इच्छाच नसते. दुसर्‍याने निर्णय घ्यावा आणि आपण त्याने अनुकरण करावे; अशी ती निर्णय प्रक्रिया असते. हीच प्राणिमात्राची जाणिव माणसातही सजग असते. तीच समुह म्हणुन कार्यरत होते.

   सभेत वा प्रचंड गर्दी असते तिथे माणसे कशी वागतात? हजारो लोकांची सभा वा कार्यक्रम चालू असतो, तिथे दोघातिघांनी उठून उंदिर वा साप असे ओरडत पळायला सुरूवात केली; मग कोणीही साप खरेच आहे काय त्याचा शोध घेत नाही. प्रत्येकजण वेगाने सभास्थानापासून पळू लागतो. संकटप्रसंगी असेच आपले अनुभव आहेत की नाही? उलट बाजूने विचार करा. एखाद्या देवस्थान वा तत्सम जागी गेलात, मग आधीचा जे करतो त्याचे अनुकरण मागचा माणुस करत असतो. माझे बालपण मुंबईत लालबागमध्ये गेले. तेव्हा आम्ही ज्याला बाजारातला गणपती म्हणायचे त्या गरमखाड्याच्या सार्वजनिक गणपतीला हल्ली जग लालबागचा राजा म्हणून ओळखते. तो नवसाला पावतो असेही ऐकायला मिळते. ही त्याची ख्याती मागल्या पंधरावीस वर्षातली आहे. मग आधीचा गणपती नवसाला पावत नव्हता काय? कारण समजूत आल्यापासूनच्या सहा दशकात पहिली चाळिस वर्षे मला तो गणपती माहित आहे. पण कधीच तो नवसाला पावतो असे मी पहिल्या चाळिस वर्षात ऐकले नव्हते. मग तो कधीपासून नवसाला पावू लागला? टिव्हीचा व वाहिन्यांचा सुळसुळाट होईपर्यंत त्याची नवसाला पावणारा अशी ख्याती नव्हती. वाहिन्यांनी ती क्याती आज खेडोपाडी पोहोचवली. त्या स्थानापासून पाचशे पावलावर वास्तव्य करून जी गोष्ट माझ्या कानी चाळीस वर्षे आली नाही, ती गेल्या पंधरा वर्षात हजारो मैल जाऊन पोहोचली, त्याला समुहाची मानसिकता म्हणतात. तिथे आधी संजयदत्त आला, मग सलमान खान पोहोचला आणि बघताबघता लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती बनून गेला. नावाजलेल्या लोकांनी त्याला नवसाला पावणे भाग पाडले नाही का?

   याचा अर्थ तो नवसाला पावणारा गणपती नाही, असा माझा अजिबात दावा नाही. ज्यांच्या नवसाला पावला त्यांना मी कुठल्या आधारावर खोटे पाडू शकतो? तो त्यांचा त्यांचा अनुभव आहे. पण ज्यांना तसा अनुभवच आलेला नाही, त्यांनीही दुसर्‍यांचा अनुभव स्विकारणे किती सहजगत्या होऊन जाते ना? लोक असे वागतात, कारण त्यांना विचार करण्याचा, उत्तर शोधण्याचा शिणवटा अजिबात नको असतो. ज्या मार्गाने सलमान वा संजयदत्त यांना मुक्ती मिळाली; त्याच मार्गाने आपल्यालाही मिळणार ही श्रद्धाच त्यांना नवसाला घेऊन जात असते. कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणतात, कोणी त्याला भक्ती म्हणतात. त्याला वास्तवात समुह मानसिकता किंवा झुंडीचे मानसशास्त्र म्हणता येईल. जेवढ्या श्रद्धेने ही मंडळी तिथे जमतात व दिवसदिवस ठाण मांडून त्या राजाचे दर्शन घेतात, त्यांच्या त्या श्रद्धेत एक ताकद असते. कधीकधी तीच ताकद मग विध्वंसाच्या रूपाने प्रगट होते, त्याला आपण दंगल म्हणतो. भक्तीने एकत्र येणार्‍यांना जसे सोपे उत्तर वा उपाय हवा असतो; तसाच  चिडलेल्यांनाही सोपा उपाय हवा असतो. चिकित्सा नको असते, विश्लेषण नको असते. सामुहिक मानसिकता किंवा झुंडीचे मानसशास्त्र असेच काम करते. ज्यांना ते अवगत असते ते मानवी समुहांवर राज्य करतात. त्यासाठी मानवी समुह निर्माण करतात. त्या समुहाला विचार देतात, सत्य त्याच उद्धारकापाशी असल्याची श्रद्धा त्या समुहामध्ये निर्माण करतात. मग तो लोकसमुह स्वत:चे विचार व अनुभव म्हणून आपल्या उद्धारकाच्या नावावर खोटेही बोलू लागतो किंवा धडधडीत खोटेही स्विकारू लागतो. त्या उद्धारकाच्या एका शब्दाखातर जीव ओवाळून टाकायलाही तयार होतो. माणसांच्या झुंडी, जमाव किंवा गर्दी विचार करतात तरी कसा? आहे ना गुंतागुंतीचा प्रश्न?    ( क्रमश:)
भाग   ( १४ )    ८/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा