शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

डॉ. दाभोळकर, त्या पुरोगाम्यांना माफ़ करा   गुरूवारची संध्याकाळ दवाखान्यातच गेली. आपण एकदा डॉक्टरांच्या तावडीत सापडलो, की त्यांनी मोकळीक करण्यापर्यंत आपल्याला निघता येत नाही. सहाजिकच त्या दिवशी विविध वाहिन्यांवरचे प्राईमटाईम वा चर्चा हुकल्या. मग जेवण वगैरे उरकून बातम्या बघितल्या; त्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. डॉ. दाभोळकरांच्या हत्येला महिना पुर्ण होत आला आणि अजून कोणा संशयितालाही अटक झालेली नाही, अशी ती तक्रारवजा बातमी होती. तेच निमित्त साधून पत्रकार युवराज मोहिते यांच्या पुढाकाराने जादूटोणा कायद्याचे सोपे चित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झाल्याची बातमी त्याच्या सोबतच सांगितली गेली. ह्या पुस्तकाचे प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालेले चित्रणही दाखवले गेले. त्यात राजसोबत दाभोळकरांची कन्या मुक्ता व युवराज दिसत होते. नंतर त्यासंबंधाने राज ठाकरे यांची खोचक प्रतिक्रियाही दाखवण्यात आली. तसे पाहिल्यास त्यात नवे असे काहीच नव्हते. दाभोळकर यांच्या हत्येनंतर तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज यांनी जो संशय व्यक्त केला होता, त्याचीच त्यांनी महिनाभराने पुनरुक्ती केलेली होती. अन्य कुठल्याही गुन्ह्याचे आरोपी व पुरावे सापडतात, मग दाभोळकरांचेच मारेकरी का सापडत नाहीत; असा सवाल राजनी एका. ही हत्या सरकार प्रायोजित तर नाही ना; असा खुला आरोप राजने केला. महिनाभर आधी त्यांनी संशयाची सुई सत्ताधार्‍यांकडेही जाते; असे म्हटलेलेच होते. आता अशा राजकीय आरोपाकडे सत्ताधारी पक्षाने काणाडोळा करणेही शक्य नव्हते. सहाजिकच त्यावर सत्ताधारी, म्हणजे कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडून अत्यंत संतप्त बोचर्‍या प्रतिक्रिया आल्या. त्याही सदरहू मराठी वाहिन्यांनी अगत्यपुर्वक दाखवल्या. त्यापैकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आजकालचे प्रवक्ते नबाब मलिक, यांनी दुखण्यावरच बोट ठेवले. अर्थात ते तसे राज ठाकरे यांचे दुखणे म्हणता येणार नाही. तर माध्यमांचे वा सेक्युलर दुखणे म्हणता येईल. म्हणूनच त्याची योग्य दखल माध्यमे वा सेक्युलर मंडळींनी कशी घेतली नाही; याचे मला खास आश्चर्य वाटले. मग तो विषय तसाच मनात घोळत राहिला.

   नबाब मलिक म्हणाले, युतीची सत्ता असताना, असेच एक हत्याकांड अनुत्तरीत राहिलेले आहे. ज्याचे दुवे व धागेदोरे आजवर सापडलेले नाहीत आणि त्यातला अनुभव दांडगा असल्यानेच राज ठाकरे असा संशय घेत असावेत. त्यांचा रोख युतीची सत्ता असतानाच्या गाजलेल्या रमेश किणी मृत्यूशी होता. मुंबईचा एक रहिवासी हा किणी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये संशयास्पद रितीने मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर दिर्घकाळ त्या मृत्यूसाठी शिवसेनेचे तेव्हा नेता असलेले राज ठाकरे यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्या निकटवर्तियांना त्यात गुंतवून रोजच्या रोज आरोपांच्या फ़ैरी उडवल्या जात होत्या. अखेरीस दोनतीन लोकांना अटक झाली. सीबीआयची चौकशी झाली. पण प्रत्येक चौकशीत आरोप निष्फ़ळ ठरले. कोणी साक्षीदार वा कुठला पुरावा समोर आणला गेला नाही. पुढे त्यात आरोपी केलेल्यांचीही कोर्टात निर्दोष मुक्तता झाली. पण आज नबाब मलिक व गेल्या वर्षापुर्वी नाशिकच्या महापालिका निवडणूकीत छगन भुजबळ, यांनी पुन्हा किणी हत्याकांडाचा उल्लेख केला होताच. महिनाभरापुर्वी जसा दाभोळकर प्रकरणात सनातन वा त्याचे कोणी म्होरके आहेत, त्यांच्यावर छातीठोकपणे आरोप चालले होते, तसेच तेव्हा किणी प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर बेताल आरोप चालू होते. तीन चौकश्या होऊनही साधा एफ़ आय आर दाखल व्हावा इतकाही दुवा सापडला नव्हता. तरी भुजबळांपासून पुष्पा भावे यांच्यापर्यंत तमाम लोक कंबर कसून राज ठाकरे यांच्या अटकेसाठी अहोरात्र झटत होते. त्यासाठी किणी यांची पत्नी शीला किणी यांना प्रेक्षणीय व्यक्ती असल्यासारखे सहानुभूती जमवायला पेश केले जात होते.  किमान वर्ष दिड वर्ष हा खेळ चालला. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दोन वर्ष त्या ‘बहिणी’कडून भुजबळांनी राखीही बांधून घेतली होती. परंतू आज मृत रमेश वा त्याची पिडीत पत्नी शीला किणी कोणालाही आठवत नाही. किंबहूना तेव्हा वरातीतल्या वर्‍हाड्यांसारखे नाचणारे कपील पाटिल, निखिल वागळे, युवराज मोहिते, पुष्पा भावे, छगन भुजबळ सगळेच किणीला विसरून गेलेत. याचा अर्थ, त्याच्या मारेकर्‍यांचा शोध लागला व त्यांना कठोर शिक्षा झाली अशी समजूत करून घेण्याचे काही कारण नाही. त्यात पकडलेल्या संशयितांवर खटले झाले व सुनावण्य़ाही झाल्या. पण दोनपाच वर्षे चाललेल्या त्याच खटल्याच्या कुठे बातम्याही आल्या नाहीत, की त्या सहानुभूतीदारांपैकी कोणी त्याबद्दल शीला किणींकडे विचारपूसही करायला फ़िरकला नाही.

   म्हणूनच मला नवल वाटले. गुरूवारी रात्री राज ठाकरे यांच्या हस्ते दाभोळकरांच्या स्मृत्यर्थ काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांच्याच बाजूला मिरवणारे युवराज मोहिते बघून मला नवल वाटले. ते चित्र शीला किणी यांनी बघितले असेल; तर त्यांना काय वाटले असेल? कारण हेच युवराज मोहिते तेव्हा सतरा वर्षापुर्वी किणी हत्याकांडातला आरोपी म्हणून राज ठाकरे यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात गर्क होते. आज ज्याप्रकारे त्यांनी आपल्या माध्यमातून दाभोळकर यांच्या संशयास्पद हत्येबद्दल सहानुभूतीचा धंदा मांडला आहे; तसाच तेव्हा त्यांनी निखिलच्या ‘महानगरी’ दुकानातला एक साधा विक्रेता म्हणून रमेश किणी यांच्या मृत्यूचा बाजार मांडला होता. त्यासाठीच्या सहानुभूतीचा वाडगा फ़िरवलेला होता. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हत्यारा म्हणून शरसंधान चालविले होते. ज्या तडफ़ेने व आवेशात आज युवराज व त्यांचे पुरोगामी सेक्युलर साथीदार सनातनच्या विरोधात गदारोळ करतात; तेच तेव्हा राज ठाकरेच्या विरोधात चाललेले होते. तुलनेने सनातन विरुद्धचा गाजावाजा महिन्याभरात कमी झाला वा ओसरला आहे. राज विरुद्धचा तमाशा वर्षभर तरी जोमात चालू होता. त्याबद्दलही माझी तक्रार नाही. आज दाभोळकरांच्य मारेकर्‍यांना पकडण्यासाठी टाहो फ़ोडत असताना; आपण राज ठाकरेच्याच बाजूलाच उभे आहोत व त्याच्याच ‘शुभहस्ते’ दाभोळकरी पुस्तकाचे थाटामाटाने प्रकाशन करून घेत आहोत, हे समजण्या इतकीही युवराजला शुद्ध नसावी? कारण अजून तरी त्याने किंवा त्यांच्या सेक्युलर गोतावळ्यातील कोणी; किणी प्रकरणात राज ठाकरे निर्दोष असल्याचे जाहिरपणे मान्य केल्याचे माझ्या ऐकीवात नाही. किंवा सतरा वर्षापुर्वी आपण किणी प्रकरणात अकारण राजला गोवण्याचे पाप केल्याची कबुली त्यांनी कुठे दिलेली माझ्यातरी वाचनात नाही. म्हणजेच आजही राज ठाकरे त्यांच्यासाठी किणी मृत्यूमधला संशयितच असतो ना? मग त्याच्याच हस्ते दाभोळकरी विचारांचे पुस्तक प्रकाशन? की धंदा व फ़ायदा असेल तेव्हा मरणारा निव्वळ विकावू वस्तू समजण्याला सेक्युलर पुरोगामी कळवळा म्हणतात?

   एका बाजूला राष्ट्रवादी पक्षाचा प्रवक्ता नबाब मलिक, किणी प्रकरणाची राज ठाकरे यांना आठवण करून देतो आणि दुसरीकडे त्याच किणीच्या सुतकातला एक प्रमुख सुतकी युवराज त्याच राज ठाकरे यांच्या हस्ते त्याच दाभोळकरी पुस्तकाचा सोहळा साजरा करतो. काय सांगावे? उद्या काही वर्षांनी हेच युवराज व त्याचे सेक्युलर साथीदार अन्य कुणा सेक्युलर पुरोगाम्याच्या विचारांच्या पुस्तकाचे प्रकाशन सनातनच्या आठवल्यांच्या हस्ते सुद्धा करू शकतील. त्यांना कोण मेला अथवा मारला गेला, याच्याशी काहीही कर्तव्य नसते.  त्याच्या मरणातून आपल्याला काय साध्य करून घेता येते; त्यावर त्यांचा डोळा असतो. म्हणून तर किणीच्या प्रकरणात राज ठाकरे व त्याच्या माध्यमातून सेना भाजपाच्या युती सरकारला गोत्यात घालण्यासाठी त्या मृत्यूचा वापर झाला आणि जेव्हा त्यामध्ये राजला गुंतवता येत नाही असे दिसून आले; तेव्हा शीला किणी यांना वार्‍यावर सोडून तमाम सेक्युलर चळवळ्ये फ़रारी झाले होते. आजही फ़रारी आहेत. पण डॉ. दाभोळकर तर त्यांचे आपले, म्हणजे चळवळीतले आहेत ना? त्यांच्याविषयीची सहानुभूती किती खरी मानायची? माझा तरी तसा गैरसमज होता. पण गेल्या महिन्याभरात तोही संपला. कारण एका महिन्याच्या आत २०-२१ ऑगस्टला गळा काढून टाहो फ़ोडणार्‍या तमाम रुदाल्या आज बेपत्ता आहेत. पंधरा दिवस सनातनच्या कुणा म्होरक्याला झोडण्यासाठी निमित्त म्हणून दाभोळकरांच्या हत्याकांडाचे चक्क भांडवल करण्यात आले. मग गोव्यात कोणी सनातनचा साधक पकडल्याचे ढोल पिटून झाले. पण त्यानंतर यात सनातनला गोवता येत नसल्याचे जाणवताच, तमाम सेक्युलर पुरोगामी फ़रारी झालेत आणि हमीद वा मुक्ता ही दाभोळकरांची मुले आपल्यापरीने न्यायासाठी प्रयत्नशील आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? महिनाभरापुर्वी टाहो फ़ोडत गल्ली ते दिल्लीपर्यंत आक्रोश करणार्‍यांना दाभोळकरांबद्दल आत्मियता होती? त्यांना न्याय मिळावा म्हणून ओरडा चालला होता? की बहुतेक पुरोगामी आपला सनातन विरुद्धचा कंडू शमवून घेण्यासाठी एका निरपराधाच्या हत्याकांडाचे बेशरम राजकीय भांडवल करीत होते? जितक्या सराईतपणे किणी हत्याकांड वार्‍यावर सोडून पुरोगामी राजकारण खेळले गेले, तितक्याच व्यापारी दिखावू मानसिकतेने दाभोळकरांच्या हत्याकांडाचे राजकारणच केले गेले नाही काय? सनातनला गोत्यात आणण्यापलिकडे त्यांचे सेक्युलर पुरोगामी अश्रू किती दिखावू व खोटे होते त्याचा यापेक्षा अधिक पुरावा कुठला हवा? सनातन संस्था अडकणार नसेल; तर यातल्या किती लोकांना दाभोळकरांचे खरे खुनी व हल्लेखोर पकडले जाण्यात स्वारस्य आहे? असेल तर त्याविषयीचा आवाज का थंडवला आहे? जितका सनातनवाल्यांना पकडण्य़ासाठी दबाव आणला जात होता, तितका खरे गुन्हेगार पकडण्यासाठी जोर का लावला जाताना दिसत नाही?

   यासाठीच मी पुरोगामी व सेक्युलर हे शब्द शिवीसारखे वापरतो किंवा अपशब्द मानतो. इतकी या मतलबी लोकांनी त्या शब्दांची रया रसातळाला नेऊन ठेवली आहे. गुन्हेगार व हल्लेखोर देखील अशा व्यापारी मतलबी पुरोगाम्यांपेक्षा अधिक प्रामाणिक असू शकतील. म्हणून मला कोणी प्रतिगामी, पुराणमतवादी म्हटले तरी चालते. पण पुरोगामी म्हटले तरी अंगावर झुरळ पडल्यासारखे शहारे येतात. आपणही त्या पुरोगामी बदमाशांकडून गुराढोरासारखे वापरले जाऊ, अशी भिती सतावते. सर्व आयुष्य चळवळीसाठी देणार्‍या दाभोळकराची ही स्थिती असेल, तर सामान्य पुरोगामी कार्यकर्त्याचे किती भयंकर शोषण व फ़सवणूक दिशाभूल होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

भूमिकेतला अभिनय आणि अभिनिवेश


   मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी एनडीटीव्ही या इंग्रजी वाहिनीवर बक स्टॉ्प्स हिअर या चर्चेत बरखा दत्त हिने दोन मुस्लिम नेत्यांना आमंत्रित केलेले होते. त्यातले एक होते गुजरातचे मोदी समर्थक जाफ़रभाई सारेशवाला आणि दुसरे कोणी दिल्लीतले मुस्लिम नेता होते. त्यांनी नेहमीप्रमाणे गुजरातच्या दंगलीत ग्रासलेले मुस्लिम अजून निर्वासित छावण्यात खितपत पडलेत, मग मोदींच्या विकासाच्या गप्पा कशाला; असा सवाल केला. जाफ़रभाईंनी त्यांना तिथल्या तिथे आव्हान दिले. दिल्लीत बसून वाटेल त्या अफ़वा पसरवू नका. जरा गुजरातला या आणि वास्तव आपल्या डोळ्यांनी बघा, असे बजावले. गुजरात वा अहमदाबादेत कुठे अशी एक तरी दंगलग्रस्त छावणी आहे ते दाखवा; हे आव्हान तो मुस्लिम नेता स्विकारू शकला नाही. पण मुद्दा तो नाहीच. चर्चेचे आयोजन करणारी बरखा स्वत: पत्रकार आहे आणि तिला अशा छावण्या नाहीत हे ठाऊक असायला हवे. निदान ठाऊक नसेल तर तिने तात्काळ तोच प्रश्न पकडून त्या मुस्लिम नेत्याला फ़ैलावर घ्यायला हवे होते. पण तसे घडले नाही. घडत सुद्धा नाही. जेव्हा असे खोटेपण उघड होते, तेव्हा सेक्युलर मुखवटा लावलेले पत्रकार लगेच सारवासारव करतात आणि त्या खोटेपणावर पांघरूण घालू बघतात. त्यासाठी केविलवाणी बौद्धिक कसरत करतात. ती बाब लोकांच्या लक्षात आलेली आहे. बुद्धीमान असून बरखा असे का वागते? सेक्युलर असे का वागतात? त्यालाच भूमिका घेणे म्हणतात. भूमिका म्हणजे तरी काय असते? भूमिका घेतली, घ्यायला हवी, असा शब्दप्रयोग काय सुचवतो? या भूमिका म्हणजे अमिताभ बच्चन वा शाहरुख खान यांच्या अभिनयासारखा मामला आहे काय? सेक्युलर वा हिंदूत्ववादी, पुरोगामी प्रतिगामी भूमिका म्हणजे निव्वळ अभिनय असतो काय? काही काळासाठी तसा अभिनय करणे म्हणजे भूमिका घेणे असते काय? 

   आपल्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना अभिनेता वा अभिनेत्री, जसे त्या पात्रा व्यक्तीमत्वाशी तर्कसुसंगत वागतात आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी त्या तर्कशास्त्राचा काहीही संबंध नसतो, तसाच काहीसा हा ‘भूमिका घेण्याचा’ प्रकार आहे काय? ज्याचा वास्तव जीवनाशी वा वर्तनाशी, सत्याशी काडीमात्र संबंध नसावा? एकदा ‘ती भूमिका’ घेतली मग माणूस ‘तसा’ वागत जातो आणि तसे करताना त्याला वास्तविकतेची जोडलेले प्रश्न विचारायचे नसतात. कुठल्या चित्रपटात अमिताभने केलेल्या भूमिकेत तो जसा वागला किंवा त्याने जे केले; त्याचा वास्तवाशी किती संबंध आहे, असे त्याला विचारण्याची सोय नसते, तसाच हा प्रकार असावा. सामाजिक वा सार्वजनिक जीवनात वागणार्‍या अनेकांची अशीच स्थिती आपल्या अनुभवास येत असते. अन्य बाबतीत अत्यंत तर्कसंगत व योग्य वर्तन असलेली ही माणसे; ‘तशा’ भूमिकेचा प्रसंग आला, मग वास्तवाशी तर्कविसंगत वागताना दिसतात. आणि हे ठराविक लोकांचेच होते असेही मानायचे कारण नाही. कुठल्याही ‘भूमिकेत’ जाणार्‍याची तीच स्थिती असते. इथे कालच्या चर्चेत बरखा सेक्युलर ‘भूमिकेत’ होती सहाजिकच तिला दिल्लीच्या त्या मुस्लिम नेत्याच्या थापा व अफ़वाबद्दल जाब विचारण्याची गरज वाटली नाही. कारण ज्या भूमिकेत ती होती, त्या भूमिकेत तिला तसेच बोललेले ऐकायचे व आपल्या श्रोत्यांना ऐकवायचे होते. सहाजिकच खरेखोटे दुय्यम होऊन जाते. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व त्यात ठराविक भूमिका घेणार्‍यांची तशीच स्थिती असते. त्यांना ‘भूमिकेत’ गेल्यावर तारतम्य बाळगण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरत नाही. तर त्या ‘भूमिकेशी’ जुळणारे खोटेही चालू शकते, त्याचे समर्थन करावे लागते. त्यासाठी कुठला सज्जड पुरावा किंवा तपशील आवश्यक वाटत नाही. 

   आधीच्या माझ्या लेखात मी धोंडोपंत यांच्या एका वाक्याची मिमांसा केलेली आहे. तिथे त्यांची पाकिस्तान विषयीची भूमिका ठरलेली आहे. कुठल्याही रितीने वा पद्धतीने पाकिस्तानचा पराभव बघितलेला त्यांना आवडतो. ही त्यांची ठाशीव भूमिका आहे. नेमकी अशीच स्थिती सेक्युलर वा पुरोगाम्यांची असते. त्यांच्या मनात मोदी वा संघ परिवार, हिंदुत्ववादी मंडळीविषयी एक ठाम भूमिका आहे. एकदा ती भूमिका स्विकारली, अंगीकारली; मग त्याबाबतीतले तारतम्य बाळगण्याचे सोयरसुतक उरत नाही. त्याचे प्रतिक असलेल्या कुठल्याही गोष्टी नामशेष झालेल्या वा पराभूत होताना बघण्यात त्यांच्या मनाला खुप आनंद होत असतो. त्यात त्यांचा कुठला वैयक्तीक नफ़ातोटा असतोच असेही नाही. उदाहरणार्थ गुजरातच्या दंगली व देशात आजवर झालेल्या दंगलीचे घेऊ. त्यात तसा फ़ारसा फ़रक नाही. पण गुजरातमधली कुठलीही गडबड गोंधळ घ्या, ताबडतोब मोदी त्याला जबाबदार असतात. पण अन्य राज्यातील तशाच प्रकारची घटना असली, मग मात्र त्यातला राज्यकर्ता दोषी धरायची त्यांची तयारी नसते. पंतप्रधान कार्यालयातून कोळसा खाणीच्या फ़ायली गायब झाल्या वा तिथेच अनेक घोटाळ्यांचे धागेदोरे जाऊन पोहोचतात. त्यांच्या अनेक मंत्र्यांवर थेट कोर्टाकडून ठपका आलेला आहे. पण त्याचा मनमोहन सिंग यांच्याशी काडीमात्र संबंध नाही; असे सांगायला हेच सेक्युलर पत्रकार हिरीरीने पुढे येतात. पण गुजरातमध्ये कुपोषण असो, पोलिस चकमक असो, दंगल असो, सामान्य पोलिस शिपायाने केलेले पाप असो. त्याचा थेट मुख्यमंत्र्याशी संबंध जोडायला ही मंडळी केविलवाणी बौद्धिक कसरत करताना दिसतील. त्याला भूमिकाच जबाबदार असते. तसे वागण्याचा त्यांच्या बुद्धीशी संबंध नसतो, तर त्यांच्या भूमिकेशी तसे वागणे निगडीत असते. उमा भारती वा काही लोकांनी आसाराम बापू यांच्या समर्थनाला जाण्याचा मुर्खपणा तशाच भूमिकेतून केलेला आहे. हा सगळा भूमिका घेण्याचा परिणाम असतो. एकदा भूमिका घेतली, मग आपल्या बुद्धीला तिलांजली देऊन भरकटणे भागच असते. भूमिका व अंधानुकरण यात काहीच फ़रक नसतो. 

   आपण अत्यंत शास्त्रशुद्ध तार्किक राजकीय विचार करून भूमिका घेतो, असे सतत अभिमानाने सांगणार्‍या कम्युनिस्टांची अशीच शोकांतिका आहे. कोणातरी एका विचारवंत पत्रकाराने कम्युनिस्टांबद्दल पुर्वी केलेले एक विधान आठवते. त्यांच्या डाव्यानिष्ठा इतक्या सोवियत युनियनशी जोडलेल्या होत्या, की मास्कोत मुसळधार पाऊस पडत असेल आणि दिल्लीत झक्क ऊन पडलेले असेल; तरी कम्युनिस्ट डोक्यावर छत्री घेऊनच चालेल. याला भूमिका घेणे म्हणतात. जिथे वास्तवाशी बुद्धीला झगडावे लागते. बुद्धीला पटत नसले तरी भूमिका म्हणून चुकीचे समर्थन करावे लागते. जसे आज आसारामचे भक्त त्याच्या पापकर्माचेही समर्थन करतात, तसेच काही हिंदूत्ववादीही त्यात गुंतलेले दिसतील. तितक्याच उत्साहात दिल्लीतल्या शीख कत्तलीला पाठीशी घालून गुजरातच्या दंगलीचे अवडंबर माजवताना कडवे सेक्युलर सुद्धा दिसतील. दोन्हीकडे ठरलेल्या भूमिकेमुळे येणारी अगतिकता साफ़ दिसू शकते. याचीच दुसरी बाजूही आहे. जेव्हा कोणी एक भूमिका घेऊन उभा ठाकतो, तेव्हा त्याच्या विरोधात असलेला दुसर्‍या टोकाला जाऊन संबंध नसताना विरुद्ध मुर्खपणाचेही समर्थन करताना दिसेल. जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेताच करूणानिधी एनडीएमध्ये सहभागी झालेले होतेच ना? अणूकरार विषयावरून डाव्यांनी युपीए सरकारचा पाठींबा काढून घेताच, ममता त्याच्या समर्थनाला पुढे सरसावल्याच की नाही? अशा दोन परस्पर विरोधी गोटात वाटल्या गेलेल्यांना आपली अशी कुठली ठाम भूमिका नसतेच. अन्य कुणाचे कडवे विरोधक वा शत्रू म्हणुन त्यांच्या भूमिका प्रसंगानुसार बदलत असतात. आणि त्याबद्दल त्यांना छेडायला गेलात, तर त्याचेही लंगडे बौद्धिक समर्थन मोठ्या हिरीरीने ही मंडळी करताना दिसतील. दोष त्यांचा नसतो किंवा त्यांच्या वास्तविक विचारांचाही नसतो. तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना स्वतंत्रपणे आपली बुद्धी वापरता येत नसते. कॉम्प्युटरच्या भाषेत ज्याला डिसेबल करणे म्हणतात, तशी भूमिका घेतल्यावर विचारशक्ती ठराविक बाबतीत आपोआप डिसेबल होत असते. 

   समोर घडणार्‍या घटना कुठल्याही असोत, कशाही असोत; त्यात आपल्या भूमिकेला साजेसे जेवढे असेल, तेवढेच उचलून त्यावर आपली प्रतिक्रिया उमटत असते. आपला प्रतिसाद वास्तवाला सोडून असू शकतो. म्हणूनच गुजरातची दंगल म्हटले, की तावातावाने बोलणारे त्या दहा वर्षापुर्वीच्या घटनेबद्दल जितके संवेदनाशील होतात, तितके वर्षभरापुर्वीच्या आसामच्या हिंसाचाराबाबतीत एकदम सौजन्यशील होऊन जातात. भूमिका हा एकप्रकारे अभिनय वा अभिनिवेशच असतो. तसे त्या त्या व्यक्तीचे मत असतेच असेही नाही. एका विशिष्ठ विषयात भूमिका स्विकारली; मग त्याला तिच्यामागून फ़रफ़टत जावे लागत असते आणि त्यासाठी आपल्याच बुद्धी व विवेकाला गुंडाळून ठेवावे लागत असते. जसजशी त्याची सवय अंगवळणी पडते, तसा मग प्रतिसाद व प्रतिक्रिया आपोआप दिल्या जातात. त्या उत्स्फ़ुर्तही वाटतात. गुजरात बाहेरचे मोदी विरोधक व मोदी समर्थक अशाच गटात विभागले गेलेले आहेत. त्यांचे आपापले हेवेदावे आहेत वा असतात आणि त्यासाठी निमित्त म्हणून मग मोदी वा गुजरातच्या दंगलीचे विषय वापरले जात असतात. तसे वागणे ही त्या ‘भूमिके"ची मागणी असते. काही अभिनेत्री मोठा आव आणून भूमिकेची आवश्यकता असेल तर आपणही ‘देहप्रदर्शन’ करू असे सांगतात, त्यापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका व तिच्या आवश्यकता भिन्न नसतात. त्याला आपापले पुर्वग्रह व समजुतीही तितक्याच जबाबदार असतात. एकदा त्या भूमिका निश्चित झाल्या, मग त्यावर तत्वांची वस्त्रेप्रावरणे चढवली जातात. बाकी दोन्हीकडल्या प्रतिक्रिया सारख्याच असतात. तिथे तर्कशास्त्र वा विवेकबुद्धीला स्थान नसते. त्यामुळेच घटना एकच असते, प्रसंग एकच असतो; पण अशा भूमिकेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया नित्यनेमाने परस्पर विरोधी टोकांना झोकांड्या खाताना आपण पाहू व अनुभवू शकत असतो. 


मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

मोदींच्या लोकप्रियतेचे रहस्य.


   अनेकदा माणसे सहजगत्या काहीतरी बोलतात वा सांगतात. काहीजण अगदी अनवधानाने मनातले बोलतात तर काहीजण विचारपुर्वक काही बोलतात. पण वाचणारा किंवा ऐकणारा ते गंभीरपणे घेतोच असे नाही. कधीकधी असे बोललेले किंवा वाचलेले मनात राहुन जाते आणि सवडीने मनातल्या मनात त्यावर विचार होत रहातो. उहापोह चालत असतो. काही वेळानंतर वा काही काळानंतर अचानक त्याचे संदर्भ स्पष्ट होतात किंवा त्यातून एक नवी दिशा मिळत असते. काहीतरी नवेच गवसत असते. अनेकदा भिन्न लोकांनी सांगितलेल्या मुद्दे वा गोष्टीत परस्पर संबंध आढळून येतात. एकाने उपस्थित केलेल्या गहन प्रश्नाचे उतर दुसर्‍याच्या वक्तव्यात सापडू शकते. म्हणूनच मला अशी माणसे ऐकावीशी किंवा वाचावीशी वाटतात. अगदी सहजगत्या ते आपल्याला शिकवत वा प्रगल्भ बनवित असतात. मजेची गोष्ट म्हणजे त्यांना त्याचा पत्ताही नसतो. फ़ेसबुकवर असा अनेकदा अनुभव येत असतो. घरबसल्या एका जागी जगातल्या शेकडो लोकांचे मनोगत आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असते. आपण त्यातले निवडक घेतो वा बर्‍याच अंशी त्याकडे दुर्लक्षही करतो. सगळेच वाचायला, तपासून विचार करायला वेळही नसतो. पण म्हणून कशालाही टाकावू वा फ़ालतू समजण्याची चुक मी करीत नाही. शक्य तेवढे वाचून व समजून घेण्याचा प्रयास करीत असतो. अर्थात याला दुसरीही बाजू असते. काहीजणांना चर्चा वा विचारविनिमय वगैरे नको असतो. त्यांना उचापती वा खोडसाळपणा करण्यातच धन्यता वाटत असते. त्यामुळे डिवचण्य़ाचाच उद्योग अशी मंडळी करीत असतात. त्यांच्याकडे काणाडोळा करून आपण मोकळ्या मनाने फ़ेसबुक वा आपल्यापर्यंत येणार्‍या माहितीचा वेध घेतला; तर आपला लाभ होऊ शकतो. मला तरी होतो. कारण अनेकदा असेच मित्र नकळत महत्वाचे दुवे किंवा विषय सहजगत्या देऊन जातात. अनुत्तरीत प्रश्नाची सोपी उत्तरे सुचवून जातात. गेल्या दोनतीन दिवसात मला असाच एक अनुभव आला.

माझ्या मित्रयादीत असलेले रविंद्र पोखरकर आणि धोडोपंत आपटे असे दोन भि्न्न प्रकृतीचे मित्र आहेत. त्यांच्या जवळपास लागोपाठ आलेल्या दोन पोस्ट मी वाचलेल्या होत्या. वाचून सोडूनही दिलेल्या होत्या. म्हणजे गंभीरपणे प्रतिक्रियाही दिलेल्या नव्हत्या. दिल्या त्याही थातूरमातूर होत्या. पण दोघांच्या पोस्ट मनात कुठेतरी घुमत राहिल्या असाव्यात. मंगळवारी अचानक भिन्न विषयांवरील त्यांच्या पोस्टमधील संबंध मला उलगडला. इतरांनीही त्यांच्या त्या मूळ पोस्ट वाचायला हरकत नसावी. दोन्हीत सुतराम परस्पर संबंध नाही, हे मगच लक्षात येऊ शकेल. त्या पोस्ट अशा.....

Ravindra Pokharkar

नरेंद्र मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेचं नेमकं मूळ कशात आहे..?
गुजरातमधील नरसंहार..विकास..की आणखी काही..?
मोदी भक्तांनी कृपया शिवीगाळ न करता उत्तर द्यावे ही नम्र विनंती..!
===========================

झिम्बाब्वे संघाचे मन:पूर्वक अभिनंदन...............
२३९ ला झिम्बाब्वेनी पाकड्यांची खोलून मारली, याचा मला खूप आनंद झाला आहे.
पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो. असो.
डेव्ह व्हॉटमोर ने केस वाढवल्याचे पाहिले होते. आज त्यांचा पॉनिटेल घातलेला पाहिला. आता तेच कर म्हणावं. तीच वेळ आलेय तुझ्यावर आयुष्यात.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत
============================
   दोघांचे विषय किती टोकाचे भिन्न आहेत ना? एकाने मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेचे रहस्य कशात असा सवाल केला आहे; तर दुसरा झिंबाब्वेने पाकिस्तानला क्रिकेटमध्ये पराभूत केल्याचा आनंद व्यक्त करतो आहे. दोन्हीत कुठे तरी संबंध जोडता येईल काय? वाचून बाजूला झालो, तेव्हा मलाही तसेच वाटले होते. पण मनात त्यातले जे दुवे रेंगाळत राहिले व क्रमाक्रमाने लक्षात आले, की पोखरकरांच्या प्रश्नाचे उत्तर धोंडोपंतांची आपल्या पोस्टमधून सहजगत्या देऊन टाकले आहे. मोदींची लोकप्रियता आणि झिंबाब्वेने पाकिस्तानला पराभूत करण्याचा काय संबंध येतो ना? पण बारकाईने धोंडोपंतांच्या पोस्टमधील एक वाक्य वाचा. ते म्हणतात, ‘पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो.’ ह्या वाक्याचा संदर्भ मोदींच्या लोकप्रियतेशी जोडला जातो का?

   पोखरकरांना मोदींच्या लोकप्रियतेचे कारण हवे आहे आणि धोंडोपंत पाकच्या पराभवातील आपल्या आनंदाचे कारण सांगत आहेत. त्यांना झिंबाब्वेच्या विजयाचा आनंद झालेला नाही. ते पाकिस्तानच्या पराभवाने आनंदित झालेले आहेत. तो पराभव कोणी केला व कसा केला; याच्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नाही. पाकिस्तानचा पराभव हे धोंडोपंतांच्या आनंदाचे कारण आहे. मोदींच्या लोकप्रियतेची कारणमिमांसा नेमकी तशीच करता येईल. मोदींची आज दिसणारी लोकप्रियता ही झिंबाब्वेच्या विजयासारखी फ़सवी आहे. धोंडोपंतांना झालेला आनंद झिंबाब्वेच्या विजयाचा आहे, असे जर कोणी समजत असेल तर ती त्याची चुक आहे. कारण त्यांनी इथे आपल्या आनंदाचे कारण स्पष्ट केलेले आहे. पण मोदींच्या बाबतीत तसे घडत नाही. मोदींचे लोकांना आकर्षण कशाला आहे, त्याच शोध घेतला जात असतो. पण त्यापेक्षा मोदी कोणाला पराभूत करू बघत आहेत वा करण्याची शक्यता आहे; त्याचा शोध घेतला तर उत्तर सहजगत्या सापडू शकेल. मोदी सतत कॉग्रेसच्या विरुद्ध बोलत असतात आणि तथाकथित सेक्युलर मंडळी मोदींचे टारगेट आहे. सहजिकच सेक्युलर व कॉग्रेस यांना पाकिस्तानच्या जागी ठेवून धोंडोपंताची प्रतिक्रिया विचारात घ्या. मग लक्षात येईल, की मोदींची लोकप्रियता हा निव्वळ आभास आहे. जे कोणी आज मोदींचे समर्थन हिरीरीने करताना दिसतात; त्यांचे मोदीप्रेम हे भाजपा वा कुठल्या राजकीय विचारांशी निगडीत नसून कुठल्या तरी तिरस्कार वा तिटकार्‍यातून त्यांचे मोदीप्रेम उदभवले आहे. अशा मोदीप्रेमींना मोदी विजयी होण्यापेक्षा मोदी ज्यांना पराभूत करायल सज्ज झालेत; त्यांना पराभूत होताना बघायला हे मोदीप्रेमी उत्सुक आहेत. म्हणूनच त्यांच्या मोदीप्रेमाला मी आभास मानतो. कारण अशा बहुतांश मोदीप्रेमींना हिंदूत्व, संघ वा भाजपाशी काडीमात्र कर्तव्य नाही. त्यांना मोदी पंतप्रधान झालेले बघण्यात तसूभर रस नाही. त्यापेक्षा त्यांना कॉग्रेस वा तथाकथित सेक्युलर पाखंडाला पराभूत झालेले बघण्यात स्वारस्य आहे. जसे धोडोपंत म्हणतात, ‘पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो.’

   जसे धोंडोपंतांना झिंबाब्वेविषयी कुठले प्रेम नाही, तसेच मोदीप्रेमींनाही या माणसाविषयी आकर्षण नाही. त्यापेक्षा आपण ज्यांना शत्रू वा निकामी समजतोय, त्यांचे निर्दालन करण्याची आपली इच्छा पुर्ण करणारा एक उमेदवार; इतकेच हे मोदीप्रेम मर्यादित आहे. धोंडोपंतांच्या वाक्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते म्हणतात, ‘कुठेही व कुणाकडूनही पाकिस्तानचा पराभव’ हा भाग महत्वाचा आहे. त्याचा दुसरा अर्थ काय होतो? झिंबाब्वेच्या जागी बांगलादेश वा श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा पराभव झाला असता; तर धोंडोपंत कमी आनंदी झाले असते काय? अजिबात नाही. त्यांनी तितकाच आनंद व्यक्त केला असता. कारण त्यांना कोणाच्या विजयात आनंद नसून; त्यांचा आनंद कुणाच्या तरी पराभवात सामावलेला आहे. नेमकी हीच गोष्ट मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा अभ्यास व विश्लेषण करताना विसरली जाते. मोदी भाजपाचे आहेत किंवा संघाशी संबंधित आहेत, याच्याशी लोकांना कर्तव्यच नाही. मोदी बाजूला ठेवा. त्यांच्या जागी जनता दल युनायटेडचे नितीशकुमार यांनी सेक्युलर थोतांड व कॉग्रेसच्या पराभवाचा चंग बांधून ते भारतीय लोकांना सामोरे आले असते; तरी त्यांची लोकप्रियता अशीच दिसून आली असती. तेच कशाला जयललिता, मुलायम, ममता किंवा कोणी मार्क्सवादी पक्षा़चा नेताही असता, तरी त्याच्या मागे लोक असेच धावले असते. कारण आज भारतीय लोकांमध्ये कॉग्रेस व त्यांनी मागल्या दहा वर्षात चालवलेल्या सेक्युलर पाखंडाबद्दल तिरस्कार उफ़ाळला आहे. त्याचे भांडवल भाजपाचा कुठलाही नेता करू शकला नाही. उलट माध्यमांच्या पोरकट विश्लेषणाला भुलून अडवाणीही सेक्युलर व्हायला गेले. डुप्लिकेट सेक्युलर कोणाला चालेल? मोदींनी त्याच लोकभावनेचा नेमका धुर्तपणे फ़ायदा उठवला आहे.

   मोदींनी सेक्युलर नाटक करण्यापेक्षा पाखंडी सेक्युलर पक्ष व त्यांच्या भंपकपणाला कंटाळलेल्या लोकांना आपणच या पाखंडाचा बंदोबस्त करू शकतो, अशी आशा दाखवलेली आहे. सहाजिकच त्या पाखंडाला कंटाळलेला वर्ग व त्याच्या विरोधातला वर्ग मोदींकडे आकर्षित झालेला आहे. त्याला मोदी वा भाजपाविषयी काडीमात्र आकर्षण नाही. उलट त्याला ज्याचा तिटकारा आलेला आहे, त्याचे निर्दालन करणारा कोणी भेटला, त्याचा आनंद आहे. म्हणून तो नरेंद्र मोदींचा उदो उदो करू लागला आहे. म्हणूनच मी त्याला लोकप्रियतेचा आभास म्हणतो. त्याचे प्रत्यंतर मग आपल्याला विविध मतचाचण्यांमध्ये पडलेले दिसते. भाजपापेक्षा मोदी यांची लोकप्रियता प्रत्येक चाचणीत अधिक दिसून येते. याचा अर्थच असा, की त्या मतदाराला (धोंडोपंतांप्रमाणेच) भाजपाच्या राजकीय विचार वा पक्षाशी कर्तव्य नाही. त्याला कॉग्रेस व सेक्युलर नाटकाविषयी तिटकारा आहे. आणि त्यासाठी त्याला कॉग्रेसला पराभूत करणारा कोणीही नेता चालणार आहे. ती भूमिका मोदींनी मोठ्या धुर्तपणे आपल्या अंगावर घेतली आहे. तिसर्‍या आघाडीचा झेंडा मिरवणार्‍या कोणा नेत्याने बाकीच्या छोट्यामोठ्य़ा पक्षांना एकत्र करून तसा पवित्रा घेऊन आक्रमकपणे त्याच सेक्युलर थोतांडाच्या विरोधात उभे रहायची हिंमत दाखवली; तर तीच लोकप्रियता मोदींना सोडून त्याच्याकडे वळायला वेळ लागणार नाही. कारण स्पष्ट आहे. अशा देशभरच्या ‘धोंडोपंतां’ना मोदींच्या विजयाची आकांक्षा नसून सेक्युलर थोतांडासह कॉग्रेसला पराभूत होताना बघायचे आहे.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

काल रात्री मला मिळालेला दृष्टांत   पुढले काही दिवस तुम्ही मुंबईच्या गिरणगावात गेलात, तर सगळीकडे गणेशभक्तांची गर्दी लोटलेली दिसेल. त्या गर्दीत अर्ध्याहून अधिक लोक नवस करायला किंवा नवस फ़ेडायला आलेले असतील. कारण इथला ‘लालबागचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा बाजारातला गणपती, अलिकडे भलतीच गर्दी खेचतोय. गेल्या वर्षी एकाच दिवसात तिथे अठरा लाख भक्तांनी दर्शन घेण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याचे आताच एका वाहिनीवर ऐकले. गणपती बाप्पाच नव्हेतर कुठलाही चमत्कार कसा सुरू होतो, त्याचा साक्षात्कार हल्ली या उपग्रह वाहिन्या घडवित असतात. कारण आज सकाळपासून लालबागच्या विविध सार्वजनिक गणपतीचे अनेक चमत्कार व साक्षात्कार मी प्रथमच ऐकत होतो. आज वयाची पासष्टी ओलांडलेल्या माझे पुर्वायुष्य़ याच लालबागमध्ये गेले. निदान तीन दशकांचा कालखंड मी तिथे घालवला आहे. पण इतक्या चमत्कार घडवणार्‍या भूमीत इतकी वर्षे नुसतीच गमावल्याचा मला स्वत:लाच थांगपत्ता नव्हता. मग माझ्या आयुष्य़ातल्या या चमत्काराचे दर्शन मला कोणी घडवले? उपग्रह वाहिन्यांनी नव्हेतर आणखी कोणी? कारण अशा वाहिन्यांच्या जमाना सुरू होईपर्यंत आणि देशातल्य घराघरात त्यांचे जाळे विस्तारण्यापुर्वी कधी, लालबागचे हे गणपती नवसाचे असतात, हे तिथे पंचवीस वर्षे जगूनही मलाच ठाऊक नव्हते. आणि असे म्हणायला मी कोणी बुद्धीवादी, विवेकवादी वा नास्तिक अजिबात नाही. कारण वयाच्या विशीत असताना एक वर्ष मी सुद्धा त्याच लालबागमधल्या सर्वात जुन्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सवाचा सुवर्ण महोत्सवी वर्षातला एक सहचिटणिस म्हणून काम केलेले आहे. म्हणूनच गणपतीची वा भक्तीभावाची हेटाळणी अंधश्रद्धा म्हणून करण्यासाठी, असे काही मी लिहीलेले नाही. इथले नवस व कौतुके मला इतकी जगप्रसिद्ध असल्याचे वाहिन्यांवरच्या बातम्या ऐकल्या नसत्या तर कधीच कळले नसते. असो.

   ते सुवर्ण महोत्सवी वर्ष होते १९६९ आणि तेव्हा मी माहिमच्या रुपारेल महाविद्यालयात विद्यार्थी होतो. तिथेच आजचे राज्यसभा सदस्य असलेले हुसेन दलवाई बीएच्या वर्गातले विद्यार्थी होते. त्या उत्सव काळात मी कॉलेजमधून गायब होतो. सहाजिकच उत्सवाचा उद्योग संपल्यावर हजर झालो; तेव्हा अनेक मित्रांप्रमाणे हुसेननेही मी कुठे होतो अशी विचारणा केली होती. मग मी गणेश उत्सवात एक कार्यकर्ता वा पदाधिकारी म्हणून गढलेला असल्याचे ऐकून हुसेनने माझी खिल्ली उडवली होती. अर्थात तेव्हा मला समाजवाद वा सेक्युलर पुरोगामी असण्यातला बुद्धीवाद वगैरे फ़ारसा उमगलेला नव्हता. ‘अरे गणपती कसले बसवता? देशात गरीब, दलित, कष्टकर्‍यांची दुर्दशा बघा. पोस्टर लावायला, मोर्चात घोषणा द्यायला यायचे सोडून उत्सव साजरे करतोस?’ हुसेनच्या त्या पांडीत्याने माझ्या मनात कमालीची अपराध भावना निर्माण करून ठेवली होती. शिवाय तेव्हा मुस्लिम सत्यशोधक विचारवंत हमीद दलवाईचा भाऊ अशीच हुसेनची ओळख होती. सहाजिकच तो काही महान विचार सांगतोय, हे गृहीत होते. म्हणून गप्पच रहाणे शहाणपणाचे होते. असा तो काळ होता. पण त्यामुळे अर्थातच मला गणेश उत्सवात जाऊन आपण काही पाप केल्यासारखे अजिबात वाटले नाही. तसेच त्यात सहभागी झाल्याने माझी अंधश्रद्धा वाढली असेही काही होऊ शकले नाही. कारण श्रद्धा वगैरे व्यक्तीगत बाबी असतात अशीच माझी समजूत होती आणि घरी देवधर्म पाळला जात असला तरी माझ्यावर कोणी कधी त्याची कुठलीच सक्ती केलेली नव्हती. माझ्या श्रद्धा व धर्म वगैरे व्यक्तिगत सोयीनुसार चालत असत व आजही तशाच चालतात. त्या वर्षीच्या उत्सवात दमछाक झाली आणि नंतर मी त्यातून आळशीपणाने बाजूला झालो.

   तेव्हा कुठल्याही गणपतीची मदार स्थानिक रहिवाश्यांच्या वर्गणी व दुकानदार, व्यापार्‍यांच्या देणगीवर अवलंबून असायची. चार फ़लक वा जाहिराती मिळवताना कार्यकर्त्यांची तारांबळ उडत असे. आमच्या सुवर्ण महोत्सवात माझ्यासोबत असलेला पारकर नावाचा एक सहचिटणीस विक्रीकर विभागात नोकरी करीत होता. त्याच्या ‘अधिकारामुळे’ त्याने स्मरणिकेत काही हजारांच्या जाहिराती एकहाती आणल्याचे आम्हा सर्वांना केवढे कौतूक होते. कारण सव्वा रुपया घरगुती वर्गणी होती. एकूण जमा खर्च पन्नास हजारापर्यंत गेला, तरी आभाळ ठेंगणे वाटण्याचा तो काळ होता. शिवाय त्या सव्वा रुपयासाठीही दोन तीनदा लोकांची दारे वाजवावी लागत. आणि पन्नाशी गाठणारा चिंचपोकळी हा लालबागचा पहिलाच गणपती होता. उंच व भव्य गणपतीची पारंपरा त्यानेच सुरू केली, त्याचाही एक वेगळा इतिहास आहे. तेव्हा बघायला जमणार्‍या गर्दीसाठी कौतुकाचे दोनच गणपती असायचे, एक चिंचपोकळीचा आणि दुसरा तिथेच जवळ असलेला रंगारी बदक चाळीचा गणपती. हे दोन्ही भव्य चित्रप्रसंगाचे गणपती सारंग नावाचे दोन बंधूच बनवित असत. श्याम सारंग आणि राम सारंग. त्यांच्या कलेला दाद द्यायला गर्दी लोटत असे. पण अशा गर्दी लोटणार्‍या उत्सवात जाहिरात करून माल खपवण्याचा जमाना तेव्हा आलेला नव्हता. सहाजिकच मंडपाचा खर्च आणि व्यवस्थेसह अन्य खर्च जमा करताना कार्यकर्त्यांच्या नाकी दम यायचा. उत्सवाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारी भव्य कमान उभारायची, तर तिचा खर्च उचलणारा जाहिरातदार मिळवायला दाताच्या कण्या कराव्या लागत. अशाच जाहिरातीसाठी तेव्हा स्थानिक नगरसेवक भाई शिंगरे आम्हाला घेऊन इंडीयन ऑईलचे सहव्यवस्थापक असलेल्या अभिनेता आत्माराम भेंडे यांच्याकडे घेऊन गेले होते. ड्युक वा गोल्डस्पॉट अशा खाद्यपेयांच्या कंपन्या हा आणखी एक पटणारा जाहिरातदार असायचा. अन्यथा जाहिरातीचे फ़लक हा मंडळासाठी तोट्याच्याच व्यवहार असायचा.

   अशा या गिरणगाव लालबागच्या गणपतीचे नवस तरी किती मोठे असायचे? पाच पंचवीस नारळाचे तोरण बांधायचे नवस कोणीतरी केलेले असायचे आणि त्याचा मंडळात कोणाला पत्ता नसायचा. जेव्हा असा कोणी भक्त नवस फ़ेडायला यायचा, तेव्हा तसा नवस झाल्याचा पत्ता लागायचा. बाकी नवसाला पावणारा असे कुठल्याच गणपतीचे लालबागमध्ये कौतुक नव्हते. पण अप्रतिम देखावे, सजावट व भव्य मुर्ती; असेच लालबागच्या गणपतीचे वैशिष्ट्य होते. चिंचपोकळी व रंगारी बदक चाळ हे गणपती बघितल्यावर गणेशगल्ली, मार्केटचा (लालबागचा राजा) गणपती. जयहिंद सिनेमाच्या वाडीतला, अभ्युदय नगरचा आणि कॉटनग्रीनचा गणपती बघून लोकांचा दर्शन सोहळा संपत असे. त्याखेरीज काही बिनपूजेचे हलणारे गणपतीही असायचे. आसपासच्या कंपाऊंडमधले शेडगे, फ़ाटक व कांबळी यांचे चित्रमय प्रदर्शनाचे गणपती असायचे. म्हणजे त्या देखाव्यात हलणार्‍या मुर्ती चित्रे असायची. पौरणिक ऐतिहासिक घटनांवर आधारीत हालचाली करणार्‍या मुर्ती; असे त्या प्रदर्शनाचे स्वरूप असे. त्यासाठी तिकीट काढावे लागत असे. थोडक्यात संपुर्ण दिवस खर्ची घालूनच लालबागचे गणपती बघायला जत्रेसारखी गर्दी उसळत असे. ती आजच्यापेक्षा कमी नक्कीच होती. कारण तेव्हा गणपतीसाठी गावी गेलेले वा घरोघर अडकून पडलेले गणेशभक्त प्रामुख्याने गौरीगणेश विसर्जन झाल्यावरच लालबागकडे वळत असायचे. त्यामुळे मग पहिले निदान चारपाच दिवस लालबागला गर्दी नसायची. अखेरच्या पाचसहा दिवसात मात्र दिवसरात्र असा फ़रक होत नसे. आता पहिल्या दिवशी सकाळ उजाडल्यापासूनच जत्रा सुरू होते. त्याचे प्रमुख कारण आता अमराठी लोकही लालबागच्या जत्रेला लोटू लागले आहेत. ही सगळी किमया उपग्रह वाहिन्यांची आहे. गेल्या पंधराविस वर्षात उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला आणि त्यातून लालबागच्या गणपतीची किर्ती व ख्याती जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचली. इतकी की आता चार दशकांपुर्वीचे अनेक सेक्युलर पुरोगामी सुद्धा गणेशभक्त होऊन गेलेत. मी उत्सवाचा सहचिटणिस असताना कॉलेजमध्ये माझी खिल्ली उडवणार्‍या हुसेन दलवाईचा उल्लेख आलेला आहे ना? तोही आता मोठा गणेशभक्त होऊन गेला आहे. कारण गेली काही वर्षे हुसेन अगत्याने बांद्रा परिसरात गणेशभक्तांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणारे फ़लक झळकवत असतो.

   पुण्यात एका गाफ़ील क्षणी ओंकारेश्वराच्या पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घालून त्यांची हत्या झाली, त्या घटनेला आज नेमके वीस दिवस पुर्ण होऊन गेलेत. त्यानंतर दोनतीन दिवस घसा कोरडा होईपर्यंत विवेकवाद व अंधश्रद्धांवरील आपल्या निष्ठांचे प्रदर्शन मांडणार्‍या बहुतेक वाहिन्या आज दाभोळकर विसरून नवसाला पावणार्‍या विविध गणपतींचे हवाले लाखो करोडो भारतीयांना देत आहेत. त्यापैकी कोणाला दाभोळकर आज आठवलेले सुद्धा नाहीत. तेव्हा दाभोळकर हत्येमुळे शरमेने खाली गेलेल्या माना, आज नवसाचे गणपती दाखवताना अभिमानाने ताठ झालेल्या आहेत. याला विवेकवादाचा चमत्कार म्हणावे की त्या नवसाला पावणार्‍या लालबागच्या राजाची किमया म्हणावे, तेच मला उमगलेले नाही. हुसेनभाईला विवेकवादाला तिलांजली देऊन गणेशभक्त व्हायला तीन दशकांचा कालावधी लागला, वाहिन्यांवरील नास्तिक बुद्धीवादी पत्रकारांना गणेश ‘पावायला’ तीन आठवड्याचा कालावधी पुरला. त्यांना दाभोळकरांच्या हत्येमुळे शरम वाटली, तो चमत्कार होता की आज लालबागचा राजा नवसाला पावतो; असे जाणवले हा साक्षात्कार आहे? तुमच्यामाझ्यासारखा सामान्यबुद्धीचा माणूस हे कोडे कधी उलगडू शकणार आहे काय?

   कधीकधी मला वाटते की बुद्धीची देवता मानल्या जाणार्‍या त्या गणरायाचे वाहन असलेले उंदिरच आजकाल बुद्धीची देवता म्हणून तोतयेगिरी करतात की काय? आपल्या कानीकपाळी रोजच ओरडून मारला जाणारा हा सगळा बुद्धीवाद त्या उंदरांप्रमाणे असा या बिळातून त्या बिळात किंवा इथल्या अडगळीतून तिथल्या ढिगात दडी मारायला का पळत असतो? ‘तुमचा नरेंद्र निवडा’ असे तुम्हाआम्हाला आवाहन करणार्‍या एबीपी वाहिनीला लालबागचा राजा ‘प्रसन्न’ होऊन त्याने दोन्ही नरेंद्रांकडे पाठ फ़िरवत तीन आठवड्यात गजेंद्रच निवडला. तेव्हा मला त्या बुद्धीदात्या गणरायाचीही खुप दया आली. त्यानेही माझ्या सहानुभूतीचा मन:पुर्वक स्विकार करताना मंडपात जाऊन स्थानापन्न होण्यापुर्वी मनमोहन सिंगांप्रमाणेच माझी समजूत काढली. दृष्टांत देत मला काल रात्री म्हणाला, ‘सोकावलेल्या उंदरांच्या राज्यात सगळी बुद्धीच कुरतडली जातेय रे. जमल्यास बुद्धी सुरक्षा विधेयक संसदेत संमत करून घेणारा कुणी पक्ष असेल, तर त्याला बहूमत देऊन बघ. माझा अगदी मनमोहन झालाय.’