तोच निरर्थकपणा पुन्हा पुन्हा करत रहायचा आणि काहीतरी वेगळे घडेल अशी अपेक्षा करायची याला मुर्खपणा म्हणतात - अल्बर्ट आईन्स्टाईन
आपल्याकडल्या बहूतांश राजकीय विश्लेषकांमध्ये हा गुण ठासून भरलेला आढळतो. मग त्यांना बंगालमधील ममता बानर्जीच्या यशाचे रहस्य उलगडायचे असो; किंवा महाराष्ट्रातल्या शिवसेना वा देशातील भाजपाच्या यशस्वी वाटचालीचे विश्लेषण करायचे असो. पहिली गोष्ट म्हणजे असे विश्लेषक व अभ्यासक कुठलाही राजकीय घडामोडींचा अभ्यासच करत नाहीत. त्यांच्या डोक्यात एक सिद्धांत तयार असतो. मग त्या सिद्धांताला पुरक असे पुरावे म्हणजे घटना, घडामोडी ते शोधतात आणि त्यालाच संशोधन असे नाव देतात. वास्तवात ते संशोधन नसते तर पोलिस तपासासारखे वा चौकशीसारखे काम असते. पोलिस कसे, आधी एखाद्या गुन्ह्याची नोंद करतात आणि मग त्यांचा संशय असतो, त्याच अनुषंगाने शोध घेऊ लागतात. मग त्यांचाही शोध बाजूला पडतो आणि पोलिस जागा होतो. म्हणजे असे, की ते सत्य शोधतच नाहीत, तर आपल्याला हवे ते शोधतात आणि सत्याकडे पाठ फ़िरवतात. पोलिस काय करतात? शोध घेताना आरोपी ज्यात अडकू शकतो, असे पुरावे गोळा करत जातात. पण आरोपी सुटेल, असे पुरावे सापडले तरी बाजूला फ़ेकतात. त्याचे कारण ज्याच्यावर आरोप ठेवलेत; त्याला अडकवण्यात त्यांना रस असतो. त्यांना गुन्ह्याचा शोध वगैरे घ्यायचा नसतो. अशा कामाला संशोधन म्हणत नाहीत. त्याला तपास म्हणतात. संशोधन त्याला म्हणतात, जिथे सत्याचा व वास्तवाचा शोध घेतला जात असतो. राजकीय विश्लेषक तसे काम करत नाहीत. त्यांचे सिद्धांत आधीच तयार असतात. तेच लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांना काही तपशील हवे असतात वा पुरावे शोधायचे असतात. मग सत्य लोकांसमोर कसे आणले जाईल?
यातला नेमका फ़रक असा असतो, की पोलिसांनी गुन्हेगार पकडला व त्याच्यावर आरोप ठेवले तरी त्याच्यावर कायद्याच्या कोर्टामध्ये आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला निर्दोष मानावे अशी सभ्यता पाळावी हे कायद्याचे बंधन आहे. तुम्ही कोणी इंग्रजी वाहिन्या बघत असाल, तर त्यावर अमेरिकेतील अस्सल पोलिस कारवाईचे प्रत्यक्ष चित्रण ‘कॉप्स’ म्हणून दाखवणारी एक मालिका आहे. त्याच्या आरंभीच प्रेक्षकांना सूचाना दिली जाते. इथे दाखवले जातात, त्या आरोपींना गुन्हा सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानावे. हे सभ्यतेचे बंधन मनोरंजनाची मालिका असूनही त्या वाहिन्या पाळतात. पण आपल्याकडल्या वृत्तवाहिन्या चर्चा करताना आरोप आहेत; म्हणूनच एखाद्याला बेधडक गुन्हेगार असल्यासारखे खुलेआम उल्लेख करत असतात. हा असभ्यपणाचा प्रकार नाही काय? मग असे होते, की पाचदहा वर्षांनी त्याच बातम्या पुरावा किंवा संदर्भ म्हणून वापरल्या जातात आणि त्यावर आधारित निष्कर्षही बेधडक सांगितले जातात. सगळाच प्रकार असा होत असेल तर तुमच्यापर्यंत सत्य पोहोचायचे कसे? याचे अगदी ताजे उदाहरण हवे असेल तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याच्याकडे बघा. गेल्या दहा वर्षे त्यांच्यावर वाटेल ते व वाटेल तसे आरोप चालू आहेत. आणि अनेकदा न्यायालयाने तपास करून, खास तपासणी पथके नेमूनही आरोप फ़ेटाळले आहेत. पण म्हणून खोट्या आरोपाखाली मोदींच्या विरोधातल्या गप्पा थांबल्या आहेत काय? मोदी यांच्यावर नवे आरोप होतच असतात आणि नुसता आरोप व्हायची खोटी, की लगेच वाहिनीवर बातम्या झळकतात, ‘मोदी अडचणीत’. कशी मजा आहे ना? इतकी वर्षे किमान शंभरवेळा अडचणीत आलेले मोदी एकदाही फ़सलेले नाहीत. याला म्हणतात आजकालचे राजकीय विश्लेषण.
आता इतके होऊनही निवडणुका मोदी जिंकतात. तर त्यांनी विजय मिळवला म्हणून त्यांचे गुन्हे माफ़ होत नाहीत असेही पांडित्य सांगितले जाते. परंतू असे युक्तीवाद करणारे पुन्हा कॉग्रेस व युपीएने विजय मिळवला; मग त्यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचाही दावा करतात. मग मोदींच्या विजयाने त्यांच्याही कामाला दाद मिळाली, असे का मानायचे नाही? त्याचे उत्तर नसते. जिथे आपल्याला अडचणीचे होईल; त्याबद्दल बोलायचेच नाही, याला हल्ली विश्लेषण म्हटले जाते. शिवसेनेचा शेहेचाळिस वर्षाचा इतिहास असाच आहे. तिच्यावर वाटेल ते आरोप झाले आणि त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. आता त्याच जुन्या अरोपांना पुरावे म्हणून समोर आणले जात आहे. त्यातला एक मोठा आरोप म्हणजे कॉगेसनेच शिवसेनेचे भूत उभे केले. शिवसेनेला कॉग्रेसनेच वाढवले. आपण हा आरोप युक्तीवादासाठी मान्य करू. पण मग असे कॉग्रेसने कशासाठी करावे? तर मुंबईत डाव्या पक्षांची जी ताकद होती; ती खच्ची करण्यासा्ठीच कॉग्रेसने हे डावपेच खेळले होते, असाही दावा विश्लेषक कित्येक वर्षापासून करीत आहेत. तोही मान्य केला, तरी एक प्रश्न शिल्लक उरतो, की असे असेल तर त्या डाव्या पक्षांना त्याचे दु:ख कशाला होते? त्यांचे दु:ख शिवसेनेकडून आपल्या शेवटाबद्दल आहे काय? त्यांचे दु:ख कॉग्रेसला संपवण्याच्या त्यांच्या मोहिमेत शिवसेनेने व्यत्यय आणल्याचे त्यांचे दु:ख आहे काय? असेल तर मग त्यांनी मरू घातलेल्या कॉग्रेसला वाचवण्य़ाचे पाप कशाला केले? १९९५ सालात युतीची सत्ता आली होती. १९९९ च्या निवडणुकीत युतीचे बळ कमी पडले, तेव्हा कॉग्रेसला पुन्हा सत्तेवर यायला कोणी बहूमोलाची मदत केली होती? याच डाव्या विचारांच्या पक्षांनी पुढाकार घेऊन कॉग्रेसला नवी संजीवनी दिली नाही का?
आणि अशा रितीने सेक्युलर पक्षाची सत्ता आणताना; कॉग्रेसला जीवदान देणारे हेच डावे पक्ष होते. म्हणजे यांनी सेक्युलर म्हणून कॉग्रेसला मदत केली तर ते पुण्यकर्म असते. जर गेल्या शेहेचाळीस वर्षापासून कॉग्रेसला संपवण्याच्या कामात शिवसेना हीच डाव्या राजकारणची अडचण होती; तर त्याच कॉग्रेसला १९९९ सालात वाचवायला त्याच डाव्यांनी पुढाकार का घेतला? जी शिवसेना कॉग्रेसची बटीक आहे असे १९६०-७० या दशकात म्हटले जात होते, तीच शिवसेना कॉग्रेस विरोधात उभी राहिली; तेव्हा कॉग्रेसला वाचवायला धावलेले कोण होते? त्यांना कॉग्रेसचे बटीक का म्हटले जात नाही? डाव्यांना संपवताना निदान शिवसेना चाळीस पंचेचाळीस वर्षात आपल्या पायावर उभी राहिली. त्यासाठी कॉग्रेसने तिचा वापरही करून घेतला असेल. पण जेव्हा कॉग्रेसला शिवसेनाच डोईजड होऊ लागली; तेव्हा कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनाला धावलेले कॉग्रेसचे बटीक होत नाहीत काय? की शिवसेनेने केले म्हणजे पाप असते आणि डाव्यांनी तेच केले म्हणजे पुण्य असते; अशी राज्यशास्त्रातील खास व्याख्या आहे? मजेची गोष्ट अशी दिसेल, की शिवसेना कॉग्रेसला मदत करीतही असेल. पण त्यासाठी शिवसेनेने कधी आत्महत्या केली नाही. डाव्यांनी व सेक्युलर पक्षांनी मात्र कॉग्रेसला वाचवण्यासाठी चक्क आत्महत्या केली आहे. १९९९ सालात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सत्तेपासून थोपवताना डाव्यांचा इथला पायाच उखडला गेला. मग २००४ सालात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात कम्युनिस्टांचा बंगालमधून तर लालू, पासवानांचा बिहारमधून पाया उखडला गेला. तरी त्यांना कोणी कॉग्रेसची सतीसावित्री वा बटीक म्हटले नाही. मग तेवढे सुद्धा न करणार्या व आपल्या वाढीसाठी कॉग्रेसची मदत घेणार्या शिवसेनेला कॉग्रेसची बटीक का म्हणायचे; याचे उत्तर आहे काय? त्याचा काही पुरावा आहे काय? पुराव्याची गरजच काय? जुन्या थापांना आज नव्याने फ़ोडणी द्यायची की झाला ताजा पुरावा तयार.
तर आपल्याकडल्या राजकीय विश्लेषकांची ही अवस्था आहे. त्यांना खरी शिवसेनाच माहिती नाही. समजून वा माहिती करून घेण्याची गरज वाटली नाही. त्यापेक्षा तेव्हापासून म्हणजे १९६७ पासून शिवसेनेवर वाटेल ते खोटेनाटे आरोप करण्यात आले, आज त्याचाच आधार घेऊन मनोरंजक कहाण्या रंगवल्या जात असतात. त्यामुळे शिवसेनेचे दोष, चुकाही कधी समोर आणल्या जात नाहीत, की शिवसेनेचे गुण वा तिचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान सुद्धा समोर आणले जात नाही. आणि त्यावरचा कहर म्हणजे असे बोलणारेच पुन्हा बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची पोकळी कोण भरून काढणार असेही प्रश्न विचारत असतात. सत्य स्विकारता येत नाही आणि सहनही होत नाही; अशी या विश्लेषकांची मग तारांबळ उडून जाते. पोकळी वाटत असेल, तर आधी शिवसेनाप्रमुखांनी काय भरीव केले ते शोधावे लागेल आणि मगच ती पोकळी भरायच्या गप्पा करता येतील. ( क्रमश:)
भाग ( १८ ) ७/१२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा