माझ्या लेखात आणि लिखाणात नेहमी विद्वान, विचारवंत किंवा विश्लेषकांचा उद्धार असतो, असा एक आक्षेप आहे. तो रास्तही आहे. कारण मला अशी माणसे समाजाचे प्रबोधन करणारी असावित असे वाटते. आणि खरे विचारवंत, बुद्धीमंत ते काम नेहमीच करत आलेले आहेत. पण त्यांना तसा आव आणून मिरवण्याची कधी गरज भासत नाही. आपण हिरो आहोत असा आभास निर्माण करण्यासाठी कुणाकडे व्हीलन म्हणजे खलनायक; म्हणून बोट दाखवावे लागत नाही. ज्यांना तसेच करावे लागते, त्यांना वास्तव सांगायचे नसते; तर कथाकथन करायचे असते. आणि कथानकामध्ये मग स्वत:ला किंवा कोणाला हिरो वा नायक म्हणून उभे करायचे असेल; तर खलनायकही आवश्यक असतो. तसा ही मंडळी विचार सांगणे सोडून खलनायकाची कथा सांगू लागतात आणि त्यातून स्वत:ला नायक म्हणून पेश करतात. मात्र काळाच्या ओघात असे नायक टिकत नाहीत. उलट त्यांनीच रंगवलेले खलनायक इतिहासाच्या कसोटीवर नायक म्हणून जगाने स्विकारलेले असतात. बाळासाहेब ठाकरे हा असाच एक सेक्युलर माध्यमांनी व विचारवंतांनी रंगवलेला खलनायक होता. मात्र प्रत्यक्षात आयुष्याच्या अखेरीस तोच नायक म्हणून समोर आल्यावर; अनेक समकालीत विचारवंताची तारांबळ उडालेली आहे. डाव्या सेक्युलर विचारवंत व नेत्यांच्या नाकर्तेपणाने शिवसेनेला जन्म दिला किंवा पोषक परिस्थिती निर्माण केली; हे सत्य आजवर त्यापैकी कोणी कधी बोलायची हिंमत केली नाही. पण आता ते सविस्तर सांगायचा उद्योग मी नव्याने करू लागल्यावर; काही शहाणे त्यातले खरकटे उचलून ताव मारू लागले आहेत. कायबीइन लोकमतचे ‘दर्डा’वणारे संपादक निखिल वागळे, त्याच खरकट्या पंगतीतले असल्याचे एका वाचकाने मला लक्षात आणून दिले. म्हणुन त्याची दखल घेणे भाग आहे.
बाळासाहेबांना जाऊन आज एक महिना पुर्ण झाला. मध्यंतरी त्यांच्या संबंधाने खुप काही लिहिले व बोलले गेले आहे. त्यात निखिल व कायबीइन लोकमतचा वाटा देखिल होता व आहे. १८ नोव्हेंबरला तर संपुर्ण दिवस त्याने चराट लावलेले होते. पण अंत्ययात्रा संपल्यावर; आपल्या मनातले गरळ ट्विटरवर ओकले आणि लोकांनी शिव्या घातल्यावर ते पुसूनही टाकले. असो, मुद्दा इतकाच, की ती गरळ आपल्या वहात्या वाहिनीवर ओकायची हिंमत का नव्हती? की कोणी तरी ‘दर्डा’वेल आणि बाहेरचा रस्ता दाखवेल या भितीपोटी निखिलने आपल्या आविष्कार स्वातंत्र्याचा गळा स्वत:च दाबला आणि मालक व टीआरपीला शरण गेला होता? नसेल तर ट्विटरवर लिहिले, तेच वाहिनीवर बोलायची हिंमत का केली नाही? कारण त्याच्यात कधीच खरी हिंमत नव्हती. रोडरोमियो जेसे गर्दीचा फ़ायदा घेऊन मुलींची छेड काढण्यात पुरुषार्थ शोधतात, तशी निखिलची हिंमत. त्यामुळे खरेच मार खावा लागेल, अशी शक्यता असली; मग त्याने प्रत्येकवेळी शेपुट घालून पळ काढलेला आहे. अंत्ययात्रेच्या दिवशी ती गरळ जाहिरपणे ओकली असती, तर तोच लक्षावधीचा जनसागर स्टुडीओवर चाल करून आला असता आणि वाचवायला पोलिसही मोकळे नव्हते. त्यामुळेच ‘लागलेली दाबून’ ठेवावी, तशी त्याने गरळ दाबून ठेवली आणि मोकळी सवड मिळताच ट्विटरवर स्वत:ला ‘मोकळे’ करून घेतले. त्याच्याबद्दल इंटरनेटवर बर्याच लोकांचे मेसेज फ़िरत होते. मी त्याची दखल घेतली नाही. पण आता महिनाभर उलटल्यावर त्याने ब्लॉग लिहिला असून; बाळासाहेबांबद्दल मुक्त चिंतन केल्यासारखे काही लिहिले आहे. त्याचे ते मत असायला कोणाची हरकत नाही. पण त्यात जे पांडित्य शिवसेनेच्या स्थापनेबद्दल त्याने सांगायचा प्रयत्न केला आहे; ते माझ्या ‘उलटतपासणी’तून उचलेले खरकटे असल्याचे एका चाणाक्ष वाचकाने नजरेस आणून दिल्याने, त्याची दखल घेणे मला भाग आहे. शिवसेनेची स्थापना व राडासंस्कृतीसह तात्कालीन राजकीय घडमोडीचा मी जो उहापोह केला आहे, त्याकडे आजवर कोणा राजकीय सेक्युलर विचारवंताने डोळसपणे बघायचे कष्ट घेतलेले नाहीत. निखिलपाशी तेवढी अभ्यासू वृत्तीच नाही. असे असताना त्याने सेनेच्या स्थापने वेळचा डाव्या राजकारणाचा संदर्भ अचानक कुठून द्यावा? आणि तेवढे त्याचेच निरिक्षण होते, तर १७/१८ नोव्हेंबरला जे चराट अखंड चालू होते, त्यात त्याचा उल्लेख कशाला येऊ शकला नाही? आधी निखिल ब्लॉगवर काय लिहितो वाचा....
‘राज्याच्या राजधानीत आपली कोंडी होत असल्याची भावना मराठी समाजाच्या मनात निर्माण झाली. याला सत्ताधारी काँग्रेसकडेही उत्तर नव्हतं आणि डाव्या पक्षांकडेही. वास्तविक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व या डाव्या पक्षांकडेच होतं. त्यांनी मराठी माणसाला अशाप्रकारे कळत नकळत वार्यावर सोडायला नको होतं. पण राष्ट्रीय राजकारणाच्या रेट्यात मराठी अस्मितेचा मुद्दा मागे पडला. काँग्रेसला तर सोयरसूतकच नव्हतं. ‘मार्मिक’चे संपादक असलेल्या बाळ ठाकरेंनी नेमका हाच मुद्दा उचलला. त्यावेळी ‘मार्मिक’मध्ये टेलिफोन डिरेक्टरीतल्या याद्या प्रसिद्ध व्हायच्या. त्यातील अमराठी माणसांची बहुसंख्या मराठी तरुणांना चकित करून सोडायची. ‘वाचा आणि थंड बसा’ असा सुरुवातीला या मालिकेचा मथळा होता. मालिका लोकप्रिय झाल्यावर तो ‘वाचा आणि पेटून उठा’ असा झाला. त्याला मराठी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हळूहळू बाळ ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराच्या सभांनाही गर्दी होऊ लागली.’
आजवर त्याने कधी हे ‘मराठी तरूणाला वार्यावर डाव्यांनी सो्डण्याची’ भाषा वापरली आहे काय? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्वच डाव्यांकडे होते आणि त्यांनीच मराठी तरूणांचा व मराठी माणसांचा राज्यस्थापने नंतर पुरता भ्रमनिरास केला, हे आजवर कुठल्या सेक्युलर डाव्या लेखक, विचारवंत, पत्रकार वा विश्लेषकाने सांगितले आहे काय? कुठे लिहिले तरी आहे काय? पहिल्या दिवसापासून शिवसेना ही कॉग्रेसची बटीक व वसंतराव नाईकांनी कम्युनिस्ट पक्ष व कामगार चळवळीची आक्रमकता मोडण्यासाठी काढलेली वसंतसेना; अशी्च डाव्या पक्ष व लेखकांकडून झालेली टवाळी व चिंतन आहे. आपल्या दोनतीन दशकांच्या पत्रकारीतेत अनेकदा शिवसेनेवर लिहितांना, निखिलने तरी कधी शिवसेनेत आलेल्या त्या आरंभीच्या तरूणांचा डावे पक्ष व समितीने भ्रमनिरास केला; असे का सांगितले नव्हते? कारण त्याला त्यातले काही माहितीच नव्हते. आणि पत्रकार म्हणून जन्माला आल्यापासून शिवसेनेच्या विरोधात मिळेल ते शब्द, वाक्ये, खरकटे पक्वान्न म्हणून ताव मारण्यातच पत्रकारिता; अशी त्याने समजूत करून घेतलेली. मग प्रथम दाक्षिणात्यांचा द्वेष, मग भय्यांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष ठाकरेंनी रुजवला; अशी तोंडपाठ वाक्ये रट्टा मारून लिहायची ‘सवय लागली, जडली वेडी प्रीत’ तशी निखिलची पत्रकारीता. इथेही सत्य बोलायची तयारी नाही. ज्या मराठी तरूणाला डाव्यांनी वार्यावर सोडले असा दावा आहे, तो काय सभ्य, साळसूद वा सुसंस्कृत होता काय? ज्याला निखिल वा तत्सम मंडळी आयुष्यभर राडासंस्कृती म्हणत आले, त्यात पारंगत असाच तो (डाव्यांनी वार्यावर सोडलेला) तरूण होता. म्हणजे ज्याच्यासाठी बाळासाहेबांवर आरोप होतात, त्या राडासंस्कृतीचे जनक मुळात डावे पक्षच होते. त्याबद्दल मात्र निखिल मौन पाळणार. एवढ्यासाठी मी विचारवंत म्हणून मिरवणार्या खोटारड्यांवर चिडतो. मुर्खांना धड खोटेही बोलता येत नाही.
डाव्यांनी वार्यावर सोडलेल्या मराठी तरूणांना शिवसेनेच्या रुपाने पर्याय मिळाला. म्हणून त्यांना दगड मारायला वा मोडतोड करायला शिवसेनाप्रमुखांनी काही शिबीरे घेऊन प्रशिक्षण दिलेले नव्हते. त्या तरूणांना त्याचे प्रशिक्षण डाव्यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतच मिळालेले होते. आपल्या विरोधकांची तोंडे बंद करायला शिवसेनाप्रमुखांनी ते प्रशिक्षित तरूण वापरले. आणि त्याचा सर्वोत्तम साक्षिदार कोणी मराठी माणुस नाही; तर कृष्णा देसाईचा खुन झाल्यानंतर शिवसेनेत आलेला एक समाजवादी झुंजार कार्यकर्ता होता. मात्र योगायोगाने तो निखिल वागळे यांना प्यार असलेल्या समाजवादी पक्षातला खंदा कार्यकर्ता होता आणि पारशी होता. त्याचे नाव दादी गोवाडीया असे होते. त्याने तर मधू दंडवते यांच्यापासून तमाम समाजवादी नेत्यांची त्यावेळी जाहीर सभांमधून अब्रूच काढली होती. आणि त्याच्याही पलिकडली गोष्ट म्हणजे समाजवादी असूनही हा पारशी शिवसेनेत आला, तो तिच्या राडासंस्कृतीसाठी. पण यातले काही निखिल किंवा त्याच्या खरकट्य़ा पंगतीमध्ये येऊन बसणार्यांना माहितच नसेल; मग त्यांनी बिनबुडाच्या गोष्टी सांगितल्या तर नवल कुठले? (क्रमश:)
भाग ( २८ ) १७/१२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा