गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

‘आप’नेता आशुतोष.... पत्रकार आशुतोष

(झुंडीचे राजकारण -३)   जवळपास दोन दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तवाहिन्यांवर पत्रकारिता करणारा अनुभवी पत्रकार आशुतोष याने अकस्मात नववर्षाच्या आरंभी आयबीएन हिंदी या वाहिनीच्या संपादक पदाचा राजिनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. इतक्या महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी अकस्मात अधिकारपद सोडून एखाद्या पक्षात चळवळीत सहभागी व्हायची ही पहिलीच घटना नव्हती. दिल्लीत ह्या नवख्या पक्षाला अनपेक्षित यश मिळाल्यावर देशातल्या अनेक नामवंत व्यक्तींनी त्यात प्रवेश घेण्य़ाची जणू शर्यतच सुरू झाली होती. पण तो मुद्दा इथे महत्वाचा नाही. त्या पक्षात दाखल होताच पत्रकार आशुतोष एकदम वेगळी भाषा बोलू लागला आणि त्याच्या वर्तनासह हावभावातही आमुलाग्र बदल जाणवू लागला. पत्रकार असताना एकाहून एक मुरब्बी राजकारण्यांना बोलते करणारा आणि आडोसे घेऊ न देणारा आशुतोष; स्वत: नेता म्हणून मुलाखत देऊ लागला, तेव्हा जुन्याजाणत्या नेत्यांनाही लाजवील इतका बेछूट व बेताल बोलू लागला. हा असा नखशिखांत बदल कुठल्या संघटनेत वा पक्षात गेल्यावर माणसात होतो काय? आजवर ज्या व्यक्तीला आपण बघत असतो आणि त्याच्या वागण्याच्या ज्या पद्धती असतात, त्यात असा आमुलाग्र बदल का होऊ शकतो? त्याच्यातली नम्रता, संयम, सोशिकता, समंजसपणा कुठल्याकुठे कसा बेपत्ता होऊन जातो?

   आम आदमी पक्षाचे अन्य नेते सोडून आशुतोष या नवोदिताकडे कशाला वळायचे? तर त्याला गेली आठदहा वर्षापेक्षा अधिक काळ लाखो लोकांनी ‘आजतक’ वा आयबीएन हिंदी वाहिनीवर बघितलेले आहे. त्यामुळेच त्याच्या वागण्या बोलण्याचा अनुभव अनेकांना असणार. आधी वाहिनीचा पत्रकार संपादक म्हणून तिथे येणार्‍या व संपर्कात असणार्‍या नेत्यांशी आर्जवी भाषेत बोलणारा व सुसंकृत वाटणारा हा माणूस; आम आदमी पक्षाची टोपी डोक्यावर घालून नेता होताच त्या पक्षाच्या अन्य नेत्यांसारखा गुरगुरू लागला. बदल लक्षणिय स्वरूपाचा आहे. आता हा माणुस नित्यनेमाने कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर ‘आप’चा प्रवक्ता नेता म्हणून दिसत असतो. जे कोणी बघत असतील त्यांनी अतिशय बारकाईने त्याच्या भाषा व वर्तनातले बदल निरखून अभ्यासावेत. त्यात आलेला आवेश, अहंकार व आक्रमकता नजरेत भरणारी आहे. कालपर्यंत सभ्य समंजस दिसणारा हा माणुस, असा अकस्मात का बदलू शकला? तोच नव्हे त्या पक्षात दाखल झालेल्या अनेकांमध्ये एकाच पद्धतीचा उद्धटपणा व उर्मटपणा आपल्याला दिसू शकतो. खाजगीत किंवा व्यक्तीगत पातळीवर बोलताना ही माणसे अत्यंत वेगळी असतील. पण जेव्हा ती डोक्यावर टोपी घालून किंवा पक्षाचे प्रतिनिधीत्व करायला सरसावतात, तेव्हा त्यांच्यातला उद्धटपणा व आवेश नजरेत भरणारा असतो. त्यामध्ये आपणच सत्य बोलतोय आणि दुसरा कोणी ऐकणारा ते मान्य करणार नसेल; तर तोच बदमाश असल्याचा सूर आढळेल. हाच तो बदल आहे. झुंडीत सहभागी झाल्यावर असा आमुलाग्र बदल घडून येत असतो. कारण झुंडीत सहभागी झाले, मग आपले व्यक्तीमत्व त्यात हरपून जाते आणि व्यक्ती त्याच एक जमावाचे अविभाज्य अंग होऊन जाते. आम आदमी पक्षाच्या प्रत्येक सदस्य वा नेत्याचा आवेश, भाषा वा बोलण्याची पद्धत एकसमान दिसेल. जणू एका साच्यातून काढलेला माल असावा, तसेच ते बोलताना व वागताना दिसतील. त्यालाच झुंडीची लक्षणे म्हणता येईल.

   झुंड म्हणजे जमाव नसतो. जमाव म्हणजे माणसांची गर्दी. पण जमाव जेव्हा एकाच विशिष्ठ हेतूने प्रभावित, प्रेरीत होऊन एकत्र येतो; तेव्हा त्याचे क्रमाक्रमाने झुंडीत रुपांतर होत असते. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने विविध विचारांचे वा मानसिकतेचे लोक एकत्र येत गेले. त्यांच्यात अन्य कुठले साम्य नव्हते. भ्रष्टाचाराला गांजलेल्यांचा तो एक मोठा घोळका होता. परंतु त्यामध्ये केजरीवाल व त्यांचे जुने सहकारी शिसोदिया आदी मंडळी आधीपासून एकाच संघटनेचे कार्यकर्ते होते. त्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व अण्णांकडे दिले, तरी चळवळीची दिशा ठरवण्याची सुत्रे आपल्याच हाती ठेवलेली होती. त्यासाठी जी कोअर कमिटी बनवण्यात आली; त्यात बहुतांश सदस्य केजरीवाल यांच्याच टोळीतले होते. त्यांच्या एकजुटीसमोर त्यात सहभागी झालेल्या इतरांना निरूत्तर करणे, त्यांना सहजशक्य होते. जिथे जमले नाही, तिथे मग अण्णा टिममधून एक एक लोक बाहेर पडत गेले. पण केजरीवाल टिम अण्णांना धरून राहिली. इतकेच नव्हेतर त्यांनी बाजूला होणार्‍यांना वा मतभेद दाखवणार्‍यांना पद्धतशीरपणे बदनाम करण्याचा डावही यशस्वीरित्या खेळला. सहाजिकच आंदोलनात सहभागी होणार्‍या नव्या चेहर्‍यांना केजरीवाल यांची मूळ संघटना व अण्णा टिम यातला फ़रक कधी समजू शकला नाही. मग जेव्हा अण्णांची गरज संपली, तेव्हा त्यांनाही सन्मानपुर्वक बाजूला करण्याचा डाव यशस्वीरित्या राबवण्यात आला. अण्णा कुठल्याही स्थितीत राजकारण मानणार नाहीत ह्याची खात्री होती. म्हणूनच अण्णा बाजूला झाले तरी त्यांनी चेतवलेल्या तरूणांना परिवर्तनाची सुरसुरी आलेली होती. त्यांनी अण्णांकडे पाठ फ़िरवून केजरीवाल यांच्या टोळीचा आश्रय घेतला. आपोआप मग त्याला झुंडीचे स्वरूप येत गेले. त्यात मग केजरीवाल व त्यांचे विश्वासू लोक वगळता इतर कुणाला मत असायचा विषयच नव्हता. केजरीवाल टोळी जे निर्णय घेईल, तेच सत्य व योग्य असा दंडक तयार झाला. पण उदात्त हेतूने व महान कारणास्तव एकत्र आल्याची पक्की निष्ठा असल्याने कोणी त्यात मोडता घालत नव्हता.

   आंदोलनात उतरल्यापासून आपण राजकारणात जाणार नाही अशी ग्वाही देणार्‍यांनी राजकीय पक्ष बनवून निवडणूका लढण्यापर्यंत मजल मारलीच. पण पुढे गेल्या दोन महिन्यात त्यांनी घोषित केलेल्या प्रत्येक विषयावर कोलांटी उडी मारलेली दिसेल. गाडी बंगला घेणार नाही, इथपासून प्रत्येक बाब उलटी झालेली दिसेल. पण त्याविषयी ‘आप’च्या सदस्य नेत्याकडे खुलासा मागा. तो नेमके उत्तर देण्यापेक्षा केजरीवाल करतात, तीच पोपटपंची करू लागेल. आपली सफ़ाई देण्यापेक्षा दुसर्‍या पक्ष नेत्यांवर आरोप करील. किंवा प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करू लागेल. त्याच्यासारखा सुबुद्ध सुशिक्षित माणूस इतका बेताल कसा बोलू शकतो, याचे आपल्याला मग नवल वाटते. पण त्यात नवल काहीच नाही. कारण तो अडाणी असो, की सुशिक्षित सुजाण माणुस असो, झुंडीत सहभागी झाला तर त्याला त्याचा मेंदू वापरताच येत नाही. त्याला पोपटपंचीच करावी लागते. कारण आपण करीत आहोत तो मुर्खपणा वा खोटेपणा असला, तरी आपण कुठल्या तरी महान उद्दीष्ट व हेतूसाठी तसे वागत आहोत; अशी त्याची पक्की धारणा झालेली असते. त्यामुळेच अन्यथा सभ्य सुसंस्कृत वाटणारी माणसे झुंडीत शिरल्यावर बेताल व बेछूट वागू लागतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणून मुद्दाम इथे पत्रकार आशुतोष याच्यातील बदलाकडे लक्ष वेधले आहे. झुंडीत माणुस कसा बदलतो आणि वहावत जातो, त्याचा हा उत्तम नमूना आहे. आशुतोष याच्या चेहर्‍यावर असे बेछूट बोलतांना दिसणारा छद्मीपणा त्याचा सज्जड पुरावा आहे. इतर ‘आप’नेते वा प्रवक्ते कदाचित तितके बनेल नसतील. पण झुंडीची लक्षणे त्यांच्यात स्पष्टपणे बघता येतात.

   झुंडीचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे तो जमाव एका ठराविक हेतूने वा उद्दीष्टाने एकत्र आलेला असला तरी त्याच्यात कमालीचे विरोधाभास एकत्र नांदत असतात. ते नेत्याच्या आहारी जातात आणि सुचनाप्रवण असतात. सूचनाप्रवण म्हणजे त्यांची बुद्धी स्वत:वर कसलीही जबाबदारी घ्यायला राजी नसते, तर नेत्याच्या आदेशाची सतत प्रतिक्षा करीत असते. नेत्याकडून आलेल्या सुचना वा आदेश म्हणजेच आपला स्वत:चा विचार वा निर्णय अशी झुंडीतल्या प्रत्येकाची ठाम समजूत असते. त्यामुळेच तिथे नेत्याशी मतभिन्नता असलेला कोणी टिकू शकत नाही, की झुंडीत शिरतही नाही. काही लोक त्यात फ़सतात. पण लौकरच नेता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो. तत्क्षणी तमाम झुंड त्या भिन्न मत दाखवणार्‍याकडे शत्रूवत नजरेने बघू लागते. आम आदमी पक्षाचे लोक कालपर्यंत त्यांची सहकारी असलेल्या किरण बेदीविषयी कसे बोलतात, ते बघितल्यास त्याची प्रचिती येईल. बेदी सुद्धा खुप जुनी गोष्ट आहे. नुकताच पक्षात मतभेद दाखवणारा आमदार विनोदकुमार बिन्नी याची अवस्था बघितली तर यातली झुंडीची मानसिकता लक्षात येऊ शकेल. बिन्नी प्रकरणात बिन्नी आज असत्य बोलत असतील. पण सरकार स्थापनेआधी त्यांची समजूत घालून त्यांना पत्रकारांसमोर खोटे बोलायला भाग पाडण्यात आले होते. तेव्हा त्यांना मंत्रीपद नको होते, असे केजरीवाल व अन्य ‘आप’नेतेही कॅमेरासमोर बोलले होते. पण आज तेच नेते बिन्नीला मंत्रीपद नाकारले म्हणून तो रागावलाय म्हणतात. याचा अर्थ सरकार स्थापनेपुर्वी केजरीवाल बेधडक पत्रकारांसमोर खोटे बोलले होते ना? ‘आप’च्या कोणी नेत्याने वा सदस्याने त्याबद्दल केजरीवाल यांना जाब विचारला आहे काय? किंबहूना त्याबद्दल आपण प्रश्न विचारला, तरी या निष्ठावंत ‘आम आदमी’ला संताप अनावर होतो.

   राजकारणात आपणच तेवढे इमानदार व पारदर्शक असल्याचे दिवसरात्र दावे करणार्‍या पक्षातले हे छुपे राजकारण, त्यांच्या लबाडीचा पुरावा नाही काय? परंतु त्याबद्दल कुणी केजरीवाल समर्थक आम आदमी नाराज आहे काय? असूच शकत नाही. कारण झुंडीत असताना त्याला असा विवेकी स्वयंभू विचार करायची मुभाच नसते. केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी अण्णा आंदोलनाचा आडोसा व आश्रय घेऊन एक झुंड पद्धतशीरपणे निर्माण केली. आज आपण दिल्लीतल्या राजकारणात जे काही बघत आहोत, त्याला म्हणूनच झुंडीचे राजकारण म्हणता येईल. हे झुंडीचे राजकारण कसे होऊ शकते? एकीकडे ते जमावाचे राजकारण असते आणि दुसरीकडे त्यात एकत्र येणारे लोक हे नेत्याचे सच्चे अनुयायी असावे लागतात. त्यांचा कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानापेक्षा आपल्या नेत्याच्या अमोघ अपुर्व कर्तबगारीवर आंधळा विश्वास असावा लागतो. त्याने सूर्याला चंद्र म्हटले, तर त्यावरही शंका घेणारा अशा झुंडीत असून चालत नाही, की मतभेदाचा सूर लावणार्‍याला त्यात जागा नसते. त्याच झुंडीत काहीकाळ घालवलेले बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी नेमक्या अशाच वर्तनाचा व कार्यपद्धतीचा हवाला दिलेला आहे. एकवेळ केजरीवाल आपली चुक मान्य करतील, पण त्यांच्या सच्च्या अनुयायांना ते चुकल्याचे मान्य होईल काय? ती केवळ अशक्यकोटीतली गोष्ट आहे. ही झुंड कशी असते? जमाव आणि झुंडीत काय फ़रक असतो? झुंडीची लक्षणे कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढल्या काही लेखातून समजून घेणार आहोत. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा