रविवार, ९ डिसेंबर, २०१२

शिवसेना पुरस्कृत किंमत कमी; दादा कोंडके असे का म्हणायचे?





   शिवसेनेचा इतिहास सांगतांना बहूतेकजण १९६६ सालच्या दसर्‍याची पहिलीच मोठी सभा आणि त्यानंतरच्या उडुपी हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचे वर्णन सांगतात. मग एकदम १९६७ सालातल्या सार्वत्रिक निवडणुका किंवा लगेच झालेल्या ठाण्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेली शिवसेना सांगतात. पण मध्यंतरीच्या दिड वर्षाच्या काळात शिवसेना व बाळासाहेब यांचे काय चालले होते? शिवसेना मुंबईत आवाज उठवत होती; पण मुंबईच्या बाहेर पुणे वा नाशिक अशा शहरात शिवसेनेला आपले पाय का रोवता आले नव्हते? अशा प्रश्नांचा उहापोह कधी होत नाही. त्याचे मुख्य कारण तेव्हा आजच्या इतका माध्यमांचा पसारा वाढला नव्हता आणि बारीकसारीक गोष्टी वृत्तपत्रातून छापून येत नव्हत्या. आजच्यासारखी सोळा, बत्तीस पानांची वृत्तपत्रे तेव्हा होतीच कुठे? सहा पानांचा नवशक्ती किंवा मराठा, चार पानांचा नवाकाळ, आठ पानांचा महाराष्ट्र टाईम्स वा लोकसत्ता अशी स्थिती होती. त्याच पानांमध्ये सर्वकाही बसवावे लागत होते. विशेष पुरवण्याही नव्हत्या. मग गल्लीबोळात घडणार्‍या घटनांना त्यात स्थान सहसा मिळत नसे. अशाच गल्लीबोळातल्या कार्यक्रमातून शिवसेना वाढत होती. पण तिची नोंद अभ्यासकांना मिळायची कशी? आज आपण कुठल्या तरी गल्लीत किंवा वॉर्डात मोफ़त वह्यापुस्तक वाटपाचे कार्यक्रम असल्याच्या बातम्या वाचतो. त्याही होण्याआधी घोषणा म्हणून छापून येतात आणि नंतर समारंभ पार पडला म्हणून छापून येतात. अशा कितीतरी गोष्टी तेव्हा शिवसेना शाखेकडून सुरू झाल्या होत्या. क्वचितच त्यातल्या एखाद्या उपक्रमाचा उल्लेख तात्कालिन वृत्तपत्रातून सापडेल.

   शिवसेनेने दाक्षिणात्यांच्या विरोधात आघाडी उघडली होती व त्यासाठी ‘बजाव पुंगी हटाव लुंगी’ अशी घोषणा त्या काळात दिली; हे वारंवार सांगितले जाते. पण त्याच दाक्षिणात्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर शिवसैनिक काय काय करीत होता, याबद्दल कोणी सांगतो काय? उदाहरणार्थ गणेशोत्सवाच्या अगोदर मध्य व दक्षिण मुंबईच्या नाक्यानाक्यावर पडणार्‍या नारळाच्या राशी घ्या. गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास महिला करतात. त्या उपासाच्या निमित्ताने मुंबईत त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शहाळी विकली जायची. त्यासाठी नाक्यानाक्यावर शहाळ्यांचे ढिग घालून लुंगीवाला कोणीतरी अण्णा केरळी बसलेला दिसायचा. तोही लुंगीवाला असल्याने त्याच्या विरोधात काही शिवसैनिकांनी परस्पर आघाडी उघडली. या लुंगीवाल्यांना धंदा करू द्यायचा नाही म्हणून मग आमच्या लालबाग परळ परिसरातल्या बंडू शिंगरे व इतर शिवसैनिकांनी थेट शहाळी विकायचा घाट घातला. पण लुंगीवाला नको असला तरी मराठी महिलांना व्रतासाठी शहाळी हवीच होती. त्यांची गैरसोय करून चालणार नव्हती. मग ठाणे, रायगड जिल्ह्यातून ओळखी काढून हिरवे नारळ आणले गेले. मराठी विक्रेते विकायला बसले. पण त्यांना केरळी विक्रेता जसा धारदार सुरीने शहाळे तासून देतो, ती कला अवगत नव्हती. त्यामुळे या शिवसैनिक विक्रेत्यांची भलतीच तारांबळ उडालेली असायची. अनेकांनी त्यात स्वत:ला जखमी करूनही घेतले होते. तो दाक्षिणात्य सहजगत्या सवयीनुसार मांडीवर नारळ ठेवून सुरी चालवायचा. ती कला मराठी मुलांना अवगत नव्हती. त्यामुळे फ़जिती व्हायची. पण हे तरूण चिकाटीने ठाण मांडून शहाळी विकायला बसले होते. मग कोणाच्या तरी डोक्यातून आयडीया निघाली की घाऊक बाजारातून वस्तू आणुन स्वस्तात विकायच्या. चाळीखाली असलेल्या मोकळ्या जागेत वा मंडळाच्या जागेत साठा करून अशी स्वस्त मालाची विक्रीकेंद्रे निघाली. त्यामागे कुठलीही योजना नव्हती, की नियोजन नव्हते. आपापल्या भागात जसे काही सुचेल ते शिवसैनिक करीत होते.

   अन्य राजकीय पक्षांनी किंवा संघटनेने असे उद्योग कधी केले नव्हते. त्यामुळे या तरुणांची जाणकार कार्यकर्ते टिंगलही करायचे. शिवसेनेच्या एका शाखेत अशी काही टूम निघाली; मग त्याची खबर लागली, की दुसर्‍या कुठल्या तरी शाखेत त्याचे अनुकरण व्हायचे. जीवनावश्यक अशा अनेक वस्तू स्वस्तात किंवा कमी किंमतीत विकणार्‍या केंद्रांचा मग मुंबईच्या भागाभागात सुळसुळाट झाला होता. शिवसेना पुरस्कृत स्वस्त विक्रीकेंद्र अशी ती कल्पना होती. ज्या शाखेला वा तिथल्या तरूणांना जे काही मिळवून स्वस्तात विकणे शक्य आहे; तो व्यापार सुरू झाला होता. यातला ‘शिवसेना पुरस्कृत’ शब्द अतिशय मोलाचा होता. कारण जिथे असा फ़लक असायचा, त्याला महापालिकेच्या धाडी घालणार्‍या गाडीचा त्रास होऊ शकत नसे. त्यामुळे बारीकसारीक मराठी फ़ेरीवालेही ‘पुरस्कृत’ फ़लक लावू लागले होते. त्याचा एक भडका त्याच काळात पश्चिम उपनगरात जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात उडाला होता. तो दाक्षिणात्यांच्या विरोधातला नव्हता; तर भय्या लोकांच्या विरोधातला होता. मराठी विक्रेते फ़ेरीवाल्यांना हुसकण्याचा उद्योग तिथल्या बहूसंख्य उत्तर भारतीय फ़ेरीवाल्यांनी केल्यावर शिवसैनिकांनी त्यात हस्तक्षेप करून मराठी फ़ेरीवाल्यांच्या बाजूने धुमाकुळ घातला. तेव्हा फ़ेरीवाला युनियन समाजवाद्यांची होती. त्यांनी सदस्य भय्यांची बाजू घेतल्याने प्रकरण चिघळले आणि चक्क दंगल झाली होती. मुद्दा इतकाच, की शिवसैनिक म्हणून जे तरूण एकत्र आले होते, ते आपापल्या परीने असे उद्योग करीत होते. आणि त्याची दखल विनोदवीर दादा कोंडके यांनीही घेतली होती.

   त्या काळात दादा कोंडके रुपेरी पडद्यावर आलेले नव्हते. पण त्यांचेही नाव रंगमंचावर गाजत होते. ‘विच्छा माझी पुरी करा’ असे वगनाट्य दादांनी जोरात चालविले होते. त्या तमाशाप्रधान नाट्यामध्ये दादा मूळच्या संहितेमध्ये ताज्या घटना व घडामोडींचा इतका बेमालूम वापर करून घ्यायचे; की त्यावर लोकांच्या उड्या पडायच्या. त्या वगामध्ये एका विवाहाचा प्रसंग त्यांनी रंगवला होता. मग विविध वस्तू दादा मंचावर आणुन ठेवत असतात आणि भटजीला बरोबर आहेत, काय असेही विचारत असतात. त्यात नारळ आणून ठेवल्यावर मागे फ़िरताफ़िरता थांबून दादा भटजीला विचारायचे, हा नारळ केवढ्याचा असेल. मग भटजी काही किंमत अंदाजे सांगायचा. पण दादा मानायचे नाहीत. किंमत कमी कमी करीत इतकी खा्ली आणली जायची, की भटजी तोंडात बोट घालून म्हणायचा, इतका स्वस्त? तेव्हा दादा सांगायचे, मग काय साध्या नेहमीच्या दुकानातला नारळ नाही हा. शिवसेनेच्या विक्रीकेंद्रातला नारळ आहे. तिकडे जायचे, की मागाल ते स्वस्त. किंमत कमी. ‘शिवसेना पुरस्कृत म्हणजे किंमत कमी’. असा टोमणाही दादा हाणायचे. त्याच्या पुढे प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेशी युती केली आणि त्यांच्या उमेदवारांनी शिवसेना पुरस्कृत असे फ़लक लावले होते, त्याचा उल्लेख करून दादा ठोकायचे, ‘प्रजासमावादी पक्ष, शिवसेना पुरस्कृत, किंमत कमी’.

   सांगायचा मुद्दा असा, की शिवाजी पार्कच्या मेळाव्यानंतर शिवसैनिक आपापल्या परीने कामाला लागला होता. त्याला असे वस्तू स्वस्तात विकायचा कार्यक्रम त्याच्या पक्षाने वा संघटनेने दिलेला नव्हता किंवा तशी काही मोहीम संघटनेने आखलेली नव्हती. ही तरूण मुले आपापल्या भागात जमेल तसे काही उद्योग कार्यक्रम करू लागली होती. शिवाजी पार्कच्या दणदणीत सभेने व नंतरच्या थोड्याफ़ार मोडतोडीने जो दबदबा शिवसेना नावाने तयार झाला होता; त्याचा लाभ आपापल्या परीने हे तरूण उठवत होते आणि मराठी नागरिकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेऊ लागले होते. प्रचलित राजकीय चळवळी व पक्षांच्या संघटनांचे काम बघितले, तर हा सगळा प्रकारच हास्यास्पद होता. पण यातून त्या रिकामटेकड्या तरूणांना नियमितपणे एकत्र जमायची सवय लागत होती, त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता नव्हती. पण काहीतरी करायची उत्सुकता, उमेद मात्र प्रचंड होती. त्यामुळे असे काही उद्योग सुरू व्हायचे आणि बंदही पडायचे. पण त्यांची उमेद अजिबात खच्ची व्हायची नाही., आधी कुठेच चुकले त्याचा विचार करून नवे काही सुरू करण्याचे पाऊल उचलले जात होते. त्याला पक्षाची वा नेत्यांची संमती घ्यावी लागत नव्हती, की मान्यता मिळवावी लागत नव्हती. मुंबईभर प्रत्येक भागातल्या शाखा असेच काही स्वतंत्रपणे करीत होत्या. खरे सांगायचे तर मुंबईच्या कानकोपर्‍यात तेव्हा शाखाही स्थापन झालेल्या नव्हत्या. पण जिथे असे तरूणांचे गट होते, ते ‘मार्मिक’मधून वाचून आपले मत बनवित होते आणि उपक्रम चालवित होते. भगवा झेंडा आणि शिवसेना ही चार अक्षरे असली, की बस्स झाले; असाच सगळा प्रकार होता. त्यातून मग दादा कोंडके यांच्याप्रमाणेच अन्य प्रस्थापित पक्षांनीही शिवसेनेची व बाळासाहेबांची गंभीर दखल घ्यायला सुरूवात केली. त्याचा फ़ायदा बाळासाहेबांनी आपल्या भूमिकेचा प्रसार करायला मोठ्या चतुराईने करून कसा घेतला, तीही मनोरंजक बाब आहे.     ( क्रमश:)  
भाग   ( २१ )    १०/१२/१२


३ टिप्पण्या:

  1. Aachrya aatre yancha ek lekh vachanat aala hota, tyamde shivsena ha shabd va sanghatana tyanchi kalpana hoti ase vishleshan hote..........
    Bhau shivsenechya stapanechi mhanje suruvatichi parshvabumi var ekadha lekh liha.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ शिवसेनेची ही अनवट सुरुवात आणि दादा कोंडक्यांचा रोल याची तुमच्या शैलीत माहिती झाली !

    उत्तर द्याहटवा