१९६० सालात मी फ़ारतर बारा वर्षाचा होतो. आम्ही त्या वयात वृत्तपत्र वाचायला लागलो होतो. मराठी भाषिकांना त्यांचे राज्य मिळाल्याचा आनंद होता आणि त्यावर वडिलधारी माणसे खुश आहेत; म्हणजे खरेच काही मोठे महान घडले आहे, असे आम्हाला आपोआपच वाटत होते. आज मुले जितक्या चौकसपणे वाटेल ते प्रश्न व शंका पालकांना विचारू शकतात, तेवढे विचारस्वातंत्र्य तेव्हाच्या मुलांना उलपब्ध नव्हते. त्यामुळे वडिलधार्यांच्या हातातून वर्तमानपत्र मोकळे झाल्यावर त्यात डोकावण्याची पर्वणी असे. त्यात जे काही हाती लागायचे तेच खुप होते. सगळ्यांच्या घरात वृत्तपत्रे येत नसत, कारण तो एक वेगळा खर्च मानला जायचा. सहाजिकच ज्यांच्याकडे वर्तमानपत्र खरेदी करायची श्रीमंती होती, तेही आपापसात वाटून वृत्तपत्रे घेत असत. म्हणजे आमच्या घरी ‘नवशक्ती’ यायचा तर दोन खोल्या पलिकडे महाजनांच्या घरी ‘मराठा’ आणि पलिकडल्या बाजूच्या निमकरांकडे ‘लोकसत्ता’ असायचा. मग त्यांच्या घरातले वाचून संपले; मग दुपारच्या सुमारास ही वर्तमानपत्रे शेजारच्या घरात जायची. थोडक्यात चाळीमध्ये कुणाच्याही घरी येणारे वर्तमानपत्र हे सामुहिक वाचनालयासारखे फ़िरत असे. मात्र असे असले तरी ते ज्या घरातले असे; तिथे संध्याकाळची दिवेलागण होईपर्यंत परत यायचे. कारण तेव्हा वर्तमानपत्राच्या रद्दीला सुद्धा किंमत होती. ती रद्दी महिना दोन महिन्यात विकल्यानी आठवड्याच्या रेशनचे पैसे निघत असत. थोडक्यात घरातली रद्दी देखिल उत्पन्नाचे साधन होती. अशा काळात आम्हा मुलांना वर्तमानपत्र शेजारून आणायचे; तर त्यात डोकावून घेण्याचीस संधी साधावी लागत असे. किंवा सगळ्यांची वाचून चोथा म्हणून बाजूला फ़ेकलेल्या वर्तमानपत्रावर ताव मारावा लागत असे, अर्थात त्यातले किती कळत असे हा भाग वेगळा. पण त्याही काळात एक जगबुडी होणार असल्याची बातमी आम्हा मुलांमध्ये कुजबुजीचा विषय झालेली आठवते. मग आम्ही तिसर्या मजल्यावरचे पहिल्या मजल्यावरच्यांना तुम्ही कसे वाचणार, की बुडणार असा भाबडा प्रश्नही विचारायचो. त्यात सोळा वर्षाच्या बाब्याने सगळ्यांनी गच्चीत जाऊन बसायचे आहे, पाणी ओसरल्यावर परत यायचे असे सांगितलेले आठवते. तेव्हा तो बाब्या पवार आम्हाला केवढा महान ज्ञानी पुरुष वाटला होता.
असा तो काळ होता, जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मग त्या बातम्यांमधून वा वडिलधार्यांच्या बोलण्यातून समिती फ़ुटल्याचे कानावर यायचे. पण समिती फ़ुटली म्हणजे काय; त्याचा थांगपत्ता नव्हता. माझी आई तेव्हा अशा बारीकसारीक राजकीय कार्यक्रमात भाग घ्यायची. वडिलांना त्यात फ़ारसा रस नव्हता. माझ्या आईचा प्रजा समाजवादी पक्षाकडे ओढा होता. त्यामुळे मग माझ्यापेक्षा मोठी बहीण काहीकाळ सानेगुरूजी कथामाला किंवा राष्ट्र सेवा दल अशा संस्था, संघटनांमध्ये जायची. पण सुदैवाने मी असा कुठे जबरदस्तीने घातला वा पाठवला गेलो नाही. मात्र प्रजा समाजवादी म्हणजे प्रसपच्या ज्या लालबाग वॉर्डाच्या बैठका व्हायच्या; त्याला मी त्या कोवळ्या वयात हजेरी लावायचो. तिथे काय तात्विक बोलले जाते, त्याचा मला कधी अर्थच कळला नाही. पण आपण अवघ्या जगाच्या संबंधात चाललेल्या कुठल्या तरी महान प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत; याचा अभिमान मात्र वाटायचा. अशा बैठकींना त्या भागातले प्रसपचे पंधरावीस कार्यकर्ते आलेले असायचे. महिन्या दोन महिन्यातून अशी बैठक असायची. तिथे वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिका, विषय वा आंदोलनाच्या तयारीची चर्चा चालायची. पोस्टर्स येतील ते कुठे व कोणी लावायचे; असा काहीसा प्रकार चर्चेत असायचा. त्यात वराडकर गुरूजी म्हणून साठी पलिकडचे गृहस्थ असत आणि ते कायम डुलकी लागल्यासारखे शांत बसलेले असत. पण मध्येच एखाद्या मुद्द्यावर तावातावाने बोलू लागत. मात्र त्यांची झोपलेली मुद्रा अजिबात बदलत नसे. प्रसपच्या एका सभेचे आयोजन आमच्या सुदाम भुवन चाळीच्या गच्चीवर झाले होते. तिथे एसेम जोशी येणार म्हणून केवढी धावपळ पंधरा दिवस चालू होती. शेसव्वाशे लोकांची ती सभा झाली आणि एसेमनी आमच्या घरी चहा पोहे खाल्ल्याचे कौतुक माझे पालक कित्येक महिने जगाला अगत्याने सांगत होते. त्याची महत्ता पुढे चारपाच वर्षांनी कळली.
त्यानंतर मात्र आमच्या घरी प्रसपच्या मान्यवरांची वर्दळ सुरू झाली. भाऊ पाध्ये यांची पत्नी शोषन्ना पाध्ये आणि डॉ. लिला अव्हारिस ( त्या १९६८ नंतर नगरसेविका झाल्या) यांचे नेहमी आमच्या घरी येणेजाणे होते. लिलाताई भारतमाता थिएटरसमोर असलेल्या मोरारजी मिलमध्ये लेबर ऑफ़िसर होत्या. त्या मिलमध्ये काम करणारे सातआठ लोक आमच्या चाळीत होते. त्यांना मग आमच्या आईविषयी आदर वाढला होता. मात्र ही मोजकी डोकी सोडली तर सामान्य लोकांमध्ये कुठे प्रसप नावाच्या पक्षाचा बोलबाला दिसत नसे. आमचा गिरणगाव म्हणजे विळाकणिस. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. त्या कोवळ्या वयात प्रसपच्या स्थानिक बैठकीला आईच्या सोबत जायचो. तेव्हा मला त्यातले काही कळत नव्हते. पण तरीही मी त्या नीरस बैठकीला जायला अत्यंत उत्सुक असायचो, त्याचे कारण त्या बैठकीला येणारा एक विक्षिप्त माणूस. भारतमाता जवळच्या हाजीकासम चाळीत तळमजल्याला एका नाट्यमंडळाची खोली होती. तिथे ह्या बैठका व्हायच्या. त्यात मला आवडणारी व्यक्ती होती दादी गोवाडीया. त्या बहूतांशी कोकणी, घाटी मराठी कष्टकर्यांच्या बैठकीत वेगळा असा एक माणूस होता, तो हा पारशी. तोही कोणी मोठा पैसेवाला श्रीमंत पारशी नव्हता. मोरारजी मिलच्या भिंतीला लागून असलेल्या एका चाळीतला तो रहिवासी. पण अत्यंत कट्टर समाजवादी कार्यकर्ता होता. तो ज्या मराठीत बोलायचा, त्यातून मुद्दा मांडला जाण्यापेक्षा विनोदच निर्माण होत असे. माझ्यासारख्या मुलासाठी त्या नीरस बैठकीत तो मोठाच विरंगुळा असायचा. जुन्या सिनेमात वा मराठी नाटकात पारशी पात्र विनोदासाठी घातलेले असे. इथे ते पात्र साक्षात माझ्या समोर असायचे.
पारशी मंडळी अत्यंत प्रेमात वा रागाने बोलताना मस्त शिव्यांचा वापर करतात. दादी त्याला अपवाद नव्हते. तिथे हाजीकासम चाळीच्या त्या इवल्या खोलीतल्या बैठकीत; त्यांचे मुद्दे तावातावाने मांडताना त्यांना शिव्या आवरता येत नसत. आणि त्यात समोरच्याला त्यांचा मुद्दा पटला नाही किंवा त्यावर अकारण शंका घेतली जाते असे वाटले; मग दादी चिडायचे. तेव्हा शिव्यांची झकास उधळण व्हायची. शाला (साला), भडवा हे त्यांचे अत्यंत प्रिय शब्द होते. जो आवडता असेल त्याच्याविषयी विशेषण म्हणुन दादी ते शब्द सहजगत्या वापरायचे. त्या कोवळ्या वयातही त्यांनी अशा बैठकीत कम्युनिस्ट आणि विशेषत: कृष्णा देसाईच्या गुंडगिरीच्या विरोधात केलेल्या तक्रारी अजून आठवतात. त्यांचा एकच मुद्दा असायचा. जोपर्यंत कम्युनिस्टांच्या गुंडगिरीला प्रसप चोख उत्तर देणार नाही, तोपर्यंत पक्षाला त्या गिरणगावात पाय रोवून उभे रहाता येणार नाही. पण दादींचा तो मुद्दा तिथे बसलेल्या सानेगुरूजींच्या शिष्यांना पटत नसे. कथामाला किंवा सेवादलात संस्कार झालेल्यांना हाणामारी किंवा हिंसक मार्ग मान्य नसायचा. त्यामुळे कम्युनिस्ट दादगिरीला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा दादींनी वापरली; मग लगेच त्याबद्दल हरकतीचे मुद्दे उपस्थित व्हायचे. मी तसा सोबतच्या पोरांमुळे विळाकणिस म्हणजे कम्युनिस्ट समर्थक होतो. विळाकणिस म्हणजे कम्युनिस्ट पक्ष हे तेव्हा ठाऊक नव्हते हा भाग वेगळा. पण झुंज दिली पाहिजे, हा दादींचा मुद्दा मला पटायचा. पण माझी तिथली उपस्थिती, केवळ आईच्या सोबत आलेला इतकीच असायची. बोलायची मुभा नव्हती. पण असे झाले; मग दादी गोवाडिया खवळायचे आणि जी शिव्यांची बरसात व्हायची, ती पर्वणी असायची.
महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, त्यानंतर मुंबई वा प्रामुख्याने ज्याला गिरणगाव किंवा कष्टकरी वस्त्यांची मुंबई होती, तिथे असे कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. म्हणजे त्यांच्याकडे हाणामारी करू शकणार्या भणंग तरुणांचे घोळके होते. आणि त्या तरुणांची हौस, मस्ती जिरवण्याचा अजेंडा त्यांच्याकडेच होता. प्रसप वा अन्य पक्ष त्या मस्तवाल पोरांना तत्वज्ञान शिकवून वैचारिक क्रांती करायला धडपडत होते. त्यांना प्रतिसाद कोण देणार? याचा अर्थ हाणामारीच हवी असा नाही. पण जेव्हा कम्युनिस्ट अन्य कोणाला पक्षाच्या सभा किंवा प्रचारही करायला गुंडगिरीने रोखत होते, तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने दोन हात करायला हवेत अशी दादी गोवाडीयांची भूमिका होती. पण त्यांचे कोणी त्यांच्याच पक्षात ऐकत नव्हता. अनेकदा पक्षाचा प्रचार करताना ज्या समाजवाद्यांना कम्युनिस्टांचा जबर मार खावा लागला; त्यात गोवाडियांचा समावेश होता. मला ऐकलेले आठवते, की एकदा तर प्रसपच्या सभेत दगडांचा मारा सोसणार्या गोवाडीयांना दिर्घकाळ इस्पितळात उपचारासाठी पडावे लागले होते. बोटचेपेपणा व शामळूपणा यामुळे समाजवाद्यांना कामगार वस्त्यांमध्ये आपला जम बसवता आला नाही. मग त्यांच्याप्रमाणेच कम्युनिस्ट विरोधात असलेल्या तरूणांसमोर अन्य पर्याय कुठला होता? ( क्रमश:)
भाग ( ३४ ) २३/११/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा