मंगळवार, ६ मार्च, २०१२

नैतिकतेचे ठेकेदारच दांभिक वाचाळवीर


* ज्याने चुक केली आहे, पण ती दुरूस्त करायला जो तयार नसतो, तो पुढली चुक करत असतो. -कंफ़्युशिअस
*  दुसरे काय करतात वा करत नाहीत तिकडे लक्ष देऊ नका, तर आपण काय करत नाही वा करतो, तिकडे लक्ष ठेवा. -गौतम बुद्ध
* दुसर्‍यांच्या चुका शोधणे सोपे असते. आपल्य़ा चुका ओळखणे अवघड असते. -गौतम बुद्ध
* दुसरा आपल्याशी जसे वागतो त्याचा संताप येत असएल तर आपणही त्याच्याशी तसे वागू नये. -सॉक्रेटिस

   मुद्दाम या चिंतक थोरपुरूषांचे हे सुविचार इथे आधी सांगितले. समाजाला चार चांगल्या गोष्टी सांगण्याचा आव आणणार्‍यांसाठी ते आवश्यक आहे. कारण आजकाल उठल्याबसल्या लोकांना ज्ञानामृत पाजणार्‍यांचा सुकाळ झाला आहे. त्यांच्या वाट्याला जाण्याआधी माझे अज्ञान व उसनवारी आधीच कबुल केलेली बरी.

   अविष्कार स्वातंत्र्य हा शब्दप्रयोग अलिकडे खुप तेजीत आहे. सामान्य माणसाला व वाचकाला त्याचा कितीसा अर्थ ठाऊक आहे देवजाणे. पण ज्यांच्या हातात लेखणी किंवा प्रसारमाध्यमाचे साधन आहे, त्यांनी मात्र त्याचा सतत उदघोष चालविलेला असतो. हे असे जगात पहिलांदाच घडते आहे असे मानायचे कारण नाही. ज्याचा हाती ससा तोच पारधी अशी उक्ती प्रचलीत आहे. तशीच माध्यमे ज्याच्या हाती, तो आपले तेच खरे म्हणू लागला तर नवल नाही. महात्मा जोतिबा फ़ुले त्याच प्रवृत्तीला कलमकसाई म्हणायचे. हातातल्या लेखणीने इतिहास लिहायचे वा नोंदणी करायची सत्ता ज्यांनी काबीज केली होती, तेच मग जगावर राज्य करायचे. म्हणजे जे धाडसी लोक लढाया करून राज्य निर्माण करायचे, त्यांच्यावरही याच कलमकसायांची सत्ता चालत असायची. मग कागदावर ही मंडळी असल्याचे नसले करून दाखवायची. नसल्याचे असले करणेही त्यांनाच शक्य होते. शिवाय लोकांना लिहिता वाचता येत नव्हते. मग काय, लिहिणारा आणि ते वाचून दाखवणारा एकच असल्यावर काहीही लिहा आणि काहीही वाचा. फ़रक कुठे पडणार होता?

   पुढे काळ बदलला. समाजात साक्षरता आली. काही लोकांच्या धाडसामुळे वा संघर्षामुळे शिक्षण सामान्य माणसांपर्यंत येऊन पोहोचले. त्यांनाही लिहिता वाचता येऊ लागले. मग अशी सामान्य माणसे प्रश्न विचारू लागली. वाचून दाखवलेले आणि लिहिलेले यातली तफ़ावत सांगून सवाल करू लागली. लेखणीची हुकूमत चालेनाशी झाली. कलमकसाई आपल्या लेखणीच्या फ़टकार्‍याने कोणाचे राजरोस नुकसान करायच्या स्थितीत राहिलेले नाहीत. सामान्य लोकांनाही शब्द वाचता येतात आणि शब्दांचे अर्थही कळतात. सहाजिकच शब्दांचा आडोसा घेउन गैरसमजूती पसरवणे भाग होते. त्यासाठी मग अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य अशा गोलमाल शब्दांची कसरत चालू असते. मुळात ही एक दुष्ट प्रवृत्ती असते. दुसर्‍याची दिशाभुल करायची आणि त्या गैरसमजूतीच्या बळावर लोकांचे शोषण करायचे,, असा त्या प्रवृत्तीचा हेतू असतो. जाणिवपुर्वक मग असे गैरसमज निर्माण केले जातात. अण्णा हजारे यांच्या सहकार्‍यांना लक्ष्य़ बनवण्याचा प्रकार त्याच हेतूने झालेला आहे. त्यातले अरविंद केजरीवाल यांनी कुठल्या सभेत बोलताना, संसदेत खुनी, बलात्कारी, दरोडेखोर बसलेत असे सांगितले. त्यावरून आ्ता गदारोळ उठवण्यात आलेला आहे.

   केजरीवाल यांनीच कशाला, इतर अनेकांनी असे यापुर्वी म्हटलेले आहे. रामलिला मैदानावर अण्णांचे उपोषण चालू असताना अभिनेता ओम पुरी यांनी असेच म्हटले, त्यावरून गदारोळ उठला होता. त्यांनी नंतर क्षमा मागितली आणि प्रकरण थंडावले होते. आता पुन्हा केजरीवाल तेच बोलले आणि गोंधळ सुरू झाला आहे. त्यात गुंतलेल्या राजकारण्यांनी काहूर माजवले तर गोष्ट वेगळी आहे. पण माध्यमे व पत्रकारांनी त्यावर अण्णा टीमला शहाणपण शिकवण्याची व  सभ्यता समजावण्याची गरज आहे काय? जी सभ्यता आपण पाळू शकत नाही वा आपण जेवढा शहाणपणा दाखवू शकत नाही, त्याचे धडे इतरांना देण्याची गरज आहे काय?’ लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी एक उक्ती आहे, त्यापेक्षा माध्यमांचे हे वागणे वेगळे आहे काय? कारण जी अपेक्षा असा उपदेश करणारे बाळगतात, त्यांनी तर तसे कधी वागून दाखवलेले नाही. उलट जेव्हा कोणी त्यांच्या अशा उद्धटपणाला जाब विचारला, तेव्हा यांनीच त्यावर कोर्टात जा, कायदेशीर कारवाई करा, असे प्रत्युत्तर दिलेले आहे. मी बिनबुडाचे बोलत नाही. दाखले व पुरावे देण्यावर माझ्या पत्रकरितेची मदार आहे.

   केजरीवाल यांच्यावर अनेकांनी टिकेची झोड उठ्वली आहे. पण त्यातल्या दोघांचे दावे इथे मी तपासून घेणार आहे. अर्थात त्यासाठी मी माझे नियम वा निकष वापरणार नाही. ज्यांचे तपासणार, त्यांचेच हे निकष-नियम आहेत. नियम पहिला:"आरोप सिद्ध होत नाहीत तोवर एखाद्याला गुन्हेगार म्हणणे, हे कायद्याच्या प्राथमिक तत्त्वाचे उल्लंघन आहे. हा केवळ तांत्रिक मुद्दा नाही, तर लोकशाहीचा आधार असलेल्या अनेकांपैकी एका मूल्याशी तो निगडित आहे." महाराष्ट्र टाईम्सच्या २९ फ़ेब्रुवारी २०१२ च्या अंकात "दांभिक वाचाळवीर" शिर्षकाचा जो संपादकिय लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यातले हे वाक्य आहे. आणि ते योग्यच आहे. मी ते मान्य करतो आणि त्याचे पालन करण्यातच माझी पत्रकारिता खर्ची पडलेली आहे. सवाल इतकाच, की स्वत: त्या दैनिकाने वा त्यांच्या अलिकडल्या संपादक पत्रकारांनी तो दंडक पाळला आहे काय? तेच कशाला, त्यांच्याच हातात हात घालून जे इतर भंपक लोक अविष्कार स्वातंत्र्याचा पदराआअड लपतात, त्यांनी हे तत्व कितपत पाळले आहे? त्यांच्यावर केजरीवाल यांच्याप्रमाणेच बेछूट वागल्याचा लिहिल्याचा आरोप झाला, तेव्हा त्यांनी सभ्यपणे क्षमायाचना केलेली आहे काय? गुन्हा कबुल करण्याची सभ्यता दाखवली आहे काय? असती तर त्यांनी याच संपादकीय सदरात नेमक्या एक महिन्यापुर्वी बेशरमपणे "तोडफोड संस्कृतीचे पाईक" अशा शिर्षकाचा संपादकीय लेख कशाला लिहिला असता? आज केजरीवाल जेवढ्य़ा बेधडकपणे संसदसदस्यांबद्दल बोलत आहेत व कसलाही सज्जड पुरावा उपलब्ध नसताना बोलत आहेत, तेवढ्याच बेजबाबदारपणे २९ जानेवारी रोजी ’मटा"ने संसदसदस्य आनंदराव अडसुळ यांच्याविषयी पक्षांतराची बातमी प्रसिद्ध केली होती.

   त्या बातमीमुळे शिवसैनिक संतप्त झाले होते आणि अडसुळ ज्या सहकारी बॅंक कर्मचार्‍यांच्या संघटनेचे नेते आहेत, त्या लोकांनी मटाच्या कार्यालयावर हल्ला चढवला होता. त्यांच्या हल्ल्याचा निषेध झालाच. व्हायलाही हवाच. पण दुसरीकडे अशी बिनबुडाची अफ़वा पसरवणार्‍या मटाच्या पत्रकारीता व संपादकीय बेजबाबदारपणाचा निषेध झाला होता काय? त्यासाठी अडसुळ समर्थकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पण त्याची मागणी सुसंस्कृत असल्याचा आव आणणार्‍यांनी केली होती. ती करणार्‍यांनी ’मटा’च्या संपादकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी का केली नाही? त्या संपादकानी चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तशाच थाटात दुसर्‍या दिवशी हल्लेखोरांवर तोडफ़ोड संस्कृतीचा आरोप केला. स्वत:च्या पापाचे प्रायश्चित नाही, की साधी कबुली देण्याचाही सभ्यपणा नाही. म्हणजे जे शहाणपण केजरीवाल यांना शिकवले जात आहे, त्यासाठी अण्णा टीमवर गरळ ओकली जात आहे, त्याचा लवलेशही मटामध्ये नाही. मग त्यांना कोरडे पाषाण म्हटल्यास वावगे ठरेल काय?  केजरीवाल दांभिक वाचाळवीर असतील, तर मटाचे संपादक तरी कोण आहेत? तेही दंभिक बोरूबहाद्दर नाहीत काय? की पत्रकारिता म्हणजे "कायद्याच्या प्राथमिक तत्त्वाचे उल्लंघन " करण्यास घटनेने दिलेला खास अधिकार आहे, असे या संपादकांना म्हणायचे आहे?

   नियम व कायद्याचे राज्य असेल तर ते सर्वाना समान वागणुक देणारे असते. जो नियम केजरीवाल यांना लागेल, तोच पत्रकार संपादकांना लागला पाहिजे. आणि इथे मी प्रचलित कायद्याची भाषा सांगत नसून, पत्रकार व संपादक जे निकष सांगतात, तेच त्यांना ला्वण्याचा आग्रह धरतो आहे. तो निकष कुठला आहे? मटाचेच संपादक २९ जानेवारी रोजी लिहितात, "शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचेही नाव ठळकपणे, पण प्रश्नचिन्हासह प्रसिद्ध झाले. त्यापूर्वी अडसूळ यांची प्रतिक्रिया घेतली गेली नाही, ही त्यांची तक्रार योग्य मानली, तरी त्याबाबतचा खुलासा प्रसिद्ध करण्याचा आग्रह धरणे व तो मान्य न झाल्यास कायदेशीर पाऊल उचलणे, हा पर्याय देशाच्या कायदेमंडळात बसणार्‍या अडसूळ यांना अवलंबता आला असता." यात कुठेतरी आपण खोटारडेपणा केला, तेही "कायद्याच्या प्राथमिक तत्त्वाचे उल्लंघन"  आहे, याचा थांगपत्ता मटाच्या संपादकांना महिन्याभरापुर्वी नव्हता? हे आज सुचलेले शहाणपण आहे काय? जे आज केजरीवाल यानी केले तर चुक आहे, तेच तुम्ही महिनाभरापुर्वी केले, तेव्हा अविष्कार स्वातंत्र्याचे पुण्यकर्म होते काय? ही शुद्ध भामटेगिरी नाही काय? मग आताही तुम्ही त्यांच्यावर दुगाण्या झाडण्यापेक्षा केजरीवाल यांना खुलासा करायचा सल्ला द्यावा. एकदम गुन्हेगार कशाला ठरवायचे? (क्रमश:)
भाग ( १९७ )      ६/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा