शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

तर शिवसेना उदयासच झाली नसती


   सांगायचा मुद्दा इतकाच, की शिवसेना ही परिस्थितीने निर्माण केली. त्यामागे काही योजना नव्हती, की कुठले व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात, तशी मांडलेली संकल्पना नव्हती. ‘मार्मिक’मध्ये नावांच्या याद्या छापल्या जायच्या असे आजकाल वारंवार वाचनात येते. दाक्षिणात्य किंवा गुजराती अशा अमराठी नावांच्या टेलिफ़ोन डिरेक्टरीमधली नावे क्रमाने छापली जायची आणि त्यावर ‘वाचा आणि थंड बसा’ असे शिर्षक असायचे. पुढे त्याला प्रतिसाद मिळाल्यावर ‘वाचा आणि उठा’ असे शिर्षक बदलण्यात आल्याचा हवाला दिला जातो. पण हे ठरवून झाले होते काय? ‘मार्मिक’ सुरू केल्यावर त्यातून, विस्कळीत होऊन गेलेल्या मराठी माणसाच्या मुंबईतील बेचैन असलेल्या तरूणांसाठी प्रबोधनकारांनी लेखन चालू ठेवले होते. त्यामुळे काही मंडळी प्रभावित झाली होती. त्यांनी मुंबईच्या अमराठी वर्चस्वाचे हे दाखले बाळासाहेबांच्या नजरेस आणून दिले आणि ते एक माहिती म्हणून ‘मार्मिक’मध्ये छापले जाऊ लागले. पण त्यातून काहीतरी संघटना व लढा उभारण्याची कल्पना अजिबात नव्हती. तसा त्यातला आवेशही नव्हता. पण जसजशा या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या; तसतसा त्याचा प्रभाव जनमानसावर पडू लागला आणि विविध भागातील तरूणांच्या संस्थांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यातले काही बाळासाहेबांना येऊन भेटू लागले. त्यातून काहीतरी करायला हवे, असा विचारविनिमय सुरू झाला. सहाजिकच अन्य पक्ष जसे काही राजकीय तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून उभे रहातात व आरंभ करतात; तशी शिवसेनेची सुरूवात नव्हती. एका सामान्य सदराने तिचा अनवधानाने आरंभ झाला होता आणि ती संघटना स्वत:च आकार घेऊ लागली होती. त्यासाठी कार्यरत झालेल्यांनाही पुढे त्यातून काही मोठी राजकीय संघटना आकारास येईल याची सुतराम शक्यता ठाऊक नव्हती.

   प्रथम हा तपशील आणून देणार्‍यांनी जी कामगिरी बजावली, त्यातले काही सतत बाळासाहेबांच्या संपर्कात आले. तर त्या याद्या वाचून नंतर काही लोक त्यांच्या संपर्कात आले. त्यातून काहीतरी करायची भूमिका आकार घेऊ लागली. ख्यातनाम व्यंगचित्रकार बाळासाहेब आणि नामवंत समाजसुधारक, लेखक असलेले प्रबोधनकार यांचा गोतावळा मान्यवरांचा होता. त्यातही यावर उहापोह होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे मिळणार्‍या प्रतिसादाला आकार येत गेला. अशी काही प्रादेशिक अस्मितेची संघटना असावी ही प्रबोधनकार व आचार्य अत्रे यांचीही कल्पना होती. महाराष्ट्र सेना असे तिचे नाव ठेवायचाही म्हणे विचार झाला होता. पण तिला कधीच आकार मिळू शकला नाही, असेही त्या काळातले जाणकार म्हणायचे. पण शिवसेना ही त्याच संकल्पनेवर आधारलेली होती; असे नक्कीच म्हणता येणार नाही. तो निव्वळ योगायोग होता. कारण स्वत: बाळासाहेब कधी कुठल्या पक्ष वा संघटनेत नेता किंवा कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले नाहीत वा रमले नाहीत. मग त्यांनी संघटना काढण्याचा विचारही करण्याशी शक्यता कशी असेल? ते सगळेच जुळून आलेले योगायोग होते. मात्र अंगावर आले तर पळायचे नाही, सामोरे जायचे; हा बाळासाहेबांचा स्वभाव असल्याने, ते येईल त्या परिस्थितीला सामोरे गेले आणि इतिहास घडत गेला. त्याला त्या नावांच्या याद्या कारणीभूत झाल्या हे निखळ सत्य आहे. पण आज जसे भासवले जाते, की अमराठी लोकांच्या विरोधात जनभावना भडकावी; म्हणून त्या याद्या मुद्दामच छापल्या जात होत्या, ते निव्वळ असत्य आहे. तो योगायोग होता. पण परिस्थितीने पुढला घटनाक्रम घडवून आणला.

   जेव्हा असा याद्यांचा सामान्य मराठी तरूणाला वागण्यातून अनुभव येऊ लागला; तेव्हा संताप समोर येऊ लागला होता. त्याला जर कुठल्या प्रस्थापित राजकीय पक्ष वा संघटनेने तोंड फ़ोडले असते, तर शिवसेना आकारच घेऊ शकली नसती. म्हणजे इथल्या कामगार संघटना किंवा राजकीय संघटनांनी भूमीपुत्रांवरचा अन्याय; म्हणून तो विषय हाती घेतला असता तर? कारण तो मराठी तरूण त्याच कम्युनिस्ट, रिपब्लिकन, समाजवादी किंवा शेकाप, जनसंघ अशा पक्षातच कमीअधिक प्रमाणात विखुरला होता. त्यापैकी कुठल्याही पक्षाला त्या ज्वलंत विषयावर चळवळ उभारणे शक्य होते. सत्ताधारी म्हणून कॉग्रेस पक्ष तितकी टोकाची भूमिका घेऊ शकला नसता. पण अन्य पक्षांचे काय? त्यांचे बहुतांश नेते व कार्यकर्ते मराठी होते. त्यांनी हा विषय का घेतला नाही? आज बेळगावात कुठलाही पक्ष कानडी म्हणून उभा ठाकतो आणि तिथल्या मराठी लोकांच्या भावनांची पर्वा करत नाही. मुंबईत उत्तर भारतीयांच्या विरोधात आवाज उठवला गेला; मग बिहारसहित तमाम उत्तर भारतातले नेते पक्षविरोध विसरून एकत्र येतात. तसे इथल्या राजकीय पक्षांना तेव्हा मराठी बाणा दाखवून का वागता आले नाही? आजही इथल्या राजकीय पक्षांना स्थानिक अस्मितेचा विषय आला, मग अंग चोरण्याची का गरज भासते? ज्यांनी मराठी भाषिकांचे राज्य व्हावे म्हणून आंदोलन केले; तेच हे सगळे पक्ष होते आणि त्यांचे नेते, कार्यकर्ते मराठीच होते. मग ते राज्य मिळाल्यावर त्या राज्याच्या राजधानीमध्ये मराठी तरूणांची गळचेपी होत असेल, तर कोणी लढायचे? त्या त्या पक्षातल्या मराठी तरूणांनाही तोच प्रश्न सतावत होता. पण त्या मराठी तरूणांच्या घुसमटीला पक्षात वाव नव्हता. त्याला नवा मार्ग शोधणे भाग होते. ती वाट शिवसेना म्हणून निघाली. जर तेव्हाच्या विविध पक्षांपैकी कोणी तो विषय हाती घेतला असता; तर ती वाट शोधलीच गेली नसती.

   ज्यांनी ‘मार्मिक’मध्ये अमराठी नावांच्या याद्या तयार करून दिल्या; ते आणि विविध पक्षातले मराठी तरूण भिन्न होते. पण दोघांच्या मनातले दु:ख सारखेच होते, वेदना सारखीच होती. त्यामुळेच मग विविध पक्ष व संघटनामधल्या त्या तरूणांना नव्या व्यासपिठाची गरज भासू लागली. त्यांची मते ‘मार्मिक’च्या वाचक पत्रातून समोर येऊ लागली आणि मग बाळासाहेबांना काही जाणकारांनी भेटून त्याच भावनेला संघटित रुप देण्याचा विचार पुढे आला. अमराठी लोकांचे वर्चस्व आणि अरेरावी मुंबईतून मोडून काढायला हवी; असे वाटणारे पांढरपेशे आणि गल्लीबोळातले तरूण यांच्यात दरी होती. ती दरी भरण्याचे काम ‘मार्मिक’ने केले. ज्या तरूणाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीने झुंजवला होता, तो रिकामा हात चोळत बसला होता. कारण त्या चळवळीच्या नेत्यांनी व पक्षांनी त्याला वार्‍यावर सोडून दिले होते. तो मुळातच राडेबाज होता. पण असंघटित होता, विस्कळीत होता. राडेबाज म्हणजे दंगामस्ती करू शकणारा, हाणामारीला पुढे जाणारा. साध्या भाषेत ज्याला झुंजार म्हणतात, असा तरूण. तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीने निर्माण केला. ती आयती फ़ौज शिवसेनेला मिळाली. म्हणजे त्यांनीच स्वत:ला शिवसेना म्हणून रुपांतरीत करून घेतले. समितीच्या नेत्यांनी त्यांना वार्‍यावर सोडले होते, त्यांना नेता हवा होता. बाळासाहेबांच्या रुपाने नेता आणि शिवसेनेच्या रुपाने त्यांना संघटनेचे रुप मिळाले. तर मुद्दा इतकाच, की महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या सार्वजनिक जीवनात शिवसेनेने राडा किंवा हाणामारीची संस्कृती आणली ही शुद्ध बनवेगिरी आहे. ती संस्कृती ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची देणगी आहे. खरे तर त्याच संस्कृतीने शिवसेनेला जन्म दिला म्हटले तर वावगे ठरणार नाही.

   त्याच योगायोगाने बाळासाहेब ठाकरे नावाच्या उत्तम व्यंगचित्रकाराला राजकारणात किंवा संघटनात्मक जीवनात आणले. पुढे असे योगायोग जुळत गेले, की त्याच संघटनेला निवडणुकीच्या राजकारणातही उतरावे लागले. बदनाम कृष्ण मेनन याला समितीने उभा केला नसता, तर सेनेला दोनदा ठाणे कल्याणपर्यंत झुंज द्यावी लागली नसती आणि इतक्या लौकर सेना ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीत उतरली नसती. तिथले यश मिळाले नसते तर मुंबईची मोठी महापालिका लढवण्यापर्यंत सेनेची मजल जाऊ शकली नसती. दोन दशकांपासूनचे जुने कम्युनिस्ट, रिपब्लिकन वा समाजवादी पन्नास जागा ज्या मुंबईत कधी लढवू शकले नाहीत; त्याच मुंबईत स्थापनेपासून अवघ्या दोन वर्षात शिवसेनेने शंभराच्या आसपास उमेदवार उभे करायची हिंमत करावी, ही सोपी बाब नाही. सेनेचा पाठींबा विधानसभेत घेतलेल्या व ठाण्यात घेतलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला सेनेची ताकद कळली होती. म्हणूनच प्रा. मधू दंडवते यांनी सेनेशी दुय्यम भागिदार होऊन १९६८ ची मुंबई पालिका लढवायचा पवित्रा घेतला. त्याचा लाभही त्यांना मोठा मिळाला. कधी नव्हे ते त्या पक्षाचे अकरा नगरसेवक निवडून आले. पण त्याच युतीने शिवसेनेला भविष्यातील एक चांगला खंदा प्रामाणिक व अमराठी शिवसैनिक मिळवून दिला. त्याचे नाव होते दादी गोवाडीया. हा समाजवादी कार्यकर्ता शिवसैनिक कसा झाला?    ( क्रमश:)
भाग   ( ३३ )    २२/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा