शुक्रवार, ३० मार्च, २०१२

विद्वत्तेतली नंपुसकता आणि अडाणी कर्तृत्व  विथ ऑनर्स अशा नावाचा एक इंग्रजी चित्रपट आहे. १९९४ सालात प्रदर्शित झालेला तो चित्रपट अनेकदा कुठल्या तरी वाहिनीवर दिसत असतो. त्यातला एक प्रसंग मला खुप भावलेला आहे. म्हणुनच जेव्हा चुकून माझा रिमोट मला त्याच्यापर्यंत घेऊन जातो, तेव्हा तेव्हा मी तो चित्रपट बघत असतो. विद्वान व त्यांच्या बुद्धीमत्तेच्या मर्यादा उघड करणारा तो प्रसंग त्यात छान चितारला आहे. जगाला आपले पुस्तकी वा उसने शहाणपण अखंड ऐकवणार्‍या व मिरवणार्‍या विद्वानांचे त्यात झकास वस्त्रहरण बघायला मिळते. आणि तेही एक भणंग टपोरी दारूड्याकडून.

   प्रसंग असा आहे, की हॉर्वर्ड या अमेरिकेतील सर्वात स्कॉलर मानल्या जाणार्‍या विद्यापीठातील कायद्याच्या वर्गात एक मुलगा शिकत असतो. एका अपघातात जखमी झाल्याने तो जायबंदी झालेला असतो. त्याच्या मदतीला एक भणंग येतो. त्यांची दोस्ती होते. एके दिवशी तो त्या भणंगाला आपल्यासोबत वर्गात बसवतो. तिथे जगातले सर्व कायद्याचे व तत्वज्ञानाचे अर्क आपणच प्यायलेलो आहोत, अशा थाटात शिकवणारा एक प्राध्यापक असतो. पाठ देताना तो विद्यार्थ्यांची खिल्ली उडवत असतो. त्याचे लक्ष या भणंगाकडे जाते. तो विद्यार्थी नाही हे लगेच लक्षात येते. प्राध्यापकाने हटकताच तो भणंग  वर्गातून बाहेर जायला निघतो. पण स्वत:ला जगातला सर्वोच्च शहाणा समजणारा तो प्राध्यापक, कारण नसताना त्या भणंगाची कुरापत काढतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, त्याचे अधिकार व त्यांची राज्यघटना अशा विषयावर तिथे उहापोह चालू असतो. त्यावरचे प्रश्न विचारून तो प्राध्याअक मुलांची भंबेरी उडवत असतो. त्याच पद्धतीने त्या भणंगाची खिल्ली उडवण्याचा मोह त्याला आवरत नाही. तिथेच सगळी गडबड होऊन जाते. कारण त्या भणंगाला सभ्यता, त्यातून येणारी सोशिकता, याचा थांगपत्ता नसतो. त्यामुळे तो प्राध्यापकाला आपल्या रोडछाप पद्धतीने हाताळतो व प्राध्यापकाची पुरती तारांबळ उडून जाते.

   अमेरिकन अध्यक्षाला प्रचंड अधिकार आहेत. तो एका क्षणात अणूयुद्ध सुरू करू शकतो. त्याला रोखण्याचे तिथल्या संसदेलाही फ़ारसे अधिकार नाहीत. मग ही हुकूमशाहीच नाही काय? अमेरिकन राज्यघटनेचे वैशिष्ठ्य काय? असे प्रश्न त्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना विचारलेले असतात. त्याच प्रश्ह्नांची उत्तरे तो त्या भ्णंगाकडून मागतो. तर तो टपोरी विचारतो, फ़ुकट नाही, दारू प्यायला पैसे देणार असशील तर उत्तर देईन. प्राध्यापक नाही म्हणताच ’झक मारलास’ म्हणत तो भणंग निघतो. प्राध्यापक मजकूरांना तो अवमान वाटतो. ते पैसे द्यायला तयार होतात. पण इथे त्यांची कुणा सभ्य माणसाशी गाठ नसते, समोरचा भणंग आपल्याच संस्कृतीत त्यांना म्हणतो, आधी पैसे दाखव. शेवटी त्याला पैसे मिळाल्यावर तो जे उत्तर देतो ते बुद्धींवंतालाही लाजवणारे असते. तेवढेच नाही तर विचारवंत बुद्धीमंत अभ्यासक म्हणून जे ’मिरवतात’ त्यांच्या भाकडपणावरचे ते सर्वोत्तम भाष्य आहे. पाच डॉलर खिशात टाकल्यावर तो भणंग उत्तरतो,

"मी एक भणंग टपोरी पुंड आहे. अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा तसाच पुंड असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आमच्यासारखे बुद्धीमान नसलेले पुंडच काही तरी करतात. ते कधी बरे असते तर कधी वाईट असते. पण आम्ही काही तरी करतो. तुम्ही नाकर्ते नपुंसक असता. तुम्हाला काहीच करता येत नाही. जे काही आमच्यासारखे लोक करतात, त्याचा अर्थ लावण्यातच तुमचे भाकड आयुष्य संपून जाते. राहिली गोष्ट अमेरिकन राज्यघटनेची. ती कधीच परिपुर्ण नव्हती. ज्यांनी ती घटना बनवली, त्यांनाही ती परिपुर्ण नाही याची कल्पना होती. म्हणूनच त्यांनी त्यात काळ व गरजेनुसार बदल, दुरुस्ती करण्याची तरतुद करून ठेवली आहे. तेच तर त्या घटनेचे वैशिष्ठ्य आहे."  

आपण वाहिन्या वा अन्य वृत्तपत्रातून जे विद्वान जगाला शहाणपण अखंड शिकवत असतात, त्यांचे वागणे पाहिले, तर त्याची साक्ष मिळते. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्याचा दाखलाच त्यांच्या एका लेखातून दिलेला आहे. एका वाचकानेच मला तो लेख मुद्दाम पाठवला. त्याचे पोस्टमार्टेम मी करणार आहे. पण आपल्या त्या विद्वत्तापुर्ण लेखातून सप्तर्षी यांनी सत्य लपवताना जेवढे सत्य सांगून टाकले त्याबद्दल मला त्यांचे आभार मानयलाच हवेत. त्याच लेखाने मला हा उपरोक्त चित्रपट व तो प्रसंग आठवला. मजा इतकीच, की त्यात तो भणंग इसम प्राध्यापक विद्वानाला जे सुनावतो, त्याची साक्ष सप्तर्षी लेखी स्वरुपात देतात. ’सत्याग्रही विचारधारा’ नावाचे मासिक ते चालवतात. त्याच्या जानेवारी अंकामध्ये त्यांचा संपादकीय लेख आहे, ’जनशक्ती, धनशक्ती, न्यायशक्ती
आणि राजशक्ती, प्रचारशक्ती यांचा खेळ’. त्यातला हा उताराच वाचून बघा.

   ’लोकपाल बिलाच्या निमित्ताने एक स्वागातार्ह गोष्ट घडली. देशातील सामान्य नागरिकांनाही ‘बिल’ व ‘कायदा’ यातील फरक व दोन्हीमधले अंतर कसे पार केले जाते ही प्रक्रिया उमगत चालली आहे. संसदेत बिल कसे प्रवेश करते, ते सभागृहाची मालमत्ता कसे बनते आणि सभागृहातील सदस्यांच्या हाती त्या बिलाचे भवितव्य कसे संक्रमित होते, या प्रक्रियेबद्दल लोकांना ज्ञान झाले. यावर झालेल्या व होत असलेल्या व्यापक चर्चेमुळे भारतीय नागरिकांच्या सामुदायिक शहाणपणात निश्चित भर पडली आहे. याचे अर्धे श्रेय अण्णा हजारे यांना दिले पाहिजे. कारण ते अडाणीपणाने काहीतरी उत्स्फूर्तपणे बोलून बसतात. ते त्यांना माहीत नसलेल्या विषयावर ते रेटून बोलतात. अज्ञानातून साहस जन्माला येत असते. प्रसारमाध्यमे कसल्याही विषयावर अण्णांचे मत ऐकायला फारच उत्सुक असतात. मग त्यांच्या या वक्तव्यावर वाहिन्यांवर उलट सुलट चर्चा होते. या चर्चा आज ग्रामीण भागातील तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. तरूणांना चर्चेची सवय लागणे हे लोकशाहीला पोषकच ठरणार आहे. रोज रात्री ९ वाजता ग्रामीण भागातील लोक आणि विशेषताः तरुण मंडळी टीव्ही समोर मांडी ठोकून बसलेले असतात’.

हे सप्तर्षी यांचे शब्द मी मुद्दाम जसेच्या तसे सादर केलेले आहेत. त्यातला विरोधाभास लक्षात येतो का? अण्णांच्या आंदोलनाने काय साधले त्याची त्यांनी यातून स्पष्ट शब्दात कबूली दिलेली आहे. ’भारतीय नागरिकांच्या सामुदायिक शहाणपणात निश्चित भर पडली आहे. याचे अर्धे श्रेय अण्णा हजारे यांना दिले पाहिजे.’ श्रेय किती व कोणाला हा विषय सध्या बाजूला ठेवा. आज म्हणजे देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून व लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून, सहा दशके भारतीय नागरिक एकूणच लोकशाही प्रक्रियेबद्दल अडाणी अज्ञानी होते, याचीच ही कबूली आहे ना? सवाल आहे तो त्यांना कोणी अडाणी ठेवले हा. गेली कित्येक वर्षे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे निदान चार दशकाहून अधिक का्ळ तरी डॉ. सप्तर्षी व त्यांचे सेक्युलर समाजवादी युक्रांदिय भाईबंद लोकशाहीची जपमाळ अखंड ओढत बसले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली सगळी बुद्धीमत्ता व अक्कल, गुणवत्ता पणाला लावली आहे. मग भारतिय नागरिक लोकशाही प्रक्रियेबद्दल अज्ञानी राहिलेच कसे? एकाहुन एक शहाणे, विद्वान, अभ्यासक, विचारवंत, संपादक लोकशाहीवर प्रवचने, व्याख्याने देत असताना, भारतिय नागरिक अडाणी राहिलाच कसा? की यांनी त्या नागरिकाला समजूच नये, अशा भाषेत व पद्धतीने आपली प्रवचने केली? विद्यार्थी अडाणी राहीला वा शिकला नाही तर तो दोष शिक्षकाचा नाही काय?

"अण्णा अडाणीपणाने काहीतरी उत्स्फूर्तपणे बोलून बसतात. ते त्यांना माहीत नसलेल्या विषयावर ते रेटून बोलतात.’ असे डॉ. सप्तर्षी म्हणतात. ते खरेच आहे. पण त्या अडाणी माणसाने अल्पावधीत जे काही केले बोलले त्यातून भारतियांना लो्कशाही कळली असेल, तर या देशातल्या नागरिकांना शिकण्यासाठी शहाण्याची मदत हवी की अडाण्यांची गरज आहे? जे काम सप्तर्षी सारख्या शहाण्यांना सहा दशकात साधले नाही, ते अपुर्व कार्य एका गावठी अडाण्याने काही आठवड्यात व मोजक्या शब्दात आणि घोषणांनी करून दाखवले. त्या चित्रपटातला तो भणंग माणूस सांगतो, त्यापेक्षा सप्तर्षी काय वेगळे सांगत आहेत? त्यांच्यासारखे दिवाळखोर शहाणे विद्वान नागरिकांना लोकशाही वा तिची महती समजावून सांगू शकले नाहीत. मग त्यांची विद्वत्ता काय कामाची?  त्यांनी विचारपुर्वक बोलण्याचा उपयोगच काय? जे लोकांना समजत नाही, अडाणी अज्ञानी ठेवते त्याला विद्वत्ता म्हणायचे काय?  शहाणा व अडाणी यांची नेमकी व्याख्या तरी काय आहे? तुमची आमची सोडा. सप्तर्षीसारख्या शहाण्यांची तरी शहाणपणा व विद्वत्तेची व्याख्या काय आहे? दुर्बोध, अनाकलनिय बोलणे म्हणजे विद्वत्ता असते काय?   (क्रमश:)

भाग  ( २२१ )    ३१/२/१२

डॉ. सप्तर्षी यांचा मूळ लेख इथे वाचता येईल
http://kumar-saptarshi.blogspot.in/p/blog-page_24.html

९ टिप्पण्या:

 1. Chhan Post, Aapaly deshatil Vidwan he suddha Adani lokani adani rahave yakarata prayatna karatat. Fakta Prabodhanachya Gappa maratat.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Kumar saptarshi kay laykiche ahet he aajchi tarun pithi changlya prakare jante. He mahashay nashib vaigare manat nahi pan nashibanech te ekda nivadnuk jinkalet ani nantar swatahla vidwan mhanaun gheu lagle.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. बर झाल तुम्ही सप्तर्षिणा झोडल . ये अति शहाणे विद्वान यात नव अति शहाणे चौधरी आणि असेच दोन चार. दोन हाणा पण मला विचारवंत म्हणा अशी यांची मागणी असते . सगळ्या चांगल्या कामात हे तसेच त्या मेघा पाटकर ,अरुंधती खोडा घालत असतात
  त्या मेघा पाटकर यांनी नर्मदा धरणाला कडाडून विरोध केला होता आज त्याच नर्मदा धरणामुळे गुजरात ची जनता पाणी पिते आहे . संपूर्ण गुजरातला नळ वाटे पाणी फक्त ५००० करोड मध्ये पुरविले. आज गुजरात मध्ये २ ते ३ वर्षे पावूस नाही पडला तरी तेथे पाण्याची कमतरता नाही .इथे ७०००० करोड खर्चून ८०% महारष्ट्र तहानलेलाच आहे . अजून या धरणाची उंची वाढवली असती तर उत्तर महारष्ट्र ला पाणी मुबलक मिळाले असते पण या बाईने ते करू दिले नाही

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. सप्तर्षि तर केवल एक कोंग्रेसी तबेल्यातला एक घोडा आहे. आता टांग्यालाही उपयोगी नसलेला. त्याचे काय ? बिचारा वाहिन्यांच्या कुंपणांतले गवत खाऊन रखडत रखडत चालतो आणि तिथेच उभा असतो पोटासाठी !!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. भाऊ कुमार सप्तर्षी ह्या भनंग व्यक्तिबद्दल जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाही. उगाचच स्वतःची वाचा अशुद्ध करण्यात काही हाशिल नाही.
  Forget him forgive.

  प्रत्युत्तर द्याहटवा