शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

शारिरीक असतो तसाच बलात्कार बौद्धिकही असतो



  सध्या बलात्कारावर मोठाच उहापोह चालू आहे. त्यातच मध्यप्रदेशातील एका महिला शास्त्रज्ञाने किंवा राष्ट्रपतींच्या खासदार चिरंजीवांनी काही मुक्ताफ़ळे उधळल्याने; मोठेच काहूर माजले आहे. पण त्यावर गदारोळ करणारे तरी त्यात मागे असतात काय? रंगभुषा वा नटणेथटणे करणार्‍यांची दिल्लीत निदर्शने चालू आहेत; अशी भाषा अभिजीत मुखर्जी या कॉग्रेस खासदाराने वापरली. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील एक महिला शेती शास्त्रज्ञाने दुसर्‍या टोकाचे विधान करून खळबळ उडवून दिली. जर इतके गुंड अंगावर आले तर त्या मुलीने बलात्कार करू बघणार्‍यांना शरण जायला हवे होते. असे त्या शास्त्रज्ञ महिलेचे म्हणणे आहे. त्यावर तात्काळ काहुर माजवण्यात आले. पण हे कोणी बोलत असेल, तर त्याचे संदर्भ किंवा हेतू कोणी तपासून बघणार आहे किंवा नाही? टोळीच्या तावडीत सापडल्यावर प्रतिकार केल्याने जीवावर बेतले. त्याऐवजी शांतपणे अत्याचार सहन केला असता, तर निदान जीव वाचला असता, असेच त्या महिला शास्त्रज्ञाला म्हणायचे आहे. पण तिच्या म्हणण्याचा अर्थ बलत्काराचे स्वागत करावे असा लावला गेला. लगेच तिला बलात्कार समर्थक ठरवण्याची स्पर्धाच माध्यमात सुरू झाली. शेवटी गुन्हा झाला असेल, तरी त्याचे नुसते पुरावे खटल्यात तपासले जात नाहीत, तर ज्याला आरोपी म्हणून पकडले आहे व ज्याचा विरोधात पुरावे समोर आले आहेत; त्याचा गुन्ह्यामागचा हेतू स्पष्ट होतो किंवा नाही, याचाही शोध घेतला जात असतो, पण इथे हेतू किंवा पुराव्याची कोणाला गरज वाटेनाशी झाली आहे, ज्यांच्या हाती माध्यमे व प्रसार साधने आहेत; त्यांच्या मनात आले, मग एका सेकंदात समोरचा माणूस आरोपी असतो आणि माध्यमांनी आरोप ठेवला, मग त्याच्या विरुद्धचा आरोप सिद्धही झालेला असतो; अशा थाटात सगळा कारभार चालू आहे. माझा त्यालाच आक्षेप आहे. कारण तोही एकप्रकारचा बलात्कारच आहे. त्याला शारिरीक नाही तरी बौद्धीक बलात्कार म्हणायला हवे. 

   ज्या शब्दांसाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्यावर आक्षेप घे्तला जात आहे, त्याच स्वरूपाचे आरोप वा आक्षेप माध्यमातील बड्या लोकांनी सरसकट वापरले आहेत, त्याचे काय? कुठलेही वर्तमानपत्र काढून बघा, त्यात जी तरूणाई रस्त्यावर उतरली तिच्याविषयी व्यक्त झालेली मते मुखर्जी यांच्यासारखीच आहेत. दिल्लीतल्या बलात्कारानंतर जो जनसगर रस्त्यावर उतरला, तो एका नवश्रीमंत वर्गातला आहे आणि खाऊनपिवून सुखी जगणार्‍यांचा आहे, अशी जी टिका सार्वत्रिक माध्यमातून झाली, त्यांना काय म्हणायचे आहे? सुखवस्तू मध्यमवर्ग किंवा नवश्रीमंत वर्गाला न्याय मागण्याचा अधिकार नाही? त्यांच्यावरचे बलत्कार माफ़ असतात काय? जेव्हा गरीबावर अन्याय होतो, दंगलीत मुस्लिमांवर अन्याय होतो; तेव्हा ही नवश्रीमंत वा मध्यमवर्गिय मंडळी कुठे असतात; असे सवाल बहुतांश माध्यमातून विचारले गेलेले आहेत. हे शब्द ज्यांना उद्देशून विचारले गेले आहेत, तोच वर्ग फ़ॅशन करतो. तोच वर्ग रंगभूषा करतो, तोच डिस्कोमध्ये जातो. आणि त्यांनाच माध्यमातले अतिशहाणे नवश्रीमंत म्हणतात आणि अभिजीत मुखर्जी फ़ॅशन करणारे म्हणतात. दोन्ही भाषेचा हेतू एकच आहे; पण शब्द मात्र वेगवेगळे आहेत. मग तोच प्रश्न या माध्यमातल्या दिवट्यांना विचारता येईल. किती दिवट्या माध्यमातल्या शहाण्यांनी खैरलांजीचा बलात्कार उचलून धरला होता, रस्त्यावर येऊन धसास लावायला पुढाकार घेतला होता? त्यावर मोठ मोठ्या बातम्या दिल्या असतील. पण ते तर माध्यमांचे कामच आहे. यातले किती माध्यामवीर रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करीत होते? खैरलांजीच्या दलित, गरीब महिलांसाठी बातम्यातून न्याय मागणारे माध्यमवीर जेसिका लालसाठी मात्र इंडिया गेटपाशी मेणबत्त्या पेटवायला अगत्याने हजर होते. त्यांचा दर्जा ह्या  नवश्रीमंतांपेक्षा वरचा म्हणजे खुपच वरचा असतो. नवश्रीमंतांच्या दहापट अधिक उत्पन्न असलेले दिवटे असले प्रश्न विचारत असतात. 

   यालाच मी बौद्धीक बलात्कार म्हणतो. जेव्हा अशा अतीश्रीमंत वर्गातल्या कुणावर किंवा त्यांच्या अशा बुद्धीमान आश्रितांवर हल्ला किंवा बलात्कार होतो, तेव्हा या कनिष्ठ मध्यमवर्गातून कोणी मदतीला, मोर्चाला आलेले नाही, त्याची ही तक्रार असते. बलात्कार कोणावरही होवो, तो तितकाच भीषण असतो. तिथे दुसर्‍याच्या मनाविरुद्ध त्याच्यावर स्वत:ला लादणे होत असते. आज लोकांमध्ये एका गुन्ह्याविषयी कमालीची चीड निर्माण झालेली असताना; त्याच समाजाच्या मनात दुही माजवण्याचे प्रयास पापावर पांघरूण घालणारेच असतात. जेव्हा मुंबईत वसंत ढोबळे नावाचा पोलिस अधिकारी कुठल्या बेकायदा बीयरबार किंवा हुक्का पार्लरवर धाडी घालत होता, तेव्हा त्याच्या विरोधात प्रचाराची मोहिम चालवणार्‍या माध्यमांचे हेतू शुद्ध होते काय? प्रामुख्याने वाहिन्यांनी ढोबळे यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. व्यसनाधीनता गुन्ह्याला आमंत्रण देत असते. त्यातूनच मुलींवरच्या एकफ़र्ती प्रेमाचे व हल्ल्याचे प्रमाण बेफ़ाट वाढलेले आहेत. त्याला या रेव्ह पार्ट्या अधिक कारणीभूत होतात. त्याच डबक्यातून अशा गुन्हेगारीचे व्हायरस व मच्छरांची पैदास होत असते. त्या डबक्यांच्या विरोधात पोलिसांनी वा कुठल्या संघटनेने चार शब्द बोलले; मग लगेच स्वातंत्र्याची पोपटपंची कोण सुरू करतो? अशा व्यसनाधीनतेच्या विरोधात केलेली आंदोलने, मागण्या किंवा कृती यांना मॉरल पोलिसींग ठरवून त्याची खिल्ली उडवणारे अतिशहाणे कोण असतात? घरोघर जाऊन पोहोचलेल्या टिव्हीवर चिकनी चमेली किंवा मुन्नी बदनाम कोण करत असतो? त्याचे सामान्य मनावर काय परिणाम होतात, याचे भान नसते, त्याला हल्ली बुद्धीमंत म्हणतात काय अशी शंका येते. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यालाच आजचा नवश्रीमंतवर्ग किंवा नवमध्यमवर्ग बळी पडला आहे. 

   पण परवा त्या एका बलात्काराने तोच वर्ग म्हणजे त्यातले तरूण खडबडून जागे झाले आणि रस्त्यावर उतरले; तर त्यांच्याकडे हेटाळणीने बघणारे समाजाचे हितचिंतक असू शकतात काय? आजच्या अशा अराजकाला खरा कोण जबाबदार असेल; तर असे दिवाळखोर बुद्धीमंत व बेजबाबदार माध्यमेच आहेत. कारण त्यांनी स्वातंत्र्य व आधुनिकता यांच्या नावाखाली अनेक मृत्यूचे सापळे तयार करून ठेवलेले आहेत. त्यात मग अनेक मुली, महिला किंवा निरपराध लोक अनवधानाने सापडत असतात. सात आठ वर्षाची मुले लिटल मास्टर म्हणून जे काही नाच करतात, त्यातले हावभाव किंवा गीताचे शब्द त्यांना कळणारे तरी असतात काय? मग त्या कोवळ्या वयात ते एकमेकांकडे ‘आयटेम’ म्हणून बघू लागले तर नवल ते काय? गेल्याच आठवड्यात पुण्याच्या बारामती भागातील बलात्काराची बातमी त्याचा पुरावा आहे. सोळा व अकरा वर्षे वयाच्या दोघा मुलांनी दहा वर्षाच्या मुलीला आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मागल्या पिढीला ज्या वयात बलात्कार हा शब्दही ऐकून माहित नसेल, त्या वयात पुढली पिढी बलात्कार करू लागली आहे. ही कुणाची किमया आहे? आपण काय सांगतो, काय दाखवतो, कला म्हणून काय पेश करीत आहोत, रियालिटी शोमध्ये मुलांना प्रसिद्धीच्या आमिषाने ओढून आणणार्‍यांनी त्याच्या परिणामांचा कधी विचार तरी केला आहे काय? 

   या बौद्धीक बलात्कारानेच सगळा समाज भरकटत चालला आहे. कारण वैचरिक स्वातंत्र्याच्या नावाखाली जे नैतिकतेच अध:पतन करण्याच आजचे बुद्धीमंत हातभार लावत आहेत, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. कोण चांगल्या घरातली. सुसंस्कारातली मुलगी व कोण चटकन उपलब्ध होणारी; यातला फ़रक कळेनासा झाल्यावर श्वापदांसाठी सर्व समाजच शिकारीचे जंगल होऊन गेला, तर नवल नाही. शेवटी आपण एकटे एकटे जगत नसतो, त्याच समाजात जगतो, जिथे भ्रष्ट नजरेचे, अनेक वृत्तीचे लोक वावरत असतात. त्यांच्या वर्तनाची हमी सरकार व कायदा देऊ शकत नसतो. म्हणूनच प्रत्येकाने सावधपणा बाळगणे अगत्याचे असते. त्याचे भान कितीजणांना राहिले आहे? पोलिस व सरकारने आपले काम केले पाहिजे व लोकांना सुरक्षा दिलीच पाहिजे. पण त्या कामात लोकांनीही पोलिसांना सहकार्य करायला नको का? आम्ही धोका ओढवून घेणार आणि सरकार व कायद्याने आम्हाला वाचवावे; अशी अपेक्षा करता येणार नाही. मग होते असे, की अनेकदा अशा वाह्यात गोष्टींशी संबंध नसलेल्यांचाही त्यात बळी पडत असतो. वैचारिक अनाचाराने व बौद्धीक भ्रष्टाचाराने समाजची मानसिकता सडवली आहे. बलात्कार हा त्याचा परिणाम आहे. कारण तुम्ही माणसातल्या पुरूषी मनातले सुप्त नर श्वापद जागवणार असाल; तर त्याच्या परिणामातून सुटका नाही. म्हणूनच रस्त्यावर उतरलेल्या त्या तरूणाईचे स्वागत करायला हवे, की ज्यांच्याकडे उनाड, खोडसाळ किंवा भरकटलेले म्हणूनच बघितले जाते, त्यांनी रस्त्यावर येऊन आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले आहे. माध्यमांनी त्याला भलतीकडे नेण्याचे निदान पाप तरी करू नये, एवढीच अपेक्षा.  ( क्रमश:) 
भाग   ( ४० )    २९/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा