लहानपणी केव्हातरी आजीकडून ऐकलेल्या गोष्टी आजही आठवतात. त्या बालपणी त्या गोष्टी खुप मजेशीर वाटायच्या. त्या पौराणीक गोष्टीतले राक्षस, देव त्यांचे चमत्कार, त्यांच्या लढाया, त्यांचे खाणेपिणे. सगळेच काही अजब असायचे. जे आसपास कुठे घडताना कधी दिसत नसे. पण आजी अशा काही रंगवून सांगायची त्या गोष्टी, की ऐकायला खुप मजा यायची. जसजशी अक्कल येत गेली तसतसा त्यातला फ़ोलपणा कळत गेला. पुढे पुस्तके वगैरे वाचायला शिकलो, वर्तमानपत्रे व त्यातले शहाण्यांचे लेख वाचले, तेव्हा कळले, की आजी सांगायची तो सगळा भाकड म्हणजे निरर्थक प्रकार होता. कुठल्याही मानवी तर्कशास्त्रात बसणारा किंवा वैज्ञानिक कसोटीला उतरणारा नव्हता. त्यामुळे तो मुर्खपणाही वाटायला लागला. त्यातच एक गोष्ट होती रामायणातल्या खलनायक रावणाच्या एका झोपाळू भावाची. तो म्हणे अगडबंब देहाचा राक्षस होता. एकटाच मोठ्या सैन्याशी लढायचा. प्रचंड गाडाभर अन्न खायचा. आणि झोपला तर कित्येक दिवस उठायचाच नाही. त्याला झोपेतून उठवायचे तर ढोलताशे वाजवून त्याची झोपमोड करायला लागायची. अशी गाढ झोप एकवेळ आपण बघितलेली असू शकते. पण आजीच्या गोष्टीतल्या त्या कुंभकर्णाची झोप भारी गाढ होती. ढोलताशे वाजवणारे म्हणे त्याच्या अंगावरून नाचायचे कवायत करायचे. तेव्हा कुठे त्याचे डोळे किलकिले व्हायचे आणि हळूहळू त्याला जाग यायची. आधी इतका अगडबंब राक्षस अजून कुठे सापडलेला वा कोणी बघितलेला नाही. किंवा त्याच्या इतक्या प्रदिर्घ गाढ झोपेचा पुरावा समोर आला नव्हता. त्यामुळे माझ्या वाढलेल्या अकलेपायी मी आजीची गोष्ट कधीच निकालात काढून वैज्ञानिक अहंकाराच्या निद्रेत गाढ झोपून गेलो होतो. किती वर्षे कोण जाणे. पण गेल्या काही महिन्यात माझ्या लक्षात आले, की मलाच कोणी तरी झोपेतून उठवण्यासाठी भयंकर गोंगाट करते आहे. डोळे थोडे किलकिले केल्यावर लक्षात आले, की देशातले लोक रस्त्यावर उतरून कोणाला तरी जागवायचा प्रयास करत असल्याचा धुमाकुळ चालू आहे. तेव्हा डोळे आणखी थोडे उघडून बघितले; तर एक भलाथोरला राक्षस अस्ताव्यस्त भारत नावाच्या खंडप्राय देशात घोरत पडला आहे. लोक त्याला सरकार म्हणून हाका मारून, गदारोळ करून जागवायचा प्रयत्न करीत आहेत. कर्कश आवाजात ओरडत आहेत, घोषणा देत आहेत, आरोळ्या ठोकत आहेत, त्याच्या अंगावर थयथया नाचत आहेत.
मी माझी बौद्धिक झोप झटकून समोर बघितले तर खरेच तो अस्ताव्यस्त पडलेला राक्षस आळोखेपिळोखे देत होता. पण उठून काही बसत नव्हता. इतक्यात एक अनामिक मुलगी तिथे अवतरली आणि तिने त्याच्या नाकाडावर अशी लाथ मारली, की तो उठून बसला आणि डोळे चोळत समोर कसला गोंगाट चालू आहे त्याकडे बघू लागला. मात्र एव्हाना लोक चिडले होते आणि त्याला धोंडे मारू लागले होते. कारण त्याला जागवण्याच्या नादात लाथ मारणार्या त्या मुलीचा बळी गेला होता. आजीच्या गोष्टीतला तो राक्षस मानवी देहासारखा असेल अशी माझी बौद्धिक समजूत होती. पण राक्षस तसे नसतात. ते अनेक माणसांनी बनलेले, अनेक यंत्रणांनी प्रचंड काम करणारे असू शकतात. आणि बंद पडले मग त्यांना पुन्हा कार्यरत करतांना माणसांचीच तारांबळ उडत असते, असा आजीच्या गोष्टीचा मतितार्थ असणार हे माझ्या लक्षात आले. पण त्यासाठी त्या बिचार्या मुलीचा बळी गेला होता. कुंभकर्णाची झोप ही भाकडकथा नाही, तर ती सत्यकथा आहे याचे मला भान आले. दोन आठवड्यापुर्वी त्या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार झाला, नव्हे होऊ देण्यात आला; त्याला हीच कुंभकर्णाची झोप कारणीभूत आहे. सरकार नावाची राक्षसी यंत्रणा झोपा काढत बसली नसती; तर ही वेळ त्या मुलीवर आली नसती. देशात आज कुठल्याही माणसाला न्याय मिंळत नाही, अशी जी धारणा झाली आहे, त्याला ही सरकारी कुंभकर्णाची झोप कारणीभूत आहे. बलात्कार झाला आणि पहिलाच झाला असेही नाही. पण इतके बलात्कार नित्यनेमाने होत असतानाही सरकारी यंत्रणा जरासुद्धा हलत नसेल तर कुंभकर्ण खोटा कसा मानायचा? बरे तक्रारी होतात, गुन्हे नोंदवले जातात, तपास चौकश्या होतात, खटले चालवले जातात आणि तरीसुद्धा बेछूटपणे बलात्कारांचा सिलसिला चालूच रहातो, तेव्हा सरकार गाढ झोपले आहे याचाच पुरावा मिळत असतो ना?
इतके होऊनही सरकार शांत आहे. उलट आमची झोप कशाला मोडली; म्हणून सामान्य निदर्शकांच्या अंगावर पोलिस घातले जातात, त्याला कुंभकर्ण नाही तर काय म्हणायचे? बलात्काराला एक आठवडा लोटल्यावर गृहमंत्री आपण तीन मुलींचे बाप आहोत अशी ग्र्वाही देतात, पंतप्रधानही तेच सांगतात. त्यामुळे कोणी बलात्कार करायचा थांबत असतो का? मंत्री वा सत्ताधार्यांनाही मुली आहेत, म्हणून बलात्कार थांबल्याचे जगात कुठे उदाहरण आहे काय? पण त्यांच्या मुलीवर असा अन्याय, अत्याचार झाल्यास कायदे नियम धाब्यावर बसवून तिची सुटका केली जाते; याची उदाहरणे नक्कीच आहेत. याच देशातल्या मुफ़्ती महंमद सईद नावाच्या गृहमंत्र्यालाही दोन मुली आहेत आणि त्यापैकीच रुबाया नावाच्या मुलीचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. तिच्या सुटकेसाठी चार खतरनाक जिहादींची मुक्तता करण्याची अट घातली होती. तेव्हा अवघ्या तीन दिवसात त्या जिहादींना मुक्त करून रुबाया सईद यांची सुटका करून घेण्यात आली होती. तेव्हा मंत्र्यांना मुली असून चालत नाही, त्यांच्यावर दुर्घर प्रसंग यावा लागतो, हे आपण विसरून गेलो आहोत. गृहमंत्र्यांनी आपल्यालाही तीन मुली आहेत असे सांगताना; फ़क्त अशा मंत्री व सत्ताधार्यांच्याच मुली या देशात सुरक्षित असू शकतात, असेच सांगितले होते. शिवाय बाकीच्या मुली असतील त्यांच्या सुरक्षेची आपली जबाबदारी आपली नाही; असेच सांगितले नाही काय? आज ती मुलगी, जिच्यावर धावत्या बसमध्ये बलात्कार झालाम ती मृत्यूशी झुंज देताना इहलोकीची यात्रा संपवून मोकळी झाली आहे. तेव्हा तिने कोणता संदेश दिलाय भारतीयांना? प्रत्येकजण मंत्री होऊ शकत नाही, म्हणूनच ज्यांना मुली आहेत ते मंत्री होणार नसतील तर त्यांच्या मुलीची सुरक्षा संपली आहे; हाच तो संदेश नाही काय? कोणाचा सिंगापुरमध्ये मृत्यू झाला? बलात्कारित मुलीचा, की भारत नावाच्या खंडप्राय देशातील कायदा व्यवस्थेचा मुत्यू झाला? कोण मेले आणि कोणावर बलात्कार झालाय? कोणाला तरी या वास्तवाचे भान आहे का? बलात्कार होतो म्हणजे काय?
बलात्कार कुठल्या महिलेवर होत नाही. ती ज्या समाजामध्ये वास्तव्य करत असते, ज्या देशाची नागरिक असते, तिथल्या शासन यंत्रणेवर असा बलात्कार होत असतो. कारण त्या नागरिक स्त्रीच्या देहाच्या सुरक्षेची जबाबदारी तिथल्या शासन यंत्रणेने उचललेली असते. म्हणुनच ज्या देशात इतक्या संख्येने व सहजतेने बलात्कार होतात; ते त्या देशाच्या सरकारचेच धिंडवडे असतात. त्यात महिलेवर होतो, तो केवळ शारिरीक अत्याचार असतो. ती अबला असते. पण ज्याने तिला बळ द्यायचे ते सरकार व कायदा असतो. म्हणूनच बलात्कारी जो अन्याय करतो; तो कायद्याच्या अधिकारावरचा बलात्कार असतो. ज्या शासन व सत्ताधार्यांना आपल्यावरच बलात्कार झालाय त्याचा पत्ता नाही; त्यांना जागे तरी कसे म्हणायचे? ज्या मुलीचा शुक्रवारी मध्यरात्री सिंगापुरच्या इस्पितळात मृत्यू झाला, तिच्यावर नक्कीच लैंगिक हल्ला झालेला आहे, शारिरीक अत्याचार झालेले आहेत. पण तिने आपली अब्रू राखण्यासाठी जीवापाड झुंज दिली व त्यात ती जबर जखमी झाली. त्याच जखमांनी तिचा बळी जरूर घेतला आहे. पण बलात्कार म्हणाल; तर त्या स्वाभिमानी अब्रूदार मुलीवर गुन्हेगार बलात्कार करूच शकलेले नाहीत. कारण तिने त्यांचे बळ झुगारून त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला होता. तिच्या अंगी जेवढे बळ, शक्ती होती, तेवढ्यानिशी तिने प्रतिकार केला, झुंज दिली आणि शुद्ध असेपर्यंत ती झुंजत राहिली. शुद्ध हरपल्यावर झाला; त्याला अत्याचार म्हणता येईल, पण बलात्कार नाही. उलट ज्या सरकारच्या हाती अधिकार आहेत आणि पोलिसांच्या हाती बंदूका आहेत, त्यांना जर समाजात वावरणार्या बलात्कारी गुन्हेगारांना रोखता येत नसेल, तर झाला व होतात, ते बलात्कार त्या सरकार व सत्ताधार्यांवर असतात, जे अब्रूची राखण करायचे सोडून कुंभकर्णासारखे झोपा काढत असतात. होय मित्रांनो, शुक्रवारी अपरात्री मरण पावली व जिच्यावर धावत्या बसमध्ये अत्याचार झाला, तो अपघात होता. तिचा अपघातात बळी गेला. स्वत:ची अब्रू प्राण पणाला लावून राखणार्या स्त्रीवर कोणी बलात्कार करू शकत नाही. तिच्या देहाची लैंगिक विटंबना होते; तो तिथल्या कायदेशीर सत्तेवरला बलात्कार असतो. आणि त्याचा पुरावा पाहिजे कोणाला? बघा, आता हेच सत्ताधारी देशाचा ध्वज अर्ध्या उंचीवर आणून आणि नतमसतक होऊन, माना खाली घालतील लाजेने तिच्या मृतदेहासमोर. ज्या मुलीने करोडो भारतीयांना स्वाभिमानासाठी जागे केले आणि मृत्यूशय्येवर पडलेल्या आपल्या सामुहिक इच्छाशक्तीला जिवंत केले; ती मरेलच कशी? ती तर चीड, संताप, प्रक्षोभ, जाणिव होऊन आपल्या सर्वांच्या मनात तळपते आहे. आता तिला जिवंत ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हाती आहे. तुम्ही तिला मनात जागी व जिवंत ठेवू शकता किंवा मारू शकता. काय विचार आहे? (क्रमश:)
भाग (४१ ) ३० /१२/१२
पण समजा एखाद्या मुलीने आपल्या अब्रूपेक्षा आपलं आयुष्य महत्त्वाचं मानून जर बलात्कारकर्त्यांना विरोध केला नाही, एवढंच नाही तर सहकार्य केलं तर ती कमी अब्रूदार म्हणवेल का? किंबहुना, मुलींना आणि आपल्या समाजाला योनिशुचिता ही एक अति महत्त्व दिली गेलेली गोष्ट आहे हे समजायची गरज आहे. जिथे अत्याचार होत असतो तिथे तर मुलीला अब्रू, लज्जा वाटायचं काहीच प्रयोजन नाही. कारण ज्यात तिची चूकच नाही जिच्यावर उलट अत्याचार होत आहे, तिला लाज का वाटावी? मी व्यभिचार किंवा बेताल वागण्याच्या बाबतीत बोलत नाही आहे किंवा त्याचं समर्थन करीत नाही आहे. पण बलात्कार ही आयुष्य झाकोळून टाकणारी गोष्ट न होता त्यातून लौकरात लौकर मुलींना आणि त्यांच्या कुटुंबाला बाहेर पडता येण्याच्या बाबत बोलत आहे. जिथे प्रतिकार व्यर्थ आहे आणि प्रतिकार न करण्याने स्वतःची कमीतकमी हानी होणार असेल तर तिथे प्रतिकार न करता त्यातून बाहेर पडणं यात काहीच चूक नाही. किंबहुना तो शहाणपणाच ठरेल. मला हे माहित आहे की बोलणं खूप सोपं आहे आणि बहुतांश भारतीय मुलींना पिढ्यांपिढ्यान्च्या मानसिकतेमुळे हे केवळ अशक्य आहे. पण 'शुद्ध' असेपर्यंत झुंज देण्याबाबत आपण म्हटलंत ते पटलं नाही. प्रतिकार न करता अगदी सहकार्य केलं तरी ती मुलगी तितकीच 'शुद्ध' असेल.
उत्तर द्याहटवा