सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो.........


Only two things are infinite, the universe and human stupidity, and I'm not sure about the former. 
Albert Einstein 

 आज म्हणजे ३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी तमाम हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण चालू असताना बघितली आणि केजरीवाल यांचे विधान मनोमन पटले. रेलभवनच्या धरण्याअखेरीस केजरीवाल म्हणाले होते, ‘ये मीडियाको क्या हो गया?’ खरेच माध्यमांना काय झाले आहे, तेच समजत नाही. आज ‘आप’ची पत्रकार परिषद चालू असताना त्या पक्षाचे एक झुंजार नेते संजय सिंग व सबसे तेज नेते आशुतोष यांनी अतिशय खळबळजनक गौप्यस्फ़ोट केला. पण त्याची ब्रेकिंग न्युज कुठल्याच वाहिनीने केली नाही. त्या दोघांनी माध्यमांना स्पष्ट शब्दात जाब विचारला, की मागल्या महिन्याभरात ‘आप’ सरकारने दिल्लीत जितकी कामे केली, तितकी अन्य कुठल्या सरकारने कधी तरी केली होती काय? त्याचे कौतुक करायचे सोडून पत्रकार भलतेसलते प्रश्न कशाला विचारत आहेत, असा त्यांचा सवाल होता. पण ब्रेकिंग न्युज पुढेच होती. या दोघा नेत्यांनी सवाल केला, की ‘मागल्या महिन्याभरात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारांनी कोणते असे कौतुकास्पद काम केले? त्यांनाही जरा जाऊन विचारा ना?’ माध्यमांवर आणि विशेषत: वाहिन्यांवरच माहितीसाठी अवलंबून असणार्‍या निदान माझ्यासारख्या ‘आम आदमी’साठी ही मोठीच ब्रेकिंग न्युज होती. कारण या तीन राज्यात निवडणूका होणार आणि तिथे मतदानही झाल्याचे माझ्या ऐकीवात दोन महिन्यांपुर्वी होते. आठ आठवड्यापुर्वी तिथे मतमोजणीही झाल्याचे मी ऐकले होते. पण पुढे माझ्यातरी वाचनात वा कानावर तिथे सरकारे स्थापन झाली, विधीमंडळ पक्षांनी आपापले नेते निवडले किंवा मंत्रीमंडळाचा शपथविधी वगैरे झाल्याचे माझ्या बघण्यात आले नाही. अर्थात दहा मिनीटात फ़टाफ़ट शंभर बातम्यांमध्ये काही प्रक्षेपित झाले असेल तर बघायचे राहुन गेले असावे. पण कुठल्याही वाहिनीने या तीन राज्यात मुख्यमंत्री निवड वा मंत्रीमंडळाच्या शपथविधीची ठळक बातमी दिल्याचे मला ठाऊक नाही. मग ‘आप’नेते संजय सिंग व आशुतोष त्या तीन राज्यातल्या नव्या सरकारांच्या कामाचा हिशोब मागत असतील, तर ती ब्रेकिंग न्युज होत नाही काय?

   सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात सर्वच वाहिन्या व माध्यमात पाच राज्यांच्या निवडणुकांचा खुप बोलबाला होता. त्यासाठी मतचाचण्या घेऊन आकड्यांचे विश्लेषण चालू होते. मतदान कुठे किती झाले, त्याच्याही बातम्या गाजत होत्या. आणि अखेरीस ८ डिसेंबरला दिल्लीसह त्या तीन राज्यांच्या मतमोजणीला सुरूवात झाल्याचे बघितलेले आठवते. तेवढेच नाही. संध्याकाळपर्यंत राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाने मुसंडी मारून प्रचंड बहुमत संपादन केल्याचेही मी ऐकले होते. पण तो मामला ८ डिसेंबरच्या मध्यरात्री संपला. त्यानंतर त्या तीन राज्यात निवडणूका, मतदान वा मतमोजणी झाल्याची कुठली बातमी आजपर्यंत आलेली नाही. कोण जिंकला असेल वा कोणी मुख्यमंत्री झाला किंवा त्याने मंत्रीमंडळात कोणाला घेतले वगळले याबद्दल अवाक्षर कुठे ऐकायला मिळाले नाही. ९ डिसेंबर २०१३ पासून आजतागायत म्हणजे ‘आप’नेत्यांनी त्या तीन राज्यात नवी सरकारे आल्याचा उल्लेख करण्यापर्यंत त्या तीन राज्यात काही घडलेलेच नव्हते. मला तर वाटले होते की बहुधा निवडणुक आयोगाने त्या तीन राज्यातल्या निवडणूका व मतमोजणी रद्दबातल करून टाकली आणि तिथे एव्हाना राष्ट्रपती राजवट लागलेली असावी. म्हणून मी त्याबद्दल चौकसपणा वा चिकित्सक वृत्तीने बघितले सुद्धा नव्हते. कारण मी अत्यंत निष्ठावान असा वाहिन्या व न्युज चॅनेल्सचा अनुयायी आहे. सहाजिकच त्या तीन राज्यातल्या निवडणूका वा पुढल्या सरकार स्थापनेविषयी अवाक्षर आलेले नसेल. तीन राज्यात काय झाले हे माझ्यासारख्या ‘आम आदमी’ला कळावे कसे? कारण ९ डिसेंबरपासून आजतागायत केवळ दिल्लीच्याच विधानसभांच्या निकालाचे व त्यातून उदभवलेल्या राजकारणाचे विश्लेषण मी ऐकतो आहे. त्यानुसार दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त मोठे यश मिळवून भाजपाच्या व प्रामुख्याने मोदींच्या यशाचा रथ रोखला आहे आणि संपुर्ण देशात आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेची त्सुनामीच आलेली आहे. त्यात बहुतांश राजकीय पक्ष व नेते वाहून वा बुडून गेले आहेत.

   दिल्लीत आम आदमी पक्षाचे बहूमत थोडक्यात हुकले. त्यांना भाजपापेक्षा अवघ्या पाच जागा कमी मिळाल्या. पण त्यांचे बहूमत हुकताना त्यांनी भाजपाला बहूमताचा पल्ला गाठू दिला नाही. परिणाम इतका मोठा झाला, की अन्य तीन राज्यात भाजपाने मिळवलेले अफ़ाट यशही मातीमोल होऊन गेले. दिल्लीतील ‘आप’च्या यशापुढे माध्यमांचे डोळे इतके दिपले, की त्यांना दिल्ली व भारताचा नकाशा यातला फ़रकही कळेनासा झाला. पुढल्या दिड महिन्यात देशभरात कुठे काहीही घडत नव्हते, की घडू शकणार नव्हते. केजरीवाल मुख्यमंत्री होणे, त्यांनी बंगला गाडी नाकारणे, त्यांनी गल्लीबोळात सरकार बनवण्याविषयीचे जनमत आजमावणे, त्यांनी कॉग्रेसच्या पाठींब्याने सरकार बनवूनही कॉग्रेसचा पाठींबा नाकारणे किंवा त्यांच्या या लोकप्रियतेने जगभरात नव्या लोकशाही परिवर्तनाची त्सुनामी येणे; इतक्या एकाहून एक घडामोडी घडत होत्या. त्यात मध्यप्रदेश व राजस्थानात भाजपाने दोनतृतियांश मिळवलेले बहूमतही भुस्कट उडून जावे, तसे कुठल्याकुठे बेपत्ता झाले. भाजपा कॉग्रेसच नव्हेतर त्या तीन राज्यातले लोकही आपण नवे सरकार निवडले आहे, ते विसरून गेले. त्यामुळेच मग तिथे या गडबडीत सत्तेवर येऊन बसलेल्या सरकारला काहीही कामच उरले नाही. त्यांनी पदांच्या शपथा घेतल्या आणि आपापल्या घरोघरी जाऊन झोपा काढायचे काम हाती घेतले. देशात जे काही करायचे ते आता केजरीवाल व त्यांचे सहकारी करतील, आपल्याला काम नाही, असे मानून तीन राज्यातले मंत्री मस्त निद्रादेवीच्या आधीन झाले. ‘आप’नेते आशुतोष व संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली नसती, तर अजून कोणाला कळले सुद्धा नसते, की दिल्ली सोबतच या अन्य तीन राज्यात निवडणूका झाल्या व नवी सरकारे आलेली आहेत. सत्तेवर येऊनही त्यातले मुख्यमंत्री नुसते आळशी झोपा काढत आहेत. आणि या तीन राज्यातले सत्ताधीश काहीच काम करीत नसल्याने बिचार्‍या आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह केजरीवाल यांनाच माध्यमांच्या ससेमिर्‍याला सतत सामोरे जावे लागते आहे.

   माध्यमांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट नाही काय? पत्रकारांनी काय करावे आणि कसे जागरूक रहावे; तेही आता आम आदमी पक्षाच्या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागत आहे. जरा अन्य तीन राज्यांकडेही बघा, त्यांच्या कामाचीही परिक्षा घ्या, असे सांगायची पाळी या नव्या पक्षावर आलेली आहे. पण पहिल्या दिवसापासून सगळे पत्रकार बिचार्‍या ‘आप’च्या मागे हात धुवून लागले आहेत. माध्यमे व पत्रकारांना अन्य तीन राज्यात निवडणूका झाल्या आणि तिथेही नवीन सरकारे स्थापन झालीत, याची आठवण ‘आप’नेते करून देत आहेत. नशीब म्हणायचे. ‘आप’ नेत्यांनी इतकी जागरूकता दाखवली नसती तर आपल्या देशातील पत्रकार, माध्यमे व विश्लेषकांना राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्येही निवडणूका होऊन नवी सरकारे आलीत, हे कळायला कदाचित पुढली पाच वर्षे उलटावी लागली असती. म्हणून म्हटले, ही ब्रेकिंग न्युज आहे. पण बहुधा अजून माध्यमांना त्याचे भान आलेले नसावे. कारण पुन्हा सर्वच वाहिन्यांनी ‘आप’नेत्यांच्या भाजपा कॉग्रेसवरील आरोपांना वारेमाप प्रसिद्धी दिली. पण या तीन राज्यात कोण नवे मुख्यमंत्री झालेत किंवा त्यांनी गेल्या दीड महिन्यात काही काम केले काय, त्याचा कुठलाही गोषवारा अजून दिलेला नाही. नाही म्हणायला एकदोन अपवाद आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुरक्षा कमी करून केजरीवाल यांची नक्कल केल्याची एक बातमी मध्यंतरी येऊन गेली होती. पण शिवराजसिंग चौहान किंवा डॉ. रमण सिंग यांच्याविषयी काही कानावर आलेले नाही. बहुधा मतमोजणीनंतर त्यांना राज्यपालांनी परस्पर शपथेशिवायच मुदत वाढवून दिली असावी.

   इथे एक शंका मला येते, ती वेगळीच आहे. केजरीवाल किंवा त्यांच्या ‘आप’नेत्यांना तरी अन्य तीन राज्यात दिल्लीसोबतच निवडणूका झाल्याचा साक्षात्कार कधी घडला? कारण मध्यंतरीच्या महिन्याभरात त्यांनी कधी माध्यमांकडे त्या तीन राज्यांकडेही बघा, असे कधी सुनावले नव्हते. तेव्हा त्या तिन्ही राज्यांच्या निकालावर बोळा फ़िरवून व तिथल्या भाजपाच्या मोठ्या यशाकडे काणाडोळा करून माध्यमे फ़क्त दिल्लीतल्या ‘आप’च्या अर्धवट यशाचे गोडवे गाण्यात रमली होती, तेव्हा केजरीवालांना तरी कुठे तीन राज्ये आठवत होती? जेव्हा कौतुक संपून माध्यमे व पत्रकार कामाची चाचणी घेऊ लागली; तेव्हा आपल्या सोबतच इतर तीन राज्यात सरकारे सत्तेवर आल्याचा साक्षात्कार ‘आप’नेत्यांना झाला ना? जेव्हा कौतुकाचे बोल कानावर पडत होते, तेव्हा त्यात भागिदार नको होता आणि जेव्हा तपासण्याची वेळ आली, तेव्हा मात्र बाकीच्या सरकारांच्याही चुका तपासण्याचे सल्ले ‘आप’नेते देऊ लागले आहेत. देशात नव्हेतर जगात इतक्या अल्पावधीत इतके उत्तम काम दुसर्‍या कुठल्या सरकारने कधी केले नाही, असा केजरीवाल यांचा दावा आहे. किंबहूना त्यांनी जगातल्या सर्वच गोष्टी सर्वप्रथम केल्या आहेत. यापुर्वी दुसर्‍या कुणाला जे जमले नाही ते ते फ़क्त केजरीवालच करू शकतात. त्यांचे सरकारच करू शकते. निवडणूकीत दुसर्‍या क्रमांकाची मते व जागाही दुसर्‍या क्रमांकाच्या मिळवूनही कोणाला इतकी प्रसिद्धी आजवर मिळवता आलेली आहे काय? दुसर्‍या कुणा मुख्यमंत्र्याने अगोदर लालबत्तीच्या सरकारी गाड्या व बंगला नाकारून नंतर ते गुपचुप घेतले आहेत काय? कुठल्या मुख्यमंत्र्याने जनता दरबार भरवून त्यातून जीव मुठीत धरून पळ काढला आहे काय? वाजतगाजत दरबार भरवायच्या वल्गना करून नंतर तो कायमचा गुंडाळण्याचा विक्रम दुसर्‍या कुणाला कधी जमला आहे काय? दुसरा कुणी राजकारणी नेता सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत राहिला आहे काय? दुसर्‍या कुठल्या राजकीय पक्ष वा नेत्यांनी ‘अत्यंत विनम्रपणे’ उद्धटता करीत विरोधकांची निंदानालस्ती करण्याचे भाषाकौशल्य दाखवले आहे काय?

   आईनस्टाईन हा वैज्ञानिक विचारवंत म्हणतो, ‘दोनच गोष्टी अमर्याद आहेत; विश्वाचा पसारा आणि मानवी मुर्खपणा. मात्र पहिल्याविषयी मी साशंक असलो तरी दुसर्‍याविषयी नाही.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा