रविवार, ११ मार्च, २०१२

अण्णांचे शब्द मतदाराने खरे करून दाखवले


   पाच विधानसभांच्या निवडणूकांची सगळ्यांनाच काळजी वाटत होती. म्हणून तर अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार अशी नुसती घोषणा करताच, तमाम राजकीय निरीक्षक आपली अभ्यासू अलिप्तता सोडून मैदानात उतरले होते. कॉग्रेसविरुद्ध प्रचार म्हणजे अण्णांचे राजकारण आहे, असा ओरडा लगेच सुरू झाला होता. कॉग्रेसने तसा आरोप करण्याआधीच पत्रकार अण्णांना तसा प्रश्न थेट विचारू लागले होते. राजकारण खेळत असल्याच्या आरोपाला अण्णा दाद देत नाहीत म्हटल्यावर, काही पत्रकार आपली पत्रकारी भुमिका विसरून पक्षिय भुमिकेत शिरले होते. कॉग्रेस विरुद्ध प्रचाराचा भाजपाला फ़ायदा होईल, असेही सल्ले अण्णांना देऊ लागले होते. पण अण्णांनी कॉग्रेस विरुद्ध प्रचारात उतरण्याची गरज नाही असे मी तेव्हाच म्हटले होते. निवडणूकीचे पडघम वाजायला लागले तेव्हाच मी तशी गरज नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले होते. कारण स्पषटच होते. कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी कुणा बाहेरच्या माणसाने खास प्रयत्न करण्याची अजिबात गरज नव्हती. खुद्द सोनिया व राहुल यांनी ते महत्वपुर्ण काम आपल्या अतिशय विश्वासू लोकांवर सोपवलेले आहे. दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल व चिदंबरम अशी त्यांची नावे आहेत. आणि त्यांनी आपले काम छान पार पाडले आहे. परवाच्या कॉग्रेस पराभवाचे श्रेय कोणी राहुल तर कोणी मुलायम, अखिलेश यादव यांना देत असले, तरी त्याचे खरे मानकरी उपरोक्त तिघेजण आहेत. आणि त्यांना मोकाट सोडल्याबद्दल त्याचे श्रेय आपोआपच सोनिया-राहुल या मायलेकरांना द्यावे लागेल.

   कॉग्रेसचा या निवडणूकीत पराभव झाला आहे. पण तो दुसर्‍या कोणीही केलेला नसून, खुद्द कॉग्रेसनेच तो घडवून आणला आहे. जो बोकड गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेला असतो, त्याला कोणी मारण्याची गरज नसते. तो स्वत:च मरण ओढवून आणत असतो. त्याला जसे कोणी मारण्याची गरज नसते, तसाच त्याला कोणी वाचवू सुद्धा शकत नसतो. आपल्याकडल्या तथाकथित सेक्युलर पत्रकार व अभ्यासकांना त्याचेच भान राहिलेले नाही. त्यामुळेच ते जीवाच्या आकांताने कॉग्रेसला वाचवायला धडपडत असतात. बरे त्यांना खरोखरच कॉग्रेसला वाचवण्याची इतकीच जबरदस्त इच्छा असेल, तर त्यांनी पुढे होऊन त्या पक्षाचे काम व नेतृत्व हाती घ्यायला हरकत नाही. मग तरी काही होऊ शकेल.

   आज कॉग्रेस पक्ष आपली ओळखसुद्धा हरवून बसला आहे. आपण कोण आहोत, आपला इतिहास काय आहे, आपल्या प्रथापरंपरा काय आहेत, याचेही भान कुठल्या कॉग्रेस नेत्याला वा कार्यकर्त्याला उरलेले नाही. शिवाय त्या पक्षात कोणी कार्यकर्ताही शिल्लक राहिलेला नाही. जे त्या पक्षात असतात वा वावरतात त्यांना आपण कॉग्रेसवाला म्हणतो. म्हणून तो कॉग्रेसजन होत नाही. आज कॉग्रेस म्हणजे नेहरू-गांधी खानदानाच्या खुशमस्कर्‍यांची एक टोळी होऊन बसली आहे. पुर्वीच्या काळात जहागीरदार सरंजामदारांच्या पदरी जशी भाट तोंडपुजकांची वर्दळ असायची. तशा गर्दीला आजकाल कॉग्रेस म्हटले जाते. त्याची नक्कल हलूहळू इतर पक्षातही होऊ लागली आहे. ती स्तुती ऐकून नेत्यांना बरे वाटत असेल. पण त्यामुळे कर्तबगार माणसे त्या संघटना वा पक्षाकडे पाठ फ़िरवतात. ज्यांना कर्तृत्व गाजवायचे असते, पराक्रम करून दाखवण्याची हौस असते, त्यांना स्तुतीपाठक म्हणून जगण्याची शरम वाटते. ते अशा गर्दीपासून दुर पळतात. कॉग्रेस आता अशा लाचार आशाळभूत गरजवंतांचा अड्डा बनला आहे. त्याचे राजरोस प्रदर्शन करण्याला कार्य म्हटले जाते.

   समर्था घरीचे श्वान अशीच आजच्या कॉग्रेसवाल्यांची अवस्था आहे. त्याने मालकाचे पाय चाटावेत, नुसते त्याच्याकडे बघितले तरी शेपुट हलवून आपली निष्ठा व्यक्त करावी, गळ्यातला पट्टा अभिमानाने मिरवावा आणि वेळ आली मग मालकाच्या इशार्‍यावर भुंकावे, यापेक्षा वेगळे काही चालते काय? परवा विधानसभांचे निकाल लागत असताना व त्याआधी, पक्षाचे सरचिटणिस दिग्विजय सिंग यांनी जिभ बाहेर न काढता त्याची साक्ष दिली होती ना? पक्ष विजयी झाला तर त्याचे श्रेय राहुलना असेल आणि पराभूत झाला तर दोष आमचा कार्यकत्यांचा असेल. याला नम्रता म्हणत नाहीत तर लाचार खुशमस्करेगिरी म्हणतात. नेतृत्वाचा हाच निकष असेल तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मुर्खच म्हणायला हवा. संघाचा पराभव झाला, मग तो समोर येऊन त्याचा दोष स्वत:वर घेतो. विश्वचषक जिंकल्यावर त्याने अगत्याने त्याचे श्रेय सर्व संघालाच नव्हे तर त्यासाठी अखंड राबलेल्या संघाच्या सेवक, सहकारी व कर्मचार्‍यांना सुद्धा दिले होते. नेता म्हणजे काय असतो तेही आता कॉग्रेस पक्षातल्या कुणालाच कळेनासे झाले आहे. त्यांनीच नव्हे तर त्यांच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांनी जरा त्याचे धडे महेंद्रसिंग धोनी याच्याकडून गिरवण्याची गरज आहे.

   धोनी संघाचे नेतृत्व करतो, तेव्हा त्यालाही मैदानात खेळावे लागते. जिंकल्यावर चषक त्याच्याच हातात पडत असतो. पण लगेच तो चषक धोनी आपल्या सहकार्‍यांकडे सोपवतो. मैदानात त्यालाही खेळावे लागते. जिंकल्यावर चषक हाती घेण्यापुरता धोनी कर्णधार होत नाही. संघाचा पराभव झाल्यावर सुद्धा शिव्या खायला तो पुढे येतो. त्याच्या संघातले कोणी सर्व श्रेय त्याला देत नाहीत. जिंकलो तर धोनीमुळे आणि हरलो तर आमच्या नालायकीमुळे, असे आपण कुणा भारतीय क्रिकेटपटूकडून ऐकले आहे काय? नसेल तर दिग्विजय सिंग काय बोलत असतात? त्यांना कोणाही पत्रकाराने मुलाखतीच्या वेळी खडे बोल ला ऐकवू नयेत? तुम्ही करत आहात ते पक्षकार्य वा नम्रता नसून, ती शुद्ध चमचेगिरी आहे, असे कोणीच पत्रकार का म्हणत नाही? दिग्विजय यांची चापलूसी संतापजनक असते. आरंभी अशी भा्टगिरी फ़क्त दिग्विजय तेवढेच करायचे. त्यांना थांबवण्यात आले नाही म्हणुन आता ती कॉग्रेस पक्षात प्रथाच पडली आहे. मॅडमना हेच आवडते असे जाणवल्यामुळेच सगळे तसे बोलू लागले असणार ना? पण त्यानेच कॉग्रेसचा घात केला आहे. जनतेमध्ये काम करण्याची गरज उरली नाही. राहुल सोनीया दिसले किंवा जोराजोराने कुणावर तरी भुंकायचे की कार्य संपले, अशी पक्षकार्याची नवी व्याख्या तयार झाली. त्याचाच लोकांना आता वीट आला आहे.

   कॉग्रेसची धोरणे, जाहिरनामा, प्रचार यापेक्षा तिच्या चापलुसगिरीला लोकांनी नाकारले आहे. जिथे त्याचा कहर झाला, तिथे कॉग्रेसला जास्त फ़टका बसला आहे. रायबरेली, अमेठी हे तर त्यांचे घरचे मतदारसंघ. त्यात एकूण दहा आमदार निवडले जातात. त्यात अवघे दोन जिंकु शकले. रायबरेलीमध्ये सर्व पाच उमेदवार पराभूत झाले. अमेठीत फ़क्त दोन जिंकू शकले. या भागात लाडली बेटी प्रियंका ठाण मांडून बसली होती. तिथे असताना साडी नेसायची व बेटी असल्याचे नाटक करायचे आणि दिल्लीत आल्यावर जिन्स घालून जगायचे, हे आता खेडोपाडी लोक टीव्हीवर बघू शकतात. त्यामुळेच अशी नाटके उपयोगाची राहिलेली नाहीत. त्याचीच किंमत घरच्या मतदारसंघात मोजावी लागली आहे. आणि तेवढीच गोष्ट नाही. या समर्था घरीच्या श्वानांच्या चावण्याने, लोक आता व्याकुळ होऊ लागले आहेत. स्वामी रामदेव किंवा अण्णा हजारे यांना गांधी कुटुंबाच्या श्वानांनी घेतलेले चावे लोकांनी पाहिले होते. झोपलेल्या रामदेव समर्थकांवरचा लाठीहल्ला, अण्णांना उपोषणापुर्वीच झालेली अटक, लोकांनी पाहिली होती. त्याला सरकारी कारवाई असे कोणीही तर्कशुद्ध भाषेत म्हटले, तरी लोकांना दिसायचे ते दिसले होते. किमान सभ्यता स्वत; राहुल सोनिया दाखवत नाहीतच. पण त्यांच्या कृपेने शिरजोर झालेल्या कपिल सिब्बल, चिदंबरम यांचा उर्मटपणा, उद्धटपणा लोकांना दिसत होता. तो थोपवण्याचा एकच मार्ग होता. मालकाची मस्ती उतरवणे. आणि या प्रकरणी मालक सोनिया व राहुल होते. कॉग्रेसची मस्ती उतरवली मग या श्वानांची मस्ती कमी होते आणि आपोआप कपिल चिदंबरम व दिग्विजय यांची मस्ती संपणार. म्हणुनच लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा पराभव लोकपाल नाकरल्यामुळेच झाला यातही शंका नाही. किंबहुना त्या सर्व लढ्यात व आंदोलनात सरकारने जी मस्ती दाखवली, त्याचाच हा परिणाम आहे. त्या काळात अण्णा काय म्हणाले होते, ते आठवते? संसदेत तुमचे बहुमत असेल म्हणुन तुम्ही सर्वसत्ताधीश नाही. संसदेत बसलेत, त्यांच्यापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. अण्णांचे तेच बोल मतदाराने खरे करून दाखवले आहेत. संसद, त्यातले बहुमत, त्यातून बनणारे सरकार व त्यावर हुकूमत गाजवणारे गांधी घराणे सार्वभौम नाही, हेच या मतदानाने सिद्ध केले ना? (क्रमश:)
 ( भाग २०१ )  ११/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा