शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

भ्रामक जगातली पत्रकारिता आणि अवास्तव विश्लेषण


   कृती माणसाच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. कृतीची संधी उपलब्ध नसेल तर माणुस ती निर्माण करतो
-अल्बर्ट आईनस्टाईन

   मी पत्रकार किंवा राजकीय विश्लेषकांवर बेछूट आरोप करतोय असे कोणाला वाटू शकेल. पण माझा हा आरोप बिनबुडाचा नाही, तसाच तो केवळ भारतीय पत्रकार वा जाणकारांपुरता मर्यादित नाही. हे अगदी जगभरचे वास्तव आहे. अगदी सोपी व्याख्या द्यायची, तर अलिकडचे कुत्रे भूंकले म्हणून पलिकडचे भुंकू लागते; तशी अनेकदा अवस्था असते. हे ऐकायला कितीही चुकीचे किंवा कडवट असले तरी निखळ सत्य आहे. बहुतांशी अलिकडला जे बोलतो त्याची खातरजमा न करता त्याचे माध्यमात किती भयंकर अंधानुकरण चालते; त्याच्यावर मायकेल मेयर नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने अनुभव कथन करणारे पुस्तकच लिहिले आहे. 1989: THE YEAR THAT CHANGE THE WORLD  ( १९८९; जगाचा चेहरामोहरा बदलणारे वर्ष) असे त्याचे नाव आहे. आणि हा पत्रकारितेत नवखा असतानाचा त्याचा अनुभव आहे. जेव्हा शीतयुद्ध संपायची नांदी झाली होती व त्या दिशे्ने घडामोडी पूर्व युरोपात घडत होत्या, त्याचा तो प्रथमदर्शी साक्षिदार होता. पण त्याच्या अनुभवावर तेव्हा त्याचे संपादकही विश्वास ठेवायला तयार नव्हते. असे का व्हावे? तर त्याचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सहकारी; इतकी वर्षे एक खोटे ऐकून बधीर झाले होते. इतके बधीर की खरे ऐकण्याचेही त्यांना भय वाटू लागले होते. आजवर त्यांनी सोवियत युनीयनच्या पोलादी पडद्याआडच्या ज्या अफ़वा किंवा दंतकथा ऐकल्या होत्या; त्यावर त्यांचा इतका पक्का विश्वास बसलेला होता, की सत्य बघण्याची व ऐकण्याचीही त्यांना भिती वाटू लागली होती. त्या नवख्या पत्रकाराला केवळ योगायोगाने अशा मोठ्या ऐतिहासिक घडामोडीचा साक्षिदार व्हायची संधी मिळाली होती. ती घटना होती दुसर्‍या महायुद्धाने उभी केलेली बर्लिनची भिंत पाडली जाण्याची आणि त्या निमित्ताने तेव्हाच अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी बोललेल्या वाक्याची.

   अमेरिका व सोवियत युनियन यांनी शीतयुद्ध थांबवण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात केली होती. त्यासंदर्भात एक समारंभ होता. त्यातले रिगन यांचे भाषण लिहून देणार्‍याने त्यात लिहिले होते, ‘आधी बर्लिनची ती भिंत पाडा गोर्बाचेव्ह’. रिगन यांनी ते वाक्य त्या समारंभात बोलावे किंवा नाही; यावर प्रचंड खल झाला होता व अखेरच्या क्षणी ते बोलायचे असे ठरले होते. रिगन यांना प्रतिकात्मक म्हणून ते बोलायचे होते व ते बोलले. पण पोलादी पडद्याआड तशाच घटना घडतही होत्या. मात्र जगभरच्या जाणकारांना व खुद्द रिगन व गोर्बाचेव्ह यांनाही त्याचा पत्ता नव्हता. योगायोग असा, की र्रिगन त्या समारंभात तसे वाक्य बोलले आणि अल्पावधीतच लोकांनीच ती भिंत पाडली. त्यामुळे त्या वाक्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. पण प्रत्यक्षात ती भिंत पाडली गेली, तेव्हा हा पत्रकार मेयर तिथे हजर होता आणि ती सर्वच घटना किती आकस्मिक व योगायोगाची होती, त्याचे तपशीलवार वर्णन त्याने पुस्तकात दिले आहे. रेडीओवरच्या एक चुकीच्या बातमीने व त्यासंबंधी कोणीच खुलासा करायला हजर नसल्याने; जो अफ़ाट मानवी लोंढा पुर्व बर्लिनच्या बाजून भिंतीपाशी जमला आणि वाढतच गेला, त्याला आवरण्याच्या पलिकडे परिस्थिती गेली, तो निव्वळ योगायोग होता. एका चुकीच्या बातमीचा विपरित परिणाम होता. ज्याचा तपशील या पत्रकाराने पुढे सविस्तर बातमीपत्र लिहिण्यापर्यंत कुणालाच माहित नव्हता. मात्र गोर्बाचेव्ह यांनी शीतयुद्ध संपवून भिंत कशी पाडली; त्याचे कौतूक जगभरचे पत्रकार करीत होते. प्रत्यक्षात त्याच्याशी ना गोरबाचेव्हचा संबंध होता ना अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचा संबंध होता. तिथे जमलेल्या झुंडीकडून घडलेले ते आततायी कृत्य होते. एका चुकीच्या बातमीने ती झुंड त्या भिंतीजवळ जमा होत गेली आणि बघताबघता त्या झुंडीचे रुपांतर मानवी लोंढ्यात झाले, त्याला अडवणे शक्य नाही म्हणून तिथले सैनिक व रक्षक यांनी शरणागती पत्करली, त्याचा तो संपुर्ण परिणाम होता.

   त्या काळात सोवियत गटाच्या राष्ट्रामध्ये पाश्चात्य किंवा बाहेरच्या पत्रकारांना मोकळे फ़िरण्याची संधी नव्हती. सहाजिकच तिथून कोणी परागंदा होऊन बाहेर यायचा; त्याने दिलेली माहिती किंवा अधिकृतरित्या सरकारी पातळीवर येणर्‍या बातम्या, यावरच सोवियत प्रदेशातील माहितीसाठी अवलंबून रहावे लागत असे. त्यामुळे तिकडे जायला कोणी मोठा जाणकार पत्रकार तयार नसायचा. त्यामुळे ‘न्युजविक’च्या या नवख्या पत्रकाराला तिकडे जाण्याची संधी मिळाली. खरे तर तिथे त्याचा वरिष्ठ जायचा होता. पण त्याने कंटाळा केला आणि मेयरला संधी मिळाली. जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा त्याला तिथे प्रचंड घडामोडी घडत असल्याचा सुगावा लागला. त्याला धक्काच बसला. कारण सोवियत देशांमध्ये इतकी नाराजी व स्फ़ोटक परिस्थिती आहे; याचा बाहेरच्या पत्रकारांनाच थांगपत्ता नव्हता. तर जगाला काय माहित असणार? पण माध्यमे व जाणकार मात्र सोवियत गटाच्या देशात सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत होते. आणि असेच नेहमी होत असते. त्याचे कारण वास्तवापासून माध्यमे खुप दूर असतात आणि माध्यमातले बहूतांशी पत्रकार आपापल्या समजूतीमध्ये इतके मशगुल असतात, की त्यांना सत्याचा पडताळा घेण्याचीही गरज वाटत नाही. त्यामुळे आजची तरी अशी परिस्थिती आहे, की वास्तवापेक्षा राजकीय जाणकार भलतीच भ्रामक प्रतिमा लोकांमध्ये उभी करीत असतात. परिणामी जेव्हा सत्य समोर येते, तेव्हा अनेक जाणकारांची तारांबळ उडत असते. ज्यांनी शिवसेना हा लोकमताचा पाठींबा नसलेला पक्ष आहे व गुंडांची झुंड आहे; अशी प्रतिमा गेल्या चार दशकात लोकांसमोर मांडली, त्यांना शिवसेनाप्रमुख इतके महत्वाचे आता का वाटतात? त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात व सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाल्याचा शोध कधी लागला? कसली आहे ती पोकळी? मजा आहे ना?

   शिवसेनेला व बाळासाहेब यांना राजकारणात इतके महत्वाचे स्थान असेल तर ते त्यांनी कसे मिळवले कधी मिळवले; हे सुद्धा सांगायला नको का? शिवसेना इतकी महत्वाची झाली तर तिला महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान कोणत्या कारणाने व कशामुळे प्राप्त झाले; त्याचाही खुलासा व्हायला हवा ना? महाराष्ट्रात शिवसेनेने हे स्थान मिळवताना आधीपासूनचे बिगर कॉग्रेस पक्ष नष्टप्राय का झाले, याचेही विश्लेषण व्हायला नको का? आधीच्या एकाहून एक विचारधारेच्या राजकीय पक्षांना कॉग्रेस विरोधी राजकारणात जे यश मिळवता आलेले नव्हते; त्यापेक्षा अधिक यश शिवसेना का मिळवू शकली, त्याचेही स्पष्टीकरण व्हायला नको का? पण ते कधीच झालेले नाही. शिवसेनेने जुन्या प्रस्थापित राजकीय पक्षांची जागा कशी व्यापली, कोणत्या कारणाने व्यापली, याबद्दल कधी बोलले गेले आहे का? धर्माचा उन्माद निर्माण केला, धर्माचा आडोसा घेतला, हे आरोप ठिक आहेत. पण लोकांनी त्या शिवसेनेला किंवा त्यांच्या अजेंडाला मान्यता का दिली, याचा खुलासा व्हायला नको का?

   आज जेव्हा बाळासाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असे म्हटले जाते, त्यांनी आपले हे स्थान निर्माण करताना आधी कुठली पोकळी भरून काढली होती? या प्रश्नांची उत्तरे कधी विश्लेषकांनी दिली आहेत का? त्यांनी कधी शोधलीच नाहीत तर देणार कुठून? एसेम जोशी, कॉम्रेड डांगे, उद्धवराव पाटील असे एकाहून एक दांडगे नेते या महाराष्ट्राने बघितले आहेत. पण त्यांनाही कधी इथे सत्तांतर करून कॉग्रेसला पराभूत करणे शक्य झाले नव्हते. ते बाळासाहेबांनी करून दाखवले. त्या दांडग्या नेत्यांचे कधीच निधन झाले. पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झाल्याचे बोलले गेले नाही. त्यांच्यानंतर काय, असे प्रश्न विचारले गेले नाहीत. त्यांच्या पक्षापुरते विचारले गेले असतील. पण एकूणच महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक पोकळी अशी भाषा ठाकरे यांच्यविषयी कशाला? त्यातून या माणसाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर आपली छाप पाडल्याचीच कबुली दिली जात नाही काय? मग ती कबुली देणार्‍यांनी आजवर शिवसेना का स्थापन झाली, तिची वाढ विस्तार का झाला, समाजाच्या कोणत्या घटकांकडून कशामुळे प्रतिसाद मिळाला, अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला नकोत का? पण ती कधीच शोधली गेली नाहीत. त्यामुळेच शिवसेनेबद्दल सर्वत्रच गैरसमज होत राहिले, पसरवले गेले. आणि शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने जे वास्तव समोर येऊन उभे ठाकले, तेव्हा त्याचा आवाकाही यातल्या कोणा विश्लेषकांना घेता येईना. त्यामुळे मग जुन्या त्याच अफ़वा व गावगप्पांना फ़ोडणी देण्याचे उद्योग सुरू झाले. सत्य इतकेच आहे, की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालवणार्‍या पक्ष व नेत्यांनी पुढे त्याच मराठी माणसाला व प्रामुख्याने मुंबईतल्या मराठी माणसाला वार्‍यावर सोडल्याचा परिणाम म्हणजे शिवसेना एवढेच ते सत्य आहे. त्यातूनच शिवसेनेचा उदय झालेला आहे.   ( क्रमश:)  
भाग   ( १९ )    ८/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा