सोमवार, १० डिसेंबर, २०१२

रजत शर्माच्या ‘आपकी अदालत’चा जनक?




 
   पंधरा वीस वर्षापुर्वी आपल्याकडे जेव्हा खाजगी टिव्ही वाहिन्या सुरू झाल्या तेव्हा दूरदर्शनवर अनेक प्रायोजित कार्यक्रम सादर करणार्‍यांनी आपापल्या उपग्रह वाहिन्या सुरू केल्या. त्यापैकीच एक वाहिनी आहे इंडीया टिव्ही. रजत शर्मा नावाच्या माणसाने ती वाहिनी सुरू केली आहे. दूरदर्शन नंतरच्या काळात बहुधा झी वाहिनीवर रजत शर्मा एक लोकपिय कार्यक्रम सादर करीत असे. ‘आपकी अदालत’ असे त्याचे नाव. आजही तोच कार्यक्रम त्याच्या स्वत:च्या इंडीया टिव्ही वाहिनीवर चालू आहे. पण त्या कार्यक्रमाची सुरूवात झाली, तेव्हा त्यातला पहिला स्टार होता बाळासाहेब ठाकरे. ही अदालत तशी काल्पनिक किंवा नाटकी. पण त्यात कोर्टाचा सेट लावलेला असतो आणि त्यात आरोपीच्या पिंजर्‍यात पाहुण्याला बसवले जाते आणि रजत शर्मा जनतेचा वकील म्हणून त्याच्यावर नानाविध आरोप करीत असतो. मग त्या पाहुण्याने त्याबद्दल आपला बचाव किंवा सफ़ाई मांडायची असते. आता तो खुपच लोकप्रिय झालेला कार्यक्रम आहे. पण त्यातला पहिला पाहुणा होता बाळासाहेब. नंतर रजतने झी टिव्ही सोडला तेव्हा त्या अदालतीचा गाजवाजा कमी झाला. पण अशा कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रीय पातळीवर झाली; तेव्हा अन्य कुठला राष्ट्रीय नेता निवडण्यापेक्षा रजत शर्माने शिवसेनाप्रमुखाची त्यासाठी निवड केली होती. यातून महाराष्ट्राबाहेर न जाताही बाळासाहेबांची देशभरातील लोकप्रियता लक्षात येऊ शकेल. हा माणूस बेधडक मनातले बोलतो आणि तसे करताना अजिबात घाबरत नाही, अशी त्यांची ख्याती झाली होती आणि त्याचाच फ़ायदा रजत शर्माला घ्यायचा होता. याच संदर्भात एक आणखी आठवण सांगण्यासारखी आहे, १९९५ च्या सुमारास अनेक नव्या वाहिन्या सुरू व्हायच्या होत्या. त्यांची तयारी चालू होती. तेव्हा माझ्या एका इंग्रजी पत्रकार मित्राने सांगितलेला किस्सा आहे. त्याला टॉकशो सुरू करायचा होता. त्यासाठी पाहुणे व्हावे म्हणून अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या त्याने दिल्लीत भेटी घेतल्या. दहापैकी चार लोकांनी त्याला सांगितले; पहिला भाग ठाकरेंना घेऊन कर, मगच आम्हाला बोलाव. असे एवढ्यासाठी, की ज्या कार्यक्रमात ठाकरे असतील; तो लक्ष वेधून घेतो आणि नंतरच्या पाहुण्यांना आयता प्रेक्षक मिळतो. ठाकरेंमुळे कार्यक्रम ताबडतोब लोकप्रिय होतो. बाळासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा हा खरे म्हणायचे तर फ़टकळ स्वभावाचा भाग होता. आणि दहा महिन्यांपुर्वी मराठी वाहिन्यांची पालिका निवडणुकी दरम्यान त्यांच्या मुलाखती घेण्यासाठीच नव्हेतर सतत दाखवण्यासाठी सुद्धा स्पर्धा केवळ टीआरपीसाठीच होती. असो.

   तर पंधरा सोळा वर्षापुर्वी बाळासाहेबांना घेऊन ‘आपकी अदालत’ कार्यक्रम सुरू केला; म्हणून तसा तो पहिलाच कार्यक्रम नव्हता. आजच्या कित्येक शिवसैनिकांना माहिती सुद्धा नसेल, की ‘आपकी अदालत’ या संकल्पनेचा जनकही कदाचित बाळासाहेबच असतील. कारण टिव्हीवर रजत शर्माने तसा कार्यक्रम पेश करण्याच्या तीन दशके आधी बाळासाहेबांनी अशा अनेक अदालतीमध्ये दणक्यात बाजी मारलेली होती. आणि ती कॅमेरा किंवा बंदिस्त स्टुडीओमध्ये नव्हे; तर खुल्या मैदान किंवा थेट प्रेक्षकांसमोर. त्याला अभिरूप न्यायालय म्हटले जायचे. शिवाजीपार्कची शिवसेनेची सभा भव्यदिव्य झाली आणि लोकांचे लक्ष ठाकरे नावाच्या नव्या वक्त्याकडे ओढले गेले. तोपर्यंत आचार्य अत्रे, एसेम जोशी, कॉम्रेड श्रीपाद डांगे, जॉर्ज फ़र्नांडीस वगैरे मंडळी यांना गर्दी खेचणारे व मैदान गाजवणारे वक्ते मानले जात होते. पण बाळासाहेबांनी शिवाजी पार्कची एकच सभा अशी गाजवली, की तिच्या बातम्यांनी या माणसाबद्दल लोकांमध्ये कमालीचे कुतूहल निर्माण केले. मग त्याचा फ़ायदा घेण्यसाठी अनेक सांस्कृतिक, सामाजिक संस्था, ग्रंथालये व वाचनालयांनी सभांसाठी बाळासाहेबांना वक्ता म्हणून अगत्याने आमंत्रणे द्यायला सुरूवात केली. त्याशिवाय अन्य राजकीय पक्ष व पत्रकारांमध्येही त्यांच्या बाबतीत उत्सुकता वाढलेली होती. त्यातूनच मग कोणी तरी अभिरूप न्यायालय अशी कल्पना काढली. कोणी ते मला आता माहित नाही. पण त्यात विविध पक्षाचे नेते किंवा पत्रकार असायचे आणि त्यांच्या गराड्यात बाळासाहेब व्यासपिठावर असायचे. त्यातला एक न्यायाधिश म्हणून बसवला जायचा. थोडक्यात अध्यक्ष म्हणजेच न्यायाधीश असायचा. मग हे बाकीचे फ़िर्यादी म्हणून आरोप करायचे व जाब विचारायचे. मद्रासी म्हणजे दाक्षिणात्य, परप्रांतिय, अमराठी भारतीयांच्या विरोधात चळवळ करून बाळासाहेब देशाच्या ऐक्याला व मुंबईतील सामाजिक सामंजस्याला बाधा आणत आहेत, असा सर्वसाधारण आरोप असायचा. त्याच्या अनुषंगाने हे अन्य वक्ते विविध आरोप करायचे आणि आपल्या खुसखुशीत बोचर्‍या शैलीत बाळासाहेब त्यांना उत्तरे द्यायचे. त्यातून सर्वसामान्य श्रोत्याच्या समोर शिवसेनेची भूमिका सोपी करून मांडण्याची संधी बाळासाहेबांना आयतीच मिळत गेली. तो कार्यक्रम खुपच लोकप्रिय झाला होता. त्याच्या जसजशा बातम्या आल्या; तसे ते कार्यक्रम वाढतच गेले. परिणाम शिवसेनेच्या वाढीला वेग आला. अन्य कुठल्याही वक्त्यापेक्षा बाळासाहेबांची भाषा सोपी व सुस्पष्ट असल्याने व भूमिका मराठी अस्मितेची असल्याने ते तरूण मंडळींना भारावून टाकत असत.

   राजकीय भाषणे असली तरी ती बाळासाहेबांच्या खुसखुशीत शैलीमुळे मजेशीर होऊन जात. अखेरीस त्यात दोष सिद्ध झाल्यामुळे बाळासाहेबांना न्यायाधीश गमतीशीर शिक्षा फ़र्मावत असायचे. म्हणजे आठ दिवस माटुंगा (या मद्रासी वस्ती अधिक असलेल्या) भागात आठवडाभर लुंगी परिधान करून वास्तव्य करायचे किंवा महिनाभर इडली डोसा अशाच खाण्यावर रहायचे; अशा मजेशीर शिक्षा फ़र्मावल्या जात असत. यातली मजा अशी होती, की त्या कार्यक्रमात विविध पक्षाचे राजकीय नेते यायचे व सहभागी व्हायचे. त्यामुळे श्रोतावर्ग होता, त्याला सर्वच पक्षाच्या भूमिका एकत्र ऐकायला मिळायच्या आणि त्यांना बाळासाहेबांनी आपल्या शैलीमध्ये निरूत्तर करताना बघितल्यावर; शिवसेनेची भूमिका पटवणे बाळासाहेबांना सोपे जायचे. त्यांच्या स्पष्ट सोप्या भाषेमुळे नेहमी बाळासाहेबच अशा कार्यक्रमात बाजी मारायचे. पण मजा तिथेच संपत असली, तरी त्याचा राजकीय परिणाम ऐकणार्‍यावर दिर्घकाळ रहात असे. आणि त्यामध्ये अन्य पक्षाच्या नेत्यांचा हातभार अनावधानाने लागत होता. आपण शिवसेनेच्या प्रचार व प्रसाराला हातभार लावतोय, याची त्या भिन्न पक्षाच्या नेत्यांना तेव्हा कल्पनाही येत नव्हती. बाळासाहेबांनी अशा कार्यक्रमाचा शिवाजी पार्कनंतरच्या काळात खुपच फ़ायदा करून घेतला होता. अशा एका कार्यक्रमामध्ये कम्युनिष्ट नेत्या कॉ. अहिल्या रांगणेकर सहभागी होत्या आणि मला तो कार्यक्रम बघितल्याचे आठवते. पण असे कार्यक्रम व सभा मुंबईच्या परिसरातच मर्यादित होत्या. क्वचितच साहेबांनी मुंबईच्या बाहेर मोहिम काढलेली होती. शिवाय शिवसेनेने घेतलेले विषय मुळात मुंबईतील अमराठी आक्रमणाचे व मुंबईत येणर्‍या परप्रांतियांच्या लोंढ्याचे असल्याने; मुंबईबाहेर शिवसेनेला वावच कमी होता. तरी पुणे वा नाशिक भागातील काही मोजके तरूण शिवसेनेत येत होते व आले होते. मुंबईबाहेर शिवसेनेची मजल ठाणे कल्याणपर्यंतच गेलेली होती. त्याचे प्रामुख्याने असलेले कारण म्हणजे शिवसेनेने हाती घेतलेल्या विषयाची भौगोलिक मर्यादा होय. आणि म्हणूनच शिवसेना दिर्घकाळ मुंबईबाहेर का वाढली नाही; असा प्रश्न विचारला जातो, तो शुद्ध मुर्खपणाचा आहे.

   पण मुंबई काबीज केली मग मुंबई सभोवती वाढणारी उपनगरे व महानगरे काबीज करणे सोपे होते. त्यासाठी जे नव्या तरूणांचे नेतृत्व बाळासाहेबांना उभे करायचे होते, त्याचा पाया मुंबईतच घालावा लागणार होता. त्यामुळेच मुंबईत अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी आपली प्रचार व प्रसाराची मोहिम यशस्वीपणे चालवली होती. अन्य पक्षही अशा अभिरुप न्यायालयातून शिवसेनेला मदतच करत होते. कारण हा उद्याचा नवा राजकीय पक्ष आहे व आपल्याला राजकीय आव्हान म्हणून उभा राहिल; असे कोणाच्या मनातही आलेले नव्हते. इतरांचे सोडा खुद्द बाळासाहेबही कुठला राजकीय पक्ष काढायला निघाल्याचा आव आणत नव्हते. अन्य जे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी मराठी हिताची व न्यायाची भूमिका घ्यावी; असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच नजिकच्या काळात त्यांनी निवडणुका आल्यावर विभिन्न पक्षाच्या उमेदवारांना शिवसेनेचा पाठींबाही देऊन टाकला होता. फ़ार कशाला काही उमेदवार आपलेच असल्याच्या थाटात शिवसेना मैदानात उतरली होती. मात्र राजकारणात व निवडणुकीत उतरण्याचा संकेत तेव्हा बाळासाहेबांनी कधीच दिला नाही. म्हणूनच अन्य पक्षाच्या नेत्यांनी अशा अभिरूप न्यायालयाच्या परिसंवादातून अनवधानाने शिवसेनेला खुप मोठा हातभार लावला; असेच मानायला हवे. थोडक्यात आजच्या ‘आपकी अदालत’ कार्यकमाचा खरा जनक कोण होता हे आपल्या लक्षात आलेच असेल.  ( क्रमश:)  
भाग   ( २२ )    ११/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा