रविवार, १६ डिसेंबर, २०१२

पुराणमतवादी आणि उदारमतवादी


    ठाण्यात शिवसेनेने पहिली निवडणुक यशस्वीरित्या जिंकली आणि त्यांना मुंबईतील महापालिकेचे वेध लागले होते. ह्या निवडणूका विधानसभा लोकसभेच्या नंतर साधारण आठदहा महिन्यांनी झालेल्या असाव्यात. मला आता नेमके आठवत नाही. पण दोन निवडणूकांच्या निकालातली तफ़ावत बदलत्या काळाची चाहूल होती. ज्या गिरणगावातून कम्युनिस्ट पक्षाचा एक खासदार लोकसभेत व तीन आमदार विधानसभेत जाऊन पोहोचले होते, तिथेच त्या पक्षाचे आणि एकूण मुंबईत संपुर्ण महाराष्ट्र समितीचे पानिपत होऊन गेले. हा इतका बदल झटपट का झाला; याचा विचार शिवसेनेने करायची गरज नव्हती. कारण तमाम पत्रकार, जाणकारांसह विचाराधिष्ठीत पक्षांच्या दृष्टीने शिवसेना ही विचारशून्य संघटना होती ना? मग तिने वा तिच्या नेतृत्वाने यश वा अपयशाचा विचार तरी कसा करायचा? पण ज्यांना आपण महान विचारांचे अनुयायी आहोत व आपला अवतारच समाजाचा उद्धार करण्यासाठी झाला आहे असे भ्रम कायम झालेले असतात; त्यांनी त्या निकालांचा विचार करायला नको होता काय? ज्यांच्याकडे कुठला कार्यक्रम नाही, वैचारिक बैठक नाही किंवा वि्चारसरणी नाही; त्या शिवसेनेकडे अवघ्या काही महिन्यात तोच मतदार का वळला होता? ज्याने सार्वत्रिक निवडणुकीत डाव्यांना साथ दिली होती, कम्युनिस्ट आमदार व खासदार निवडून दिले होते, तो गिरणगावातला डाव्यांचा बालेकिल्ला असा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे का ढासळावा? पण तसे झालेच नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने डाव्यांच्या डोक्यात हवा गेली होती आणि वास्तुस्थिती बघण्यापेक्षा ते आपल्या सिद्धांतामध्ये इतके मशगुल होते, की त्यांना लोकमत बदलते आहे; याची जाणिवच होत नव्हती.

   शिवसेना म्हणजे वसंतसेना, कॉग्रेसची बटीक असे शेलके शब्द वापरले, मग त्यांचे वैचारिक विश्लेषण संपत होते. आणि गंमत बघा, आज त्याला पंचेचाळीस वर्षे उलटून गेली, तरी तिसर्‍या पिढीतल डावे तेवढ्याच उत्साहात त्यावेळच्या घडामोडींचे तसेच आकलन सांगत असतात. त्याचे कारणही आहे. पुराणमतवादी आणि क्रांतीकारक डाव्या विचारांचे लोक; यांच्यात एक समान सुत्र बघायला मिळते. पुराणमतवादी असतात, त्यांच्या मते धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेले आहे, त्याप्रमाणेच विश्वातल्या सर्व घडामोडी घडत असतात. तो इश्वरी संकेत असतो. त्यात माणूस कसली ढवळाढवळ, हस्तक्षेप करू शकत नाही. ईश्वरेच्छा बलियसी. सर्वकाही ठरलेले आहे. याला डावे विचारवंत पोथीनिष्ठा किंवा भाकडकथा असे म्हणतात. पुराणमतवाद म्हणून हिणवतात. पण म्हणुन डाव्यांचे तरी आकलन वा विश्लेषण वेगळे असते का? त्यांचा पोथ्यापुराण वा धर्मग्रंथावर विश्वास अजिबात नाही. पण त्यांच्या स्वत:च्या काही पोथ्या पुराणे आहेत आणि जगात घडणारी प्रत्येक गोष्ट त्यातील सिद्धांतानुसारच घडते; यावर त्यांची एखाद्या भाविकासारखी नितांत श्रद्धा असते. धर्ममार्तड व श्रद्धाळू हजार बाराशे वर्षे जुन्या पोथ्यांचे हवाले देत असतात, तर डावे विचारवंत दिडदोनशे वर्षे जुन्या पोथ्यांचे हवाले देत असतात. इतकाच काय तो फ़रक आहे. बाकी दोघांचा आव आणि आवेश सारखाच असतो. डाव्यांच्या अभ्यासू मतानुसार जायचे; तर मार्क्सच्या विश्लेषण आकलनापुर्वी जग अस्तित्वातच नव्हते. आणि समजा अस्तित्वात असेलच; तर त्यातली प्रत्येक घटना मार्क्सने सांगितली त्याप्रमाणेच घडलेली असणार. त्याबद्दल शंका घेणार्‍याला डाव्या चळवळीत स्थान असू शकत नाही. ‘हे जगभरच्या कामगारांनो’ असे आवाहन मार्क्स करतो. तर धर्मांचा प्रेषित, ‘हे श्रद्धावंतानो’ असे आवाहन करतो. मार्क्सचे आवाहन काय वेगळे आहे? जितके धर्म तत्वज्ञान व आडाखे दोनचार हजार वर्षात फ़सलेले आहेत, तेवढेच डाव्या उदारमतवाद व क्रांतीविषयक तत्वज्ञानाचे आडाखे चुकलेले आहेत. पण दोन्ही बाजू सारख्याच ‘आपणच खरे’ ठरल्याचे दावे करताना दिसतील. शिवसेनेच्या बाबतीत डाव्यांची तीच फ़सगत तेव्हा झाली आणि अजून ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत.

   आपला बालेकिल्ला असलेल्या गिरणगावात शिवसेना नावाचे वादळ घोंगावते आहे, तर त्याचे कारण काय; अशी मिमांसा डाव्यांना करावीशीच वाटली नाही. मार्क्सने लुंपेन क्लासची व्याख्या दिलेली आहे किंवा अन्य काही सांगितलेले आहे; त्यातच त्यांनी शिवसेनेला बसवण्याचा सोपा मार्ग अनुसरला. सत्याला तुम्ही नाकारू शकता, पण टाळू शकत नाही. म्हणूनच सत्याला सामोरे जाण्याखेरीज काही पर्याय नसतो. म्हणूनच आपल्या जवळपासची मुले अचानक शिवसेनेच्या प्रेमात का पडली; हे रहस्य डाव्यांनी शोधण्याची गरज होती. कारण सावळाराम पाटकर किंवा गुलाबराव गणाचार्य असे कम्युनिस्ट आमदार हे सामान्य घरातले कार्यकर्ते होते. आर्थररोड नाक्यावर असलेल्या केरमानी मॅन्शन या चाळीच्या एका छोट्या खोलीत वास्तव्य करणारे गुलाबराव; सतत त्या मुलांच्याच सहवासात होते. त्याच इमारतीमधली मुले पुढे तरूण झाल्यावर विद्यार्थी उत्कर्ष मंडळ चालवायची. त्या मुलांना वळण लागावे, त्यांच्यावर संस्कार व्हावेत; म्हणुन त्यांना संघ शाखेवर पाठवण्याचे काम कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य नावाच्या कम्युनिस्ट आमदाराने केले, यावर आज कोणी विश्वास ठेवील काय? मुलांना संस्कार मिळावेत, शिस्त लागावी अशी इच्छा असल्यानेच त्यांनी असे केले असेल. म्हणून संघाच्या शाखेत गेलेली सगळीच मुले काही पुढे हिंदूत्ववादी झाली नाहीत. पण मुद्दा इतकाच, की राजकीय मतभेद असूनही दुसर्‍या संघटनातले चांगले गुण वा उपयुक्तता यांचा आदर करण्याची भावना सर्वात होती. तत्वत: एकमेकांचे विरोध केले जायचे. पण द्वेषभावना त्यात नसायची. अशी ही आपल्याच सहवासातील मुले अचानक शिवसेनेच्या नादाला का लागली; त्याचा शोध घेण्याची गरज डाव्यांना वाटली नाही. तिथेच त्यांची मतदाराशी असलेली नाळ तुटत गेली. पण जुनी पिढी मात्र त्यांच्याबरोबर टिकून होती आणि त्यांच्यातही हळूहळू बदल होत चालला होता.

   तेव्हा मतदाराचे वयसुद्धा तरूण झालेले नव्हते. आज अठराव्या वर्षी मतदान करता येते. पण त्यावेळी एकविसाव्या वर्षी माणूस मतदानाला पात्र व्हायचा. त्यामुळे शिवसेनेमध्ये असलेल्या बहुतांश तरूणांना मुळात मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. तरीही त्यांच्यातला ओसंडून जाणारा उत्साह प्रचारापासून प्रत्येक बाबतीत दिसायचा. भिंती रंगवण्यापासून प्रचारफ़ेर्‍या काढण्यापर्यंत धमाल असायची. संख्येची ताकद दाखवण्यात शिवसेना आघाडीवर असायची. घरातले कार्य असल्यासारखी ही मुले का राबतात, हे शहाण्यांनी शोधणे आवश्यक नव्हते का? लोकसभा निवड्णूकीत इशान्य मुंबईत गेलेला तरूण आता त्याच्या भागात निवडणुकीला सज्ज झाला होता. मात्र उमेदवार कोणी व्हायचे अशी समस्या होती. वक्ते ही सेनेची मो्ठी समस्या होती. ठाण्याची स्वतंत्र निवडणुक लढवताना, काही नवखे वक्ते तयार झाले होते. त्यात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी असे वक्ते ठाण्याच्या निवडणुकीने पुढे आणले. त्यांना हाताशी धरून बाळासाहेबांनी मैदान लढवायची तयारी केली होती. मग त्यातून उत्साही शिवसैनिकांनी आपल्या तेव्हाचे वक्ते आणि भविष्यातल्या नेत्यांची विशेषणे तयार केली होती. दत्ताजी साळवी अत्यंत रांगडे बोलणारे, त्यांना कमांडर दत्ताजी साळवी; तर नेमकी शेरेबाजी करणार्‍या प्रमोद नवलकर यांना मशीनगन अशी विशेषणे त्याच काळात चिकटली. ती अगदी विसाव्या शतकाची अखेर होईपर्यंत कायम होती. निवडणूका खुप पुढे होत्या. पण त्याची चाहुल लागल्यापासून शिवसेनेचे तरूण कामाला लागले होते. त्यात भिंती रंगवण्यापासून छोट्यामोठ्य़ा सभा बैठका घेण्यापर्यंत धावपळ चालू होती. आपल्या बालेकिल्ल्यात चाललेली ही लगबग डाव्यांना कळलीच नाही; असे म्हणत येईल काय? झुंडशाही, गुंडगिरी असे आरोप केले म्हणजे काम सम्पले अशीच एकूण स्थिती होती. शिवाय आपले रस्त्यावरचे बळ संपले आहे किंवा संपते आहे, त्याचेही भान डाव्यांनी ठेवले नाही. एकवेळ अशी आली होती, की कम्युनिस्टांच्या खेरीज ज्या गिरणगावात दुसर्‍या कोणची सभाच होऊ शकत नव्हती; त्याच गिरणगावात पोलिसांच्या कडक बंदोबस्ताशिवाय डाव्यांना सभा घेणे अशक्य होऊन गेले. आपल्या पक्ष कचेरीत येजा करायला त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते घाबरू लागले. मात्र तरीही ह्या बदलाची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याची सदबुद्धी काही डाव्यांना वा कम्युनिस्टांना सुचली नाही. त्यांची जणू मराठी मनाशी असलेली नाळच तुटली होती. शिवसेनेला तेच हवे होते आणि कॉग्रेसला दुसरे काय हवे होते?  (क्रमश:)
भाग   ( २७ )    १६/१२/१२

1 टिप्पणी:

  1. लगे रहो भाऊ ..या स्वयंघोषित विचारवंत व स्वतःला पत्रकार म्हणवणार्‍या उंटावरच्या शहाण्यांना असेच शालजोडीतून हाणत रहा...

    उत्तर द्याहटवा