आज मुंबई कोणाची हा प्रश्न सहजगत्या विचारला जातो आणि तेवढ्याच उत्साहात मुंबई कोणाची; यावर वादही घातले जातात. कधी असा खुळचट प्रश्न सचिनसारख्या क्रिकेटपटूला विचारला जातो; तर कधी त्यावरून मराठी अस्मितेची टवाळी करण्यात आपलेच मराठी पत्रकार व माध्यमे धन्यता मानतात. पण संयुक्त महाराष्ट्राचे जे आंदोलन पेटले होते, त्यात कळीचा मुद्दाच ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ असा होता. आणि म्हणूनच तो लढा सर्वाधिक हिंसक मुंबईतच झालेला होता. कारण ज्या द्वैभाषिकाचा हट्ट नेहरूंनी व कॉग्रेसने केलेला होता; त्या मुंबई राज्याची राजधानी मुंबईच होती आणि त्यावर गुजरातचा तेवढाच हक्क आहे, असाही दावा केला जात होता. आपण मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे बघितले, तर तिकडच्या बहुतांश जागी गुजराती वस्तीचे प्राबल्य दिसेल. पश्चिम रेल्वेने गुजरात जवळ असल्याने; तिथे ही वस्ती झालेली होती. पण मुंबईवर आपलाच हक्क असल्याचे ठामपणे सांगत संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली घोषणा नुसती मराठी राज्यापुरती मर्यादित ठेवली नव्हती; तर त्या घोषणेतच मुंबईचा समावेश केलेला होता. म्हणजेच नुसता मराठी भाषिक मराठी प्रांत ही मागणी नव्हती, तर ‘मुंबई’सह संयुक्त महाराष्ट्र असा त्यात मुंबईवर भर होता. त्यातच मोरारजी देसाई हा गुजराती नेता मुंबई राज्याचा तेव्हा मुख्यमंत्री होता. त्यांनी आंदोलन चिरडून काढण्यासाठी पोलिस बळाचा जो अतिरेकी वापर केला; त्यामुळे लढा अधिकच चिघळत गेलाच. पण त्यामुळेच गुजराती समाजाविरूद्ध भावनाही भडकल्या होत्या. मराठी आंदोलकांचा रोख मग गुजराती लोकांच्या विरोधात गेला होता. परीणामी त्या आंदोलनाच्या भडक्यात गुजराती लोकांना आपले इथले घरसंसार सोडून गुजरातकडे पळ काढायची वेळ आली होती. व्यापार उदीम गुजराथ्यांच्याच हाती असल्याने; ते भक्ष्यस्थानी पडलेले होते. दगडफ़ेक, जाळपोळ, लाठीमार, अश्रूधूर व गोळीबार यांनी मुंबई अक्षरश: रणांगण बनली होती. मुंबई म्हणजे प्रामुख्याने माहिम व सायनच्या अलिकडचे मुंबई बेट; असा त्याचा अर्थ आहे. कारण तेव्हा मुंबईची वाढ व विस्तार तेव्हा आजच्यासारखा डहाणू, कर्जत वा खोपोली, पनवेलपर्यंत झालेला नव्हता. उपनगरे ही गावासारखीच होती व मुंबई बेटापुरतीच मर्यादित होती.
सहाजिकच सगळ्या आंदोलनाचा भडका हा सायन-माहिमच्या अलिकडेच उडालेला होता. त्यातही मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग उतरल्याने दक्षिण व मध्य मुंबईचे अक्षरश: युद्धक्षेत्र झालेले होते. त्या काळात माझे वय अवघे सात आठ वर्षाचे होते. पण गिरणगावात लालबागमध्ये हमरस्त्यालगतच्या चाळीत आमच्या कुटूंबाचे वास्तव्य होते, त्यामुळे प्रत्यक्ष दंगल, गोळीबार, अश्रूधूर, लाठीमार, जाळपोळ अशा गोष्टी त्या बालवयातही अनुभवता आल्या. तेवढेच नाही. आमच्या चाळीत पाच गुजराती मारवाडी कुटुंबांचे वास्तव्य होते, त्यांनाही धोका होता, त्यांना सुखरूप अन्यत्र पाठवण्यासाठी आमच्या वडीलधार्यांनी केलेली धावपळ मला चांगलीच आठवते. बाबूलाल नावाचे एक दुकानदार होते. त्यांचे तळमजल्यावरचे कापडाचे दुकान गिरणगावात बस्ता बांधण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची खोली आमच्या समोरचीच होती. मग काय, त्या दंगल व आंदोलनाचा आडोसा घेऊन धमक्या व खंडण्या घेणार्या गुंडांना मोकाट रान मिळाले होते. बाहेर रस्त्यावर अनेक तासांची संचारबंदी असायची आणि हमरस्ता सोडून गल्लीबोळात गुंडगिरी करू शकणार्यांची हुकूमत होती. पण त्या गुंडांना कोणी पायबंद घालू शकत नव्हते. कारण रस्त्यावर उतरून धुमाकूळ घालायचे कामही तेच करत होते. कोण कार्यकर्ता आणि कोण गुंड याला काहीही अर्थ नव्हता. रस्त्यावरचे दिवे दगड मारून फ़ोडून टाकलेले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्तावर गुडूप अंधार असायचा. कुठे कुठे सत्याग्रह चालू असल्याची अफ़वा आणि बातम्या चाळीत लोक कुजबुजायचे, त्यातून कळायच्या. दिवसा थोडा काळ संचारबंदी उठायची; तेव्हा गडबडीने लोक खरेदी करायचे. कोणी वृत्तपत्र आणले तर बातम्या मिळायच्या. नाही तर रेडीओवरच्या सरकारी बातम्या आणि मोकळीक मिळेल तेव्हा भेटीगाठीमधून आलेल्या ऐकीव अफ़वा; यांच्यावरच विसंबून रहावे लागत होते. अंधार पडला मग धमाल असायची. रस्त्यावर काळोखातच पोलिसांच्याच गाड्या फ़िरत असत आणि त्यांच्या मदतीला दिलेल्या बेस्टच्या बसेस असायच्या. बाकी वाह्तुक ठप्प असायची. पण एखादी गाडी आलेली लगेच कळायची आणि धमाल सुरू व्हायची.
पोलिसांची असो, की इतर कुठली गाडी असो; तिचा आवाज आला; मग अचानक तिच्या दिशेने चौफ़ेर इमारतीमधून दगडांचा वर्षाव सुरू व्हायचा. काही वेळी त्यात पेटते बोळेही असायचे. अनेक गच्च्यांमधून गोफ़णीने दगडांची अचूक फ़ेक करणारेही सज्ज असायचे. मोजके पोलिस असल्याने आणि खुल्या रस्त्यावर पोलिसांचा वावर असल्याने त्यांना उघडपणे त्या अंधारात दंगलखोरांचा प्रतिकार करता येत नसे. दुकानाच्या फ़ळ्यांचा किंवा छपरांचा आडोसा पोलिसांना घ्यावा लागत होता. मग पोलिस अशा दिशेने बेधडक गोळीबार करायचे. दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेले होते. एका दिवशी आमच्या हिंदमाता लेनमधून (आजच्या दत्ताराम लाड मार्ग) तीन मृतदेह पोलिसांनी आणून महापालिकेचा कचरा गाडीत टाकून नेलेले मी बघितलेले आठवतात. काळाचौकीच्या नाक्यावर असलेल्या भिवंडीवाला चाळीच्या गच्चीतून एके रात्री खुपच गोफ़णगुंडा झाला होता. दुसर्या दिवशी त्याच चाळीतून चौघांना पोलिसांनी झोडपून काढत रस्त्यावर आणलेले मी बघितले होते. दिग्विजय मिलच्या गेटसमोरच आमची चाळ होती. रस्त्याच्या बाजूला तिसर्या मजल्यावर आमची खोली होती. तिच्या गॅलरीच्या खिडक्यांना जाळीची दारे होती. त्यामुळे तीच एक गॅलरी सुरक्षित मानली जायची. मग चाळीतले तमाम बुजूर्ग आमच्या गॅलरीमध्ये गर्दी करायचे आणि आम्ही घरचे असून आम्हा पोरांना तिथे प्रवेश नसायचा. पण हे मोठे बाजूला झाले; मग आम्हाला रस्त्यावर थोडे डोकावण्याची संधी मिळायची. त्या आंदोलनाचा भडका उडाला होता, तेव्हा पोलिसांचे हालही बघितले आहेत. बिचार्या पोलिसांना रस्त्यावर आडोसा नव्हताच; पण प्रातर्विधी कुठे करायचे ही सुद्धा समस्याच होती. कारण मराठी बाण्य़ाने पिसाळलेली जनता त्यांना आपल्या इमारतीमध्ये घुसू देत नसायची. एके दिवशी आमच्या काळचौकी नाक्यावर मोठी सभा होणार अशी बातमी आली. तिथे ट्रकवर उभे राहून शाहीर अमरशेख यांनी गायलेल्या पोवाड्याचे सूर अजून माझ्या कानात गुंजतात, कुठलाही स्पिकर नव्हता आणि किमान पाचशे पावलावरून त्यांचा आवाज स्पष्ट आमच्या तिसर्या मजल्यावर ऐकू येत होता.
यशवंतराव चले जाव आम्ही मराठे घेतो आण
राहिल अथवा जाईल प्राण, राहिल अथवा जाईल प्राण
अमरशेख, आत्माराम पाटिल अशा शाहीरांनी तेव्हा गाजवलेल्या सभा आणि मोर्चे मिरवणूका म्हणजे कहर होता. ज्यांनी ते युद्धजन्य वातावरण बघितले नाही, त्यांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय ते समजू शकत नाही आणि मुंबईसाठी मराठी माणसाचा हट्ट कशासाठी; तेही कळू शकणार नाही. मराठी राज्यासाठी सर्वत्र आंदोलन व लढा झाला. पण तुंबळ लढाई होती ती मुंबईसाठी आणि झाली सुद्धा मुंबईतच. धरपकड, अटक, गोळीबार लाठीमार अश्रूधूर नेहमीची बातमी होती. पण मी त्या वयात बघितलेला तो प्रसंग आजही आठवतो. हा शाहिरांच पोवाडा झाला; तेव्हा हजारो लोकांचा जमाव त्या नाक्यावर जमा झाला होता. एसेम जोशी येणार अशी बातमी होती. पण ते पोहोचण्यापुर्वीच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची कुमक आली आणि आधी थेट अश्रूधूराची नळकांडी फ़ोडण्यात आली. त्यामुळे जमावाची पळापळ, पांगापांग झाली. काही मिनीटातच त्या रस्त्यावर चपलांचा खच पडला होता. लोकांनी आसपासच्या इमारती चाळींमध्ये आश्रय घेतला होता. आमच्या चाळीतून तरूण हाता्त भरलेल्या कळश्या घेऊन रस्त्यावर पडलेल्या धूर ओकणार्या नळकांड्या विझवायला धावले होते. दिगंबर घाडीने एक नळकांडी उचलून आगावूपणे चाळीत आणली; तर त्याचा पोळलेला हात किती दिवस बरा झाला नव्हता. असे ते दिवस होते. मुंबईसाठी एकाएका मराठी माणसाने सोसलेल्या कष्टाचे, त्रासाचे व दिलेल्या झुंजीचे ते दिवस होते. त्यामुळेच आमची पिढी किंवा तेव्हाच्या गिरणगावातली तरूण व बालकांची पिढी; कॉग्रेसच्या विरोधात लहानाची मो्ठी झाली. ‘मुंबई कोणाची’ म्हटले मग मराठी माणसाचा जीव खालीवर का होतो, ते पुस्तके वा ग्रंथ वाचून इतिहास शिकणार्यांना कधीच कळणार नाही. ज्यांनी तो संघर्ष उमेदीच्या काळात बघितला; त्यांनाच त्याची चाड असू शकते. आणि तोच मराठी तरूण मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यावर सुखावून गेला होता. फ़ुशारला होता. त्यानेच मग १९५७ च्या निवडणुकीत कॉग्रेसला पाणी पाजले होते, म्हणूनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. पण त्या मराठी तरूणाला काय मिळाले? बाळासाहेब गेल्यावर शिवसैनिकाला पोरकेपणा का वाटला, त्याचेही उत्तर आधीच्या प्रश्नातच आहे. (क्रमश:)
भाग ( १४ ) ३/१२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा