मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

राईचा पर्वत करायला राई तर हवी ना?




   अभ्यासक किंवा जाणकार असे आपण ज्यांना समजतो, किंवा तसे मिरवणारे जे असतात; त्यांची खरी बुद्धीमत्ता त्यांच्या वाचनातून आलेली असते. मात्र ज्या विषयाचे जाणकार म्हणून असे लोक मिरवत असतात, तो विषय वा व्यक्ती त्यांच्या समोर साक्षात येऊन उभी राहिली, तरी अनेकदा त्यांना ओळखता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. माझाच एक अनुभव सांगतो. माझ्याकडून थोडेफ़ार धडे गिरवलेला एक पत्रकार आहे, आता तोही अधूनमधून वाहिन्यांवर ज्येष्ठ विश्लेषक म्हणून बोलत असतो. एकदा त्याच्याकडे पत्रकारिता अभ्यासक्रम करणारी शिकावू मुलगी अनुभवासाठी आलेली होती. तिला शिवसेना या विषयावर प्रबंध निबंध असे काही लिहायचे होते. त्याने या मुलीला माझ्याकडे माहिती घ्यायला पाठवून दिले. थोडी चर्चा केल्यावर माझा लक्षात आले, की त्या मुलीचा सिद्धांत तयार आहे. त्या सिद्धांताला पुरक अशी माहिती तिला हवी होती. पण मी जे काही धडाधडा सांगत गेलो, ते ऐकताना तिचे डोळे विस्फ़ारत गेले होते. कारण शिवसेना या विषयावर तिने आजवर जे ऐकले होते किंवा वाचले होते; त्याला बहुतांशी छेद देणार्‍या अशा गोष्टी तिच्या प्रथमच कानावर पडत होत्या. ते स्वाभाविकच होते. ज्यांची पुस्तके तिने संदर्भासाठी वा आधार म्हणून घेतली होती; त्यांचाही कुठला अनुभव नव्हता किंवा अभ्यास नव्हता. तिने एक इंग्रजी पुस्तक सोबत आणले होते. ते चाळून मी तिला पंधरा मिनीटातच त्यातल्या दोनचार चुका व खोटे तपशील काढून दाखवले. मग तिच्यावर थक्क व्हायची पाळी आली. बिचारी गडबडून गेली. पण मीच तिची समजूत घातली. ति्ला म्हटले, तुला शिवसेनेचा इतिहास अभ्यासायचा आहे, की पदवी पदरात पाडून घ्यायची आहे, ते आधी ठरव. जर पदवी मोलाची असेल; तर झक मारला खरा इतिहास व दाखले. तुझ्या त्या बेअक्कल प्राध्यापकाला हवे तेच लिहून मोकळी हो. खरी शिवसेना आहे तिथे राहू देत. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होणार नाही, की तुझे होणार नाही.

   मी असे तिला का सांगावे? तर त्या इंग्रजीतील पुस्तकाच्या आरंभीच मुंबईच्या कुठल्या भागात शिवसेनेने मूळ धरले व तिथे कोणत्या मराठी जातीजमातींचे प्राबल्य होते, त्याचा संदर्भ देण्यात आलेला होता. लालबाग परळ भागातले मराठा कुणबी आणि दादर परिसरातील ब्राह्मणांच्या प्राबल्यावर शिवसेना उभी राहिल्याचा जावईशोध त्या लेखकाने कुठून लावला होता देवजाणे. कारण मराठा, कुणबी, माळी यांचे प्राबल्य मुख्यत: भायखळा माझगाव परिसरात आहे. लालबाग परळ हा मुख्यत: कोकणी कुणबी, भंडारी अशा वस्तीचा आहे. शिवाजीपार्क दादरच्या परिसरात ब्राह्मणांपेक्षा कायस्थ, सारस्वतांचा वरचष्मा होता. गिरगावात पाठारेप्रभू एसकेपी अशा मराठी जमातींचे प्राबल्य. पण त्याचा थांगपत्ता त्या पुस्तकाच्या लेखकाला नव्हता. पण पुस्तक इंग्रजीमध्ये आहे, म्हणजे अभ्यासपुर्ण अशी एक समजूत पक्की. मग काय? हे इंग्रजी लेखन करणारे अनेकदा किती उनाडपणा करतात, त्याचाही इथे नमूना पेश करायला हरकत नाही. म्हणजे तेही किती तब्बल बेअक्कलपणाचे नमूने असतात, त्याचा अंदाज येईल.

   योगायोगाने बरोबर दहा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली, त्याला आता वीस वर्षे पुर्ण होत आहेत. आणि मी किस्सा सांगतोय त्याला दहा वर्षाचा कालावधी होतोय. कारण नेमक्या दहा वर्षापुर्वी टाईम्स ऑफ़ इंडीया नामक देशातील मान्यवर दैनिकामध्ये एक जुन्या दंगली संबंधाने बातमी छापली होती. ब्याण्णवच्या दंगलीचा भडका मुंबईभर उडाला तसाच तो धारावीमध्येही झाला होता. त्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न झाले, त्यात माझ्या मित्राने जीवापाड प्रयत्न केले. दंगल आटोपली एवढ्यावर न थांबता; त्याने हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर एक माहितीपट सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचे जगभर कौतुक झालेले आहे. त्यामुळेच मी त्याची सुपरस्टार म्हणून गंमतही करतो. तुम्ही कधी मुंबईच्या सायन स्थानकातून जिना चढून बाहेर आलात तर वहानांची प्रचंड वर्दळ दिसते. तिकडे दुर्लक्ष करून थेट समोर बघायचे. सात आठ मजली उंच इमारत दिसेल. राजबर टॉवर असे तिचे नाव आहे. त्याच्या पाचव्या मजल्यावर माझा हा मित्र वास्तव्य करतो. डिसेंबर २००२ मध्ये त्याच्याच सलोखा कार्याचे कौतुक करणारी बातमी टाईम्समध्ये झळकली होती. त्या वृत्तपत्राच्या दोन महिला पत्रकार त्याला घरी भेटायला आल्या होत्या व त्यातूनच त्या बातमीला आकार व शब्द मिळाले होते. शबनम मिनवाला व राधिका राजाध्यक्ष अशी त्या दोन पत्रकारांची नावे.

   प्रसिद्ध झाल्यावर ती बातमी मी वाचली आणि थक्कच झालो. ‘धारावीतला झोपडीवासी भाऊ कोरडे म्हणतो,’ (Bhau Korde a slumdweller from Dhrawi says), हे त्या बातमीतले वाक्य वाचून माझा डोळ्यावर विश्वास बसेना. दोनतीनदा मी ती बातमी वाचली आणि मग त्याला फ़ोन लावला. त्यालाही बातमी ऐकून हसता पुरेवाट झाली. या दोन्ही मुली त्याच्या फ़्लॅटवर येऊन बसल्या होत्या, त्याच्याशी बोलल्या होत्या आणि तरीही त्याचा उल्लेख झोपडीवासी असा करत होत्या. आता त्यांच्या त्याच बातमीचा संदर्भ घेऊन वीसतीस वर्षांनी कोणीतरी मुंबईच्या दंगलीवर अभ्यासपुर्ण पुस्तक लिहील. त्यात भाऊ कोरडेचा उल्लेख काय असेल? ही आजच्या एकूण पत्रकारिता व अभ्यासकांची दुर्दशा आहे. राईचा पर्वत असे आपण ज्याला म्हणतो, त्याच्याही पलिकडे हा अभ्यास जाऊन पोहोचला आहे. कारण त्यात पर्वत उभा केलेला असतो. पण ज्याच्यापासून पर्वत उभा केला, त्या राईचाही कुठे मुळात पत्ता नसतो. सहाजिकच तीस चाळीस वर्षापुर्वी जे काही आरोप बातम्यांमधून छापून आलेले असतील, किंवा तात्कालीन पत्रकाराने आपला अंदाज आडाखा ठोकून दिलेला असेल, त्यालाच अस्सल माहिती मानून मगा आजचे अभ्यासक आपले संशोधन करणार व आधीच बनवलेल्या सिद्धांताला उपयुक्त माहिती घेऊन ठोकून देणार. असाच प्रकार शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली तेव्हा १९९६ सालात झाला होता. पुणे विद्यापिठातील राज्यशास्त्राचे प्रमुख राजेंद्र व्होरा व त्यांचे सहाय्यक व आजकाल वाहिन्यांवर नेहमी दिसणारे डॉ. सुहास पळशीकर यांचे एक अभ्यासपुर्ण पुस्तक ग्रंथाली संस्थेने प्रसिद्ध केले होते. त्यात इतिहास व वास्तवाचे पाडलेले मुडदे वाचून मी थक्क झालो. त्यासंबंधाने त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता.

   ज्या घटना कधी घडलेल्याही नाहीत, अशा घटना घडल्याचे सांगत त्यांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचे सिद्धांतवजा पुस्तक लिहिले होते. संदर्भासाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रस्तावना लिहून प्रकाशकांनी ते प्रसिद्धही केले होते. त्यातल्या खोट्या व चुकीच्या तपशीलाची यादीच मी त्यांना पाठवली होती. पण त्याचा कुठलाही खुलासा त्यांना देता आलेला नव्हता. डॉ. दता सामंतांच्या बेमुदत संपाने निर्माण केलेल्या गिरणी कामगारांच्या प्रश्नावर १९८४ सालात शरद पवार, जॉर्ज फ़र्नांडीस व बाळासाहेब ठाकरे एका व्यासपीठावर आले होते. ती घटना बदलून या दोघा प्राध्यापक महोदयांनी ठाकरे, शरद जोशी व डॉ. दत्ता सामंत यांना एका व्यासपिठावर आणून बसवले. तेवढेच नाही, तर मग त्याचे राजकीय परिणाम सुद्धा त्या पुस्तकात कथन केलेले आहेत. आता सांगा राई सुद्धा नसताना तिचा पर्वत उभा करता येतो की नाही? तर असे करण्यासाठी तुम्ही अगोदर माध्यमातल्या ढुढ्ढाचार्यांकडून जाणकार, अभ्यासक वा विश्लेषक अशी आपली नोंद करून घ्यावी लागते. मग ज्या विषयावर बोलायचे आहे, त्याबद्दल तुम्हाला कवडीचे ज्ञान वा माहिती नसली तरी चालेल. तर असेच लोक बाळासाहेब निवर्तल्यानंतर वाटेल ती पोपटपंची करताना पाहून अनेक जुन्याजाणत्या शिवसैनिकांचे मनोरंजन झाले असेल तर काही कडव्या शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असेल.

   असे होतच असते आणि होणारच. कारण आजकाल जो पत्रकार होतो, त्याला आपन बुद्धीमंत झालो, असा रातोरात साक्षात्कार होत असतो. मग आपल्याला बुद्धी आहे त्याचे प्रदर्शन केल्याशिवाय त्याला रहावत नाही. आणि नसलेल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडायला गेले; मग उघडे पडायची वेळ अपरिहार्यपणे येते. निखिल वागळे ऐकत असाल तर तो नेहमी आपण कुठल्याही घटनेचे साक्षिदार आहोत असा दावा करतो. त्याचा जेव्हा जन्मही झालेला नव्हता, त्याचा तो साक्षिदार असेलच कसा? पण साक्षिदार असल्याचा दावा केला, मग साक्ष द्यावीच लागते ना? मग द्या काहीही ठोकून. त्यानेही फ़ेबृवारीतल्या पालिका निवडणुकीचे विश्लेषण करताना कायबीईन लोकमतवर अशी स्वत:च्या मुर्खपणाची साक्ष दिली होती आणि तेव्हा त्याच्या सोबत असलेले व आता झी२४ तासचे संपादक झालेले उदय निरगुडकर यांनीही त्याला मान डोलवली होती. १९६७ सालात ठाण्यात सेनेने पहिली निवडणूक लढवली आणि सतीश प्रधान नगराध्यक्ष झाल्याचा शोध या दोघांनी लावला होता. त्याच दिवशी ‘माझा’ वाहिनीवर खुद्द बाळासाहेब ठाण्यात वसंतराव मराठे सेनेचा ठाण्यात पहिला नगराध्यक्ष झाल्याचे आपल्या मुलाखतीमधून सांगत होते. अशी एकूण अभ्यासकांची अवस्था व स्थिती आहे. त्यामुळेच आता बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचा तो जुना इतिहास जसा आठवतो, तो सांगणे मला अगत्याचे वाटते. निदान त्याची कुठे नोंद राहावी, एवढीच अपेक्षा. म्हणूनच सेनेच्या स्थापनेपुर्वीच्या काही गोष्टी अगत्याच्या आहेत व सांगाव्या लागत आहेत. ह्याचा अभ्यासकांना पत्ता नाही वा त्यांना जाणून घेण्याची कधी गरजही वाटलेली नाही.    ( क्रमश:)
भाग   ( १६ )    २७/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा