गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

नगरपित्याला नगरसेवक बनवला कोणी?


   
   १९६७ सालात शिवसेना ठाण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली हे सगळे सांगतील. पण त्याच निवडणुकीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक मोठी भेट राजकीय क्षेत्राला दिली; ते कधी कोणी आठवणीने सांगतो काय? कसे सांगणार? माहित असेल तर सांगेल ना? आज कुठलेही वर्तमानपत्र उघडा किंवा कुठल्या वाहिनीच्या बातमीमध्ये नगरपालिका किंवा महापालिकेची बातमी असेल; तर तिच्या सदस्याचा उल्लेख कसा केला जातो? कॉग्रेसचा नगरसेवक, भाजपाचा नगरसेवक असाच उल्लेख होतो ना? हा नगरसेवक शब्द कोणी आणला? त्याच्या आधी नगरपालिकेच्या सदस्याला कोणत्या नावाने संबोधले जात होते? आमच्या लालबागचा कृष्णा देसाई कम्युनिस्ट पक्षातर्फ़े विधानसभेचा आमदार होण्याआधी तिथूनच मुंबई महापालिकेचा सदस्य म्हणून निवडून आलेला होता. प्रजासमाजवादी पक्षाच्या भास्कर देसाईचा पराभव करून कृष्णा देसाई महापालिकेचा सदस्य झाला. तोपर्यंत त्या सदस्यांना सीटीफ़ादर्स म्हणजे नगरपिता म्हटले जात होते. अगदी १९६७ पुर्वीच्या वृत्तपत्रातल्या बातम्या काढून बघा. त्यात तुम्हाला नगरपिता असाच उल्लेख सापडेल. जेव्हा शिवसेना ठाण्याच्या निमित्ताने पलिका निवडणुकीत उतरली; तेव्हा बाळासाहेबांनी जी भूमिका त्यासंदर्भात मांडली, त्यात ही भूमिका मोलाची होती. ‘निवडून येणारा पालिकेचा सदस्य तुमचा बाप नाही, तुम्ही मतदार व नागरिक त्याचे बाप आहात. म्हणूनच बाप निवडू नका, तुमचे सेवक निवडा’ असे आवाहन बाळासाहेबांनी केले होते. शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, ते तुमचे बाप नातील, शहराचे पिते नसतील तर सेवक असतील. म्हणूनच त्यांना ‘नगरसेवक’ संबोधले जाईल; असे बाळासाहेब प्रत्येक प्रचारसभेतून सांगायचे. तेव्हा त्यांची यथेच्छ टवाळीही झाली. पण आज कुणाला तो जुना नगरपिता शब्द आठवतो तरी काय? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि सरसकट वापरातून नगरपिता हा शब्दच हद्दपार झाला आहे. प्रत्येकजण नगरसेवक हाच शब्द वापरत असतो. राजकारणाला गजकरण म्हणणारी शिवसेना शेवटी त्याच राजकारणात उतरली आणि पालिका निवडणुकीपासून त्याची सुरूवात झाली; हे अगत्याने सांगणार्‍यांना, त्याच निवडणुकीने केलेले हे आमुलाग्र परिवर्तन का लक्षात नाही? शिवसेना व बाळासाहेब यांनी राजकीय भाषेला दिलेली ही एक अमूल्य देणगी नाही काय? त्यांनी नगरपित्याला नगरसेवक बनवला.

   अर्थात अशा गोष्टी माहित असायला, शिवसेना घडताना बघण्याची गरज आहे. त्यावेळच्या आख्यायिका सांगणार्‍याच्या पोपटपंचीवर आधारित मत बनवायचे आणि त्यावरच निष्कर्ष काढायचे असतील; तर बट्ट्याबोळच व्हायचा. आणि म्हणूनच शिवसेना निवडणुकीत कशी व का उतरली? तिच्यासाठी पोषकभूमी कोणी कशी तयार करून दिली; तेही समजून घेणे अगत्याचे होते. ठाणे, कल्याणमध्ये लागोपाठ दोन निवडणूका लोकसभेसाठी झाल्या नसत्या आणि त्यात डाव्यांनी बदनाम मेनन उभा केलाच नसता; तर सेनेच्या संघटित ताकदीचा अंदाज तिलाही आला नसता. पण त्याच आधीच्या निवडणुकीतील एक घटक तेवढाच महत्वाचा आहे. शिवसेनेची त्यावेळची कुवत ओळखून एका पक्षाने सेनेशी जवळीक केली होती. त्या पक्षाचे नाव होते, प्रजा समाजवादी पक्ष. मधू दंडवते, त्याचे मुंबईतील नेता होते. त्यांच्या दादरमधील विधानसभा उमेदवारीला सेनेने पाठींबा दिल्याने बाळसाहेबांशी त्यांचे सौहार्द निर्माण झाले होते. सहाजिकच लगेच आलेल्या ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीत प्रसपने शिवसेनेशी युती केली. म्हणजेच पहिली निवडणुकही सेनेने स्वबळावर लढवली नव्हती. त्यात त्यांच्यासोबत सानेगुरुजींचा वारसा सांगणार्‍या राष्ट्र सेवा दलीय लोकांचा भरणा असलेल्या समाजवाद्यांचा पक्ष होता. या दोघांनी ठाण्यातील जागांचे आपसात वाटप करून घेतले आणि त्या पहिल्या प्रयत्नातच त्या युतीला तिथे बहूमत मिळाले. त्यामुळे युतीतील मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचे वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले तर प्रसपला उपनगराध्यक्षाचे पद देण्यात आलेले होते. मला नक्की आठवत नाही, पण कोणी पेंड्से नावाचे समाजवादी गृहस्थ त्या पदावर निवडून आले होते. आणि आज सेवादलीय म्हणुन सेनेची टवाळी करण्यात धन्यता मानणारे निखिल वागळे तेव्हा धड चड्डी देखिल परिधान करण्याच्या वयात नव्हते. तर त्यांना समाजवादी इतिहास तरी कुठे माहित असणार? म्हणुन तर दहा महिन्यांपुर्वी ठाणे, मुंबई वगैरे पालिका निवडणुकीत कायबीइन लोकमतवर बोलताना, त्या मुर्खाने सतीश प्रधान यांना त्या पहिल्या निवडणुकीत ठाण्याचे सेनेचे नगराध्यक्षही करून टाकले होते. तर ठाण्यातलेच उदय निरगुडकर तेव्हा विश्लेषक म्हणुन निखिल सोबत होते आणि त्यांनीही नंदीबैलासारखी मान डोलावली होती. आज ते झी २४तासचे संपादक झाले आहेत.

   सतीश प्रधान हा त्यावेळचा तरूण उमदा नगरसेवक होता. आनंद दिघे व गणेश नाईक तेव्हाचे युवा सेनावाले म्हणता येतील इतके कोवळे होते. शब्बीर शेख, अशोक शाईवाले असे वरिष्ठ म्हणता येतील ते शिवसैनिक ठाण्यातल्या सेनेची धुरा चालवत होते. तेव्हा शिवसेनेत नेता वगैरे भानगडी नव्हत्या. शिवसेनाप्रमुख असे एकच पद होते. बाकी सारे शिवसैनिक किंवा शाखाप्रमुख असायचे. पण पहिला नगराध्यक्ष म्हणुन वसंतराव मराठे यांना मोठा मान सेनेच्या व्यासपीठावर मिळत असे. आणखी एक मजा सांगायला हवी. आपले नगरसेवक जनतेची सेवा करतील आणि राजकारणापासून दूर असतील असे आश्वासन बाळा्साहेबांनी दिलेले होते. पण आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी त्यांनी आपली संघटना एकजीव असल्याचे सांगताना; कोणी नगरसेवक सेनेतून फ़ुटला तर त्याची ठाण्यात गाढवावरून धिंड काढली जाईल, असेही सांगून टाकलेले होते. इतके बेधडक व आक्रमक बोलणेच मुळात राजकारणात नवे होते. सहाजिकच त्याची पत्रकार विचारवंतांकडून टवाळीही होत असे. पण तेवढीच वाक्ये शोधून त्याला वारेमाप प्रसिद्धीही मिळत असे. सहाजिकच या गाढवावरच्या धिंडीलाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि मग शंकर पाटलांच्या ‘धिंड’ या गोष्टीसारखा प्रसंग ओढवला. मंत्रीपदाच्या मोहात सापडून कॉग्रेसमध्ये छगन भुजबळ गेले, त्याचा वारंवार उल्लेख होतो. पण तशा गोष्टी शिवसेनेत पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत. ठाण्यात असेच मारोतराव शिंदे प्रकरण घडले. नगराध्यक्षपदासाठी या शिवसेनेच्या नगरसेवकाने शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला. आता त्याची धिंड काढून शब्द पाळण्याची वेळ शिवसेनेवर आली. ‘मार्मिक’ या मुखपत्राने मारोतराव शिंदे यांच्याविरोधात झोड उठवली होती. आणि ठाण्यात एकूणच वातावरण तंग होऊन गेले. शिवसैनिक म्हणजे झुंड; ती केव्हा जमेल आणि केव्हा येऊन तुटून पडेल; याचा भरवसा नव्हता. त्यामुळेच शिंदे यांना पक्षांतराला प्रोत्साहन देणार्‍या कॉग्रेस पक्ष व त्याच्या सरकारवर शिंदे यांना संरक्षण देण्याची पाळी आली. त्यात मग पदावर निवडून येणे वगैरे दुय्यम झाले होते. फ़ुटणार्‍याला धडा शिकवण्याला महत्व आले होते. मारोतराव शिंदे हा बहूधा ठाण्याच्या इतिहासात पोलिस संरक्षणात वावरलेला पहिलाच राजकीय नेता, कार्यकर्ता असावा. त्याचे कारण हे असे धिंड होते.

   अर्थात मारोतराव शिंदे हा शिवसेनेतून बाहेर पडलेला ठाण्यातला एकमेव शिवसैनिक वा नगरसेवक नव्हता. पुढल्या काळात अनेकजण फ़ुटले. अगदी आज अगत्याने उल्लेख केला जातो, त्या खोपकरपर्यंत. महापालिका होऊन सतीश प्रधान ठाण्यातील सेनेचे पहिले महापौर झाले. पण दुसर्‍या वर्षीच्या निवडणुकीत वसंत डावखरे यांनी बाजी मारताना शिवसेनेची मते फ़ुटली होती. त्यात श्रीधर खोपकर असावा हा संशय होता. त्यात त्याचा बळी पडला. त्याची मुंबईच्या उपनगरात हत्या झाली, ती शिवसैनिकांनीच केली असा आरोप होता. मग काय पुढल्या काळात कोणीही सेनेतुन फ़ुटणार अशी बातमी असली, मग त्याचा खोपकर होणार असे बातमीत अगत्याने लिहिले जात असे. पण इतकी वर्षे उलटून गेली आणि ठाण्यासारख्या टुमदार नगराचे महापालिकेत रुपांतर झाले; तरी अजून शिवसेनेची ठाण्यावरची पकड ढिली झालेली नाही. दरम्यान तेव्हाचा शिवसेनेचा पहिला मित्रपक्ष प्रजा समाजवादी पक्षाचे आज नामोनिशाण उरलेले नाही. पण त्यांचे जे कोणी वंशज आज पांगलेले व विखुरलेले आहेत, त्यांना आपली अशी अवस्था कशामुळे झाली असा विचारही करावेसे वाटत नाही. ही केवढी शोकांतिका आहे ना? जो पक्ष वा त्याचे वारस, स्वत:ला विचारवंत म्हणतात किंवा वैचारिक टेंभा सातत्याने मिरवत असतात, त्यांना आपण इतके नामोहरम का झालो व ज्यांच्याकडे विचारच नाही म्हणतो, ती शिवसेना अजून का टिकली आहे, त्याचा विचारही करावासा वाटू नये? यापेक्षा वैचारिक दिवाळखोरी कोणती असू शकते? पण तेच आजच्या वैचारिकतेचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. ज्यांना धड विचार करता येत नाही, ज्यांचे विचार सुस्पष्ट नाहीत किंवा ज्यांच्यात निव्वळ वैचारिक गोंधळच आहे; त्यांना आजकाल विचारवंत म्हटले जाते. मग समाजवाद्यांना तरी दोष देऊन काय उपयोग? (क्रमश:)
भाग   ( २५ )    १४/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा