गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

सामान्य माणूस गुलाम व्हायला उत्सुक असतो?


स्वत:ला विचारवंत किंवा बुद्धीमंत समजणारे कधी जमावाच्या विचारपद्धतीकडे गंभीरपणे बघत नाहीत. किंबहूना जमावाच्या विचारपद्धतीचा व मानसिकतेचा विचारच करत नाहीत. म्हणूनच त्यांना लोक असे का वागतात, कसे निर्णय घेतात, त्याचा थांग लागत नाही. विचारपुर्वक विश्लेषण केलेल्या किंवा सारासार अभ्यास केलेल्यांना जे पटत नसते, तसे लोक का वागतात. तसे पाहिले तर ज्या गोष्टी लोकांसमोर असतात, त्याच गोष्टी अभ्यासकांच्याही समोर असतात. मग दोघांच्या निर्णयात वा मिमांसेत फ़रक का पडतो? एक ताजे उदाहरण मी देईन. जर सामान्य लोक वा जमाव कसा विचार करतो त्याची दखल अभ्यासकाने घेतली तर त्यालाही सामान्य माणसाच्या निर्णयशक्तीचे भाकित करणे शक्य असते. गुजरातच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुढल्या महिन्याच्या पुर्वार्धात तिथे मतदान व्हायचे आहे. त्यात कोण जिंकेल वा कोणाकडे लोकांचा कौल आहे, त्याचा अंदाज घेण्यासाठी ‘इंडीया टूडे’ नामक इंग्रजी वृत्तपत्राने मतचाचणी घेतली. त्यांच्याच इंग्रजी वाहिनीवर त्याचे निकाल सांगताना एक चर्चा योजलेली होती. चाचणीतले मुद्दे व त्यावरील लोकमत यावर जमलेले अभ्यासक भाष्य करत होते. त्यामध्ये एम. जे. अकबर या जाणत्या पत्रकाराचा समावेश होता. हा माणुस मला आवडतो. कारण आज वाहिन्यांच्या माध्यमात जे मुठभर विवेकी पत्रकार शिल्लक आहेत, त्यात अकबरचा समावेश होतो. आपली मते बाजूला ठेवून सत्य बघण्याचे धाडस त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच त्या दिवशीच्य चर्चेत त्याचे मत इतर अभ्यासकांपेक्शा वेगळे पण योग्य होते.

   सर्वच मतचाचण्यातून नरेंद्र मोदी पुन्हा गुजरात जिंकणार असेच निष्कर्ष आलेले आहेत. पण या चाचणीमध्ये इतरही प्रश्न विचारून लोकमताचा कल शोधण्यात आला होता. त्यामध्ये मोदी यांच्या दुर्गुणांबद्दल मत घेण्यात आले होते. मोदी उर्मट आहेत. मोदी कायद्याला जुमानत नाहीत. मोदी अन्य पक्ष व नेत्यांना आदराने वागवत नाहीत. अशा प्रश्नांवर लोकमत घेतलेले होते. त्यात ३८ टक्के लोकांनी मोदी उर्मट असल्याचा निर्वाळा दिला होता. या उर्मटपणाला दुर्गुण ठरवूनच मग अन्य अभ्यासकांनी आपले मत नोंदवले. पण अकबर यांनी दुसरी बाजू मांडली. उर्मट माणूस आपल्याला दुर्गुणी वाटतो. पण जो मतदार मत द्यायला जाणार आहे, त्याला तो दुर्गुण वाटतो काय? आजच्या परिस्थितीचा विचार करून लोक मतदान करणार असतील, तर त्यांना उर्मटपणा करणारा नेता हवा आहे, की मनमोहन सिंग यांच्यासारखा दुबळा नेता हवा आहे? आपल्याच मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री किंवा बेताल वागणारे मंत्री वा शेजारी मस्तवाल पाकिस्तान यांच्यासमोर नमते घेणार्‍या पंतप्रधानाच्या तुलनेत मोदी कसा वाटतो? अराजकाला आवर घालण्यासाठी खमक्या नेताच हवा आणि तो उर्मट असेल व कोणाला न जुमानता निर्णय घेऊ शकणरा असेल तर? असे निर्णय घ्यायचे तर उर्मट व उद्दाम नेताच हवा, मनमोहन सिंग यांच्यासारखा नेभळट नको, असेच सामान्य माणसाला वाटत असेल, तर उर्मट, उद्धट वर्तन हा मोदींसाठी दुर्गुण ठरत नाही तर जमेची बाजू होते. असे अकबर यांनी दाखवून दिले. हा फ़रक असतो. चाचणीचे आकडे व तपशील सर्वच अभ्यासकांसमोर समान होते. पण त्याचा अर्थ कोणत्या संदर्भात लावायचा याचे भान एकट्या अकबर यांना होते. सहाजिकच विश्लेषण बदलून जाते.

   उर्मट आहे म्हणून मोदी लोकांना आवडत नसेल असे इतरांना वाटत होते. कारण ते स्वत:च्या मतानुसार विश्लेषण करीत होते. पण अकबर यांनी सामान्य लोक त्याकडे कसे बघतील याचा विचार केला. मग उर्मट असून मोदींना लोक का अधिक मते देणार, त्याचा उलगडा होतो. पाकिस्तानची मस्ती उतरवू शकेल असा माणूस उर्मटच असला पाहिजे, असे सामान्य बुद्धीच्या लोकांना वाटते. आणि मतदान करणारे लोक सामान्य बुद्धीचे असतात. त्यांना परराष्ट्र संबंध किंवा राजकीय डावपेच, अशा गोष्टी कळत नसतात. त्यांना सोपी उत्तरे हवी असतात. दुसरी गोष्ट घ्या. कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आणि त्याचा उल्लेख करून मोदी म्हणतात मला मुलगीच नाही तर जावई कुठून असेल? मग मला असले उद्योग करायची गरजच काय? हे सामान्य माणसासाठी सोपे उत्तर असते. ज्याला नातेगोते वा संसारच नाही, असा नेताच भ्रष्टाचार थांबवू शकतो; अशा सोप्या उत्तराची वाट मोदी अशा विधानातून देत असतात. ते सुचवतात, की नातेगोते यांच्यात फ़सलेला माणुस जनतेसाठी काम करू शकणार नाही, तो आपल्याच कुटुंबाचे कल्याण करण्यात गर्क राहिल. त्यामुळे ज्याला घरकुटुंबाचा गोतावळा नाही; असाच माणुस सत्तेवर बसवला पाहिजे. असा माणूस मी एकटाच आहे व म्हणून मलाच निवडा; असे मोदी कधीच सांगत नाहीत. पण ते असे बोलतात व सुचवतात, की नेता वा पंतप्रधान म्हणुन लोकांच्या मनात त्यांचेच नाव यावे. यालाच मी सोपे उत्तर वा उपाय म्हणतो.

   कुठल्याही यशस्वी नेता किंवा चळवळीकडे बघितले तर तेच दिसेल, त्याने जनसमुदायाच्या समोर सोपी उत्तरे व उपाय मांडले आहेत. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांच्या उपोषणामागे लोक धावले, कारण भ्रष्टाचाराने गांजलेल्या लोकांना त्यावरचा उपाय हवा होता. पण आता त्याबद्दल लोकांना भ्रमनिरास झाला आहे. लोकांची जी गर्दी अण्णांचा मागे अपेक्षेने धावली होती तिला संघटित करण्याचे कोणतेही प्रयास झाले नाहीत. उलट परिस्थिती बंगालमध्ये ममता बानर्जी यांची दिसेल. त्यांनी सिंगुर व नंदीग्राम येथील शेतकर्‍यांच्या उठावामध्ये शिरकाव करून घेतला आणि तशाच अन्यायाला चिडलेल्यांना आवाज दिला. लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली होती, त्यावरचा उपाय म्हणजे दिर्घकाळ बंगालमध्ये स्थीर झालेल्या डाव्या आघाडीची सत्ता उलथून पाडणे, असा सोपा उपाय त्यांनी लोकांसमोर मांडला. लोकांनी तो सहज स्विकारला. डाव्यांची धोरणे कुठे चुकीची आहेत वा बदलली पाहिजेत; त्याचे विश्लेषण ममता लोकांना समजावत बसल्या नाहीत. समस्या कुठलीही असो, उपाय डाव्या आघाडीला उखडून टाकणे इतका सोपा होता. मोदी यांची कहाणी वेगळी नाही. त्यांनी सतत त्यांच्यावर झालेल्या दंगलीच्या आरोपांना अंगावर न घेता, ती गुजरातची बदनामी असल्याचे सांगत स्वत:ला गुजरातची अस्मिता म्हणून पेश केले. विकासाची जी कामे केली त्याचे श्रेय स्वत:ला घेण्यापेक्षा त्यांनी ते गुजराती अस्मितेचे यश सांगत स्वत:लाच गुजरात बनवून टाकले. जनमताची नाडी गवसलेले लोक मोठ्या खुबीने लोकांना कळपात रुपांतरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. जमावाची मानसिकता ओळखून वागत असतात. सामान्य माणसाला जमाव किंवा कळपात रुपांतरीत करून आपल्या विचारांनाच त्या कळपाचे विचार बनवून टाकत असतात.

   असे होऊ शकते आणि आजही होत आहे कारण सर्वसामान्य माणसाला विचारांचा काथ्याकुट करायला आवडत नाही. त्याला निर्णय घ्यायला आवडत नाही. आपल्या वतीने कोणी तरी कठोर निर्णय घेणारा लोकांना हवा असतो. ज्याची भक्ती आपण करावी आणि बदल्यात त्याने कृपावंत होऊन आपला उद्धार करावा; अशी एक सामुदयिक प्रबळ इच्छा असते. जो तिच्यावर स्वार होऊ शकतो, त्यालाच जनतेवर निर्विवाद राज्य करता येते, हुकूमत गाजवता येते. त्याची गुलामी पत्करायला सामान्य माणसे कमालीची उत्सुक असतात. सामान्य माणसाला स्वातंत्र्य वगैरे काही नको असते. अविष्कार स्वातंत्र्य नको असते. त्याला सामान्य माणुस म्हणुन सुखाने सुरक्षित व सुखरूप जगण्याची हमी तेवढी हवी असते. त्याची हमी द्यायला जो पुढे येईल, त्याच्या समोर शरणागत व्हायला सामान्य माणूस उतावळा असतो. मग तो कधी साधूपुरूषाच्या रुपाने सामोरा येतो, तर कधी राजकीय पराक्रमी पुरूष म्हणून समोर येतो. शस्त्र उगारून त्याला आपली हुकूमत प्रस्थापित करावी लागत नाही. त्याला केवळ सामुहिक मानसिकतेच्या आधारे आपले अधिराज्य प्रस्थापित करता आले पाहिजे. सामुहिक म्हणजे कळपाच्या जाणिवा समाजात जागवता आल्या पाहिजेत आणि त्यावर आपली हुकूमत प्रस्थापित करता आली पाहिजे. आपलेच विचार व भूमिका सामान्यांच्या हिताच्या व उपयुक्त आहेत, हे लोकांच्या मनात ठसवता आले पाहिजे. त्या सामुहिक मानसिकतेशी खेळता आले पाहिजे. विस्कळीत समाजातून वा लोकांमधून स्वतंत्र झुंड निर्माण करता आली पाहिजे. बाकी सगळे आपोआप होत जाते. हे काम किती सोपे व सहजसाध्य असते त्याचे उदाहरण उद्या तपासू या  ( क्रमश:)
भाग   ( १५ )    ९/११/१२

1 टिप्पणी:

  1. ठलुआ क्लब
    राहुल ट्रेन में एक सीट पर अकेला लेटा था

    . "आम आदमी" आया और बोला :- भाई थोडा साइड में
    हो जाइये मुझे भी बैठना है

    राहुल :- तुझे पता है मैं कौन हूँ . .?? "आम आदमी" डर कर दूसरी जगह बैठ
    गया फिर मोदी जी आये और बोले :- साइड में हो जा छोटू मुझे बैठना है

    राहुल :- अबे ओये तुझे पता है मैं कौन हूँ

    मोदी जी ने राहुल की गर्दन पकड़ के
    उठा लिया और बोले :- हाँ बोल तू कौन है .....??

    राहुल :- जी मैं " बीमार " हूँ .. 2 दिन से तेज़ बुखार है .

    उत्तर द्याहटवा