सोमवार, २६ मार्च, २०१२

सर्वोच्च न्यायालयालाही शंका का यावी?



   एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. न्या. ए. के. गांगुली व न्या. दलबीर भंडारी यांच्या खंडपीठासमोर एक प्रकरण सुनावणीसाठी आले असताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावना प्रातिनिधीक आहेत. मुलींच्या विवाहयोग्य वयाच्या संबंधाने हे प्रकरण होते. अठराव्या वर्षीच मुलीचे लग्न करावे. त्याआधी झालेला विवाह बेकायदा मानून रद्द केला जाईल, अशा स्वरूपाच्या विषयावर सुनावणी होती. पण विवाहयोग्य वय हे कशावरून ठरवायचे? कायद्यातील तरतुदी बघितल्या तर धर्मानुसार हे वय वेगवेगळे सांगण्यात आले आहे. हिंदू मुलींसाठी लग्नाचे वय एक तर मुस्लिम मुलींसाठी ते वेगळे आहे. या तफ़ावती कधी संपायच्या? कोवळ्या वयात मुलीचे लग्न झाले तर गर्भधारणेतून तिच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो. म्हणुनच ही कायदेशीर तरतूद करण्यात आल्याचा दावा आहे. तो योग्य सुद्धा आहे. पण मग मुलीचे शरीर धर्मानुसार वागते, की वयानुसार वागते? जी गोष्ट हिंदू मुलीसाठी अपायकारक आहे तीच मुस्लिम मुलीसाठी आरोग्यवर्धक कशी? ही शंका सामान्य माणसाला, हिंदूला येणारच. तीच शंका अगदी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीला सुद्धा आली. पण अशा शंका सेक्युलर शहाण्यांना येत नाहीत. म्हणुनच ते अशा नेमक्या विषयावर मुग गिळून ग्प्प बसलेले असतात. त्यांनाच आजकाल सेक्यु्लर विचारवंत म्हणतात ना? उठसुट हिंदूंना सेक्युलॅरिझम शिकवणार्‍या या शहाण्यांना त्याच न्यायमुर्तींनी कानपिचक्या त्या दिवशी सुनावणीत दिल्या होत्या.

    "हिंदू समाज सुधारणांसाठी अधिक सहिष्णू व सहनशील आहे, त्याच्या व्यक्तीगत कायद्यात बदल करण्यापलिकडे सरकारचे सुधारणांचे प्रयास का जात नाहीत. पण अन्य धर्मांच्या व्यक्तीगत कायद्यात सुधारणा करण्यात सरकारची सेक्युलर इच्छाशक्ती पांगळी का पडताना दिसते."

   आधीच्या लेखात मी जे मुद्दे धार्मिक भेदभावाचे लिहिले, त्याची अशी खुद्द सर्वोच्च न्यायालयसुद्धा साक्ष देते. पण त्याकडे यातले लढवय्ये सेक्युलर कधी वळले आहेत काय? ज्या धार्मिक बंधनात मुस्लिम व ख्रिश्चन समाज अडकून पडला आहे, त्यातून त्याला मुक्त करायची वेळ आली; मग या पाखंडी सेक्युलर विचारवंतांचे पाय डगमगू लागतात. ते खोल बिळात दडी मारून बसतात. जिथे खरा धर्मांधतेचा सामना करायला हवा तिथे वा तशी वेळ आली; मग हे शहाणे लपून बसतात. किंवा त्यावरचे लोकांचे लक्ष विचलित करायचा प्रयत्न करतात. सामना याचा अर्थ मुस्लिमांच्या धर्मात ढवळाढवळ असा होत नाही. बहुसंख्य मुस्लिमात धर्म म्हणजेच सर्व काही अशी धारणा असते. त्यामुळेच मुस्लिमात मागासलेपणा अधिक आहे. आधुनिकतेचा अभाव आहे. त्यांना मुस्लिम मुल्ला  मौलवींच्या कचाट्यातून सोडव्ण्याची गरज आहे. कधी काळी रामनोहन रॉय यांच्या प्रयासांच्या मागे ब्रिटीश सत्ता उभी राहिली म्हणुन धार्मिक रुढी बंधनातून हिंदू समाजाची मुक्तता होऊ शकली. तेव्हाचे बुद्धीवादीही त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी हिंदू धर्ममार्तंडांचा रोष पत्करण्याची हिंमत दाखवली होती. आजचे तथाकथीत सेक्युलर सुधारणावादी विचारवंत नेमके उलटे काम करत असतात. ते मुस्लिम सुधारणांना मदत करण्याऐवजी त्यांच्यातल्या धर्मांध वृत्तीला पाठीशी घालून धर्मवेडाला संरक्षण करत असतात. यालाच मी दुटप्पीपणा म्हणतो. तो नुसता निरुपयोगी असता तर गोष्ट वेगळी होती. पण तो निरुपद्रवी नसून मुस्लिम लोकसंख्या व एकूणच भारतीय समाजाला विघातक आहे. एका बाजूला असा दुटप्पीपणा हिंदुंच्या मनात शंका निर्माण करून त्यांना अस्वस्थ करीत असतो. तर दुसरीकडे मुस्लिमांच्या विकासात अडथळा बनून त्यांना हिंदुंच्या रोषाचे बळी बनवत असतो.

   जो समाज पुढारलेला आहे व सोशिक आहे त्याला विश्वासात घेऊन जो मागे पडला आहे त्याला सुधारण्यासाठी प्रवृत्त करणे, याला प्रागतिक विचारसरणी म्हणतात. त्याचा मागमुस कुठेतरी या सेक्युलर टोळीमध्ये दिसतो काय? विविध धार्मिक समाजघटकात परस्परात भांडणे लावणे, त्यांच्यात संशयाचे वातावरण असेल तर त्यात तेल ओतणे, त्यांना चिथावण्या देणे, यापेक्षा सेक्युलर शहाणे काही वेगळे काम करताना आपल्याला दिसतात काय? आता ते थेट न्यायालयाच्याही नजरेत भरू लागले आहे. वरील न्यायालयाची टिप्पणी त्यातूनच आलेली आहे. सेक्युलर इच्छाशक्ती पांगळी पडताना दिसते असे न्यायालय म्हणते आहे. कारण ते आता अधिक स्पष्ट दिसते आहे. याचे कारण सिटिझन फ़ॉर पीस संस्था म्हणते, त्याप्रमाणे राजकीय भुमिका कारणीभूत झाली आहे. जे लोक स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेतात व वाहिन्यांवर तावातावाने बोलताना दिसतात, ते खरे विचाराने सेक्युलर नसून, त्यांना राजकीय लाभासाठी सेक्युलर भूमिका वापरायची असते. त्यात जो समाजघटक वा धार्मिक घटक लौकर आपल्या बाजूला येऊ शकेल, त्याला दुसर्‍याबद्दल भयभीत करण्यासाठी सेक्युलर भुमिकेचा वापर होत असतो. ’इस्लाम खतरेमे’ अशी गर्जना केली, मग मुस्लिम एकत्र येतात ही जगभरची वस्तुस्थिती आहे. इथे त्याचाच गैरवापर करून घेण्यात आला आहे. हिंदू आक्रमक होत आहेत, हिंदू संघटित होत आहेत, असे भय मुस्लिमात माजवून त्यांची एकगठ्ठा मते मिळवता येत असतात. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे तेच करताना दिसतील. त्यांचा डोळा धर्मनिरपेक्षतेवर नसून, त्याच्या आडोशाने मिळू शकणार्‍या मतांवर आहे. त्यामुळेच या राजकीय सेक्युलर अवताराने खर्‍या सेक्युलर विचारांचा बोजवारा उडवला आहे.

   मग जे सेक्युलर हिंदुंना धर्मात सुधारणा सांगून प्रवचन देतात, तेच मुस्लिमांच्या जुनाट परंपरांचे समर्थन करताना दिसतील. राजीव गांधी पंतप्रधान असताना शहाबानू खटल्याचा निकाल लागला होता. तब्बल तीन दशके खालच्या कोर्टापासून लढत सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या त्या खटल्यात, शेवटी शहाबानू या वृद्धेला न्याय मिळाला होता. तोही धर्मरुढीशी संबंधीत नव्हता, तर भारतीय दंडविधानानुसार झालेला निवाडा होता. पण त्याला धर्माचरणातील ढवळढवळ, असे ठरवून काही मुस्लिम धर्ममार्तंडांनी गदारोळ केला. मग त्यात मुस्लिम राजकीय नेते सहभागी झाले. तेव्हा लोकसभेत प्रचंड बहुमत असलेल्या राजीव गांधींचे पाय डळमळले. त्यांनी मुल्लामौलवींसमोर शरणागती पत्करून दंडविधानात बदल केला. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय फ़िरवणारा कायदा संसदेत संमत करून घेतला. दंडविधान हा धर्मविषयक कायदा नाही. त्यात धर्म आणला कोणी? कुणा हिंदूत्ववादी सरकार वा पक्षाने तो भेद निर्मांण केलेला नाही, तर सेक्युलर म्हणून अहोरात्र जपमाळ ओढणार्‍या कॉग्रेसने तसा भेदभाव निर्माण केला. त्याच्या विरोधात कोण उभा राहिला? कुणा सेक्युलर संपादक, बुद्धीमंताला नाव तरी आठवते का त्या लढवय्याचे? तो मुस्लिम तरूण कॉग्रेसचाच नेता होता आणि राजीव गांधींच्या सरकारमधला मंत्री सुद्धा होता.

   आरीफ़ महंमद खान असे त्याचे नाव. त्याने राजीवच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आपल्या केंद्रिय मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला होता. आपण ज्या पक्षात आहोत वा ज्याला सेक्युलर समजतो, तो पक्का धर्मांध लोकांचे लांगुलचालन करणारा आहे, असा संताप आल्यानेच त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले होते. किती सेक्युलर कॉग्रेसजन वा उदारमतवादी बुद्धीमंत, संपादक त्याच्या समर्थनाला तेव्हा उभे राहिले? किती अन्य पक्षातले सेक्युलर नेते आरीफ़खानची पाठ थोपटायला पुढे आले? जे आज बाबरी वा गुजरातसाठी अखंड गळा काढत असतात, त्यापैकी किती शहाणे तेव्हाच्या त्यांच्या धाडसाचे पुरावे देऊ शकतील? तिथेच या तथाकथीत सेक्युलर शहाणे पत्रकार, बुद्धीमंत, संपादकांचे पितळ उघडे पडते. त्यांचे सगळे शहाणपण व धाडस जिथे विरोधाची शक्यता नाही वा आक्रमक धर्मवादाचा धोका नसतो, तिथेच त्यांचे शौर्य ते गाजवताना दिसतील. पण जिथे तसा धोका असतो, तिथे ते एकजात बिळात दडी मारून बसल्याचाच इतिहास आहे. म्हणूनच मी त्याला थोतांड म्हणतो. हिंदू समाज धर्माच्या आधारे मतदान करत नाही. व्यवहारात हिंदू म्हणुन वागत नाही, म्हणून हे शहाणे त्याच्यावर तोंडसुख घेत, आपल्या सेक्युलर असण्याचे प्रदर्शन मांडत असतात. पण जिथे धर्मभावना तीव्र व आक्रमक असतात, त्या ख्रिश्चन वा मुस्लिम समाजाच्या धार्मिक सुधारणेचा विषय आला, मग हेच शहाणे सेक्युलर भाषा विसरून समजूतदारपणाचे प्रवचन देऊ लागतात. त्यातून मग आता सहिष्णू, सोशिक हिंदू समाजात देखील संशयाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. सिटीझन फ़ॉर पीस या संस्थेने त्याची निदान दखल घेतलेली दिसते. हा सगळा जो भोंदूपणा आहे त्यानेच समाजमन भ्रष्ट केले असून संपुर्ण समाजजीवनात भ्रष्टाचारच शिष्टाचार बनत गेला आहे. त्याचा दुसरा दाखला पुढल्या भागात वाचू या.  (क्रमश:)

भाग  ( २१७ )    २६/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा