शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत



 
   अलिकडेच शिवसेनेचा दसरा मेळवा शिवाजीपार्क मैदानावर पार पडला. खरे तर तिथे सभा मेळाव्यांना न्यायालयाने बंदी घातलेली आहे. पण खास बाब म्हणून काही अटी घालून हायकोर्टानेही शिवसेनेच्या या मेळाव्याला परवानगी दिली. मोठी उत्सुकता लोकांमध्ये होती, की बर्‍याच काळानंतर शिवसेनाप्रमुख दर्शन देतील. मात्र त्याबद्दल अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवण्यात आली आणि शेवटी त्यांचे व्हिडीओ चित्रण दाखवण्यात आले. शेहेचाळिस वर्षापुर्वी जिथे त्यांनी पहिले भाषण केले, तिथे बिघडल्या प्रकृतीमुळे शेवटची सभा इच्छा असूनही त्यांना घेता आली नाही. पण याच जागी त्यांनी काही वर्षापुर्वी आपला नातू आदित्य याला लोकांच्या पदरात टाकले होते. शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यात प्रबोधनकारांनीही आपला पुत्र आता महाराष्ट्राला अर्पण केला, असेच सांगितले होते. त्या चित्रित भाषणामध्येही बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्यला संभाळून घ्या; असे आवाहन मराठी माणसाला केले. या निमित्ताने त्यांनी प्रतिकात्मक म्हणून नातवाला तलवार दिली. आदित्यने ती तलवार उपसून दाखवली होती. अर्थात त्यात आता काही नवे राहिलेले नाही. अलिकडल्या दोन दशकात अनेक नेत्यांना मोठ्या समारंभात अशा तलवारी देण्याचे नाट्य रंगवले जाते. त्याने तलवारीसारखे तळपावे, असे त्यातून सूचित करायचे असते. देखावा सोडल्यास त्यातून अधिक काही बोध घेता येत नाही. म्हणूनच साहेबांनी आदित्यला तिथे प्रतिकात्मक रुपाने तलवार दिली होती. पण मुंबई महाराष्ट्रामध्ये हे तलवार बहाल वा भेट करण्याचे तंत्र सर्वात प्रथम शिवसेनेच्या व्यासपिठावरच सुरू झाले होते, हे किती लोकांना आठवते? एका अशाच शिवाजी पार्कच्या मेळाव्यात बाळासाहेबांना सन्मान म्हणून तलवार भेट देण्यात आलेली होती. ती देणार्‍या माणसाचे नाव होते सरदार लाभसिंग चढ्ढा.

   शिवसेनेची सुरूवात झाल्यावर आणि सेनेने निवडणुकीत उडी घेतल्यावर; मतांच्या विजयाने तिला विविध समाजघटकातून मान्यता मिळत गेली. आरंभी मराठी माणसे व पुर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांची असलेली शिवसेना, हळूहळू एकुणच मुंबईकरांची संघटना बनत गेली. त्यात कल्याणचा मुस्लिम शिवसैनिक शब्बीर शेख होता; तसाच दादरच्या गंगाधर निवासमध्ये वास्तव्य करणार्‍या शीख कुटुंबातला अस्खलीत मराठी बोलणारा कोहली नावाचा शीख तरूणही होता. पण त्याला शिख पंजाबी म्हणणे हा त्याच्यासहित शिखांवरही अन्याय होता. कारण त्याचा वेश व पगडी शिखाची असली, तरी तो अस्सल मराठी होता. दिलोजानसे मराठी तरूण होता. त्यावेळी त्याची योगायोगाने ओळख झाली, तेव्हा त्याचे नाव कोळी असेच मला सांगण्यात आले होते. कोळ्यांमध्ये शीख धर्माचा प्रसार कधी झाला, असे तेव्हा मला पडलेले कोडे होते. पुढे त्याच गंगाधर निवास इमारतीमध्ये माझे लालबागचे जुने शेजारी व पुढे दैनिक ‘मराठा’तले सहकारी आत्माराम सावंत वास्तव्याला गेले. तेव्हा तो कोळी नसून कोहली असल्याचा शोध लागला. असे अनेक भाषिक व प्रांतिय शिवसेनेत आरंभीपासून होते. ज्यांना मराठी अस्खलित बोलता येत नव्हते; पण दिर्घकाळ मुंबईचे रहिवासी होते, त्यांचाही त्यात भरणा होता. हा दादरचा कोहली त्यापैकीच एक होता. पण जसजशी शिवसेना निवडणूका जिंकून प्रस्थापित होऊ लागली; तसे अन्य भाषिक मुंबईकरही सेनेत सहभागी होऊ लागले होते. त्यातच लाभसिंग चढ्ढा यांचा समावेश होता. त्या काळात एकदा लोकप्रिय अभिनेत्री वैजयंतीमालाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सहभागी झाली होती. अगदी व्यासपिठावर येऊन बसलेली होती. त्या सभेत ऐन भाषणे चालू असताना मोठा जोरदार पाऊसही पडलेला आठवतो. अशा मेळाव्यात लाभसिंग चढ्ढा असायचा, तसाच एक भय्या अभिनेताही असायचाच.  हिंदी चित्रपटात तेव्हा खलनायकाच्या भूमिका करणारा तिवारी नावाचा नट होता. त्याचेही हिंदी भाषण अनेक मेळाव्यात झालेले होते. प्रत्येकवेळी हा तिवारी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीचे खास कौतुक करायचा. अर्जुनाचे गांडीव धनुष्य, असे त्याचे शब्द असायचे. पहिल्या तीनचार वर्षातच शिवसेनेने अमराठी लोकांना आपल्या जवळ करायला सुरुवात केली होती. लाभसिंग चढ्ढा त्यापैकीच एक.

   त्यातूनच शिवसेनेच्या जवळ एक शीख समाजाचा गट येऊन पोहोचला. पहिल्या मेळाव्यात हे लोक नव्हते. पण तीनचार वर्षानंतर हे अमराठी लोक शिवसेनेत दिसू लागले. अमराठी म्हणजे ज्यांना मराठी बोलता येत नव्हते. पण जे आपण मुंबईकर आहोत, म्हणून स्वत:ला महाराष्ट्राचे भूमीपुत्र मानत होते, असेच लोक शिवसेनेत येऊ लागले. त्यात लाभसिंग चढ्ढा आघाडीवरचा माणूस होता. त्याने प्रथम शिवसेनाप्रमुखांना शिख समाजातर्फ़े सन्मान चिन्ह म्हणून शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर तलवार दिली होती. नुसती दिली नाही तर बाळासाहेबांना ती म्यानातून काढून उंचावून समोरच्या समुदायाला दाखवायलाही भाग पाडले. साहे्बांना अशा गोष्टी सहसा आवडत नसत. पण त्यांनी एक समाज घटकाचा सन्मान म्हणून ते सहन केले असे म्हणता येईल. पुढे काही वर्षे लाभसिंग चढ्ढाचा हा शिरस्ताच झाला होता. शिवाय त्याचे पंजाबी हिंदीतले भाषणही सेनेच्या व्यासपिठावरून व्हायचे. असा प्रकार महाराष्ट्रात सहसा कधी कुठे होत नसे. मराठी प्रथेनुसार फ़ेटा बांधणे हा सन्मान होता. अलिकडे मात्र त्या तलवार भेटीचे फ़ॅड खुप बोकाळले आहे. पण त्याचीही सुरूवात अशी शिवसेनेच्या व्यासपिठावरून झाली. लाभसिंग चढ्ढाच्या शिवसेनेतील वावरण्याने शिवसेना म्हणजे तमाम अमराठी लोकांची शत्रुच आहे; या अपप्रचाराला तडा गेला. हळूहळू अन्य भाषिक व परप्रांतिय, पण मराठीद्वेष न करणारे शिवसेनेत येऊ लागले व सेनेत दिसू लागले. त्याची सुरूवात लाभसिंग चढ्ढा याच्यापासून झाली होती. ती विसरता कामा नये.

   पण ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेने मुंबई महापालिकेत मोठे यश मिळवल्यानंतरच्या आहेत. बर्वे आणि सप्रे यांच्या दोन लोकसभा निवडणुका आणि ठाणे कल्याण येथील पालिका निवडणुकानंतर शिवसेनेकडे लोक गंभीरपणे बघू लागले होते. तेव्हा मुंबईच्या डाव्यांच्या विरोधात शिवसेनेचा कॉग्रेसने वापर केला असे म्हटले जात होते. पण लौकरच ती शिवसेना कॉग्रेसच्याही विरोधात दंड थोपटू लागली होती. त्यात मुंबई शहरासाठी कॉग्रेसमध्ये वेगळी संघटना असण्यावर ‘मार्मिक’मधून झोड उठवली जात होती. अन्य सगळ्या राज्यात प्रदेश कॉग्रेस असते, इथे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश अशा दोन वेगळ्या कॉग्रेस समित्या होत्या. मुंबईच्या कॉग्रेसला बीपीसीसी असे म्हटले जात असे. त्या पदावर जाणिवपुर्वक अमराठी माणुस नेमला जायचा. ठाण्यावर भगवा फ़डकवला आणि सेनेने मुंबई कॉग्रेसवर हल्लाबोल सुरू केला. त्याला महाराष्ट्र कॉग्रेसची फ़ुस असू शकते. कारण मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांना बीपीसीसीचा अध्यक्ष दाद देत नसे. त्यांना या सवत्यासुभ्याची पोटदुखी असल्यास गैर काहीच नव्हते. त्यांनी शिवसेनेला मदत केली वा फ़ुस दिली असेल; यात शंकाच नाही. पण त्याचा लाभ उठवताना सेनेने आपले बस्तान मुंबईत बसवले, म्हणूनच मुंबईचे मराठीपण टिकून राहिले हे कोणी आज अर्धशतकानंतरही नाकारू शकणार नाही. त्या काळात स. का. पाटील हा कोकणी मराठी माणुसच मुंबई कॉग्रेसचा दिग्गज होता. पण त्याला मराठीप्रेम नव्हतेच. अगदी संयुक्त महारष्त्र समितीच्या लढ्यात देखील आवेशात मराठीपणाच्या विरोधात बोलणारा मराठी नेता; अशीच पाटिल यांची ख्याती होती. त्यांनी सेनेच्या काळात मुद्दाम हफ़ीज खान नावाच्या नगण्य माणसाला बीपीसीसीचा अध्यक्ष म्हणुन आणून बसवले होते. ‘मार्मिक’चे तेव्हाचे अंक काढले तर निदान दोनतीन डझन या हफ़ीज खानची व्यंगचित्रे आढळतील. मार्मिकमध्ये आलेली व्यंगचित्रे तात्काळ मोठ्या भिंतीवर रंगवून काढणार्‍या उत्साही हौशी चित्रकारांचा भरणा सेनेमध्ये होता. त्यामुळेच वर्षभरात येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली होती. खरे तर त्या निवडणुका वॉर्डाच्या पुनर्रचनेमुळे खुप लांबलेल्या होत्या. पण ठाणे जिंकल्यावर मुंबईत सेनेची चाचपणी सुरू झाली. त्यात सेनेला प्रजा समाजवादी पक्षाची खुप मदत झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण ठाण्याच्या निवडणुका छोट्या होत्या. त्याच्या तुलनेत मुंबईचे मतदारसंघ आकाराने व संख्येनेही मोठे होते. आणि त्यापेक्षाही विभाग व वॉर्ड अशी सेनेची संघटनात्मक बांधणी तेव्हा अजिबात झालेली नव्हती. ज्याला मराठी बाणा वा अस्मिता म्हणून काही वाटायचे व जो त्यासाठी काहीतरी करायला उत्सुक होता, तो स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घ्यायचा. सहाजिकच दाट वस्तीच्या मध्य व दक्षिण मुंबईत सेनेचा दबदबा तयार झाला होता, तसा उपनगरात नव्हता. पण लाभसिंग चढ्ढाने देण्याआधीच सेनेची तलवार तळपू लागली होती. त्यातूनच मुंबई पालिका लढवायचे सेनेला वेध लागले.(क्रमश:)
भाग   ( २६ )    १५/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा