सोमवार, २६ मार्च, २०१२

सेक्युलर पापातले माफ़ीचे साक्षीदार



   मी सेक्युलर मंडळींच्या विरोधात लिहितो, बोलतो म्हटल्यावर मला आपोआपच जातियवादी ठरवता येत असते. याला लेबल लावणे म्हणतात. जेव्हा बौद्धिक व तर्कशुद्ध प्रतिवाद करता येत नसतो, तेव्हा माणसे अशीच वागतात. कारण लेबल लावले वा शिक्का मारला, मग त्यावर पांघरूण घालणे सोपे जात असते. आज माहितीचा अधिकार झाल्यामुळे अनेक गोष्टी सहजगत्या आपल्याला कळू शकतात. तो अधिकार कायद्याने मिळाला नव्हता तेव्हा कुठल्याही फ़ाईल, कागदपत्रावर गोपनिय असा शिक्का मारून, ती माहिती लपवली जात होती. लेबल लावणे  हा त्यातलाच प्रकार आहे. कोणाला जातियवादी म्हणून लेबल लावायचे, तर कुणाला सेक्युलर म्हणुन लेबल लावायचे, मात्र त्याचा खरेखोटेपणा तपासू द्यायचा नाही. आजकालचा सेक्युलॅरिझम व जातियवाद तसाच आहे. त्यात तथ्य काहीच नसते. स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेतात ते कोणावरही अशी लेबले चिकटवत असतात. थोडक्यात ते जातियवादालाही सेक्युलर लेबल लावून शुद्ध करून घेतात आणि कोणा सेक्युलराला जातियवादाचे लेबल डकवून बदनाम करत असतात. माझा राग वा आरोप अशा भंपक व बोगस सेक्युलर लोकांवर आहे. त्यांनाच मी आधूनिक भटजी म्हणत असतो. आजचा बोकाळलेला जातियवाद, जातिय-धार्मिक तेढ ही त्यांच्याच अतिरेकाची देणगी आहे. आणि भाऊ नेहमी पुराव्यानिशी बोलतो. त्यामुळेच माझ्याकडे त्याचा पुरावाच नव्हे तर माफ़ीचा साक्षीदार सुद्धा आहे.

   माफ़ीचा साक्षीदार हा गुन्ह्यातला साथीदार असतो. पण नंतर पश्चात्ताप झाला म्हणुन वा स्वत:ची कातडी बचावण्यासाठी तो गुन्ह्याची कबूली देत असतो. आपलाल्या साथीदारांच्या पापाचे पाढे वाचत असतो. ’सिटीझन फ़ोर पीस’ नावाची अशीच एक सेक्युलर संस्था संघटना आहे. त्यात अठरापगड भाषा धर्माचे उच्चभ्रू लोक सदस्य आहेत. १९९२-९३ च्या मुंबईतील भीषण दंगलीनंतर त्यांनी धार्मिक सदभावना वाढीस लागण्यासाठी व सहिष्णूता नांदावी, म्हणून ही संस्था स्थापन केली होती. निदान त्यांचा तसा दावा आहे. आज दोन दशकांचा कालावधी उलटून गेल्यावर, त्यांनी या सेक्युलर प्रांतात काय पल्ला गाठला आहे? से,क्युलर समाज व धार्मिक सदभाव निर्माण होणे दुर, उलट विविध धर्मियांमध्ये अधिकच कटूता निर्माण झाल्याची शंका त्यांन भेडसावू लागली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दशकात जो सेक्युलॅरिझम डोक्यावर घेतला त्याचा पुनर्विचार करावा असे त्यांना वाटू लागले आहे. किंबहूना त्याच सेक्युलर विचारांच्या अतिरेकाने  धार्मिक सहभावाला तडा जाऊन भिन्न धर्मियांत परस्पर संशय वाढल्याचे त्यांना दिसून आले आहे. त्याचमुळे त्यांनी सेक्युलर म्हणून जे काही थोतांड माजवले जाते त्याचा नव्याने विचार व्हावा, म्हणून त्यंनी एक प्रबंधच सार्वजनिक विचारासाठी मांडला आहे. त्याची वाच्यता रोज त्याच सेक्युलर भुमिकेची आरती ओवाळणार्‍या पत्रकार वा जाणकारांच्या चर्चेत का येऊ नये? त्याचा उहापोह त्यांनी आपल्या वाहिन्यांवरील चर्चेत वा वृत्तपत्रिय लिखाणात का करू नये?

   कुठलाही भोंदू बाबा वा भगत आपल्या फ़सलेल्या वा उघड्या पडलेल्या पापाबद्दल कधी आपण होऊन बोलतो का? तीच या सेक्युलर भोंदू शहाण्याची कहाणी आहे. या प्रबंधाने त्याची पापे व भोंदूगिरी चव्हाट्यावर आणली आहे. मग ते त्याची दखल कशाला घेतील? काय सांगावे उद्या हेच भोंदू त्याही त्यांच्या जुन्या सहकारी साथीदारांवर जातियवादी असाही आरोप करायला मागेपुढे बघणार नाहीत. या प्रबंधाची सुरूवातच सेक्युलर भोंदूगिरीचा मुखवटा फ़ाडून करण्यात आलेली आहे. त्याची पहिली वाक्येच स्पष्ट आहेत.

" जो सेक्युलॅरिझम आपण जाणतो त्याने, या देशाला अनेक बाजूंनी अपयशी बनवले आहे, असे आम्हाला वाटते. सेक्युलॅरिझमच्या संपुर्ण कल्पनेबद्दल आत्मपरिक्ष्णाची व त्यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे, की ज्यामुळे त्यात नवा जोश येऊ शकेल व त्या्ला भारताच्या संदर्भात नवा अर्थ प्राप्त होऊ शकेल."  

   सार्वत्रिक विचारार्थ मांडलेल्या या प्रबंधामध्ये किंचीत का होईना प्रामाणिकपणा आढळतो, जो बहूधा उर्वरीत मिरवणार्‍या सेक्युलरांमध्ये नसतोच. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे राजकारणी, पत्रकार, समाजसेवक, बुद्धीमंत, विश्लेषक सहसा हिंदूविरोधी बोलतात, मग आपण सेक्युलर झालो असे मानतात. सरसकट हिंदू समाज वा हिंदू संघटनांना शिव्याशाप दिले, म्हणजे सेक्युलर झालात असे आजचे चित्र आहे. निदान बहुसंख्य हिंदूंना आता तसे वाटू लागले आहे. काहीजण तर सेक्युलर असणे म्हणजे हिंदूविरोधी व मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांधतेचे समर्थक असेच मानले जाऊ लागले आहेत. या समजूतीची दखल निदान या प्रबंधात घेतली गेली आहे. त्यामुळेच हे लोक निदान आपल्या सेक्युलर विकृतीबद्दल डोळस आहेत म्हणायला लागेल. वास्तवात सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे होय. पण आपल्या देशात त्याचे एक विकृत चित्र व रूप, इथल्या राजकीय सेक्युलरांनी निर्माण करून ठेवले आहे. त्याचाच हा दुष्परिणाम आहे. त्यामुळेच सेक्युलरांनीच तो बदनाम केला आहे. जो विचार निष्पक्ष असायला हवा तोच पक्षपाती केल्यावर दुसरे काय होणार?

   याचे एक ताजे उदाहरण पुरेसे आहे. नुकत्याच जालेल्या निवडणुकीत अकाली दल व भाजपावर दिग्विजय सिंग व कॉग्रेस जातियवादाचा आरोप करत होते. पण तेच स्वत: शिखांचा दुसरा पंथ असलेल्या डेरा सच्चा सौदा अनुयायांची मते मिळवण्यासाठी, त्या पंथाच्या प्रमुखाकडे पाय धरायला गेलेले होते. ही धर्मनिरपेक्षता असते काय? यालाच सेक्युलॅरिझम म्हणतात काय? मुलायमसाठी दिल्लीच्या जुम्मा मशीदीचे शाही इमाम मते मागत फ़तवा काढून फ़िरत होते. तरी मुलायम सेक्युलर असतो म्हणजे काय? शंकराचार्य असे भाजपासाठी फ़िरले असते तर हेच सेक्युलर पत्रकार काय म्हणाले असते? ह्याला सेक्युअर म्हणत नाहीत तर मुस्लिमधार्जिणेपणा म्हणतात वा त्यालाच मग हिंदू मनात हिंदूविरोधी भुमिका समजले जाते. ही नेमकी बाब उपरोक्त प्रबंधामध्ये कथन केली आहे. त्यात आजच्या राजकीय सेक्युलर थोतांडाच्या याच दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले आहे.  तेवढेच नाही, मतांसाठी ज्याप्रकारे सेक्युलर भुमिकेचे राजकीय विकृतीकरण करण्यात आले, त्यानेच तो उदात विचार कसा बदनाम झाला त्याचाही उल्लेख आहे. म्हणुनच मी त्याला एक प्रामाणिक प्रयत्न म्हणतो.

   या विकृतीकरणाने लोकांना सेक्युलर वा सहिष्णू बनवण्यापेक्षा त्यांच्यात धार्मिक भेदभावाची जाणीव निर्माण केली. त्याची सुरूवात बाबरी पाडण्यापासून वा अयोध्येत राममंदिर बांधण्यच्या हट्टातून नव्हे, तर त्याच्याही आधी शहाबानू खटल्याचा निकाल बदलण्यापासून झाली; हेही या प्रबंधात आलेले आहे. ही सर्वसामान्य माणसाची समजूत असेल असा त्यावर निर्ढावलेले सेक्युलर बदमाश शिक्का मारतील, याची मला कल्पना आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमुर्ती सामान्य माणूस नसतो ना? सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही असेच मत व्यक्त केलेले आहे. याला म्हणुनच जेवढे हिंदू वा मुस्लिम धर्मांध जबाबदार नाहीत, त्यापेक्षा अधिक अर्धवट सेक्युलर कारणीभूत झालेले आहेत. त्यांनीच जातीधर्माच्या विरोधात संदर्भहीन पोरकटपणा करताना सेक्युलर विचारांचा बोजवारा उडवला आहे. आज आपण जे दुष्परिणाम पहातो ते याच अतिरेकातून आलेले आहेत. गुजरातच्या दंगलीसाठी घसा फ़ुटेपर्यंत बोंबलणारे, कधी चुकून दिल्लीच्या निर्वासित छावण्यात खितपत पडलेल्या काश्मिरी पंडितांबद्दल सहानूभूतीने बोलताना आपण ऐकतो का? तिथे सामान्य माणसाला पक्षपात व भेदभाव जाणवू लागत असतो. त्यामुळे तो सेक्युलॅरिझमकडे संशयाने पाहू लागतो. त्याला हे सगळे थोतांड वाटू लागते. ही मनातली धुसफ़ुस तो सामान्य माणुस वाहिन्यांवर येऊन सांगत नसतो, कारण त्याला कोणी विचारत सुद्धा नाही. आणि बोललाच तर ते काटूनछाटून दाखवले जात असते. मग ती  मनातली वेदना कधी दंगल पेटते तेव्हा स्फ़ोट्क रुप धारण करत असते. त्याचे भान दिडशहाण्या सेक्युलरांना नसले तरी त्यांच्याच काही भाईबंदांना होत असेल वा झालेले असेल, तर त्यांचे स्वागतच करायला हवे. कारण सगळ्याच गोष्टी व समस्यांवर कायद्यात व न्यायालयात उत्तरे नसतात. समाजात नेहमी समजुतदारपणानेच मोठे प्रश्न सुटत असतात. परस्पर विश्वासाने जेवढी सुरक्षा समाजात निर्माण होते तेवढी सुरक्षा कायदा करू शकत नाही. आणि ते काम भांडणे लावून, वाद वाढवून वा रंगवून होत नसते. ज्यांना या मुळ प्रबंधात रस आहे त्यांनी इंटरनेटवर पुढील दुव्यावर जाऊन तो जरूर वाचावा.  (क्रमश:)
भाग  ( २१५ )    २४/३/१२
 http://www.citizensforpeace.in/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=56&Itemid=55 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा