सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

मराठी तरूण शिवसेना शोधत होता का?


   संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातला हिंसाचार वा गोळीबार इथे कथन करण्याची आता गरज नाही. त्याचे तपशील अन्यत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व नोंदलेही गेलेले आहेत. मी माझ्या अनुभवापुरता मर्यादित बोलेन. तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा आनंदोत्सव सर्वाधिक झाला तो मुंबईत आणि मध्य दक्षिण मुंबईत. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या स्थापनेचा मंगल कलश आणला म्हणतात त्याची मिरवणूक मी बघितली. ती सुद्धा त्याच चाळीच्या गॅलरीमधून; जिथून मी चार वर्षापुर्वी दंगल गोळीबार बघितला होता. त्याची भीषणता जेवढी मनावर कोरली गेली आहे; तेवढाच राज्यस्थापनेचा उत्साह मनात ताजा आहे. प्रत्येक चाळीवर रोषणाई केली होती. दिवाळीसारखी आकाशकंदिलांची सजावट होती. गुढ्यातोरणे आमच्या गिरणगावात लागली होती. मंगल कलशाच्या मिरवणुकीचे जंगी स्वागत करायची तयारी अनेक दिवस चालली होती आणि आम्हा पोरांनाही त्यात राबवले जात होते. आपण काहीतरी महान इतिहासाचे साक्षिदार बनत आहोत; अशी एक भाबडी कल्पना मनात होती. अवघ्या वारा वर्षाचे वय होते तेव्हा माझे.

   आज ज्याला डॉ. आंबेडकर रोड म्हणतात त्याच रस्त्यावरून ती मिरवणूक जायची होती आणि जिथून म्हणून ती मिरवणूक जाईल; तिथे त्या मंगल कलशावर पुष्पवृष्टी व्हावी अशी सज्जता चालली होती. कमानी उभारल्या जात होत्या. आणि ते खुप कटकटीचे काम होते. कारण त्याच रस्त्यावरून ट्राम चालायची आणि रेल्वेला जशी ओव्हरहेड वायर असते, तशी तिथे दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर ट्रामची जाडजुड वायर संपुर्ण रस्ताभर होती. तिला धक्का न लावता या कमानी, तोरणे व पुष्पवृष्टीची व्यवस्था म्हणजे गुंतागुंतीचे काम होते. पण मराठी बाण्याच्या उत्साहाला उधाण आलेले होते. आमच्या भागात अनंत मालवणकर हा त्यातला म्होरक्या होता. परिसरातल्या मंडळे व संस्थांना सोबत घेऊन त्याचीही धावपळ चालू होती. दिग्विजय गिरणीच्य गेटसमोर जी फ़णसे बिल्डिंग आहे; तिचा आधार घेऊन पुष्पवृष्टीची टोपली टांगण्य़ाचे काम ३० एप्रिलच्या मध्यरात्री चालू असताना अपघात झाला. ड्रेनेज पाईपला दोरखंड बांधण्यासाठी चढलेल्या तरूणाचा भार त्या जुनाट पाईपाला पेलवला नाही आणि पाईप निखळला. तो नेमका खाली उभे राहून मार्गदर्शन करणार्‍या अनंत मालवणकरच्या मस्तकावर आदळला. दोघे जखमी झाले आणि केईएम इस्पितळात दाखल झाले. पाईपवर चढलेला वेंगुर्लेकर पाय जखमी होऊन बचावला. पण मालवणकरला मात्र मंगल कलश जिवंतपणी बघायचे भाग्य लाभले नाही. आम्ही मुले सकाळी अंथरुणातून उठलो; तेव्हा पहिली बातमी तीच होती. मालवणकर गेला. तसा तो बाप्या होता. चांगला तिशीच्या पुढचा. पण आमच्या तोंडी त्याचे नाव अरेतुरेचेच असायचे. मग आमच्या तेवढ्य़ा परिसरत शोककळा पसरली होती. काळाचौकी, गणेश टॉकीज, तुळशीराम पाडा लालबाग मार्केट (जिथे आजचा लालबागचा राजा बसतो) असा सगळ परिसर चळवळ संपल्यावरच्या ह्या हुतात्म्यासाठी शोकाकूल होता. कारण तो नुसता सजावट करताना गेला नव्हता. आधीच्या चळवळीत त्याने मोठी हिंमत दाखवलेली होती. त्याच्या निधनाने आमच्या आनंदात मीठाचा खडाच टाकला होता.

   पदरमोड करून असे कित्येक अनंत मालवणकर त्या काळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला म्हणून दिवाळी साजरी करत होते. त्यांचा आनंद, उत्साह किंवा त्यामागची भावना किती राजकीय नेत्यांना कळली वा उमगली होती याची शंकाच आहे. कारण हे असे तरूण कुठल्या ठराविक राजकीय पक्षाचे सदस्य वा कार्यकर्ते पदाधिकारी नव्हते. ते आपापल्या भागात, परिसरात छोट्या छोट्या संस्थांमधून जमेल तसे समाजकार्य करीत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने व त्यासाठी स्थापन झालेल्या सर्वपक्षिय समितीने; त्या विखुरलेल्या तरूणाला नेतृत्व दिले होते. त्या आंदोलनात भाग घेतलेल्या व लाठ्या गोळ्या, खाण्यापासून तुरूंगवास भोगणार्‍यांमधले अर्ध्याहून अधिक तरूण समितीचे कार्यकर्ते होते. आणि समितीचा म्हणजे कुठ्ल्याच नोंदलेल्या राजकीय पक्षाला ते बांधील नव्हते. त्यांचे विचार उजवे नव्हते, की डावे नव्हते. महाराष्ट्राचा अभिमान व मराठी अस्मिता, हाच त्यांचा विचार होता आणि मराठीशी त्यांची बांधिलकी होती. मग तिथे तिथे ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य होते, त्या पक्षाचा उमेदवार समिती म्हणून उभा राहिला व जिंकला होता. पण त्याला विजयी करणारा मतदार किंवा त्याच्या निवडणुकीत पदरमोड करून राबलेला अनंत मालवणकर यांच्यासारखा कार्यकर्ता; कुठल्याच पक्षाचा नव्हता. मात्र निवडून आलेले वा त्या भागात पुढाकार घेणारे जे समितीचे म्होरके होते; तेच तरूणांचे नेते झाले होते. आणि त्यांनी मराठीचा झेंडा खांद्यावर घेतला म्हणून तो तरूण त्यांच्या मागे धावत होता, त्यांच्या इशार्‍यावर कर्तव्य म्हणून राबत होता. दोघातही एक असंबद्ध गैरसमज होता. सामान्य तरूणाला त्याचा नेता मरा्ठीचा अभिमानी वाटत होता; तर आपल्या पक्षाच्या विचार भूमिकेशी तो बांधील नेता मात्र सोबत झटणार्‍या तरूणाला आपल्याच विचार-पक्षाचा बांधील कार्यकर्ता समजू लागला होता. यातल्या तरूणाच्या मनाशी एक खुणगाठ बांधलेली होती. कॉग्रेस हा पक्ष वा त्याच्याशी कोणीही मराठीद्रोही आहे. बाकी उरलेले समिती म्हणून मराठी अस्मितावाले; हे गृहित होते. सहाजिकच त्यावेळी निवडणुका आल्या, की आपोआप मराठीचा अभिमानी कॉग्रेस विरोधात समितीच्या बाजूने उभा असायचा. आमच्यासारख्या कोवळ्या वयातल्या पोरांना तर वेगवेगळ्या पक्षांचे स्वरूपही कळत नव्हते.

   गिरणगावात प्रामुख्याने समाजवादी व कम्युनिस्ट यांचे कॉग्रेस विरोधात प्राबल्य होते. अधिक दलित वस्त्या व बाबासाहेबांच्या प्रभावाखाली आलेल्या वस्त्यांमध्ये शेड्युल कास्ट फ़ेडरेशनचे वर्चस्व होते. पुढे बाबासाहेबांच्या इच्छेनुसार रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला; तेव्हा त्याच शेकाफ़ेला रिपब्लिकन असे नवे नाव मिळाले. पण हे तीन गट सोडले तर बाकी राजकारण तरूणांना फ़ारसे माहित नव्हते. १९५७ च्या निवडणूकात दैदिप्यमान यश मिळवणारी समिती नंतर पक्षीय वादातून फ़ुटली आणि जिथे ज्या पक्षाचे प्राबल्य होते, त्याने समितीचा वारसा आपल्याकडेच असल्याच्या थाटात वागायला सुरूवात केली. आमच्या भागात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. आणि आम्ही दहाबारा वर्षाची मुलेही विळाकणिस ही कम्युनिस्टांची निशाणी घेऊन काम करायचो. म्हणून आम्ही कम्युनिस्ट झालो नव्हतो. पलिकडे दादर वा नायगावमध्ये समाजवादी पक्षाचे प्राबल्य समितीमध्ये होते. तिथले तरूण झोपडी निशाणी घेऊन मिरवायचे. वरळी वा नायगाव बीडीडी चाळीच्या परिसरात रिपब्लिकन हत्ती निशाणी तरूणांना जवळची वाटत होती. मग व्हायचे काय? निवडणूका लागल्या, मग आमच्यासारखी मुले भिंती रस्ते रंगवायला मौज म्हणून निघायची. पिट्या म्हणजे पितांबर हडकर आमच्यातला वळणदार हाताचा. नजीकच्या रेल्वे यार्डातून चुनखडी आणून रंग तयार करायचा आणि मोठमोठी विळाकणीस निशाणी रंगवायचे काम आम्ही रिकामपणी करायचो. कोणी त्यासाठी कधी चहा पाजला नाही, की काम करा असे सांगितले सुद्धा नाही. आपण मराठी बाण्याचे तर कॉग्रेसला हरवायचे आणि समितीला जिंकून आणायचे. असे वाटायचे. कशासाठी? त्याची अक्कल होतीच कुठे? समिती कधीच निकाली निघाली हे कुणाला ठाऊक होते? संयुक्त महाराष्ट्र समिती विलयास जाऊन संपुर्ण महाराष्ट्र समिती अशी केवळ डाव्या पक्षांचीच एका आघाडी उरली आहे, त्याचा आम्हा पोरांना पत्ताच नव्हता. अगदी शिवसेनेची सुरूवात झाली तेव्हाही असाच गोंधळ बहूतांश तरूणांच्या मनात होता.  

   १९६२ च्या निवडणुकीत समिती उरलेली नव्हती आणि पुन्हा कॉग्रेसला स्पष्ट बहूमत मिळाले होते. अगदी मुंबईतही कॉग्रेस दणक्यात जिंकली होती. समितीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आणि आपटले. आधीच्या निवडणुकीसारखे विरोधकांना यश मिळवता आले नाही. मराठी मतांची एकजुट राहिली नाही आणि मुंबईतही कॉग्रेसने बाजी मारली, तिथून मराठी तरूणांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. समितीमधले विविध राजकीय पक्ष व नेते परस्परांच्या विरोधात कशाला भांडतात व कॉग्रेसला रान मोकळे देतात, अशी बोचणी त्या मराठी तरूणांच्या मनात होती. पण त्यामागची कारणे कळावी एवढे राजकीय आकलन त्याला आलेले नव्हते. सहाजिकच तो मराठी बाण्याचा तरूण विविध कॉग्रेस विरोधी गटात विभागला गेला होता. मजेची गोष्ट लक्षात घ्या, तो कार्यकर्ताच होता आणि अनेक बिगर कॉग्रेस पक्षासाठी राबतही होता. त्याचे मराठीप्रेम समान होते. पण तो वेगवेगळ्या गटात विभागला गेला होता. जिथे तो राबत होता, त्या पक्षाशी त्याची निष्ठा वा बांधिकली नव्हती. केवळ कॉग्रेस विरोधासाठी तो त्यात्या पक्षात राबत होता. त्याला आपली अशी ओळखच नव्हती. त्या ओळखीच्या शोधात १९६० नंतर तो मुंबईचा मराठी तरूण काही वर्षे चाचपडत होता. तो काय शोधत होता?    (क्रमश:)
भाग   ( १५ )    ४/१२/१२

२ टिप्पण्या: