सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

आकड्याचे बहूमत खर्‍या लोकमताला घाबरले?




   गेली सहासात वर्षे आपल्याला जनतेने बहूमत दिले आहे, अशी शेखी मिरवणारे आता कोणाला घाबरले आहेत? प्रत्येकवेळी संसदेतील बहूमत म्हणजे लोकसभेतील २७३ खासदारांचा आकडा म्हणजेच लोकांचा विश्वास; अशी भाषा वापरणार्‍यांची आज पाचावर धारण का बसली आहे? त्यांच्या हातात सत्ता आहे. लष्कर आहे, पोलिस आहेत, हत्यारे सुद्धा आहेत. मग असे सत्ताधारी कोणाला घाबरले आहेत? आपण विरोधी पक्ष म्हणून संसदेत किंवा व्यासपिठावरून बोलणार्‍यांना नामोहरम केले म्हणजे वाटेल ती मनमानी करायला मोकाट आहोत; अशा समजुतीने वागणार्‍यांना आता खरी जनता सामोरी आल्यावर का घाम फ़ुटला आहे? ही परिस्थिती कशामुळे आली? दिल्ली वा अन्य महानगरांमध्ये एका बलात्कारानंतर लोकांचे जमाव फ़िरू लागल्यावर; सरकार भयभीत का झाले आहे? त्यातून मार्ग काढणे सरकारला का शक्य झालेले नाही? ज्या जनतेचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून सहासात वषे अहोरात्र बोभाटा करणार्‍यांना, या मुठभर जनतेचा विश्वास उडाल्यावर भिती का वाटावी? तर आजवरचा खोटेपणा चव्हाट्यावर येतोय, त्याच्या भितीने सरकारला घाम फ़ुटला आहे. कारण या सरकार व सत्ताधार्‍यांपाशी कधीच बहूमत नव्हते. त्यांच्यापाशी लोकसभेतील आकड्यांची बेरीज होती. त्यांनी बहूमताची विटंबना करून आकड्यांच्या लोकशाहीचा जो धुमाकुळ गेल्या काही वर्षात घातला; त्याचीच भुते आजच्या सत्ताधार्‍यांना भेडसावत आहेत. त्याला निमित्त एका बलात्काराचे झाले आहे. शंभराव्या घावाने वृक्ष कोसळतो किंवा एका साध्या गवतकाडीनेही उंट खाली बसतो म्हणतात; तशी या सरकारची अवस्था झालेली आहे. त्या बलात्कारामुळे लोक इतके खवळलेले नाहीत. त्याची शेकडो कारणे आहेत. तो सगळा राग या निमित्ताने उघड्यावर आलेला आहे.

   एखादा वृक्ष तोडताना त्याच्यावर पडणार्‍या प्रत्येक घावातून त्याचा बुंधा दुबळा कमकुवत होत असतो. शेवटचा घाव निर्णायक ठरतो. तसाच लोकांच्या संयम व सहनशीलतेचा बांध फ़ोडायला हा बलात्कार एक निमित्त झाले आहे. उंटाच्या पाठीवर आधीच प्रचंड बोजा असेल, तर त्याला उभे राहून चालणे अशक्य झालेले असते, अशावेळी त्याच्या पाठीवर एक काडी ठेवल्याने वजनात मोठा फ़रक पडत नाही. पण त्या उंटासाठी तेवढा भारही अशक्य असतो म्हणून तो खाली बसतो. या सरकारच्या पापाचा घडा तसाच गेल्या दोनतीन वर्षापासून अखंड भरतो आहे. पण आपल्याला विचारणारा कोणीच नाही, अशा मस्तीत त्यांनी डावपेच खेळले होते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माध्यमे व प्रचार साधने हाताशी घेऊन; त्यांनी देशातील प्रमुख अशा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला बदनाम किंवा दुर्बळ करून सोडले. त्या पक्षाचे नेतृत्वही साठमारीत गुंतल्याने त्यांना आपल्या घटनात्मक जबाबदारीचे भान राहिले नाही, तेही सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडले. विरोधी पक्ष नामोहरम झाल्यावर कॉग्रेसने पद्धतशीररित्या आपल्याच मित्र पक्षांचा काटा काढायचे डावपेच खेळले. त्यामुळे कुठलेच जनतेचे पाठबळ पाठीशी नसताना व संसदेत बहूमत नसताना; कॉग्रेस मस्तवाल पद्धतीने वागत राहिली. मग जेव्हा कसोटीचा वेळ आला, की मग पुन्हा मुर्ख लहान पक्षांना सेक्युलर शपथा घालून आपल्या मनमानीसाठी पाठींबा मिळवत आली. मग कधी डाव्या आघाडीने असेल तर कधी मायावती मुलायमनी असेल; आपल्या लाचारीसाठी कॉग्रेसची पाठराखण केली. ती त्यांची बौद्धिक कसरत माध्यमातील मुर्खांचे समाधन करणारी असली; तरी त्याचे व्यवहारी परिणाम भोगणार्‍या जनतेला विचारधारेशी कर्तव्य नसते. म्हणून जनतेमध्ये कमालीची चलबिचल होती. त्या प्रक्षोभाला आवाज देण्याचे खरे काम विरोधी पक्ष म्हणून भाजपाने पार पाडायला हवे होते.. पण त्या पक्षाचे आजचे नेतृत्व आशा्ळभूतपणे सत्तेच्या खुर्चीकडे डोळे लावून बसल्याने त्यांना लोकांच्या नाराजीतून मोठे आंदोलन इभे करता आले नाही. म्हणून जनतेची नाराजी संपत नसते. पाण्याच्या वहात्या प्रवाहाप्रमाणे जनतेची नाराजी आपला मार्ग शोधत असते. आपले नेतृत्व शोधून काढत असते. त्यांनी अण्णा हजारे वा स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर येऊन दाखवले.

   अण्णांना तो आपला करिष्मा वाटला असला तरी वस्तुस्थिती तशी नव्हती. जो कोणी जनतेच्या असंतोषाला वाट करुन देणार होता, त्याच्यासाठी रस्त्यावर यायला लोक सज्जच होते. मग त्यात भाजपाने पुढाकार घेतला असता; तर तेवढाच प्रतिसाद त्यालाही मिळाला असता. पण वाजपेयी बाजूला झाल्यावर आणि रस्त्यावरच आयुष्य घालवलेल्या अडवाणींना खुर्चीचे डोहाळे लागल्यापासून; भाजपामध्ये जन आंदोलनाचे नेतृत्व करणारा कोणी शिल्लकच उरलेला नाही. त्यांना विधानसभा किंवा लोकसभा आणि वाहिन्यांसह माध्यमात पोपटपंची करणे; म्हणजेच जनतेचे नेतृत्व असे वाटू लागले आहे. सहाजिकच विरोधी पक्ष असूनही भाजपाला जनतेच्या असंतोषाचा सुगावाही लागला नाही. वाहिन्यांच्या कॅमेरासमोर चित्रण होत असताना आवेशात बोलणे वा पत्रकार परिषदा घेण्यात ते गुंतून पडले. आंदोलन रस्त्यावर होते, आणि त्यालाच सत्ता शरण येते, हे भाजपा विसरून गेला होता. तिथेच त्याची व पर्यायाने लोकशाहीतील लोकांच्या आवाजाची कोंडी झाली होती. कारण माध्यमात कॉग्रेसने भाजपाला गप्प करणारे आपले हस्तक बसवले आणि संसदेत बहूमताच्या आकड्यावर विरोधी स्वरच दाबून टाकला. मग मनमानीला खुले रान मिळाले; अशी सत्ताधार्‍यांनी समजूत करून घेतली. पण प्रत्यक्षात त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घेतला होता. कारण जनतेच्या प्रक्षोभाचा आवाज विरोधी पक्ष असतात, तेव्हा त्यांच्याशी सत्तेला वाटाघाटी करता येत असतान. विरोधी नेत्यांच्या मागे आंदोलन असले; मग विरोधकांशी बोलणी करतो म्हणुन जमावाला घरी शांतपणे पाठ्वण्याचा मार्ग खुला असतो. पण इथे विरोधकांना नामोहरम करताना लोकप्रक्षोभाशी बोलणी करण्याचा मार्गच सत्ताधार्‍यांनी संपवून टाकला होता. आणि जनतेनेही भाजपावर विसंबून आंदोलन करायचा विचार सोडला होता. म्हणून जनतेचे प्रश्न संपले नव्हते, की त्यांचा राग आटोपला, शमला नव्हता. त्या जनतेने मग दुसरा मार्ग शोधून काढला. त्यांनी पर्यायी विरोधी पक्ष शोधला; जो संसदेतला विरोधी पक्ष नव्हता किंवा निवडणुका लढवणारा पक्ष वा नेता नव्हता. लोकपालच्या निमित्ताने उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना पाठींबा द्यायला जमा झालेल्या लाखो लोकांना लोकपाल वगैरे काहीही कळत नव्हते. पण अण्णा व त्यांचे सहकारी सत्ताधार्‍यांची मस्ती, मनमानी व भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत हे नक्की कळत होते. आपल्या वेदनांचा आवाज उठतो म्हणून लोक अण्णांच्या मागे गेले होते.

   अण्णांप्रमाणेच दुसरीकडे योगासने शिकवण्यातून देशाच्या कानाकोपर्‍यात लोकप्रिय झालेले स्वामी रामदेव तसा दुसरा चेहरा होता. त्यांनीही स्वदेशी व काळापैसा असे दोन विषय त्याच दरम्यान हातात घेतले. अण्णा सोडून उरलेले लोक रामदेव यांच्यामागे गेले. थोडक्यात जे काम विरोधी पक्षाचे लोकशाहीत असते, ती जबाबदारी विरोधी पक्ष पार पाडू शकले नाहीत, ती पार पाडण्यासाठी लोकांनी दोन नवे नेते उदयास आणले. त्याचे श्रेय खरे तर सत्ताधारी कॉग्रेस पक्षाला द्यावे लागेल. त्यांनी माध्यमे हाताशी धरून भाजपा या विरोधी पक्षाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचे पाप केले नसते आणि संसदेत विरोधकांचा सुर गळचेपी करून बंद पाडला नसता, तर लोकांना आपल्या वेदनांचा हुंकार निघतो आहे, असे समाधान तरी मिळत राहिले असते. त्यांना विरोधी पक्षांवर नवा पर्याय म्हणुन अण्णा किंवा रामदेव यांची कास धरावी लागली नसती. आणि त्यात सत्ताधार्‍यांचा कोणता फ़ायदा झाला असता? तर विरोधातला आवाज व क्षोभ नियंत्रित करणारा कोणी तरी त्यांच्या मदतीला उपलब्ध झाला असता. ज्याच्याशी बोलणी करतो, असे सांगून रस्त्यावर येणार्‍या जमावाला घरोघरी पांगवणे सोपे झाले असते. लोकशाहीत त्यासाठीच विरोधी पक्षाची तरतूद ठेवली आहे. ती सोय कॉग्रेसने सत्ता मिळताच प्रथम उध्वस्त करून टाकली आणि भाजपाही त्याला बळी पडला. पण सरकार व सत्तेशी बोलणी करू शकेल; असे नवे नेतृत्व जनतेने सरकारला उपलब्ध करून दिले. अण्णा व रामदेव हे जमावाचे नवे नेते किंवा संसदेत नसलेले नवे विरोधी नेते होते. सरकारने जनमान्यता असलेल्या त्याही नेतृत्वाला मान्यता द्यायचे नाकारले. आणि आज जमाव नेतृत्वहीन होऊन रस्त्यावर आला; तेव्हा त्याच सत्ताधर्‍यांची तारांबळ उडाली आहे. नेते वा विरोधी पक्षांना खच्ची करून बहूमताची व आकड्यांची कसरत म्हणजे लोकशाही; अशा समजुतीमध्ये मोकाट सुटलेल्यांना खरी लोकशाही दाखवायला जनता आता जमाव होऊन रस्त्यावर उतरली आहे. आणि त्या जनतेला घरोघरी परत कसे पाठ्वायचे; त्याचा विचार करून सरकारला धडकी भरली आहे.    ( क्रमश:)
भाग   ( ४३ )      १/१/१३

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

बलात्कार शासनकर्त्याच्या पुरूषार्थावर होत असतो



   लहानपणी केव्हातरी आजीकडून ऐकलेल्या गोष्टी आजही आठवतात. त्या बालपणी त्या गोष्टी खुप मजेशीर वाटायच्या. त्या पौराणीक गोष्टीतले राक्षस, देव त्यांचे चमत्कार, त्यांच्या लढाया, त्यांचे खाणेपिणे. सगळेच काही अजब असायचे. जे आसपास कुठे घडताना कधी दिसत नसे. पण आजी अशा काही रंगवून सांगायची त्या गोष्टी, की ऐकायला खुप मजा यायची. जसजशी अक्कल येत गेली तसतसा त्यातला फ़ोलपणा कळत गेला. पुढे पुस्तके वगैरे वाचायला शिकलो, वर्तमानपत्रे व त्यातले शहाण्यांचे लेख वाचले, तेव्हा कळले, की आजी सांगायची तो सगळा भाकड म्हणजे निरर्थक प्रकार होता. कुठल्याही मानवी तर्कशास्त्रात बसणारा किंवा वैज्ञानिक कसोटीला उतरणारा नव्हता. त्यामुळे तो मुर्खपणाही वाटायला लागला. त्यातच एक गोष्ट होती रामायणातल्या खलनायक रावणाच्या एका झोपाळू भावाची. तो म्हणे अगडबंब देहाचा राक्षस होता. एकटाच मोठ्या सैन्याशी लढायचा. प्रचंड गाडाभर अन्न खायचा. आणि झोपला तर कित्येक दिवस उठायचाच नाही. त्याला झोपेतून उठवायचे तर ढोलताशे वाजवून त्याची झोपमोड करायला लागायची. अशी गाढ झोप एकवेळ आपण बघितलेली असू शकते. पण आजीच्या गोष्टीतल्या त्या कुंभकर्णाची झोप भारी गाढ होती. ढोलताशे वाजवणारे म्हणे त्याच्या अंगावरून नाचायचे कवायत करायचे. तेव्हा कुठे त्याचे डोळे किलकिले व्हायचे आणि हळूहळू त्याला जाग यायची. आधी इतका अगडबंब राक्षस अजून कुठे सापडलेला वा कोणी बघितलेला नाही. किंवा त्याच्या इतक्या प्रदिर्घ गाढ झोपेचा पुरावा समोर आला नव्हता. त्यामुळे माझ्या वाढलेल्या अकलेपायी मी आजीची गोष्ट कधीच निकालात काढून वैज्ञानिक अहंकाराच्या निद्रेत गाढ झोपून गेलो होतो. किती वर्षे कोण जाणे. पण गेल्या काही महिन्यात माझ्या लक्षात आले, की मलाच कोणी तरी झोपेतून उठवण्यासाठी भयंकर गोंगाट करते आहे. डोळे थोडे किलकिले केल्यावर लक्षात आले, की देशातले लोक रस्त्यावर उतरून कोणाला तरी जागवायचा प्रयास करत असल्याचा धुमाकुळ चालू आहे. तेव्हा डोळे आणखी थोडे उघडून बघितले; तर एक भलाथोरला राक्षस अस्ताव्यस्त भारत नावाच्या खंडप्राय देशात घोरत पडला आहे. लोक त्याला सरकार म्हणून हाका मारून, गदारोळ करून जागवायचा प्रयत्न करीत आहेत. कर्कश आवाजात ओरडत आहेत, घोषणा देत आहेत, आरोळ्या ठोकत आहेत, त्याच्या अंगावर थयथया नाचत आहेत.

   मी माझी बौद्धिक झोप झटकून समोर बघितले तर खरेच तो अस्ताव्यस्त पडलेला राक्षस आळोखेपिळोखे देत होता. पण उठून काही बसत नव्हता. इतक्यात एक अनामिक मुलगी तिथे अवतरली आणि तिने त्याच्या नाकाडावर अशी लाथ मारली, की तो उठून बसला आणि डोळे चोळत समोर कसला गोंगाट चालू आहे त्याकडे बघू लागला. मात्र एव्हाना लोक चिडले होते आणि त्याला धोंडे मारू लागले होते. कारण त्याला जागवण्याच्या नादात लाथ मारणार्‍या त्या मुलीचा बळी गेला होता. आजीच्या गोष्टीतला तो राक्षस मानवी देहासारखा असेल अशी माझी बौद्धिक समजूत होती. पण राक्षस तसे नसतात. ते अनेक माणसांनी बनलेले, अनेक यंत्रणांनी प्रचंड काम करणारे असू शकतात. आणि बंद पडले मग त्यांना पुन्हा कार्यरत करतांना माणसांचीच तारांबळ उडत असते, असा आजीच्या गोष्टीचा मतितार्थ असणार हे माझ्या लक्षात आले. पण त्यासाठी त्या बिचार्‍या मुलीचा बळी गेला होता. कुंभकर्णाची झोप ही भाकडकथा नाही, तर ती सत्यकथा आहे याचे मला भान आले. दोन आठवड्यापुर्वी त्या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार झाला, नव्हे होऊ देण्यात आला; त्याला हीच कुंभकर्णाची झोप कारणीभूत आहे. सरकार नावाची राक्षसी यंत्रणा झोपा काढत बसली नसती; तर ही वेळ त्या मुलीवर आली नसती. देशात आज कुठल्याही माणसाला न्याय मिंळत नाही, अशी जी धारणा झाली आहे, त्याला ही सरकारी कुंभकर्णाची झोप कारणीभूत आहे. बलात्कार झाला आणि पहिलाच झाला असेही नाही. पण इतके बलात्कार नित्यनेमाने होत असतानाही सरकारी यंत्रणा जरासुद्धा हलत नसेल तर कुंभकर्ण खोटा कसा मानायचा? बरे तक्रारी होतात, गुन्हे नोंदवले जातात, तपास चौकश्या होतात, खटले चालवले जातात आणि तरीसुद्धा बेछूटपणे बलात्कारांचा सिलसिला चालूच रहातो, तेव्हा सरकार गाढ झोपले आहे याचाच पुरावा मिळत असतो ना?

   इतके होऊनही सरकार शांत आहे. उलट आमची झोप कशाला मोडली; म्हणून सामान्य निदर्शकांच्या अंगावर पोलिस घातले जातात, त्याला कुंभकर्ण नाही तर काय म्हणायचे? बलात्काराला एक आठवडा लोटल्यावर गृहमंत्री आपण तीन मुलींचे बाप आहोत अशी ग्र्वाही देतात, पंतप्रधानही तेच सांगतात. त्यामुळे कोणी बलात्कार करायचा थांबत असतो का? मंत्री वा सत्ताधार्‍यांनाही मुली आहेत, म्हणून बलात्कार थांबल्याचे जगात कुठे उदाहरण आहे काय? पण त्यांच्या मुलीवर असा अन्याय, अत्याचार झाल्यास कायदे नियम धाब्यावर बसवून तिची सुटका केली जाते; याची उदाहरणे नक्कीच आहेत. याच देशातल्या मुफ़्ती महंमद सईद नावाच्या गृहमंत्र्यालाही दोन मुली आहेत आणि त्यापैकीच रुबाया नावाच्या मुलीचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. तिच्या सुटकेसाठी चार खतरनाक जिहादींची मुक्तता करण्याची अट घातली होती. तेव्हा अवघ्या तीन दिवसात त्या जिहादींना मुक्त करून रुबाया सईद यांची सुटका करून घेण्यात आली होती. तेव्हा मंत्र्यांना मुली असून चालत नाही, त्यांच्यावर दुर्घर प्रसंग यावा लागतो, हे आपण विसरून गेलो आहोत. गृहमंत्र्यांनी आपल्यालाही तीन मुली आहेत असे सांगताना; फ़क्त अशा मंत्री व सत्ताधार्‍यांच्याच मुली या देशात सुरक्षित असू शकतात, असेच सांगितले होते. शिवाय बाकीच्या मुली असतील त्यांच्या सुरक्षेची आपली जबाबदारी आपली नाही; असेच सांगितले नाही काय? आज ती मुलगी, जिच्यावर धावत्या बसमध्ये बलात्कार झालाम ती मृत्यूशी झुंज देताना इहलोकीची यात्रा संपवून मोकळी झाली आहे. तेव्हा तिने कोणता संदेश दिलाय भारतीयांना? प्रत्येकजण मंत्री होऊ शकत नाही, म्हणूनच ज्यांना मुली आहेत ते मंत्री होणार नसतील तर त्यांच्या मुलीची सुरक्षा संपली आहे; हाच तो संदेश नाही काय? कोणाचा सिंगापुरमध्ये मृत्यू झाला? बलात्कारित मुलीचा, की भारत नावाच्या खंडप्राय देशातील कायदा व्यवस्थेचा मुत्यू झाला? कोण मेले आणि कोणावर बलात्कार झालाय? कोणाला तरी या वास्तवाचे भान आहे का? बलात्कार होतो म्हणजे काय?

   बलात्कार कुठल्या महिलेवर होत नाही. ती ज्या समाजामध्ये वास्तव्य करत असते, ज्या देशाची नागरिक असते, तिथल्या शासन यंत्रणेवर असा बलात्कार होत असतो. कारण त्या नागरिक स्त्रीच्या देहाच्या सुरक्षेची जबाबदारी तिथल्या शासन यंत्रणेने उचललेली असते. म्हणुनच ज्या देशात इतक्या संख्येने व सहजतेने बलात्कार होतात; ते त्या देशाच्या सरकारचेच धिंडवडे असतात. त्यात महिलेवर होतो, तो केवळ शारिरीक अत्याचार असतो. ती अबला असते. पण ज्याने तिला बळ द्यायचे ते सरकार व कायदा असतो. म्हणूनच बलात्कारी जो अन्याय करतो; तो कायद्याच्या अधिकारावरचा बलात्कार असतो. ज्या शासन व सत्ताधार्‍यांना आपल्यावरच बलात्कार झालाय त्याचा पत्ता नाही; त्यांना जागे तरी कसे म्हणायचे? ज्या मुलीचा शुक्रवारी मध्यरात्री सिंगापुरच्या इस्पितळात मृत्यू झाला, तिच्यावर नक्कीच लैंगिक हल्ला झालेला आहे, शारिरीक अत्याचार झालेले आहेत. पण तिने आपली अब्रू राखण्यासाठी जीवापाड झुंज दिली व त्यात ती जबर जखमी झाली. त्याच जखमांनी तिचा बळी जरूर घेतला आहे. पण बलात्कार म्हणाल; तर त्या स्वाभिमानी अब्रूदार मुलीवर गुन्हेगार बलात्कार करूच शकलेले नाहीत. कारण तिने त्यांचे बळ झुगारून त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला होता. तिच्या अंगी जेवढे बळ, शक्ती होती, तेवढ्यानिशी तिने प्रतिकार केला, झुंज दिली आणि शुद्ध असेपर्यंत ती झुंजत राहिली. शुद्ध हरपल्यावर झाला; त्याला अत्याचार म्हणता येईल, पण बलात्कार नाही. उलट ज्या सरकारच्या हाती अधिकार आहेत आणि पोलिसांच्या हाती बंदूका आहेत, त्यांना जर समाजात वावरणार्‍या बलात्कारी गुन्हेगारांना रोखता येत नसेल, तर झाला व होतात, ते बलात्कार त्या सरकार व सत्ताधार्‍यांवर असतात, जे अब्रूची राखण करायचे सोडून कुंभकर्णासारखे झोपा काढत असतात. होय मित्रांनो, शुक्रवारी अपरात्री मरण पावली व जिच्यावर धावत्या बसमध्ये अत्याचार झाला, तो अपघात होता. तिचा अपघातात बळी गेला. स्वत:ची अब्रू प्राण पणाला लावून राखणार्‍या स्त्रीवर कोणी बलात्कार करू शकत नाही. तिच्या देहाची लैंगिक विटंबना होते; तो तिथल्या कायदेशीर सत्तेवरला बलात्कार असतो. आणि त्याचा पुरावा पाहिजे कोणाला? बघा, आता हेच सत्ताधारी देशाचा ध्वज अर्ध्या उंचीवर आणून आणि नतमसतक होऊन, माना खाली घालतील लाजेने तिच्या मृतदेहासमोर. ज्या मुलीने करोडो भारतीयांना स्वाभिमानासाठी जागे केले आणि मृत्यूशय्येवर पडलेल्या आपल्या सामुहिक इच्छाशक्तीला जिवंत केले; ती मरेलच कशी? ती तर चीड, संताप, प्रक्षोभ, जाणिव होऊन आपल्या सर्वांच्या मनात तळपते आहे. आता तिला जिवंत ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हाती आहे. तुम्ही तिला मनात जागी व जिवंत ठेवू शकता किंवा मारू शकता. काय विचार आहे? (क्रमश:)
भाग   (४१  )    ३० /१२/१२

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

शारिरीक असतो तसाच बलात्कार बौद्धिकही असतो



  सध्या बलात्कारावर मोठाच उहापोह चालू आहे. त्यातच मध्यप्रदेशातील एका महिला शास्त्रज्ञाने किंवा राष्ट्रपतींच्या खासदार चिरंजीवांनी काही मुक्ताफ़ळे उधळल्याने; मोठेच काहूर माजले आहे. पण त्यावर गदारोळ करणारे तरी त्यात मागे असतात काय? रंगभुषा वा नटणेथटणे करणार्‍यांची दिल्लीत निदर्शने चालू आहेत; अशी भाषा अभिजीत मुखर्जी या कॉग्रेस खासदाराने वापरली. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील एक महिला शेती शास्त्रज्ञाने दुसर्‍या टोकाचे विधान करून खळबळ उडवून दिली. जर इतके गुंड अंगावर आले तर त्या मुलीने बलात्कार करू बघणार्‍यांना शरण जायला हवे होते. असे त्या शास्त्रज्ञ महिलेचे म्हणणे आहे. त्यावर तात्काळ काहुर माजवण्यात आले. पण हे कोणी बोलत असेल, तर त्याचे संदर्भ किंवा हेतू कोणी तपासून बघणार आहे किंवा नाही? टोळीच्या तावडीत सापडल्यावर प्रतिकार केल्याने जीवावर बेतले. त्याऐवजी शांतपणे अत्याचार सहन केला असता, तर निदान जीव वाचला असता, असेच त्या महिला शास्त्रज्ञाला म्हणायचे आहे. पण तिच्या म्हणण्याचा अर्थ बलत्काराचे स्वागत करावे असा लावला गेला. लगेच तिला बलात्कार समर्थक ठरवण्याची स्पर्धाच माध्यमात सुरू झाली. शेवटी गुन्हा झाला असेल, तरी त्याचे नुसते पुरावे खटल्यात तपासले जात नाहीत, तर ज्याला आरोपी म्हणून पकडले आहे व ज्याचा विरोधात पुरावे समोर आले आहेत; त्याचा गुन्ह्यामागचा हेतू स्पष्ट होतो किंवा नाही, याचाही शोध घेतला जात असतो, पण इथे हेतू किंवा पुराव्याची कोणाला गरज वाटेनाशी झाली आहे, ज्यांच्या हाती माध्यमे व प्रसार साधने आहेत; त्यांच्या मनात आले, मग एका सेकंदात समोरचा माणूस आरोपी असतो आणि माध्यमांनी आरोप ठेवला, मग त्याच्या विरुद्धचा आरोप सिद्धही झालेला असतो; अशा थाटात सगळा कारभार चालू आहे. माझा त्यालाच आक्षेप आहे. कारण तोही एकप्रकारचा बलात्कारच आहे. त्याला शारिरीक नाही तरी बौद्धीक बलात्कार म्हणायला हवे. 

   ज्या शब्दांसाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्यावर आक्षेप घे्तला जात आहे, त्याच स्वरूपाचे आरोप वा आक्षेप माध्यमातील बड्या लोकांनी सरसकट वापरले आहेत, त्याचे काय? कुठलेही वर्तमानपत्र काढून बघा, त्यात जी तरूणाई रस्त्यावर उतरली तिच्याविषयी व्यक्त झालेली मते मुखर्जी यांच्यासारखीच आहेत. दिल्लीतल्या बलात्कारानंतर जो जनसगर रस्त्यावर उतरला, तो एका नवश्रीमंत वर्गातला आहे आणि खाऊनपिवून सुखी जगणार्‍यांचा आहे, अशी जी टिका सार्वत्रिक माध्यमातून झाली, त्यांना काय म्हणायचे आहे? सुखवस्तू मध्यमवर्ग किंवा नवश्रीमंत वर्गाला न्याय मागण्याचा अधिकार नाही? त्यांच्यावरचे बलत्कार माफ़ असतात काय? जेव्हा गरीबावर अन्याय होतो, दंगलीत मुस्लिमांवर अन्याय होतो; तेव्हा ही नवश्रीमंत वा मध्यमवर्गिय मंडळी कुठे असतात; असे सवाल बहुतांश माध्यमातून विचारले गेलेले आहेत. हे शब्द ज्यांना उद्देशून विचारले गेले आहेत, तोच वर्ग फ़ॅशन करतो. तोच वर्ग रंगभूषा करतो, तोच डिस्कोमध्ये जातो. आणि त्यांनाच माध्यमातले अतिशहाणे नवश्रीमंत म्हणतात आणि अभिजीत मुखर्जी फ़ॅशन करणारे म्हणतात. दोन्ही भाषेचा हेतू एकच आहे; पण शब्द मात्र वेगवेगळे आहेत. मग तोच प्रश्न या माध्यमातल्या दिवट्यांना विचारता येईल. किती दिवट्या माध्यमातल्या शहाण्यांनी खैरलांजीचा बलात्कार उचलून धरला होता, रस्त्यावर येऊन धसास लावायला पुढाकार घेतला होता? त्यावर मोठ मोठ्या बातम्या दिल्या असतील. पण ते तर माध्यमांचे कामच आहे. यातले किती माध्यामवीर रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करीत होते? खैरलांजीच्या दलित, गरीब महिलांसाठी बातम्यातून न्याय मागणारे माध्यमवीर जेसिका लालसाठी मात्र इंडिया गेटपाशी मेणबत्त्या पेटवायला अगत्याने हजर होते. त्यांचा दर्जा ह्या  नवश्रीमंतांपेक्षा वरचा म्हणजे खुपच वरचा असतो. नवश्रीमंतांच्या दहापट अधिक उत्पन्न असलेले दिवटे असले प्रश्न विचारत असतात. 

   यालाच मी बौद्धीक बलात्कार म्हणतो. जेव्हा अशा अतीश्रीमंत वर्गातल्या कुणावर किंवा त्यांच्या अशा बुद्धीमान आश्रितांवर हल्ला किंवा बलात्कार होतो, तेव्हा या कनिष्ठ मध्यमवर्गातून कोणी मदतीला, मोर्चाला आलेले नाही, त्याची ही तक्रार असते. बलात्कार कोणावरही होवो, तो तितकाच भीषण असतो. तिथे दुसर्‍याच्या मनाविरुद्ध त्याच्यावर स्वत:ला लादणे होत असते. आज लोकांमध्ये एका गुन्ह्याविषयी कमालीची चीड निर्माण झालेली असताना; त्याच समाजाच्या मनात दुही माजवण्याचे प्रयास पापावर पांघरूण घालणारेच असतात. जेव्हा मुंबईत वसंत ढोबळे नावाचा पोलिस अधिकारी कुठल्या बेकायदा बीयरबार किंवा हुक्का पार्लरवर धाडी घालत होता, तेव्हा त्याच्या विरोधात प्रचाराची मोहिम चालवणार्‍या माध्यमांचे हेतू शुद्ध होते काय? प्रामुख्याने वाहिन्यांनी ढोबळे यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. व्यसनाधीनता गुन्ह्याला आमंत्रण देत असते. त्यातूनच मुलींवरच्या एकफ़र्ती प्रेमाचे व हल्ल्याचे प्रमाण बेफ़ाट वाढलेले आहेत. त्याला या रेव्ह पार्ट्या अधिक कारणीभूत होतात. त्याच डबक्यातून अशा गुन्हेगारीचे व्हायरस व मच्छरांची पैदास होत असते. त्या डबक्यांच्या विरोधात पोलिसांनी वा कुठल्या संघटनेने चार शब्द बोलले; मग लगेच स्वातंत्र्याची पोपटपंची कोण सुरू करतो? अशा व्यसनाधीनतेच्या विरोधात केलेली आंदोलने, मागण्या किंवा कृती यांना मॉरल पोलिसींग ठरवून त्याची खिल्ली उडवणारे अतिशहाणे कोण असतात? घरोघर जाऊन पोहोचलेल्या टिव्हीवर चिकनी चमेली किंवा मुन्नी बदनाम कोण करत असतो? त्याचे सामान्य मनावर काय परिणाम होतात, याचे भान नसते, त्याला हल्ली बुद्धीमंत म्हणतात काय अशी शंका येते. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यालाच आजचा नवश्रीमंतवर्ग किंवा नवमध्यमवर्ग बळी पडला आहे. 

   पण परवा त्या एका बलात्काराने तोच वर्ग म्हणजे त्यातले तरूण खडबडून जागे झाले आणि रस्त्यावर उतरले; तर त्यांच्याकडे हेटाळणीने बघणारे समाजाचे हितचिंतक असू शकतात काय? आजच्या अशा अराजकाला खरा कोण जबाबदार असेल; तर असे दिवाळखोर बुद्धीमंत व बेजबाबदार माध्यमेच आहेत. कारण त्यांनी स्वातंत्र्य व आधुनिकता यांच्या नावाखाली अनेक मृत्यूचे सापळे तयार करून ठेवलेले आहेत. त्यात मग अनेक मुली, महिला किंवा निरपराध लोक अनवधानाने सापडत असतात. सात आठ वर्षाची मुले लिटल मास्टर म्हणून जे काही नाच करतात, त्यातले हावभाव किंवा गीताचे शब्द त्यांना कळणारे तरी असतात काय? मग त्या कोवळ्या वयात ते एकमेकांकडे ‘आयटेम’ म्हणून बघू लागले तर नवल ते काय? गेल्याच आठवड्यात पुण्याच्या बारामती भागातील बलात्काराची बातमी त्याचा पुरावा आहे. सोळा व अकरा वर्षे वयाच्या दोघा मुलांनी दहा वर्षाच्या मुलीला आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मागल्या पिढीला ज्या वयात बलात्कार हा शब्दही ऐकून माहित नसेल, त्या वयात पुढली पिढी बलात्कार करू लागली आहे. ही कुणाची किमया आहे? आपण काय सांगतो, काय दाखवतो, कला म्हणून काय पेश करीत आहोत, रियालिटी शोमध्ये मुलांना प्रसिद्धीच्या आमिषाने ओढून आणणार्‍यांनी त्याच्या परिणामांचा कधी विचार तरी केला आहे काय? 

   या बौद्धीक बलात्कारानेच सगळा समाज भरकटत चालला आहे. कारण वैचरिक स्वातंत्र्याच्या नावाखाली जे नैतिकतेच अध:पतन करण्याच आजचे बुद्धीमंत हातभार लावत आहेत, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. कोण चांगल्या घरातली. सुसंस्कारातली मुलगी व कोण चटकन उपलब्ध होणारी; यातला फ़रक कळेनासा झाल्यावर श्वापदांसाठी सर्व समाजच शिकारीचे जंगल होऊन गेला, तर नवल नाही. शेवटी आपण एकटे एकटे जगत नसतो, त्याच समाजात जगतो, जिथे भ्रष्ट नजरेचे, अनेक वृत्तीचे लोक वावरत असतात. त्यांच्या वर्तनाची हमी सरकार व कायदा देऊ शकत नसतो. म्हणूनच प्रत्येकाने सावधपणा बाळगणे अगत्याचे असते. त्याचे भान कितीजणांना राहिले आहे? पोलिस व सरकारने आपले काम केले पाहिजे व लोकांना सुरक्षा दिलीच पाहिजे. पण त्या कामात लोकांनीही पोलिसांना सहकार्य करायला नको का? आम्ही धोका ओढवून घेणार आणि सरकार व कायद्याने आम्हाला वाचवावे; अशी अपेक्षा करता येणार नाही. मग होते असे, की अनेकदा अशा वाह्यात गोष्टींशी संबंध नसलेल्यांचाही त्यात बळी पडत असतो. वैचारिक अनाचाराने व बौद्धीक भ्रष्टाचाराने समाजची मानसिकता सडवली आहे. बलात्कार हा त्याचा परिणाम आहे. कारण तुम्ही माणसातल्या पुरूषी मनातले सुप्त नर श्वापद जागवणार असाल; तर त्याच्या परिणामातून सुटका नाही. म्हणूनच रस्त्यावर उतरलेल्या त्या तरूणाईचे स्वागत करायला हवे, की ज्यांच्याकडे उनाड, खोडसाळ किंवा भरकटलेले म्हणूनच बघितले जाते, त्यांनी रस्त्यावर येऊन आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले आहे. माध्यमांनी त्याला भलतीकडे नेण्याचे निदान पाप तरी करू नये, एवढीच अपेक्षा.  ( क्रमश:) 
भाग   ( ४० )    २९/११/१२

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२

शक्तीमान गुंडापेक्षा बुद्धीमान गुन्हेगार धोकादायक



   काही वर्षापुवी ‘मशाल’ नावाचा एक हिंदी चित्रपट आलेला होता. दिलीपकुमार, अनील कपूर व निळू फ़ुले; अशा नटांनी त्यात अप्रतिम भूमिका केल्या होत्या. पण उतारवयात असूनही त्यातली प्रमुख भूमिका दिलीपकुमारनेच सादर केली होती. त्याने त्यात एका झुंजार पत्रकाराचे पात्र रंगवले होते. आज जे अविष्कार स्वातंत्र्याचे नाटक करणारे वास्तव पत्रकार आहेत, त्यांच्या वास्तव जीवनापेक्षा दिलीपकुमारने रंगवलेला पत्रकार खुप प्रामाणिक होता आणि जेव्हा परिस्थितीचे चटके बसू लागतात, तेव्हा त्याने परिस्थिती बदलण्यासाठी रौद्ररुप धारण करण्य़ापर्यंत मजल मारलेले ते कथानक होते. पत्रकार म्हणून नुसतेच लिखाणातले पोकळ शहाणपण न सांगता तो अनील कपूर या टपोरी तरुणाला  सुधारतो. पत्रकार बनवतो. पण दरम्यान अशा घटना घडतात, की स्वत: दिलीपकुमारच गुन्हेगार वनून जातो. या दरम्यान त्याचे एक वाक्य माझ्या कायमचे स्मरणात राहून गेले आहे. हल्ली त्या वाक्याची प्रतिदिन आठवण मला होत असते. अमरिश पुरी हा त्या चित्रपटातला पैसेवाला मुजोर शेठ व गुन्हेगारी व्यवसायातून कमाई करणारा असतो. त्याच्या भानगडी चव्हाट्यावर आणायच्या हट्टामुळे दिलीपकुमारला चांगल्या मोठ्य़ा वृत्तपत्रातली नोकरी सोडावी लागते. कारण पैसेवाला अमरीश पुरी मालकालाच खरेदी करतो आणि मग त्याच्या भानगडी छापायची बंदी येते. आजचा वास्तवातला कोणी संपादक असता, तर त्याने एव्हाना अमरीश पुरीच्या बुटाला पॉलिश करून आपली नोकरी परत मिळवली असती आणि परत अविष्कार स्वातंत्र्याचे साग्रसंगीत व्याख्यान देऊन ढेकरही दिला असता. बाकी भानगडी व घोटाळे सांगताना व दाखवताना आवेशपुर्ण बोलणार्‍या निखिल वागळेच्या आजच्या सवालाला दर्डांच्या कोळशाच्या खाणीचा बोभाटा झाल्यावर तोंड काळे करायची वेळ आलीच ना? पण म्हणून एकट्या निखिलला बेशरम मानायचे कारण नाही. आजकाल पत्रकारितेला अशाच निर्लज्ज लोकांनी काबीज केले आहे. कोणाला झाकायचा आणि कोणाला दाखवायचा अशी परिस्थिती आहे. पुन्हा बेशरमपणा इतका बेमालूम असतो, की किती सांगायचे असाही प्रश्न असतो.

   पण चित्रपटातला पत्रकार दिलीपकुमार खोटा पत्रकार असल्याने मालकाला शरण जात नाही, की अमरिश पुरीच्या पैशासमोर झुकत नाही. तो नोकरीवर लाथ मारून निघतो. तेव्हा त्याला खिजवायला आलेला अमरिश पुरी त्याला पुन्हा खरेदी करायला त्या मोठ्या वृत्तपत्राच्या दालनात येतो, ऑफ़र करतो. तेव्हा दिलीपकुमार चारचौघात त्याच्या सणसणीत थोबाडीत हाणतो आणि शांतपणे म्हणतो, तुझ्या ऑफ़रचा यापेक्षा योग्य जबाब माझ्यापाशी दुसरा नव्हता. आजच्या बहूतांश पत्रकारांचा आवेश असतो असाच. पण तो तुम्हाआम्हाला दाखवण्यापुरता. बाकी कोण डोळा मारतो याची प्रतिक्षा करणार्‍या या पतिव्रता म्हणाव्यात अशी वस्तुस्थिती आहे. ‘बेरक्या’ नावाचा कोणी अनभिज्ञ त्याची लक्तरे ऑनलाईन धुवत असतो. असो. चित्रपटात दिलीपकुमार स्वत:चे छोटे वृत्तपत्र चालू करतो आणि पैशाची ओढाताण सहन करीत चालवित असतो. तेव्हा पुन्हा त्याच्या त्याही कार्यालयात जाऊन अमरिश पुरी त्याला खिजवतो. पैसे नसले तर काही चालत नाही; वगैरे वगैरे सुनावतो. सर्वकाही ऐकल्यावर दिलीपकुमार जे उत्तर देतो, ते महत्वाचे. इतकी वर्षे उलटून गेल्यावरही ते कायमचे मेंदूत कोरले गेले आहे. आपल्या बुद्धीचा सार्थ अभिमान असलेल्या दिलीप उत्तरतो, ‘तू एक फ़डतूस गुंड आहेस. तुझ्याकडे हाणामारीची ताकद असेल. पण मी बुद्धीमान आहे आणि मी जोपर्यंत माझी बुद्धी गुन्हेगारीसाठी वापरत नाही, तोपर्यंतच तुझी चलती आहे. ज्या दिवशी माझ्यासारखा बुद्धीमान गुन्हेगारीच्या क्षेत्रात येईल ना, त्यादिवशी तुझी सद्दी संपेल. ताकदवाल्या गुंडापेक्षा बुद्धीमान गुन्हेगार अधिक धोकादायक असतो हे कधी विसरू नको’

   आजवर जगाने अत्यंत खतरनाक अशा ज्या गुंड गुन्हेगारांचा इतिहास वाचला व अभ्यासला आहे, त्यांना दिलीपकुमारचे ते शब्द पटतील. कारण ज्यांनी गुन्हेगारीला ताकदीने सुरूवात केली असेल, पण थोडी संधी मिळताच बुद्धीचा योग्य वापर केला; तेच टिकून राहिले व त्यांनी गुन्हेगारीचे मोठे साम्राज्य निर्माण केलेले दिसेल. मग तो आपल्याकडचा दाऊद असो, की अमेरिकेतले माफ़िया असोत. त्यातले बुद्धीमान होते त्यांनी आपली साम्राज्ये उभी केली. आज अनेक पत्रकार थेट गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरलेले नाहीत, पण गुन्हेगारीला साथ देण्यास आपली बुद्धी राबवत असतात. म्हणूनच मला त्या चित्रपटाचे स्मरण झाले. गुन्हा म्हणजे तरी काय असते? तुम्ही दुसर्‍याची फ़सवणूक केली म्हणजे गुन्हाच केलेला असतो ना? एखाद्या वयात येणार्‍या मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिला कुंटणखान्यात अलगद आणून विकणारा आणि आपल्या बुद्धीचातुर्याने कुणा माणसाला टोपी घालण्यास हातभार लावणारा; यात फ़रक नसतो. मग तुम्हाआम्हाला बातमी वा लेखाच्या माध्यमातून गाफ़ील ठेवणारे आणि अलगद शत्रूच्या हाती सोपवणारे; त्या भामट्या प्रियकरापेक्षा वेगळे असतात काय? अशा कामात जेव्हा बुद्धी पणाला लावली जाते; तेव्हा त्याला गुन्हाच म्हणायचा असतो. आज जे दिल्लीतील बलात्काराच्या निमित्ताने आंदोलन भडकले आहे, त्याच्या बातम्या देताना चाललेली बौद्धिक कसरत म्हणूनच मला घातक व भामटेगिरी वाटते. त्या आंदोलनाला अराजक ठरवण्याची काही ठराविक पत्रकार व माध्यमांची बौद्धिक कसरत बनवेगिरीच आहे. त्याचा एक किस्सा मी काल सुभाष तोमर या पोलिस शिपायाच्या मृत्यूसंबंधाने स्पष्ट केला होता. आता गेल्या दिड वर्षातल्या अण्णा हजारे व इतरांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा विषय घ्या. त्यातही पत्रकारांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसेल. हे सर्व कोणाच्या इशार्‍यावर चालू असते? कशासाठी चालू असते?

   बलात्कारानंतर लोक खवळून रस्त्यावर आले, मग त्याला व्हायरस किंवा झुंडशाही म्हणायचे तर दिल्लीत वा अन्य शहरांमध्ये जे राजरोस बलात्कार व खून होत आहेत, त्याला कायद्याचे राज्य म्हणायचे काय? जेव्हा अशी भाषा संपादक, पत्रकार लिखाणातून बातम्यातून वापरतात, तेव्हा ठीक असते. पण त्याच बातम्या ऐकून वा वाचून लोक रस्त्यावर आले; मग अराजक होत असते? तसे असेल तर ते अराजक पेटवण्याचे पाप त्याच पत्रकार व माध्यमांचेच नाही काय? गुजरात पेटला असताना तिथे जाऊन मोदी सरकार विरोधात भडकावू भाषण देणार्‍या व विधाने करणार्‍या सोनिया गांधी दंगल मिटवण्याचे प्रयास करत नव्हत्या. तर आगीत तेलच ओतत होत्या. त्याच दंगलीत पोळ्या भाजून घेत होत्या. त्याबद्दल बोलायचे नाही. पण भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी बलात्कार संबंधातील कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलवायची मागणी केली; मग मात्र पोळी भाजून घेतली, अशी भाषा कशाचे द्योतक आहे? माध्यमांना लोकांची दिशाभूल करायची, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? थोडे संयमाने घ्यायला हवे असे बौद्धिक देणार्‍यांना अरुणा शानभागवर बलात्कार होऊन चार दशके उलटल्यानंतर आज लोक रस्त्यावर आले; म्हणजे संयमाचा अंत झाला एवढेही कळत नाही काय? पण लोकांमध्ये गोंधळ माजवायचा असेल तर असेच चालणार. मग त्यासाठी भलतेसलते प्रश्न उपस्थित केले जाणार. गुजरातच्या दंगलीचा न्याय मागायच्या वेळी हे तरूण कुठे होते? गरीबांच्या प्रश्नांची तड लावतांना हे लोक कुठे होते? असले प्रश्न केवळ दिशाभूल करण्यासाठी उपस्थित करणारे पत्रकार बौद्धिक गुन्हेगार असतात. दिलीपकुमार त्या चित्रपटात जे वाक्य बोलला, त्याचा अनुभव मला म्हणूनच आजकाल नित्यनेमाने येत असतो.

   अशा बदमाशांचे किस्से ऐकले किंवा तपासून बघितले तर लोक गुंडापेक्षा पत्रकारांना रस्त्यावर खेचून मारतील अशी स्थिती आहे. आज आपला समाज व देश ज्या दुरावस्थेल पोहोचला आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार कोण असेल तर आपल्या देशातली दगाबाज प्रमुख माध्यमेच होत. गुंडांच्या तावडीतून सोडवायचे नाट्क करणार्‍यानेच नंतर बलात्कार करावा, तशी आजच्या बौद्धीक वर्गाची स्थिती झाली आहे. देशाला व समाजाला लुटणार्‍या सतावणार्‍यांच्या सेवेत त्यांची बुद्धी राबते आहे आणि त्याचेच दुष्परिणाम अवघ्या समाजाला भोगावे लागत आहेत. कारण आता गुन्हेगारी वा गुंडगिरी भुरटी राहिली नसून त्याच्यामागे बौधिक ताकद उभी राहिली आहे. खर्‍या माफ़ियांपेक्षा हे दिशाभूल करणारे बुद्धीवादी भामटे, आपल्याला विनाशाकडे घेऊन चालले आहेत. दिलीपकुमार तरी बरा होता. गुंड होताना त्याने अमरिश पुरीसारख्या मुजोर गुन्हेगाराला संपवायला आपली बुद्धी पणाला लावली होती. आजचे अनेक संपादक व बुद्धीमंत त्याच गुन्हेगारांचे सहाय्यक बनले आहेत, त्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत.     ( क्रमश:)
भाग   ( ३९)    २८/११/१२

बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

अफ़वाबाज वाहिन्यांना शिक्षा कोण देणार?



    अफ़वा पसरवणे हा गुन्हा आहे असे नेहमी सांगितले जाते. पण कधीकधी शंका येते, की खरेच अफ़वा पसरवणे हा गुन्हा असता तर आजच्या या इतक्या वाहिन्या आपले आपले दुकान, इतके दिवस चालवू शकल्या असत्या काय? इतकी वृत्तपत्रे चालली असती काय? कारण जितकी अधिक पाने व जितक्या अधिक अफ़वा आणि वाहिन्या तेवढ्या अधिक अफ़वा; अशी आजची परिस्थिती झालेली आहे. काही वर्षापुर्वी मुंबईत तीन बॉम्बस्फ़ोट झाले. त्यातले दोन चर्नीरोडच्या जवळ मुंबादेवीच्या परिसरात आणि तिसरा गेटवेपाशी. पण त्या संध्याकाळी बहुतेक वाहिन्या चार स्फ़ोट झाल्याची रसभरित वर्णने ऐकवत होत्या. रस्त्यावर जो कोणी भेटेल त्याला प्रत्यक्ष दर्शी म्हणून पेश करत होत्या. त्यात ‘आजतक’ व ‘एनडीटीव्ह’ यांचा समावेश होता. मराठी वाहिन्यांचे पेव तेव्हा फ़ुटले नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून अखेर लोकांना सत्य समजू शकले. त्यात मुंबादेवी व झवेरीबाजार मिळून जे दोन स्फ़ोट झाले होते, त्याच्या जागांची ठिकाणे माहिती नसल्याने, दिल्लीच्या स्टुडीओमध्ये बसून रसभरित वर्णने सांगणार्‍यांना काहीच कळत नव्हते आणि बातमी देणार्‍यापासून ऐकणार्‍यापर्यंत सगळेच अंधारात चाचपडत होते. म्हणजेच चालू होती ती नुसती अफ़वाबाजी होती. पुढल्या काळात वाहिन्या वाढत गेल्या आणि सबसे तेज म्हणजे सर्वात आधी बातमी देण्याच्या नादात वाटेल ते सांगण्याची स्पर्धाच सुरू झाली. ज्यांच्याकडे काहीच बातमी नसेल ते बेधडक बातम्या घडवू लागले. म्हणजे वाटेल ते खोटेही सांगू लागले. त्यात झीन्युजचा सध्या गजाआड असलेला सुधीर चौधरी आघाडीवर होता. त्याने एका शाळेतील प्राचार्या विद्यार्थिनींना वेश्यावृत्तीला लावतात; अशी अफ़वा तयार करून खळबळ उडवून दिली होती. मग शाळेवर जमाव धावून गेला होता. त्यात त्याने चेहरा झाकलेली त्याच्याच वाहिनीची एक मुलगी वार्ताहर शाळेची विद्यार्थिनी म्हणून दाखवून खोटारडेपणा केला होता. थोडक्यात खोटेपणा आता माध्यमांचा स्वभाव बनू लागला आहे. मग त्याचा लाभ उठवणारे ग्राहकही तयार होणारच ना? चार नोटा तोंडावर फ़ेकल्या; मग कुठलीही अफ़वा पसरवणे आता सोपे झाले आहे.

   याचा ताजा अनुभव म्हणजे लोकांची आंदोलने सुरू झाली, लढे सुरू झाले; मग त्याच्या विरोधात कंड्या पिकवून बेदिली व गैरसमज पसरवायचे. त्यासाठी मग दिग्विजय सिंग यांच्यासारखे अफ़वाबाज सज्ज असतातच. दिल्लीच्या आंदोलनात तेच झाले आहे. जेव्हा त्या निदर्शनांवर कुठल्या राजकीय पक्ष वा संघटनेचा आरोप करण्याची सोय राहिली नाही; तेव्हा त्याचा ताबा गुंड समाजकंटकांनी घेतल्याच्या अफ़वा सुरू झाल्या. ज्याप्रकारची तोडफ़ोड व फ़ेकाफ़ेक त्या आंदोलनात झाली, त्याला समाजकंटकांनी केलेला धुमाकुळ म्हणायचे असेल; तर मग आपल्या देशातल्या तमाम पक्ष संघटना व त्यांच्या आंदोलनामध्ये केवळ गुंड व समाजकंटकांचाच भरणा असतो असे म्हणायला लागेल. शरद पवार यांच्या थोबाडीत दिल्लीमध्ये एका माथेफ़िरूने मारली, त्यानंतर पुण्यात जवळपास दोन दिवस बंद होता आणि मोडतोड चालू होती. त्यात आघाडीवर तिथले महपौरच होते. मग त्यांना समाजकंटक म्हणणार आहोत काय? आणि ज्याप्रकारांना समाजकंटकाची कृती म्हटले जाते, त्याचे रूप आजकाल अनेक विधानसभा व कायदेमंडळे, महापालिकांच्या सभागृहात दिसत असते. त्या सर्वांना गुंडच म्हणायला हवे. पण मग तसे म्हटले तरी चालत नाही. केजरिवाल किंवा शिसोदियांनी संसदेत गुंड बसलेत, त्यातल्या पावणेदोनशे लोकांवर गुन्हे दाखल आहेत म्हटले तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून उलट आरोप करण्यात माध्यमांचाच पुढाकार होता ना? मग परवा दिल्लीच्या दंगल वा निदर्शनामध्ये घडले त्याला नेमके काय म्हणायचे? गुंडगिरी की संसदिय कामकाज?

   अशा माध्यमांकडून खर्‍या बातम्या किंवा माहिती मिळणेच अशक्य आहे. म्हणूनच दिल्लीच्या निदर्शनांवर गुंडगिरीचा आरोप झाला तर नवल नव्हते. पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एका पोलिसाच्या हत्येचा आरोप आंदोलकांवर लावला; तेव्हा कहर झाला. सुभाष तोमर नावाचा एक पोलिस शिपाई त्याच निदर्शनांच्या वेळी दगड लगून जखमी झाल्याच्या बातम्या सर्वप्रथम आल्या. मग त्याचा त्याच जखमेमुळे मृत्यू झाल्याचे सांगत त्यात केजरिवालच्या पक्षाचे कार्यकर्ते पकडल्याचा गवगवा माध्यमांनी केला. अखेरीस केजरिवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आठ लोक पकडले आहेत; त्यात पक्षाचा एकच कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तेवढेच नाही, ज्यांना तोमर हत्या प्रकरणी अट्क झाली होती, त्याबद्दल खुद्द न्यायमुतींनीच शंका व्यक्त केली. पोलिसांना त्या अटक व धरपकडीबद्दल समर्पक उत्तरे कोर्टामध्ये देता येत नव्हती. पण तोपर्यंत तमाम वाहिन्यांनी निदर्शकांनी पोलिसाचा हकनाक बळी घेतल्याच्या अफ़वा पसरवायला सुरुवात केली होती. मात्र हा पोलिस ज्या इस्पितळात आहे वा त्याच्यावर उपचार चालू आहेत, तिथून कुठली माहिती घेण्याची कोणाला गरज वाटली नाही. तो कुठल्या दगडाने जखमी झालेला नाही, किंवा त्याला दगड लागून जिव्हारी जखम झालेली नाही; असे उपचार करणारे डॉक्टर्स सांगतही होते. पण सबसे तेज दौडणार्‍यांना सत्य हवेच कुठे होते? पोलिस वा सरकारच्या इशार्‍यावर अफ़वा पसरवण्याचे कंत्राट घेतल्यासारखी माध्यमे कामाला लागली होती. पण माध्यमांचे दुर्दैव असे, की त्यांनीच केलेल्या चित्रणात सत्य नोंदले गेले होते. त्यात तो पोलिस म्हणजे सुभाष तोमर रस्त्यात पडलेला आणि त्याला मदत करणार्‍या दोघा निदर्शकांचेही चित्रण झालेले होते. एका निदर्शक जखमी मुलीनेच तोमरचे डोके मांडीवर घेऊन त्याला मदत चालविल्याचे दृष्य़ टिपले गेले होते. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात त्या शिपायाला वाचवण्य़ाची धावपळ चालविली होती, त्यांच्यावरच दगडफ़ेक व खुनाचा आरोप माध्यमे करीत होती. पोलिस सांगत होते, आणि माध्यमे अफ़वा पसरवत होती.

   योगेंद्र नावाचा एक पत्रकारितेचा विद्यार्थी त्या घटनेचा साक्षिदार होता आणि तोमरला इस्पितळात पोहोचवण्यात सहभागी झाला होता. सहाजिकच अनेक चित्रात तो टिपला गेला होता. आता त्यानेच समोर येऊन सरकार, पोलिस व माध्यमांचा बुरखा फ़ाडला आहे. आपण व एक जखमी तरूणी त्या तोमरला कसे वाचवत होतो, त्याचे दाखले योगेंद्रने चित्रणाच्या मदतीनेच जगासमोर सिद्ध केले. त्यामुळे दिल्लीच्या पोलिस आयुक्तांचे तोंड काळे झाले आहे आणि सरकारच्या बेशरमपणाचा पुरावा जगासमोर आलेला आहे. पण त्याचवेळी त्या पापामध्ये माध्यमांनी शासनाला दिलेली साथ विसरता येईल काय? दगड लागून तोमर जखमी झाला आणि त्याच्या जीवावर बेतले; ही मुळातच अफ़वा होती. तिची शहानिशा दोन दिवस वाहिन्यांनी कशी केली नाही? पोलिस आयुक्त व सरकारी इशार्‍यावर अफ़वा पसरवणार्‍यांनी इस्पितळाचे डॉक्टर काय सांगतात, त्याकडे काणाडोळा करून थापा कशाला मारल्या? तोमर दगडफ़ेकीत जखमी झाला असेल तर त्याला पोटात आत इजा कशी झाली? दगड लागून शरीराच्या आत जखमा कशा होऊ शकतील? तोमर दिर्घकाळ हृदयविकाराचे उपचार घेत होता, हे सत्य पोलिसांनी लपवले होते. पण योगेंद्र पुढे आला नसता तर माध्यमांनी पसरवलेली अफ़वा सत्य ठरून गेली असती. अण्णा हजारे किंवा विरोधी पक्षांची विश्वासार्हता संपली काय याची उठताबसता चर्चा करणार्‍या माध्यमांची विश्वासार्हता किती उरली आहे? एका शिकावू पत्रकाराने बुधवारी एकूणच वाहिन्यांच्या संपादक व पत्रकारांची अब्रू वेशीला टांगली म्हणायची. कारण त्यांनीच चित्रित केलेल्या व टिपलेल्या चित्रणातून त्याने वाहिन्यांवरच्या बातम्यांना अफ़वा ठरवून दाखवले. जिथे हार्ट अटॅकने तोमर कोसळला होता, त्याची जी छायाचित्रे बुधवारी तमाम वाहिन्या दाखवत होत्या, त्यात जखमी पोलिसाला मदत करणारे दोन निदर्शक त्या संपादक पत्रकारांना का दिसले नव्हते? शिकावू पत्रकाराने डोळे उघडण्यापर्यंत हे वाहिन्यांचे संपादक डोळे झाकून बातम्या सांगत होते, की अफ़वा पसरवत होते? सवाल इतकाच आहे, की अफ़वा पसरवणे हा गुन्हा असेल तर तोमर दगडफ़ेकीमुळे जखमी होऊन जिवाला मुकला, अशी अफ़वा पसरवणार्‍यांचे काय? त्यात दिल्लीच्या पोलिस आयुक्तांपासून वाहिन्यांच्या पत्रकार संपादकांपर्यंत अनेकांचा समावेश होतो. तेही गुन्हेगार नाहीत काय? अशा अफ़वा पसरल्याने पोलिस बिथरले असते आणि त्यांनी निदर्शकांना झोडपून काढले असते; तर किती भीषण परिस्थिती ओढवली असती? या व्यापक प्रमाणात अफ़वा पसरवणार्‍या वाहिन्या व त्यांच्या पत्रकारांवर कोणती कारवाई होणार आहे?   ( क्रमश:)
भाग   ( ३८ )    २७/११/१२

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

माध्यमे बुद्धीमंत दिशाभूल का करतात?



    "दुसर्‍याच्या चुका शोधणे खुप सोपे असते. पण आपल्या चुका ओळखणे अत्यंत अवघड असते." अशी भगवान बुद्धाची शिकवण आहे. त्याचा अर्थ इतकाच, की आपण कधी चुकत नसतो. ही समजूतच आपली सर्वात मोठी चुक असते. सर्व समस्या तिथूनच सुरू होत असतात. मग आपण आपल्या आयुष्यातल्या समस्यांकडे त्याच नजरेने पाहू लागतो. ज्या गोष्टी चुकल्याने आपल्याला त्रास होत असतो, त्यावर उपाय शोधण्यापेक्षा आपणच त्याचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फ़ोडून समाधानी होतो. पण ते समाधान फ़सवे असते. कारण त्यातून समस्या सुटत नसते, की आपला त्रास संपत नसतो. उलट ती समस्या सोडवण्याची इच्छाच आपण गमावून बसत असतो. मग अशा समस्येचे निदान करायला वा त्यावरचा उपाय शोधायला आपण इतरांकडे आशाळभूतपणे बघू लागतो. त्यात त्या दुसर्‍याला धंदा दिसला, तर तो आपल्या या गरजेचे वा लाचारीचेच दुकान थाटत असतो. या सर्वामागे एकच कारण असते, आपण चुकतच नाही, ही आपली ठाम समजूत सर्वात मोठी चुक असते. तिथे अहंकार बाजूला ठेवून आत्मपरिक्षण करण्याची गरज असते.

   एक उदाहरण देतो. मला एका तरूण मुलाचा फ़ोन आला. तो उलटतपासणी नियमित वाचणारा आहे. त्याला वाटते मी खुप परखड सडेतोड लिहितो. म्हणून त्यातून लोकांना न्याय मिळू शकेल, मिळत असावा. मग मी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येवर लिहिले पाहिजे. माझ्या सडेतोड लिखाणाने कांदा उत्पादकांना न्याय नक्की मिळेल, असा त्याला विश्वास वाटत होता. हे सर्व ऐकायला बरे वाटणारे होते. पण ते अजिबात सत्य नव्हते. कारण मी वर्षभर लिहितो आहे, म्हणुन कुठल्या समस्या प्रश्नाचे निराकरण झाले, असा माझा तरी अनुभव नाही. मग ऊस वा कांदा उत्पादकांना मी लेखणीने न्याय मिळवून देऊ शकतो, यावर मी विश्वास कसा ठेवायचा? पण त्या मुलाची तशी गाढ श्रद्धा होती. मी त्याला खुप समजावले. पण तो हट्ट सोडत नव्हता. लेखनाने वा प्रसिद्धीने समस्या सुटत नसतात वा न्याय मिळत नसतो. त्यातून जी लोकजागृती होते, त्याच्या धाकाने सत्ता जागी झाली, तर न्यायासाठी हालचाली होऊ शकतात. पुर्वी काही प्रमाणात असे होत असे. मग त्याला माझा अनुभव सांगितला.

   १९७६ नंतर शरद जोशी यांच्या पुढाकाराने शेतकरी संघटना अस्तित्वात आली, तीच मुळात कांदा उत्पादकांच्या आंदोलनातून. त्यावेळी मी त्याच विषयावर लेख लिहिला होता. ’कांदा का कावला?’ असे त्याचे शिर्षक मला अजून आठवते. माझे लिखाण शेतकर्‍याला न्याय देऊ शकत असते, तर आज पुन्हा तो कांदा उत्पादक असा अन्यायग्रस्त कशाला राहिला असता? तेव्हा कांदा उत्पादकाला न्याय मिळाला. कारण तेव्हा त्याने संघटित होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. शेतकरी संघटना त्यातून उदयास आली. जेव्हा ती मरगळली, तेव्हा पुन्हा कांदा उत्पादक शेतकर्‍याचे हाल सुरू झाले. आज तीसपस्तीस वर्षांनी रडगाणे तसेच चालू आहे. तेव्हाही उत्पादन किंमतीच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही, हीच तक्रार होती. आज तीच तक्रार तशीच चालू आहे. तेव्हा कदाचीत त्या फ़ोन करणार्‍या मुलाचा पिता तेव्हा याच्या इतका तरूण असेल. मुद्दा इतकाच, की कठोर शब्दात लिखाण केले, म्हणुन न्याय मिळत नसतो; तर लोकशक्तीच न्याय मिळवून देत असते. पण आंदोलन हे एकावेळच्या उपायावर थांबता कामा नये, तर त्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढला गेला पाहिजे. कोणाच्या आंदोलनाने वा लिखाणातुन आपल्याला न्याय मिळेल या समजूतीमधून लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मग ते शेतकरी संघटनेचे आंदोलन असो किंवा अण्णा हजारे, स्वामी रामदेवांचे आंदोलन असो. त्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्यावर सामुहिक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होत असते. सहानुभूती हे न्यायाचे सुत्र झाले पाहिजे.

   अन्याय दुर करणे हे आपले उद्दीष्ट असले पाहिजे. मग तो अन्याय कोणावर झाला हे महत्वाचे नाही, अन्याय करणारा एका बाजूला व अन्याय सोसणारा दुसर्‍या बाजूला, अशी समाजाची विभागणी झाली पाहिजे. मग लक्षात येईल, की अन्यायग्रस्तांची संख्या प्रचंड आहे, तर अन्याय करणार्‍यांची संख्या नगण्य आहे. ही नुसती संख्या बघितली तरी अन्याय करणार्‍यांचे पाय चळचळा कापू लागतील. त्यांच्याकडे न्यायाची भिक मागावी लागणार नाही. तेच गयावया करीत तुमच्या पायाशी न्यायासह लोळण घेतील. पण तसे कधीच होत नाही. कारण सगळे अन्यायग्रस्त एकत्र येत नाहीत. कधी शाळेच्या देणगीने त्रस्त झालेले लढत असतात, तर कधी कांदा उत्पादक लढत असतात. कधी घरासाठी गिरणी कामगार लढत असतात, तर कधी ऊस उत्पादक, दुध उत्पादक लढत असतात. जेव्हा एका समाज घटकाचा लढा प्राणपणाने चालू असतो, तेव्हा वेगवेगळ्य़ा कारणाने अन्यायग्रस्त असलेले इतर समाजघटक, त्याकडे त्रयस्थ, तटस्थ म्हणून बघत असतात. थोडक्यात इतर अन्यायग्रस्त, त्या लढणार्‍या एका समाजगटाला एकाकी शत्रूच्या जबड्यात सोडुन देत असतात. तेव्हा प्रत्यक्षात असे इतर अन्यायग्रस्त त्या मुठभर अन्याय करणार्‍यांचे हातच बळकट करत असतात. तिथे त्या एका अन्यायग्रस्ताची शिकार होऊन जाते. मग पुढे कधी दुसरा अन्यायग्रस्त समाजगट त्याच अवस्थेत शिकार्‍याचे सावज होत असतो.

   गेले पाच सहा दिवस दिल्लीत जो प्रकार घडला, त्याने हे शिकारीच हादरून गेले आहेत. त्यात सरकार व सत्ताधार्‍यांसह सर्व राजकारण्याचा समावेश होतो. पण तेवढाच तो बदमाश माध्यमे व वाहिन्यांचाही होतो. म्हणूनच मग त्या लोकक्षोभाला मुठभर मध्यमवर्ग किंवा सुखवस्तूंचा उन्माद म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामागचा हेतू सामान्य माणसाने समजून घेतला पाहिजे. सर्व समाजघटक रस्त्यावर आले मग सिंहासन डोलू लागत असते. ते डळमळणारे सिंहासन संभाळण्याची जबाबदारी नेहमी स्वत:ला बुद्धीमंत समजणारा वर्ग उचलत असतो, जो खर्‍या अर्थाने मध्यमवर्ग असतो. ज्याला सर्व सुखसोयी मिळालेल्या असतात आणि सत्ताधारी त्यांची मर्जी संभाळत बाकीच्यांची मस्त शिकार करत असतात. दिल्लीच्या रस्त्यांवर जी गर्दी उसळली आहे, त्यात गरीबाघरची मुले नाहीत, तळागाळातली तरूण मुले नाहीत; ही शुद्ध फ़सवणूक आहे. नेहमी तुम्ही बघाल तर दोनपाच हजार लोकांमध्ये कुठे एखादे गरीबाचे मूल वा महिला असेल तेवढेच मुद्दाम टिपून दाखवले जाते. एखादी बुरखेधारी मुस्लिम महिला किंवा विशिष्ट टोपी धारण केलेला मुस्लिम दाखवून सर्वच समाजघटक सहभागी असल्याचा देखावा मस्त निर्माण केला जातो. पण आता दिल्लीच्या आंदोलनाने सत्ता डगमगू लागल्यावर माध्यमांची लबाडी सुरू झाली आहे. कारण त्याच राजकारण्यांचे प्रचंड भांडवल अशा माध्यमांमध्ये गुंतलेले असते. त्यांच्याच इशार्‍यावर माध्यमे नाचत असतात. सामान्य लोकाचे लढे प्रक्षोभक होऊ नयेत, म्हणून त्यांच्या वतीने आपण लढत आहोत; असा देखावा माध्यमे निर्माण करीत असतात. पण जेव्हा त्यातून खरेच लढे उभे रहातात, तेव्हा त्यांना सुरुंग लावण्याचे कामही माध्यमांनाच पार पाडावे लागत असते. सध्या माध्यमांतील बातम्यांचा सुर बघितला तर त्याचीच साक्ष मिळेल. तरुणांचे आंदोलन राजकीय पक्ष व संघटनांनी काबीज केल्याची भाषा त्यातूनच आलेली आहे. कारण ही माध्यमे व त्यांचे मालक हे सत्ताअधारी शिकार्‍यांचेच भागिदार व साथीदार आहेत व असतात.

   माध्यमांमुळे न्याय मिळत नाही की लढे यशस्वी होत नाहीत. त्यातून थोडीफ़ार प्रेरणा मिळू शकते. पण खरा न्याय लोकांना रस्त्यावर उतरूनच मिळवावा लागत असतो. मात्र जेव्हा खरोखरच लोक न्यायासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा या माध्यमांची भाषा व भूमिका का बदलते? तर ते शिकार्‍याचेच साथीदार असतात आणि शिकारीतच त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. अन्यायातच त्यांचे स्वार्थ सामावलेले असतात. बुद्धीमंत असा का वागतो? समाजातील असंतोषाला पहिली आग लावणारा किंवा हवा देणारा हाच वर्ग; खरे लढे हाणून पाडायला नेहमी पुढे आल्याचे इतिहासातही आढळून येते. त्याचे कारण त्याचे स्वार्थ अन्याय्य प्रणालीमध्ये सामावलेले असतात. म्हणूनच जेव्हा अण्णांचे नुसते उपोषण चालू होते, तेव्हा याच माध्यमांनी अण्णांना दैवत बनवण्याचा पवित्रा घेतला होता. पण जेव्हा अण्णांच्या सोबत जनता रस्त्यावर उतरू लागली, तेव्हा माध्यमांची भूमिका बदलली होती. आधी अण्णांवर संघाशी संबंधित म्हणून आक्षेप घेण्यात आले, त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता सिद्धच झालेले आहे. कारण केजरिवाल संघासह भाजपावरही आरोप करीत असतात. आता ताज्या आंदोलनात तेच केजरिवाल रस्त्यावर आले; मग त्यांनी आंदोलनाचे राजकारण केले, असाही आरोप माध्यामांनी चालविला आहे. मुद्दा न्यायाचा असेल तर त्यात कोण येतो त्याच्याशी संबंध काय? बुद्धीमंत असे बुद्धीभेद का करतात? आंदोलन व न्यायाच्या लढ्याशी दगाफ़टका का करतात? ( क्रमश:)
भाग   ( ३७ )    २६/११/१२

सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

तुम्हीच सांगा; अडाणी कोण? शहाणा कोण?



    मी कधीकधी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण तालूक्यात महिमानगड नावाच्या खेड्यात विश्रांतीसाठी जाऊन मुक्काम करतो. तिथे शेजारी वास्तव्य करणार्‍या एका अशिक्षित म्हातारीला माझे नाव वर्तमानपत्रात छापून येते आणि मी लेखक वगैरे असल्याचे अकारण कौतुक आहे. तिने एकदा सहज प्रश्न विचारला, ‘मला सांगा भाऊ, शहाण्यात आणि अडाण्यात कितीसा फ़रक असतो?’ मी मनोमन हसलो आणि म्हणालो; तसा फ़ारसा नसतो आजी. चार पुस्तके शिकलेला आणि लिहिता वाचता आले; म्हणून लोक एखाद्याला शहाणा म्हणतात, इतकेच. पण मित्रांनो खरे सांगायचे, तर मी निरूत्तर झालो होतो तिच्या प्रश्नावर. मग दोन दिवसांनी तिने खोचकपणे पुन्हा विचारले, अजून उत्तर सापडले नाही का? मी निमूटपणे शरणागती पत्करून म्हटले आजी, तुम्हाला काय वाटते? तिने सहजगत्या मला शहाण्या व अडाण्याची व्याख्या सांगितली. त्या दिवसापासून आपण शहाणे असू नये असेच मला वाटू लागले. तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:

   ‘जो नागडा असतो आणि आपण नागडे आहोत, याची त्याला लाज वाटते, म्हणून जो अब्रू झाकायची धडपड करतो ना? तोंड लपवू बघतो ना? तो अडाणी असतो. मात्र जो स्वत: नागडा असून दुसर्‍याच्या नागडेपणाकडे बोट दाखवून, त्याला अब्रू झाकण्याचे सल्ले देतो, त्याची कारणे सांगतो; पण स्वत:च नागडे असल्याचा त्याला थांगपत्ताही लागत नाही, तो शहाणा असतो.’

   ही व्याख्या इथे का सांगायची वेळ आली माझ्यावर, तर गेला आठ्वडाभर जी दिल्लीतल्या बलात्कार विषयावर चर्चा व गोंधळ चालू आहे, त्यात अनेक विद्वानांनी तोडलेले अकलेचे तारे, हे त्याचे कारण आहे. वाहिन्यांपासून वृत्तपत्रातले अनेक शहाणे कायद्याच्या तरतूदी बदलण्यापासून शिक्षेच्या कठोरतेपर्यंत सर्वच गोष्टींवर तावातावाने बोलत आहेत. त्यात पुन्हा अनेकजण निदर्शनात भाग घेणार्‍या मध्यमवर्गिय मुलीमुलांवर ताशेरे झाडत आहेत. त्या शहाण्यांच्या मते गावात वा गरीब वस्तीत बलात्कार होतात, तेव्हा ही सुखवस्तू मंडळी कुठे असतात? गुजरातच्या दंगलीत शेकडो लोक मारले गेले; तेव्हा यातले किती रस्त्यावर आले होते? त्यापैकी कोणी कधी मोदींना मुस्लिम हत्याकांडाचा जाब विचारला होता काय? असले प्रश्न ज्या शहाण्यांना पडतात, त्यांना आमची ती खेड्यातली आजी काय म्हणते; ते सांगणे मला खुप आवश्यक वाटले, म्हणुन तो अनुभव सांगितला. अकलेचे दिवाळे वाजले मग माणसे कसे बोलू लागतात, त्याचा हा नमूना आहे. दिल्लीत बलात्कार झाल्याच्या त्या घटनेने लोकांची झो्प उडाली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. मग त्यांच्या आंदोलनात कोण को्ण सहभागी झाले; त्याचीही झाडाझडती सुरू आहे. पण लोक इतके संतापून रस्त्यावर का उतरलेत; त्याचा शोध घेण्याची बुद्धी नाही, की इच्छा नाही. त्यात कोण उतरला किंवा कशासाठी आला; हा मुद्दा कुठून येतो? कुठलाही माणुस कुठल्या आंदोलनात सहभागी होतो, त्यानुसार त्या आंदोलनाचे मूल्यमापन करायचे असते, की त्या आंदोलनाने हाती घेतलेल्या प्रश्नावरून त्याने मूल्यमापन करायचे असते?

   उद्या मुंबईत वा पुण्यात रिक्षावाल्यांनी मिटरवाढीसाठी आंदोलन केले; मग त्यांना मोदींच्या दंगलीविषयी प्रश्न विचारणे हा निव्वळ मुर्खपणा नसतो का? आज जी मुले दिल्लीच्या रस्त्यावर घोषणा देत धरणी देऊन बसली आहेत, त्यांचे वय पंधरापासून पंचवीस वर्षाचे असेल. त्यांचे वय २००२ साली पाच ते पंधरा वर्षाचे असेल. तेव्हा गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा न्याय मागायला त्यांनी काय पाळण्यातून वा शाळेला दांडी मारून रस्त्यावर यायला हवे होते? गुजरात दंगलीचा संबंध काय दिल्लीतल्या आंदोलनाशी? पण असे प्रश्न विचारायचे आणि लोकांच्या मनात गोंधळ उडवून द्यायचा असतो. पण जे प्रश्न त्या आंदोलक वा निदर्शकांना विचारले जातात, तेच विचारणार्‍यांनी त्यासाठी स्वत: काय केले; हा प्रश्न कोणी विचारायचा?  यांनी वाहिन्या वा वृत्तपत्रातली नोकरी सोडून किंवा विद्यापिठातली प्राध्यापकी सोडून; कधी गुजरातच्या दंगलग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले आहे काय? मग दुसर्‍यांना असले सल्ले देणे म्हणजे नागड्याने लंगोटी नेसलेल्यांना जरा चांगले कपडे घालून येण्याचा सल्ला देणेच नाही काय? असे प्रश्न एकतर बुद्दू विचारू शकतो किंवा बदमाशच विचारू शकतो. ज्या लोकांना आंदोलन करायचे असते, ते त्यांच्या हेतूने आंदोलन करीत असतात. त्यांनी कोणत्या विषयावर आंदोलन करावे; असे दुसर्‍या कोणाला ठरवण्याचा अधिकार नसतो. तसा असेलच तर मग अयोध्येत मंदिर बांधण्याच्या आंदोलनात मुलायम मायावती का नाहीत; असा प्रश्न का विचारला जात नाही? संघ परिवार दंगलग्रस्त मुस्लिमांच्या न्यायासाठी काय करतो; असे विचारणार्‍यांची म्हणूनच कींव येते. कारण त्यासाठी संघाची स्थापना झालेली नाही किंवा तो त्या संघटनेचा हेतू नाही. जसा मुलायम वा कम्युनिस्ट अयोध्या आंदोलनात नसतात, तसेच संघवाले मुस्लिमांच्या न्यायाच्या भानगडीत नसणार. पण असे प्रश्न विचारले जातात, कारण लोकांची त्यातून दिशाभूल करायची असते.

   आज दिल्लीत लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते सामुहिक बलात्काराच्या एका भीषण घटनेमुळे आणि त्यात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी व्हायला कुठलीही अडचण असण्याचे काही कारण नाही. जे आंदोलन करतात, त्यात असे प्रश्न विचारणारे कधी सहभागी होतात काय? म्हणजे आम्ही सहभाग देणार नाही, आम्ही इथे बसून आंदोलनाची टवाळी करणार आणि पुन्हा आंदोलनात कोणाला घ्यायचे; त्याची परवनगी याच शहाण्यांकडून घ्यायची. कमाल आहे ना? यालाच नागडेपणा म्हणतात. हल्ली माध्यमांची एक बदमाशी चालू झालेली आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. बलात्काराच्या प्रकरणात निष्क्रीय ठरलेल्या सरकारचा बचाव करता येता नाही, तर आंदोलकांवर शंका काढायच्या. त्यात रामदेव बाबा का आले? आंदोलन केजरिवाल कंपूने हायजॅक केले. ही भाषा शुद्ध बनवेगिरी आहे. कारण आंदोलनात कोण आले, त्यापेक्षा सरकारने त्या आंदोलनाला प्रतिसाद कसा दिला; हा गंभीर प्रश्न आहे. इतकी भीषण घटना दिल्लीत व देशाच्या राजधानीत भर वर्दळीच्या रस्त्यावर घडली आणि त्यावर लोकांमध्ये प्रक्षोभ माजला असतानाही; सरकार बिळात दडी मारून बसले आहे, ही मुळात गंभीर बाब आहे. जर सरकार लोकांच्या प्रक्षोभाला दाद देत नसेल, तर लोकही पोरकेपणाने कुणाचा सहारा मिळतो काय ते बघणार ना? मग त्यांच्या मदतीला व सहकार्याला विरोधी पक्ष वा अन्य संघटना आल्या, तर दोष कुणाचा? विरोधी पक्ष वा अन्य संघटनांचे दार वाजवायला लोक गेलेले नव्हते. मुळात लोक सरकारचेच दार ठोठावत येऊन उभे होते. त्यांना सरकारने कसा प्रतिसाद दिला? त्या लोकांच्या अंगावर पोलिस घातले गेले, त्यांच्यावर अश्रूधूर सोडण्यात आला. लाठीमार करून लोकांना पिटाळून लावण्यात आले. त्याबद्दल माध्यमांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. ते राहिले बाजूला आणि हेच माध्यमातील शहाणे आंदोलकांना दुसर्‍यांची मदत कशाला घेतली; म्हणून जाब विचारतात. याला आपल्या सामान्य मराठी भाषेत काय म्हणतात? आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना.

   ही आजच्या आपल्या देशातील शहाण्यांची शोकांतिका आहे. चक्क चौकात नागडे उभे राहून हे शहाणे अब्रूदार सामान्य जनतेला म्हणजे आम आदमीलाच लंगोटी कशाला नेसलास; असा जाब विचारता आहेत. यालाच बेशरमपणा म्हणतात. दुसरीकडे मग या आंदोलनाला नेताच नाही, असाही दावा केला जातो. नेता असेलच कसा? जेव्हा जेव्हा लोकांनी कुणा नेत्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, तर त्याला बदनाम करून हा कशाला आणि तो कशाला; असे विचारणारे हेच शहाणे असतात ना? अण्णांच्या आंदोलनात त्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप करायचा. स्वामी रामदेवच्या आंदोलनात तेच आरोप, केजरिवालवर तोच आरोप. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत; त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. आता ताज्या आंदोलनात नेताच नाही, मग त्याला निर्नायकी म्हणायचे. म्हणजे यात एकच सिद्धांत ठरलेला दिसतो, सरकारविरोधात आंदोलन करू नका असे म्हणायचे नाही, पण तसे सुचवत रहायचे. कितीही अराजक असो, कितीही भ्रष्टाचार असो, त्या विरुद्ध आंदोलन करणे म्हणजे गुन्हा आहे, असेच लोकांच्या मनावर ठसवले जात आहे. याचाच दुसरा अर्थ जो काही अन्याय अत्याचार होत आहे, तो निमूटपणे सहन केला पाहिजे, असाच होतो. पण तो त्याच शब्दात सांगितला जात नाही. दाखवायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे, म्हणतात, तशी आज आपल्या माध्यमे व बुद्धीमंताची लाचार अवस्था झालेली आहे. अत्यंत बेशरमपणे गुन्हेगारी व सरकारी नाकर्तेपणाचे राजरोस समर्थन करण्यापर्यंत य शहाण्य़ांची मजल गेली आहे. त्यांच्यापेक्षा अडाणी अण्णा म्हणूनच लोकांना अधिक विश्वासार्ह वाटू लागले आहेत. त्यामुळेच नेता नसलेली जमावाची आंदोलने आकार घेऊ लागलेली आहेत.   (क्रमश:)
भाग   ( ३६ )    २५/११/१२

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

दिल्लीत रस्त्यावर आलेला जमाव काय सांगतोय?




   सध्या जे काही दिल्लीत चालू आहे, तेच नेहमी सर्वत्र होत असते. पण त्याच्याकडे बघण्याची ज्याची नजर जशी असते; तसे त्याला ते दिसत असते. लाखो लोक रस्त्यावर उतरून कायदा धाब्यावर बसवत आहेत. दिल्लीत बलात्कार झाला हे सत्य कोणी नाकारलेले नाही. त्याच्यातले आरोपी पकडले गेले आहेत, हे सुद्धा निखळ सत्य आहे. पण मग लोकांना काय हवे आहे? लोकांचा कायद्या्वर विश्वास उरलेला नाही. म्हणूनच सरकार वा पोलिसांच्या शब्दावर विसंबून लोक घरोघरी परतायला तयार नाहीत. हे असे प्रथमच घडते आहे असे नाही. मात्र त्याच्या वर्णनात तफ़ावत होत असते. कधी त्याला दंगल म्हटले जाते; कधी अराजक ठरवले जाते. आज त्याला जनतेचा प्रक्षोभ असे नाव देण्यात आले आहे. पण जमाव असा का वागतो, त्याचे स्पष्टीकरण वा खुलासे देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाहीत. सोपी उत्तरे शोधली जातात. एका बलात्काराने लोक इतके चिडण्याचे कारण नाही. दिल्लीत आता बलात्कार ही नित्याची बाब झाली आहे. कधी तो घरात घुसून एखाद्या मुलीवर, महिलेवर होतो, तर कधी तिचे अपहरण करून केला जातो. कधी सामुहिक बलात्कार होतो, तर कधी धावत्या गाडीत होतो. मग या एका बलात्काराने लोक इतके का चिडले आहेत? तर त्याचे कारण हा बलात्कार नसून ते नित्याचे दुखणे वा रोग झाल्याने भयभीत होऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत. कारण इतके भयावह रुप त्या गुन्ह्याने धारण केले; असतानाही सरकार शांत झोपा काढते आहे आणि म्हणूनच त्या सरकारला जागवले पाहिजे असे लोकांना वाटू लागले असावे. अर्थात तिथे धुमकुळ करणार्‍या लोकांनी अनेक मागण्या केल्या आहेत. कोणी कठोर शिक्षा, फ़ाशीची शिक्षा तर कोणी लिंग कापून आरोपींना नंपुसक बनवण्याची शिक्षा व्हावी; इथपर्यंत वाटेल त्या मागण्या केलेल्या आहेत. त्यातला तर्क किंवा योग्यायोग्ग्यता शोधण्याची ही वेळ नाही. कारण जे लोक चिडून प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर आले आहेत, ते विचारपुर्वक कुठली मागणी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. मग त्यांनी केलेल्या मागण्यांचा तर्कशुद्ध विचार करणार्‍यांना शहाणे म्हणता येईल काय? ही आपल्या देशातल्या बुद्धीवादाची शोकांतिका आहे. त्यांना पुस्तकातल्या व्याख्येपलिकडे जाऊन वास्तवाच्या जगात घडणार्‍या घटनांचे विश्लेषण करताच येत नाही. त्यातून मग अधिकच समस्या निर्माण होत असतात.

   आज लोक दिल्लीतल्या एका बलात्काराने संतप्त झालेले नाहीत, तर गुन्हा करणार्‍यांच्या हिंमतीने भयभीत होऊन रस्त्यावर आलेले आहेत. सरकारच्या निष्क्रियतेला घाबरून रस्त्यावर आले आहेत. धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार होऊ शकतो, याचा अर्थ पकडले जाण्याचे भय गुन्हेगारांना उरलेले नाही. पकडले गेल्यास कुठली कठोर शिक्षा होण्याचे भय नाही. आणि असेच असेल तर घराबाहेर पडणेही धोक्याचे झालेले आहे व कायद्याचे राज्य उरले नाही, अशी लोकांची धारणा झालेली असते. मग असे लोक घाबरून दंगल माजवायला रस्त्यावर येत नाहीत. ते जमावाने सामोरे येऊन सिद्ध करत असतात, की कायद्याची भिती नाही तर गुन्हेगारांनी जमावाची भिती बाळगावी. कारण जमावाकडे दयामाया नसते. तो जमाव कायद्याच्या तरतुदीचा विचार करत नाही, की संशयिताच्या नागरी अधिकाराची भिडभाड ठेवत नाही. त्याला ज्याच्यावर संशय येतो, त्याला थेट दोषी ठरवुन तिथल्या तिथे शिक्षा देण्याची क्षमता जमावामध्ये असते, हेच दाखवून द्यायचे असते. आणि जेव्हा असा जमाव एकत्र येतो, किंवा त्याच उद्देशाने घाराबाहेर पडतो; तेव्हा त्याला रोखण्याची ताकद पोलिस वा सरकारमध्ये नसते, हेच गुन्हेगारांच्या मनावर बिंबवण्या्चा जमावाचा हेतू असतो. मग अशा जमावाची भूमिका व आकांक्षा सरकार व सत्ताधारी असतात, त्यांनी समजून घेतली तरच वातावरण निवळत असते. आज दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांचा कायदा पुस्तकात असतो एवढेच माहिती आहे. त्यामुळेच ते पुस्तकात कायदा आहे, त्याप्रमाणे राबवू पहात आहेत आणि परिस्थिती आणखी चिघळत गेली आहे. ज्याप्रकारे या मुलीवर बलात्कार झाला, त्यातून लोकांचा धीर सुटला आहे, त्याचबरोबर सातत्याने होणार्‍या अशा गुन्ह्याने लोकांचा शासनावरचाही विश्वास उडालेला आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.

   दिल्लीत शनिवारी हा धुमाकुळ चालू असताना अलिकडे झारखंड राज्यात एका ठिकाणी मुलींची छेड काढणार्‍या टोळक्याला जमावाने घेरले आणि त्यांचा तिथल्या तिथे न्यायनिवाडा करून टाकला. त्यांना जमावाने ठारच मारून टाकले. दिल्लीत जगाचे लक्ष वेधलेले आहे. पण दिल्लीतला जमाव यापुढे काय करणार आहे आणि अशा प्रकरणी कसा न्याय होणार आहे; त्याची ही चाहूल आहे. काही वर्षापुर्वी अशीच घटना महाराष्ट्रात नागपूरमध्ये घडली होती. अक्कू यादव नावाचा गुंड त्या शहरातल्या कस्तुरबा झोपडपट्टीमध्ये धुमाकुळ घालत होता. त्याने शेकडो गुन्हे करूनही कायदा त्याला रोखू शकत नव्हता. नुसते बलात्काराचे त्याच्यावर अठरा वीस गुन्हे नोंदलेले होते. पण प्रत्येकवेळी जामीनावर सुटणार्‍या अक्कूची हिंमत वाढत गेली होती. शेवटी लोकांनी कायदा हाती घेऊन त्याचा ‘निकाल’ लावण्यापर्यंत त्याने डझनावारी बलात्कार करून झाले. पण त्याच्यावरील पहिल्या खटल्याचीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे मग तिथल्या रहिवाश्यांनी प्रकरण आपल्या हाती घेतले. एका प्रकरणात त्याला अटक झाली होती व कोर्टात तारीख होती, म्हणून अक्कूला पोलिस घेऊन आले होते. तिथे रहिवाश्यांचा जमाव दबा धरून बसला होता. तारीख मिळालेला अक्कू कोर्टाच्या बाहेर पडताच जमावाने त्याच्यावर झडप घातली आणि अक्षरश: त्याची खांडोळी करून टाकली. दोनतीनशे लोकांच्या जमावापुढे अक्कूचा ताबा असलेल्या पोलिसांचे काही चालले नाही. पण इतक्या मोठ्या जमावाने कायदा हाती घेऊन निकाल लावल्यावर घडलेला चमत्कार बघा. त्या कस्तुरबा वस्तीमध्ये बलात्काराचा नंतर गुन्हा होऊ शकला नाही. जे काम कायदा राबवणार्‍या पोलिसांना शक्य झाले नाही, ते जमावाने करून दाखवले.

   मग त्याला लोकांनी कायदा हाती घेतला असे म्हणायचे का? कायदा कोणाच्या हाती असतो? ज्यांच्या हाती असतो, त्यांनी त्याची अंमलबजावणी प्रसंग येतो तेव्हा केलीच नाही, तर तो कायदा काय चाटायचा आहे? त्याचा काही हेतू आहे व असतो. कायदा हा लोकांना सुरक्षेची व न्यायाची हमी देण्यासाठी असतो, त्याच दृष्टीने तो राबवला जावा, अशी अपेक्षा असते. त्यात कुठे त्रुटी निर्माण झाली; मग कायदा निरूपयोगी होऊन जातो. ज्याच्यावर कायदा राबवण्य़ाची जबाबदारी सोपवलेली असते, त्यांनी योग्यरित्या त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा असते. जसे आपण मूल कुणाकडे संभाळण्यासाठी देतो, तेव्हा त्या मुलावर त्याचा अधिकार नसतो, जे त्याचे जन्मदाते आहेत, त्यांचाच मुलावर अधिकार असतो. ज्याला जबाबदारी दिली त्याला ती पाळता येत नसेल; तर आपण मुलाचा ताबा त्याच्याकडून काढून घेतो, त्यापेक्षा लोकांनी कायदा हाती घेणे वेगळे नसते. लोकशाहीमध्ये लोकांचे राज्य असते आणि लोकांचाच कायदा असतो. त्याची जबाबदारी निवडून दिलेल्या लोकांवर, म्हणजे लोकप्रतिनिधींवर सोपवलेली असते. त्यांना सत्ताधारी म्हणतात, त्यांच्याकडून ती जबाबदारी पार पाडली जात नसेल, तर कायदा राखण्याची व राबवण्याची जबाबदारी अखेर कोणावर येणार? जे लोकशाहीतील नागरिक असतात, त्यांनाच ती जबाबदारी पार पाडणे भाग असते. ती जबाबदारी कायदा हाती घेऊनच पार पाडणे शक्य आहे व असते. नागपूरच्या कस्तुरबा नगरातील लोकांनी कायदा हाती घेऊन अक्कू यादवला मृत्यूदंड फ़र्मावला, त्याचे तेच कारण होते. त्यांनी नुसता कायदा हाती घेतला नाही तर कायद्याची प्रतिष्ठा राखली होती. कायद्याची प्रतिष्ठा पुनर्स्थापित केली होती.

   आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या लाखो लोकांना कायदा हाती घेण्याची सुरसुरी आलेली नाही. त्यांनी ज्यांच्या हाती कायदा सोपवला आहे, त्यांच्याकडून कयद्याचे योग्य संगोपन होत नसल्याच्या भावनेने लोक अस्वस्थ झालेले आहेत आणि कायदा हाती घ्यायला बाहेर पडले आहेत. आणि बघा किती कायद्याची बुज राखली गेली आहे. चार दिवस लोक रस्त्यावर उतरले आहेत तर दिल्लीत कुठे बलात्कार वा मोठा काही दखलपात्र गुन्हा घडल्याची बातमी कानावर आलेली नाही. कारण ‘कायद्याचा अंमल’ करायला साक्षात जनताच रस्त्यावर आल्याने गुन्हेगारांना धडकी भरली आहे. जनतेच्या कायद्याचे राज्य असते, तेव्हा गुन्हेगारांना तारखा, जामीन, युक्तीवाद असे संरक्षण मिळत नाही, वकील मिळत नाही. थेट गुन्हा सांगून शिक्षा दिली जाते. कायदा जनतेच्या हाती म्हणजे गुन्हेगारांना धडकी. दिल्लीतल्या धुमाकुळाने अनेक संदेश अनेकांना दिलेले आहेत. तेही समजून घेण्याची गरज आहे.  ( क्रमश:)
भाग   ( ३५ )    २४/११/१२

शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

असा एक पारशी माणूस शिवसैनिक बनत गेला




   १९६० सालात मी फ़ारतर बारा वर्षाचा होतो. आम्ही त्या वयात वृत्तपत्र वाचायला लागलो होतो. मराठी भाषिकांना त्यांचे राज्य मिळाल्याचा आनंद होता आणि त्यावर वडिलधारी माणसे खुश आहेत; म्हणजे खरेच काही मोठे महान घडले आहे, असे आम्हाला आपोआपच वाटत होते. आज मुले जितक्या चौकसपणे वाटेल ते प्रश्न व शंका पालकांना विचारू शकतात, तेवढे विचारस्वातंत्र्य तेव्हाच्या मुलांना उलपब्ध नव्हते. त्यामुळे वडिलधार्‍यांच्या हातातून वर्तमानपत्र मोकळे झाल्यावर त्यात डोकावण्याची पर्वणी असे. त्यात जे काही हाती लागायचे तेच खुप होते. सगळ्यांच्या घरात वृत्तपत्रे येत नसत, कारण तो एक वेगळा खर्च मानला जायचा. सहाजिकच ज्यांच्याकडे वर्तमानपत्र खरेदी करायची श्रीमंती होती, तेही आपापसात वाटून वृत्तपत्रे घेत असत. म्हणजे आमच्या घरी ‘नवशक्ती’ यायचा तर दोन खोल्या पलिकडे महाजनांच्या घरी ‘मराठा’ आणि पलिकडल्या बाजूच्या निमकरांकडे ‘लोकसत्ता’ असायचा. मग त्यांच्या घरातले वाचून संपले; मग दुपारच्या सुमारास ही वर्तमानपत्रे शेजारच्या घरात जायची. थोडक्यात चाळीमध्ये कुणाच्याही घरी येणारे वर्तमानपत्र हे सामुहिक वाचनालयासारखे फ़िरत असे. मात्र असे असले तरी ते ज्या घरातले असे; तिथे संध्याकाळची दिवेलागण होईपर्यंत परत यायचे. कारण तेव्हा वर्तमानपत्राच्या रद्दीला सुद्धा किंमत होती. ती रद्दी महिना दोन महिन्यात विकल्यानी आठवड्याच्या रेशनचे पैसे निघत असत. थोडक्यात घरातली रद्दी देखिल उत्पन्नाचे साधन होती. अशा काळात आम्हा मुलांना वर्तमानपत्र शेजारून आणायचे; तर त्यात डोकावून घेण्याचीस संधी साधावी लागत असे. किंवा सगळ्यांची वाचून चोथा म्हणून बाजूला फ़ेकलेल्या वर्तमानपत्रावर ताव मारावा लागत असे, अर्थात त्यातले किती कळत असे हा भाग वेगळा. पण त्याही काळात एक जगबुडी होणार असल्याची बातमी आम्हा मुलांमध्ये कुजबुजीचा विषय झालेली आठवते. मग आम्ही तिसर्‍या मजल्यावरचे पहिल्या मजल्यावरच्यांना तुम्ही कसे वाचणार, की बुडणार असा भाबडा प्रश्नही विचारायचो. त्यात सोळा वर्षाच्या बाब्याने सगळ्यांनी गच्चीत जाऊन बसायचे आहे, पाणी ओसरल्यावर परत यायचे असे सांगितलेले आठवते. तेव्हा तो बाब्या पवार आम्हाला केवढा महान ज्ञानी पुरुष वाटला होता.

   असा तो काळ होता, जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मग त्या बातम्यांमधून वा वडिलधार्‍यांच्या बोलण्यातून समिती फ़ुटल्याचे कानावर यायचे. पण समिती फ़ुटली म्हणजे काय; त्याचा थांगपत्ता नव्हता. माझी आई तेव्हा अशा बारीकसारीक राजकीय कार्यक्रमात भाग घ्यायची. वडिलांना त्यात फ़ारसा रस नव्हता. माझ्या आईचा प्रजा समाजवादी पक्षाकडे ओढा होता. त्यामुळे मग माझ्यापेक्षा मोठी बहीण काहीकाळ सानेगुरूजी कथामाला किंवा राष्ट्र सेवा दल अशा संस्था, संघटनांमध्ये जायची. पण सुदैवाने मी असा कुठे जबरदस्तीने घातला वा पाठवला गेलो नाही. मात्र प्रजा समाजवादी म्हणजे प्रसपच्या ज्या लालबाग वॉर्डाच्या बैठका व्हायच्या; त्याला मी त्या कोवळ्या वयात हजेरी लावायचो. तिथे काय तात्विक बोलले जाते, त्याचा मला कधी अर्थच कळला नाही. पण आपण अवघ्या जगाच्या संबंधात चाललेल्या कुठल्या तरी महान प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत; याचा अभिमान मात्र वाटायचा. अशा बैठकींना त्या भागातले प्रसपचे पंधरावीस कार्यकर्ते आलेले असायचे. महिन्या दोन महिन्यातून अशी बैठक असायची. तिथे वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिका, विषय वा आंदोलनाच्या तयारीची चर्चा चालायची. पोस्टर्स येतील ते कुठे व कोणी लावायचे; असा काहीसा प्रकार चर्चेत असायचा. त्यात वराडकर गुरूजी म्हणून साठी पलिकडचे गृहस्थ असत आणि ते कायम डुलकी लागल्यासारखे शांत बसलेले असत. पण मध्येच एखाद्या मुद्द्यावर तावातावाने बोलू लागत. मात्र त्यांची झोपलेली मुद्रा अजिबात बदलत नसे. प्रसपच्या एका सभेचे आयोजन आमच्या सुदाम भुवन चाळीच्या गच्चीवर झाले होते. तिथे एसेम जोशी येणार म्हणून केवढी धावपळ पंधरा दिवस चालू होती. शेसव्वाशे लोकांची ती सभा झाली आणि एसेमनी आमच्या घरी चहा पोहे खाल्ल्याचे कौतुक माझे पालक कित्येक महिने जगाला अगत्याने सांगत होते. त्याची महत्ता पुढे चारपाच वर्षांनी कळली.

   त्यानंतर मात्र आमच्या घरी प्रसपच्या मान्यवरांची वर्दळ सुरू झाली. भाऊ पाध्ये यांची पत्नी शोषन्ना पाध्ये आणि डॉ. लिला अव्हारिस ( त्या १९६८ नंतर नगरसेविका झाल्या) यांचे नेहमी आमच्या घरी येणेजाणे होते. लिलाताई भारतमाता थिएटरसमोर असलेल्या मोरारजी मिलमध्ये लेबर ऑफ़िसर होत्या. त्या मिलमध्ये काम करणारे सातआठ लोक आमच्या चाळीत होते. त्यांना मग आमच्या आईविषयी आदर वाढला होता. मात्र ही मोजकी डोकी सोडली तर सामान्य लोकांमध्ये कुठे प्रसप नावाच्या पक्षाचा बोलबाला दिसत नसे. आमचा गिरणगाव म्हणजे विळाकणिस. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. त्या कोवळ्या वयात प्रसपच्या स्थानिक बैठकीला आईच्या सोबत जायचो. तेव्हा मला त्यातले काही कळत नव्हते. पण तरीही मी त्या नीरस बैठकीला जायला अत्यंत उत्सुक असायचो, त्याचे कारण त्या बैठकीला येणारा एक विक्षिप्त माणूस. भारतमाता जवळच्या हाजीकासम चाळीत तळमजल्याला एका नाट्यमंडळाची खोली होती. तिथे ह्या बैठका व्हायच्या. त्यात मला आवडणारी व्यक्ती होती दादी गोवाडीया. त्या बहूतांशी कोकणी, घाटी मराठी कष्टकर्‍यांच्या बैठकीत वेगळा असा एक माणूस होता, तो हा पारशी. तोही कोणी मोठा पैसेवाला श्रीमंत पारशी नव्हता. मोरारजी मिलच्या भिंतीला लागून असलेल्या एका चाळीतला तो रहिवासी. पण अत्यंत कट्टर समाजवादी कार्यकर्ता होता. तो ज्या मराठीत बोलायचा, त्यातून मुद्दा मांडला जाण्यापेक्षा विनोदच निर्माण होत असे. माझ्यासारख्या मुलासाठी त्या नीरस बैठकीत तो मोठाच विरंगुळा असायचा. जुन्या सिनेमात वा मराठी नाटकात पारशी पात्र विनोदासाठी घातलेले असे. इथे ते पात्र साक्षात माझ्या समोर असायचे.

   पारशी मंडळी अत्यंत प्रेमात वा रागाने बोलताना मस्त शिव्यांचा वापर करतात. दादी त्याला अपवाद नव्हते. तिथे हाजीकासम चाळीच्या त्या इवल्या खोलीतल्या बैठकीत; त्यांचे मुद्दे तावातावाने मांडताना त्यांना शिव्या आवरता येत नसत. आणि त्यात समोरच्याला त्यांचा मुद्दा पटला नाही किंवा त्यावर अकारण शंका घेतली जाते असे वाटले; मग दादी चिडायचे. तेव्हा शिव्यांची झकास उधळण व्हायची. शाला (साला), भडवा हे त्यांचे अत्यंत प्रिय शब्द होते. जो आवडता असेल त्याच्याविषयी विशेषण म्हणुन दादी ते शब्द सहजगत्या वापरायचे. त्या कोवळ्या वयातही त्यांनी अशा बैठकीत कम्युनिस्ट आणि विशेषत: कृष्णा देसाईच्या गुंडगिरीच्या विरोधात केलेल्या तक्रारी अजून आठवतात. त्यांचा एकच मुद्दा असायचा. जोपर्यंत कम्युनिस्टांच्या गुंडगिरीला प्रसप चोख उत्तर देणार नाही, तोपर्यंत पक्षाला त्या गिरणगावात पाय रोवून उभे रहाता येणार नाही. पण दादींचा तो मुद्दा तिथे बसलेल्या सानेगुरूजींच्या शिष्यांना पटत नसे. कथामाला किंवा सेवादलात संस्कार झालेल्यांना हाणामारी किंवा हिंसक मार्ग मान्य नसायचा. त्यामुळे कम्युनिस्ट दादगिरीला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा दादींनी वापरली; मग लगेच त्याबद्दल हरकतीचे मुद्दे उपस्थित व्हायचे. मी तसा सोबतच्या पोरांमुळे विळाकणिस म्हणजे कम्युनिस्ट समर्थक होतो. विळाकणिस म्हणजे कम्युनिस्ट पक्ष हे तेव्हा ठाऊक नव्हते हा भाग वेगळा. पण झुंज दिली पाहिजे, हा दादींचा मुद्दा मला पटायचा. पण माझी तिथली उपस्थिती, केवळ आईच्या सोबत आलेला इतकीच असायची. बोलायची मुभा नव्हती. पण असे झाले; मग दादी गोवाडिया खवळायचे आणि जी शिव्यांची बरसात व्हायची, ती पर्वणी असायची.

   महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, त्यानंतर मुंबई वा प्रामुख्याने ज्याला गिरणगाव किंवा कष्टकरी वस्त्यांची मुंबई होती, तिथे असे कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. म्हणजे त्यांच्याकडे हाणामारी करू शकणार्‍या भणंग तरुणांचे घोळके होते. आणि त्या तरुणांची हौस, मस्ती जिरवण्याचा अजेंडा त्यांच्याकडेच होता. प्रसप वा अन्य पक्ष त्या मस्तवाल पोरांना तत्वज्ञान शिकवून वैचारिक क्रांती करायला धडपडत होते. त्यांना प्रतिसाद कोण देणार? याचा अर्थ हाणामारीच हवी असा नाही. पण जेव्हा कम्युनिस्ट अन्य कोणाला पक्षाच्या सभा किंवा प्रचारही करायला गुंडगिरीने रोखत होते, तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने दोन हात करायला हवेत अशी दादी गोवाडीयांची भूमिका होती. पण त्यांचे कोणी त्यांच्याच पक्षात ऐकत नव्हता. अनेकदा पक्षाचा प्रचार करताना ज्या समाजवाद्यांना कम्युनिस्टांचा जबर मार खावा लागला; त्यात गोवाडियांचा समावेश होता. मला ऐकलेले आठवते, की एकदा तर प्रसपच्या सभेत दगडांचा मारा सोसणार्‍या गोवाडीयांना दिर्घकाळ इस्पितळात उपचारासाठी पडावे लागले होते. बोटचेपेपणा व शामळूपणा यामुळे समाजवाद्यांना कामगार वस्त्यांमध्ये आपला जम बसवता आला नाही. मग त्यांच्याप्रमाणेच कम्युनिस्ट विरोधात असलेल्या तरूणांसमोर अन्य पर्याय कुठला होता?   ( क्रमश:)  
भाग   ( ३४ )    २३/११/१२

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

तर शिवसेना उदयासच झाली नसती


   सांगायचा मुद्दा इतकाच, की शिवसेना ही परिस्थितीने निर्माण केली. त्यामागे काही योजना नव्हती, की कुठले व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात, तशी मांडलेली संकल्पना नव्हती. ‘मार्मिक’मध्ये नावांच्या याद्या छापल्या जायच्या असे आजकाल वारंवार वाचनात येते. दाक्षिणात्य किंवा गुजराती अशा अमराठी नावांच्या टेलिफ़ोन डिरेक्टरीमधली नावे क्रमाने छापली जायची आणि त्यावर ‘वाचा आणि थंड बसा’ असे शिर्षक असायचे. पुढे त्याला प्रतिसाद मिळाल्यावर ‘वाचा आणि उठा’ असे शिर्षक बदलण्यात आल्याचा हवाला दिला जातो. पण हे ठरवून झाले होते काय? ‘मार्मिक’ सुरू केल्यावर त्यातून, विस्कळीत होऊन गेलेल्या मराठी माणसाच्या मुंबईतील बेचैन असलेल्या तरूणांसाठी प्रबोधनकारांनी लेखन चालू ठेवले होते. त्यामुळे काही मंडळी प्रभावित झाली होती. त्यांनी मुंबईच्या अमराठी वर्चस्वाचे हे दाखले बाळासाहेबांच्या नजरेस आणून दिले आणि ते एक माहिती म्हणून ‘मार्मिक’मध्ये छापले जाऊ लागले. पण त्यातून काहीतरी संघटना व लढा उभारण्याची कल्पना अजिबात नव्हती. तसा त्यातला आवेशही नव्हता. पण जसजशा या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या; तसतसा त्याचा प्रभाव जनमानसावर पडू लागला आणि विविध भागातील तरूणांच्या संस्थांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यातले काही बाळासाहेबांना येऊन भेटू लागले. त्यातून काहीतरी करायला हवे, असा विचारविनिमय सुरू झाला. सहाजिकच अन्य पक्ष जसे काही राजकीय तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून उभे रहातात व आरंभ करतात; तशी शिवसेनेची सुरूवात नव्हती. एका सामान्य सदराने तिचा अनवधानाने आरंभ झाला होता आणि ती संघटना स्वत:च आकार घेऊ लागली होती. त्यासाठी कार्यरत झालेल्यांनाही पुढे त्यातून काही मोठी राजकीय संघटना आकारास येईल याची सुतराम शक्यता ठाऊक नव्हती.

   प्रथम हा तपशील आणून देणार्‍यांनी जी कामगिरी बजावली, त्यातले काही सतत बाळासाहेबांच्या संपर्कात आले. तर त्या याद्या वाचून नंतर काही लोक त्यांच्या संपर्कात आले. त्यातून काहीतरी करायची भूमिका आकार घेऊ लागली. ख्यातनाम व्यंगचित्रकार बाळासाहेब आणि नामवंत समाजसुधारक, लेखक असलेले प्रबोधनकार यांचा गोतावळा मान्यवरांचा होता. त्यातही यावर उहापोह होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे मिळणार्‍या प्रतिसादाला आकार येत गेला. अशी काही प्रादेशिक अस्मितेची संघटना असावी ही प्रबोधनकार व आचार्य अत्रे यांचीही कल्पना होती. महाराष्ट्र सेना असे तिचे नाव ठेवायचाही म्हणे विचार झाला होता. पण तिला कधीच आकार मिळू शकला नाही, असेही त्या काळातले जाणकार म्हणायचे. पण शिवसेना ही त्याच संकल्पनेवर आधारलेली होती; असे नक्कीच म्हणता येणार नाही. तो निव्वळ योगायोग होता. कारण स्वत: बाळासाहेब कधी कुठल्या पक्ष वा संघटनेत नेता किंवा कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले नाहीत वा रमले नाहीत. मग त्यांनी संघटना काढण्याचा विचारही करण्याशी शक्यता कशी असेल? ते सगळेच जुळून आलेले योगायोग होते. मात्र अंगावर आले तर पळायचे नाही, सामोरे जायचे; हा बाळासाहेबांचा स्वभाव असल्याने, ते येईल त्या परिस्थितीला सामोरे गेले आणि इतिहास घडत गेला. त्याला त्या नावांच्या याद्या कारणीभूत झाल्या हे निखळ सत्य आहे. पण आज जसे भासवले जाते, की अमराठी लोकांच्या विरोधात जनभावना भडकावी; म्हणून त्या याद्या मुद्दामच छापल्या जात होत्या, ते निव्वळ असत्य आहे. तो योगायोग होता. पण परिस्थितीने पुढला घटनाक्रम घडवून आणला.

   जेव्हा असा याद्यांचा सामान्य मराठी तरूणाला वागण्यातून अनुभव येऊ लागला; तेव्हा संताप समोर येऊ लागला होता. त्याला जर कुठल्या प्रस्थापित राजकीय पक्ष वा संघटनेने तोंड फ़ोडले असते, तर शिवसेना आकारच घेऊ शकली नसती. म्हणजे इथल्या कामगार संघटना किंवा राजकीय संघटनांनी भूमीपुत्रांवरचा अन्याय; म्हणून तो विषय हाती घेतला असता तर? कारण तो मराठी तरूण त्याच कम्युनिस्ट, रिपब्लिकन, समाजवादी किंवा शेकाप, जनसंघ अशा पक्षातच कमीअधिक प्रमाणात विखुरला होता. त्यापैकी कुठल्याही पक्षाला त्या ज्वलंत विषयावर चळवळ उभारणे शक्य होते. सत्ताधारी म्हणून कॉग्रेस पक्ष तितकी टोकाची भूमिका घेऊ शकला नसता. पण अन्य पक्षांचे काय? त्यांचे बहुतांश नेते व कार्यकर्ते मराठी होते. त्यांनी हा विषय का घेतला नाही? आज बेळगावात कुठलाही पक्ष कानडी म्हणून उभा ठाकतो आणि तिथल्या मराठी लोकांच्या भावनांची पर्वा करत नाही. मुंबईत उत्तर भारतीयांच्या विरोधात आवाज उठवला गेला; मग बिहारसहित तमाम उत्तर भारतातले नेते पक्षविरोध विसरून एकत्र येतात. तसे इथल्या राजकीय पक्षांना तेव्हा मराठी बाणा दाखवून का वागता आले नाही? आजही इथल्या राजकीय पक्षांना स्थानिक अस्मितेचा विषय आला, मग अंग चोरण्याची का गरज भासते? ज्यांनी मराठी भाषिकांचे राज्य व्हावे म्हणून आंदोलन केले; तेच हे सगळे पक्ष होते आणि त्यांचे नेते, कार्यकर्ते मराठीच होते. मग ते राज्य मिळाल्यावर त्या राज्याच्या राजधानीमध्ये मराठी तरूणांची गळचेपी होत असेल, तर कोणी लढायचे? त्या त्या पक्षातल्या मराठी तरूणांनाही तोच प्रश्न सतावत होता. पण त्या मराठी तरूणांच्या घुसमटीला पक्षात वाव नव्हता. त्याला नवा मार्ग शोधणे भाग होते. ती वाट शिवसेना म्हणून निघाली. जर तेव्हाच्या विविध पक्षांपैकी कोणी तो विषय हाती घेतला असता; तर ती वाट शोधलीच गेली नसती.

   ज्यांनी ‘मार्मिक’मध्ये अमराठी नावांच्या याद्या तयार करून दिल्या; ते आणि विविध पक्षातले मराठी तरूण भिन्न होते. पण दोघांच्या मनातले दु:ख सारखेच होते, वेदना सारखीच होती. त्यामुळेच मग विविध पक्ष व संघटनामधल्या त्या तरूणांना नव्या व्यासपिठाची गरज भासू लागली. त्यांची मते ‘मार्मिक’च्या वाचक पत्रातून समोर येऊ लागली आणि मग बाळासाहेबांना काही जाणकारांनी भेटून त्याच भावनेला संघटित रुप देण्याचा विचार पुढे आला. अमराठी लोकांचे वर्चस्व आणि अरेरावी मुंबईतून मोडून काढायला हवी; असे वाटणारे पांढरपेशे आणि गल्लीबोळातले तरूण यांच्यात दरी होती. ती दरी भरण्याचे काम ‘मार्मिक’ने केले. ज्या तरूणाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीने झुंजवला होता, तो रिकामा हात चोळत बसला होता. कारण त्या चळवळीच्या नेत्यांनी व पक्षांनी त्याला वार्‍यावर सोडून दिले होते. तो मुळातच राडेबाज होता. पण असंघटित होता, विस्कळीत होता. राडेबाज म्हणजे दंगामस्ती करू शकणारा, हाणामारीला पुढे जाणारा. साध्या भाषेत ज्याला झुंजार म्हणतात, असा तरूण. तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीने निर्माण केला. ती आयती फ़ौज शिवसेनेला मिळाली. म्हणजे त्यांनीच स्वत:ला शिवसेना म्हणून रुपांतरीत करून घेतले. समितीच्या नेत्यांनी त्यांना वार्‍यावर सोडले होते, त्यांना नेता हवा होता. बाळासाहेबांच्या रुपाने नेता आणि शिवसेनेच्या रुपाने त्यांना संघटनेचे रुप मिळाले. तर मुद्दा इतकाच, की महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या सार्वजनिक जीवनात शिवसेनेने राडा किंवा हाणामारीची संस्कृती आणली ही शुद्ध बनवेगिरी आहे. ती संस्कृती ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची देणगी आहे. खरे तर त्याच संस्कृतीने शिवसेनेला जन्म दिला म्हटले तर वावगे ठरणार नाही.

   त्याच योगायोगाने बाळासाहेब ठाकरे नावाच्या उत्तम व्यंगचित्रकाराला राजकारणात किंवा संघटनात्मक जीवनात आणले. पुढे असे योगायोग जुळत गेले, की त्याच संघटनेला निवडणुकीच्या राजकारणातही उतरावे लागले. बदनाम कृष्ण मेनन याला समितीने उभा केला नसता, तर सेनेला दोनदा ठाणे कल्याणपर्यंत झुंज द्यावी लागली नसती आणि इतक्या लौकर सेना ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीत उतरली नसती. तिथले यश मिळाले नसते तर मुंबईची मोठी महापालिका लढवण्यापर्यंत सेनेची मजल जाऊ शकली नसती. दोन दशकांपासूनचे जुने कम्युनिस्ट, रिपब्लिकन वा समाजवादी पन्नास जागा ज्या मुंबईत कधी लढवू शकले नाहीत; त्याच मुंबईत स्थापनेपासून अवघ्या दोन वर्षात शिवसेनेने शंभराच्या आसपास उमेदवार उभे करायची हिंमत करावी, ही सोपी बाब नाही. सेनेचा पाठींबा विधानसभेत घेतलेल्या व ठाण्यात घेतलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला सेनेची ताकद कळली होती. म्हणूनच प्रा. मधू दंडवते यांनी सेनेशी दुय्यम भागिदार होऊन १९६८ ची मुंबई पालिका लढवायचा पवित्रा घेतला. त्याचा लाभही त्यांना मोठा मिळाला. कधी नव्हे ते त्या पक्षाचे अकरा नगरसेवक निवडून आले. पण त्याच युतीने शिवसेनेला भविष्यातील एक चांगला खंदा प्रामाणिक व अमराठी शिवसैनिक मिळवून दिला. त्याचे नाव होते दादी गोवाडीया. हा समाजवादी कार्यकर्ता शिवसैनिक कसा झाला?    ( क्रमश:)
भाग   ( ३३ )    २२/१२/१२

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

निखिल हा दर्डांच्या खाणीतला कोळसा आहे का?


   "वाद अंगावर ओढून घेण्यात वागळेंना मजा येते. त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे. सोनिया गांधी आणि आर. के. धवन यांचे संबंध असल्याचा मजकूर ‘महानगर’मधल्या राजीव गांधींच्या मृत्यूच्या बातमीतच होता. सहाजिकच कॉग्रेस कार्यकर्ते तेव्हा आले होते, ते काही हल्ला करण्यासाठी नाही. अत्यंत सभ्यपणे, ‘तुम्ही छापलं ते बरोबर नाही, अनुचित आहे’ असं ते सांगत होते. पण आपण लिहितो तेच बरोबर अशी हवा डोक्यात गेलेले वागळे त्यांना हाकलून मोकळे झाले. मग कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि निदर्शने सुरू झाली."

   हा निखिलच्या अविष्कार स्वातंत्र्याचा पुरावा आहे. तो पुरावा सोळा वर्षापुर्वी कपील पाटिल यानी लिहिलेल्या लेखातला आहे. निखिलला कुणाची तरी अकारण कळ काढून वाद अंगावर ओढवून घेण्याची मजा वाटते, असेच कपीलने म्हटले आहे ना? म्हणजे त्याचा जो काही सत्यकथनाचा आव असतो ते निव्वळ ढोंग असते. कपील त्याचीही ग्वाही देऊन म्हणतो, ‘त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे.’ यापेक्षा आणखी निखिलच्या बदमाशी व भामटेगिरीचा पुरावा कुठला हवा आहे? अर्थात ही जुनी गोष्ट झाली. पण सुंभ जळले तरी पिळ जात नाही म्हणतात ना, त्यातली बाब आहे. अगदी अलिकडे निखिलने तोच उद्योग करून बघितला. पण त्यात ‘मजा आली नाही’. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्याने कायबीइन लोकमत या वाहिनीवर दिवसभर लाळ गाळून झाल्यावर ट्विटरवर गरळ ओकली. जे वाहिनीवर गुलामी करत असल्याने बोलता आले नव्हते; ते मनातले निखिलने ट्विटरवर लिहिले. ‘बाळासहेब ठाकरे हे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे अनौरस अपत्य होते, ज्याने त्या लोकशाहीचा आपल्या तथाकथित हुकूमशाहीच्या प्रयोगासाठी वापर करून घेतला.’ हे जर निखिलचे खरे मत असेल, तर त्याने वाहिनीवर लाळ गाळत बसायची काय गरज होती? तिथेही तेच बोलायची हिंमत दाखवायला हवी होती. पण तेवढी हिंमत त्याच्यापाशी नव्हती. असेही म्हणायला जागा नाही. कारण त्याने मनातले ट्विटरवर लिहिले. सवाल आहे, की तेच वाहिनीवर बोलताना हिंमत कुठे गेली होती? तेव्हा याच्या तथाकथित अविष्कार स्वातंत्र्याच्या गळ्य़ात कोणाचा पट्टा बांधलेला होता? कोणी निखिलची गळचेपी केली होती? आणि केली असेल तर निखिल त्याबद्दल अवाक्षर का बोलत नाही?

   असे काही अविष्कार स्वातंत्र्य म्हणून त्या दिवशी व वाहिनीवरून बोलले तर मोडतोड होईल; याची भिती दुय्यम होती. त्या मोडतोडीला गुलाम निखिलचे मालक घाबरत नाहीत. तेवढी भरपाई करायला त्यांच्याकडे बख्खळ पैसा आहे. पण अशी काही मुक्ताफ़ळे वाहिनीवरून उधळली असती, तर त्या वाहिनीची टीआरपी एका तासात रसातळाला गेली असती, आणि निखिलला ढुंगणावर लाथ मारून हाकलायची वेळ दर्डांवर आली असती. त्याचे पुर्ण भान असल्यानेच निखिल वाहिनीवर ठाकरे यांच्या कौतुकाची लाळ गाळत होता आणि मालकांच्या इशार्‍यावर त्याचे आविष्कार स्वातंत्र्य शेपूट हलवित होते. कारण कळ काढली तर निखिलला मजा आली असती. पण दर्डांचे दिवाळे वाजले असते. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्यासह मजा गुंडाळून निखिल बाळासाहेबांच्या आरत्या ओवाळत बसला होता. यालाच मी ढोंगीपणा म्हणतो. जे बोलायची हिंमत नोकरी वा पगाराचा गळ्यातला पट्टा ओढल्यावर निमूट गप्प बसते आणि शेपूट हलवते, त्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय? तर मुद्दा इतकाच, की हा माणुस निव्वळ ढोंगी आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टी व कृतीसह बोलण्यातही फ़क्त लबाडी असते. खरे तर त्या तथाकथित स्वातंत्र्याचा आडोसा घेऊन निखिलला वाद उकरून काढायचे असतात आणि त्यातून आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. आजवर त्याने जी काही अशी स्वातंत्र्याची लढाई करायचे नाटक चालविले आहे, त्याचा हेतू कायम समान राहिलेला आहे. उपरोक्त कपीलच्या विधानात कॉग्रेस कार्यकर्त्यांचा व पांडूरंगशास्त्री आठवले यांच्या अनुयायांचा उल्लेख आलेला आहे. त्यांना दुखावण्यार्‍या गोष्टींचा अविष्कार स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? आणि जर इतकाच मोठा लढवय्या आहे निखिल; तर त्याने कपील म्हणतो तशी माहिम पोलिस ठाण्यात जाऊन सोनिया गांधी प्रकरणात माफ़ी का मागितली? त्याचे उत्तर निखिल कधी देतो काय?

   कपीलच्या त्या लेखाला उत्तर देताना, निखिल म्हणतो, ‘सोनिया गांधींचा उगाळून फ़ेकून दिलेला कोळसाही त्यांनी (कपील पाटलांनी) पुन्हा शोधला आहे. या सगळ्याबद्दल आणखी काही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.’ असे निखिलचे तेव्हा ‘महानगर’मधून दिलेले उत्तर आहे. म्हणजे यांच्या पापाबद्दल जाब विचारला, मग तो उगाळून फ़ेकून दिलेला कोळसा असतो. की तेव्हापासूनच निखिलला कोळसा या विषयावर कुठले स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नसल्याने दर्डा ही मालक मंडळी कोळसा खाणीत अडकल्याचे आढळून आल्यावर निखिलने कायबीइन लोकमत वाहिनीवर त्याची चर्चा टाळली होती? की निखिलने उगाळून फ़ेकून दिलेला कोळसा घेऊनच दर्डांनी कोळसा खाणीचा कारभार सुरू केला आणि त्यासाठीच निखिलला घेऊन मुद्दाम वाहिनीचा व्यवहार सुरू केला होता? कोळसा आणि निखिलचे इतके जुने नाते आहे.

   रस्त्यातून चाललेल्या एखाद्या मुलीची छेड काढायची आणि तिने चप्पल मारल्यावर, हल्ला झाला म्हणून बोंबा मारायच्या; याला निखिल अविष्कार स्वातंत्र्याची लढाई म्हणत असतो. तो त्याची मजा घेत असतो. बाकीचे जे कोणी मुर्ख पत्रकार संपादक त्याच्यामागे त्यासाठी भाबडेपणाने उभे रहातात, त्यांचा निखिल मोठ्या धुर्तपणे वापर करत असतो. त्यात हेमंत देसाई इत्यादिंचा समावेश होतो. असे भाबडे किंवा वैचरिक गुलामीने अगतिक झालेले; मग निखिलच्या पापावर पांघरूण घालायला अगत्याने पुढे येत असतात. खरे तर निखिलचा बुरखा फ़ाडणारा कपीलचा तो लेख अत्यंत महत्वाचाआसा अविष्कार स्वातंत्र्याच्या खोट्या लढाईचा दस्तावेजच आहे. कारण त्याच कपीलने ‘महानगर’च्या भंपकपणाचे वाभाडे मी ‘मार्मिक’मधून काढले; तेव्हा निखिलच्या अशाच भाषेत खुलासा पाठवला होता. मात्र काही वर्षातच त्याने ‘महानगर’ व निखिल अशा दोघांवर माझेच जुने आरोप करणारा उपरोक्त लेख लिहिला. त्यात निखिल एकटाच उघडा पडलेला नाही. कारण कपीलच्या लेखाला उत्तर देताना निखिलने कपीललाही उघडानागडा करून टाकला होता. त्यातून आजकालची लेखन स्वातंत्र्य व अविष्कार स्वातंत्र्याची लढाई हे कसे ढोंग आहे; त्याचीच दोघांनी परस्परांच्या विरोधात दिलेली साक्ष, असे हे तीन लेख आहेत. मला अशी घाण जपून ठेवायची वाईट सवय आहे. पण ह्यांनी इतकी राजरोस चव्हाट्यावर घाण केली असली व एकमेकांच्या पापाचा जाहिर पाढा वाचलेला असला; तरी कोणा अन्य अविष्कार स्वातंत्र्यवीराने त्यावर भाष्य केलेले नाही. यालाच म्हणतात जातीसाठी खावी माती. त्यालाच मी सेक्युलर ढोंगबाजी किंवा पुरोगामी भामटेगिरी म्हणतो.

   यातून एक गोष्ट लक्षात येईल, की शिवसेनेने आपल्यावर हल्ले करावेत म्हणुन निखिल जाणिवपुर्वक कळ काढणार्‍या बिनबुडाच्या बातम्या देणार आणि हल्ला झाला मग अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून गळाही काढणार. मग त्याविरुद्ध मोजके डावे निदर्शने व धरणी असले ढोंग करायला हजर होणार. हा परिपाठ झालेला होता. म्हणूनच त्या लेखात कपील म्हणतो, ‘वागळे डाव्यांना फ़ार प्रिय आहेत’. ते का प्रिय आहेत वा होते? तर त्यांना शिवसेनेशी दोन हात करण्याची कुवत राहिलेली नव्हती. अशावेळी शिवसेनेची कळ काढणार्‍यावर ते फ़िदा होणे स्वाभाविकच असते. सुंदर मदालसा कटरिना वा करीना कपूरला मिठीत घेणार्‍या सलमान वा शाहरुखला बघून थेटरात शिट्ट्या फ़ुंकणारे आंबटशौकीन असतात, तशीच ही मानसिकता असते. आपण अशा सुंदर मुलीच्या जवळही जाऊ शकत नसतो, तेव्हा तसे काही पडद्यावर बघण्यातला एक आभासही खुश करणारा असतो. तोच आनंद निखिलने ‘महानगर’ दैनिकातून डाव्यांना मिळवून दिलेला होता. म्हणूनच ‘वागळे डाव्यांना प्रिय होते.’ पण मुळात तो ढोंगी माणुस आहे. माणुस बेअक्कल असतो किंवा बदमाश असतो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतील तर धोका कमी असतो. पण दोन्ही एकत्र असतील तर अधिक घातक रसायन तयार होते. निखिल हे तसेच घातक रसायन आहे. तेव्हा त्याने जो ब्लॉग लिहून पुन्हा ठाकरे यांच्या निधनानंतर मुक्ताफ़ळे उधळली आहेत, तेवढ्यापुरती त्याची हजेरी इथे तातडीने घ्यावी लागली. बाकी सवडीने पुढे बघू. मुद्दा इतकाच, की त्याच्यासह त्याच्या भोवतालच्या विद्वानांच्या अकलेची कींव करावीशी वाटते. कारण ते एका गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. आणि समाजात असेच पोकळ सभ्य लोक गुन्हेगारीला पोसत असतात हे सांगणे भाग होते.    ( क्रमश:)
भाग   ( ३२ )    २१/१२/१२

बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

चांगुलपणावर पोसलेले गुन्हेगारीचे बांडगुळ


   परवा दिल्लीत जी बलात्काराची मोठी भीषण घटना घडली, त्यासंदर्भात सध्या महिलाविषयक गुन्ह्यांची व्यापक चर्चा चालू आहे. त्यात भाग घेणारे व सभ्य मुखवट्यात अव्वाच्या सव्वा व्याख्यानबाजी करणारे तरी कितीसे सभ्य सुसंस्कृत आहेत? कसल्या त्या चर्चा होत्या आणि त्यात कसल्या गोष्टींचे संदर्भ दिले जात होते? एका चर्चेतील माहितीनुसार शंभर बलात्कार वा लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांपैकी फ़ार तर दहा तक्रारी होतात. म्हणजे नोंदल्या जातात, उरलेले नव्वद गुन्हे झाकले वा लपवले जातात. याचा अर्थ असा नाही, की त्या गुन्ह्यातले जे कोणी गुन्हेगार असतात, ते आपल्या मनातल्या अपराधी भावनेमुळे गुन्ह्याची लपवाछपवी करतात. त्यांची लपवाछपवी तर असतेच. पण अशा गुन्ह्याचे जे बळी असतात, ते बहुतांशी आपल्या अब्रू व सभ्यतेचे कवच सुरक्षित ठेवायला; त्या घटनांबद्दल गप्प बसतात किंवा कुठे वाच्यता करीत नाहीत. आणि जो कोणी त्यातला गुन्हेगार असतो, त्याच्याशी संबंधित लोकही ‘आपला’ म्हणून त्या गुन्ह्यावर पांघरुण घालत रहातात. याच लपवाछपवीने गुन्हेगारांना मोठे संरक्षण व प्रोत्साहन मिळत असते. त्यातून गुन्हेगारी इतकी सोकावत जाते, की असे सराईत गुन्हेगार मोठे प्रतिष्ठीत म्हणून ‘उजळमाथ्याने’ समाजात वावरत असतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन उलट इतरांवर चिखलफ़ेक करण्याची मुजोरीसुद्धा करीत असतात. असे आरोप मी हवेत करत नाही. त्याचे एक सुप्रसिद्ध उदाहरण मी आज वाचकांसमोर पेश करणार आहे. म्हणजे त्यातल्या सराईत गुन्हेगाराचे व त्याच्या गुन्हेगारीवर पांघरूण घालून त्याला सोकावण्यात हातभार लावणार्‍या शेकडो इतर तथाकथित सुसंस्कृत सभ्य गृहस्थांचे चेहरे समोर आणणार आहे. पुढील एक जुन्या लेखातील उतारा वाचा मग अंदाज येईल.

   "वागळे स्वत:च एक मोठा फ़्रॉड आहे. षटकार प्रकाशनातल्या आपल्या भागिदारांना त्यांनी कसं फ़सवलं ते द्वारकानाथ संझगिरी, उमेश आठल्येकर आणि हेमंत देसाई यांना विचारा. आपल्या भागिदारांना फ़सवून ‘षटकार’च्या गठ्ठ्य़ांची चोरी कोण, कशी करत होतं; तो किस्सा धमाल आहे. कोर्टकचेरी आणि पोलिसात गेल्यानंतरच संझगिरी-आठल्येकर यांना त्यांचा कायदेशीर वाटा वागळेकडून वसूल करता आला."

   "वाद अंगावर ओढून घेण्यात वागळेंना मजा येते. त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे. सोनिया गांधी आणि आर. के. धवन यांचे संबंध असल्याचा मजकूर ‘महानगर’मधल्या राजीव गांधींच्या मृत्यूच्या बातमीतच होता. सहाजिकच कॉग्रेस कार्यकर्ते तेव्हा आले होते, ते काही हल्ला करण्यासाठी नाही. अत्यंत सभ्यपणे, ‘तुम्ही छापलं ते बरोबर नाही, अनुचित आहे’ असं ते सांगत होते. पण आपण लिहितो तेच बरोबर अशी हवा डोक्यात गेलेले वागळे त्यांना हाकलून मोकळे झाले. मग कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि निदर्शने सुरू झाली. मला नीना कर्णिकांचा फ़ोन आला. ‘तू लगेच ये, निखिलला काही कळत नाही. तूच संभाळू शकशील.’ मी तेव्हा ‘महानगर’चा मुख्य वार्ताहर होतो. पांडुरंगशास्त्रीदादांचे शेकडो कार्यकर्ते असेच एकदा चिडून आले होते. तेव्हा त्यांना मीच सामोरा गेलो होतो. वागळेंची हिंमत सुद्धा झाली नव्हती. म्हणून मीना कर्णिकांनी मला बोलावलं असावं. मी त्या कॉग्रेस कार्यकर्त्यांना शांत केलं आणि चहा घेता घेता बोलू अशी विनंती केली. कार्यकर्ते शांत झाले. मग मात्र वागळेंनी पोलिस स्टेशनात जाऊन चक्क माफ़ी मागितली." (दै. सांज दिनांक, अबीर-गुलाल, दि.९ नोव्हेंबर १९९६)

   हा उतारा सध्याचे राजकीय नेते व आमदार कपील पाटिल यांच्या एका जुन्या लेखातला आहे. तेव्हा कपील पाटिलही अविष्कार स्वातंत्र्याचे एक खंदे लढवय्या होते आणि कफ़न डोक्याला बांधून आवेशात लिहित बोलत असत. त्यांचे एक ‘आज दिनांक’ नावाचे दैनिक बंद पडले. तेव्हा आपल्याला न जुमानता वागणार्‍या कपीलच्या अपयशावर चोची मारणारा लेख निखिलने ‘महानगर’मध्ये लिहिला होता. ‘एका सांजदैनिकाचा मृत्यू’ असे त्याचे शिर्षक होते. दिवाळखोरीमुळे ते कसे बंद पडले; त्याचे पोस्टमार्टेम निखिलने त्यातून केले होते. तेव्हा खवळलेल्या कपीलने (आजकालच्या भाषेत निखिलवर) पलटवार करायला नव्या ‘सांज दिनांक’ या सांजदैनिकात मुहतोड जबाब दिला होता. त्याचे शिर्षक होते, ‘ठाकरे आणि वागळे: एकाच नाण्य़ाच्या दोन बाजू’. त्यामधला हा उतारा आहे. त्या लेखाची सुरूवातच कपीलने मोठी मजेशीर केली होती. ‘निखिल वागळेंच्या तोंडाला तोंड लावणं म्हणजे स्वत:ला एड्स लावून घेणं. म्हणून वागळेंच्या तोंडाला कोणी लागत नाही असं म्हणतात.’ इथून कपीलच्या लेखाला सुरूवात झाली होती. असो. त्याचा तो इशारा कोणी फ़ारसा मानलेला दिसत नाही. अन्यथा आज कायबीइन लोकमत वाहिनीवर असे जाहिररित्या एड्स लावून घेण्याचे कार्यक्रम कशाला झाले असते? पण हा वरचा उतारा कपीलच्या त्या लेखातला आहे आणि आजच्या पुरता तेवढाच एड्स पुरेसा आहे. तेवढ्यापुरते आपण सत्य तपासून बघू.

   यात कपीलने काही घटना, मुद्दे आणि काही नावे दिलेली आहेत. जे निखिलच्या अपराधाने बळी आहेत, असा दावा केलेला आहे. त्यातले दोन चेहरे तुम्हाला बघून माहित आहेत. एबीपी माझा वाहिनीवर क्रिकेट व क्रिडा विषयाचे समिक्षक म्हणून दिसणारे द्वारकानाथ संझगिरी आणि निखिलच्याच बाजूला एड्सची भिती न बाळगता नित्यनेमाने दिसणारे हेमंत देसाई. त्यांचा उल्लेख कपीलने सोळा वर्षापुर्वी आपल्या ‘सांज दिनांक’ दैनिकातल्या उपरोक्त लेखात केलेला आहे. त्यांची निखि्लने फ़सवणूक केली आणि त्यासा्ठी पोलिस व कोर्टबाजी करूनच न्याय मिळवावा लागला; असा त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे. आपल्याला व अन्य कित्येकांना फ़सवणार्‍या या फ़्रॉड निखिल वागळेबद्दल उपरोक्त दोघा मान्यवरांनी कधी जाहिरपणे वाच्यता केली आहे काय? आपल्या लेखातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ‘लाज असेल तर राजीनामा द्या’ असे आवाहन करणार्‍या हेमंत देसाई यांच्या लाजेचे काय? त्यांनी कधी कपील म्हणतो त्या फ़्रॉड प्रकरणात आपले थोबाड उघडले आहे काय? उलट निखिलच्या ‘सवालाची’ उत्तरे द्यायला हे गृहस्थ मिरवत येत असतात. विलासरावांना लाज असायला हवी, तर हेमट देसाईंना लाजबिज बाळगण्याची गरज वाटत नाही काय? मग त्यांनी आजवर कधी निखिलच्या फ़्रॉडबद्दल मौन कशाला पाळले आहे? त्याची वाच्यता कुठेच का केलेली नाही? कपील तर म्हणतो, की तो किस्सा खुपच धमाल आहे. मग देसाई गप्प कशाला? स्वत:ची वा आपल्या मित्रांची धडधडीत फ़सवणूक झाल्यावरही देसाई गप्प कशाला बसतात? अब्रूसाठी? कुणाच्या अब्रूसाठी? निखिलच्या खोट्या अब्रूसाठी का? गुन्हेगारांना पाठीशी कसे घातले जाते; त्याचे हे प्रतिष्ठीत उदाहरण आहे. आणि हेच असे भामटे वाहिन्यांवर बसून पिडीत मुली व तरूणींच्या कुटुंबियांनी अब्रूचे थोतांड न माजवता तक्रारी करायला पुढे आले पाहिजे अशी आवाहने करणार. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या निकटवर्ती वा गोतावळ्यातल्या गुन्हेगाराला अब्रुदार बनवायला, त्याच्या गुन्ह्यांवर दाबून पांघरूण घालणार. आपण एका फ़्रॉड सोबत मांडीला मांडी लावून बसतो आणि जगाला पोकळ सुसंस्कृतपणा शिकवतो, याची देसाई महोदयांना कधी शरम वाटली आहे काय? नसेल तर त्यांचे शहाणे बुद्धीवादी बोल किती पोकळ असतील त्याची आपण कल्पना केलेली बरी.

   सांगायचा मुद्दा इतकाच, की निखिल आणि अन्य कोणी गुन्हेगार सारखेच असतात. त्यांची खरी ताकद तुमच्या आमच्या अब्रुदारपणात सामावलेली असते. त्यांच्या बेशरमपणात त्यांची खरी शक्ती असते. आणि त्यांच्या त्या बेशरमपणाला देसाईसारखे लोक खतपाणी घालत असतात. अन्य पत्रकार संघटना किंवा लेखक कलावंतांच्या संस्था; त्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असतात. संझगिरी मात्र खरा सभ्य माणूस आहे. त्याला दुसर्‍यांच्या उखाळ्यापाखाळ्य़ा काढायच्या नसतात, म्हणून तो गप्प बसतो. पण त्यामुळेच निखिलसारखे बदमाश प्रतिष्ठीत व्हायला हातभार लागत असतो, हे विसरता कामा नये. आपण आज दिल्लीत बलात्कार झाले वा डोंबीवलीत कुणा रोडरोमियोने केलेल्या हल्ल्यात कुणाचा बळी गेल्यावर आक्रोश करतो, तेव्हा त्यांना कोणी पोसले वा प्रोत्साहन दिले, त्याकडे बघायचे विसरतो किंवा काणाडोळा करतो. मग असेच बदमाश शिरजोर होऊन उलट्या बोंबा मारू लागतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर महिन्याभराने लिहिलेला निखिलचा ब्लॉग त्याचा अस्सल पुरावा आहे. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्याने निधनाच्या दुसर्‍या दिवशी ट्विटरवर ओकलेले गरळ होय. त्यातून बदमाश कसे शिरजोर होतात आणि गुन्हेगारी कशी प्रतिष्ठीत होते, त्याचीच प्रचिती येते. जेव्हा आपण असे बदमाश सहन करतो किंवा त्यांच्याकडे काणाडोळा करतो; तेव्हाच गुन्हेगारीला मोकाट रान मिळत असते. कारण गुन्हेगारी नेहमी चांगुलपणाच्या सभ्यतेवर पोसले जाणारे बांडगुळच असते. त्याचा आणखी एक सज्जड पुरावा उद्या तपासू या.    ( क्रमश:)
भाग   ( ३१ )  २०/१२/१२

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

‘वागळेच्या दुनिये’तील कसरती आणि मर्कटलिला



   खरे तर माझ्यावरच्या शिवसैनिकांच्या हल्ल्याबद्दल मी कधीच लिहिले नाही. त्याला आता ३८ वर्षे होऊन गेली. पण इतक्या वर्षात माझी भूमिका अजिबात बदललेली नाही. नंतरही अनेक वृत्तपत्रात होतो आणि बेधडक लिहित आलो. पण मला कोणाची भिती वाटली नाही. वाटायची गरजही नसते. पण दुसरीकडे ज्यांच्यावर हल्ले झाले आणि ज्यांनी शिवसेनेसकट इतरांवरही अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप केला; त्यांच्या बातम्या किंवा त्यांचे लेख तपासून बघा. बहुतेक वेळी असेच हल्ले दिसतील, की त्यातून जाणीवपुर्वक त्या व्यक्ती वा राजकीय पक्षाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. निखिल वागळे याने महानगर नावाचे वर्तमानपत्र काढून अशा बदनामीच्या मोहिमा व राजकीय विरोधाची सुपारीबाजी सुरू केली, तिथून हे हल्ले वाढलेले दिसतील. हा माझा आरोप नाही, तर निखिल सोबत महानगरच्या ‘धंद्यात’ सहभागी असलेल्या कपिल पाटिल या तात्कालीन सहकारी पत्रकाराची ती साक्ष आहे. त्यामुळे निखिलवर शिवसेनेचे हल्ले का व्हायचे; त्याचे सोपे उत्तर मिळू शकते. हा विषय मध्येच येण्याचे कारण म्हणजे निखिलचा ताजा ब्लॉग होय. त्यात निखिल लिहितो,......

‘कोण होते बाळासाहेब ठाकरे ? मराठी समाजाला भूरळ घालणारे लोकप्रिय नेते की भारतीय समाजात फूट पाडणारे हिंदुहृदयसम्राट? बाळासाहेब एक व्यंगचित्रकार होते की व्यंगचित्रातून बोलणारे राजकीय नेते? विरोधी विचारांची माध्यमं बंद पाडणारे ते हुकूमशहा होते का? ते बॉलिवूडचे गॉडफादर होते की खरेखुरे आश्रयदाते? अडल्या नडलेल्याला मदतीचा हात देणारे ते रॉबिनहूड होते की श्रीकृष्ण आयोगात म्हटल्याप्रमाणे सेनापती? बाळासाहेब ठाकरे दोस्तांचे दोस्त आणि दुष्मनांचेही दोस्तच होते का? 
असे असंख्य प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर विचारता येतील. माझ्या मते, बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यक्तिमत्त्वात अनेक परस्पर विरोधी रूपं दडलेली होती. प्रस्थापित राजकीय आणि सामाजिक नियमांच्या चौकटीत न बसणारा असा हा कलंदर नेता होता. स्वतःच्या शैलीत, स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या तंद्रीत आणि स्वतःच्या आवेगात त्यांनी राजकारण केलं. त्यातून महाराष्ट्राच्या गेल्या ५२ वर्षांच्या राजकारणातला ‘ठाकरे इफेक्ट’ उभा राहिला. या इफेक्टमुळे अनेक संसार उभे राहिले आणि काही उद्ध्वस्त झाले. एक अत्यंत वलयांकित आणि वादग्रस्त नेता असं बाळासाहेबांचं वर्णन करता येईल. माझ्या वाट्याला आलेले पहिले ठाकरे हिंसक होते. त्यांनी घटनेने मला दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा अधिकार नाकारला. १९७९ पासून आजपर्यंत पाच वेळा शिवसैनिकांनी माझ्यावर किंवा माझ्या कार्यालयावर जीवघेणे हल्ले केले. आधी ‘साप्ताहिक दिनांक’, मग ‘महानगर’ आणि २०१० साली ‘आयबीएन लोकमत’. या सर्व हल्ल्यांना माझ्या सहकार्‍यांनी जिद्दीने तोंड दिलं. ‘महानगर’च्या अंकावर बहिष्कार टाकण्याचा बाळासाहेबांनी दिलेला आदेश मुंबईतल्या मराठी जनतेनेच नाकारला. ठाकरेशाही पुढे आम्ही झुकणार नाही, हे माझ्या सहकार्‍यांनी दाखवून दिलं.’   

   निखिलच्या वाट्याला आलेले बाळासाहेब हिंसक होते असा त्याचा दावा आहे. आणि त्यासाठी त्याने दिलेला हवाला कुठला; तर त्याच्यावर झालेले हल्ले होत. नेमका हाच प्रश्न मला अनेक व्याख्यानात श्रोते पत्रकारांनीव विचारलेला आहे. पण माझ्या एका प्रतिप्रश्नाने त्या प्रत्येकाला निरूत्तर केलेले आहे. आणि आज मी इथे तोच प्रश्न वाचकांसमोरही विचारतो आहे. शिवसेनेचा निखिल वा अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला; हे तुम्ही अनेकदा बातम्यातून ऐकलेले थोतांड आहे, असे म्हटले मग आश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. पण मी अशी शंका घेणार्‍या पत्रकार श्रोत्यांना विचारतो, की हल्ला या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यावर हल्ला होतो, त्याच्या जखमी अवस्थेतील एखादे तरी छायाचित्र तुम्ही कुठल्या बातमीत बघितले आहे काय? या प्रश्नावर हे शंका विचारणारे निरुत्तर होतात. कारण निखिल हा जगातला एकमेव असा माणूस व पत्रकार आहे, की त्याच्यावर शिवसैनिकांनी अनंत हल्ले चढवले; पण त्याला एकदाही जखमी करण्यात कोणाला यश मिळालेले नाही. बहुधा महाभारतातल्या कर्णानंतर कवचकुंडले जन्मजात मिळालेला इतिहासातील निखिल हा दुसराच महापुरूष असावा. कारण आजवर डझनावारी प्राणघातक हल्ल्यात त्याला एकही जखम होऊ शकलेली नाही. आणि ज्याला साधी जखमसुद्धा होत नाही, त्याच्यावर इतके हल्ले होतात; म्हणजे नेमके काय होते, याचे मला जबरदस्त कुतूहल आहे. बोलाची कढी आणि बोलाचा भात ना सगळा? पण मग हा तमाशा इतके दिवस का व कसा चालू शकला? 

   माझ्या वाट्याला आलेले पहिले ठाकरे हिंसक होते. त्यांनी घटनेने मला दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा अधिकार नाकारला. असे निखिल लिहितो. पण घटनेने निखिलला कुठलाही खास अधिकार दिलेला नाही. ज्यांनी ज्यांनी राज्यघटना वाचलेली आहे, त्यांना माहित आहे, की त्यात निखिल वागळेसाठी बाबासाहेबांनी कुठलीही खास तरतूद केलेली नाही. जी नागरी स्वातंत्र्ये आहेत, ती तमाम भारतीय नागरिकांसाठी आहेत. तेव्हा घटनेने मला दिलेले स्वातंत्र्य हा निखिलचा दावा तद्दन भंपकबाजी आहे. दुसरा दावा त्याला जगण्याचा अधिकार हिंसक ठाकरे यांनी नाकारला, ही आणखी एक मस्त लोणकढी थाप. कारण जगायचा अधिकार नाकारलेला माणूस हे लिहायला जिंवंत कसा? आणि ज्याने तो अधिकार नाकारल्याचा दावा करतो आहे, त्याच व्यक्तीच्या मृत्यूनंतर निखिल हा लेख लिहितो असाही निखिलचा दावा आहे. निखिलला जगायचा अधिकार नाकारल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यावर बाळासाहेब हा लेख लिहित नसून; त्यांच्या मृत्यूनंतर निखिल हा लेख लिहितो आहे. म्हणजे तो अजून जिवंत नक्कीच आहे. मग जगायचा अधिकार ठाकरे यांनी नाकारला म्हणजे नेमके काय? हा माणूस तुमच्याआमच्या वास्तव जगत जगतो, की आपल्याच भ्रामक जगाच्या कल्पनाविश्वात जगतो, याचीच मला अनेकदा शंका येते. की याच्याच कल्पनाविश्वाची चोरी करून आर.के. लक्ष्मण या व्यंगचित्रकाराला ‘वागळे की दुनिया’ नावाची कथा सुचली? ज्याच्यावर पुढे गाजलेली दुरदर्शन मालिका तयार झाली व गाजली? वरच्या एका वाक्यात त्याने जे काही सांगायचा प्रयत्न केला आहे, ते कोणी कधी गंभीरपणे वाचतो काय याचीही शंका येते. 

   ज्याने जगायचा अधिकार नाकारला असा दावा आहे, त्याचीच मुलाखत घेतली व ती झकास रंगली; असाही निखिलचा दावा आहे. जणू मांजराने शिकार करून खाल्लेल्या उंदराचे आत्मकथन बालपणी बालसाहित्यात वाचले आणि त्यातून निखिल अजून बाहेरच पडलेला नाही, असे मानायचे काय? आणि तसे नसेल तर मग इतक्या अतर्क्य तर्कहीन गोष्टी तो इतक्या सहजपणे कशा सांगू शकतो? तर त्याचेही कारण समजून घेण्याची गरज आहे. निखिलची पत्रकारीता ही डाव्या चळवळीतली एक विकृती होती. आज जसा निखिल टीआरपीसाठी वाटेल तशा कोलांट्या उड्या मारतो; तशाच त्याने महानगर नावाचे दैनिक चालवताना मर्कटलिला केलेल्या होत्या. शिवसेनेचे हल्ले ओढवून आणणे; हा त्यातला व्यापारी हेतू होता. शिवसैनिक येऊन थोडी मोडतोड करतील, पण त्यातून मिळणारी अफ़ाट प्रसिद्धी व झोत यासाठीचे ते पद्धतशीर चालविलेले नाटक होते. त्याचाही एक वाचकवर्ग होता. शिवसेनेमुळे नामोहरम झालेल्या डाव्यांना शिवसेनेशी रस्त्यावर उतरून लढायची कुवत नव्हती, पण गलितगात्र चळवळीमध्ये खुमखुमी होती. लैंगिक चाळे असलेले चित्रपट गलितगात्र झालेले आंबटशौकीन म्हाराते जास्त बघतात, कारण ते सुख भोगायची कुवत उरलेली नसते. त्या विकृतांसाठीच असे चित्रपट काढले जातात; तसे महानगर हे थकलेल्या डाव्यांना गुदगुल्या करणारे वृत्तपत्र होते. शिवसेनेला डिवचून अंगावर घेतल्याचे समाधान डाव्यांना निखिल देऊ शकत होता आणि त्याने नेमका त्याचाच धंदा यशस्वी रितीने करून दाखवला. त्यातून त्याच्या मागे डाव्यांची पराभूत मानसिकता येऊन उभी राहिली. त्यातला लढाऊ बाणा हे निव्वळ ढोंग होते असा माझा आरोप नाही, निखिलचा त्यातला भागिदारच तसे सांगतो. कोण तो त्याचा भागिदार?      ( क्रमश:)  
भाग   ( ३० )    १९/१२/१२