शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

सैया झुठो का बडा सरताज निकला   दिल्लीत सध्या काय चालू आहे? एका बाजूला संसदेत तेलंगणा राज्यनिर्मितीचा घोळ आहे. लोकसभा राज्यसभेत धुमाकुळ आहे आणि दिल्ली विधानसभा स्थगीत करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. दुसरीकडे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यात मुरलेल्या जुन्या पक्ष व नेत्यांसह नवख्या आम आदमी पक्षानेही मुसंडी मारलेली आहे. त्यासाठी अवघा दिड वर्ष वय असलेल्या या पक्षाच्या तरूण नवख्या मुख्यमंत्र्याने राजिनामा देऊन ज्या प्रकारचे राजकारण केले; त्यामुळे नुसतेच जुने राजकारणी नव्हेतर भले भले राजकीय विश्लेषकही चक्रावून गेलेले आहेत. आजवरच्या राजकीय अभ्यासाला या नव्या राजकीय घडामोडीचे आकलन करताना नाकी दम येतो आहे. केजरीवाल व त्यांचा नवा पक्ष राजकारणात नवे पायंडे पाडतो आहे, की असलेल्या व्यवस्थेला उध्वस्त करतो आहे, याचेच रहस्य उलगडताना अनेकांची दमछाक झाली आहे. कारण त्यात केजरीवाल एकीकडे मोठा इमानदार राजकारणी वाटतो, तर दुसरीकडे त्याच्या वागण्याविषयी अनेक शंका संशय मनात येत रहातात. या पक्षाला काय हवे आहे वा करायचे तरी काय, असा प्रश्न पडतो. त्यांनी असे का वागावे, त्याचेही आकलन होत नाही. होणार्‍या चर्चा इतक्या उथळ व संदर्भहीन असतात, की त्यामधून गोष्टी स्पष्ट होण्यापेक्षा अधिकच गुंतागुंत होत जाते. पण समजून घ्यायला वा उलगडायला हे खरेच इतके जटील कोडे आहे काय?

   मंगळवारी दैनिक ‘पुढारी’मधून याच विषयावर दिर्घलेखातून विश्लेषण करायची सूचना मिळाली, तेव्हा मी प्रवासात होतो. सातार्‍याहून पुण्याला निघालो होतो. फ़ोन संपला आणि बस पकडून निघालो, तेव्हा वार्‍यावर डोळा केव्हा लागला कळलेच नाही. पाऊण तासाने खंबाटकी घाटाला बगल देण्यार्‍या बोगद्यातून बस उतरत असताना बसमधल्या काही शाळकरी पोरांनी गलका केला आणि जाग आली. पुढे शिरवळ येईपर्यंत सैरभैर विचारांना गवसणी घालताना अचानक एक जुने चित्रपट गीत आठवले. चोपन्न वर्षापुर्वी यश चोप्राने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटातले खुप गाजलेले ते युगलगीत आहे. महेंद्र कपूर व लतादिदींनी गायलेले आणि राजेंद्रकुमार व माला सिन्हा यांच्यावर चित्रीत झालेले. जसजसे ते गीत गुणगुणत गेलो, तसतसे दिल्लीतल्या आजच्या जटील राजकारणाचे अनेक धागे उलगडत गेले आणि नीरा नदीच्या पुलावर येईपर्यंत मनातल्या मनात गीतकार साहिर लुधयान्वीला साक्षात दंडवत घातला. आजच्या राजकीय अभ्यासकांना, जाणकारांना जे कोडे सतावते आहे, त्याचे भाकित या कवीने तब्बल चोपन्न वर्षापुर्वी आपल्या लोकप्रिय गीतामध्ये करून ठेवलेले असावे? अगदी मोजक्या व नेमक्या शब्दातले ते गीत मी शाळकरी वयात ऐकलेले. हजारदा तुम्ही सुद्धा ऐकलेले असेल. अर्थात तेव्हा चित्रपट बघता आलेला नव्हता. दहा वर्षानंतर कॉलेजच्या काळात बघितला. ती सगळी कथा आठवली. आपण मनपुर्वक वा अनवधानाने कितीतरी गाणी ऐकतो. पण खरेच त्यातल्या गर्भित अर्थाकडे वळून तरी बघतो काय? त्या चित्रपटातला नायक नायिका एक प्रेमगीत गातात

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ......
हसीनो से अहद ए वफ़ा चाहते हो
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो....

   यातला प्रेमवीर बाजूला ठेवा. प्रेमाने भारावलेली प्रेयसी बाजूला ठेवा. त्यांच्यात सामावलेला केजरीवाल किंवा भारावलेली दिल्लीची जनता आपण बघितली काय? त्यांच्यातच नवनवे राजकीय पक्ष वा नेते आणि त्या त्या कालखंडात भारावलेली मतदार जनता आपण बघू शकलो आहोत काय? हातात झाडू घेऊन देशाला भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेल्या केजरीवाल व त्याच्या सख्यासोबत्यांनी दिल्लीकरांना मागल्या सहा महिन्यात जी मधूरवाणीने भुरळ घातली; त्याचे शब्द, त्यातला आशय महेंद्रकपूरच्या स्वरापेक्षा कितीसा वेगळा होता? त्याला साशंक मनाने दाद म्हणजे मते देणार्‍या दिल्लीच्या मतदाराचा सावध प्रतिसाद लताच्या स्वरापेक्षा भिन्न होता काय? फ़क्त तुम्ही साथ द्या आणि बघा, अवघे जग आपण उलथेपालथे करून टाकू; असाच त्यातला आशय नाही काय? त्यातला आर्जवी स्वर आणि तितकेच आश्वासक शब्द. तो प्रेयसीला म्हणतो तुझे मंदीर उभारून तुझी पूजा बांधीन. पण त्याच्या प्रेमाला सावध प्रतिसाद देणारी ती प्रेयसी पदोपदी त्याला इशारा देते आणि धोके दाखवते आहे. पण बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला प्रियकर कुठे शुद्धीवर येतो? त्याची मर्दुमकी चालूच असते तो म्हणतो

दुपट्टे के कोने को मुँह में दबा के
ज़रा देख लो इस तरफ़ मुस्कुरा के
मुझे लूट लो मेरे नज़दीक आ के
कि मैं मौत से खेलना चाहता हूँ,
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ

रिवाज़ों की परवाह ना रस्मों का डर है
तेरी आँख के फ़ैसले पे नज़र है
बला से अगर रास्ता पुर्खतर है
मैं इस हाथ को थामना चाहता हूँ, 
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हू

   केजरीवाल व त्यांच्या पक्षाने दिल्लीकरांना भेडसावणार्‍या प्रत्येक समस्येवर सोपा उपाय काढला होता. प्रत्येक नियम ही जगण्यातली अडचण आहे, म्हणूनच प्रत्येक कायदा झुगारून लावा, प्रत्येक कायदाच भ्रष्टाचाराची जननी आहे, तो पायदळी तुडवा. यापेक्षा त्यांची भूमिका तसूभर वेगळी होती काय? केजरीवाल व त्यांच्या पक्षाची भूमिका त्या गाण्यात अशी येते. ‘जनलोकपालके लिये सौ कुर्सिया कुरबान, भ्रष्टाचारसे कोई सौदा नही’, हे ऐकायला खुप बरे वाटते. पण ज्या परिस्थितीत केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे भवितव्य राज्यपालाच्या हाती सोपवून पळ काढला आहे, त्यातून आता लोकांनी आपले निवडून दिलेले आमदारही निरूपयोगी झालेले आहेत. त्यांना कुठला अधिकार राहिलेला नाही. त्या बदल्यात दिल्लीकरांच्या नशीबी काय आले?

   वीजेचे दर अर्धे करणार, सातशे लिटर मोफ़त पाणी, साडेतीन लाख हंगामी कर्मचार्‍यांना कायम नोकरीत घेणार, ज्यांनी आंदोलनात सहभागी होऊन दिड वर्ष वीजेची बिलेच भरली नाहीत, त्यांना अर्धी बाकी माफ़; इत्यादी सगळी आश्वासने बारगळली आहेत. ही सगळी आश्वासने पुर्ण करण्याचा मार्ग भलताच कठीण म्हणजे ‘पुर्खतर’ आहे असे सगळेच ओरडून सांगत होते. पण आपल्या नायकाला पर्वा कुठे होती? ‘बला से अगर रास्ता पुर्खतर है’. ज्यांनी केजरीवाल यांच्यावर विसंबून ह्या सर्व गोष्टी केल्या; त्यांच्यावर आज काय परिस्थिती आलेली आहे? ते सर्व कर्मचारी आजही हंगामी कंत्राटी आहेत, ज्यांनी दीड वर्षापासून वीजबिले थकवली, त्यांच्या बोकांडी पंधरावीस हजाराची बिले बसली आहेत. पाण्याची टंचाई कायम आहे. आणि हे सगळे धोके दिल्लीकरांनी प्रेमात पडलेल्या प्रेयसीसारखे ओढवून आणलेले नाहीत काय? कळत असूनही ते धोके पत्करलेले नाहीत काय? मौतसे खेलनेवाला फ़रारी झाला आहे आणि बिचारी जनता गोत्यात सापडली आहे. प्रत्येक युगात आणि प्रत्येक समाजात असे क्रांतीकारक येतच असतात आणि त्यानी घातलेली भुरळ त्या त्या कालखंडात जनतेला भुलवतच असते. आपल्या मनातल्या शंका संशय गुंडाळून जनता त्या स्वप्नाला भुलतच असते. केजरीवाल नावाच्या जादूगार प्रियकराचे समिकरण कुठे फ़सले? काय चुकले त्याचे? साहिरने त्याचेही उत्तर त्याच गाण्यात प्रेयसीच्या मुखातून दिलेले आहे.

ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
कि तुम हुस्न को पूजना चाहते हो, 
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
उन्हीं से मुझे माँगना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो 

काळजीपुर्वक वरच्या एक एका ओळीचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न आपण कधीच केलेला नाही. करीतही नाही. कुठल्याही समाजात झटपट क्रांती होत नसते. बदल होतच असतात आणि जुन्या गोष्टी टाकून नव्या स्विकारल्या जात असतात. पण कुठलेही बदल रातोरात होत नाहीत. काही नव्या गोष्टी काळानुरूप येतात आणि जुन्यांना बाजूला सारून प्रस्थापित होतात. पण जादूची कांडी फ़िरवावी, तसे मोठे बदल होत नाहीत. जो कोणी असे करायचे म्हणतो, तो एकतर लफ़ंगा असतो किंवा मुर्ख तरी असतो. आणि साहिरच्या गीतातली प्रेयसी त्याचीच ग्वाही देते. ‘कि खोना भी पड़ता है पाने के पहले, इजाज़त तो ले लो ज़माने से पहले’.

   जितका हे गीत मी गुणगुणत गेलो, तितका मला दिल्लीतल्या नव्या राजकीय वादळाचा अर्थ सहज उलगडत गेला. वयात येणार्‍या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असाच एक वादळी कालखंड येत असतो. जिथे तिचेच आयुष्य नव्हेतर अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकू शकेल, असे भासवणारा कोणीतरी प्रियकर तरूण भेटत असतो, भुरळ घालत असतो. त्यापेक्षा मानवी समाजाची अवस्था वेगळी नाही. ग्रासलेल्या किंवा गोंधळलेल्या समाजाला त्यापासून मुक्ती देणारा कोणीतरी प्रेषित उद्धारकर्ता हवाच असतो आणि आसपासच्या जाचक वाटणार्‍या जगाला उध्वस्त करून टाकायची त्याची भाषा त्या समाजाला भुरळ घालत असते. त्याच्या कल्पना, स्वप्ने वा शब्दाविषयी हळव्या मनातल्या शंकाही सावधानतेचे इशारे देत असतात. पण हुरळलेले मन सावधानतेला झुगारून धोक्यांकडे झेपावापयला उतावळी होतच असते. दिल्लीकर मतदारांची मानसिकता त्यापेक्षा वेगळी नव्हती. अजूनही त्या भुलभुलैयातून दिल्लीकर पुर्णत; बाहेर पडू शकला, असे आपण म्हणू शकत नाही. आणि दिल्लीकर कशाला देशाच्या अन्य शहरातले कित्येक सुशिक्षीत, सुखवस्तू लोकही केजरीवाल यांच्या पक्षाची भुरळ घालणारी भाषा ऐकून आज भारावलेले आपण बघू शकतो. त्यात नवे काहीच नाही. व्यक्तीगत जीवनात किंवा सार्वजनिक जीवनात असे सातत्याने घडल्याचे इतिहासात दाखलेच आहेत. पण त्यामुळे कायदे-नियम वा संकेत, परंपरांच्या जंजाळातून मानव समाज कधीच मुक्त होऊ शकलेला नाही. कारण समाज म्हणून जगताना जी सुरक्षीतता व स्थैर्य अत्यावश्यक असते, त्यासाठी नियम कायद्याचे जोखड मानेवर घ्यावेच लागते.

   स्वस्तात वीज, मोफ़त पाणी वा कायमची नोकरी हवी, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण त्या सुविधांच्या उभारणीचा खर्च करण्याच्याही तरतुदी करायला हव्यात. त्या करणार्‍याला परवडणेही आवश्यक असते. त्यात लूटमार असू नये, हे मान्य केले तरी त्याचा व्यवहार जमवावा लागतो. दुसर्‍यांवर चोर डाकू असे आरोप केल्याने त्यावरची उत्तरे सापडत नसतात. म्हणूनच जीवन नियमात व कायद्यात बसवावे लागते. जमाखर्चाचे गणित जु्ळवावे लागते. ज्याला ती प्रेयसी रिवाज म्हणते. ‘यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में’ याचा अर्थ इतका सोपा आहे. मग तो रिवाज वीजदरातला असेल, पाणीपुरवठ्यातला असेल, धरणी वा सत्याग्रहाशी संबंधीत असेल, प्रशासकीय सत्ता विकेंद्रीकरणाचा असेल. विकेंद्रीत सत्ताधिकाराचा असेल. त्याचा स्विकार करून त्याच्या मर्यादेत राहूनच व्यवहार चालवावे लागतात. त्यात उतरून त्यांची कालबाह्यता सिद्ध करून त्यात बदल करावे लागतात. आपण कशाची पर्वा करीत नाही, असे बोलणे धाडसाचे असले तरी परिणामशून्य असेल तर घातकच असते. उतावळ्या प्रियकरासारखे असते. दिल्लीच्या राजकारणाचा म्हणूनच एक मनोरंजक थरारक सिनेमा होऊन गेला. दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की इथे कथानकातली पात्रे यश चोप्राच्या चित्रपटासारखी काल्पनिक नाहीत. खरीखुरी दिल्लीची आम जनताच त्याचे दुष्परीणाम भोगते आहे.

   देशाला १९४७ सालू स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्या लोकशाही देशाचे व समाजाचे भवितव्य कोणत्या दिशेने जायचे; याची दिशा ठरवण्यात देशातल्या जाणकारांनी तब्बल तीनचार वर्षे खर्ची घातली. घटना समिती बनवून एकीकडे देशाचा हंगामी कारभार चालवणार्‍या नेत्यांनी दुसरीकडे दुरगामी दिशा देणारी राज्यघटना बनवली. त्यानुसार पहिल्या निवडणूका व्हायला व पहिले निर्वाचित सरकार सत्तेवर यायला, तब्बल पाच वर्षाचा कालावधी उलटला. त्यातून आकाराला आलेले कायदे व व्यवस्था म्हणजेच आजच्या भारतीय समाजाचे ‘रिवाज’ झालेले आहेत. त्यात जुने व कालबाह्य होतात, त्यांना काळानुसार निकालात काढून त्यांच्या जागी नवे कायदे व नियम आणायची व्यवस्थाही त्याच राज्यघटनेत केलेली आहे. शेकडो राष्ट्रीय नेते या साडेसहा दशकांच्या काळात उदयास आले व कालौघात गडपही झाले. पण आजही देशाची राज्यघटना कायम आहे आणि तिने निर्माण केलेली व्यवस्था या देशाच्या अब्जावधी जनतेला आश्वासक सुरक्षीत जीवनाची हमी देते आहे. त्याच व्यवस्थेला झुगारणारे केजरीवाल पहिलेच नाहीत. त्यात खोट काढणारा आम आदमी पक्ष पहिलाच नाही. यश चोप्राच्या तरूणपणी त्यांनी काढलेल्या त्या क्रांतीकारी चित्रपटाची कथाही अर्धशतकात खुप बदलत गेली. तीस वर्षानंतर ‘दिलवाले’मध्येही त्यांनी रिवाजांशी झुंजणारा, पण रिवाज बदलण्यासाठी मागल्या पिढीला भाग पाडणारा नवा नायक रंगवला. प्रत्येक पिढी आपल्या परीने व्यवस्थेतले जाचक बदल झुगारून उभी ठाकते आणि तेव्हा सोयीचे ठरतील असे बदल त्यात घडवून आणते, प्रस्थापित व्यवस्थेमध्ये ही नवी पिढी काही परिणामकारक बदल घडवून आणते. पण आमुलाग्र बदल कधीच घडत नाहीत. त्या डागडूजीलाच परिवर्तन म्हटले जाते. व्यवस्था आपल्या जागी कायम असते. कारण व्यवस्था ही मानवी समाजाची आत्यंतिक गरज असते. या उलथापालथीमध्ये अनेकांच्या व्यक्तीगत जीवनामध्ये वादळे येतात. त्यांना मग समाज उदात्त होऊन हौतात्म्य बहाल करीत असतो.

   तीनचार पिढ्यांच्या फ़रकाने बघितले, तर त्या समाजात आमुलाग्र बदल झालेले दिसतात. त्याचे कारण हे असे बदल प्रत्येक पिढीच्या धक्काबुक्कीतून घडत असतात. पण एकाच पिढीत मोठा बदल झाला, असे सहसा होत नाही. कारण कुठलाही समाज एकाच पिढीतल्या आमुलाग्र बदलासाठी मोजावी लागणारी मोठी किंमत द्यायला सहसा राजी होत नाही. दिल्लीतले राजकीय वादळ तसेच एका चित्रपट कथेसारखे मनोरंजक असले, तरी त्याचे काहीसे परिणाम विद्यमान राजकीय व्यवस्थेवर होणारच. पण केजरीवाल किंवा त्यांचे सवंगडी म्हणतात, तितके आमुलाग्र बदल निदान त्यांच्याकडून घडण्याची शक्यता नाही. कारण त्यासाठी मोजावी लागणारी प्रचंड किंमत द्यायची त्यांची तयारी कुठेच दिसली नाही. त्यांनीही आपल्या कामातून वा व्यवहारातून पळवाटाच शोधून चलाखी करण्यात धन्यता मानलेली दिसली. अनुदानातून आपल्या मतदारांना सवलती देणे वा नुसत्याच आरोपातून अन्य पक्षांना गुन्हेगार ठरवण्याची त्या पक्षाची कार्यशैली; कुठल्याही अन्य प्रस्तापित राजकीय पक्षाइतकीच बनेल व लबाड होती व आहे. एखाद्या रेल्वेच्या प्रवासात कडाक्याचे भांडण हमरातुमरी करून गर्दीत आपल्याला जागा मिळवली जाते त्यातलाच प्रकार. त्यापलिकडे आम आदमी पक्ष वा केजरीवाल यांनी अधिक योगदान भारतीय राजकारणाला दिले असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांनी प्रस्थापित राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. एखाद्या प्रेमवीराने प्रेमविवाह करून आपण जगातला मोठाच अभूतपुर्व पराक्रम केल्याच्या थाटात मिरवावे आणि नेहमीच्या जगात स्वत:ला समावून घ्यावे; त्यापेक्षा अधिक काही झाले आहे काय?

   मुख्यमंत्रीपद गेल्यावर निवासस्थान न सोडणार्‍या राबडीदेवी आणि केजरीवाल यांच्यात किती फ़रक आहे? प्रत्यारोप झाल्यावर तोंड लपवून बसणार्‍या मुलायमपेक्षा केजरीवाल वेगळे आहेत काय? जनता दरबार सोडून पळणार्‍या केजरीवालांपेक्षा निदर्शनांसमोर न आलेले मनमोहन सिंग वेगळे कसे? दारात धरणे धरलेल्या शिक्षकांकडे ढूंकून न बघणारे केजरीवाल आणि निदर्शकांवर लाठीमार करणारे अखिलेश यादव भिन्न कसे? बाकीचे आपल्या इमानदारीची अहोरात्र जपमाळ ओढत नाहीत. तेवढा फ़रक सोडला तर आम आदमी पक्ष आणि बाकीचे सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. साहिरच्या शब्दात केजरीवाल आणि मंडळींना आपण ‘बडे नासमझ हो’, इतकेच म्हणू शकतो. की शांताराम बापूंच्या चित्रपट गीताच्या शब्दात म्हणायचे

सैया झुठो का बडा सरताज निकला

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

बुद्धिजीवी पुढार्‍यांची शोकांतिका   जनता चळवळीच्या इतिहासातील सामन्यत: दुर्दैवी किंवा ट्रॅजिक मुर्ती कोण असेल, तर चळवळीच्या प्रतापामुळे जुनी व्यवस्था धुळीस मिळाल्याचे पहाण्याइतके प्रदीर्घ आयुष्य लाभलेला चळवळीचा बुद्धिजीवी होय.

   जनता चळवळी आणि विशेषत: क्रांत्या याबद्दल एक फ़ार मोठा गैरसमज जगभर पसरलेला आहे. भ्रष्ट व जुलमी शासनसत्तेला उलथून पाडून सामान्य नागरिकासाठी आचार, विचार आणि विवेकस्वातंत्र्य प्राप्त करून घेण्य़ासाठी सामान्य जनतेने ह्या चळवळी उभारलेल्या असतात, हा तो गैरसमज होय. या चळवळीचा प्रवर्तक जो बुद्धिजीवी वर्ग त्यातील मंडळींनी प्रस्थापित व्यवस्थेबरोबरच्या त्यांच्या स्वत:च्या हाणामारीच्या प्रसंगी नेत्र्दिपक शब्दांचे व घोषणांचे जे धुके निर्माण केलेले असते, त्या धुक्याचा परिणाम म्हणजे हा गैरसमज. समाज कोणताही असो, समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्थेवर नाखुश असणारे काही लोक तरी निश्चितच असतात. समाजातील बुद्धिमंत त्याच लोकांना चिथावण्या देतात आणि त्यांच्या मदतीने चळवळी उभारतात. चळवळीचे खरे प्रवर्तक ही बुद्धिमंत मंडळी असतात. परंतु प्रचाराचा गदारोळ आणि घोषणांची आतषबाजी यातून निर्माण होणार्‍या धुरळ्यामुळे ही चळवळ सामान्य जनतेने राज्यकर्त्यांविरुद्ध सुरू केली आहे, असा आभास तयार होतो. पुढे समजा चळवळ यशस्वी झाली, समाजातील बुद्धिमान वर्गानेच ती चळवळ प्रवर्तित केलेली असल्याने सप्त स्वातंत्र्याचा विस्तार हे आश्वासन जाहिरनाम्यात पहिल्या क्रमांकाने असणार यात शंका नाही. मात्र चळवळीच्या उद्योगाला यश आले आणि प्रस्थापित सत्ता उलथून पडली, की मग त्या आश्वासनाचे काय होते ते विचारू नका. हे आश्वासन तेव्हा कचर्‍याच्या टोपलीत पडलेले असते आणि सप्त स्वातंत्र्ये आधी असतात त्यापेक्षा अधिक आकुंचन पावलेली असतात, जनता चळवळीसारख्या अवाढव्य उद्योगाचे हे वैशिष्ट्यपुर्ण लक्षण आहे. या चळवळी मानवी स्वातंत्र्याची कक्षा रुंदावण्याचे वचन देतात. पण प्रत्यक्षात ती कक्षा नेहमीच कमी करतात. मात्र त्याचवेळी त्या असेही भासवतात, की चळवळीची सुत्रे काही मतलबी आणि रक्तपिपासू व्यक्तींच्या हाती गेली आहेत. लबाडीने त्यांनी ती बळकावली आहेत. त्यांना दूर केल्यानंतर जाहिरनाम्यात दिलेले प्रत्येक वचन प्रत्यक्षात येणार आहे. आज जरी आम जनतेची फ़सवणूक झाल्याचे दिसत असले, तरी उद्या सर्व ठाकठीक होईल. वस्तुत: चळवळ प्रवर्तित करणार्‍या चळवळीच्या मूठभर बुद्धिजीवी अग्रदूतावाचून कोणाचीही फ़सवणूक झालेली नसते किंवा अन्य कुणी स्वातंत्र्यालाही वंचित झालेले नसतात. फ़सवणूक बुद्धिजीवींची झालेली असते. स्वातंत्र्याला वंचित बुद्धिजीवी झालेले असतात. गदा त्यांच्या स्वातंत्र्यावर आलेली असते. कारण प्रस्थापित सत्तेच्या मूढपणाचे आणि अकर्तृत्वाचे सार्वजनिक बाभाडे याच बुद्धिजीवींनी काढलेले असतात. प्रस्थापित व्यवस्था सहज मोडीत काढता येईल, अशी हवा त्यांनीच पसरवलेली असते. आपल्या नालायकीमुळे प्रस्थापित सत्ताधार्‍यांना सत्तेवर रहाण्याचा हक्कच उरलेला नाही, हा विचार त्यांनीच सर्वत्र पोहोचवलेला असतो. सत्ताधार्‍यांनी चालवलेल्या जुलूमाच्या आणि दडपशाहीच्या कहाण्यांना त्यांनीच शब्द व आवाज पुरवलेला असतो, आत्माविष्कार आणि आत्मप्रकटीकरणाच्या स्वातंत्र्याचे नारे त्यांनीच दिलेले असतात. हे सर्व करताना त्यांनी स्वत:च्या मनाशी गृहीत धरलेले असते, की ज्या गोष्टी त्यांना हव्याश्या वाटतात, त्याच सामान्य जनतेला हव्याश्या वाटतात. वस्तुत: सामान्य मनुष्याला आत्मज जबाबदारीचे लोढणे टाळायचे असते. आत्मज जबाबदारीमुळे मनावर येणार दडपण टाळण्याचे स्वातंत्र्य त्याला हवे असते. सामान्य मनुष्य़ आत्माविष्काराच्या आणि आत्मप्रकटीकरणाच्या स्वातंत्र्यामागे कधीच नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर जीवन पेलणे हेच ज्याला कठीण वाटते, तो सामान्य मनुष्य आत्मज जबाबदारी स्वेच्छेने शीरावर घेऊ पाहिल हेच चुकीचे आहे. आत्मज जबाबदारीचे स्वातंत्र्य त्याच्याकडून कोणी काढून घेतल्यास ते त्याला हवे असते. आपल्या जबाबदारीवर आपल्या आवडेल तो आयुष्यक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य हा सामान्य मनुष्यासाठी फ़ार मोठा भार असतो. हा भार कोणी आपल्या शीरावर घेईल, तर बरे अशी त्याची सुप्त भावना असते. कारण या जबाबदारी सोबत अपयशा़चीही जबाबदारी शीरावर घ्यावी लागते; हे सामान्य मनुष्याला चांगले ठाऊक असते. सामान्य मनुष्याला विवेकशीलतेचे स्वातंत्र्य नको असते. ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवता येईल आणि ज्याचे हुकूम पाळल्याने आपले भौतिक नुकसान होणार नाही, उलट फ़ायदाच होईल, असा हुकूम देऊन काम करून घेणारा कुणीतरी त्याला हवा असतो. हा सामान्य मनुष्य जुनी सत्ता आणि जुनी व्यवस्था उलथून टाकतो. परंतु मुक्त समाजाच्या आकर्षणातून ही गोष्ट तो करीत नाही. त्याला स्वतंत्र लोकांचा मुक्त समाज प्रस्थापित करायचा नसतो. त्याला समाज हवा असतो, तो ठोकळेबाज, एकछापी, निनावी लोकांचा. चिरेबंदी समाज, एक विचारांचा, एक भावनेचा. जुनी व्यवस्था दुष्ट आणि निर्दय होती; म्हणून सामान्य मनुष्याने त्या व्यवस्थेच्या विरुद्ध झेंडा खांद्यावर घेतलेला नव्हता. तर ती व्यवस्था पुरेशी कठोर व सामर्थ्यवान नव्हती, म्हणून त्याने तो झेंडा हाती घेतला होता. जिथे टोकाची दडपशाही असते, तिथे सामान्य मनुष्य मूग गिळून बसतो आणि सत्ताधारी दुर्बल होताच उठाव करतो, हे इतिहासात वरचेवर पहायला मिळते. जनता चळवळीत जे सामील होतात ते सत्ताधार्‍यांचा जुलूम खटकला म्हणून नव्हे; तर संपुर्ण समाजाला एकजीव करण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले म्हणून होय. मारझोड करून का होईना पण राज्यकर्ते जर का एकसंघ, एकछापी आणि एकढंगी समाज निर्माण करण्यात यशस्वी झाले असते, तर त्यांना याच कार्यकर्त्या सामान्य मनुष्यांनी डोक्यावर घेतले असते.

   जनता चळवळीच्या बुद्धिजीवी पुढार्‍यांना वाटते, की सामान्य जनतेला स्वातंत्र्य, समता आणि बंधूता यासारख्या उदात्त ध्येयांची भूक लागली होती आणि त्या जनतेच्या निदर्शनास आपण ही भूक आणून दिली. म्हणून ती जनता राज्यकर्त्याच्या विरुद्ध एकत्र झाली होती. प्रत्यक्षात तसे काहीही नसते. बुद्धिजीवींचा तो भ्रम असतो. एक मोहक भ्रम; पण भ्रमच. स्वातंत्र्य व समता यापैकी एकाशीही जनतेला कर्तव्य नसते. कारण या अत्यंत अमूर्त कल्पना आहेत आणि दैनंदिन जीवनाशी त्यांचा बेताचा संबंध आहे. मग प्रश्न असा, की चळवळीसाठी जनता एकत्र कशी होते? त्याचे उत्तर हे, की जनतेसमोर राज्यकर्त्याच्या विरुद्ध जी भाषणे झडत असतात आणि ज्या घोषणा दिल्या जात असतात, ती ऐकून व पाहून मनुष्यास असे वाटू लागते, की राज्यकर्त्याचे काही खरे नाही. ते पडण्याच्या बेतात आहेत. आणखी एकच धक्का, की जमीनदिस्त होतील. दुसर्‍या शब्दात प्रस्थापित व्यवस्था सडली आहे म्हणून नव्हे, तर ती दुर्बल बनली आहे, हे बुद्धिजीवी पुढार्‍यांचे मत पटल्याने सामान्य माणसे लढ्यात उतरलेली असतात. सहाजिकच लढा संपून जेव्हा नवी व्यवस्था प्रस्थापित होते, तेव्हा सामान्य मनुष्याची काहीही फ़सगत झालेली नसते. कारण बुद्धिजीवी वर्ग ज्या कारणासाठी राज्यकर्त्या वर्गाच्या विरुद्ध असतो त्याच्याशी सामान्य मनुष्याला कसलेही कर्तव्य नसते. सामान्य मनुष्याला चळवळीतून जे हवे असते तेच त्याला मिळते. जनतेला एकछापी, चिरेबंदी समाजव्यवस्था हवी असते आणि तिला तीच व्यवस्था मिळते. चळवळ यशस्वी होताच काही काळ तरी सामान्य लोकांना जे हवे तेच मिळालेले असते. या व्यवहारात खरी फ़सगत चळवळीच्या सिद्धांतकाराची आणि बौद्धिक अध्वर्युंची होते. त्यांना मानवी स्वातंत्र्यामध्ये भरघोस वाढ हवी असते. नव्या राजवटीत ही स्वातंत्र्ये वाढण्याऐवजी कमी होतात. तेव्हा खरी ट्रॅजिडी, खरे दुर्दैव चळवळीच्या सिद्धांतकाराचेच ठरते.

   चळवळीचे, वैचारिक प्रचाराचे, नेत्रदिपक घोषणांचे वगैरे पहिले पर्व संपून चळवळ दुसर्‍या पर्वामध्ये प्रवेशली, की चळवळीच्या आघाडीवरून ज्यांनी चळवळीला प्रेरणा दिलेली असते; त्या बुद्धिजीवी मंडळींना मागे ढकलण्यात येते. आता राजकारणात मुरलेल्या व्यक्ती त्या चळवळीच ताबा घेतात. आणि अगदी पद्धतशीरपणे चळवळीत काम करणार्‍या विचारवंतांना चळवळीच्या बाहेर जाण्यास भाग पाडतात. किंबहूना हे विचारवंत स्वत: होऊनच चळवळीतून बाहेर पडू लागतात. विचारवंताचे हे दुर्दैवच म्हणता येईल. कारण चळवळीला प्रेरणा त्यांनीच पुरवलेली असते. चळवळीसाठी पोषक वातावरण सुद्धा त्यांनीच तयार केलेले असते. तरीही चळवळीतून त्यांना माघार घ्यावी लागते. विचारवंतांच्या या दुर्दैवाची एकदोन कारणे सांगता येतील. कारण विचारवंतांची चळवळीतून केली जाणारी ही हाकालपट्टी हा अपवाद नसून जनता चळवळीच्या बहुतेक सगळ्या बौद्धिक अध्वर्युंच्या नशिबात हेच दुर्भाग्य लिहिलेले दिसून येते. विचरवंतांच्या या विशिष्ट दुर्दैवाने एक कारण ते खुद्द स्वत:च असतात. हे बौद्धिक अध्वर्यु तोंडाने जरी संघटित कृतीचा जप करतात, तरी मनातून ते खुद्द स्वत; मात्र कमालीचे व्यक्तीवादी असतात. आणि व्यक्तीवादी असल्याने, सर्वांनी एकत्र येऊन जगन्नाथाचा रथ ओढून न्यायचा आहे, या भूमिकेशी ्ते कधीही सहमत होऊ शकत नाहीत. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या मताप्रमाणे जीवन जगावे, तो तिचा हक्क आहे आणि तिच्या परीने ती सुखी समाधानी होऊ शकते, या सिद्धांता्वर त्यांचा पुर्ण विश्वास असतो. हा विश्वास कदाचित अंधविश्वासात मोडेल इतका कडवा असतो. ह्या सिद्धांतावर विश्वास असल्याने, वैयक्तीक मताचे आणि उपक्रमशीलतेचे स्वातंत्र्य त्यांना मुळातच मान्य असते. परंतु चळवळीने वेग घेतल्यावर चळवळी्ची सुत्रे अशा व्यक्तींच्या हाती येतात, की ज्याचा व्यक्तीवादाला पुर्ण विरोध असतो. त्याला व्यक्तीबद्दल संपुर्ण अनादर असतो. ते फ़क्त संघटित कर्तृत्वच ओळखतात. बरे गंमत अशी, की जनता चळवळीसारख्या संघटितपणे लढा देणार्‍या चळवळीची सुत्रे अशाच महाभागांच्या हाती जातात. कारण जनता चळवळीत सामील होणारी जनता आणि असे नेते यांच्या धारणा जवळपास समान असतात.

(विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकातून.  मानवी इतिहास, संस्कृती, सामाजिक व राजकीय विषयातले गाढे अभ्यासक चिंतक अशी त्यांची ओळख होती. हे ‘पानिपत’कार नव्हेत.) पृष्ठे २१०-२१३

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

इतर पक्षांचा बाप मुकेश..... तर ‘आप’चा बाप कोण?

                                                                     (उत्तरार्ध)


   गेले काही दिवस केजरीवाल व आम आदमी पक्ष सरकार सोडून पळ काढायचा आटापिटा करीत होते. याचा अर्थ त्यांना सत्तेचा मोह नव्हता, असे अजिबात नाही. त्यांच्या इतका सत्तालोभी निदान आज भारतातल्या कुठल्याही भ्रष्ट पक्षातही नसावा. अन्यथा त्यांनी इतरांची मदत घेऊन सत्ता भोगली आणि पाठींबा देणार्‍यांवरच गरळ ओकली नसती. आपण कोणाचाच पाठींबा घेतलेला नाही, असा दावा पन्नास दिवस केजरीवाल व त्यांची टोळी करीत होती, त्यात थोडे जरी सत्य असते तर त्यांनी विधानसभेत आर्थिक मागण्या मान्य होईपर्यंत थांबण्याचे काय कारण होते? विधानसभेत राज्यपालांच्या पत्रावर मतदान झाले, तेव्हाच भाजपा व कॉग्रेस यांनी एकत्रितपणे पत्राच्या बाजूने मत दिल्याचे स्पष्ट झाले होते. केजरीवाल यांचाच आरोप मान्य करायचा, तर त्या दोन्ही पक्षांना मुकेश अंबानी यांनी एकत्र आणले होते. कारण केजरीवाल यांनी त्याच अंबानी विरोधात पहिल्यांदाच एफ़ आय आर दाखल करण्याचा मोठाच पराक्रम केला होता. ही अर्थातच नेहमीप्रमाणे ठोकलेली लोणकढी थाप होती. कारण अंबानी विरोधात पहिला गुन्हा कॉग्रेसचे पंतप्रधान नरसिंहराव यांचे सरकार असताना केंद्रीय अर्थमंत्रालयाचाच्या अंमलबजावणी खात्याने दाखल केलेला होता. तेव्हा आपणच पहिले असल्याचे थोतांड निव्वळ खोटे. असो. पण मुकेश अंबानी विरोधात केजरीवालांच्या एफ़ आय आर दाखल्यामुळे दोन्ही भ्रष्ट पक्ष एकत्र आल्याचे सिद्ध केल्यावर केजरीवाल विधानसभा सोडून राजिनामा द्यायला बाहेर का पडले नाहीत? त्यापैकीच एक कॉग्रेसच्या पाठींब्यावर आर्थिक मागण्या मंजूर करून घ्यायला केजरीवाल थांबून कशाला राहिले? आणि जर मुकेश अंबानींकडे कॉग्रेस पक्षाची मालकीच होती, तर त्या पक्षाने केजरीवाल यांच्या आर्थिक मागण्या मजूर करायला पाठींबा तरी कशाला द्यावा? केजरीवालांनी अंबानीच्या अशा भ्रष्ट हस्तक पक्षाचा पाठींबा घ्यावा तरी कशाला? आणि घेतलाच असेल, तर मग केजरीवाल सुद्धा कॉग्रेस सोबत जाऊन त्याच मुकेश अंबानीचे हस्तक होत नाहीत काय? मग त्या अर्थाने भाजपा मुकेशचा हस्तक होत नाही आणि केजरिवालांचाच पक्ष अंबानीचा हस्तक होऊन जातो ना?

   एक लक्षात घ्या, यातला कुठलाही माझा आरोप नाही. ज्या तर्कशास्त्राच्या आधारावर केजरीवाल व त्यांचा पक्ष बेछूट आरोप करीत असतो; त्याच तर्कानुसार निघणारे हे निष्कर्ष आहेत. भाजपा कॉग्रेस एकत्र येऊन काही करत असतील, तर त्यांचा बाप मुकेश अंबानी असतो, तर मग केजरीवालांच्या विधानसभेतील आर्थिक मागण्या मान्य करण्यासाठी आप व कॉग्रेस एकत्र आल्यासही तोच आरोप लागू शकतो. कारण ज्या अंबानीवर गॅस महागडा करून लूटमार केल्याचा आरोप केजरीवाल करतात आणि त्यासाठी कॉग्रेसला जबाबदार धरतात. अधिक त्याबद्दल भाजपा गप्प बसतो, म्हणून गुन्हेगार असेल, तर आर्थिक मागण्या मान्य होण्यापर्यंत मू्ग गिळून विधानसभेत गप्प बसणारे केजरीवाल कोणाचे गुलाम होतात? इतकाच अंबानीवर डुख होता, तर त्याच्या हस्तकाच्या पाठींब्याने आर्थिक मागण्या कशाला मंजूर करून घ्यायच्या? आणि त्यासाठी जनलोकपालचा मुडदा पडू कशाला द्यायचा? असे अनेक प्रश्न विचारता येतील. पण प्रश्नांची संख्या वाढवण्यापेक्षा आर्थिक मागण्या कोणाच्या घशात पैसा ओतण्यासाठी होत्या; त्याकडे बारकाईने बघायला हवे. समजा जनलोकपाल रोखला गेला, म्हणून केजरीवालांनी तडकाफ़डकी राजिनामा दिला असता, तर आर्थिक मागण्या फ़सल्या असत्या आणि त्याबरोबर वीजबिलात कपातीसाठी दिलेले अनुदानही बोंबलले असते. मग काय झाले असते? कोणाचे नुकसान झाले असते? ज्या वीज कंपन्यांची बिले लोकांनी थकवली आहेत आणि ज्यांच्या वाढीव दरात अर्धी रक्कम सरकारी तिजोरीतून भरली जाणार आहे; त्याच कंपन्यांसाठी डोकेदुखी झाली असती, त्यांना वीजपुरवठा तोडण्यासाठी कटकटी कराव्या लागल्या असत्या आणि अधिक थकलेली बिले वसूल करताना हाणामारीचे प्रसंग आले असते. केजरीवालांना त्याच कंपन्यांची चिंता होती. त्यांनीच घेतलेल्या निर्णयानुसार जे अर्ध्या वीजबिलाचे अनुदान आहे; ते थेट वीज कंपन्यांच्या घशात जायचे आहे, त्यांचा घास घशातच अडकून पडला असता. आणि त्या कंपन्या कोणाच्या आहेत? योगायोग असा, की दिल्लीत विजेचे वितरण करणार्‍या तीनपैकी दोन कंपन्या अंबानींच्याच आहेत, फ़क्त त्या अंबानीचे नाव मुकेश असे नसून अनिल अंबानी असे आहे, या दोघा भावांमध्ये किती भांडणे व कशी स्पर्धा आहे, हे वेगळे सांगायला नको. मग केजरीवाल यांना अनिल अंबानीच्या कंपनीची रखडपट्टी होणार याची चिंता कशाला होती ?

   मागल्या निवडणूकीपुर्वी त्यांनी वीज कंपन्यांना खुप शिव्याशाप दिले. कंपन्यांनी जनतेची व ग्राहकाची लूट चालवल्याचा आरोपही केला. पण वीज दर अर्धे करण्याचे आश्वासन मात्र पाळले नाही. त्याऐवजी त्याच बदमाश लूटारू कंपन्यांना अर्धी रक्कम सरकारी तिजोरीतून देण्यासाठी घाईगर्दीने अनुदानाची घोषणा करून टाकली होती. त्यानंतर त्यांनी त्याच कंपन्यांचे ऑडीट करण्याचेही जाहिर केले. तेही चालू आहे. मग त्यानुसार वीजेचे दर कमी होण्यापर्यंत थांबायला काय हरकत होती? शिवाय योगायोगाने राजिनामा देण्याची वेळ येऊन अनुदान बोंबलले असते; तरी केंद्राच्या तालावर चालणार्‍या राज्यपालांनी चार महिने तरी अनुदानित बिलांची वसूली होऊ दिली नसती. कारण लोकसभा निवडणूका व्हायच्या आहेत. त्यामुळे केजरीवाल यांनी दिलेले अनुदान रद्द  न करता केंद्रातील कॉग्रेस सरकारने बिले वसूलीला लगामच लावला असता. म्हणूनच जनलोकपाल फ़ेटाळला गेल्यावर केजरीवाल यांनी लाचाराप्रमाणे विधानसभेत बसून आर्थिक मागण्या मंजूर करून घेण्याची काहीही गरज नव्हती. लोकपालसाठी त्यांच्या कुर्बानीमध्ये अनुदानाच्या आर्थिक मागण्या आड येऊ शकत नव्हत्या, पावणे चारशे कोटीच्या अनुदान मागण्या वार्‍यावर सोडून केजरीवाल बिनधास्त हुतात्मा होऊ शकत होते. पण त्यात दोन अडचणी होत्या.

   हाच विषय मग केंद्र सरकारकडे गेला असता आणि संसदेत दिल्ली विधाबसभेचे अनुदान मंजूर करून घेण्यात आले असते. त्याचे श्रेय कॉग्रेसला मिळाले असते. पण तितकीच राजकीय अडचण होती काय? अजिबात नाही, अडचण होती ती अनिल अंबानी यांच्या कंपनीला. त्यांच्या दोन्ही कंपन्यांकडे दिल्लीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज खरेदी करायला पैसे नाहीत. अशी तक्रार त्यांनी हल्लीच केली होती आणि त्यासाठी दिल्ली सरकारकडे पैसे मागितले होते. अन्यथा वीज पुरवठा काही तास रोज तोडण्याचा इशारा दिलेला होता. टाटांची जी तिसरी कंपनी दिल्लीला वीजपुरवठा करते, तिची अशी कुठली अडचण नव्हती. म्हणजेच दिल्ली सरकारकडून अर्ध्या वीज बिलाच्या रुपाने तीनशे कोटीहून अधिक रक्कम तातडीने हवी असलेल्या कंपनीचा मालक अनिल अंबानी आहे. आणि त्यालाच पैशाची अडचण होऊ नये म्हणून दिल्ली सरकार कोसळण्यापुर्वी किंवा राजिनामा देण्यापुर्वी मुख्यमंत्र्याला काही कोटींची व्यवस्था करणे भाग होते. केजरीवाल यांची राजिनाम्याची योजना आधीपासूनच शिजलेली होती, पण जोपर्यंत आपला असली ‘मालक’ अनिल अंबानी याची अनुदानातून बेगमी केली जात नाही; तोपर्यंत त्यांना राजिनामा देऊन भागणार नव्हते. शिवाय आगामी लोकसभेचा मोठा प्लान आखलेला असताना लागणारा पैसा कुठून आणायचा? त्यासाठी मालकाला खुश करायला नको काय? त्यामुळेच राजिनाम्यापुर्वी दोन मोठे डाव केजरीवाल यांनी खेळले. पहिली गोष्ट म्हणजे ‘आप’ला मालक अनिल अंबानी याचा प्रतिस्पर्धी असलेल्या त्याच्या भावाच्या विरोधात एफ़ आय आर दाखल करून त्याला अडचणीत आणले. दुसरीकडे जनलोकपालचा बळी देऊन अनिल अंबानीच्या दोन वीज कंपन्यांना आवश्यक असलेले तीनशे कोटीहून अधिक रुपये सरकारी खजिन्यातून सुखरूप विनासायास मिळतील अशी व्यवस्था विधानसभेकडूनच करून घेतली. याला म्हणतात व्यवस्था परिवर्तन.

   ‘पहली बार इमानदारीसे काम करनेवाली पार्टी’ असे केजरीवाल वारंवार कशाला म्हणतात, त्याचा असा अन्वयार्थ आहे. ज्यांचे इमान-दारी बांधलेले असते त्यांना येणार्‍याजाणार्‍यावर भूंकावेच लागते. केजरीवाल ते काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतात. रोज नित्यनेमाने कुणावर तरी भुंकल्याखेरीज दिवस जातो काय? विधानसभा असो, रामलिला मैदान असो किंवा कुठल्या वाहिनीला मुलाखत देणे असो, आरोपाचे भुंकणे चालूच नसते काय? आणि भुंकण्याला काही कारणही लागत नाही. ठराविक व्यक्ती, वेश वा रंगावरच भुंकणे असते असेही नाही. बस, भुंकायचे. का भुंकतो बाबा, विचारायला गेलात, की माघारी पळून जायचे. आजवर अनेक विषय असे निघाले, की वाहिन्यांच्या पत्रकारांपासून इतरांनी अनेक सवाल उभे केलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत केजरीवाल वा त्यांच्या इमान-दारांनी दाखवली आहे काय? सवाल केलात, की आणखी भूंकत पळ काढायचा. अशी आजकाल ‘इमान दारी’ची नवीकोरी व्याख्या बनवण्यात आली आहे. आणि एक भुंकू लागला, मग त्याच स्वरात चहुकडुन गलका सुरू होतो. यालाच राजनितीचे परिवर्तन असे त्यांनीच दिलेले नाव आहे. वाहिन्यांच्या चर्चेत भाग घेणारे विविध आप प्रवक्ते त्याचीच साक्ष देतात ना? बिचारा एन्कर असतो, त्याला ह्या प्रवक्त्यांना थांबवताना नाकी दम येतो. पण दिल्लीच्या गल्लीबोळात लौकरच उन्हाळा सुरू झाल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणार आहेत. आताही उमटल्या असत्या. पण जनता दरबार बघून घाम फ़ुटलेल्या केजरीवाल यांना धोका कळत असल्यानेच त्यांनी राजिनाम्याच्या नाटकाची ‘रामलिला’ न करता हनुमान (रोड) चालिसावरच कार्यक्रम उरकला.

   शपथ व लोकपाल विधेयक रामलिला मैदानावर संमत करण्याच्या वल्गना संपल्या. ‘आप’ला आम आदमीची भिती वाटू लागली आहे. अन्यथा समारंभाच्या आयोजनाचे मास्टर असलेल्या केजरीवालांनी थेट रामलिला मैदानावरच राजिनाम्याच्या लिला रंगवल्या असत्या, पण तिथे लोटणार्‍या आम आदमीने फ़ैलावर घेऊन आश्वासनांची सरबत्ती केली असती. कारण आता हुकमी गर्दी कॅमेरात पुरणारी असली, तरी मैदानावर लोटणार्‍या संतप्त दिल्लीकरांच्या गर्दीला ‘आप’ची टोपीवाली मोजकी डोकी आवरू शकणार नाहीत याची खात्री आहे. म्हणूनच हनूमान रोडवरल्या खिडकीतून राजिनाम्याच्या गर्जना झाल्या आणि थेट लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तोच आम आदमी त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल, याबद्दल मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. (संपुर्ण)

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

आधी लगीन रायबाचे....... मग बघू कोडाण्याचे

                                                           (पूर्वार्ध)   मला खात्री आहे, की असे शिर्षक चटकन खटकणारे आहे. कारण आपण मराठी माणसांनी बालपणापासून कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी वीरमरण पत्करणार्‍या नरवीर तानाजी मालुसरेची कहाणी ऐकलेली असते, त्यातून आपली वीरमरणाविषयी एक संकल्पना डोक्यात तयार झालेली असते. त्यात घरचे शुभकार्य आणि पोटच्या पोराचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी साक्षात मृत्य़ूला सामोरा जाणारा तानाजी आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो. खरे तर आपल्यापैकी कोणी त्या लढाईच्या प्रसंगी उपस्थित नव्हतो आणि खरेच तानाजी नेमके तेच वाक्य बोलला किंवा नाही; याची आपण हमी देऊ शकत नाही. पण वीरमरणाची वा त्यागपुर्ण हौतात्म्याला प्रेरणा देणारी कहाणी म्हणून आपल्याला हे वाक्य भारवून टाकते. आपल्यालाच कशाला महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्यांना त्या वाक्याने भारावलेले आहे. पण त्या भारावण्याच्या पलिकडे जाऊन बघितले, तर त्यातून एक बोधही दिलेला आहे. भले ते वाक्य खरेच तानाजीने उच्चारलेले असो व नसो, पण त्यापेक्षा त्यातला बोध मोलाचा आहे. तो बोध आहे आयुष्यातील व सार्वजनिक जीवनात संघर्षाला उतरलेल्या व्यक्तीच्या प्राधान्यक्रमाचा. व्यक्तीगत स्वार्थ वा व्यक्तीगत हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देण्याच्या विषयातला तो निकष आहे. तिथे तानाजी घरचे योजलेले शुभकार्य बाजूला ठेवून स्वराज्याच्या विषयाला प्राधान्य देतो, तेव्हा तो हिंदी भाषेत बोलला असता तर काय म्हणाला असता? ‘कोंडाणा काबीज करने के लिये किसीभी हद तक जा सकते है’. इथे कोंडाणा किल्ल्याच्या जागी जनलोकपाल शब्द टाकून बघा. वेगळा आवेश वा वेगळा निर्धार आपल्या कानी गेल्या पंधरा दिवसात आलेला होता काय? आणि आता व्हायचे ते होऊन गेल्यावर केजरीवाल किंवा त्यांचे सवंगडी काय सांगत फ़िरत आहेत? आम्ही जनलोकपाल होण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा त्याग केला. जनलोकपाल नाही तर सरकारही नको. केवढा त्याग आहे ना?

   सत्ता हाती आल्यापासून केजरीवाल व आम आदमी पक्षाची भाषा थेट तानाजी मालुसरेशी जुळणारी नव्हती का? ‘आधी लगीन जनलोकपालाचं’ अशाच भाषेत आपण ऐकत नव्हतो का? पण ज्याप्रकारे घटनाक्रम घडला किंवा केजरीवाल यांनी हौतात्म्य पत्करले, ते जनलोकपालाचं लगीन लावून का? तानाजी सुद्धा कोंडाण्याचे लगीन व्हायच्या आधीच शहीद झाला होता. त्याला वीरमरण आल्यानंतरच त्याच्या सवंगड्यांनी, मुठभर मावळ्यांनी शर्थीने किल्ला लढवला आणि म्हातार्‍या शेलारमामाच्या नेतृत्वाखाली किल्ला सर केला. पण तोवर तानाजी त्यांना सोडून गेला होता. म्हणजेच त्याचे शब्द त्याने नाही तर त्याच्या सवंगड्यांनी पुर्ण केले होते. त्यांनी कोंडाण्याचे लगीन लावले. पण दुसरीकडे रायबाचे योजलेले लगीन राहुनच गेले होते. आधुनिक तानाजीचा आव आणणारे केजरीवाल व त्यांचे सवंगडी ‘सोवळे’ लढवय्ये त्याच आवेशात लढले आणि त्यांनी जनलोकपालाचा किल्ला सर केला काय? काय घडले, कसे घडले? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी बनवलेले जनलोकपाल विधेयक गुलदस्त्यात ठेवून लपवाछपवी चालली होती. मग त्यावर आक्षेप आल्यावर घटनात्मकतेचा वाद चिघळवण्यात आला. पुढे त्यावर उपराज्यपालांचा आक्षेप आल्यावर आधी विधानसभेच्या कामकाजात केजरीवाल आणि मंडळी शुद्ध बनवेगिरी करीत होती. राज्यपालांचे पत्र लपवून त्यांनी कामकाज सुरू करीत आर्थिक मागण्या मान्य करून घेण्य़ाची भामटेगिरी आरंभली होती. त्यामुळे हरकतीचा मुद्दा उपस्थित करून अन्य पक्षाच्या सदस्यांनी कामकाजालाच आक्षेप घेतला आणि राज्यपालांच्या पत्रावर विचारपूस केली. हा विरोधकांचा हलकटपणा होता काय?

   वैधानिक कामकाजाच्या नियमानुसार राज्यपालांचा काही संदेश असेल तर सर्व कामकाज बाजूला ठेवून आधी तो संदेश सभागृहाला वाचून दाखवणे, हे सभापतींचे कर्तव्य असते. त्यामुळेच पत्राचा माध्यमातून गवगवा झालेला असल्याने अन्य पक्षाचे आमदार त्याबद्दल विचारणा करीत होते. पत्र आले आहे काय? असेल तर वाचून दाखवा आणि नसेल तर सभापतींनी पत्र आलेच नसल्याचे सांगून टाकावे. मात्र सभापती त्यावर काहीच बोलत नसल्याने गदारोळ चालू होता. म्हणजेच मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांचे सरकार विधानसभेतच लपवाछपवी करीत होते. पण कामकाज स्थगीत करावे लागले आणि विधानसभेच्या अधिकार्‍यांनी नियमांचे कान टोचल्यावर सभापतींनी राज्यपालांचे पत्र वाचून दाखवले. त्यानुसार आपल्याला न सांगता असे विधेयक सादर करणे घटनाबाह्य असल्याचा संदेश राज्यपालांनी दिलेला होता. त्यामुळेच केजरीवाल यांची भामटेगिरी त्यांच्या ‘सोवळ्यांसह’ उघडी पडली. मग त्यावर सभागृहाचे मत घेऊन विधेयक मांडायचा निर्णय घ्यावा, असा आग्रह विरोधकांनी मांडला. पण त्यावर गोंधळ घालत केजरीवाल यांनी विधेयक विधानसभेत मांडायची परवानगी सभापतींकडे मागितली. ती अर्थातच त्यांच्याच पक्षाचा सभापती असल्याने त्यांना मिळाली आणि त्यावरून मग काहूर माजले. विधेयक मांडल्याचा कांगावा फ़ार काळ चालू शकला नाही. कारण घडलेला घटनाक्रम घटनाबाह्य व नियमबाह्य असल्याने विरोधकांनी पुढले कामकाज अडवून धरले. मग त्यांच्या इच्छेनुसार राज्यपालांच्या पत्रावर मतदान घ्यावेच लागले. म्हणजेच भामटेगिरी करून विधेयक मांडल्याचा सगळा बनाव वायाच गेला. त्यावर मतदान झाले आणि सभागृहाने बहूमताने राज्यपालांचा आक्षेप मान्य केला. खरे तर तिथेच केजरीवाल यांनी ‘आधी लगीन जनलोकपालाचे’ अशी गर्जना करीत राजिनामा फ़ेकायला हवा होता. पण त्यांनी तसे काहीच केले नाही. विधेयक मांडायलाच विरोध झाल्यावरही केजरिवाल बसून राहिले. कारण त्यांना लोकपाल विधेयक मांडून संमत करून घेण्यापेक्षा पावणे चारशे कोटीच्या आर्थिक मागण्या सभागृहात मंजूर करून घ्यायच्या होत्या. सहाजिकच ‘भाडमे गया लोकपाल’ असे मनोमन म्हणत केजरीवाल व त्यांच्या ‘सोवळ्या’ सवंगड्यांची टोळी सभागृहात बसूनच राहिली आणि अगतिकपणे कॉग्रेसच्या पाठींब्यावर आर्थिक मागण्या मंजूर व्हायची प्रतिक्षा करीत राहिली. त्यासाठी त्यांनी आपली इमानदारी व परिवर्तनाची लढाई गुंडाळून ठेवली.

   त्यांना लोकपाल मांडण्याआधी त्या आर्थिक मागण्या मान्य करून घ्यायच्या होत्या. त्या मंजूर झाल्याच नसत्या तर मुख्यमंत्री होताच वाटलेली अनुदानाची खैरात बोंबलली असती. विजेची बिले अर्धे करण्याचा खर्च सरकारी तिजोरीतून जायचा होता. शिवाय पाण्याचा खर्चही त्यातूनच व्हायचा होता. त्यासाठी पावणे चारशे कोटी रुपयांची मंजुरी आधी करून घ्यायची. मग राज्यपालांच्या पत्रावर गोंधळ घालून हुतात्मा व्हायचा डाव व्यवस्थित शिजलेला होता. आपण आर्थिक मागण्यांसाठीही थांबलो नसतो, असे नंतर मिरवता आले असते. पण सगळाच गोंधळ झाला. पत्र आधी वाचले गेले आणि जनलोकपाल बारगळला, तरी हे हुतात्मे चांगले जिवंत विधानसभेत ठाण मांडून बसलेले होते. बाजूला मरून पडलेल्या जनलोकपालाच्या मुडद्याकडे वळूनही बघायला त्यापैकी एकाचीही तयारी नव्हती. तमाम ‘आप’ सोवळ्यांचा जीव आर्थिक मागण्या मंजूर होण्यात अडकला होता. कारण आर्थिक मागण्या लटकल्या तर खैरात म्हणून अनुदान दिलेली विजेची बिले सरकारी तिजोरीतून भरली गेली नसती आणि दोड महिन्यात आपण विजेची बिले अर्धी केली, असे मिरवण्याची सोय राहिली नसती. म्हणूनच केजरीवाल नावाच्या मुख्यमंत्र्याने जनलोकपालचा हुतात्मा कुर्बान करून पावणे चारशे कोटी रुपये पदरात पाडून घेतले. थोडक्यात या दिल्लीच्या नाट्यातल्या लढवय्याने आव तर तानाजीचा आणत ‘आधी लगीन लोकपालचे’ अशी आवेशपुर्ण भाषा वापरत चढाई केली. पण खरोखर सत्तेची खुर्ची पणाला लावण्याचा प्रसंग ओढवला, तेव्हा पलटी मारून ‘आधी लगीन अनुदानाचे, मग पाहू लोकपालाचे’ असा पळपुटेपणा केला.

   समजा आर्थिक मागण्या आधीच मंजूर होऊन गेल्या असत्या, तर राज्यपालांच्या पत्रावर मतप्रदर्शनही त्यांनी होऊ दिले नसते आणि बेधडक घटनाबाह्य विधेयक मांडून पळ काढला असता. मग त्यावर काहूर माजवणार्‍या भाजपा कॉग्रेसच्या आमदारांना लोकपाल विधेयकाचे शत्रू ठरवलेच असते. अर्थात आजही तोच कांगावा चालू आहे. जे विधेयक मांडलेच जाऊ शकत नाही किंवा मांडलेच गेले नाही; त्याला विरोधी पक्षांनी फ़ेटाळले, हाच मुळात बनवेगिरीचा प्रकार आहे. आणि त्यासाठी केजरीवाल यांनी सत्ता सोडली, हा म्हणूनच बदमाशीचा नमूना आहे. उठसुट दुसर्‍यांची नियत खोटी असल्याचे हवाले देणार्‍या केजरीवाल व त्यांच्या ‘सोवळ्यांची’ नियत किती खोटी व बदमाशी आहे; त्याचा हाच सर्वात मोठा नमूना आहे, कारण त्यांनी जनलोकपाल रुपी कोंडाण्याच्या लग्नाचे हवाले दिले आणि त्यासाठी शंभरवेळा मुख्यमंत्र्याची खुर्ची कुर्बान करण्याच्याही डरकाळ्या फ़ोडल्या. पण जेव्हा खरी कुर्बानी द्यायची वेळ आली, तेव्हा बिचार्‍या जनलोकपाल विधेयकाला एकटे मरायला सोडून, हा लढवय्या आर्थिक मागण्यांचे लगीन लावत बसला होता. त्यासाठीची मंगलाष्टके विरोधी पक्षांकडून ऐकत अक्षता कधी पडतात, त्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होता. त्या अक्षता पडल्यावर मात्र याने आपण जनलोकपाल विधेयकासाठी सत्तेची खुर्ची कुर्बान केल्याची पुन्हा डरकाळी फ़ोडली. पुढे जनलोकपालचा मुडदाही उचलण्याचे सौजन्य दाखवले नाही. तो विधेयकाचा मुडदा तसाच पडून आहे आणि केजरीवाल आता लोकसभेच्या मांडवात उतरले आहेत. डरकाळी पुन्हा तीच आहे. ‘आधी लगीन जनलोकपालाचे’. आणि तो जनलोकपाल नावाचा नवरदेव कुठल्या मांडवात आहे? तो तर दिल्ली विधानसभेच्या आवारात मरून पडला आहे. याला म्हणतात, ‘इमानदारी’. अर्थात आपण आपल्या कालबाह्य अर्थाने केजरीवाल यांच्या ‘इमानदारी’ शब्दाचा अर्थ लावतो, ही त्यांची चुक नाही; तर आपला गुन्हा आहे. केजरीवाल तर परिवर्तन करायला आलेले आहेत. त्यांना व्यवस्थेचे परिवर्तन करायचे आहे. पण सध्या लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने व्यवस्था परिवर्तनासाठी पुरेशी सवड त्यांना मिळालेली नाही. म्हणून तात्पुरती सोय म्हणून त्यांनी व्याख्या परिवर्तनाचा शॉर्टकट शोधला आहे. ते व्यवस्था तशीच कायम ठेवून व्याख्या परिवर्तन करीत सुटले आहेत. त्यामुळे इमानदारी या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्या ‘इमान-दारी’ अशी फ़ोड करून समजून घ्यायला हवी. आपले ‘इमान’ त्यांनी कुणाच्या ‘दारी’ बांधले आहे त्याची धडधडीत साक्षही त्याच दिवशी विधानसभेच्या गदारोळात व धिंगाण्यातून मिळाली आहे. जनलोकपालच्या मुडद्यावरून चालत जाऊन केजरीवालांनी कोणाशी इमान राखले; तोही एक समजून घेण्यासारखा मुद्दा व तपशील आहे. त्याचे पोस्टमार्टेम पुढल्या लेखात करू. (अपुर्ण)

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

बुद्धीला निकामी करणारे सामुहिक मन

                                              (झुंडीचे राजकारण -४)

                       

   ‘कारवान’ नावाच्या एका नियतकालिकाने असीमानंद यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यावरून सध्या राजकारणासह माध्यमातून मोठेच वादळ उठवण्यात आलेले आहे. कारण हे स्वामी असीमानंद कुठल्या आश्रमात बसून मुलाखत देणारे कुणी साधू नाहीत, तर मालेगाव आणि समझोता एक्सप्रेस अशा दोन गाजलेल्या बॉम्बस्फ़ोटातले आरोपी म्हणून कुठल्याही आरोपाशिवाय गजाआड खितपत पडलेले हिंदूत्ववादी कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यावरही तोच आरोप आहे आणि आतापर्यंत विविध तपास यंत्रणांनी चौकशा केल्यावरही या आरोपींवर कुठलेही ठोस आरोप न्यायालयात ठेवले गेलेले नाही. त्यांच्यावरचे आरोप आक्षेप हे माध्यमांनी खळबळ माजवण्यासाठीच होत आले आहेत आणि हा खेळ गेली तब्बल साडे पाच वर्षे अव्याहत चालू आहे. त्यात कधी नवी भर पडते, तर कधी जुन्याच आरोप संशयांना उजाळा दिला जात असतो. जोपर्यंत त्यांच्यावर आरोप होत असतात तोपर्यंत त्याचे कौतुक माध्यमातून व काही गोटातून चालते आणि कंटाळा आला, मग तो विषय मागे पडतो. तब्बल साडेपाच वर्षे चाललेला हा खेळ खरा वा निदान तर्कसंगत असावा, असेही त्यावर ताव मारणार्‍यांना वाटलेले नाही. अत्यंत बुद्धीमान व सुसंगत विचार करणारे कित्येक पत्रकार, बुद्धीमंत, विश्लेषकही या एकूण तर्कविसंगत खेळात गटांगळ्या खाताना दिसतील. आता ‘कारवान’ नामक नियतकालिकात आलेली असीमानंद यांची ताजी मुलाखत घ्या. त्याच्या खरेखोटेपणाचा भाग बाजूला ठेवू. त्यात जे काही कथन करण्यात आलेले आहे, त्याची शहानिशा करावी, असे त्यावर तुटून पडलेल्या कुणा समतोल बुद्धीवाद्याला वाटले आहे काय? नसेल तर का वाटू नये? ही बाब अतिशय मोलाची व लक्षणिय आहे. त्यालाच झुंडीच्या मानसिकतेमध्ये सूचनाप्रवणता असे म्हणता येईल. ही सूचनाप्रवणता समजून घेतली, तर झुंडीचे सामुहिक मन कसे काम करते त्याचा अंदाज येऊ शकतो.

   असीमानंद ज्या आरोपात व प्रकरणात गुंतलेले आहेत, त्या घातपातांची आजवर अर्धा डझन यंत्रणांकडून तपासणी झालेली आहे. सध्या हे प्रकरण एन आय ए नामक केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या यंत्रणेकडे धुळ खात पडलेले आहे. आरंभी महाराष्ट्रातील ए टी एस यंत्रणेने त्याचा तपास केला. त्यात मालेगाव येथील काही मुस्लिम तरूणांना अटक केलेली होती. पुढे अचानक त्या यंत्रणेचे प्रमुख बदलले आणि त्या पदावर आलेल्या हेमंत करकरे यांनी मालेगावच्या स्फ़ोटात हिंदू अतिरेकी असल्याचा शोध लावला. त्यावेळी समोर आणली गेलेली माहिती आज किती लोकांच्या स्मरणात आहे? करकरे यांच्या विशेष पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग व कर्नल पुरोहित यांना अटक केली. त्यांच्याच तपासात पुढे असीमानंद, दयानंद पांडे अशा इतरांना अटक झाली. पण आरंभीच्या त्या तपासात असे उघड करण्यात आलेले होते, की ‘अभिनव भारत’ म्हणून हिंसक कारस्थाने शिजवणार्‍या या गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांची हत्या करण्याचेही कारस्थान केलेले होते. आज किती लोकांना त्याचे स्मरण आहे? तसे असेल, तर मग या कारस्थानी लोकांना मोहन भागवत यांच्याशी विश्वासात जाऊन कुठली मंजुरी घेण्याची गरज उरते काय? आता ताज्या प्रसिद्ध मुलाखतीवर विश्वास ठेवायचा, तर त्या टोळीच्या कारस्थानांना भागवत यांचाच आशीर्वाद होता. जुन्या आणि नव्या आरोप वा माहितीची सांगड घालायची, तर हे कारस्थानी मोहन भागवत यांच्याकडून हिंसा करायला मंजुरी घेत होते आणि तेव्हाच भागवत यांच्या हत्येचेही कारस्थान शिजवत होते. किंबहूना आपलीही हत्या घडवून आणायला भागवतच आशीर्वाद देत होते. कुठल्याही इतक्या मोठ्या संघटनेचा प्रमुख आपलीच हत्या घडवणार्‍यांना आशीर्वाद देतो, हे तर्कसंगत आहे काय?

   थोडक्यात हेमंत करकरे यांच्या तपासावर विश्वास ठेवायचा, तर या टोळीला भागवत यांची हत्या करायची होती आणि आजच्या ‘कारवान’ मुलाखतीलाच खरे मानायचे तर आपल्याच मारेकर्‍यांना भागवतच प्रोत्साहन देत होते. यातली एक बाजू खरी असू शकते आणि म्हणूनच दुसरी धडधडीत खोटी असू शकते. पण तेव्हा साडेपाच वर्षापुर्वी अतिशय हिरीरीने करकरे यांनी केलेल्या आरोप वा आक्षेपावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा जो वर्ग होता; तोच आज तितक्याच मिटक्या मारीत नेमक्या उलट्या आरोपावरही आंधळेपणाने विश्वास ठेवतो आहे. असीमानंद यांच्या मुलाखतीनुसार भागवतांवर आणि संघावर शंका घेणार्‍यांना करकरे यांनी केलेला गौप्यस्फ़ोट आठवतो तरी आहे काय? नसेल तर कशाला आठवत नाही? मिमांसा त्याची आवश्यक असते. कारण यापैकी सर्वच माणसे बुद्धीमान व चिकित्सक आहेत. त्यांना कोणी सहजासहजी तर्कविसंगत विधानाने उल्लू बनवू शकणार नाही. पण इथे अनुभव उलटेच सांगतो. हीच माणसे तेव्हा ज्या विधानावर नि:शंक मनाने विश्वास ठेवत होती, त्याच्याच उलट्या वक्तव्यावर आज तितकाच विश्वास दाखवत आहेत. अशा बुद्धीमान लोकांची बुद्धीही अशी पंगू कशाला होते? तर त्याचे उत्तर सूचनाप्रवणता असे आहे. त्यांना आवडणारी व पटणारी माहिती देत गेलात; तर त्यांची तर्कशक्ती उदासिन होऊन काहीही मान्य करू लागते. त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती निकामी होऊन जाते. तुम्ही दिलेली माहिती, सूचना वा बातमी त्यांना मनापासून आवडणारी असायला हवी. ती खरी वा वास्तविक असण्याची गरज नसते, जे ऐकायला अशी माणसे आसुसलेली असतात, म्हणजे त्यांचा पुर्वग्रह त्याकरीता उतावळा असतो, अशी माहिती खरी असण्याची गरज नसते, तर खुश करणारी असावी लागते. ती माहिती तात्काळ स्विकारली जाते आणि ती माहितीच चिकित्सक तल्लख बुद्धीला निद्रीस्त करीत असते. एकदा अशी बुद्धी सुप्तावस्थेमध्ये गेली, मग व्यक्ती डोळसपणे त्याच्या सारासार बुद्धीलाही न पटणार्‍या गोष्टी बिनदिक्कत स्विकारू लागते. इतकेच नव्हेतर त्या तर्कविसंगत विषयाचे हिरीरीने समर्थन करू लागते.

   यालाच सूचनाप्रवणता म्हणतात. जेव्हा काही लोक समविचारी असतात किंवा एका ठराविक भूमिकेवर ठाम मत बनवून बसलेले असतात; त्यांना वास्तविक माहितीची गरज नसते. त्यांच्या मताशी जुळणारी माहिती, पुरावे त्यांना हवे असतात. त्यांच्या मताला छेद देणारी कुठलीही माहिती अशा व्यक्तीला नको असते. याला एका ठराविक विषयावर तयार झालेले सामुहिक मन कारण असते. असे सामुहिक मन म्हणजे समविचारी लोक असतात. ते लोक एकत्र जमणारे किंवा एकमेकांपासून दुर वसलेले असले, तरी त्यांच्या प्रतिक्रिया समान आढळतील. आताही ‘कारवान’मधील असीमानंद यांच्या मुलाखतीनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया तपासल्या, तर तशाच दिसतील. त्यात संघाच्या समर्थकांनी ती मुलाखत झटकून टाकली आहे, तर तितक्याच उत्साहात संघाच्या विरोधात ठाम असलेल्या लोकांनी त्यातला आरोप निखळ सत्य असल्याचा दावा केलेला दिसेल. यापैकी कोणाला त्या मुलाखतीची सत्यासत्यता तपासून बघायची गरज वाटलेली नाही. हाच प्रकार आपण मोठ्या प्रमाणात मोदी समर्थक, केजरीवाल यांचे पाठीराखे किंवा संघाचे समर्थक वा  विरोधक यांच्यात पाहू शकतो. प्रमुख्याने अलिकडल्या काळात केजरीवाल समर्थक व आम आदमी पक्षाच्या पुरस्कर्त्यांचे वागणे बघितले, तर त्याची नित्यनेमाने साक्ष मिळत असते. डोक्यावर आम आदमी पक्षाची टोपी चढवली, ही सूचनाप्रवणता किती प्रभावशाली काम करते त्याचे सदोदीत अनुभवास येणारे ते उदाहरण आहे.

   झुंडीलाच दुसर्‍या भाषेत समविचारी असेही संबोधले जात असते. त्यात सहभागी झाले; मग आपापल्या सामुहिक मताशी ठाम रहावे लागते आणि त्याच्याशी मतभेद होऊ शकेल, असे काहीही ऐकून घेणेही अन्याय अत्याचार वाटू लागतो. अशी नुसती जरी शंका आली, तरी आपापल्या जागी राहून अशा समविचारी झुंडीतला माणूस भिन्न प्रकृती वा प्रवृत्तीच्या व्यक्ती वा मतावर तुटून पडतो. ही भावना इतकी प्रखर व अनावर असते, की भिन्न मत म्हणजे अवघ्या विश्वाच्या एकूण अस्तित्वालाच धोका असल्याच्या आवेशात त्याचा प्रतिकार सुरू होतो. त्यासाठी मग तशा सूचना त्या समुहाला पुरवण्याचेही काम कुणाला करावे लागत असते. अशा सूचना वास्तविक असायचे कारण नसते. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यघटनेचे पालन करायचे शपथेवर मान्य केलेले आहे. मग जनलोकपाल विधेयक त्याच घटनात्मक चौकटीतून विधानसभेत आणायला त्यांनी नकार देऊन चालेल काय? ज्या घटनेच्या आधारावर तुम्ही सत्ता हाती घेतली; तिलाच झुगारण्यात घटनेचे उल्लंघन होत नाही काय? पण हे कुणा ‘आप’नेता वा कार्यकर्त्याला पटते काय बघा. शक्यच नाही. तो कितीही शिकलेला सुशिक्षीत सुबुद्ध असो. त्याची बुद्धी ते पटवूनच घेणार नाही. कारण मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल बोलतील तेच सत्य आणि योग्य; अशी त्या प्रत्येकाची सामुहिक मानसिकता घडवण्यात आलेली आहे. असे एकाच वेळी एकाच विषयावर कुठल्याही मतभिन्नतेशिवाय एकमत होण्यालाच समविचारी वा झुंडीचे सामुहिक मन म्हणता येईल. त्याला वेगळा चिकित्सक विचार सुचत नाही आणि पुढे आला तरी सहन होत नाही. त्याला आवडणारा विचार ऐकायचा असतो आणि तोच निखळ सत्य असल्याचे आधीच ठरून गेलेले असते. सोवियत युनियन कोसळून पडेपर्यंत ते आतून किती पोखरले गेले आहे, त्याच्या बातम्या झळकत होत्या. पण इथल्या बुद्धीमान भारतीय कम्युनिस्ट नेत्यांना, विचारवंतांना तो अमेरिकेन हस्तकांचा प्रचार वाटत होता. मात्र तो मनभावीपणा अजिबात नव्हता. अगदी मनापासून त्या प्रत्येक विद्वानाचा त्यावर प्रामाणिक विश्वास होता. त्यात कुठलेही ढोंग नव्हते. त्यालाच सूचनाप्रवणता म्हणतात. जिथे जिथे चिकित्सक बुद्धी सुप्त व निकामी होऊन जाते.

   झुंड ही अशी असते ती जमावासारखी एकत्र असायची गरज नसते. पण कुठेही पसरलेली विखुरलेली असली, तरी ती एकाच वेळी विविध स्थानी एकाच प्रेरणेने, सुचनेने कार्यप्रवण होऊ शकते. कारण झुंडीत शिरले, मग आपली बुद्धी गुंडाळून ठेवावी लागते. अशी माणसे झुंडीला प्रिय नसलेले विषय असतात तेव्हा एकदम वेगळे वागताना बोलताना दिसतील. पण जिथे त्यांचे समुहमन कार्यप्रवण होते किंवा तशी सूचना येते; तिथून त्यांच्या वर्तनामध्ये आमुलाग्र बदल झालेला दिसेल. त्यात एकसुरीपणा व एकजिनसीपणाही आढळून येईल. आज त्याचे प्रभावी उदाहरण म्हणून आम आदमी पक्षाकडे बघता येईल. तितका झुंडीचा प्रभावशाली अविष्कार सध्या अन्य समाजघटकात आढळून येत नाही. (अपुर्ण)


गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

‘आप’नेता आशुतोष.... पत्रकार आशुतोष

(झुंडीचे राजकारण -३)   जवळपास दोन दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तवाहिन्यांवर पत्रकारिता करणारा अनुभवी पत्रकार आशुतोष याने अकस्मात नववर्षाच्या आरंभी आयबीएन हिंदी या वाहिनीच्या संपादक पदाचा राजिनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. इतक्या महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी अकस्मात अधिकारपद सोडून एखाद्या पक्षात चळवळीत सहभागी व्हायची ही पहिलीच घटना नव्हती. दिल्लीत ह्या नवख्या पक्षाला अनपेक्षित यश मिळाल्यावर देशातल्या अनेक नामवंत व्यक्तींनी त्यात प्रवेश घेण्य़ाची जणू शर्यतच सुरू झाली होती. पण तो मुद्दा इथे महत्वाचा नाही. त्या पक्षात दाखल होताच पत्रकार आशुतोष एकदम वेगळी भाषा बोलू लागला आणि त्याच्या वर्तनासह हावभावातही आमुलाग्र बदल जाणवू लागला. पत्रकार असताना एकाहून एक मुरब्बी राजकारण्यांना बोलते करणारा आणि आडोसे घेऊ न देणारा आशुतोष; स्वत: नेता म्हणून मुलाखत देऊ लागला, तेव्हा जुन्याजाणत्या नेत्यांनाही लाजवील इतका बेछूट व बेताल बोलू लागला. हा असा नखशिखांत बदल कुठल्या संघटनेत वा पक्षात गेल्यावर माणसात होतो काय? आजवर ज्या व्यक्तीला आपण बघत असतो आणि त्याच्या वागण्याच्या ज्या पद्धती असतात, त्यात असा आमुलाग्र बदल का होऊ शकतो? त्याच्यातली नम्रता, संयम, सोशिकता, समंजसपणा कुठल्याकुठे कसा बेपत्ता होऊन जातो?

   आम आदमी पक्षाचे अन्य नेते सोडून आशुतोष या नवोदिताकडे कशाला वळायचे? तर त्याला गेली आठदहा वर्षापेक्षा अधिक काळ लाखो लोकांनी ‘आजतक’ वा आयबीएन हिंदी वाहिनीवर बघितलेले आहे. त्यामुळेच त्याच्या वागण्या बोलण्याचा अनुभव अनेकांना असणार. आधी वाहिनीचा पत्रकार संपादक म्हणून तिथे येणार्‍या व संपर्कात असणार्‍या नेत्यांशी आर्जवी भाषेत बोलणारा व सुसंकृत वाटणारा हा माणूस; आम आदमी पक्षाची टोपी डोक्यावर घालून नेता होताच त्या पक्षाच्या अन्य नेत्यांसारखा गुरगुरू लागला. बदल लक्षणिय स्वरूपाचा आहे. आता हा माणुस नित्यनेमाने कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर ‘आप’चा प्रवक्ता नेता म्हणून दिसत असतो. जे कोणी बघत असतील त्यांनी अतिशय बारकाईने त्याच्या भाषा व वर्तनातले बदल निरखून अभ्यासावेत. त्यात आलेला आवेश, अहंकार व आक्रमकता नजरेत भरणारी आहे. कालपर्यंत सभ्य समंजस दिसणारा हा माणुस, असा अकस्मात का बदलू शकला? तोच नव्हे त्या पक्षात दाखल झालेल्या अनेकांमध्ये एकाच पद्धतीचा उद्धटपणा व उर्मटपणा आपल्याला दिसू शकतो. खाजगीत किंवा व्यक्तीगत पातळीवर बोलताना ही माणसे अत्यंत वेगळी असतील. पण जेव्हा ती डोक्यावर टोपी घालून किंवा पक्षाचे प्रतिनिधीत्व करायला सरसावतात, तेव्हा त्यांच्यातला उद्धटपणा व आवेश नजरेत भरणारा असतो. त्यामध्ये आपणच सत्य बोलतोय आणि दुसरा कोणी ऐकणारा ते मान्य करणार नसेल; तर तोच बदमाश असल्याचा सूर आढळेल. हाच तो बदल आहे. झुंडीत सहभागी झाल्यावर असा आमुलाग्र बदल घडून येत असतो. कारण झुंडीत सहभागी झाले, मग आपले व्यक्तीमत्व त्यात हरपून जाते आणि व्यक्ती त्याच एक जमावाचे अविभाज्य अंग होऊन जाते. आम आदमी पक्षाच्या प्रत्येक सदस्य वा नेत्याचा आवेश, भाषा वा बोलण्याची पद्धत एकसमान दिसेल. जणू एका साच्यातून काढलेला माल असावा, तसेच ते बोलताना व वागताना दिसतील. त्यालाच झुंडीची लक्षणे म्हणता येईल.

   झुंड म्हणजे जमाव नसतो. जमाव म्हणजे माणसांची गर्दी. पण जमाव जेव्हा एकाच विशिष्ठ हेतूने प्रभावित, प्रेरीत होऊन एकत्र येतो; तेव्हा त्याचे क्रमाक्रमाने झुंडीत रुपांतर होत असते. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने विविध विचारांचे वा मानसिकतेचे लोक एकत्र येत गेले. त्यांच्यात अन्य कुठले साम्य नव्हते. भ्रष्टाचाराला गांजलेल्यांचा तो एक मोठा घोळका होता. परंतु त्यामध्ये केजरीवाल व त्यांचे जुने सहकारी शिसोदिया आदी मंडळी आधीपासून एकाच संघटनेचे कार्यकर्ते होते. त्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व अण्णांकडे दिले, तरी चळवळीची दिशा ठरवण्याची सुत्रे आपल्याच हाती ठेवलेली होती. त्यासाठी जी कोअर कमिटी बनवण्यात आली; त्यात बहुतांश सदस्य केजरीवाल यांच्याच टोळीतले होते. त्यांच्या एकजुटीसमोर त्यात सहभागी झालेल्या इतरांना निरूत्तर करणे, त्यांना सहजशक्य होते. जिथे जमले नाही, तिथे मग अण्णा टिममधून एक एक लोक बाहेर पडत गेले. पण केजरीवाल टिम अण्णांना धरून राहिली. इतकेच नव्हेतर त्यांनी बाजूला होणार्‍यांना वा मतभेद दाखवणार्‍यांना पद्धतशीरपणे बदनाम करण्याचा डावही यशस्वीरित्या खेळला. सहाजिकच आंदोलनात सहभागी होणार्‍या नव्या चेहर्‍यांना केजरीवाल यांची मूळ संघटना व अण्णा टिम यातला फ़रक कधी समजू शकला नाही. मग जेव्हा अण्णांची गरज संपली, तेव्हा त्यांनाही सन्मानपुर्वक बाजूला करण्याचा डाव यशस्वीरित्या राबवण्यात आला. अण्णा कुठल्याही स्थितीत राजकारण मानणार नाहीत ह्याची खात्री होती. म्हणूनच अण्णा बाजूला झाले तरी त्यांनी चेतवलेल्या तरूणांना परिवर्तनाची सुरसुरी आलेली होती. त्यांनी अण्णांकडे पाठ फ़िरवून केजरीवाल यांच्या टोळीचा आश्रय घेतला. आपोआप मग त्याला झुंडीचे स्वरूप येत गेले. त्यात मग केजरीवाल व त्यांचे विश्वासू लोक वगळता इतर कुणाला मत असायचा विषयच नव्हता. केजरीवाल टोळी जे निर्णय घेईल, तेच सत्य व योग्य असा दंडक तयार झाला. पण उदात्त हेतूने व महान कारणास्तव एकत्र आल्याची पक्की निष्ठा असल्याने कोणी त्यात मोडता घालत नव्हता.

   आंदोलनात उतरल्यापासून आपण राजकारणात जाणार नाही अशी ग्वाही देणार्‍यांनी राजकीय पक्ष बनवून निवडणूका लढण्यापर्यंत मजल मारलीच. पण पुढे गेल्या दोन महिन्यात त्यांनी घोषित केलेल्या प्रत्येक विषयावर कोलांटी उडी मारलेली दिसेल. गाडी बंगला घेणार नाही, इथपासून प्रत्येक बाब उलटी झालेली दिसेल. पण त्याविषयी ‘आप’च्या सदस्य नेत्याकडे खुलासा मागा. तो नेमके उत्तर देण्यापेक्षा केजरीवाल करतात, तीच पोपटपंची करू लागेल. आपली सफ़ाई देण्यापेक्षा दुसर्‍या पक्ष नेत्यांवर आरोप करील. किंवा प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करू लागेल. त्याच्यासारखा सुबुद्ध सुशिक्षित माणूस इतका बेताल कसा बोलू शकतो, याचे आपल्याला मग नवल वाटते. पण त्यात नवल काहीच नाही. कारण तो अडाणी असो, की सुशिक्षित सुजाण माणुस असो, झुंडीत सहभागी झाला तर त्याला त्याचा मेंदू वापरताच येत नाही. त्याला पोपटपंचीच करावी लागते. कारण आपण करीत आहोत तो मुर्खपणा वा खोटेपणा असला, तरी आपण कुठल्या तरी महान उद्दीष्ट व हेतूसाठी तसे वागत आहोत; अशी त्याची पक्की धारणा झालेली असते. त्यामुळेच अन्यथा सभ्य सुसंस्कृत वाटणारी माणसे झुंडीत शिरल्यावर बेताल व बेछूट वागू लागतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणून मुद्दाम इथे पत्रकार आशुतोष याच्यातील बदलाकडे लक्ष वेधले आहे. झुंडीत माणुस कसा बदलतो आणि वहावत जातो, त्याचा हा उत्तम नमूना आहे. आशुतोष याच्या चेहर्‍यावर असे बेछूट बोलतांना दिसणारा छद्मीपणा त्याचा सज्जड पुरावा आहे. इतर ‘आप’नेते वा प्रवक्ते कदाचित तितके बनेल नसतील. पण झुंडीची लक्षणे त्यांच्यात स्पष्टपणे बघता येतात.

   झुंडीचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे तो जमाव एका ठराविक हेतूने वा उद्दीष्टाने एकत्र आलेला असला तरी त्याच्यात कमालीचे विरोधाभास एकत्र नांदत असतात. ते नेत्याच्या आहारी जातात आणि सुचनाप्रवण असतात. सूचनाप्रवण म्हणजे त्यांची बुद्धी स्वत:वर कसलीही जबाबदारी घ्यायला राजी नसते, तर नेत्याच्या आदेशाची सतत प्रतिक्षा करीत असते. नेत्याकडून आलेल्या सुचना वा आदेश म्हणजेच आपला स्वत:चा विचार वा निर्णय अशी झुंडीतल्या प्रत्येकाची ठाम समजूत असते. त्यामुळेच तिथे नेत्याशी मतभिन्नता असलेला कोणी टिकू शकत नाही, की झुंडीत शिरतही नाही. काही लोक त्यात फ़सतात. पण लौकरच नेता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो. तत्क्षणी तमाम झुंड त्या भिन्न मत दाखवणार्‍याकडे शत्रूवत नजरेने बघू लागते. आम आदमी पक्षाचे लोक कालपर्यंत त्यांची सहकारी असलेल्या किरण बेदीविषयी कसे बोलतात, ते बघितल्यास त्याची प्रचिती येईल. बेदी सुद्धा खुप जुनी गोष्ट आहे. नुकताच पक्षात मतभेद दाखवणारा आमदार विनोदकुमार बिन्नी याची अवस्था बघितली तर यातली झुंडीची मानसिकता लक्षात येऊ शकेल. बिन्नी प्रकरणात बिन्नी आज असत्य बोलत असतील. पण सरकार स्थापनेआधी त्यांची समजूत घालून त्यांना पत्रकारांसमोर खोटे बोलायला भाग पाडण्यात आले होते. तेव्हा त्यांना मंत्रीपद नको होते, असे केजरीवाल व अन्य ‘आप’नेतेही कॅमेरासमोर बोलले होते. पण आज तेच नेते बिन्नीला मंत्रीपद नाकारले म्हणून तो रागावलाय म्हणतात. याचा अर्थ सरकार स्थापनेपुर्वी केजरीवाल बेधडक पत्रकारांसमोर खोटे बोलले होते ना? ‘आप’च्या कोणी नेत्याने वा सदस्याने त्याबद्दल केजरीवाल यांना जाब विचारला आहे काय? किंबहूना त्याबद्दल आपण प्रश्न विचारला, तरी या निष्ठावंत ‘आम आदमी’ला संताप अनावर होतो.

   राजकारणात आपणच तेवढे इमानदार व पारदर्शक असल्याचे दिवसरात्र दावे करणार्‍या पक्षातले हे छुपे राजकारण, त्यांच्या लबाडीचा पुरावा नाही काय? परंतु त्याबद्दल कुणी केजरीवाल समर्थक आम आदमी नाराज आहे काय? असूच शकत नाही. कारण झुंडीत असताना त्याला असा विवेकी स्वयंभू विचार करायची मुभाच नसते. केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी अण्णा आंदोलनाचा आडोसा व आश्रय घेऊन एक झुंड पद्धतशीरपणे निर्माण केली. आज आपण दिल्लीतल्या राजकारणात जे काही बघत आहोत, त्याला म्हणूनच झुंडीचे राजकारण म्हणता येईल. हे झुंडीचे राजकारण कसे होऊ शकते? एकीकडे ते जमावाचे राजकारण असते आणि दुसरीकडे त्यात एकत्र येणारे लोक हे नेत्याचे सच्चे अनुयायी असावे लागतात. त्यांचा कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानापेक्षा आपल्या नेत्याच्या अमोघ अपुर्व कर्तबगारीवर आंधळा विश्वास असावा लागतो. त्याने सूर्याला चंद्र म्हटले, तर त्यावरही शंका घेणारा अशा झुंडीत असून चालत नाही, की मतभेदाचा सूर लावणार्‍याला त्यात जागा नसते. त्याच झुंडीत काहीकाळ घालवलेले बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी नेमक्या अशाच वर्तनाचा व कार्यपद्धतीचा हवाला दिलेला आहे. एकवेळ केजरीवाल आपली चुक मान्य करतील, पण त्यांच्या सच्च्या अनुयायांना ते चुकल्याचे मान्य होईल काय? ती केवळ अशक्यकोटीतली गोष्ट आहे. ही झुंड कशी असते? जमाव आणि झुंडीत काय फ़रक असतो? झुंडीची लक्षणे कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढल्या काही लेखातून समजून घेणार आहोत. (अपुर्ण)

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

आक्रमक चळवळीची प्रेरणा

(झुंडीचे राजकारण -२)


  रविवारी आम आदमी पक्षातल्या बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आपल्यासोबत आणखी दोन आमदार पक्षावर नाराज असल्या्चे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मग त्यांनी त्या बळावर सरकारचा पाठींबा काढून घेण्य़ाची धमकी दिली होती. तेव्हा त्यांच्या समवेत दोन अन्य अपक्ष आमदार होते. पण रात्री उशीरा व सोमवारी सकाळी मदनलाल नावाचा ‘आप’ आमदार बंडखोरांच्या बैठकीला हजर असल्याची बातमी झळकली. मात्र सोमवारी दुपारी त्याच मदनलाल नामक आमदाराला ‘आप’नेते संजय सिंग व आशुतोष यांनी पत्रकारांसमोर हजर केले. त्याने आपल्याला पक्षातून फ़ोडण्याचे कसे डावपेच खेळले गेले, त्याची मोठी मनोरंजक कथाच कथन केली. अर्थात आम आदमी पक्षात सगळेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्र असल्याने त्यांनी कोणावरही कसलेही आरोप करावेत, त्याला पुरावे साक्षी लागत नसतात. त्यामुळेच मदनलाल यांनी नरेंद्र मोदीपासून अरूण जेटली व डॉ. हर्षवर्धन यांच्यावर फ़ोडाफ़ोडीचे आरोप केल्यास, ते खोटे कसे म्हणता येईल? शिवाय आम आदमी पक्षाचा साक्षात ईशकृपेनेच अवतार झालेला असल्याने, त्यांना स्थल काळाचेही बंधन उरत आही. इथेही तेच झाले होते. मदनलान नावाचा ‘आप’ आमदार जी कहाणी सांगत होता, ती निवडणूक निकाल लागून तो आमदार व्हायच्या आधीची होती. म्हणजेच आपण सामान्य माणसे ज्याला धडधडीत खोटारडेपणा म्हणतो, तशीच होती. पण सांगणारा आम आदमी पक्षाचा असल्यावर ती आपोआप खरी होऊन जाते ना?

   मदनलाल याच्या कथनानुसार कोणा अज्ञात व्यक्तीचा त्याला ७-८ डिसेंबरच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजता फ़ोन आला आणि त्याने फ़ोडाफ़ोडीच्या गोष्टी केल्या. त्यानुसार मदनलाल यांनी ‘आप’चे नऊ आमदार फ़ोडायचे होते. त्या बदल्यात भाजपाच्या पाठींब्याने मदनलाल यांना मुख्यमंत्री केले जाणार होते. तर दोघांना मंत्रीपद दिले जाणार होते. जे मंत्री होतील, त्यांना प्रत्येकी दहा कोटी आणि जे नुसतेच पक्ष सोडतील, त्यांना प्रत्येकी वीस कोटी रुपये दिले जाणार होते. आता नऊ आमदारच कशाला फ़ोडायचे? तर नऊ म्हणजे २७ पैकी नऊ; म्हणजे एक तृतियांश होतात आणि त्यांना पक्षांतराचा कायदा लागू होणार नाही, असा डाव होता. पण असे सांगणारा कोण होता, ते या गृहस्थांना माहित नाही. पण त्याने अरुण जेटली व नरेंद्र मोदींचे नाव घेतले, म्हणून हा सगळा भाजपाचा डाव असल्याचा ‘आप’चा दावा आहे. यातला प्रत्येक शब्द पुरावा नसताना जरी खरा मानायचा ठरवला, तरी निदान तो आरोप तर्कशास्त्रात तरी बसायला हवा ना? त्यात तरी गफ़लत होऊ नये, अशी अपेक्षाही कोणी करू नये काय? यातून काही प्रश्न उपस्थित होतात.   

   १) विधानसभेचे मतदान ४ डिसेंबर रोजी झाले आणि मतमोजणी ८ डिसेंबरला सकाळी आठ वाजल्यानंतर व्हायची होती. म्हणजे मदनलाल यांना आलेल्या फ़ोनची वेळ, तेच सांगतात ती खरी मानायची; तर मतमोजणी सुरू व्हायच्या तब्बल पावणे आठ तास आधी यांना तशी ऑफ़र देण्यात आलेली होती. प्रत्यक्ष मदनलाल वा अन्य ‘आप’ आमदार निवडून आल्याची घोषणा होण्य़ाच्या पंधरावीस तास आधीच, त्यांची खरेदी सुरू झालेली होती. याचा अर्थ अशी खरेदीविक्री करायला आलेला मोठा अंतर्यामी असला पाहिजे. किंवा खुद्द मदनलाल तितके अंतर्यामी असायला हवेत. अन्यथा आमदार नसलेल्यांना कोणी इतक्या आधी खरेदी कशाला करणार?

   २) मतमोजणीच्या आधीच पंधरावीस तास भाजपाला आपण बहूमत मिळवत नाही, याची एकवेळ खात्री असू शकेल. पण आम आदमी पक्षाचे २७ आमदार निवडून येणार, हे भाजपाला कसे कळू शकले? शिवाय इतकी वर्षे फ़ोडाफ़ोडीचे राजकारण खेळणार्‍या ‘बदनाम’ भाजपाकडे एकतृतियांश आमदार वेगळे झाल्याने पक्षांतर कायदा लागू होत नाही, इतके अज्ञान असू शकते काय? २००३ सालात या कायद्यात बदल झाला असून दोन तृतियांश आमदार वेगळे झाले, तरच त्याला पक्षांतर समजले जात नाही, अशी दुरूस्ती करण्यात आलेली आहे. ते एकवेळ नवख्या आम आदमी पक्षाला माहित नसेल. पण फ़ोडाफ़ोडीची ‘बदमाशी’ करणार्‍या भाजपाला तरी नक्कीच ठाऊक असणार ना? मग त्याच भाजपाचे दोन मोठे नेते नऊच आमदार फ़ोडायची ऑफ़र कशाला देतात? 

   ३) मतमोजणीच्या आदल्या रात्री अशी ऑफ़र आलेली असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांपासून त्या आमदारापर्यंत सगळे लोक पुढले आठ आठवडे गप्प कशाला बसतात? प्रत्येक बाबतीत पारदर्शकतेचा आग्रह धरणार्‍या ‘आप’चे हे नेते त्याबद्दल पोलिसात जाऊन साधी तक्रार कशाला करीत नाहीत? बिन्नी व अन्य दोन आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेण्याची धमकी देण्य़ाची प्रतिक्षा कशाला करतात? पावणे दोन महिन्यांनी त्याच मदनलालचे नाव बंडखोरांच्या बैठकीत हजर राहिला म्हणून घेतले जाणार आणि त्यावेळी हा फ़ोनवरील ऑफ़रचा आरोप तुरूपचा पत्ता म्हणून वापरता येईल; असे त्यांना वाटले होते काय? असूही शकेल. पण मग पावणे दोन महिन्यानंतर अशाच प्रकारे आपले नाव बंडखोरांच्या बैठकीत हजेरी लावण्यासाठी घेतले जाण्याचा पुर्व अंदाज येऊ शकणारे मदनलाल व आम आदमी पक्षाचे नेते खरोखरच अंतर्यामीच असले पाहिजेत. मग त्यांची भाषा, त्यांचे आरोप, त्यांचे आक्षेप, त्यांचे अजब तर्कशास्त्र आपल्यासारख्या सामान्य माणसाला म्हणजे हिंदीतल्या आम आदमीला कसे उमगावे? 

   असे तर्कशास्त्र व भाषा उमगण्यासाठी तुम्ही आम आदमी पक्षाची टोपी डोक्यावर चढवावी लागते. मग तुमचा सामान्य मेंदू निकामी होऊन, जे कही डोक्यात भरवले जाईल ते विनासायास तुम्हाला खरे वाटू लागते. त्याचे पुरावे, साक्षी किंवा वास्तविकता आवश्यक रहात नाही. एकदा तुमच्या डोक्यात तिरस्काराची व द्वेष करण्यासारखी कल्पना रुजवली; मग वास्तवाशी नाते उरत नाही. छू म्हणायची खोटी, की तुम्ही अंगावर धावून जायला लागता. आणि त्याची प्रचिती मग मंगळवारी आली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा घोळका भाजपा नेते अरूण जेटली यांच्या निवासस्थानी जमला आणि त्याच्या निषेधाच्या घोषणा करू लागला. कुठलाही पुरावा नाही की कोणी साक्षीदार नाही, पण नेत्यांनी सांगितले आणि आरोप केला, म्हणजे जेटली ‘आप’ सरकार पाडणारे कारस्थानी होऊन जातात. त्याच्या विरोधात घोषणा देणे म्हणजेच मग राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि राजकीय परिवर्तनाचे महान पवित्र कार्य होऊन जाते. सोमवारचा टिव्हीवरील आम आदमी पक्षाच्या नेते, प्रवक्त्यांचा धिंगाणा व पोपटपंची बघितली होतीच. पण मंगळवारी जेटली यांच्या घरावर जमलेल्या व गदारोळ करणारी टोपीवाली झुंड बघितली आणि हिटलर आठवला. द्वेषाच्या नावाने माणसे जितकी झटकन जवळ येतात, तितकी ती प्रेमाच्या नावाने एकत्र येत नाहीत. चळवळीसाठी मित्रांपेक्षा शत्रूच्या नावाचा जप आवश्यक असतो. वास्तवातला शत्रू किंव संभाव्य कल्पनेतला शत्रू त्यासाठी आवश्यक असतो. शत्रू वा सैतानाच्या भयाने जितकी लौकर आक्रमक संघटना उभी करता येते, तितकी ती देवाच्या वा कल्याणाच्या नावाने उभी रहात नाही. जितका शत्रू प्रभावी व सामर्थ्यवान भासवला जातो, तितकी चळवळ अधिक झुंजार करता येत असते. ही प्रक्रिया जरा काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. मानसशास्त्रामध्ये त्याला झुंडीचे राजकारण वा सूचनाप्रवण झुंडशाही संबोधले जाते. अडॉल्फ़ हिटलर त्याचे नेमके विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देतो. हिटलरला विचारण्यात आले, की ज्यू जमातीचा संपुर्ण नि:पात केला पाहिजे, असे तुझे मत आहे काय? त्यावर हिटलर उत्तरला.....

     ‘छे छे, ज्यू नावाचा कोणी अस्तित्वातच नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्यू तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केवळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही.’ (हर्मान रॉशनिंग, हिट्लर स्पिक्स). 

   गेल्या दोन महिन्यात अरविंद केजरीवाल व त्यांच्या टोळक्याने ज्याप्रकारची झुंडशाही चालविली आहे, त्यामागची प्रेरणा ही अशी आहे. जनलोकपाल आणि भ्रष्टाचारमुक्त समाज ही अमूर्त कल्पना आहे. तिच्याभोवती अधिक काळ लोकांना रमवता येणार नाही. लोकांना खराखुरा हाडामासाचा शत्रू दाखवावा लागतो. त्या शत्रूला, त्या भ्रष्टाचार्‍याला, समाजशत्रूला चेहरा व नाव असावे लागते. ज्याचा द्वेष करावा असा मुखडा लागतो. छू म्हटल्यावर तात्काळ ज्याच्यावर तुटून पडावे, अशी शिकार चळवळीला आवश्यक असते. ही कुठल्याही चळवळीची अतीव निकड असते. ही बाब लक्षात घेतली तर केजरीवाल आणि त्यांची टोळी नित्यनेमाने कुणावरही कसलेही बिनबुडाचे व भ्रामक आरोप कशाला करतात, ते लक्षात येऊ शकेल. त्यांनी आरोप केलेली माणसे खरीखुरी व हाडामासाची असतात. पण त्यांच्यावरचे आरोप संदिग्ध व बिनबुडाचे असतात. बाकीच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळी तितक्या यशस्वी होत नाहीत वा झाल्या नाहीत. कारण त्यांनी भ्रष्टाचारावर हल्ले केले, तरी त्यातल्या शत्रूला चेहरा नाही की नाव नाही. ज्याचा मनापासून द्वेष करावा असा कोणी हाडामासाचा शत्रू त्या अन्य चळवळीच्या नेत्यांनी कधी समोर ठेवला नाही. उलट आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून व जनलोकपाल आंदोलनात असताना, त्याच पक्षाच्या नेत्यांनी सतत कुठल्या ना कुठल्या व्यक्तीवर, नेत्यावर बेछूट आरोप केलेले दिसतील. जे आम आदमी पक्षात सहभागी झाले नाहीत, अशा अण्णा टिमच्या इतर नेत्यांनी मात्र असे कधी कुणावर बिनबुडाचे आरोप केले नाहीत की व्यक्तीगत नावे घेतली नाहीत. केजरीवाल व आता ‘आप’नेत्यांनी मात्र अगत्याने हिटलरच्या सल्ल्याचे अनुकरण केलेले दिसेल. सोमवार मंगळवारी अरूण जेटली यांच्या घरापर्यंत पोहोचलेला घोळका तसाच कमालीच्या द्वेषाने धगधगताना दिसत नव्हता काय? जनलोकपाल आंदोलन आणि आम आदमी पक्ष यांच्यातला हा मूलभूत फ़रक आहे. केजरीवाल तिथून बाजूला कशाला झाले आणि उर्वरीत अण्णा टीम त्यांच्या सोबत का येऊ शकली नाही, त्यामागे हे झुंडीचे कारण निर्णायक आहे. पारंपारिक राजकीय पक्ष वा चळवळींच्या निकषावर म्हणूनच या पक्ष वा घटनाक्रमाला समजून घेता येणार नाही. त्यामागची झुंडीच्या मानसशास्त्राची प्रेरणा उलगडावी लागेल. (अपुर्ण)

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो.........


Only two things are infinite, the universe and human stupidity, and I'm not sure about the former. 
Albert Einstein 

 आज म्हणजे ३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी तमाम हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण चालू असताना बघितली आणि केजरीवाल यांचे विधान मनोमन पटले. रेलभवनच्या धरण्याअखेरीस केजरीवाल म्हणाले होते, ‘ये मीडियाको क्या हो गया?’ खरेच माध्यमांना काय झाले आहे, तेच समजत नाही. आज ‘आप’ची पत्रकार परिषद चालू असताना त्या पक्षाचे एक झुंजार नेते संजय सिंग व सबसे तेज नेते आशुतोष यांनी अतिशय खळबळजनक गौप्यस्फ़ोट केला. पण त्याची ब्रेकिंग न्युज कुठल्याच वाहिनीने केली नाही. त्या दोघांनी माध्यमांना स्पष्ट शब्दात जाब विचारला, की मागल्या महिन्याभरात ‘आप’ सरकारने दिल्लीत जितकी कामे केली, तितकी अन्य कुठल्या सरकारने कधी तरी केली होती काय? त्याचे कौतुक करायचे सोडून पत्रकार भलतेसलते प्रश्न कशाला विचारत आहेत, असा त्यांचा सवाल होता. पण ब्रेकिंग न्युज पुढेच होती. या दोघा नेत्यांनी सवाल केला, की ‘मागल्या महिन्याभरात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारांनी कोणते असे कौतुकास्पद काम केले? त्यांनाही जरा जाऊन विचारा ना?’ माध्यमांवर आणि विशेषत: वाहिन्यांवरच माहितीसाठी अवलंबून असणार्‍या निदान माझ्यासारख्या ‘आम आदमी’साठी ही मोठीच ब्रेकिंग न्युज होती. कारण या तीन राज्यात निवडणूका होणार आणि तिथे मतदानही झाल्याचे माझ्या ऐकीवात दोन महिन्यांपुर्वी होते. आठ आठवड्यापुर्वी तिथे मतमोजणीही झाल्याचे मी ऐकले होते. पण पुढे माझ्यातरी वाचनात वा कानावर तिथे सरकारे स्थापन झाली, विधीमंडळ पक्षांनी आपापले नेते निवडले किंवा मंत्रीमंडळाचा शपथविधी वगैरे झाल्याचे माझ्या बघण्यात आले नाही. अर्थात दहा मिनीटात फ़टाफ़ट शंभर बातम्यांमध्ये काही प्रक्षेपित झाले असेल तर बघायचे राहुन गेले असावे. पण कुठल्याही वाहिनीने या तीन राज्यात मुख्यमंत्री निवड वा मंत्रीमंडळाच्या शपथविधीची ठळक बातमी दिल्याचे मला ठाऊक नाही. मग ‘आप’नेते संजय सिंग व आशुतोष त्या तीन राज्यातल्या नव्या सरकारांच्या कामाचा हिशोब मागत असतील, तर ती ब्रेकिंग न्युज होत नाही काय?

   सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात सर्वच वाहिन्या व माध्यमात पाच राज्यांच्या निवडणुकांचा खुप बोलबाला होता. त्यासाठी मतचाचण्या घेऊन आकड्यांचे विश्लेषण चालू होते. मतदान कुठे किती झाले, त्याच्याही बातम्या गाजत होत्या. आणि अखेरीस ८ डिसेंबरला दिल्लीसह त्या तीन राज्यांच्या मतमोजणीला सुरूवात झाल्याचे बघितलेले आठवते. तेवढेच नाही. संध्याकाळपर्यंत राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाने मुसंडी मारून प्रचंड बहुमत संपादन केल्याचेही मी ऐकले होते. पण तो मामला ८ डिसेंबरच्या मध्यरात्री संपला. त्यानंतर त्या तीन राज्यात निवडणूका, मतदान वा मतमोजणी झाल्याची कुठली बातमी आजपर्यंत आलेली नाही. कोण जिंकला असेल वा कोणी मुख्यमंत्री झाला किंवा त्याने मंत्रीमंडळात कोणाला घेतले वगळले याबद्दल अवाक्षर कुठे ऐकायला मिळाले नाही. ९ डिसेंबर २०१३ पासून आजतागायत म्हणजे ‘आप’नेत्यांनी त्या तीन राज्यात नवी सरकारे आल्याचा उल्लेख करण्यापर्यंत त्या तीन राज्यात काही घडलेलेच नव्हते. मला तर वाटले होते की बहुधा निवडणुक आयोगाने त्या तीन राज्यातल्या निवडणूका व मतमोजणी रद्दबातल करून टाकली आणि तिथे एव्हाना राष्ट्रपती राजवट लागलेली असावी. म्हणून मी त्याबद्दल चौकसपणा वा चिकित्सक वृत्तीने बघितले सुद्धा नव्हते. कारण मी अत्यंत निष्ठावान असा वाहिन्या व न्युज चॅनेल्सचा अनुयायी आहे. सहाजिकच त्या तीन राज्यातल्या निवडणूका वा पुढल्या सरकार स्थापनेविषयी अवाक्षर आलेले नसेल. तीन राज्यात काय झाले हे माझ्यासारख्या ‘आम आदमी’ला कळावे कसे? कारण ९ डिसेंबरपासून आजतागायत केवळ दिल्लीच्याच विधानसभांच्या निकालाचे व त्यातून उदभवलेल्या राजकारणाचे विश्लेषण मी ऐकतो आहे. त्यानुसार दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त मोठे यश मिळवून भाजपाच्या व प्रामुख्याने मोदींच्या यशाचा रथ रोखला आहे आणि संपुर्ण देशात आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेची त्सुनामीच आलेली आहे. त्यात बहुतांश राजकीय पक्ष व नेते वाहून वा बुडून गेले आहेत.

   दिल्लीत आम आदमी पक्षाचे बहूमत थोडक्यात हुकले. त्यांना भाजपापेक्षा अवघ्या पाच जागा कमी मिळाल्या. पण त्यांचे बहूमत हुकताना त्यांनी भाजपाला बहूमताचा पल्ला गाठू दिला नाही. परिणाम इतका मोठा झाला, की अन्य तीन राज्यात भाजपाने मिळवलेले अफ़ाट यशही मातीमोल होऊन गेले. दिल्लीतील ‘आप’च्या यशापुढे माध्यमांचे डोळे इतके दिपले, की त्यांना दिल्ली व भारताचा नकाशा यातला फ़रकही कळेनासा झाला. पुढल्या दिड महिन्यात देशभरात कुठे काहीही घडत नव्हते, की घडू शकणार नव्हते. केजरीवाल मुख्यमंत्री होणे, त्यांनी बंगला गाडी नाकारणे, त्यांनी गल्लीबोळात सरकार बनवण्याविषयीचे जनमत आजमावणे, त्यांनी कॉग्रेसच्या पाठींब्याने सरकार बनवूनही कॉग्रेसचा पाठींबा नाकारणे किंवा त्यांच्या या लोकप्रियतेने जगभरात नव्या लोकशाही परिवर्तनाची त्सुनामी येणे; इतक्या एकाहून एक घडामोडी घडत होत्या. त्यात मध्यप्रदेश व राजस्थानात भाजपाने दोनतृतियांश मिळवलेले बहूमतही भुस्कट उडून जावे, तसे कुठल्याकुठे बेपत्ता झाले. भाजपा कॉग्रेसच नव्हेतर त्या तीन राज्यातले लोकही आपण नवे सरकार निवडले आहे, ते विसरून गेले. त्यामुळेच मग तिथे या गडबडीत सत्तेवर येऊन बसलेल्या सरकारला काहीही कामच उरले नाही. त्यांनी पदांच्या शपथा घेतल्या आणि आपापल्या घरोघरी जाऊन झोपा काढायचे काम हाती घेतले. देशात जे काही करायचे ते आता केजरीवाल व त्यांचे सहकारी करतील, आपल्याला काम नाही, असे मानून तीन राज्यातले मंत्री मस्त निद्रादेवीच्या आधीन झाले. ‘आप’नेते आशुतोष व संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली नसती, तर अजून कोणाला कळले सुद्धा नसते, की दिल्ली सोबतच या अन्य तीन राज्यात निवडणूका झाल्या व नवी सरकारे आलेली आहेत. सत्तेवर येऊनही त्यातले मुख्यमंत्री नुसते आळशी झोपा काढत आहेत. आणि या तीन राज्यातले सत्ताधीश काहीच काम करीत नसल्याने बिचार्‍या आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह केजरीवाल यांनाच माध्यमांच्या ससेमिर्‍याला सतत सामोरे जावे लागते आहे.

   माध्यमांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट नाही काय? पत्रकारांनी काय करावे आणि कसे जागरूक रहावे; तेही आता आम आदमी पक्षाच्या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागत आहे. जरा अन्य तीन राज्यांकडेही बघा, त्यांच्या कामाचीही परिक्षा घ्या, असे सांगायची पाळी या नव्या पक्षावर आलेली आहे. पण पहिल्या दिवसापासून सगळे पत्रकार बिचार्‍या ‘आप’च्या मागे हात धुवून लागले आहेत. माध्यमे व पत्रकारांना अन्य तीन राज्यात निवडणूका झाल्या आणि तिथेही नवीन सरकारे स्थापन झालीत, याची आठवण ‘आप’नेते करून देत आहेत. नशीब म्हणायचे. ‘आप’ नेत्यांनी इतकी जागरूकता दाखवली नसती तर आपल्या देशातील पत्रकार, माध्यमे व विश्लेषकांना राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्येही निवडणूका होऊन नवी सरकारे आलीत, हे कळायला कदाचित पुढली पाच वर्षे उलटावी लागली असती. म्हणून म्हटले, ही ब्रेकिंग न्युज आहे. पण बहुधा अजून माध्यमांना त्याचे भान आलेले नसावे. कारण पुन्हा सर्वच वाहिन्यांनी ‘आप’नेत्यांच्या भाजपा कॉग्रेसवरील आरोपांना वारेमाप प्रसिद्धी दिली. पण या तीन राज्यात कोण नवे मुख्यमंत्री झालेत किंवा त्यांनी गेल्या दीड महिन्यात काही काम केले काय, त्याचा कुठलाही गोषवारा अजून दिलेला नाही. नाही म्हणायला एकदोन अपवाद आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुरक्षा कमी करून केजरीवाल यांची नक्कल केल्याची एक बातमी मध्यंतरी येऊन गेली होती. पण शिवराजसिंग चौहान किंवा डॉ. रमण सिंग यांच्याविषयी काही कानावर आलेले नाही. बहुधा मतमोजणीनंतर त्यांना राज्यपालांनी परस्पर शपथेशिवायच मुदत वाढवून दिली असावी.

   इथे एक शंका मला येते, ती वेगळीच आहे. केजरीवाल किंवा त्यांच्या ‘आप’नेत्यांना तरी अन्य तीन राज्यात दिल्लीसोबतच निवडणूका झाल्याचा साक्षात्कार कधी घडला? कारण मध्यंतरीच्या महिन्याभरात त्यांनी कधी माध्यमांकडे त्या तीन राज्यांकडेही बघा, असे कधी सुनावले नव्हते. तेव्हा त्या तिन्ही राज्यांच्या निकालावर बोळा फ़िरवून व तिथल्या भाजपाच्या मोठ्या यशाकडे काणाडोळा करून माध्यमे फ़क्त दिल्लीतल्या ‘आप’च्या अर्धवट यशाचे गोडवे गाण्यात रमली होती, तेव्हा केजरीवालांना तरी कुठे तीन राज्ये आठवत होती? जेव्हा कौतुक संपून माध्यमे व पत्रकार कामाची चाचणी घेऊ लागली; तेव्हा आपल्या सोबतच इतर तीन राज्यात सरकारे सत्तेवर आल्याचा साक्षात्कार ‘आप’नेत्यांना झाला ना? जेव्हा कौतुकाचे बोल कानावर पडत होते, तेव्हा त्यात भागिदार नको होता आणि जेव्हा तपासण्याची वेळ आली, तेव्हा मात्र बाकीच्या सरकारांच्याही चुका तपासण्याचे सल्ले ‘आप’नेते देऊ लागले आहेत. देशात नव्हेतर जगात इतक्या अल्पावधीत इतके उत्तम काम दुसर्‍या कुठल्या सरकारने कधी केले नाही, असा केजरीवाल यांचा दावा आहे. किंबहूना त्यांनी जगातल्या सर्वच गोष्टी सर्वप्रथम केल्या आहेत. यापुर्वी दुसर्‍या कुणाला जे जमले नाही ते ते फ़क्त केजरीवालच करू शकतात. त्यांचे सरकारच करू शकते. निवडणूकीत दुसर्‍या क्रमांकाची मते व जागाही दुसर्‍या क्रमांकाच्या मिळवूनही कोणाला इतकी प्रसिद्धी आजवर मिळवता आलेली आहे काय? दुसर्‍या कुणा मुख्यमंत्र्याने अगोदर लालबत्तीच्या सरकारी गाड्या व बंगला नाकारून नंतर ते गुपचुप घेतले आहेत काय? कुठल्या मुख्यमंत्र्याने जनता दरबार भरवून त्यातून जीव मुठीत धरून पळ काढला आहे काय? वाजतगाजत दरबार भरवायच्या वल्गना करून नंतर तो कायमचा गुंडाळण्याचा विक्रम दुसर्‍या कुणाला कधी जमला आहे काय? दुसरा कुणी राजकारणी नेता सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत राहिला आहे काय? दुसर्‍या कुठल्या राजकीय पक्ष वा नेत्यांनी ‘अत्यंत विनम्रपणे’ उद्धटता करीत विरोधकांची निंदानालस्ती करण्याचे भाषाकौशल्य दाखवले आहे काय?

   आईनस्टाईन हा वैज्ञानिक विचारवंत म्हणतो, ‘दोनच गोष्टी अमर्याद आहेत; विश्वाचा पसारा आणि मानवी मुर्खपणा. मात्र पहिल्याविषयी मी साशंक असलो तरी दुसर्‍याविषयी नाही.’