सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

मी कोणालाच शुभेच्छा देणार नाही   मी शुभेच्छा कोणाला देणार नाही. कधी दिल्या सुद्धा नाहीत. क्वचित तो शब्द वापरला असेल तर तो उपरोधानेच वापरला असेल. आणि उपरोध नसेल तेव्हा अनिच्छेने वापरला असेल. पण ज्याला आजकाल शुभेच्छा म्हणतात, त्या मी कधी कोणाला दिल्याच नाहीत. इथे ज्याचे छायाचित्र अपलोड केले आहे, तो माझा एकेचाळीस वर्षांचा मित्र आज या जगात नाही. त्याला जाऊन वर्ष झाले. चार दशकांच्या प्रदिर्घ मैत्रीत आम्हाला कधी एकमेकांना शुभेच्छा द्याव्या लागल्या नाहीत. कसा कोणजाणे योगायोग असेल, पण आम्ही एकमेकांना शुभेच्छा देण्याचा प्रसंगच आला नाही. तो शब्द आम्हाला कधी वापरावाच लागला नाही. जे काही शक्य असेल ते एकमेकांसाठी केले आणि न सांगता वा न मागता केले. आज फ़ेसबुकपासून एसएमएसपर्यंत अनेक मार्गाने शुभेच्छांचा पाऊस पडत असताना वसंत सोपारकरची प्रकर्षाने आठवण झाली. वर्षभरात त्याच्याकडून कुठली अपडेट नाही. कारण तो आज या जगात नाही. कुठे असेल माहीत नाही. पण जिथे असेल तिथे आनंदात असो, खुशीत राहो आणि त्याच्या मस्त स्वभावानुसार मस्तच असावा, असे मनापासून वाटते. पण त्यातले माझ्या काहीही हातात नाही. फ़क्त तशी इच्छा मनात आहे, पण त्यापैकी काही करणे माझ्या हाती नाही. तेव्हा मला प्रथमच शुभेच्छा शब्दाचा अर्थ जाणवला. जी इच्छा शुभ म्हणजे भल्याची आहे, पण तिच्या पुर्ततेसाठी काहीही करणे आपल्या हाती नसते, तेव्हा ती व्यक्त करणे अपरिहार्य होऊन जाते. त्यापलिकडे आपण काहीच करू शकत नसतो. ती केवळ अगतिकता असते. हतबलता झाकण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड असते. सोपारकरसाठी स्वत: काही करूच शकत नाही ही अगतिकता मला त्या शुभेच्छा शब्दाकडे घेऊन आली. कधी नव्हे ती त्याला शुभेच्छा द्यायची अनिवार भावना झाली. बाकी मी कुणाला शुभेच्छा देणार नाही. माफ़ करा मित्रांनो. जे कोणी मित्र सभोवती आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करणे शक्य आहे, त्यांना शुभेच्छा कशाला देऊ?

   ज्यांनी आपले जगणे-मरणे असह्य करून सोडले आहे, तेच सरकारचे प्रमुख पंतप्रधान, अर्थमंत्री, राष्ट्रपती, सोनिया गांधी, राहूल गांधी आता संपुर्ण भारतिय जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत. कशामध्ये त्यांच्या शुभेच्छा आपल्याला कामी येणार आहेत? त्यांनीच घो्टाळे करायचे, त्यांनीच दरवाढ करायची, त्यांनीच महागाई अशा अनेक मार्गाने आपले आयुष्य नासाडी करून टाकायचे. आपले भले करणे त्यांच्या हाती आहे, तर तेच अधिकार वापरून ते आपल्या जगण्याचा नरकवास करून टाकणार आणि पुन्हा शुभेच्छा देणार. मग त्या शुभेच्छांचा अर्थ तरी काय होतो? नुसताच शाब्दिक उपचार आहे काय? नाही मित्रांनो, त्यांनी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलीय, की आपला एकही दिवस, आठवडा किंवा वर्ष आनंदाचे वा सुखासमाधानाचे जाऊ शकत नाही. म्हणूनच ते अगत्याने आपल्याला शुभेच्छा देतात. कारण त्या अजिबात निरुपयोगी आहेत याची त्यांना खात्री पटलेली आहे. जेव्हा आजच्यापेक्षा जगणे खुपच सुसह्य होते, तेव्हा कोणी कोणाला शुभेच्छा देताना घेताना पाहिल्याचे मला आठवत नाही. अगदी माझ्या बालपणी माझ्याच वाढदिवसाच्याही शुभेच्छा कोणी दिल्याचे आठवत नाही. घरात काही गोडधोड व्हायचे तेवढेच. आणि सणासुदीलाही कोणी कोणाला नजरेस येईल अशा शुभेच्छा दिल्याचे आठवत नाही. जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होते; तेव्हा कधीकुठे या शुभेच्छांचा बोलबाला नव्हता. जेव्हापासून शुभेच्छांची गर्दी आपल्या जीवनात झाली आहे, तेव्हापासून जगण्यातले सुखसमाधान जणू कुठल्याकुठे बेपत्ता होऊन गेले आहे.

   त्या राजकारण्यांचे वा सरकारचे सोडून द्या. आपण तरी काय वेगळे आहोत? आपण जसजसे एकमेकांना कुठलेही निमित्त काढून शुभेच्छा देऊ लागलो तेव्हापासून आपले वागणे बघा कसे क्रुर होऊन गेले आहे. तीनचार दशके मागे गेल्यास कुठला शिक्षक मुलांना शुभेच्छा देत नव्हता, की मुले मास्तरला शुभेच्छा देत नव्हती. पण विद्यार्थी आपल्या उत्तम अभ्यासातून शिकवणार्‍याला समाधान देत होता आणि शिक्षक उत्तम शिकवण्यातून शुभेच्छा जगत होता. समाजाचे सगळेच घटक एकमेकांशी असे वागत होते, की आपल्यामुळे सभोवताली आहेत त्यांच्या जीवनात अडचण येऊ नये; याची प्रत्येकजण खुप काळजी घेत होता. आपण दुसर्‍याच्या जगण्यात आनंद निर्माण करू शकलो नाही तरी बेहत्तर, पण निदान आपल्यामुळे दुसर्‍याच्या जगण्यात संकट वा अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यातूनच जगणे असे सुसह्य व समाधानी व्हायचे, की शुभेच्छांची कुणाला गरजच भासत नव्हती. प्रत्येकाच्या वागण्यातच शुभेच्छा पुरेपुर भरलेल्या असायच्या आणि त्या दुसर्‍यांना अनुभवास येत होत्या. शुभेच्छा ही मानवी जगण्यातली कृती होती आणि ज्याला तिचा अनुभव यायचा, त्याला शब्दांचा आडोसा घ्यावा लागत नव्हता. तोंडाने शुभेच्छा देण्याची कधी गरजच भासत नसे.

   कोपर्‍यावरचा किराणावाला, रेशनवाला. दूधवाला, केशकर्तन करणारा सलूनवाला, बाजारातला भाजीवाला, घरी पत्र-डाक आणून टाकणारा पोस्टमन किंवा परिसराची सफ़ासफ़ाई करणारा, सरकारी कचेरीतला कर्मचारी वा पोलिस ठाण्यातला शिपाई, कोणाचेही नाव घ्या; त्यांच्या वागण्यातूनच वर्षभर शुभेच्छांचा वर्षाव होत असे आणि अनुभवास येत असे. मग पोकळ शब्दांची गरज कुठे होती? ना भेटकार्ड पाठवावे लागत होते, ना भेटवस्तू द्यावी लागत होती. अवघा समाजच कृतीतल्या शुभेच्छांवर सुखीसमाधानी होता. त्या कृतीशील शुभेछा आज हरवल्या आहेत, म्हणून मग आपल्याला एकमेकांना अगत्याने शब्दांच्या शुभेच्छा द्याव्या-घ्याव्या लागत असतात. कारण आपणच समोरच्याचे जगणे असह्य करणार आहोत आणि त्याला नाडणार आहोत; याची समाजातील प्रत्येकाला इतकी खात्री झालेली आहे, की तो शब्दांचा शुभेच्छा देऊन समोरच्याला जणू धमकावतो.

   दुकानदार, विक्रेत्याने भेसळ नसलेला माल दिला, तर शुभेच्छांची गरज उरते का? पोस्टातली पत्रे वेळीच घरोघर गेली किंवा वीजपुरवठ्याच्या बिलात गफ़लत झालीच नाही, तर शुभेच्छांची आवश्यकताच संपून जाते ना? गॅसवाला आपल्या जागी प्रामाणिकपणे काम करीत असेल; त्यापेक्षा आपल्या आयुष्यात कुठला आनंद कमी होणार आहे, आपल्याला शुभेच्छांची गरज भासावी? सरकारी कार्यालये, सरकारी सेवक, राजकारणी वा राज्यकर्ते अशा सर्वांनी आपल्या जागी जे त्यांचे कर्तव्य आहे, तेवढे इमानदारीने पार पाडले; तर आपल्यापैकी कुणाला शुभेच्छांवर, कुणाच्या आशीर्वाद वाकृपेवर अवलंबून रहाण्याचे कारण उरेल काय? जेव्हा अशी सार्वत्रिक इमानदारी व चांगुलपणा समाजात नांदत होता, तेव्हा कोणीच कोणाला शुभेच्छा देत नव्हता. कारण त्यांची गरजच नव्हती. कारण प्रत्येकजण दुसर्‍यासाठी काही करायला उत्सुक होता. आपण जणू दुसर्‍याचे देणे लागतो, अशी सामाजिक धारणा जबाबदारीने जगायला भाग पाडत होती. सह-अनुभूती हे जगण्याचे सुत्र होते आणि शुभेच्छांचा उच्चार होत नव्हता. भोवतालच्या लोकांना समाधानी बघण्याची इच्छाच इतकी प्रभावी होती, की शुभेच्छा देण्याघेण्यापेक्षा साधे जगणेच शुभेच्छा बनून जायचे, भोवतालच्या लोकांना जाणवायचे आणि जगायची उमेद व शक्ती द्यायचे. तेवढीच गोष्ट आज दुर्मिळ होऊन गेली, म्हणून की काय शुभेच्छा द्याव्या-घ्याव्या लागतात.

   मुलाला शिकण्यासाठी आपण सर्व मदत करतो. पण परिक्षेत त्याला काहीही मदत करणे अशक्य असते. तेव्हाच आपण त्याला शुभेच्छा देतो ना? कारण आपल्या हाती काहीच उरलेले नसते. दूरचा प्रवास किंवा एखादी गंभीर शस्त्रक्रिया असेल; तरी आपण शुभेच्छा का देतो, त्यात काहीच करणे आपल्या हाती नसते. तसेच आजचे जीवन झाले आहे. अगदी देशाचे पंतप्रधान व राज्यकर्तेसुद्धा आपल्याला शुभेच्छा देत आहेत, कारण तुमच्या आमच्या समस्या सोडवणे त्यांच्या हाती राहिलेले नाही. शुभेच्छा हा असा उपचार झाला आहे. आपल्याच मित्र, परिचित, आप्तस्वकीय व कुटुंबियांसाठी सुद्धा काहीही न करण्याची जाणिवच आपल्याला शुभेच्छा देण्याचा उपचार करायला भाग पाडते. तो उपचार मला अगतिक व हतबल करणारा वाटतो. म्हणूनच कोणाला शुभेच्छा देण्याची इच्छाच नाही होत. कदाचित ती एकप्रकारच्या अपराधी भावनेची कबुली वाटते, म्हणून असेल. मी कोणालाच शुभेच्छा देत नाही. कोणाला दुखावण्याची इच्छा अजिबात नाही, हीच त्यामागची खरी भा्वना आहे. इतरांसाठी काहीच करणे आता शक्य राहिले नाही, असे मनाला अजून वाटत नाही, म्हणूनच शुभेच्छा देण्यापेक्षा इतरांसाठी काय करता येईल, त्याचा विचार मात्र डोक्यात अजून चालू आहे. तोच मला शुभसंकेत वाटतो. औपचारिक शुभेच्छेपेक्षा हा शुभसंकेत बरा ना?    ( क्रमश:)
भाग  ( १९ )   १३/११/१२

४ टिप्पण्या: